हॅरी पॉटर - भाग तीन

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
27 Oct 2017 - 11:28 pm

हॉगवर्ट्स मध्ये जादूच्या अनेक शाखांचं शिक्षण दिलं जातं . त्यातले काही महत्त्वाचे विषय म्हणजे -

१ . ट्रान्सफिगरेशन / रूपांतरण ,

२ . चार्म्स / मंत्रविद्या ३ . पोशन्स / काढेशास्त्र

४ . हिस्ट्री ऑफ मॅजिक / जादूचा इतिहास ( यात जादूगार समाजाच्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा समावेश होतो )

५ . ऍस्ट्रॉनॉमी / खगोलशास्त्र .

६ . हर्बॉलॉजी / वनस्पती शास्त्र

७ . डिफेन्स अगेन्स् डार्क आर्ट्स / गुप्त कलांपासून
संरक्षण

आणि

8. फ्लाईंग लेसन्स / जादुई झाडुवरून उडणे

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला हे सगळे विषय असतात . यातला उडणे हा विषय फक्त पहिल्या वर्षाकरता असतो . उरलेले सातही विषय पुढची 4 वर्षे असतात . पाचव्या वर्षात ओ.डब्ल्यू .एल नावाची एक प्रमुख परीक्षा होते . त्यात विद्यार्थी या सात विषयांपैकी ज्या विषयात पास होईल तेच विषय त्याला पुढील 2 वर्षासाठी उरतात . ओ. डब्ल्यू. एल हा ऑर्डिनरी विझार्डिंग लेव्हल याचा शॉर्टफॉर्म आहे . हि परीक्षा घेण्यासाठी शिक्षणखात्याचे तज्ज्ञ जादूगार परीक्षक म्हणून बाहेरून येतात .

दुसऱ्या वर्षापासून या 7 विषयांखेरीज आणखी वेगवेगळ्या विषयांतून विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार कोणते विषय घ्यायचे हे ठरवू शकतात . ओ. डब्ल्यू .एल . परीक्षेत या विषयांचीही परीक्षा घेतली जाते व पास झालेले विषय पुढच्या 2 वर्षांसाठी घेतले जातात . यात पासिंग ग्रेड्स असतात . ठराविक पासिंग ग्रेड्स मिळालेलेच विद्यार्थी शिक्षक पुढच्या वर्गांसाठी स्वीकारतात ... काही शिक्षक सर्वात वरची ग्रेड मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच आपल्या पुढच्या वर्गात म्हणजे 6 व्या वर्षीच्या वर्गात घेतात तर काही कोणतीही पासिंग ग्रेड असलेल्या विद्यार्थ्यांना घेतात . हि निवड करण्याचं स्वातंत्र्य त्या त्या विषयाच्या शिक्षकाला असतं .

म्हणजे सात कम्पलसरी विषय आणि एक किंवा अधिक ऑप्शनल विषय . हे ऑप्शनल विषय पुढीलप्रमाणे -

१ . डिव्हीनेशन / भविष्यकथन / ज्योतिष ,

२ . केअर ऑफ मॅजिकल क्रीचर्स / जादुई प्राण्यांचा अभ्यास ,

३ . ऍरिथमॅन्सी / अंकाचे जादुई महत्व

४ . मगल स्टडीज / मगल लोकांबद्दलचा अभ्यास

५ . स्टडी ऑफ ऍन्सिएन्ट रुन्स / प्राचीन लिप्यांचा अभ्यास

७ . ऍपॅरीशन / अंतर्ध्यान पावून दुसऱ्या ठिकाणी प्रकट होणे शिकणे

यापैकी काही विषयांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे -

१ . ट्रान्सफिगरेशन -

ही जादूची शाखा अतिशय विस्तृत आहे . यात एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूत रूपांतर करणे हे मुख्य साध्य असते . त्याचप्रमाणे वस्तू गायब करणे / वस्तूचे अस्तित्वच नाहीसे करणे , मुळात अस्तित्वातच नसलेली वस्तू हवेतून निर्माण करणे , जिवंत प्राण्यांचे निर्जीव वस्तूंत रूपांतर करणे , निर्जीव वस्तूंचे जिवंत प्राण्यांत रूपांतर करणे आणि अल्ट्रा - ट्रान्सफिगरेशन म्हणजे रुपांतरीत केलेली वस्तू पुन्हा तिच्या मूळ रुपात परिवर्तित करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश या विषयात होतो .

वेगवेगळ्या गोष्टींच्या रूपांतरासाठी वेगवेगळे मंत्र असतात आणि प्रत्येक मंत्राकरता छडीची हालचाल ही वेगळी असते . मंत्र म्हणताना हि हालचाल आणि मंत्राचा उच्चार अचूक झाला नाही तर मंत्राचा काहीच परिणाम होत नाही . शिवाय काही गोष्टींच्या बाबतीत मंत्र आणि अचूक हालचाल एवढंच पुरेसं नसतं तर कॉन्सन्ट्रेशन फार गरजेचं असतं . समोरच्या गोष्टीचे ज्या गोष्टीत रूपांतर करायचे आहे त्या वस्तूची प्रतिमा अधिकाधिक स्पष्टपणे मनात साकार करावी लागते , इकडेतिकडे लक्ष भटकू देऊन चालत नाही .

प्रथम वर्षी विद्यार्थ्यांना लहान , सोप्या वस्तूंचे रूपांतर करणे शिकवलं जाते , उदा . माचीसच्या काडीचे सुईत रूपांतर करणं , छोट्या भुंगासदृश्य किटकांचं बटणांत रूपांतर करणं इ . दुसऱ्या वर्षी ससा , पक्षी आदी जरा मोठ्या प्राण्यांचे व वस्तूंचे रूपांतर शिकवलं जातं .. अशा प्रकारे हळूहळू काठिण्यपातळी वाढत जाते व सहाव्या व सातव्या वर्षात निर्जीव वस्तूंचे प्राण्यांत रूपांतर , स्वतःच्या शरीराच्या भागांचे रूपांतर आदी शिकवलं जातं . दुसऱ्या व्यक्तीलाही वस्तूमध्ये किंवा प्राण्यामध्ये रुपांतरीत केलं जाऊ शकतं , अर्थात यासाठी खूप वरच्या दर्जाचे स्किल गरजेचं असतं . अशा रीतीने जर व्यक्तीला प्राण्यात परिवर्तित केलं तर त्या प्राणीरूपातील व्यक्तीला आपल्या खऱ्या ओळखीची काही जाणीव राहत नाही , ती त्या प्राण्याप्रमाणे वर्तन करते .

अपुरं ज्ञान किंवा कौशल्य असताना ट्रान्सफिगरेशन करू पाहणे हे फार धोकादायक असतं . अनपेक्षित अपघात होऊन रूपांतराचा प्रयोग केल्या जाणाऱ्या वस्तू / प्राणी / व्यक्तीत कायमची किंवा टेम्पररी विकृती निर्माण होऊ शकते , गंभीर इजाही होऊ शकते .

ट्रान्सफिगरेशनची आणखी पुढची पातळी म्हणजे जादूगार स्वेच्छेने कोणत्यातरी एका ठराविक प्राण्यात रुपांतरीत होऊ शकतो . या प्राण्याच्या रुपात त्याला आपल्या खऱ्या ओळखीचे पूर्ण ज्ञान असतं . हे विद्यालयात शिकवले जात नाही ..याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना ते तज्ज्ञ जादूगाराकडून घ्यावे लागते , याला अनेक वर्षे लागू शकतात . काही मोजकेच बुद्धीमान आणि जादूत निपुण जादूगार यात यशस्वी होऊ शकतात . प्राण्याचे रूप घेऊ शकण्याऱ्या जादूगारांना ऍनिमॅजस / प्राणिरूपधारी म्हटलं जातं . ऍनिमॅजस झाल्याचं रजिस्ट्रेशन जादू मंत्रालयात करावं लागतं .

२ . चार्म्स / मंत्र -

ट्रान्सफिगरेशन मध्ये वस्तू पूर्णपणे वेगळ्याच वस्तूत परिवर्तित केली जाते तर चार्म्स मध्ये वस्तूचं मूळ रूप तेच ठेवून तिचे गुणधर्म बदलले जातात . त्याचप्रमाणे वस्तू हवेत तरंगवणं , हवेतून विशिष्ट दिशेला पाठवणं , वस्तूचे रंग किंवा इतर गुणधर्म बदलणं ..

यामध्येसुद्धा मंत्राचा अचूक उच्चार आणि छडीची अचूक हालचाल फार महत्वाची असते .

चार्म्सचे असंख्य वेगवेगळे जटील आणि गुंतागुंतीचे प्रकार आणि उपयोग आहेत . एखाद्या व्यक्तीची ठराविक / सगळी स्मृती पुसून टाकणं , स्मृती बदलणं , एखाद्या ठिकाणाचा पत्ता / रहस्य व्यक्तीच्या आत्म्यात लपवणं जेणेकरून ती व्यक्ती फितूर झाली नाही तर जगात कोणी काय वाट्टेल ते करून ती जागा शोधू शकणार नाही . स्पेल म्हणजे मंत्र . या अनेक प्रकारांपैकी खाली अगदी मोजकी उदाहरणंच दिली आहेत -

बोलताना आवाज अनेक पटीने मोठा करणारा स्पेल

कुलूप उघडण्याचे मंत्र - अनलॉकिंग स्पेल्स

वरील मंत्र वापरून कुलूप उघडले जाऊ नये म्हणून अँटी अनलॉकिंग स्पेल्स

पाणी तयार करणारा स्पेल

प्रकाश निर्माण करणारा स्पेल

अग्नी निर्माण करणारा स्पेल

व्यक्तीला / हलणाऱ्या वस्तूला स्तब्ध करणारा स्पेल

एखादी दूरची वस्तू हवेतून जवळ बोलावणारा स्पेल

चार्म्स मध्ये हेक्सेस , जिंक्सेस आणि कर्सेस असे आणखी उपप्रकार पडतात पण ते चार्म्सच्या वर्गात शिकवले जात नाहीत .

हेक्सेस आणि जिंक्सेस चा वापर जादूचा वापर करून लढाई करताना होतो . यातले काही गंभीर इजा करणारे असतात तर काही तेवढे गंभीर नसतात तर काही मजेखातर वापरले जातात . बऱ्याच वेळा विद्यार्थी आपापसा अशा जिंक्सेस आणि हेक्सेसचा वापर एकमेकांची थट्टामस्करी करण्यासाठी किंवा माफक त्रास देण्यासाठी करतात किंवा एखाद्या शत्रुत्व असलेल्या विद्यार्थ्याला त्रास देण्यासाठी किंचित गंभीर इजा करणाऱ्या हेक्सेसचा वापर करतात . यांची थोडी उदाहरणं -

बाइटिंग जिंक्स - ह्याचा प्रयोग केलेली वस्तू व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करते .

डान्सिंग फिट जिंक्स - ज्या व्यक्तीवर ह्याचा प्रयोग केला जातो तिचे पाय कंट्रोल बाहेर जाऊन व्यक्ती नाचू लागते .

इन्फ्लेट जिंक्स - वस्तू / व्यक्ती फुगते / तिचा आकार वाढतो .

जेली लेग जिंक्स - पाय थरथरू लागतात , चालणं शक्य होत नाही .

पिम्पल जिंक्स - व्यक्तीच्या चेहऱ्यावर फोड येतात

दातांचा आकार मोठा करणारा हेक्स

टोनेल्स ग्रोईंग हेक्स - पायाची नखे वेगाने खूप वाढतात

जिंक्सेस आणि हेक्सेस साधारणतः कायमस्वरूपी डॅमेज करत नाहीत . काऊंटर स्पेल वापरून त्यांचा प्रभाव संपवला जातो .

कर्सेस हे हेक्सेस आणि जिंक्सेस पेक्षा गंभीर स्वरूपाचे असतात . खऱ्याखूऱ्या जादुई युद्धात यांचा वापर केला जातो .

हेक्सेस आणि जिंक्सेस कोणत्या विषयाच्या वर्गात शिकवले जातात का हे निश्चित नाही ... वेगवेगळ्या विषयांच्या वर्गात मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे , पुस्तकांच्या आधारे त्याचप्रमाणे मोठ्या विद्यार्थ्यांकडून किंवा एकमेकांकडून विद्यार्थी स्वतःच हे हेक्सेस व जिंक्सेस शिकत असावेत असं सुचवण्यात आलं आहे .

कर्सेस सुद्धा चार्म्सच्या वर्गात शिकवले जात नाहीत . काही ठराविक कर्सेस डिफेन्स अगेन्स् डार्क आर्ट्स ह्या विषयांतर्भूत शिकवले जातात .

३ . पोशन्स / काढेशास्त्र -

काढा शब्द वाचून आपला सर्दीवरचा काढा आठवेल कदाचित . पण हॅरी पॉटरच्या जगतातले काढे हे फार वेगळे , विविध कारणांसाठी वापरले जाणारे आणि अर्थातच जादुई गुणधर्म असणारे असतात .

काढे बनवण्यासाठी ठराविक धातूचं उंच खोलगट बादलीसदृश्य भांडं / कॉल्ड्रन वापरलं जातं . बहुतेक काढयांसाठी जस्त / लोखंडी कॉल्ड्रन वापरली जाते तर काही विशिष्ट मोजके काढे हे सोने / चांदीच्या कॉल्ड्रन मध्येच बनवणं आवश्यक असतं .

प्रत्येक काढा बनवण्याची एक ठराविक कृती / रेसिपी असते . घटक पदार्थ हे अचूक क्रमाने आणि अचूक प्रमाणात ऍड करावे लागतात . चवथ्या क्रमांकाचा घटक पदार्थ दुसऱ्या क्रमांकाला घालून चालत नाही . चुकीचा घटक पदार्थ किंवा चुकीच्या क्रमाने घटक पदार्थ घातल्यास तो काढा बाद होतो , काही वेळा फेरफार करून तो पूर्ण बाद होण्यापासून वाचवता येतो तर काही चुका दुरुस्त होऊ शकत नाहीत ..

काही वेळा अशा चुकीमुळे काढा फक्त दुरुस्ती पलीकडे बिघडतो तर काही वेळा काढ्यात लहानसा स्फोट होतो तर काहीवेळा असा बिघडलेला काढा कॉल्ड्रनच वितळवून टाकतो .

अचूक क्रमाने घटक पदार्थ ऍड करण्याव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टींकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं . उदा . घटक पदार्थ छोट्याश्या तराजूत अचूक तोलून मगच काढ्यात ऍड करावे लागतात , कृतीत दिलेल्या प्रमाणाहुन कमी / अधिक झाल्यास काढा बिघडण्याची शक्यता वाढते . विशिष्ट घटक ऍड केल्यानंतर काढ्याखालची ज्योत मंद करावी लागते / वाढवावी लागते . घटक पदार्थ ऍड केल्यानंतर पुढचा पदार्थ ऍड करण्याचा वेळ कृतीत दिल्याप्रमाणे अचूक पणे पाळावा लागतो ... उदा . एक घटक घातल्यानंतर 3 मिनिटे काढा उकळू द्यावा व नंतरच पुढचा पदार्थ घालावा अशा सूचना असतात ... काही / सगळ्या काढ्यांमध्ये अमुक इतके घटक पदार्थ घालून झाल्यावर - काढा ठराविक स्टेजला आल्यावर त्यावरून छडी अमुक इतके वेळा घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने / काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा अशी सूचना असते .. हे फिरवणं कमी किंवा अधिक होऊन चालत नाही . काही घटक पदार्थ अचूक रीतीने कापणं गरजेचं असतं , उदा . आडवे कापा / अमुक एवढे मोठे तुकडे करा / पेस्ट करा अशी सूचना कृतीत असेल तर तिचं तंतोतंत पालन करावं लागतं ... ते वाटेल तसे चिरुन कापून चालत नाहीत .

ह्या सगळ्या गोष्टींकडे एकाच वेळी अवधान देऊन काढा बनवावा लागतो . या कृती प्रत्येक काढ्यासाठी वेगवेगळ्या असतात .

काढयांचे घटक पदार्थ साधारण पुढील प्रमाणे असतात -

ठराविक जादुई वनस्पतींची मूळे / पाने / फुले / पाकळ्या / बिया / दाणे , विशिष्ट प्रकारची गवते

ठराविक सापांच्या काती , ठराविक जादुई प्राण्यांच्या / पक्ष्यांच्या नखांचे चूर्ण , विशिष्ट जादुई प्राण्यांच्या शिंगांचे चूर्ण , ठराविक जादुई प्राण्यांचे रक्त उदा . ड्रॅगनचे रक्त , जादुई प्राण्यांपासून मिळणारी विषे .... जादुई कीटक व प्राण्यांचे विशिष्ट अवयव उदा. मेंदू , हृदय , लिव्हर ... काही जादुई प्राण्यांची अंडी इ .

असे वेगवेगळे पदार्थ काढ्यांमध्ये वापरले जातात .

काढयांचे वेगवेगळे उपयोग आहेत . वेगवेगळ्या जादुई आजारांवरची औषधे म्हणून .... विषे म्हणून ... काही काढ्यांची उदाहरणे पुढीलप्रमाणे -

१ . ड्रॉट ऑफ लिविंग डेथ - जिवंत मृत्यूचा घोट - हा अतिशय प्रभावी व स्ट्रॉंग असा झोपेचा काढा आहे . याचा निष्काळजी वापर केल्यास व्यक्ती अनिश्चित कालावधीसाठी कोमासदृश्य झोपेत जाऊ शकते .

२ . केस वाढवणारा काढा

३ . एजिंग पोशन - हा ठराविक प्रमाणात पिणाऱ्या व्यक्तीचे वय त्या त्या प्रमाणात वाढते .. उदा . एक लहान घोट काही महिन्यांनी वय वाढवू शकतो . अर्थात हे तात्पुरतं असतं . ठराविक वेळाने , काढ्याचा परिणाम ओसरल्यावर व्यक्ती मूळ वयात येते .

४ . पॉलीज्यूईस पोशन - ह्या काढ्याचा वापर दुसऱ्या व्यक्तीचं रूप घेण्यासाठी केला जातो . का काढा बनवणं अतिशय जटील व गुंतागुंतीचं असतं . अनेक स्टेप्स असतात . हा काढा सर्व घटक पदार्थ घालून तयार झाल्यानंतर एक महिना अतिमंद आचेवर शिजावा / उकळावा लागतो , त्यानंतरच तो वापरासाठी तयार होतो . ज्या व्यक्तीचं रूप घ्यायचं आहे त्याच्या शरीराचा थोडासा भाग उदा . नखे किंवा केस पिण्याच्या आधी त्यात घालावे लागतात . हा शेवटचा घटक घातल्यानंतर काढ्याचा रंग त्या व्यक्तीच्या स्वभाव / व्यक्तीमत्वाप्रमाणे बदलतो ... आणि चवही थोड्या फार प्रमाणात बदलत असावी . मूळ चव वाईटच असते ... व्यक्तीनुरूप त्यात आणखी थोडाफार बिघाड किंवा सुधार होत असावा . याचा प्रभाव काही वेळच टिकतो , एक तास वगैरे .. जास्त काळ दुसऱ्याचे रूप ठेवायचे असल्यास हा ठराविक कालावधीनंतर पुन्हा प्यावा लागतो .

५ . वेरिटॅसिरम / वेरीटेसिरम / ट्रुथ सिरम - सत्यद्रव

हा काढा तो काढा पिणाऱ्या व्यक्तीला खरं बोलायला लावतो . गुन्हेगारांची उलटतपासणी घेताना किंवा तत्सम कारणासाठी हा वापरला जातो . ह्या काढ्याच्या वापरावर जादू मंत्रालयाचे कडक निर्बंध आहेत . सामान्य जादूगार मुक्तपणे वाटेल तसा याचा उपयोग दुसऱ्यांवर करू शकत नाहीत .

६ . फिलिक्स फेलेसिस / लिक्विड लक -

हा काढा जादुई जगतातला अतिशय विलक्षण काढा आहे . याचा रंग वितळलेल्या सोन्यासारखा सोनेरी असतो . हा पिणाऱ्या व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी नशीबवान / लकी बनवतो . अर्थात हा काढा अशक्य गोष्टी शक्य करू शकतो असं मुळीच नाही . मुळात व्यक्तीमध्ये एखादी गोष्ट साध्य करण्याची क्षमता असते पण परिस्थिती अनुकूल नसते अशा वेळी हा काढा परिस्थिती अनुकूल करतो , वाटेतील छोटेमोठे अडथळे दूर करतो .

हा काढा बनवणं अत्यंत कठीण असतं ... हा पूर्ण तयार होण्याला सहा महिने एवढा काळ लागतो . बनवताना चुका झाल्यास तो घातक ठरू शकतो . हा वारंवार घेतल्यास अतिआत्मविश्वास ( ओव्हर कॉन्फिडन्स ) आणि अविचारी बेजबाबदार वर्तन हे दुष्परिणाम दिसून येतात . तर जास्त प्रमाणात घेतल्यास हा विषारी ठरतो . मर्यादित प्रमाणात व गरज असतानाच घेतल्यास हा काढा अतिशय सुखद परिणाम देतो .

असे वेगवेगळे शेकडो काढे असतात .

सहाव्या आणि सातव्या वर्षी ओ. डब्ल्यू . एल मध्ये पास झालेल्या विषयांचं पुढचं , वरच्या कठीण पातळीवरचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं व सातव्या वर्षाच्या शेवटी N.E.W.Ts ( नास्टीली एक्जॉस्टिंग विझार्डिंग टेस्ट्स ) हि मुख्य परीक्षा द्यावी लागते . ह्या परीक्षेत मिळणाऱ्या ग्रेड्स म्हणजे आपल्या डिग्री / ग्रॅज्युएशनच्या बरोबरीच्या मानल्या जातात .

या विषयांच्या माहिती वरून लेखिकेने प्रत्येक विषय जास्तीत जास्त खरा वाटणारा , अर्थपूर्ण , खोली असलेला असा निर्माण केला आहे याची साधारण कल्पना येईल . अर्थात ह्या विषयांच्या एकूण खऱ्या व्याप्तीच्या तुलनेत मी वर लिहिलेली माहिती खूप अपुरी आहे याचीही नोंद घ्यावी . लेखिकेने अक्षरशः एक नवीन जग निर्माण केलं आहे , प्रत्येक गोष्टीला स्ट्रॉंग बेस , कारणीमीमांसा , भूतकाळ दिला आहे ...

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

28 Oct 2017 - 6:39 am | तुषार काळभोर

अर्थात तुम्ही स्वतः म्हटल्या प्रमाणे, रोलिंग्जने प्रतिसृष्टी निर्माण केलीये. एका एका विषयाचं वर्णन करायला काही लेख लिहावे लागतील.
इतकं परिपूर्णतेकडे झुकणारे लेखन आहे की 'ह्या, असं कुठं असतं का!' असा विचारसुद्धा गोष्टी वाचताना मनात येत नाही.

उगा काहितरीच's picture

28 Oct 2017 - 7:51 am | उगा काहितरीच

वा ! प्रचंड आवडत आहे ही मालीका.

सस्नेह's picture

28 Oct 2017 - 10:19 pm | सस्नेह

बापरे ! किती तपशीलवार आणि तर्कशुद्ध !
रोलिंग बाईंना साष्टांग

संग्राम's picture

29 Oct 2017 - 3:57 pm | संग्राम

खूप सुंदर आणि सोपी माहिती करून देत आहात

परिंदा's picture

30 Oct 2017 - 3:15 pm | परिंदा

मस्त लिहीलंय!

लेखिकेने अक्षरशः एक नवीन जग निर्माण केलं आहे , प्रत्येक गोष्टीला स्ट्रॉंग बेस , कारणीमीमांसा , भूतकाळ दिला आहे ...

+१
म्हणूनच हॅरी पॉटर ची अभ्यासक्रमाची पुस्तकंही प्रकाशित केली गेलीयेत, आणि तीही तितकीच वाचनीय आहेत, आपण अभ्यास करताना समासात नोंदी करतो, रेघोट्या मारतो तसं सगळं आहे या पुस्तकांमध्ये - मालिकेत याचाही उल्लेख येईल अशी आशा.