डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

Primary tabs

कल्पक's picture
कल्पक in जनातलं, मनातलं
28 Jan 2018 - 9:47 pm

गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत. लवकरच रचित बुद्धिमत्ता (artificial intelligence), आभासी वास्तव (virtual reality), यंत्रमानव (robots) या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होणार आहेत. एकीकडे हे आधुनिक आणि अवाढव्य तंत्रज्ञान आणि दुसरीकडे कमी-जास्त शिकण्याची क्षमता असलेले सामान्य लोक या दोन ध्रुवांना जोडण्याचं काम युजर एक्सपीरिअन्स डिजाईन करतं.

युजर एक्सपीरिअन्स डिजाईन प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायची झाल्यास असं म्हणता येईल की, लोकांना (किंवा संभाव्य वापरकर्त्यांना) उत्पादनाकडून किंवा सेवेकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या सध्याच्या अडचणी काय आहेत? त्यांच्या गरजा काय आहेत? अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचं निरीक्षण करून केला जातो. ह्या माहितीच्या आधारे उत्पादनाची संकल्पना तयार केली जाते. ही संकल्पना पुन्हा लोकांना दाखवली जाते. आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन उत्पादनाची अंतिम रचना तयार केली जाते. प्रत्येक उत्पादन आणि सेवा लोकांना सुलभ आणि आनंददायी व्हाव्या या साठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन उपयोगाला येतं. व्यापक आणि धोरणात्मक पातळीवर जेव्हा ही प्रक्रिया वापरली जाते तेव्हा तिला 'डिजाईन थिंकिंग' असं म्हणतात.

नव्वदच्या दशकात अमेरिकेत युजर एक्सपीरिअन्स डिजाईन ही कल्पना एका परिषदेत मांडली गेली. डिज़ाइनर्सनी त्यांच्या स्टुडिओच्या बाहेर पडून वापरकर्त्याचा (user) अभ्यास केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने उत्पादनाची किंवा सेवेची उपयुक्त रचना केली पाहिजे असा विचार ठामपणे मांडल्या गेला. भारतात कला आणि डिजाईनच्या शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा आहे. कालांतरानी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन विषयक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ऐंशी-नव्वदच्या दशकात संगणक क्रांतीमुळे आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे भारतात अनेक माहिती तंत्रज्ञान-सॉफ्टवेअर कंपन्या उदयाला आल्या ज्या प्रामुख्यानी पाश्च्यात्य ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर तयार करू लागल्या. हे सॉफ्टवेअर वापरायला सुलभ आणि आनंददायी असावे यासाठी युजर एक्सपीरिअन्स डिज़ाइनर्सची गरज भासू लागली आणि त्यातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या. हे युजर एक्सपीरिअन्स डिजाईनर्स (कंपनीच्या नफ्यासाठी आणि पर्यायानी उत्तम पगारासाठी) जरी पाश्चात्य ग्राहकांसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन करत असले तरी भारतीय लोकांना उत्पादन-सेवा सुलभ पद्धतीनी, स्वतःच्या भाषेत कशा प्रकारे वापरता येतील यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुद्धा सुरु झाले.

काही वर्षांपूर्वी संशोधकांची एक टीम म्हणून आम्ही भारतातल्या अर्धशिक्षित-अशिक्षित लोकांना मोबाईल फोनच्या फोनबुक मध्ये नंबर साठवतांना काय अडचणी येतात याचा अभ्यास केला. त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातल्या अनेक लोकांना जाऊन भेटलो, ते फोनबुक कसं वापरतात याचं निरीक्षण केलं. यातून आम्हाला असं लक्षात आलं की अर्धशिक्षित-अशिक्षित लोकांना फोन नंबरची सांगड अक्षरांसोबत घालण्यापेक्षा चित्र-रंग-चिन्ह यांच्याशी घालणं जास्त सोपं वाटत होतं. ते मित्र-नातेवाईकांचे नंबर दैनंदिन जीवनातले फोटो, चिन्ह यांच्याशी जोडण्यास उत्सुक होते. यातूनच पुढे आम्ही ९ चिन्ह आणि ९ रंग वापरून एकही अक्षर न लिहिता ८१ फोन नंबर साठवणाऱ्या दृश्य फोनबुकचे डिजाईन करू शकलो. अशिक्षित लोकांसाठी कोणतेही अक्षर न वाचता आवाज आणि दृश्य स्वरूपाचा मोबाईल फोन तयार करता येईल का असाही प्रयोग करण्यात आला.

आज भारतात संगणक, इंटरनेट आणि मोबाईल फोन्स यामुळे औद्योगिक आणि सामाजिक स्तरावर क्रांतिकारी बदल होत आहेत आणि उद्या कदाचित रचित बुद्धिमत्ता आणि रोबोट्सचा सुद्धा वापर होईल. लोकांच्या समस्या तंत्रज्ञानाचा वापर करून कशा सोडवता येतील यासाठी अनेक प्रयोग चालू आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक मोबाईल ऍप्स, वेबसाईट्स, मदत क्रमांक तयार करण्यात आले आहेत. शहरात लोकल रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी अनेक मोबाईल ऍप्स, वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत. किराणा सामान घरपोच देणारे मोबाईल ऍप्स निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात जिल्ह्याच्या आठवडी बाजारात भाजीचा दर काय आहे हे कोणत्याही दलाला शिवाय छोट्या गावातल्या शेतकऱ्याला मोबाईल ऍप द्वारे कळवता येईल का असा प्रयोग चालू आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी सार्वजनिक सुविधांसाठी अनेक मोबाईल ऍप्स आणि वेबसाईट्स तयार केल्या आहेत. डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत ग्राम पंचायती, जिल्हा परिषदा, राज्य आणि केंद्र सरकार हे ब्रॉडबँड इंटरनेटद्वारे जोडून प्रभावी आणि गतिमान कामकाज करण्यासाठी प्रयोग चालू आहेत. शाळेतले शिक्षक आणि पालकांना नियमित संवाद साधण्यासाठी मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडिया वेबसाईट्सचा वापर होत आहे. पोलीस खात्याद्वारे मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडियाचा परिणामकारक वापर होत आहे. शाळा, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, बँका, लघुद्योग अशा संस्थांमध्ये संगणक, मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या ३० वर्षात भारतातील खूप मोठी लोकसंख्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन आणि सेवा वापरायला लागणार आहे. हे सगळं तंत्रज्ञान लोकांना सुलभ, स्वभाषेत आणि आनंददायी होण्यासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन अतिशय महत्वाचं ठरणार आहे. त्या अनुषंगाने भारतीय युवकांसाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन क्षेत्रात नोकरी, व्यवसाय आणि संशोधनाच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. थोडक्यात भारताच्या तंत्रज्ञान विषयक सबलीकरणासाठी आणि डिजिटल भारताच्या यशासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन हा महत्वाचा मूलमंत्र ठरणार आहे.

निखिल वेलणकर
युजर एक्सपीरिअन्स स्ट्रॅटेजिस्ट
@nikhilwelankar

तंत्रविज्ञानलेखमाहिती

प्रतिक्रिया

सुखीमाणूस's picture

29 Jan 2018 - 10:46 am | सुखीमाणूस

यासाठी काही वेगळे शिक्षण घ्यावे लागते का?

कल्पक's picture

3 Feb 2018 - 12:51 am | कल्पक

हा लेख पहा https://www.misalpav.com/node/27069

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2018 - 10:50 am | चौथा कोनाडा

छान वाचनिय लेख आहे. माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी ही विशेष माहिती आहे !

काही वर्षांपूर्वी संशोधकांची एक टीम म्हणून आम्ही भारतातल्या अर्धशिक्षित-अशिक्षित लोकांना मोबाईल फोनच्या फोनबुक मध्ये नंबर साठवतांना काय अडचणी येतात याचा अभ्यास केला. त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातल्या अनेक लोकांना जाऊन भेटलो, ते फोनबुक कसं वापरतात याचं निरीक्षण केलं. यातून आम्हाला असं लक्षात आलं की अर्धशिक्षित-अशिक्षित लोकांना फोन नंबरची सांगड अक्षरांसोबत घालण्यापेक्षा चित्र-रंग-चिन्ह यांच्याशी घालणं जास्त सोपं वाटत होतं. ते मित्र-नातेवाईकांचे नंबर दैनंदिन जीवनातले फोटो, चिन्ह यांच्याशी जोडण्यास उत्सुक होते. यातूनच पुढे आम्ही ९ चिन्ह आणि ९ रंग वापरून एकही अक्षर न लिहिता ८१ फोन नंबर साठवणाऱ्या दृश्य फोनबुकचे डिजाईन करू शकलो. अशिक्षित लोकांसाठी कोणतेही अक्षर न वाचता आवाज आणि दृश्य स्वरूपाचा मोबाईल फोन तयार करता येईल का असाही प्रयोग करण्यात आला.

उल्लेखनिय प्रयोग !

कल्पक's picture

3 Feb 2018 - 12:52 am | कल्पक

धन्यवाद

युझरला काय पाहिजे हे ओळखण्यात छोट्या कंपन्या अग्रेसर होत्या. त्यांनी मोबाइलमध्ये आणलेल्या गोष्टी बाहेरच्या नोकिया/सॅमसंगने घेण्यात वेळ लावला.
माइक्रोमॅक्स यात हुशार आहे.
आता डिटेल ही कंपनी पुढे येत आहे. सविस्तर नंतर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2018 - 4:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

उपयोगी आहे या गृहितकावर किंवा अगदी हौस म्हणूनही एखादे सेवा/उत्पादन प्रथम विकत घेतले जाऊ शकते. मात्र, सेवा/उत्पादन तंत्रदृष्ट्या कितीही चांगले असले तरी, त्याच्यामुळे अपेक्षित काम किती सहज, सुलभ आणि कार्यक्षमतेने होते (आणि पर्यायाने संस्थेचा/व्यक्तीचा वेळ/श्रम/पैसा यांची किती बचत होणे) यावर त्याचा उपयोग भविष्यात चालू राहणे न राहणे अवलंबून असते. अर्थातच, दीर्घकालीन व्यापाराच्या (सेल आणि रिसेल) दृष्टीने प्रत्यक्ष वापरकर्त्याचा अनुभव (युजर एक्सपिरियन्स) सर्वच सेवा-उत्पादनांच्या व्यापाराच्या केंद्रस्थानी असला पाहिजे.

याला एकच (सन्माननिय नसलेला) अपवाद म्हणजे मक्तेदारीने (मोनोपॉली) कब्जात ठेवलेले सेवा/उत्पादन. त्यासंबंधात उपभोक्त्याला पर्याय नसल्याने नाईलाजाने जे मिळेल ते निमूटपणे स्विकारावे लागते. या वस्तूस्थितीचा अनुभव आपल्याला आहेच. मात्र, खुल्या होत चाललेल्या अर्थव्यवस्थेबरोबर येणार्‍या स्पर्धेमुळे अनेक क्षेत्रातली मक्तेदारी मोडीत निघालेली आहे/निघत आहे. त्यामुळे, भारतातल्याही व्यवसायाना आता वापरकर्त्याच्या सोईसुविधांचा विचार करणे भाग पडत आहे. हे जो सेवा/उत्पादन पुरवठादार सर्वप्रथम करेल तो पुढे जाईल... त्यानंतर त्याच्या स्पर्धकांना नाईलाजाने का होईना तसे करावेच लागेल, अन्यथा बुडीतखात्यात जावे लागेल.

कल्पक's picture

3 Feb 2018 - 12:55 am | कल्पक

धन्यवाद! बरोबर.

manguu@mail.com's picture

29 Jan 2018 - 7:25 pm | manguu@mail.com

छान

कल्पक's picture

3 Feb 2018 - 12:55 am | कल्पक

धन्यवाद!

मदनबाण's picture

4 Feb 2018 - 10:33 am | मदनबाण

वाचनिय लेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italiano

कल्पक's picture

9 Feb 2018 - 3:33 pm | कल्पक

धन्यवाद

पैसा's picture

4 Feb 2018 - 1:14 pm | पैसा

उपभोक्ता, वापरकर्ता हाच केंद्रस्थानी असला पाहिजे. ते लक्षात न घेता आम्ही देतो ते घ्या म्हणून बसलेल्या नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन्सची अवस्था म्हणूनच खराब झाली.

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2018 - 10:35 am | चौथा कोनाडा

+१

खरं तर नोकिया या कंपनीनी वापरकर्त्यांविषयी खूप संशोधन केलं होतं आणि त्यांच्याकडे संशोधकांची अक्षरशः फलटण होती. २००८ साली जेव्हा मोबाईल विषयक परिषदेसाठी ऍमस्टरडॅमला गेलो होतो तेव्हा नोकियाचे अनेक संशोधक तिथे आले होते. पण खूप दूरगामी आणि खूप वेळ घेऊन संशोधन करण्याच्या (युरोपिअन कार्यसंस्कृतीला अनुसरून) वृत्तीमुळे टचस्क्रीन स्मार्टफोन हा एक क्रांतिकारी टप्पा त्यांना योग्य वेळेत गाठता आला नाही जो इतर कंपन्यांनी (विशेषतः ऍप्पल आणि गुगल) गाठला आणि नोकियाला मागे टाकलं.

महेश हतोळकर's picture

8 Feb 2018 - 12:35 pm | महेश हतोळकर

ते लक्षात न घेता आम्ही देतो ते घ्या म्हणून बसलेल्या नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज फोन्सची अवस्था म्हणूनच खराब झाली.

असच म्हणतो. वास्तवीक त्यांच्यापाशी early bird advantage होता. मायक्रोसॉफ्टने GUI आणून पहीले पाऊलही टाकलं होतं. नोकियानेही ३३१०/३३१५ आणि नंतरच्या काही फोनमध्ये most intutive action center button वर देऊन सुरुवात केलीच होती. पण नंतर कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक?

खरं तर या गोष्टीला Product Conceptualization, Product design, development, post production market analysis इ. सर्वच टप्प्यांवर खूप महत्व आहे. दुर्दैवाने वापरकर्ता जोपर्यंत प्रत्यक्ष उत्पादन हाताळत नाही तोपर्यंत या बाबतीत काहिच मत देऊ शकत नाही आणि prototype / beta testing पुरेश्या वापरकर्त्यांबरोबर झाले नाही तर काहिच करता येत नाही (पुढच्या development cycle पर्यंत).

दुसरा महत्वाचा मुद्दा. Software Estimation Techniques मध्ये FP Estimation ने UEx ची खूपच हानी केली आहे. Development efforts खूप असतात पण i/o काहिच बदलत नाही. त्यामुळे rework च्यावेळेस "काम तर दिसत नाही आणि बाईतर बसत नाही" अशी टिपीकल गृहीणीसारखी developer team ची अवस्था होते आणि budget owner चा पेशंस संपतो. हे फक्त एक चॅलेंज आहे.

खूपच आवडतं क्षेत्र आहे. पण formal training/experiance जवळपास शून्य. सध्या कचेरीत आमच्या प्रॉडक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी भांडतो आहे.

जाता जाता, अ‍ॅपल फोन ४ ईंचाचा ठेवण्या मागचा स्टीव्ह जॉब्सचा दृष्टीकोन याबाबतीत समजून घेण्यासारखा आहे. सॅमसंगने व्यवस्थीत प्रोपोगंडा करून त्याची वाट लावली आणि स्टीव्ह जॉब्स नंतर अ‍ॅपलने स्वतःच तो मुद्दा सोडून दिला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Feb 2018 - 10:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण नंतर कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक?

ही चूक बर्‍याच कंपन्यांनी केली आहे. यशस्वी बदल करून आपल्या क्षेत्रात निर्विवाद व्यापारी नेतृत्व (बिझिनेस लिडरशीप इन सेक्टर) मिळाल्यावर आपल्या त्याच यशाने आंधळे होऊन "आपण बदल केल्यामुळे नेतेपद मिळवले" हे अनेक कंपन्या/नेते विसरतात. याचा परिणाम म्हणून एकतर "सतत बदल करत राहण्याची त्यांची इच्छा मरते" किंवा "बदल केल्यामुळे प्रचंड फायदा देणार्‍या पहिल्या यशालाच काही धोका झाला तर काय ? हा प्रश्न भेडसावून त्यांना बदल करण्याचे धाडस होत नाही". परिणामी दुसरा कोणी नवीन स्पर्धक व्यवसायात नवीन बदल करून त्यांना चितपट करून जातो.

हे इतिहासात अनेकदा घडलेले आहे. त्याची काही उदाहरणे...

१. मोबाईल फोन मोटोरोलाने प्रथम बाजारात आणला. (अ) मोठ्या अंतरावर वापरण्याजोगा फोन अत्यंत वजनदार (सुरुवातीला तर कारमधून नेण्याजोगे म्हणून कारफोनच्या अथवा सॅटेलाईट फोनच्या स्वरुपात) आणि छोट्या अंतरावरचे हातात घेऊन फिरण्याजोगे अर्ध्या-पाऊण किलो वजनाचे वॉकीटॉकी; हे दोन्ही अत्यंत महाग "लक्झरी उत्पादन" होते. व्यक्तिगत स्वरूपात मोठ्या संखेने वापरण्यास ते अयोग्य होते. त्यामुळे त्यांचा उपयोग मुख्यतः व्यावसायिक स्तरावर अथवा अतिश्रीमंतांचे खेळणे ("उद्योगांच्या उपयोगाचे आणि/अथवा लक्झरी उत्पादन") असाच राहिला. मात्र आपल्या या तांत्रिक आणि आर्थिक यशात मोटोरोला खूष राहिली आणि ते तंत्रज्ञान सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करण्यासाठी तिने फारसे प्रयत्न केले नाहीत.

फॉरेस्ट्री, केबल, रबर आणि इलेक्ट्रॉनिक्स या उद्योगांत असलेल्या नोकिया या जागतिक स्तरावर (आणि मोटोरोलाच्या) तुलनेने फार लहान कंपनीने मोटोरोलाच्या विचारातली चूक हेरली. तिने या तंत्रज्ञानाचे, विशेषतः आपल्या फिनलँड या बर्फाळ (आणि त्यामुळे लोकालोकांतील सतत संपर्क तुटण्याची अवस्था असलेल्या) देशातले, महत्व हेरले आणि त्या तंत्रज्ञानावरचा "लक्झरी उत्पादन" हा शिक्का पुसून ते लोकाभिमुख (कंझ्युमर आयटेम) कसे होईल या दिशेने संशोधन केले आणि त्यात यश मिळवले. अश्या तर्‍हेने त्यांनी बनवलेला सहज हातात घेऊन फिरण्याजोगा आणि स्वस्त होता. अर्थातच, त्याने मोबाईल फोन क्षेत्रात, केवळ फिनलँडमध्येच नाही तर जागतिक स्तरावर जी क्रांती घडवली तिच्या नावे तंत्रज्ञाच्या इतिहासातात एक मानाचा अध्याय आहे, यात संशय नाही. कंपनीच्या सुवर्णकाळात फिनलँड या देशाच्या जिडिपीमधला तब्बल ४०% हिस्सा या एकट्या कंपनीच्या उलाढालीचा होता !

मात्र, नोकिया या आपल्या यशात गुंगून गेली. तिने स्मार्टफोन तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले आणि ते बाजारात आल्यावरही त्याची दखल घेतली नाही. "बेसिक सोईच्या व स्वस्त" नोकिया फोनची मागणी "अनेक सोईसवलती असलेला पण महागडा" स्मार्टफोन कधीच कमी करू शकणार नाही, ही नोकियाच्या अधिकार्‍यांना खात्री होती, त्यामुळे त्यांनी स्मार्टफोन व्यवसायाकडे दुर्लक्ष केले... सामसंगने तंत्रज्ञानात आणि व्यापारात निर्विवाद आधाडी घेतल्यावर तिला जाग आली, पण तेव्हा फार वेळ झाला होता.

२. मेनफ्रेम संगणकाच्या यशात आणि अहंकारात अंध झालेल्या आयबीएमने मायक्रोकाँप्युटरला 'खेळणे' असे संबोधून त्या तंत्रज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्षच केले असे नाही तर त्याकडे तुत्छतेने पहात ते मोफत (ओपन, प्रताधिकारमुक्त) केले. त्यामुळे आयबीएम मायक्रोकाँप्युटर स्वस्त झाले आणि छोट्यामोठ्या सर्वसामान्य तंत्रज्ञालाही प्रयोग करायला सहज उपलब्ध झाले. यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे दिवसेदिवस शक्तिशाली बनत जाणारे आयबीएम आर्किटेक्चर वापरणारे संगणक बाजारात येत राहीले. जेव्हा आयबीएमला आपली चूक समजली तेव्हा फार वेळ निघून गेली होती. परिणामी मिडी संगणकनेस्तनाबूद झाले आणि मेनफ्रेमची (आणि पर्यायाने आयबीएमची ) दादागिरी कोसळली. आयबीएमच्या या चूकीने त्यांचे न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले, पण जगात व्यक्तिगत संगणकयुग अवतरले !

३. असाच इतिहास कोडॅकच्या बाबतीत घडला. फोटोग्राफी (फोटोची निगेटिव्ह फिल्म, छायाचित्र छापण्याचा पेपर, इ) व्यवसायांत दादागिरी असलेल्या या कंपनीने "डिजिटल फोटोग्राफी"कडे दुर्लक्ष केले. कारण, "टच आणि फील" असलेले कागदी छायाचित्रण कधीच "आऊट ऑफ फॅशन" होणार नाही हा तिच्या अधिकार्‍यांचा अतिविश्वास ! त्यांना आपली चूक कळून येईपर्यंत जग फार पुढे निघून गेले होते... इतके की मोबाईल फोनने फट् म्हणता सेल्फी घेणार्‍या आजच्या नवीन पिढीला, फोटोग्राफीत एकेकाळी सर्वेसर्वा असलेल्या, कोडॅकचे नावही माहीत नाही.

या सगळ्या इतिहासामुळे, नवीन (किंबहुना, सर्वच) तंत्रज्ञानावर अबलंबून असलेल्या व्यवसायांसंबंधात, काही जुन्या म्हणी बदलल्या आहेत...

१. मोठा मासा लहान माश्याला खातो (Big fish eats small fish). --->
(सद्य परिस्थितीत, बुद्धी व प्रतिसाद या दृष्टीने) चपळ मासा मोठ्या माश्याला खातो (Fast fish eats big fish).

२. असामान्य यश मिळविण्यासाठी काही वेगळी असामान्य गोष्ट करण्याची गरज असते (You need to do something extraordinary to achieve extraordinary success). --->
यशासाठी दर वेळेस काही फार वेगळी गोष्ट करण्याची गरज नसते. खूप वेळेस, तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने केल्यावरही, असामान्य यश मिळू शकते (It is not always necessary to do something different to succeed. In many cases, doing the same thing differently, can lead to extraordinary success).

चौथा कोनाडा's picture

9 Feb 2018 - 11:02 am | चौथा कोनाडा

+१

अतिशय माहितीपुर्ण प्रतिसाद !

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद

महेश हतोळकर's picture

10 Apr 2018 - 12:25 pm | महेश हतोळकर

खूपच मस्त प्रतीसाद. (वाचायचा राहून गेला होता).

चाइनिज उद्योगांपुढे सर्वच कंपन्या झोपणार आहेत. आता माइक्रोसॅाफ्टने शाओमि कंपनीशी हातमिळवणी केली आहे. नोकिया आणि मा० सिक्युअरटीचा मुद्दा कधीच सोडणार नाहीत॥ त्यामुळे त्यांना मोठं गिह्राइक मिळणार याची खात्री आहे.