गूढ अंधारातील जग -५

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
27 Dec 2017 - 12:55 pm

गूढ अंधारातील जग -५

पाणबुडीतील शस्त्रास्त्रे-

पाणबुडी बद्दल एवढे गूढ आणि भीतीदायक काय आहे?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणबुडी आपल्या अगदी जवळ येईपर्यंत ती आपल्याला सापडतच नाही. आणि एकदा परत बुडी मारली कि एवढ्या प्रचंड महासागरात तिला सर्वशक्तीनिशी शोधणे हे जवळजवळ अशक्यच आहे.
जेवढे आपण हत्तीला घाबरत नाही तेवढे बिबळ्याला घाबरतो. कारण बिबळ्याचे वजन ४० किलो असले तरी तो एवढासा लहान ( २-३ टन वजनाच्या हत्तीच्या तुलनेत ) पण अत्यंत चपळ आणि सहज दिसून येत नाही आणि केंव्हा हल्ला करेल हे हि समजणार नाही.

पाणबुडीत असलेली शस्त्रे म्हणजे त्यात असलेले पाणतीर आणि क्षेपणास्त्रे.

पाणबुडीतून डागलेली क्षेपणास्त्रे दोन प्रकारची आहेत

१) क्रूझ -- हि क्षेपणास्त्रे जमिनीलगत जाऊन लक्ष्यावर आघात करतात आणि

२) बॅलिस्टिक -- हि क्षेपणास्त्रे एखाद्या रॉकेट सारखी हवेतून वातावरणाच्या बाहेर जातात आणि प्रचंड अंतर कापून परत लक्ष्यावर सरळ वरून हल्ला करतात.

१)क्रूझ क्षेपणास्त्रे -- हि क्षेपणास्त्रे जमीनीवरील लक्ष्य (किंवा एखादे जहाज किंवा पाणबुडी असू शकते).यावर मारा करण्यासाठी असते

भारताने स्वतः विकसित केलेले ब्राह्मोस१ हे क्षेपणास्त्र या प्रकारात मोडते. हे क्षेपणास्त्र आपल्या चक्र अरिहंत किंवा सिंधुघोष क्लासच्या पाणबुड्यांवर बसविण्यात येणार आहे.
याचा सध्या टप्पा २९० किमी आहे. हे क्षेपणास्त्र जगात सर्वात जलदगतीचे समजले जाते. ज्याचा वेग ३६०० किमी ताशी (mach ३) आहे. म्हणजे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ अडीच मिनिटात पार करू शकते. इतक्त्या प्रचंड वेगाने लक्षयावर आघात करत असल्यामुळे लक्ष्याला त्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही करणे अशक्य होऊन बसते. या क्षेपणास्त्राचा वेग ६००० किमी ताशी (mach ५) वाढवण्याचा प्रकल्प चालू आहे शिवाय आता MTCR (MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME) यावर आपण सही केल्यामुळे रशिया आणि भारत सहकार्याने या क्षेपणास्त्राचा टप्पा ६०० किमी पेक्षा जास्त वाढवण्यात येत आहे. यामुळे हे क्षेपणास्त्र आता पाणबुडीतून डागून संपूर्ण पाकिस्तान त्याच्या माऱ्याच्या टप्प्यात येईल.

मार्च महिन्यात याची वाढीव टप्प्याची (EXTENDED RANGE) ४५० किमी साठी केलेली चाचणी अतिशय यशस्वी झाली आहे. https://en.wikipedia.org/wiki/BrahMos .

या क्षेपणास्त्रांमुळे अरबी समुद्रात खोल बुडी मारून बसलेल्या आपल्या पाणबुड्याना पाकिस्तानच्या भूमीवर कुठेही अचूक पणे हल्ला करता येईल अशी परिस्थिती आहे.

ब्राह्मोस २ हे क्षेपणास्त्र सुद्धा विकसित केले जात आहे ज्याचा वेग ८४०० ते ९६०० किमी ताशी (mach ७-८) म्हणजेच मुंबई पुणे हे अंतर एक मिनिटात पार करेल. https://en.wikipedia.org/wiki/BrahMos-II

आपल्या सिंधुघोष क्लासच्या पाणबुड्या रशियन बनावटीचे क्लब एस हे क्षेपणास्त्र २२० किमी अंतरापर्यंत आपल्या टॉरपेडो ट्यूब मधून डागू शकतात
फ्रेंच स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्यांवर फ्रेंच बनावटीची एक्सोसे हि क्षेपणास्त्रे बसविण्यात येणार आहेत.यापैकी कालवेरी हि पाणबुडी या क्षेपणास्त्रासह नौदलात नुकतीच दाखल झाली आहे. https://www.navyrecognition.com/index.php/news/defence-news/2017/march-2...

२) बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे-- अग्नि पृथ्वी इ क्षेपणास्त्रे या वर्गात मोडतात
पाणबुडीतुन डागण्यासाठी भारताने "अग्नि" प्रणालीवर आधारित के वर्गाची क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.

डॉ ए पी जे अब्दुल "कलाम" याना मानवंदना देण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वर्ग "के" ( कलाम) या नावाने ओळखला जाईल.

हि क्षेपणास्त्रे अग्नी पेक्षा हलकी जास्त वेगवान आणि गुप्त - सहज न शोधण्यासारखी (STEALTHY) आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/K_Missile_family

यातील K --१५ हे सागरिका नावाने ओळखले जाते आणि हे क्षेपणास्त्र चाचण्या पूर्ण करून नौदलात दाखल झाले आहे. याचा टप्पा १५०० किमी आहे.

या श्रेणीतील पुढची क्षेपणास्त्रे K -४ (३०००ते ३५०० किमी)
K -५ (५००० किमी)
http://idrw.org/k-5-slbm-indias-next-big-thing/
आणि K -६ (६००० किमी) हि आहेत.

यापैकी K -४ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे.
http://www.sunday-guardian.com/news/india-tests-3000-km-range-n-missile-...
https://www.navyrecognition.com/index.php/news/defence-news/2016/april-2...
या क्षेपणास्त्रामुळे दक्षिण चीनच्या समुद्रात जाऊन चीन मध्ये खोलवर कुठेही अणु क्षेपणास्त्र डागणे शक्य झाले आहे.

हि क्षेपणास्त्रे पाणबुडी पाण्याखाली असताना डागता येतात. त्यामुळे पाणबुडी प्रत्यक्ष कोठे आहे हे समजून येत नाही. यासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरले जाते. पाणबुडीमध्ये एका मोठ्या नळकांड्यात हे क्षेपणास्त्र हवाबंद ठेवून त्याच्या बाजूला पाणी असते. या पाण्याखाली स्फोटके वापरली जातात त्यामुळे यापाण्याची क्षणार्धात वाफ होते आणि हि वाफ आपल्या प्रचंड दाबाने क्षेपणास्त्र असलेले नळकांडे वरच्या बाजूला वेगाने ढकलते. हे नळकांडे पाण्याच्या बाहेर वर वर जाते आणि जसे गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली येऊ लागते त्यावेळेस त्यातील इंधन पेट घेते आणि क्षेपणास्त्र डागले जाते.
हि तांत्रिक दृष्ट्या फार कठीण गोष्ट आहे कारण सुरुवातीच्या पाण्याची वाफ करण्याच्या स्फोटकांनी ते क्षेपणास्त्र "जागृत" होऊन त्याचा स्फोट होऊ नये हि एक कर्म कठीण कामगिरी असते शिवाय पाण्याच्या बाहेर आल्यावर हवेत असताना क्षेपणास्त्राच्या सर्व मोटार व्यवस्थित चालू झाल्या पाहिजेत. अन्यथा क्षेपणास्त्र वेड्यावाकड्या जाणाऱ्या दिवाळीतील रॉकेट सारखेच इतस्ततः जाण्याची शक्यता असते. जर दुर्दैवाने असे झाल्यास त्यातील स्फोटके बॉम्ब किंवा अण्वस्त्रे निकामी होतील हि सुद्धा "सोय" पाहावी लागते. जिज्ञासूनि खालील दुवा आवर्जून पाहावा
http://www.popularmechanics.com/military/weapons/a25176/launching-missil...

या पार्श्वभूमीवर K -४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी महत्वाची ठरते.

https://www.youtube.com/watch?v=F0i6uoGuPwc

यावर्षीच ब्रिटिश शाही नौदलाची ट्रायडेंट क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली.

३) पाणतीर-- हे म्हणजे पाणबुडी किंवा जहाजावर हल्ला करण्याचे अस्त्र आहे. आपल्या सिंधुघोष क्लासच्या पाणबुड्यांमध्ये रशियन बनावटीचे Type 53-65 torpedo वापरले जातात. आणि जर्मन बनावटीच्या शिशुमार वर्गाच्या पाणबुड्यातून सूट(SUT) हे पाणतीर मारले जातात.

आता भारतीय बनावटीचे श्येन आणि वरुणास्त्र या पाणतीरांच्या चाचण्या पूर्ण होऊन प्रत्यक्ष उत्पादनासहि सुरुवात झाली आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Advanced_Light_Torpedo_Shyena
https://en.wikipedia.org/wiki/Varunastra_(torpedo)

एकंदरीत गेल्या काही वर्षात भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात भारत बराच पुढे येत आहे.

क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

27 Dec 2017 - 1:41 pm | महेश हतोळकर

पाणतीर आणि क्षेपणास्त्रे यात काय फरक आहे?

तुषार काळभोर's picture

27 Dec 2017 - 3:48 pm | तुषार काळभोर

पाणतीर म्हणजे torpedo. पाण्याखालून प्रवास करतात. त्यांना पुढे ढकलण्यासाठी मागे propeller पंखा असतो. हे दुसऱ्या पणबुडीवर वा जहाजावर पाण्याखालून डागता येतात.
क्षेपणास्त्र म्हणजे missile. हे हवेतून प्रवास करतात. यांना पुढे ढकलण्यासाठी इंधन जाळून गरम हवा बुडातून काढून जेट/रॉकेट सारखे पुढे जाते.

वरूणास्त्र
वरूणास्त्र

ब्राह्मोस
ब्राह्मोस

महेश हतोळकर's picture

27 Dec 2017 - 5:31 pm | महेश हतोळकर

त्यांना पुढे ढकलण्यासाठी मागे propeller पंखा असतो.

धन्यवाद पैलवान साहेब

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 8:19 pm | सुबोध खरे

पाणतीर हा प्रामुख्याने पाण्यातूनच प्रवास करतो ज्यासाठी त्याच्या मागील भागावर पंखा बसविलेला असतो जो त्यात बसवलेल्या बॅटरीवर काम करतो किंवा त्यात वेगळ्या तर्हेचे इंधन असते. साधारण इंजिनात इंधन असते जे हवेतील ऑक्सिजनवर जळते आणि पंख फिरवला जातो किंवा जेट सारखे वायूच्या धक्क्याने विमान पुढे जाते. पाणतीरात ओट्टो इंधन वापरले जाते ज्यात ऑक्सिडायझर आणि इंधन एकत्रच असतात. ते जाळल्यामुळे त्यातील तयार होणाऱ्या वायूच्या वेगाने पाणतीर पुढे ढकलला जातो. त्याला हवेतील ऑक्सिजनची गरज पडत नाही( पाण्याखाली ऑक्सिजन मिळत नाही). https://en.wikipedia.org/wiki/Otto_fuel_II
याउलट क्षेपणास्त्रे हि पाण्याच्या वरून मारा करतात मग ती पाणबुडीतून डागलेली असोत कि जहाज अथवा जमिनीवरून.
क्रूझ क्षेपणास्त्रे हि हवेतील ऑक्सिजन वापरतात पण बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हि वातावरणाच्या बाहेर जात असल्यामुळे त्यांच्या इंधनात सुद्धा ऑक्सिडायझर असावा लागतो.
ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र क्रूझ श्रेणीतील असले तरी त्याचा वेग प्रचंड असल्याने त्याला इंधन आणि ऑक्सिडायझर दोन्ही लागतात. ब्राह्मोस क्षेपणास्त्रातील स्फोटके टॉमहॉक या अमेरिकी क्षेपणास्त्रापेक्षा कमी असली तरी त्याचे वजन दुप्पट आणि वेग ४ पट असल्याने त्याची गतिजन्य ऊर्जा (KINETIC ENERGY) बत्तीस पट आहे आणि म्हणून मारक क्षमता बरीच जास्त आहे.

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख. पुभाप्र.

इरसाल's picture

27 Dec 2017 - 3:40 pm | इरसाल

भारीच.

तुषार काळभोर's picture

27 Dec 2017 - 3:52 pm | तुषार काळभोर

भारतीय नौदल आणि लेख दोन्ही

संग्राम's picture

27 Dec 2017 - 7:56 pm | संग्राम

+१

मराठी कथालेखक's picture

27 Dec 2017 - 4:27 pm | मराठी कथालेखक

एकंदरीत गेल्या काही वर्षात भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात भारत बराच पुढे येत आहे.

हे तर महत्वाचं आहेच पण या शस्त्रांत्राच्या उत्पादनासाठी लागणार्‍या सुट्या भागांचे परावलंबित्व ही नसावे /कमीत कमी असावे.. खास करुन चीनवर अवलंबून तर नक्कीच नसावे.

उपेक्षित's picture

27 Dec 2017 - 5:56 pm | उपेक्षित

नेहमीप्रमाणे क्लास १ आणि हो पुढील भाग लवकर येउदे....

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2017 - 7:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतिय बनावटीच्या अनेक शस्त्रांच्या रोचक माहितीने भरलेला सुंदर भाग !

त्याच व्यवस्था आणि तेच शास्त्रज्ञ असताना "काही विशिष्ट बंधने" ढिली झाल्याने गेल्या काही वर्षांत भारतिय शास्त्रज्ञांनी सामरिक संसाधनांमध्ये दाखवलेली चमक वाखाणण्याजोगी आहे.

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 8:22 pm | सुबोध खरे

हा एक वेगळा आणि विवादास्पद विषय आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी "काम" करू नये म्हणून "वेगवेगळ्या शक्ती काम" करीत असतात. सावकाशीने लिहितो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2017 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर लिहा. फार आश्चर्यकारक आणि दु:खदायक इतिहास आहे तो.

अणूस्फोट केल्यामुळे, ज्या वस्तू / यंत्रणा भारताला निर्यात करण्यावर जागतिक बंदी होती (उदा: सुपरकाँप्युटर्स, अंतराळ यात्रेसाठी लागणारी क्रायोजेनिक इंजिन्स, इ) त्या भारतिय शास्त्रज्ञांनी भारतात केवळ निर्माण केल्या नाहीत तर त्यासंबंधात भारत एक अग्रगण्य देश झालेला आहे. याउलट, ज्या वस्तू आयात करण्यास (आणि त्यातून कमिशन मिळण्यास) अडथळा नव्हता अश्या वस्तू, विशेषतः हजारो कोटींचे बजेट असणार्‍या सामरी वस्तू, भारतात बनू नयेत याची पुरेपूर काळजी "घेण्यात" आली, हे एक उघड गुपित आहे ! मंगळयान आणि सुपरकाँप्युटर तयार करणार्‍या भारतात उत्तम शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा का बनू शकला नाही, याचे कारण कळायला फार हुशारी लागत नाही. :(

या संदर्भात माननीय कलाम साहेब यांनी सांगितले होते की अग्नी क्षेपणास्त्र चाचणी वेळी 6 वाजता निर्धारित वेळ होती आणि पहाटेच्या 4 वाजता श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना फोन करून सांगितले की अमेरीकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयामधून फोन आला होता की चाचणी स्थगित करा. तुम्ही चाचणी घेई पर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुरध्वनी वर येवू नका. सर्व दुरध्वनी यंत्रणा बंद करण्यात आली होती. आणि चाचणी यशस्वीपणे पार पाडली.

एकुलता एक डॉन's picture

29 Dec 2017 - 2:22 am | एकुलता एक डॉन

फोन करून सांगितले की अमेरीकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयामधून फोन आला होता की चाचणी स्थगित करा.

आणि मग स्थगित का केली नाही ?

पाषाणभेद's picture

29 Dec 2017 - 2:47 am | पाषाणभेद

अहो बाईंनी कलामांना आधीच सांगीतले की,"माझा फोन येईल तेव्हा तुम्ही आधीच फोनवर येवू नका. म्हणजे मी सांगायला मोकळी की मी तर फोन केला होता ब्वॉ पण तो कलाम काय नाय आला फोनवर. मंग काय की केला ना दणका त्यांनी. आता मी काय करू? मी तर अशी एकूलती एक बाईमाणूस. माझं कोण ऐकतंयं? त्यात शास्त्रज्ञ असतात वेंधळे. टिरींग टिरींग रींग वाजू वाजू फोन सुदीक दमला अन मंग उडवलं त्यांनी राकेट. आता काय बंदी बुंदी आणायची तर आणा."

तर हे आसं. म्हंजे काय, मोट्या मोट्या लोकांच्या मोट्या मोट्या गोष्टी ओ. आपण पल्डो ल्हान मान्सं, आपल्याला कोण इचारतो? ऑ?

>>> भारतीय शास्त्रज्ञांनी "काम" करू नये म्हणून "वेगवेगळ्या शक्ती काम" करीत असतात.

डॉ. साहेब या बद्दल जरूर लिहा.

आपली राजकीय इच्छाशक्ती कशी आहे, आपले शास्त्रज्ञ / तंत्रज्ञ कश्या परिस्थितीत काम करतात आणि तरीही पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पाठवण्यात यशस्वी कसे होतात हि अभिमानास्पद गौरवगाथा लोकांना कळायलाच हवी.

अनुप ढेरे's picture

28 Dec 2017 - 10:42 am | अनुप ढेरे

Antrix Devas हे गूगल करा.

टवाळ कार्टा's picture

27 Dec 2017 - 9:23 pm | टवाळ कार्टा

सगळ्या लेखांचे एक पुस्तक करा....भन्नाट आहे सगळे

पैसा's picture

27 Dec 2017 - 10:48 pm | पैसा

खूप छान लिहिताय!

नाखु's picture

27 Dec 2017 - 11:01 pm | नाखु

माहिती आणि रंजक पद्धतीने सादरीकरण!
भारतीय तंत्रज्ञांनी केलेल्या अचाट कामांचे कौतुक आहे

नितवाचक नाखु

चांगली माहिती देत आहात. पुभाप्र.

अर्धवटराव's picture

28 Dec 2017 - 3:39 am | अर्धवटराव

अनेक बंधनात अडकलेली भारतीय कामगिरी जर इतकी जबरदस्त असेल तर प्रत्यक्ष्य अमेरीकेला आव्हान देणारा ड्रॅगन कुठल्या लेव्हलला पोचला असेल... एव्हाना त्यांनी स्ट्रींग ऑफ पर्ल्स सारखी भारताला घेरणारी स्ट्रींग ऑफ सबमरीन्सची कवायत सुद्धा पार पाडली असेल. पाण्यावरुन आलेले कसाब मंडळ, जुहु बीच वर आदळलेली भरकटलेली जहाजं आपल्याला वेळीच ओळखता आली नाहित.. इथे तर लपलेल्या चिनी पाणबुड्यांशी गाठ आहे. शिवाय त्यांना हवी ती मदत करायला लंका, पाक सारखे तत्पर शेजारी.

वरुण मोहिते's picture

28 Dec 2017 - 1:48 pm | वरुण मोहिते

उत्तम माहिती.. अजून वाचायला आवडेलच.

पाषाणभेद's picture

29 Dec 2017 - 1:50 am | पाषाणभेद

डॉक्टर साहेब, आमचे येथीलच मित्र प्रसाद गोडबोले मिळून मिसळून! कायअप्पा कट्यावर विचारतात की, "पाणबुडीतून बलेस्टिक मिसाईल सोडता येतात ? "

कृपया उत्तर द्यावे.

तुषार काळभोर's picture

29 Dec 2017 - 8:10 am | तुषार काळभोर

डॉनी सांगितलेच आहे:
बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे-- अग्नि पृथ्वी इ क्षेपणास्त्रे या वर्गात मोडतात
पाणबुडीतुन डागण्यासाठी भारताने "अग्नि" प्रणालीवर आधारित के वर्गाची क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.

डॉ ए पी जे अब्दुल "कलाम" याना मानवंदना देण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वर्ग "के" ( कलाम) या नावाने ओळखला जाईल.

हि क्षेपणास्त्रे अग्नी पेक्षा हलकी जास्त वेगवान आणि गुप्त - सहज न शोधण्यासारखी (STEALTHY) आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/K_Missile_family

यातील K --१५ हे सागरिका नावाने ओळखले जाते आणि हे क्षेपणास्त्र चाचण्या पूर्ण करून नौदलात दाखल झाले आहे. याचा टप्पा १५०० किमी आहे..............

विकीची अधिक माहिती

दुर्गविहारी's picture

30 Dec 2017 - 1:14 pm | दुर्गविहारी

खुपच सुंदर लेखमाला!!!! क्रमशः आहे हे वाचुन पुढील धाग्याच्या आतुरतेने प्रतिक्षेत.

रंगीला रतन's picture

30 Dec 2017 - 8:10 pm | रंगीला रतन

जबरदस्त... पुढिल भाग लवकर येउद्यात.

भंकस बाबा's picture

31 Dec 2017 - 2:18 am | भंकस बाबा

नेहमीप्रमाणे डॉक्टर तुम्ही बाजी मारलीय,
भरपूर लिहीत रहा

चामुंडराय's picture

31 Dec 2017 - 6:25 am | चामुंडराय

खूप छान चालली आहे हि मालिका.

काही प्रश्न:

पाण्या खाली अंधार असेल तर मार्ग कसा काढतात?
एका जागेवरून दुसऱ्या जागी जाताना नेव्हिगेशन कसे करतात?
GPS वापरतात का? त्याचे सिग्नल पाण्याखाली मिळतात का?

सुबोध खरे's picture

31 Dec 2017 - 10:59 pm | सुबोध खरे

सावकाश उत्तर देतो.

पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे पाणबुडीला खिडक्या नसतातच त्यामुळे पाण्याखाली दिवस आणि रात्र एकच असतात.
GPS ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम (किंवा जागतिक स्थितिमापक प्रणाली) येण्यापूर्वी जहाजे आपली अक्षांश आणि रेखांश आणि वेळ यांची स्थिती इनरशिअल नॅव्हिगेशन सिस्टिम (याला बोलीभाषेत जायरो म्हणतात) ( स्थितिस्थापक नौकानयन प्रणाली)

https://en.wikipedia.org/wiki/Inertial_navigation_system यात नोंद करून ठेवत असत. या प्रणालीत संगणक आपण कोणत्या दिशेला किती वेगाने किती उंची किंवा खोलीवर गेला याचे गणित मांडून आपण असलेल्या ठिकाणाची अचूक जागा दाखवत असतो. या इनरशिअल नॅव्हिगेशन सिस्टिमला GPSची गरज पडत नसे. पण यात वापरलेल्या यंत्रात काही काळाने त्रुटी(ERROR) येतात. आपले घड्याळ जसे काही सेकंदानी पुढे / मागे जाते तसे.
त्यामुळे पाणबुड्या किंवा जहाजे प्रत्येक बंदरात आपली स्थिती(अक्षांश /रेखांश) आणि तेथील स्थानिक वेळ/ प्रमाण वेळ GMT सुधारून घेत असत. याला बोली भाषेत "जायरो सेट" करणे म्हणतात
आता जहाजे GPS वर आपण असलेल्या ठिकाणाची अचूक स्थिती प्रत्येक क्षणाला तपासून पाहू शकतात. पाणबुडी जेंव्हा गुप्त कामगिरीवर निघत असे तेंव्हा या GPSमुळे (हि मूळ अमेरिकन प्रणाली आहे) अमेरिकेला तुमच्या पाणबुडीची स्थिती समजू शकते. त्यामुळे भारत आपल्या रशियन पाणबुड्यानसाठी बंदरातून निघताना (अशीच रशियन GPS म्हणजे) GLONASS वापरत असे.

या GPS वापरण्याचे दोन तोटे आहेत.
१ ) त्या देशाला तुमची पाणबुडी किती वाजता आणि कोणत्या बंदरातून निघाली आहे हे समजत असे. एकदा इनरशिअल नॅव्हिगेशन सिस्टिम ( जायरो) सेट करून पाणबुडीने डुबकी मारली कि ती पाणबुडी अदृश्य होत असे. पण अरबी समुद्राची खोली हळूहळू वाढत जाते त्यामुळे मुंबईतून बाहेर निघाल्यावर खूप खोल डुबकी मारण्यासाठी पश्चिमेला ८० नॉटिकल माईल्स (नॉट) १४४ किमी इतके दूर जावे लागते. याच विरुद्ध बंगालच्या उपसागरात केवळ २ नॉट किंवा ३.२ किमी पूर्वेकडे गेल्यावर पाणबुडी अदृश्य होते.

२) प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस त्या देशाने ( अमेरिकेने किंवा रशियाने) आपली GPS तुमच्यासाठी बंद केली तर हलकल्लोळ होऊ शकतो
यावर उत्तर म्हणून भारताने आपल्या स्वतःच्या "गगन" आणि "नाविक" या GPS प्रणाली ७ उपग्रह अंतराळात पाठवून सुरु केल्या आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/GPS-aided_GEO_augmented_navigation
https://en.wikipedia.org/wiki/Indian_Regional_Navigation_Satellite_System
https://www.isro.gov.in/applications/step-towards-initial-satellite-base...

GPS चा सिग्नल पाण्याखाली खोल गेल्यास मिळत नाही. पण डिझेल पाणबुडी जेंव्हा आपल्या बॅटऱ्या चार्ज करायला वर येतात तेंव्हा त्यांना GPS व केल्यास सिग्नल मिळू शकतो.

धन्यवाद डॉ. साहेब. बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या.
परंतु पाणबुडीला खिडक्या नसतात आणि समुद्रतळाशी अंधार असतो तेव्हा मार्गात येणारे मोठे खडक, सुळके, टेकड्या इत्यादी टाळून कसे पुढे जातात?
आजूबाजूची परिस्थिती बघण्याचा काहीच मार्ग नसतो का?

सुबोध खरे's picture

3 Jan 2018 - 12:11 pm | सुबोध खरे

पाणबुड्या जेंव्हा गुप्त कामगिरीवर नसतात किंवा स्वतःच्या मूळ बंदरात असतात तेंव्हा पाण्याच्या खाली असलेल्या सगळ्या अडथळ्यांची सोनार यंत्राने तपासणी करून ते अडथळे टाळून मार्गक्रमण करतात. पण तुम्ही जेंव्हा गुप्त कामगिरीवर असता तेंव्हा तुमचे सोनार यंत्र कोणत्याही लहरी प्रक्षेपित करत नाहीत तर फक्त "येणारे आवाज" "ऐकत" असतात. यामुळे वरून जाणारी जहाजे किंवा पाणबुड्या यांचा येणार आवाज तुम्ही ऐकू शकता आणि त्याप्रमाणे त्यांना चुकवणे शक्य होते.
दुर्दैवाने वाळूच्या टेकड्या कोरल्स इ निर्जीव/ न हलणाऱ्या गोष्टींकडून कोणत्याच लहरी येत नाहीत. त्यामुळे अशा सागरतळाच्या नकाशांचा बारकाईने अभ्यास करून त्यात येणारे अडथळे टाळूनच आपला मार्ग आखावा लागतो. आपली सर्वेक्षण करणारी जहाजे सदा सर्व काळ आपल्या आणि आंतरराष्ट्रीय सागरतळाचे सर्वेक्षण करत असतात आणि हि माहिती आपल्या पाणबुडीच्या आलेखात सतत अद्ययावत केली जाते.
हि जहाजे इतर देशांना सदिच्छा भेट देण्यास जातात तेंव्हा त्यांच्या सागरतळाच्या सर्वक्षणहि करत असतातच.
दुर्दैवाने हि माहिती कितीही अद्ययावत असली तरीही पाण्यातीळ अडथळे टाळण्यासाठी आखलेल्या पाण्याचे प्रवाह आणि पाण्याचे तापमान तासातासाला बदलत असते त्यामुळे पाणबुडी थोडीफार प्रवाहाबरोबर इकडे तिकडे ढकलली जाते आणि यामुळे ती अशा एखाद्या टेकडीवर आपटण्याची शक्यता असते.
शिवाय "जायरो" मधील त्रुटी(ERROR) जसा जसा काळ जातो तशी वाढत जाते. गुप्त कामगिरीवर असताना GPS यंत्रणा वापरून आपल्या जायरोमधील त्रुटी सुधारणे शक्य नसते.
बाकी एकंदर पाणबुडी म्हणजे अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री विहिरीच्या तळाशी पोहण्यासारखेच असते.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_submarine_incidents_since_2000

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jan 2018 - 5:04 am | अमरेंद्र बाहुबली

सर्व भाग एकदम वाचून काढले. ज्ञानात भर पडली.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jan 2018 - 5:13 am | अमरेंद्र बाहुबली

सर पण मला मागील भागांत वाचलेल्या माहितीवरून एक प्रश्न विचारावासा वाटतोय.
जर भारत पाकड्यांविरुद्धच्या युध्दात इतका पॉवरफुल होता तर पाकिस्तानची गाझी पाणबुडी अरबीसमुद्र क्रॉस करून विशाखापट्टणम पर्यंत पोहोचलीच कशी??

पाणबुडी शोधणे हे महा कर्मकठीण काम आहे यामुळेच गरीब देशसुद्धा युद्धात आपली एक दहशत बाळगून असू शकतात. गाझी हि एकमेव पाणबुडी त्यांच्याकडे होती जी बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे तिला पाण्याखालून विक्रांतवर हल्ला करण्यासाठी पाठवेन क्रमप्राप्त होते.
https://en.wikipedia.org/wiki/PNS_Ghazi

पैसा's picture

1 Jan 2018 - 8:23 pm | पैसा

खूपच छान! या विषयावर आतापर्यंत कधीच काही तेही मराठीत वाचले नव्हते.

Jayant Naik's picture

2 Jan 2018 - 8:51 pm | Jayant Naik

डॉक्टर जी फार सुरेख जमले आहेत हे सर्वच भाग. पहिल्या भागापासून उत्सुकता ताणली जात आहे. खूप अभ्यास पूर्ण लेखन. असेच लिहित चला.

अभिजीत अवलिया's picture

3 Jan 2018 - 12:38 pm | अभिजीत अवलिया

माहितीपूर्ण भाग आहे हा देखील.

पंतश्री's picture

3 Jan 2018 - 8:36 pm | पंतश्री

ह्या पाणबुड्याना वेगेवेगळ्या कॅटेगरी असतात. जश्या कलवरी.
तर ह्या कॅटेगरी कोणकोणत्या? त्याची काय विशेषता असतात? काय काय कॅटेगरी असतात? कशाच्या अनुसार ह्या ठरतात?

सुधीर कांदळकर's picture

6 Jan 2018 - 8:33 am | सुधीर कांदळकर

छानच. मागील भागातील प्रश्नाला दिलेल्या उत्तराबद्दल धन्यवाद.

किल्लेदार's picture

10 Jan 2018 - 9:24 pm | किल्लेदार

जबरदस्त ....

दीपक११७७'s picture

24 Jan 2018 - 1:43 pm | दीपक११७७

उत्तम माहिती.. अजून वाचायला आवडेलच.

समीर स. पावडे's picture

24 Jan 2018 - 5:51 pm | समीर स. पावडे

धन्यवाद साहेब