हॅरी पॉटरच्या जगातले जादुई प्राणी
या जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जादुई प्राणी / जादुई जीव आहेत . त्यातले कथेच्या दृष्टीने महत्वाचे आणि विविधतेची साधारण कल्पना येईल असे काही पुढीलप्रमाणे -
१ . हाऊस एल्फ्स -
हाऊस एल्फ हे अतिशय जुन्या व श्रीमंत प्युअर ब्लड जादूगार घराण्यांमध्येच आढळून येतात . हाऊस एल्फची उंची साधारण 3 फूट असते . हाऊस एल्फ हे आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यास जादूने बद्ध असतात . मालकाची कोणतीही आज्ञा ते मोडू शकत नाहीत . हाऊस एल्फसना माणसासारख्याच भावभावना असतात पण बहुतांश जादूगार त्यांना माणसाहून खूप कमी दर्जाचे समजतात . त्यांना पगार दिला जात नाही , विनामूल्य राबवले जाते , काही निर्दय जादूगार तर आपल्या हाऊस एल्फना लहानसहान चुका झाल्यास शारीरिक शिक्षा देतात , उदा . काठीने मारणे , उपाशी ठेवणे किंवा स्वतःला शिक्षा करून घे अशी आज्ञा देणे . आणि 99 % हाऊस एल्फसची या सगळ्याला काहीच तक्रार नसते . बहुतेक हाऊस एल्फ हे मालकाप्रति अतिशय निष्ठावान असतात . मालकाविषयी वाईट शब्द ते उच्चारु शकत नाहीत . मालकाने कितीही वाईट वागणूक दिली तरी त्याला ती देण्याचा हक्कच आहे किंवा ते योग्यच आहे असे समजण्याएवढे त्यांचे ब्रेनवॉशिंग पिढ्यानपिढ्या झालेले असते . ते स्वतःही आपल्या वैयक्तिक भावनांना महत्व देत नाहीत , मालकाला खुश / निदान संतुष्ट ठेवणं हेच त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असते .
हाऊस एल्फने जर मनापासून ठरवलंच तर तो मालकाची एखादी आज्ञा मोडू शकतो पण तसं करताना त्याला त्रास होतो , शिवाय नंतर स्वतःच स्वतःला जबर शिक्षा करून घ्यावी लागते .
जे जादूगार आपल्या हाऊस एल्फस शी खरोखर चांगले , माणसासारखे वागतात त्यांचे एल्फस तर मालकावर भक्तियुक्त प्रेमच करतात , समर्पण हा सगळ्याच हाऊस एल्फस चा मूलभूत गुणधर्म आहे . ज्यांचे मालक वाईट वागतात त्यांचे एल्फस हे आपल्या सोबत अन्यायपूर्ण वागणूक होत आहे असं म्हणत नाहीत आणि ज्यांचे मालक चांगले वागतात त्यांना तर आभाळच ठेंगणं होतं , अशा मालकासाठी ते स्वइच्छेने जीवसुद्धा द्यायला तयार होतात .
हाऊस एल्फसना जादू करण्यासाठी छडीची गरज लागत नाही . त्यांची जादू जादूगारांच्या जादूपेक्षा वेगळ्या प्रकारची असते .
हाऊस एल्फ हा या गुलामीच्या जगण्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे , तो म्हणजे मालकाने एखादा कपडा त्याला द्यायचा . पण अर्थात फुकटचा हरकाम्या गुलाम हातचा कोण जाऊ देईल ? दुसरी गोष्ट म्हणजे ही मुक्तता बहुतांश हाऊस एल्फसना नकोच असते . सगळी वाईट वागणूक सहन करण्याची त्यांची तयारी असते पण मुक्तता नको . कारण मुक्तता हि प्रचंड अपमानास्पद , नामुष्कीची गोष्ट असा त्यांच्या प्रजातीचा दृढ समज आहे .
अशा या समाजात एक बंडखोर हाऊस एल्फ निघतो - डॉबी ... ज्याला आपल्यावर अन्याय होत आहे , आपला छळ होत आहे याची जाणीव असते आणि तो मालकाच्या आज्ञेविरुद्ध जाऊन हॅरीला मदत करण्याचा प्रयत्न करतो . हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट्स या पुस्तकात डॉबी वाचकाला प्रथम भेटतो . पुस्तकाच्या उत्तरार्धात हॅरी आपल्या चतुराईचा वापर करून डॉबीला त्याच्या मालकाच्या गुलामगिरीतून सोडवतो . पुढे 4 वर्षात अनेक वेळा डॉबी हॅरी व त्याच्या मित्रांना मदत करतो .
डॉबीला मुक्त करणं हा बऱ्याच मोठ्या कथानकातला अगदी छोटासा भाग आहे .
पुढे विंकी , क्रिचर , होकी असे आणखी काही हाऊस एल्फ वाचकाला भेटतात .
हॅरीची मैत्रीण व एक महत्त्वाचं पात्र असलेली हर्माइनी ग्रेन्जर हाऊस एल्फस वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना व इतर जादूगारांना जागृक करण्याचा प्रयत्न करते .. याबाबत थोडी अधिक माहिती हर्माइनीची ओळख करून घेताना पाहू .
२ - हिपोग्रिफ / गरुड अश्व -
शरीराचा पुढचा भाग पक्ष्याचा , दोन मोठे पंख आणि खालचा भाग घोड्याचा असा हा प्राणी . हॉगवार्ट्स मधील रुबियस हॅग्रिडने ह्या प्राण्यांचा कळप जवळच्या जंगलात जोपासलेला असतो . हे उडू शकतात , यांचा वापर कदाचित प्रवासासाठी केला जात असावा किंवा ही दुर्मिळ प्राणिजात नष्ट होऊ नये यासाठी त्यांची वाढ केली असावी . हे प्राणी फार मानी असतात . अपमान झाला असं वाटल्यास शारीरिक हल्ला करू शकतात .
हॅरी पॉटर अँड प्रिजनर ऑफ अझ्काबान मध्ये एका विद्यार्थ्यावर हल्ला केल्याबद्दल बकबीक नावाच्या हिपोग्रिफला जादू मंत्रालय मृत्युदंडाची शिक्षा ठोठावते . यामध्ये हिपोग्रिफची चूक नसते व तो विद्यार्थीही गंभीर जखमी झाल्याचे केवळ नाटक करत असतो , जादू मंत्रालयाने हिपोग्रिफला मृत्युदंड द्यावा म्हणून सदर मुलाचे वडील , जे मंत्रालयात उच्छपदस्थ अधिकारी आहेत ते दबाव आणत असतात . पुस्तकाच्या शेवटी हॅरी आणि त्याचे मित्र हिपोग्रिफला मृत्यूदंडापासून वाचवतात . पुस्तकाच्या शेवटी हा हिपोग्रिफ एक महत्वाची भूमिका पार पाडतो .
३ - थेस्ट्रॉल्स -
हे उडणाऱ्या घोड्यासदृश्य काळ्या रंगाचे प्राणी आहेत . यांचे पंख प्रचंड वटवाघळाच्या पंखांप्रमाणे दिसतात . थेस्ट्रॉल्स फक्त अशाच माणसांना दिसू शकतात ज्यांनी कुणाचातरी मृत्यू होताना पाहिला आहे . जादूगार समाजातले अनेक लोक यांना अशुभ मानतात . हे उडू शकतात .
हिपोग्रिफ्सप्रमाणे थेस्ट्रॉल्सचाही कळप हॅग्रिडने हॉगवॉर्ट्स जवळच्या जंगलात जोपासला आहे .
हॉगवार्ट्सच्या स्टेशनपासून विद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या घोडागाड्या घोड्यांशिवायच धावतात . त्यांना अदृश्य घोडे जुंपले असावेत किंवा त्या जादूने धावत असाव्यात असंच सगळे विद्यार्थी समजत असतात .
पण हॅरीच्या हॉगवार्ट्सच्या पाचव्या वर्षात म्हणजे ऑर्डर ऑफ फिनिक्स पुस्तकात त्याला हे प्राणी दिसू लागतात . त्याच्या मित्रांना दिसत नाहीत . लुना नावाची मुलगी तुला भास होत नाहीयेत मलाही सुरुवातीपासून हे प्राणी दिसतात असं सांगून त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करते .
याच वर्षी जादुई प्राण्यांसंबंधीचे शिक्षण या विषयाच्या वर्गात हॅरी व इतर सर्व विद्यार्थ्यांना थेस्ट्रॉल्सची ओळख करून दिली जाते . आणि अचानक या वर्षापासून आपल्याला हे का दिसू लागले याचं कोडं हॅरीला उलगडतं .
याच वर्षी हॅरी व त्याचे मित्र एका महत्त्वाच्या हवाई प्रवासासाठी थेस्ट्रॉल्सचा उपयोग करतात .
४ . वेअरवुल्फ / नरलांडगा -
पूर्वी अनेक फँटसी चित्रपटांमधून / कादंबऱ्यांमधून प्रेक्षक - वाचकांच्या परिचयाची झालेला वेअरवुल्फ हा जीव हॅरी पॉटर मध्येही आपल्याला भेटतो .
एका वेअरवुल्फने दंश / चावा घेतल्यास दुसरा माणूसही वेअरवुल्फ बनतो हीच मूळ संकल्पना ठेवली आहे . पण याशिवाय आणखीही अनेक लहानमोठे बारकावे लेखिकेने आपल्या वेअरवुल्फ मध्ये निर्माण केले आहेत .
हॅरी पॉटरच्या जगातले वेअरवुल्फ फक्त पूर्ण चंद्र असलेल्या पौर्णिमेच्या रात्री वेअरवुल्फ मध्ये रुपांतरीत होतात . मनाला वाटेल तेव्हा ते रूप बदलू शकत नाहीत , फक्त पौर्णिमेच्याच रात्री ते रूप बदलू शकतात ... ते बदलतंच .. हि ऐच्छीक क्रिया नाही . वेअरवुल्फ मध्ये रूपांतर झाल्यावर त्याला आपण कोण वगैरे काहीही आठवत नाही , तो कुणालाही ओळखत नाही . त्याचं एका हिसंक घातकी जनावरात रूपांतर झालेलं असतं ... अशावेळी हा वेअरवुल्फ त्याचा जिवलग मित्र जरी समोर आला तरी त्याचा जीव घेऊ शकतो . दुसऱ्या दिवशी पुन्हा माणूस झाल्यानंतर आदल्या रात्री आपण काय केलं हे त्याला व्यवस्थित आठवतं . वेअरवुल्फ हा फक्त माणसालाच धोकेदायक असतो , तो इतर प्राण्यांना स्वतःहून इजा पोहोचवत नाही ... अर्थात एखादा लहान प्राणी आपणहून त्याच्या वाट्यास गेला तर तो गप्प राहत नाही .
वेअरवुल्फचे हे पौर्णिमेच्या रात्री माणसामधून वेअरवुल्फ मध्ये होणारे रूपांतरण अतिशय वेदनादायी असते . आणि पौर्णिमा संपून पुन्हा माणसात रूपांतर झाल्यानंतरही पुढचे काही दिवस फार थकवा आणि आजारी असल्याची भावना जाणवते . हॅरी पॉटरच्या जगतात 1970 मध्ये वुल्फ्सबेन या काढ्याचा ( potion ) चा शोध लावला गेला . हा काढा घेतल्यावर वेअरवुल्फच्या रूपांतरण प्रक्रियेतील वेदना कमी होतात आणि रूपांतर झाल्यानंतरही तो आपली खरी ओळख विसरत नाही , हिंसक होत नाही , शांत राहू शकतो .
ह्या काढ्याचा शोध लागला खरा पण ह्या काढ्याचे घटक पदार्थ अतिशय महाग असून हा काढा बनवण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती . अचूक पद्धतीने बनवला न गेल्यास तो विषारी होतो , तो बनवता येण्याइतके काढेशास्त्रातलं नैपुण्य असलेले जादूगार फार थोडे होते . त्यामुळे ह्याची प्राप्ती सर्वसामान्य गरीब वेअरवुल्फसच्या आवाक्याबाहेरचीच राहिली . काही नशीबवान जादूगारांनाच हा परवडू शके .
बहुतांशी जादूगारच वेअरवुल्फच्या दंशानंतर वेअरवुल्फ बनतात . मगल सुद्धा वेअरवुल्फ बनू शकतात ; नाही असं नाही पण अशा 99 % केसेस मध्ये मगल व्यक्ती त्या भयानक जखमेने , वेअरवुल्फच्या विषाने मृत्युमुखी पडते . जादूगारच या जखमेतून बचावण्याची शक्यता जास्त असते . काही वेळा वेअरवुल्फ दंश ( इनफेक्ट ) करून सोडून देतात तर काहीवेळा जीव घेतात .
जादूगार समाजात वेअरवुल्फना अतिशय वाईट वागणूक दिली जाते . इतर जादूगार कुटुंबे त्याच्याशी कसलाही संबंध ठेवत नाहीत . वेअरवुल्फ झालेले जादूगार पौर्णिमा सोडून इतर दिवशी आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे चांगले वागतात , अचानक हिंसक वागत नाहीत ( अर्थात काही अपवाद असतात ) . पण सर्वसामान्य जादूगार समाज हे समजून घेत नाही . त्यांच्यामते वेअरवुल्फ हा मनुष्यरूपातही धोकादायक असतो . वेअरवुल्फस बद्दल जादूगार समाजात घृणा , तिरस्कार , दहशत आणि प्रचंड भीती व गैरसमज आहेत . सततच्या वाईट वागणुकीमुळे वेअरवुल्फसच्याही मनात समाजाबद्दल , सरकार बद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते व ते वाईट मार्गावर चालू लागण्याची शक्यता वाढते .
जादूगार हा वेअरवुल्फ आहे समजल्यावर त्याला नोकरी मिळणे फार कठीण जाते . 1990 मध्ये तर जादू मंत्रालयाने अँटी वेअरवुल्फ कायदा निर्माण केला , त्यानुसार वेअरवुल्फना नोकरी मिळणे जवळजवळ अशक्य झाले . परिणामी अनेक वेअरवुल्फना आपल्या जादुई योग्यतेहून खालच्या दर्जाची कामे स्वीकारावी लागली तर अनेकांनी तत्कालीन कुख्यात गुन्हेगार जादूगार लॉर्ड वोल्डेमॉर्टचं अनुयायित्व स्वीकारलं , कारण वोल्डेमॉर्टच्या कारकिर्दीत तरी आपली परिस्थिती सुधारेल अशी त्यांची आशा होती .
हॅरी पॉटर सिरिजमधलं एक महत्त्वाचं पात्र हे वेअरवुल्फ आहे . त्याची ओळख करून घेताना वेअरवुल्फ या संकल्पनेबद्दल पुरेशी माहिती असावी म्हणून वरील माहिती सांगितली आहे .
५ . गॉब्लिन्स / पिशाच्च -
हे प्राणी उंची , रूप यामध्ये थोडेफार हाऊस एल्फ्सशी मिळतेजुळते असतात . चेहरा जास्त मानवसदृश्य असतो . यांचे दात - नखं हे मांसाहारी प्राण्यांप्रमाणे असतात . यातल्या बहुतेकांना इंग्लिश भाषा बोलता येते .. पण या प्रजातीची स्वतःची अशी एक खास जटील भाषा आहे , आपापसात संवाद साधण्यासाठी ते हि भाषा वापरतात . गॉब्लिन्स हे अतिशय बुद्धिमान असतात . जादुगार समाज चलन म्हणून सोने , चांदी व ब्रॉन्झची नाणी वापरतो ; ही नाणी घडवण्याचं काम गॉब्लिन्स करतात . जादूगारांची बँक ग्रिंगॉट्सचे सगळे व्यवहार गॉब्लिन्स सांभाळतात .
अनेक जादूगार गॉब्लिन्सना जादूगारांहून कमी दर्जाचे समजतात . पण गॉब्लिन्सचा स्वभाव हाऊस एल्फ्सच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध टोकाचा आहे . आपल्याला जादूगार कमी दर्जाचे समजतात याबद्दल त्यांच्या मनात राग आहे . स्वसंरक्षणासाठी / स्वार्थासाठी / अपमानाचा सूड घेण्यासाठी ते वेळप्रसंगी जादूगारावर जीवघेणा हल्लाही करू शकतात . जादूगार समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत खरे पण ते परस्पर आपुलकीमुळे नाही तर एकमेकांना एकमेकांची गरज आहे म्हणून ..... नाईलाज म्हणून . जादूगार समाजाच्या इतिहासात गॉब्लिन्सची अनेक बंडे ; जादूगार विरुद्ध गॉब्लिन्स अशा लढाया झाल्या आहेत .
गॉब्लिन्सचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तयार करत असलेल्या जादुई वस्तू ...गॉब्लिन्सनी तयार केलेल्या वस्तू अतिशय मजबूत , सुंदर , सहजासहजी नष्ट न होणाऱ्या असतात , हजारो वर्षे उत्तम टिकतात आणि काहींमध्ये विलक्षण गुणधर्म आणि जादुई शक्तीही असतात .
गॉब्लिन प्रजातीची खरेदी - विक्री आणि मालकी हक्काची संकल्पना एकदम अनोखी आणि भिन्न आहे . त्यांच्या मते वस्तू बनवणारा तिचा खरा मालक असतो , ती विकत घेणारा मालक होत नाही . गॉब्लिन्सनी बनवलेली एखादी वस्तू जादूगाराने विकत घेतली की ते असं समजतात कि ती वस्तू भाड्याने दिली आहे आणि त्या जादूगाराचा जेव्हा मृत्यू होईल त्यानंतर ती गॉब्लिन्सना परत दिली पाहिजे , आणि जर ठेवायची असल्यास तिचे मूल्य पुन्हा चुकते केले पाहिजे . अर्थात जादूगार हे मानत नाहीत व अशी खरेदी केलेली वस्तू पुढील पिढ्यांकडे सोपवली जाते . या गोष्टीला गॉब्लिन्स चोरी मानतात .
प्रतिक्रिया
24 Oct 2017 - 1:39 am | संग्राम
हा भाग पण मस्त ...
हॅरी पॉटर सिनेमे बघितलेल्या पण पुस्तके न वाचलेल्यास तुमचे हे लेख म्हणजे पर्वणीच
आता अधिकच समजून घेतोय
धन्यवाद
24 Oct 2017 - 8:53 am | आनन्दा
मस्तच आहे
24 Oct 2017 - 9:51 am | एमी
फार मस्त लिहिताय तुम्ही!! मज्जा येतेय वाचायला!
गॉब्लिन प्रजातीची खरेदी - विक्री आणि मालकी हक्काची संकल्पना एकदम अनोखी आणि भिन्न आहे . त्यांच्या मते वस्तू बनवणारा तिचा खरा मालक असतो , ती विकत घेणारा मालक होत नाही . गॉब्लिन्सनी बनवलेली एखादी वस्तू जादूगाराने विकत घेतली की ते असं समजतात कि ती वस्तू भाड्याने दिली आहे आणि त्या जादूगाराचा जेव्हा मृत्यू होईल त्यानंतर ती गॉब्लिन्सना परत दिली पाहिजे , आणि जर ठेवायची असल्यास तिचे मूल्य पुन्हा चुकते केले पाहिजे . अर्थात जादूगार हे मानत नाहीत व अशी खरेदी केलेली वस्तू पुढील पिढ्यांकडे सोपवली जाते . या गोष्टीला गॉब्लिन्स चोरी मानतात .>> हि संकल्पना मला फारच आवडली होती.
होकी कोण आठवत नाहीय :(
24 Oct 2017 - 1:59 pm | nishapari
होकी हेपजिबा स्मिथची हाऊस एल्फ . हेपजिबा स्मिथ - जिच्याकडून टॉम रिडल हफलपफचा कप व स्लायदेरीनचे लॉकेट चोरतो ती .
24 Oct 2017 - 5:05 pm | एमी
ओह्ह आठवली :D धन्यवाद.
बादवे खाली आदूबाळ जे सांगतोय की "'गोब्लिन'ला पिशाच्च हा मराठी शब्द वापरणे योग्य नाही. 'पोल्टेरगाईस्ट'ला पिशाच्च म्हणु शकता" ते मलापण पटलं.
24 Oct 2017 - 11:32 am | चिनार
जबरदस्त लिखाण !!
पुस्तक वाचताना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुढे कुठेतरी मिळते हे हॅरी पॉटर सीरिजचं एक जबरदस्त वैशिष्ट्य आहे.
जे के रोवलिंगच्या कल्पनाशक्तीला सलाम !
24 Oct 2017 - 12:37 pm | पुजारी
नीफलर , हिंकी पंक , ग्रींडिलॉव इ- बाबत पण लिहा . प्रतीक्षेत !!
24 Oct 2017 - 2:03 pm | nishapari
तसे लिहिता येण्यासारखे आणखीही अनेक प्राणी / जादुई जीव आहेत .
पण मुळात या लेखाचा हेतू हॅरी पॉटरची पुस्तकं न वाचलेल्या लोकांना ती वाचण्यात रस निर्माण व्हावा हा आहे . त्यासाठी कथानकाची साधारण रूपरेषा कळावी असा माझा प्रयत्न आहे . वर माहिती दिलेले प्राण्यांची एकूण बुक सिरिज मध्ये वारंवार काहीतरी भूमिका आहे . त्यामानाने ग्रिंडिलो , हिकिपंक यांची एकूण कथानकाच्या दृष्टीने काहीच भूमिका नाही .
युनिकॉर्न्स , सेंटॉर्स , जायंट्स / दानव , बॅसिलिस्क , मेरपीपल / जलमानव , जायंट स्पाईडर्स , बोगार्ट / बागुलबुवा , घोस्ट्स / भुते या जीवांबद्दल लेख पात्रांची ओळख करून देणाऱ्या लेखानंतर लिहेन .
24 Oct 2017 - 1:29 pm | आदूबाळ
गॉब्लिन्स म्हणजे पिशाच्च? त्यातल्यात्यात पीव्ह्जला पिशाच्च म्हणता येईल.
24 Oct 2017 - 2:02 pm | nishapari
नाही , पीव्ज गॉब्लिन नाही , तो घोस्ट / भूत . घोस्ट आणि गॉब्लिन्स हे वेगवेगळे जीव आहेत . गॉब्लिन्स हे जिवंत प्राणी आहेत तर घोस्ट्स मृत जादूगाराची मागे राहिलेली नुसती पारदर्शी छाया .
24 Oct 2017 - 2:13 pm | आदूबाळ
हो, मला कल्पना आहे पीव्ज गॉब्लिन नाही. पीव्ज पोल्टेरगाईस्ट आहे - म्हणजे गोस्टपेक्षा वेगळं. त्याला पिशाच्च हा शब्द त्यातल्यात्यात योग्य वाटतो. गॉब्लिनला नव्हे.
24 Oct 2017 - 2:49 pm | nishapari
हो , तुमचं बरोबर आहे . पीव्ज घोस्ट नाही . पोल्टरगाईस्ट आहे . म्हणजे पूर्ण वेगळ्या प्रजातीचा जीव . म्हणूनच तो घन आकार धारण करू शकतो व वस्तू हलवू शकतो , तर बाकी घोस्ट्स हे करू शकत नाहीत .
24 Oct 2017 - 2:10 pm | सस्नेह
वाचतेय...
24 Oct 2017 - 3:02 pm | पद्मावति
हाही भाग खुप मस्तं. वाचतेय. पु.भा.प्र.
24 Oct 2017 - 4:57 pm | पाटीलभाऊ
दोन्ही भाग मस्त.
31 Oct 2017 - 12:29 pm | इनिगोय
डॉबी अतिशय आवडलेलं पात्र - वाचतेय. बाकी यात कोणाला काय म्हणतात हे खरं गुंतागुंतीचं आहेच..
23 Feb 2019 - 8:44 pm | तुषार काळभोर
Thestrals अशा लोकांना दिसतात ज्यांनी मृत्यू पाहिलाय. म्हणजे कोणाला तरी मरताना पाहिलंय.
मग एक प्रश्न असा निर्माण होतो की हॅरीच्या आईचा मृत्यू त्याच्या समोर झाला मग त्याला Thestrals दिसायला चार वर्षे का लागली? Cedricच्या मृत्यूनंतर का दिसायला लागले?
यावर एक स्पष्टीकरण असं दिलं जातं, की समोर फक्त मृत्यू होणे नव्हे तर तो 'पाहणे' आवश्यक असते. अर्थात, तो मृत्यू मनात उतरला पाहिजे. आईच्या मृत्यूवेळी हॅरीला मृत्यू म्हणजे काय हे कळण्याएवढा तो मोठा नव्हता. ज्यावेळी cedricचा मृत्यू त्याने पाहिला तेव्हा त्याला Thestrals दिसू लागले.