संस्कार आणि संस्कृती

GRavindra's picture
GRavindra in जनातलं, मनातलं
9 Jan 2018 - 12:35 pm

पर्वती पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेलं मध्यवर्ती ठिकाण. मी बऱ्याचदा सकाळी तिथे फिरायला जातो. त्यावेळी योगा करणारी, फिरणारी बरीचशी लोकं तिथं असतात. पण त्यादिवशी मी जरा उशिरा म्हणजे ९-१० च्या वेळेस गेलो. तर तिथे शाळकरी गणवेशातली काही मुलं मुली अगदी प्रेमीयुगलांसारखी बिनधास्त बसली होती. त्यांच्याकडं बघून प्रश्न पडला ह्या वयातल्या मुलांना प्रेम खरच कळतं ? ते समाजातील वास्तव अंतर्मुख करायला लावणार होत. पण आजकालच जर एकंदरीत वातावरण बघितलं तर मोबाईल आणि इंटरनेट चा वाढता वापर आणि ज्या थाटणीचे चित्रपट येतायत हे सगळं प्रामुख्याने जबाबदार आहे. गेल्या काही वर्षातील चित्रपट बघितले तर (प्रामुख्याने मराठी) सगळेच चित्रपट किशोरवयीन प्रेमकथा. ज्या वयात चांगलं-वाईट ओळखता येत नाही अश्या वयात हि मुलं प्रौढ होऊ लागली (विचारांनी नव्हे कृतींनी). मला सगळ्यांनाच विशेषतः दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रश्न विचारावा वाटतो किशोरवयीन मुलांना निखळ प्रेम भावना खरंच कळते ? काही दिवसांपूर्वी वाचनात खूप सुंदर ओळी आल्या होत्या त्या अशा
" प्रेम म्हणजे समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार, आणि निभावलं तर जीवन "
पण ह्या वयात हि मस्करीचं जास्त ठरेल. कारण निभावणं काय असत ह्याची समज तर ह्या वयात येणं शक्यच नाही कारण बऱ्याच जणांना अर्ध आयुष्य गेलं तरी ती येत नाही. परंतु आजकाल एखाद्या चित्रपटाचा दर्जा हा त्याच्या कमाई वर ठरवला जातो. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शक निर्माते एक छोटा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटचा तो ५ मिनिटांचा संदेश आधीच्या दोन तासांनी मुलांच्या मनावर जे बिंबवलंय त्याचा प्रभाव नष्ट करू शकतात ? खर विचारलं तर नाही, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी प्रेक्षकांची नाडी बरोबर ओळखलीय आणि जे चालू शकत जे त्यांच्या फायद्याचं आहे असंच ते सामाजिक संदेश वगैरे सारख्या भूलथापा देऊन दाखवतात.
संस्कार मुळात करायचे नसतात ते घडत असतात, ते होत असतात आणि मुलं ते आपल्या कृतीतून घेत असतात. किती विरोधाभास आहे बघा एकीकडे मुलं शाळेमध्ये sharing is caring शिकतात आणि दुसरीकडे त्यांचेच शिक्षित पालक आजी-आजोबांसोबत घर share करायला तयार नसतात त्यांना ते वृद्धाश्रमात टाकतात. मी वर मुद्दाम शिक्षित शब्द वापरला आहे कारण शिक्षित आणि सुशिक्षित ह्यात खूप फरक आहे. वाढत्या शहरीकरणामुळं, लोकसंख्येमुळं आपण अपार्टमेंट सिस्टीम ला आलो इथपर्यंत खरं पण आपली मनं सुद्धा फ्लॅटप्रमाणे संकुचित आणि मर्यादित झाली. म्हणजे एका बाजूला sharing is caring शिकवायचं आणि दुसरीकडे त्यांच्यावर जे उत्तम संस्कार करू शकतात त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचं अश्याने खरंच आपण संस्कारक्षम पिढी तयार करू शकतो ? "घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती" ह्या ओळी ऐकल्या कि वाटत घरांना फक्त भिंतीच आहेत घरपण राहिलंच नाही. आजच्या काळात दोघांनी कमावणं गरजेचं आहे हे मान्य पण ज्याला जन्म दिला त्याला पाळणाघरात ठेऊन, ज्यांनी जन्म दिला त्यांना वृद्धाश्रमात सोडून आणि घराला कुलुपं लावून कस येईल घराला घरपण. आपण कमावतोय की घरपण गमावतोय ह्याचा विचार करायलाच हवा.
आपल्या संस्कृती मध्ये होम-हवन सांगितलं होत. ते सगळं थोतांड नव्हतं आणि देवभोळेपणा तर मुळीच नव्हता त्याला शास्त्रीय पाया होता. सांगायचंच झालं तर वास्तुशांतीची जागा आता काही ठिकाणी हाऊस वॉर्मिंग पार्टी घेतेय. मी म्हणत नाही सत्यनारायण घाला किंवा घालू नका पण जर तुम्ही होम-हवन ह्या मध्ये वापरली जाणारी समिधा, गाईचं तूप आणि शेण्या हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि ह्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत जे वातावरणातील जंतू मारून वातावरणाची शुद्धी करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. पण आपण शिक्षित (परत शिक्षित लिहितोय सुशिक्षित नाही) झालो कि ह्या सगळ्या गोष्टी मागासलेल्या वाटतात. फरक एवढाच कि त्या काळात लोकांमध्ये शास्त्रीय कारणे समजण्याची क्षमता नव्हती कारण बऱ्यापैकी लोक अशिक्षित होते त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी देव म्हणा किंवा रूढी या सारख्या नावाखाली सांगण्यात आल्या. त्या गोष्टींचं बाजारीकरण झालं हेही मान्य पण आरोग्याचा विचार करून आपण घरच्या घरीही होम-हवन करू शकतो.
मी म्हणत नाही कि पूर्वीच्या सगळ्याच रूढी परंपरा बरोबर होत्या. त्यामध्ये काही त्रुटी पण होत्या आणि आजही आहेत म्हणून त्या कालबाह्य ठरवण्याऐवजी बदलत्या काळानुसार त्यात सुधारणा करून त्या नवीन रूपात समाजासमोर ठेवल्या पाहिजेत. स्पष्टपणेच बोलायचे झाले तर श्राद्ध किंवा पितृपक्ष ह्याचा खरा अर्थ बघितला तर आपले आप्त-स्वकीय जे कालचक्रानुसार ह्या दुनियेत हयात नाहीत अश्यांसाठी आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस त्यांचे स्मरण करण्याचा दिवस. पूर्वीपासून आता पर्यंत जे चालत आलय ते म्हणजे मिष्टान्न करून कावळा-चिमणी ह्यांना त्यांच्या रूपात जेऊ घालायचे. पण आता यात बदल झाला पाहिजे कारण वायफाय ह्या मुळे आता कावळा-चिमणी दुर्मिळ झालेत आणि शिवाय नंतर ते खराब झालेले अन्नपदार्थ नदीत मिसळून प्रदूषण हि होते. त्याऐवजी तुम्ही एखाद्या गरीब होतकरू विद्यार्थ्याची शालेय फी भरू शकता, अनाथाश्रमात एकदिवस मुलांना साखर-भात खाऊ घालू शकता, तुमच्या पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण आणि संवर्धन करू शकता. प्राणिमात्रांविषयी पण प्रेम असलंच पाहिजे नाही असं नाही त्यासाठी तुम्ही तो पैसा ज्या निसर्गरक्षक संस्था आहेत त्यांना दान करू शकता. पण आपण काहीच न करता आमची संस्कृती कशी चुकीची आहे आणि आधीचे लोक कसे कर्मठ आणि देवभोळे होते म्हणत आपल्याच संस्कृतीचे वाभाडे काढत त्याची लख्तरं वेशीवर टांगतोय. पण आता नीट विचार करून प्रत्येक गोष्टीचा योग्य तो अर्थ समजून जे चांगलं आहे उपयोगी आहे तेवढंच घेऊन ते जतन करून पुढं नेऊ शकतो. संस्कृती सोडली म्हणजे फॅशन होत नसते. आताच्या नवीन बदलत्या युगामध्ये उभा राहून जेवण्याची पद्धत असेलही ते चूक कि वाईट हेही मला बघायचं नाही पण म्हणून जेवणावळी आणि पंगती याला नावं ठेऊ नका. केरळ मध्ये लोक आजही केळीच्या पानावर जेवतात, प्लास्टिक ऐवजी पेपर बॅग किंवा कापडी बॅग वापरतात त्यांनी संस्कृती जपली ती निसर्गाच्या दृष्टितिकोनातून.
आपल्यालाही ती अशीच निसर्गाचा प्राणिमात्रांचा विचार करत जोपासायचीय. जे निसर्गाच्या आणि संपूर्ण मानव जातीच्या हिताचं आहे ते अंगीकारूया आणि संस्कृतीच्या या पाऊलखुणा जपत संस्कारक्षम पिढ्या घडवूया. कारण संस्कार आणि संस्कृती हे दोन्ही शब्द हातात हाथ घालून सोबतच येतात त्यातला एकही वगळून चालणार नाही.

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Jan 2018 - 10:23 pm | पैसा

चालायचंच. एका दिशेने प्रवास सुरू असेल तर गाडीचं एक चाक पुढे न दुसरं मागे राहू शकत नाही. बदल सगळ्या गोष्टीत होणारच. त्यात संस्कार आणि संस्कृती हे प्रत्येक माणसाच्या दृष्टीने वेगवेगळे असू शकतात. डोळसपणे विचार करण्याची क्षमता सुद्धा महत्त्वाची.

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2018 - 3:36 am | टवाळ कार्टा

हेलाकाका कुठायत????????????