माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते. ते वाचकांना मनोरंजक वाटेल अशी अपेक्षा आहे.
नासक हिरा
२० जुलै १८३७ ह्या दिवशी लंडनमध्ये अनेक मौल्यवान रत्ने लिलावात विकली गेली. त्यांमध्ये 'नासक' नावाचा एक हिरा आणि एकेकाळी अर्काटच्या नबाबाच्या तिजोरीत असलेले काही दागदागिने ह्यांचाहि समावेश होता. 'नासक' हिरा 'डेक्कन प्राईझ मनी'चे विश्वस्त ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या आज्ञेवरून विक्रीस आला होता. तो विकत घेतला मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टर ह्यांनी. त्यांनी तो आपल्या समारंभांमध्ये वापराच्या तलवारीच्या मुठीमध्ये बसवला. ती तलवार कमरेला लटकावूनच ते नुकत्याच राज्याभिषेक झालेल्या विक्टोरिया राणीच्या वाढदिवस दरबाराला २४ मे १८३८ ह्या दिवशी उपस्थित राहिले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात अगदी ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडपर्यंतच्या वृत्तपत्रांनी ह्या हिराखरेदीची दखल घेतली.
'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे. ह्या नावामागे मराठेशाहीच्या अस्ताच्या दिवसांतले आणि कोणास फारसे माहीत नसलेले मनोरंजक तपशील दडलेले आहेत.
ह्या हिऱ्याला हे नाव का पडलं ह्याची प्रचलित कथा अशी आहे की हा हिरा कोणे एके काळी त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या संपत्तीचा भाग होता. दुसऱ्या बाजीरावानं तो तेथून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विजेत्या इंग्रजांनी तो मिळवला. हिऱ्याचे मूल्य वाढविण्यासाठी कोणीतरी बुद्ध्याच बनवलेली अशी ही कपोलकल्पित कथा दिसते. कसे ते पुढे पाहूच.
खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७ नोव्हेंबर १८१७ ह्या दिवशी पुणं सोडलं आणि पेशवे पुढं आणि इंग्रज मागं अशी शर्यत सुरू झाली. पेशवे पुण्याहून प्रथम नाशिक-खानदेशाकडं गेले. तेथून चांद्याकडं आणि अखेरीस उत्तरेकडं पेशवे सरकत असतांना अखेर सर जॉन माल्कम -महाबळेश्वरातील माल्कमपेठवाला- ह्यानं त्यांना गाठलं आणि अखेर पेशव्यांनी सत्ता सोडून बिठूरास पेन्शन घेऊन राहण्याचं मान्य केलं. पेशव्यांची खाजगी मालमत्ता इंग्रजांनी लढाईतली लूट म्हणून ताब्यात घेतली.
इंग्रजांच्या वतीनं कमिशनर म्हणून पुण्यातून माउंटस्ट्युअर्ट एल्फिन्स्टन सूत्रं हलवीत होता. त्याला कोठूनतरी बातमी लागली की उत्तरेकडं सरकतांना पेशव्यांनी नाशिकला एका विश्वासू व्यक्तीच्या घरात काही जडजवाहिर लपवून ठेवलं आहे. बातमी कळताक्षणी त्यानं आपल्या हाताखालच्या कॅ. ब्रिग्जला हे जडजवाहिर शोधून ताब्यात घेण्याची कामगिरी सोपविली. कॅ. ब्रिग्ज लगोलग नाशिकास रवाना झाला आणि त्या व्यक्तीच्या घराचा शोध घेऊन त्यानं घराची खणती केली. अपेक्षित घबाड त्याच्या हाती लागलं. हे घडलं २ मे १८१८ च्या रात्री. ह्या घटनाक्रमाला आधार आहे तो म्हणजे 'डेक्कन प्राईझ मनी' बाबतचा तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांमधून वेळोवेळी आलेला मजकूर. कोणाच्या घरात हा ऐवज दडविण्यात आला होता हे नाव आज कळू शकत नाही.
'डेक्कन प्राईझ मनी' म्हणजे काय? तत्कालीन रिवाजानुसार परपक्षाचा पराभव झाल्यावर त्या पक्षाची जी काही दौलत विजेत्यांच्या हातात पडेल तिचे सैनिकांमध्ये वाटप करून सैनिकांना खूष ठेवण्याची पद्धत युरोपात रूढ होती. अशा लुटीमध्ये सर्वोच्च राजसत्तेपासून मोहिमेत भाग घेतलेले सर्व अधिकारी आणि सामान्य सैनिकांपर्यंत प्रत्येकाचा दर्जानुसार वाटा असे. हे वाटप कसे करायचे ह्याचेही नियम ठरलेले होते. तदनुसार किरकोळ मूल्याच्या वस्तू जागीच विकून सर्वसामान्य सैनिकांमध्ये ती रक्कम वाटत असत. अधिक मौल्यवान वस्तू, विशेषेकरून जडजवाहिर आणि हिऱ्यांसारख्या वस्तु, इंग्लंडला पाठवून तिथं त्या सरकारजमा होत आणि कालांतरानं योग्य किमतीला त्या विकून त्या रकमेचंहि वाटप होत असे. पेशवाईच्या अस्तानंतर अशा प्रकारे नागपूरकर भोसले, होळकर आणि पेशवे ह्यांच्याकडून इंग्रजांनी बरीच लूट ताब्यात घेतली. त्यांपैकी मौल्यवान अशा वस्तु आणि जडजवाहिर इंग्लंडमध्ये पाठवलं. हाच 'डेक्कन प्राईझ मनी. ह्या रकमेचं व्यवस्थित वाटप व्हावं म्हणून ती ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या ताब्यात विश्वस्त म्हणून देण्यात आली. विश्वस्तांचं ऑफिस ८ रीजंट स्ट्रीट इथं होतं. विश्वस्तांनी आपलं काम कसं केलं ह्याचे अनेक तपशील इंग्लंडमधील तत्कालीन वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनकडं हे काम सोपवलं जाण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. नेपोलियनवर नुकताच विजय मिळवून त्यांनी आपलं इतिहासातलं स्थान पक्कं केलं होतंच. ह्याशिवाय दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा महाराष्ट्राशी चांगलाच परिचय झालेला होता.
थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्याबरोबरच्या अखेरच्या लढाईत इंग्रजांच्या हातात एक खूप मोठी रक्कम आली आणि तिचं वाटप करण्यासाठी तिच्यातला महत्त्वाचा भाग इंग्लंडमध्ये पोहोचला. लुटीतल्या बऱ्याच गोष्टी जागीच विकून रकमेचं वाटप केलं होतं. निवडक निवडक वस्तु ज्या इंग्लंडला गेल्या त्यांमध्ये 'नासक' हिराहि होत. १६ मार्च १८२१ च्या एका वृत्तपत्रात असं नाव दिलेला एक मोठा हिरा इंग्लंडात येऊन पोहोचल्याचा उल्लेख मिळतो. ह्या उल्लेखावरून असं वाटतं की हिरा नाशिकला मिळाला म्हणूनच त्याला 'Nassuck' हे नाव मिळालं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हांच्या सर्व इंग्रजी लिखाणात नाशिकचा उल्लेख Nassuck असाच केलेला आढळतो. ह्या सर्व खजिन्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी विश्वस्तांना बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पुढची पंधराएक वर्षं तरी हे काम चालू असल्याचं दिसतं.
एव्हढा वेळ लागायचं कारण असं की प्रत्यक्ष लूट घेतांना जागेवर असलेले आणि जागी नसलेले तरी ज्यांचं लुटीमध्ये योगदान होतं अशा दोन्ही गटांना वाटा घेण्याचा अधिकार होता पण कोणाचा किती वाटा ह्याबद्दल बरेच मतभेद होते. एकूण मोहिमेचा प्रमुख जनरल हिस्लॉप आणि त्याचा राजकीय वरिष्ठ कलकत्तेकर गवर्नर-जनरल मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. हिस्लॉपची तक्रार होती की आपल्या मागणीकडं पाहण्याचा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा दृष्टिकोण उपेक्षेचा आणि तुच्छतेचा आहे. नाशिकच्या खणतीच्या दिवसातला तिथं उपस्थित असलेला अधिकारी कर्नल मॅकडॉवेलची तक्रार होती की पुण्याहून आलेल्या ब्रिग्जनं त्याला अंधारात ठेऊनच आपला कार्यभाग साधला आणि त्याला न्याय्य हिश्श्यापासून वंचित ठेवलं. अशा एक ना दोन अनेक वादांमुळं हे प्रकरण पुढं पंधराएक वर्षं खदखदत होतं. वृत्तपत्रांमधून आणि पार्लमेंटात अनेकदा त्यावर प्रश्न विचारले गेले. अखेरीस १८३६-३७ साली प्रकरण अखेरीस मार्गी लागलं आणि 'नासक' हिरा विकायला बाहेर आला.
अशी अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेली रक्कमहि तशीच जबरदस्त असली पाहिजे. एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ७२ लाख रुपये इतकी होती. त्यावेळेस सोन्याचा भाव १८-१९ रुपये तोळा होता असं धरलं तर आजच्या किमतीनं ह्या लुटीची किंमत ६-७ अब्जाच्या घरात जाते. हे जरा ढोबळच अनुमान आहे पण रक्कम खूपच मोठी होती एवढं कळायला पुरेसं आहे.
आणखी एका वादाचा इथं उल्लेख करायला हवा. सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यन्तरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे देऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंबईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्राईझ मनीचं वाटप केलं जाऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.
'नासक' हिऱ्याचं पुढं काय झालं? अक्रोडाच्या आकाराच्या ह्या हिऱ्याचं वजन ८९ कॅरटहून थोडं अधिक होतं. त्याचं तेज वाढविण्याच्या हेतूनं त्याला नंतर दोनदा पैलू पाडण्यात आले. हिरा मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या पुढील पिढ्यांच्या ताब्यात पुढची सत्तरएक वर्षं होता. तदनंतर तो तीनचार वेळा युरोप-अमेरिकेत विकला गेला आणि सध्या तो एका धनाढ्य अमेरिकनाच्या मालकीचा आहे. ही शेवटची विक्री १९७० मध्ये झाली. आजची त्याची किंमत सुमारे ३० लाख अमेरिकन डॉलर्स असावी असा तर्क केला जातो. मराठेशाहीचा असा एक अवशेष एका अमेरिकेतल्या तिजोरीत बंद आहे. काळाचा चमत्कार - दुसरं काय?
प्रतिक्रिया
29 Jan 2018 - 7:50 pm | अरविंद कोल्हटकर
हा लेख जुलै ११, २०११ ह्या दिवशी मी प्रथम 'उपक्रम' ह्या सध्या वाचनमात्र असलेल्या संस्थळावर येथे प्रकाशित केला होता. ही माहिती वर नोंदविण्याचे राहून गेले ते काम आता करत आहे.
29 Jan 2018 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक माहिती. भारताचे आर्थिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले किती मोठे खजिने इंग्रजांनी लुटले असतील याची पूर्ण कल्पनाही करणे शक्य नाही. :(
29 Jan 2018 - 8:24 pm | पगला गजोधर
तुमचे लेखं अभ्यासपूर्वक , सचित्र व आटोपशीर असतात.
कृपया तुमचे लेखं तुम्ही एखादी सिग्नेचर वैगरे टाकून, सुरक्षित करा.
29 Jan 2018 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख. माहितीपूर्ण लेखन आवडले.
-दिलीप बिरुटे
29 Jan 2018 - 8:36 pm | विशुमित
रोचक माहिती...
29 Jan 2018 - 8:37 pm | गवि
अतिशय रोचक उत्कृष्ट लेख.
एक प्रश्न पडतो की असे दुर्मिळ महाग आणि नंतर जगप्रसिद्ध झालेले हिरे, पाचू, माणकं, रत्नं हे मुळात पेशवे किंवा भारतीय राजेमहाराजे यांच्याकडे कसं आलं? उदा. हाच नासक हिरा.
30 Jan 2018 - 5:46 am | एकुलता एक डॉन
भारतात हिऱ्याच्या खाणी होत्या म्हणून ?
30 Jan 2018 - 6:04 am | मनो
गवि, १७२६ सालापर्यंत भारत हा हिऱ्यांचा एकमेव मोठा सोर्स होता. जगात दुसरीकडे कुठेच हिऱ्यांच्या खाणी नव्हत्या. ब्रासिल आणि साऊथ आफ्रिका इथे खाणी नंतर सुरु झाल्या. दक्षिण भारतात गोवळकोंड्याच्या राज्यात खाणी असल्यामुळे जगभरचे व्यापारी भारतातून हिरे विकत घेत. तुम्ही तावर्निए अथवा बर्नियर यांचे नाव ऐकले असेल. ते भारतात हिऱ्यांच्या शोधात आले होते. गोवळकोंड्याचा राज्याची जी खंडणी मोगलांना जात असे त्यात हिरे असत.
जहांगीर बादशाहने आपल्या डायरीत आपल्या मुलात कोणते गुण आहेत ते लिहिले आहे - त्याचा मुलगा बाबा खुर्रम (म्हणजे शहाजहान) याला हिऱ्यांची उत्तम पारख होती. (ती डायरी मोठी मजेशीर आहे पण तो वेगळा विषय आहे) असा हिऱ्यांचा खजिना अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांनी सतत १०० वर्षे जमवला होता. औरंगजेबाला जमवण्यात काही रस नव्हता पण त्याने आहे तो जपून ठेवला. मग १७३९ साली नादिरशाहने सगळी रत्ने लुटली. ती शीख, इराणी, रशियन, अफगाण आणि आता कतार, कुवेत इथेही सापडतात. काही पाचूंवर आपल्याला या सगळ्या मालकांची नवे कोरलेली सापडतात (अकबर - जहांगीर - शहाजहान - औरंगझेब - नादीर शाह अफसर - अहमद शाह अब्दाली) त्यातून आपल्याला हा इतिहास कळतो. एक लेख टाकेन निवांत कधी तरी यावर.
आज जसे लोक गुंतवणूक म्हणून सोने अथवा जमीन घेतात तसा हिरे हा मातबर लोकांसाठी एक गुंतवणुकीचा मार्ग होता आणि स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा मार्ग देखील. मराठ्यांनी निझामाला नमवून बऱ्याचदा खंडणी घेतली. इतरही प्रांतात दरवर्षी चौथाई वसूल केली. त्यामुळे त्यांच्याकडे १०० वर्षांच्या राजवटीत पैसे आणि हिरे जमलेच होते. पुष्कळदा सैनिकी खर्च वारेमाप होई आणि उत्पन्न पुरे पडत नसल्यामुळे कर्ज घायची वेळ येई ती गोष्ट वेगळी, पण खेळते भांडवल बरेच होते.
30 Jan 2018 - 6:06 am | मनो
हे राहिलेच टाकायचे.
अगदी आजही भारताच्या एक्सपोर्ट मध्ये हिऱ्यांच्या मला वाटते १०% वाटा आहे. सुरत हे जगातले मोठे हिऱ्यांचे केंद्र आहे - त्यामागे हा इतिहास आहे. कित्येक पिढ्यांपासून सुरतमध्ये हे काम होते.
30 Jan 2018 - 7:51 am | शेखरमोघे
भारताच्या सध्याच्या हिऱ्यांच्या एक्सपोर्टमधला बराच भाग re-exportचा आहे. Rough Diamonds वेगवेगळ्या देशातून भारतात आयत झाल्यावर सुरतेत त्याना पैलू पाडले जातात.
30 Jan 2018 - 6:58 am | गवि
खूप आभार. आणखीनच रोचक माहिती दिलीत. आता त्या जहांगीरच्या डायरीबद्दल माहिती मिळवली पाहिजे.
या विषयावर आणखी लेखनाच्या प्रतीक्षेत आहे.
30 Jan 2018 - 7:43 am | मनो
दोन लेख सापडले . पहा आवडतात का.
http://madhukidiary.com/jehangir-the-curious-emperor-from-jahangir-nama/
आणि
http://www.livemint.com/Leisure/VP1pnZYhc8q2s6A3U42QzI/The-naturalist-wi...
30 Jan 2018 - 7:55 am | गवि
अवश्य. लगेच वाचतो.
बादवे त्या खाणींवरुन आठवलं. आता भारतातल्या त्या खाणी आटल्या का? नवीन सापडल्या नाहीत का? (गोवळकोंडा हे नाव एका ब्रैंडीमुळे लोकांत टिकून राहिलंय ते माहीत आहे) ;-)
30 Jan 2018 - 8:08 am | मनो
खाणी संपल्या, गेले ते हिरे, आता राहिले फक्त दगड (आणि ब्रांडी !!!) ☺️
30 Jan 2018 - 12:18 pm | रमेश आठवले
कुतुबशाही राज्यांची राजधानी गोलकुंडा किल्लयाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारपेठेत हिऱ्याची विक्री होत असे. पण तेथे हिरे सापडत नसत. तेथून जवळ वाहणाऱ्या कृष्णा आणि पालार या नद्यात वाहत येणाऱ्या वाळूतून पॅनिंग करून ते निवडले जात . गोलकुंडा अथवा त्या जवळपास कुठेही हिऱ्याच्या 'खाणी' नव्हत्या..
31 Jan 2018 - 4:15 pm | एस
पन्ना येथे हिऱ्यांची खाण होती. सध्या ती बंद आहे असे वाटते. सेम विथ कोलार सोन्याची खाण.
31 Jan 2018 - 11:06 pm | रमेश आठवले
किंबरलाईट नावाचा एक अश्मांचा प्रकार आहे. त्यात हिरे नैसर्गिकरीत्या असू शकतात. अशा दगडामध्ये हिऱ्या खाणी असतात. पन्ना जवळ माझगाव येथे अशा प्रकारचे दगड आहेत. कृष्णा व पलार या नद्यांच्या उगमा पर्यंतच्या भागा पर्यंत हे दगड असायला पाहिजेत. पण अजून पर्यंत सापडलेलेले नाहीत . फार पुरातन असल्याने त्यांची खूप झीज झाली असणार. दगडांची वाळू झाल्यावर ती वाळू आणि तिच्याबरोबर न झिजणारे खडे ( हिरे ) नदीच्या पात्रात वाहत जात असले पाहिजेत.
30 Jan 2018 - 10:40 am | ss_sameer
मूळ लेख तर भन्नाट आहेच पण यात देखील मजा आली,
इतिहास सांगणारा लेख लवकर आणा.
प्रतीक्षेत आहोत
29 Jan 2018 - 8:50 pm | श्रीगुरुजी
रोचक माहिती
30 Jan 2018 - 7:33 am | manguu@mail.com
सुंदर .... भरपूर लिहा.
30 Jan 2018 - 8:13 am | शेखरमोघे
सुन्दर महितीपूर्ण लेख. पेशव्यान्च्या उत्तरेतल्या मोहिमा कर्ज काढूनच झाल्या होत्या. सदाशिवरावभाऊ पानपतावर जो काही ऐवज घेऊन गेले तो परत आला नाही. राघोबादादा, नानासाहेब पेशवे यान्च्या "छन्दात" काही जड जवाहिर वापरले गेले असेलच. "नासक" सारख्या अनेक कथा लिहिण्यासारख्या असाव्यात!!
30 Jan 2018 - 8:25 am | गवि
हरल्यास जवळचे सारे धन शत्रूकडून लूट म्हणून जप्त होत असल्याची पद्धत होती तर मग हे कर्ज देणं ही मुळात फारच मोठी रिस्क असणार. कोण होते हे जिगरबाज बाजीगर सावकार ? की त्यांनाही कर्ज न देण्याचा चॉइस नव्हताच?
राजाचाच मल्ल्या झाल्यास ते दाद कुणाकडे मागत असावेत? रिकव्हरी अवघडच असणार.
30 Jan 2018 - 8:52 am | manguu@mail.com
लॉटरीसारखे असेल.
म्हणजे असे धनको भरपूर लोकाना कर्जे देत असतील. कुणाचे परत येतील , कुणाचे जातील.
30 Jan 2018 - 9:09 am | मनो
नाही गवि, व्याज जबरदस्त असे, रिस्क जास्त म्हणजे रिवार्डस पण जास्त होते. काही सावकार फौजबंद असत. पेशव्याचे सावकार बाबूजी नाईक बारामतीकर. त्यांची मुलगी काशीबाई बाजीरावाची बायको. बारामतीकरांचे थेट छत्रपतींशी कॉन्टॅक्टस होते. त्यांचा वडगाव काशिंबेग इथे मोठा वाडा आणि मंदिरही आहे.
पटवर्धन हे सुदधा पेशव्याचे सावकार. मिरजेच्या किल्ला आणि ठाणें त्यांच्या ताब्यात होते. सामान्य माणसाने पडण्याचा तो धंदा नव्हता.
शिवाजी महाराजांनी सुरतेत लुटले ते मोठे सावकारच. बहरजी बोहरा आणि विरजी व्होरा. शांतीदास या सावकाराचे लागेबांधे पार शहाजहान बादशहपर्यंत होते - शहजादा औरंगझेब याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत आणि ताकद शांतीदास सावकाराकडे होती.
राज्य बदललं तर जुन्या राज्याची कर्जे नवीन राजवटीवर लागू नसत. बापाचे कर्ज मुलाला द्यावे लागे. पण नवीन शाखा जसे दुसऱ्या बाजीरावाचे राज्य चालू झाले तेंव्हा त्याला आपल्या पूर्वीचे म्हणजे सवाई माधवरावाच्या काळचे कर्ज द्यावे लागले नाही.
मरते समयी थोरला माधवराव याला चिंता होती कर्जाची. कर्जे फेडू अशी जबाबदारी इतरांनी घेतल्यावरच त्याने प्राण सोडले. तसेच नाना फडणीसाच्या मृत्यूनंतर अरब शिपायांची थकबाकी ही दुल्लभशेठ या सावकाराने घेतली.
सावकारीसंबंधी हे काही विस्कळीत किस्से. माझ्या आठवणीतून लिहितो आहे त्यामुळे थोडेफार तपशील चुकलेले असतील, पण तुम्हाला एकूण अंदाज येईल. लिहून टाका एखादी फर्मास कथा याच्यावर ☺️☺️☺️
30 Jan 2018 - 8:57 am | प्रचेतस
अप्रतिम लेख.
कॅप्टन ब्रिग्ग्स उल्लेखावरुन आठवले की ह्याच कॅ. ब्रिग्ग्सने १८१८ साली नाशिकमधील काही किल्ले पायर्यामार्ग फोडून उद्ध्वस्त केले. मात्र तो त्र्यंबकेश्वजवळील हरिहर किल्ला जिंकण्यासाठी आला असता त्याला हरिहरच्या आभाळात घुसलेल्या पायर्यांनी इतके प्रभावित केले की त्याने हा पायरीमार्ग उद्ध्वस्त केलाच नाही. आजही इकडील बहुतेक किल्ल्यांचे पायरीमार्ग उद्द्वस्त झाले असता हरिहरच्या देखण्या पायर्या आजही पाहता येतात.
30 Jan 2018 - 10:56 am | ss_sameer
रस्ता कसा आहे किल्ल्यापर्यंत?
कसे जावे लागेल?
31 Jan 2018 - 8:20 am | प्रचेतस
त्र्यंबकेश्वर हर्षवाडी किंवा त्रयंबकेश्वर निरगुडपाडा.
हर्षवाडी मार्गे थोडं जवळ पडेल. पायर्यांपर्यंत रस्ता सोपा आहे. पायरीमार्ग मात्र काहीसा कठीण आहे.
30 Jan 2018 - 10:01 am | अभिजीत अवलिया
रोचक माहिती.
हरिहरच्या किल्ल्याला जावे लागेल लवकरच पायर्या बघायला.
30 Jan 2018 - 10:14 am | सुमीत भातखंडे
सुंदर लेख
30 Jan 2018 - 10:22 am | पैसा
सगळे वाचताना उदास वाटते. लढून झगडून माणसे मरून गेली. हिरे मात्र एका तिजोरीतून दुसरीत फिरत राहिले.
30 Jan 2018 - 11:11 am | अनिंद्य
@ पैसा, अगदी असेच वाटले मला ही :-(
31 Jan 2018 - 3:23 am | तिमा
लढून झगडून माणसे मरून गेली. हिरे मात्र एका तिजोरीतून दुसरीत फिरत राहिले.
हे अटळच आहे. हिरा कधी नाश पावत नाही. तो ज्याच्याकडे असतो त्याला मात्र, आपणच त्याचे कोंदण आहोत असं वाटत असतं. कोंदण नाशवंतच असतं.
30 Jan 2018 - 11:10 am | अनिंद्य
लेख आणि प्रतिसाद दोन्ही रोचक, विशेषतः मनो यांचे, सावकारी व्यवसायाबद्दलचे.
राजकीय इतिहासात सामाजिक इतिहास झाकोळला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या कालखंडात 'समाज' कसा होता, काय करत होता ह्याबद्दल माहिती परोक्ष आणि कमी असते.
30 Jan 2018 - 11:46 am | बिटाकाका
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख! कोल्हटकर, मनो - मनःपूर्वक आभार. लेखमाला आली तर काय मज्जा येईल!
30 Jan 2018 - 2:31 pm | सुखीमाणूस
+१११११
30 Jan 2018 - 9:42 pm | कुमार१
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख
आवडला
31 Jan 2018 - 3:09 am | रुपी
छान माहितीपूर्ण लेख. प्रतिसादांमधूनही सुरेख माहिती मिळाली.
31 Jan 2018 - 3:27 am | मुक्त विहारि
आणि "मनो" ह्यांचा प्रतिसाद पण आवडला....
31 Jan 2018 - 9:18 am | शेखरमोघे
पेशव्यान्चे आणखी दोन सावकार - वर्तक आणि अनगळ यान्च्या जमिनी (आणि नन्तर त्यावर बान्धलेल्या इमारती) अजुनही पुण्यात आहेत. जबर व्याजाखेरीज हे सावकार आपल्या वजनाचा उपयोग करून थोडक्या किमतीत "सरकारी" फायदे मिळवण्याचाही उद्योग करत असावेत.
31 Jan 2018 - 10:44 am | सुखीमाणूस
शालेय इतिहासात न आलेल्या रोचक गोष्टी वाचायला मजा येते.
पुर्वीचे राजे राजवाडे आणि आताचे राजकारणी सारखेच हव्यासी.
प्रजेचे हित पाहणारे अगदी थोडे.
31 Jan 2018 - 1:31 pm | मुक्त विहारि
त्यातील कंठशिरोमणी म्हणजे...छत्रपती शिवाजी महाराज...
31 Jan 2018 - 9:55 pm | खटपट्या
रोचक
1 Feb 2018 - 12:20 pm | मनो
दुसऱ्या बाजीराव पेशव्यासंदर्भात ब्रम्हावर्त म्हणजे बिठूर इथले काही किस्से नुकतेच वाचले. आधी कुणी त्याबद्दल लिहिलंय का?
बरेच लोक वाचायला उत्सुक असतील तर मी एक नवीन धागा काढतो ...
1 Feb 2018 - 12:31 pm | बिटाकाका
नारायणराव पेशव्यांच्या भुताने दिलेल्या त्रासाबद्दल थोडेफार वाचलंय पण तुमचे किस्से वाचायला आवडेल.
1 Feb 2018 - 1:12 pm | सुखीमाणूस
येउद्या लवकर
2 Feb 2018 - 5:50 am | मनो
अर्धा भाग झाला लिहून. २ दिवसात टाकतो ...
2 Feb 2018 - 2:09 pm | सुचिता१
नेकी और पुँछ पुँछ ? अवश्य लिहा .
1 Feb 2018 - 2:25 pm | जागु
माहितीपूर्ण लेख.