"किक" कोणाला कशातून,केव्हा आणि किती मिळेल याचं "तार्किक" विश्लेषण करणं जरा अवघडच आहे. रोजच्या आहाराप्रमाणेच या किकचा लागणारा खुराक देखील व्यक्तिसापेक्ष असतो. रोजच्या आहारातली कमतरता भरून काढायला जशी बाजारात व्हिटॅमिन सप्लिमेंट्स मिळतात तशी काही यासाठी उपलब्ध नाहीत . हे "किक" जीवनसत्व ज्याचे त्यालाच शोधावे लागते. हाच वार्षिक खुराक पूर्ण करण्यासाठी किक च्या शोधात रॉलीला किक मारतो आणि कुठल्यातरी प्रवासाला निघतो.
उत्तुंग पीर पन्जाल पर्वतरांगा आणि चित्रासारखी सुंदर छोटी गावं दाखवत पहाटे विमान काश्मिर खोऱ्यावरून अलगद खाली उतरते. आपले पाय मात्र जमिनीवर विमानतळाबाहेर आल्यावरच येतात. कोणीतरी पुकारलेला बंद, दोन-तीन च्या संख्येने ठिकठिकाणी हातात रायफल्स घेऊन उभे असलेले आपले जवान, मधूनच टॅक्सीला ओलांडून धूळ उडवत जाणारे लष्कराचे चिलखती ट्रक्स आणि एकंदरीतच तणावपूर्ण वातावरण यामुळे किक चा एक हलकासा डोस श्रीनगर मध्येच मिळतो.
रॉलीवर लडाखी पताका चढवल्या आणि दल-सरोवर बघायला बाहेर पडलो. दल-सरोवर असे म्हणणे म्हणजे खरंतर द्विरुक्तीच कारण काश्मिरी भाषेत दल म्हणजेच सरोवर. एखाद्या करंजीच्या आकाराचे निळेशार दल-सरोवर, बाजूने फुललेल्या मुघलकालीन बागा, परिसरावर लक्ष ठेऊन असलेले हरि-पर्वत आणि शंकराचार्य आणि चटक रंगसंगती असलेले असंख्य शिकारे म्हणजे अगदीच पिक्चर-परफेक्ट दृश्य.
अकस्मात पावसाने झोड उठवली. संपूर्ण परिसर ओला-गच्च झाला. अतिरेकी हल्ल्यापेक्षाही हे अस्मानी संकट जास्त भयंकर होते. पाऊस रात्रभर सुरु राहिला.
रात्रीच्या पावसात भिजून आळसावलेल्या रॉलीने सकाळी पोटभर खाऊन ढेकर दिला आणि सोनमर्गचा मार्ग धरला. पाऊस आता थांबला होता पण काळे ढग अजूनही भेडसावत होते. साडेसात वाजून गेले तरी बऱ्यापैकी अंधार होता. सिंधू नदीचा खळखळाट आणि रॉलीचा धडधडाट यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती आणि तेवढ्यात सोनमर्ग आले.
एका ढाब्यावर थंडीमुळे लाकडं झालेली बोटं गरमागरम दाल तडक्यात बुडवून चोखताना "दाल तो बडी चंगी बनी है पाजी" ही माझी उस्फुर्त दाद ऐकून तिथल्या "पाजी" वेटरने उरलेले पैसे स्वतःच टीप म्हणून ठेऊन घेतले.
पूर्णपणे काळवंडलेला जोझि-ला दुरूनच भीती घालत होता.
“आगे बढो, देख लेंगे!” पोटात गेलेले सुग्रास अन्न धीर देऊ लागले. बऱ्यापैकी कठीण म्हणावा असा जोझी-ला, मालवाहू ट्रक्स, पर्यटकांच्या गाड्या, मेंढ्यांचे कळप, बर्फाच्या भिंती, हलका पाऊस आणि मुबलक खाचखळगे यांच्या संगतीने पार झाला.
“ हेल्मेट निकालो और आयडी दिखाव ! ” लष्कराच्या एका हत्यारबंद जवानाने थांबवले. आयडी ची गरज पडली नाही. हेल्मेट काढल्यावर माझी बऱ्यापैकी साधी, पांढरपेशी चेहरेपट्टी कामी आली आणि परत मार्गस्थ झालो.
द्रास आले. मानवी वस्ती असलेल्या जगातल्या अतिथंड प्रदेशांमध्ये द्रास गणल्या जाते. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आणि वातावरणात आपल्या लष्कराने मिळवलेला विजय हा केवळ एकमेवाद्वितीय असाच म्हणता येईल. तोलोलिंग पर्वतरांगा आणि टायगर-हिल यांच्या पार्श्वभूमीवर बांधलेले द्रास वॉर-मेमोरियल बघितले की आपण आपोआप नतमस्तक होतो, भारावून जातो. एखादा पाकी फास्ट बॉलर देखील सहज लक्ष करू शकेल असे वाटावे इतकी ही टायगर हिल आपल्या NH1 महामार्गाजवळ आहे.
" वेल बिगन इज हाफ डन ".... सहजच विचार डोकावून गेला. कारणही तसेच होते. कारगिलमधले जरा उंचावर असलेले हॉटेल एकदम आरामशीर होते. खूप दूरवरचा प्रदेश इथून सहज दिसत होता, अगदी पाकिस्तानव्याप्त काश्मिरातली शिखरेदेखील. वारा छान सुटला होता. दिवसभराच्या कामगिरीवर बेहद्द खूष होऊन स्वतःलाच रमचा एक कडक पेग बक्षिस म्हणून देऊन टाकला.
पण .... चांगली सुरुवात झाली असली तरी हे "हाफ डन" मात्र अजिबात नव्हते. सुरु नदीकाठी वसलेल्या कारगिल मधूनच उद्या खऱ्या प्रवासाला "सुरु"वात होणार होती.
प्रतिक्रिया
2 Dec 2017 - 12:48 am | राघवेंद्र
मस्त सुरुवात !!!
2 Dec 2017 - 1:35 am | संग्राम
जबरा फोटू
2 Dec 2017 - 1:49 am | निशाचर
अप्रतिम फोटो!
क्रमश: टाकायचं राहिलं का?
2 Dec 2017 - 2:00 am | किल्लेदार
क्रमशःच आहे.... टाकायचे राहिले :)
2 Dec 2017 - 2:24 am | निशाचर
मग ठिक आहे :) 'खर्या प्रवासाच्या' प्रतिक्षेत...
2 Dec 2017 - 4:28 am | पहाटवारा
किलर फोटोज .. नेहमीप्रमाणे .. सर्व गोन्धळ - गर्दितून फक्त सुरेख चित्रदर्शी फ्रेम्स .. एकाहून एक लाजवाब !
2 Dec 2017 - 9:20 am | अभिजीत अवलिया
छान ...
2 Dec 2017 - 10:04 am | संजय पाटिल
छान सुरवात आणि सुंदर फोटो...
पु.भा.प्र.
2 Dec 2017 - 11:35 am | सस्नेह
नुसते फोटो पाहूनच डोळे निवले !
..पुढे वाचलेच नाही.
2 Dec 2017 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरा फोटो आले आहेत.
-दिलीप बिरुटे
2 Dec 2017 - 12:53 pm | राघव
क्लास वर्णन आणि फोटोज! :-)
राघव
2 Dec 2017 - 2:15 pm | चांदणे संदीप
फोटोसाठी दंडवत! लेखनही सुरेख!
येऊद्या अजून... वाचतोय!
Sandy
2 Dec 2017 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरुवात ! फोटो अप्रतिम आहेत !!
2 Dec 2017 - 3:30 pm | पद्मावति
वाह सुंदर! वाचतेय.
2 Dec 2017 - 3:38 pm | समयांत
मस्तच!
2 Dec 2017 - 5:01 pm | दिपस्वराज
देवा, बऱ्याच दिवसापासून तुमच्या लेखाची वाट पहात होतो. पण लेख 'स्पिती व्हॅली ' वर असेल असे वाटत होते. वकारच्या इंस्विंग योर्कर प्रमाणे तुम्ही टाकलेला लेख माझी दांडी घेऊन गेला.
...पण किल्लेदार या नावाला जागत हि मालिका सुद्धा दर्जेदार असणार याची चुणूक पहिल्याच लेखात आली.
2 Dec 2017 - 10:38 pm | किल्लेदार
हाहाहा....
प्रतिक्रियांबद्दल आभार. पुढचा भाग थोडा उशीरा टाकावा म्हणतो. सध्या हिमालयातल्या एकदम तीन सफरी चालू झाल्यात.
4 Dec 2017 - 9:59 am | विचित्रा
सुंदर प्रकाशचित्रे
4 Dec 2017 - 1:32 pm | शलभ
खूप सुंदर..
4 Dec 2017 - 1:59 pm | सुमीत भातखंडे
अप्रतिम फोटोग्राफी!!
4 Dec 2017 - 7:53 pm | दुर्गविहारी
कसले कातील फोटो काढताय हो. आम्हाला केव्हा जमायचे असे फोटो काढायला? लवकर टाका पुढचा भाग.
4 Dec 2017 - 8:23 pm | पैसा
मस्त!!!
4 Dec 2017 - 8:57 pm | अनिंद्य
खूब, बहुत खूब !
पु भा प्र
6 Dec 2017 - 12:59 am | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल आभार.... या रस्त्यांवर माझी आणि रॉली ची जितकी दमणूक झाली त्यापेक्षा जरा जास्तच माझी आणि लेखणीची होते आहे.
6 Dec 2017 - 2:02 am | रुपी
सुरेख! फोटो आणि लेखन मस्तच.
7 Dec 2017 - 5:35 pm | चौथा कोनाडा
वॉव, भारी, सुंदर !
........................... फोटो आणि लेखन दोन्हीही.
7 Dec 2017 - 6:39 pm | सूड
एकच नंबर!!
10 Dec 2017 - 1:31 am | मोदक
व्वाह्ह...!!!! __/\__
5 Jan 2018 - 2:11 am | विदुला
फोटो आणि लेखन छानच