... एक क्षण भाळण्याचा.

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
19 Dec 2017 - 3:00 pm

बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यातुन निपजली त्या टाळक्याला सलाम.
हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो. "जेनी चा बगडे एनी सवार बगडे " म्हणजे ज्याचा चहा बिघडला त्याची सकाळ बिघडली. कनक शहा चं माहीत नाही पण माझी मात्र सकाळ बिघडते.
अरे एखादा रवीवार येतो मस्त लोळत पडायचे. लोकसत्ता , नवाकाळ, महाराष्ट्र टाईम्स हे वर्तमान बिघडवणारे सर्व प्रकार नजरे आड करायचे. मस्त तलत ची गझल किंवा किशोरी आमोणकरांची तोडी ची कॅसेट लावायचे. फोन , दारावरची बेल हे सगळे बंद करायचे. विज्ञानाने जे काही शोध लावलेले आहेत त्या पैकी दारावरची बेल हा एक नको असणारा शोध आहे..
मस्त गप्पा रंगात आलेल्या असाव्यात आणि दारावरची बेल वाजते. घरातल्या प्रत्येकाच्या कपाळावर सरासरी अडीच आठ्या चढतात. कोण कडम़डलय या वेळी..... हेच भाव असतात. अन दारात एखादा आवडता मित्र उभा असतो.
किंवा कोणी आवडती व्यक्ती येणार असेल या अपेक्षेने दार उघडले तर उत्साही प्रफुल्लीत चेहेर्याने दार उघडले जाते आणि दारात नावडते कोणी उभे असते. म्हणजे बघा तुमच्या कडे वहीदा रहिमान आली अशा आशेने उघडलेल्या दारात दारात सपट लोशन किंवा गजकर्ण मलम चा सेल्समन उभा असेल तर ?
नको असलेल्या पाहुण्याला कटवण्यासाठी एखादे संशोधन का नाही केलं कुणी.
तर काय सांगत होतो. चहा. रवीवारी सकाळी मस्त गझल किंवा शिवकुमारची झिंझोटी लावावी. मस्त किंचीत आले घातलेला चहा हातात असावा अन सोबत तितक्या उत्साही चेहेर्याने गप्पा मारायला बायकोला वेळ असावा. दाराने स्वतःच "डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावावा
हे ज्याना जमते त्याना भाळणे आणि संभाळणे म्हणजे नक्की काय ते माहीत असते." एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे संभाळण्याचे"
ज्याना हे जमत नाही ते सगळं संभाळत संभाळत भाळत असतात. याना प्रेम सुद्धा आठ बत्तीस ची डबल फास्ट चुकेल म्हणून अर्ध्यावर सोडून द्यावे लागते .
असे लोक घरी गजरा नेताना सुद्धा पुजेला किंवा आज्जीच्या फ्रेम ला लावता येईल किंवा बायको तिच्या वेणीत माळेल अशा मल्टीपरपज एक दाम तिबल काम विचाराने आणतात. तुमच्या पैकी किती जणांचा अनुभव असेल माहीत नाही पण यांच्या घरात वाढदिवस देखील जोडीने येतात. तरुणपणी त्यानी जर चुक्कून कोणा मुलीला प्रपोज केले तर तो दिवस नक्की जोड तिथी म्हणजे पाडवा आणि भाऊबीज असा जोडून आलेला असतो. तुम्हाला काय हवे ते घ्या. मल्टीपरपज.
जे यात कुठेच बसत नाहीत त्यांचं ,माझ्या सारख्यांचं काय होतं सांगु का. की भाळण्याची इच्छा आहे पण संभाळण्याचे पेशन्स नाहीत. त्याना भाळायची भिती वाटते आणि त्यामुळे संभाळणंही जमत नाही.
असो तर काय म्हणत होतो की चहा मस्त रवीवारची सकाळ असावी चहाचा मूड असावा. शिवकुमार शर्मांची झिंझोटी असावी. आणि सोबत गप्पा मारायला बायकोला वेळ असावा. असा मुड असला की गप्पा सुरू होतात. गप्पातुन गप्पा निघतात. एकातून दुसरी दुसरीतून तिसरी . गप्पांचं रुपांतर गूज गोष्टींमधे कधी होतं कळतही नाही मग त्यातल्या शब्दानाच काय पण मौनालाही अर्थ फुटतो. साधी पायवाटही फुलांनी पायघड्या अंथरल्यासारखी वाटायला लागते.
.. .... अर्थात एक पथ्य पाळायचं असतं या वेळेला की नातेवाईक नामक शाब्दीक खड्याना त्या पायवाटेवर आणूच द्यायचं नाही. हे ज्याना जमतं त्याना भाळणं आणि संभाळणं दोन्ही जमतं.
हे मला ज्या दिवशी समजलं त्या दिवशी सुखाचा मूलमंत्र सापडला.
त्याचं झालं असं की रवीवारची दुपारची चारची नाटकाची तिकीटे काढून ठेवली होती. बर्याच दिवसानी प्रशांत दामलेला " सुख म्हणजे नक्की काय असतं ' सांगताना पहाणार होतो. “एका लग्नाची गोष्ट”. हे हीचं आणि माझं दोघांचही आवडतं नाटक. हो त्यातल्या "सुख म्हणजे नक्की काय असतं" या गाण्यासाहीत.
नेमकं त्या दिवशी घरातलं दळण संपलं होतं. हीचा आत्येभाऊ त्याचदिवशी नाशीकहून सपत्नीक घरी आला होता. अशा वेळी काय करावे हे कोणीही सुचवुन दाखवावे. माणसांना दुखवायचे नाही त्याचबरोबर आपलेही मन राखायचे ही कसरत करावी लागणार होती. तरी एक बरं होतं तो आत्तेभाऊ हीचा होता .माझा नव्हता. तीन पर्याय होते. एक नाटकाचा बेत रहीत करायचा. मी आणि तिचा आत्तेभाऊ दोघानी किंवा ती आणि त्या आत्तेभावाची बायको त्या दोघीनी नाटकाला जायचे. माझ्याखेरीज इतर तिघानी तीनही पर्याय हाणून पाडले. चौथा पर्याय शोधला चौघेही नाटकाला जाऊया . नाटकासाठी खास ठेवणीतले कपडे घातले आणि घराबाहेर पडलो. टॅक्सीने शिवाजी मंदीरला. आलो. शिवाजी मंदीराच्या दारात मोठ्ठा बोर्ड. " काही अपरीहार्य कारणामुळे..... "
त्या बोर्डमुळे आमचा एक प्रश्न सुटला होता. पण दुसरा प्रश्न लगेचच तयार होता. " आता काय....? "
" आपण एक काम करुया. आलोच आहोत तर शिवाजी पार्कला जाऊन येवूया. माझे एक सिनीयर आहेत त्यांच्याकडे जाऊया." इती हीचा आत्तेभाऊ,
अरे पण असे न सांगता अचानक कसे जायचे कोणाकडे?
चला हो मी काल त्याना फोन करुन सांगितले आहे की मी मुंबईत येतोय. ते म्हणाले होते रवीवारी घरीच असेन म्हणून. बिंधास्त कधीही या. दुपारी एक ते चार सोडून.
पण म्हणून सगळ्यानी जायचे:
चला हो. लाख माणूस आहे. त्याना नाट्यसंगीताची आवड आहे, घरी हार्मोनियम आहे, स्वतः वाजवतात. रेकॉर्ड्स चा संग्रह आहे. भरपूर वाचन आहे. भेटा तर एकदा. प्रेमात पडाल.
नाट्यसंगीताची आवड, भरपूर वाचन, हार्मोनियम , रेकॉर्ड्स चा संग्रह या सर्वानीच मला भुरळ घातली.
"चला तुम्ही म्हणाल तसे".... हीच्या मोठे केलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष्य करत आम्ही सेनाभवनला वळसा घालून शिवाजी पार्कला आलो.
इराण्याच्या हॉटेल समोरच्या गल्लीत एका अपार्टमेंटच्या गेटमधून आत गेलो.
जिने चढून पहिल्या मजल्यावर गेलो. दारावर नमस्काराच्या पोझीशन मधे
दोन जोडलेले हात काढलेले होते. चित्र एकदम प्रमाणशीर होते. त्याच्यावरुनच घरमालकाच्या आवडीची जाणीव होत होती.. बेल वाजवावी की कसे या विचारात मी होतो. बेल वाजवायला मी फार घाबरतो. अहो या डोअर बेलचे आवाज नक्की कसे येतील हे सांगता येत नाही. अगदी कर्र कीच्च पासून घणघण ते ठाण्ण पर्यन्त काय आवाज येईल साम्गता येत नाही. लोक त्यांच्या घरात इतक्या काय काय भयानक प्रकारच्या डोअर बेल लावतात म्हणून सांगु. माझ्या एका मित्राने अँब्यूलन्स चा सायरन डोअरबेल म्हणून लावला आहे. त्याच्या घरात जाताना मला उगाचच आय सी यू च्या पेशंट ला भेटायला आलोय असा फील येतो . तर दुसर्या एकाने श्री गुरुदेव दत्त अशी आरतीची धून लावली होती. काही काही ठिकाणी तर डोअर बेल इतक्या मोठ्याने वाजतात की ज्या घराची बेल वाजवली आहे त्यांचे शेजारी पण दार उघडतात. काही ठिकाणी दोन दारे असतील तर डोअर बेल ही शेजारी शेजारी असतात. कोणत्या घराची बेल कोणती हेच समजत नाही. या उलट काही ठिकाणी डोअर बेल वाजवल्यावर त्याचा आवाजच येत नाही.आप्न बेल बहुतेक वाजली नसेल या हिषेबाने ती पुन्हा पुन्हा वाजवतो आणि मग दार उघडल्यावर " कुठून आले आहेत हे लोक " असे भाव कपाळावरच्या आठ्यातून स्पष्ट दाखवणारा चेहरा दिसतो. त्यामुळे मी बेल वाजवायला शक्यतो टाळतो.
तर काय म्हणत होतो.सुमीत ने , हीच्या आत्तेभावाने, बेल वाजवली. आत कुठेतरी " मै जिंदगी का साथ निभाता चला गया " या गाण्या अगोदरची धून वाजली. आणि ती धून संपायच्या आत एक प्रसन्न चेहेर्याच्या गृहस्थानी दार उघडले. वय बहुतेक साठी पासष्ठ . अंगात टी शर्ट बर्मुडा .
" या " हासतमुखाने तोंडभरुन स्वागत केले.
( क्रमशः ).

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

19 Dec 2017 - 3:12 pm | कपिलमुनी

पुढील भागाच्य प्रतीक्षेत !
लिहिण्याची शैली आवडली आहे

संजय पाटिल's picture

19 Dec 2017 - 4:55 pm | संजय पाटिल

पुढील भागाच्य प्रतीक्षेत !
लिहिण्याची शैली आवडली आहे +१

तुषार काळभोर's picture

19 Dec 2017 - 6:27 pm | तुषार काळभोर

मम...
मी पण हेच असेच म्हणतो...

ज्योति अळवणी's picture

19 Dec 2017 - 4:42 pm | ज्योति अळवणी

मस्त

गवि's picture

19 Dec 2017 - 5:03 pm | गवि

पुलं + कणेकर..

मस्तच..

सुबोध खरे's picture

19 Dec 2017 - 5:16 pm | सुबोध खरे

सुरेख

डोअर बेल वाजायची थांबली की येतो.

मस्त मस्त मस्त..
पुभाप्र..

राही's picture

19 Dec 2017 - 8:23 pm | राही

बऱ्याच दिवसांनी दिसलात. तुमचे लेखन नेहमीच आवडते. हाही लेख आवडला.

सुरेख लिहिलंय.. वाट बघतोय पुढील भागाची..

नाखु's picture

19 Dec 2017 - 10:44 pm | नाखु

आठवड्यात दोन जेष्ठ मिपाकर मंडळी लिहीते झाले

पुभाप्र

आनंदयात्री's picture

20 Dec 2017 - 12:21 am | आनंदयात्री

भाऊ हा भाग छान जमलाय. पुढल्या भागाची वाट बघतोय.

पिवळा डांबिस's picture

20 Dec 2017 - 12:26 am | पिवळा डांबिस

लिखाण चांगलं उतरतं आहे पण नमनालाच घडाभर चहा सांडताय!

आणि दारावरची बेल वाजते. घरातल्या प्रत्येकाच्या कपाळावर सरासरी अडीच आठ्या चढतात. कोण कडम़डलय या वेळी..... हेच भाव असतात.

थापा मारू नका. तुमच्या आणि वहिनींच्या अगदी अगत्याच्या आदरातिथ्याचा लाभ आम्ही घेतलेला आहे.

( क्रमशः ).

ह्या क्रमशःवाल्यांना हाणले पाहिजेत!! ;)

असो. पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय...

रुपी's picture

20 Dec 2017 - 12:33 am | रुपी

सुंदर लिहिलंय..
मस्त रंगात आलं असतानाच क्रमशः कडमडले ;)

आनन्दा's picture

20 Dec 2017 - 6:47 am | आनन्दा

क्रमशः आवडलं

सिरुसेरि's picture

20 Dec 2017 - 8:59 am | सिरुसेरि

मस्तच लेखन . पुभाप्र . पुलं + कणेकर.. आणी वपुंचीही आठवण झाली .

विजुभाऊ's picture

20 Dec 2017 - 11:00 am | विजुभाऊ

_/\_

चौथा कोनाडा's picture

27 Dec 2017 - 5:34 pm | चौथा कोनाडा

मस्त सुरेख लिहिलंय.. मजा येइल पुढील भाग वाचायला .. !

विजुभाऊ's picture

28 Dec 2017 - 10:46 am | विजुभाऊ