चाळिसाव्या कोसावर

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
8 Oct 2017 - 8:40 pm

इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल.

आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं.

घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत.

मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो. आमच्या घरमालकांकडे ‘हितवाद’ यायचा. ते शी करायला जाताना पेपर घेऊन जायचे आणि वाचूनच बाहेर पडायचे, म्हणून मी आधीच गुपचूप पेपर चाळून घ्यायचो.

चौथीत असताना पहिली कादंबरी वाचली. ‘सत्तावनचा सेनानी’. वसंत वरखेडकरांची.

‘अस्तनीतला निखारा’ हा शब्द त्यात पहिल्यांदा वाचला. त्या वेळी अर्थ विचारायची अक्कल नव्हती. मी बरेच दिवस अस्तनीतला निखारा म्हणजे काखेतला निखारा असंच समजत राहिलो. कुठल्या ना कुठल्या शब्दानं भुरळ घालायचे ते दिवस होते.

वडलांच्या खणात एक महानुभावांचं पुस्तक मिळालं. त्यात ‘सर्वज्ञे भणीतले’ असं लिहिलं होतं. मग बरेच दिवस ‘मी भणतो… तू भण…’ अशी गंमत चालू होती.

मग काही दिवसांनी ‘चांदोबा’त ‘भल्लूक’ नावाचं एक पात्र भेटलं. मग काही दिवस ‘भल्लूक-भल्लूक’!

अगदी तेव्हापासून पक्कं केलं होतं – घर बांधलं, तर त्याला ‘काशाचा किल्ला’ किंवा ‘दुर्गेश नंदिनी’ असं नाव द्यायचं.

इथेच सगळे लोचे सुरू झाले. मेंदूच्या अस्तराच्या आत शब्द भूसुरुंगासारखे लपून राहायला लागले. जरा कुठे एखाद्या शब्दावर पाय पडला, की स्फोट सुरू! चित्रं बघितली, तरी ती शब्दांमध्ये रूपांतरित होऊनच मेंदूत शिरायची. एक नवीन बोली भाषा डोक्यात तयार व्हायला सुरुवात झाली होती.

23
चित्रश्रेय: अमुक

इंदे म्हणजे काय, दर म्हणजे घर, सुदर म्हणजे देऊळ, बाखुळ म्हणजे भांडण… असलं काहीच्या काही.

एक दिवस मी घरी सांगितलं, की आपल्या घरासमोरून रोज छोटू आणि धनंजय जातात. सगळी पुस्तकं जप्त झाली. वाचनावर बंदी आली. मी रागाच्या भरात आमच्या आप्पांना म्हणालो, “तुम्ही गेस्टाप्प्पो आहात!”

झालं! आता सगळ्यांची जास्तच तंतरली. रोज दप्तराची तपासणी सुरू! वह्यांची फाडलेली पानं दिसली की चौकशी आयोगाच्या बैठका सुरू!

सरतेशेवटी वाचन बंद आणि संध्याकाळी शाखा कंपलसरी करण्यात आली.

घरी गेस्टाप्पो आणि बाहेर घेट्टो!

हा सगळा चुत्यापा हाताबाहेर बळावत जाणार होता, इतक्यात काकोडकरांचं एक पुस्तक हातात आलं आणि मग रोम्यांस एक्स्प्रेसची सफर सुरू झाली. अनेक स्टेशनांवर थांबत थांबत रोम्यांस एक्सप्रेस बरीच वर्षं धावत होती.

अजूनही धावतेय, असं म्हटलं असतं. पण ते थोडं खोटं असेल. कारण आता मेंदूत लपलेले इतर सुरुंग न सांगताच फुटत राहतात. पहिल्या महायुद्धात न फुटलेले जिवंत सुरुंग अधूनमधून उत्खननात सापडावेत आणि फुटावेत, तसं काहीतरी होत राहतं.

*

सुरुवात गिरीपेठेतल्या पापारावांच्या घराच्या पायर्‍यांवर बसून ऐकलेल्या एका कथेतून होते.

सिनेमाच्या जाहिराती वाटणारा माणूस आणि एक लहान मुलगा यांची ही गोष्ट आहे. जाहिराती घेण्याऱ्या मुलांच्या गर्दीत तो मुलगा असतो. वाटणारा माणूस फक्त अशांच्याच हातात पत्रकं देत असतो, जी त्याच्या मते वाचण्याच्या वयात असतील. हा लहान मुलगा त्या माणसाला अजिजीने सांगतो, “अहो, मला वाचता येतंय.”

एकदाचं त्याला ते पत्रक मिळतं आणि हातात पत्रक मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहेर्‍यावरून ओसंडून वाहत राहतो. मध्यंतरी काही दिवस जातात. माणूस पुन्हा कसलीशी पत्रकं वाटायला येतो. त्याची नजर नकळत मुलाला शोधत राहते. पण तो लहान मुलगा दिसत नाही. मग कुणीसं सांगतं, की तो मुलगा कसल्याशा आजारानं गेला.

लहानपणी ‘ऐकलेली’ ही गोष्ट बिब्ब्याच्या फुलीसारखी मनावर चरचरीत ‘बुकमार्क’ करून गेली.

असले बुकमार्क्स विरतात, पण जाता जात नाहीत. उसवलेच, तर व्रण ठेवून जातात.

*

असे अनेक बुकमार्क्स सहन करूनही वाचनाच्या वेडातून सुटका होत नाही. पण अवसेपोर्णिमेला अपस्मारासारखे दिवस येतात, वेडाची झिंग वाढत जाते.

‘मैं अच्छा न हुआ, बुरा न हुआ’ असे दिवस आहेत.

या वेडाचा शेवट मला माहिती आहेच आणि तो प्रत्येक वाचकालापण कळायला हवा.

*

एका माणसाला देव पावला आणि देवानं त्याला सांगितलं, “दर दहा कोसांवर खणून बघ. जे मिळेल त्यानं समाधान झालं, तर ते तुझंच. पण नाही झालं, तर पुढच्या दहा कोसांवर काहीतरी मिळेल. शेवटचा मुक्काम चाळिसाव्या कोसावर आहे.”

पुढची गोष्ट सोपी आहे.

आधी चांदी, मग सोनं, नंतर हिरे मिळाले. पण चाळिसाव्या कोसावर आणखी काही असेल, म्हणून तो माणूस चालतच राहिला. चाळिसाव्या कोसावर एक विचित्र दृश्य दिसलं. तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्यावर एक काटेरी चक्र फिरत होतं. रक्ताच्या ओघळांनी शरीर माखलं होतं. हे अनपेक्षित होतं.

त्या रक्तबंबाळ माणसाला पहिल्या माणसानं विचारलं, “हे कसं झालं रे बाबा?”

तत्क्षणी ते चक्र उडून विचारणाऱ्या माणसाच्या डोक्यावर बसलं आणि आधीचा माणूस हसत निघून गेला.

दहा-दहा कोसांवर खणत, शोधत वणवणणारा वाचक होता आणि चाळिसाव्या कोसावर उभा असलेला लेखक होता हे सांगायला नकोच.

मी बरीच वर्षं चाळिसाव्या कोसावर उभा आहे इतकंच मला सांगायचं आहे!

– रामदास

पूर्वप्रसिद्धी: रेषेवरची अक्षरे - बालसाहित्य विशेषांक

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2017 - 8:48 pm | पिलीयन रायडर

काय लिहीलंय काका!! आणि मी खरंच पयली यंदा... वाह, क्या बात है!

मनो's picture

8 Oct 2017 - 8:59 pm | मनो

अप्रतिम

वा, कधी जमणार असे लिहायला

एस's picture

8 Oct 2017 - 11:45 pm | एस

हो ना. वाचकांची परिस्थिती बिकट असते. ते आपले बुकमार्क न केलेल्या तरीही व्रण कायम असलेल्या लिखाणाची चातकासारखी वाट पाहत राहतात. पण लेखन पूर्ण करणं न करणं सर्वस्वी लेखकाची मर्जी असते.

- बुकमार्क न केलेल्या 'पीसीजेसी' च्या पुढील भागांची बरीच वर्षे वाट पाहणारा एक वाचक.

(कुणीतरी निदान फॅन फिक्शन म्हणून तरी ती पूर्ण करा रे. आम्ही दुधाची तहान ताकावर भागवू. आता तेव्हढीच आस उरली आहे.)

आदूबाळ's picture

8 Oct 2017 - 11:53 pm | आदूबाळ

(कुणीतरी निदान फॅन फिक्शन म्हणून तरी ती पूर्ण करा रे. आम्ही दुधाची तहान ताकावर भागवू. आता तेव्हढीच आस उरली आहे.)

नॉट अ बॅड आयडिया.

एस's picture

13 Oct 2017 - 11:36 pm | एस

करताय का कथा पूर्ण?

गवि's picture

9 Oct 2017 - 1:40 am | गवि

निव्वळ सुंदर..

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2017 - 3:11 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! प्रतिमा तर अशक्य !

चाळिसाव्या कोसावर येऊन, “हे कसं झालं रे बाबा?”... बाब्बौ, नाही विचारणार :)

कंजूस's picture

9 Oct 2017 - 7:03 am | कंजूस

अगदी अगदी।
वाटतं सर्व भाषा याव्यात आणि सर्व पुस्तकांचा फडशा पाडावा.

प्रचेतस's picture

9 Oct 2017 - 8:42 am | प्रचेतस

अतीव सुंदर

मृत्युन्जय's picture

9 Oct 2017 - 10:54 am | मृत्युन्जय

बरेच दिवसांनी रामदास काका मिपावर दिसले. त्याचाच आनंद झाला.

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. पण तरीही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की चाळीस कोसांवरचा वाचकही वाचकच असतो. त्याच्या डोक्यावर ते लेखकाचे चक्र फिरायला लागले तरी मनातला वाचक कधीच मरत नाही.

sagarpdy's picture

10 Oct 2017 - 12:45 pm | sagarpdy

+१०००

सुमीत भातखंडे's picture

9 Oct 2017 - 11:00 am | सुमीत भातखंडे

लिखाण.

अभ्या..'s picture

9 Oct 2017 - 12:02 pm | अभ्या..

अनुभवी अन सुंदर लेखन.
चाळीसाव्या कोसाचे चित्रांकन झेपले नाही. काहीसे पटलेही नाही.
असो. आत्ता कुठे चालायला सुरुवात केलीय.

संजय पाटिल's picture

9 Oct 2017 - 1:06 pm | संजय पाटिल

निव्वळ अप्रतिम !!!_/\_

सुखीमाणूस's picture

9 Oct 2017 - 4:31 pm | सुखीमाणूस

खर आहे, वाचक होणे सोपे, लेखक होणे महाकठीण

मी-सौरभ's picture

9 Oct 2017 - 5:19 pm | मी-सौरभ

...

Ranapratap's picture

9 Oct 2017 - 7:14 pm | Ranapratap

मला वाटलं, मी तर माझीच जीवन गाथा वाचतोय.

मित्रहो's picture

9 Oct 2017 - 10:46 pm | मित्रहो

सुंदर लिखाण
वाचताना छान वाटले.
एका वाचनात सारे समजले असे नाहीच दोनतीन वेळा वाचून सुद्धा काही गोष्टी कळल्या नाही. माणूस चाळीस कोसावर काय शंभर कोसावर असला तरी तो वाचकच असतो. कदाचित डोक्यावर चक्र घेउन खणन करनारा असू शकतो.

छानच , प्रकाश संंतांंच लिखाण वाचल्यासारख वाटलंं.

मेघवेडा's picture

13 Oct 2017 - 1:14 pm | मेघवेडा

तंतोतंत.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2017 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह.. मजा आया.

सत्यजित...'s picture

10 Oct 2017 - 12:09 am | सत्यजित...

अतिशय सोप्या शब्दांत गहन विचार पेरण्याची आपली हतोटी,वाचकांस स्तिमित करणारी,भारणारी आहे!
प्रत्येकास,'आपण नेमके कुठल्या कोसावर आहोत?' असा प्रश्न हमखास विचारणारा लेख,'मणो-मण' चिंतनीय झाला आहे!
अभिनंदन...धन्यवाद!

एस,मृत्युन्जय यांचे प्रतिसादही आवडले!

रामपुरी's picture

10 Oct 2017 - 1:52 am | रामपुरी

आम्ही एकोणचाळीस कोस चालत येतो आणि परत मागे खणत जातो. चाळिसाव्या कोसावर जायची आपली छाती नाही.

Nitin Palkar's picture

10 Oct 2017 - 3:05 pm | Nitin Palkar

अफाट!अफलातून!!आणि.... आणि असंच काहीतरी!!!

मराठी कथालेखक's picture

10 Oct 2017 - 5:09 pm | मराठी कथालेखक

लेखक होणे म्हणजे महाकठीण , जणू मरणयातनाच असे काही नाही..
तसं म्हंटलं तर कोणतंही काम 'करणं' कठीणच असतं ..बसून त्याचा आस्वाद घेणं सोपं असतं. अगदी माठतलं पाणी पिणं सोपं आणि चाक फिरवून माठ बनवणं कठीण , सोफ्यात बसून जेवण हादडणे सोपे आणि स्वयंपाकघरात खपून ते बनविणे कठीण ...पण म्हणून काटेरी चक्र , रक्ताळलेले शरीर वगैरे उपमा जरा अतीच वाटल्यात.

शब्दबम्बाळ's picture

12 Oct 2017 - 9:39 am | शब्दबम्बाळ

रामदास काकांचे लेखन आवडते पण या लेखावरून अजून एक गोष्ट कळाली.
लेखकाच्या डोक्यावर काटेरी मुकुट बहुधा प्रस्थापित होई पर्यंत असावा. नंतर चांगला वाचक वर्ग लाभल्यावर तो मुकुट आपसूक निघत असेल.
हाच लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने असता तर त्यावर इतक्या प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रिया असत्या का हा हि एक प्रश्न पडला, कदाचित तिथे लेखक होणे म्हन्जे "काटेरी मुकुट घालणे" असे काही असते का यावर खाली भरपूर चर्चा देखील झाली असती.
पण इथे कदाचित आदर असल्यामुळे बऱ्याच लोकांनी ती गोष्ट लगोलग मान्य करून पण टाकली!!
४० कोसांचा किस्सा दुसऱ्या एका गोष्टीसंदर्भात आधी ऐकला असल्याने देखील मला असे वाटले असावे...

हाच लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने असता तर त्यावर इतक्या प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रिया असत्या का हा हि एक प्रश्न पडला,

वाचक रामदास काकांची प्रशंसा करतात कारण त्यांचे आतापर्यंतचे लेख आणि वर्तन दोन्ही प्रशंसेस पात्र आहेत. तो आदर त्यांनी कमावलेला आहे.

मराठी कथालेखक's picture

12 Oct 2017 - 4:07 pm | मराठी कथालेखक

मला वाटतेय एखादे लेखन उघडून बघावे की नाही (कारण मर्यादित वेळेत आपण किती वाचू शकतो यावर मर्यादा असल्याने) हे ठरविण्यापुरते त्या लेखकाच्या नावाला महत्व द्यावे. किंवा फारतर एखाद्या लेखकाचे एखादे लेखन आवडल्यास अजून काही चांगले वाचावयास मिळावे म्हणून त्या लेखकाचे इतर जुने/नवे लेखन शोधून ते वाचणे इतपत लेखकाच्या नावाचे महत्व असावे.
पण अमक्याने लिहिलेय तर प्रशंसा केलीच पाहिजे , आवडून घ्यायलाच हवं असं काही नाही. नाही आवडलं तर नाही आवडलं..प्रामाणिकपणे मत द्यावं.
यावरुन आठवले काही महिन्यांपुर्वी एक शतशब्द कथा स्पर्धा झाली होती आणि त्यात मला (विभागून) जो प्रथम क्रमांक मिळाला ... त्या स्पर्धेच्या कथा 'साहित्य संपादक' आयडीने प्रसिध्द झाल्या होत्या म्हणूनच मला हे यश मिळू शकले !!

आनंदयात्री's picture

14 Oct 2017 - 2:43 am | आनंदयात्री

मराठी कथालेखक,
टिचला बिलोरी आयना, काटेकोरांटीची फुलं लिहितांना या चाळीसाव्या कोसावरच्या माणसाची लेखणीही काटेरी झाली असेल, त्यामुळे या उपमा अती नाहीत तर त्यांच्या अनुभवविश्वाची अपरिहार्यता आहे.

दशानन's picture

11 Oct 2017 - 2:49 pm | दशानन

:)

नूतन सावंत's picture

11 Oct 2017 - 5:20 pm | नूतन सावंत

सुरेख लेखन!अहो मला वाचता येतं हूं जोशात नवयुग कथमलेत होती,इयत्ता चौथीत असताना वाचली होती.

Naval's picture

11 Oct 2017 - 8:24 pm | Naval

दहा-दहा कोसांवर खणत, शोधत वणवणणारा वाचक होता आणि चाळिसाव्या कोसावर उभा असलेला लेखक होता हे सांगायला नकोच.

काटा आला अंगावर हे वाचून... डोक्यावर काटेरी चक्र बाळगत, प्रामाणिकपणे लिहिणारा लेखक रक्तबंबाळ होतोच. तुम्ही एक दैवी लेखक आहात. लेखाच्या शेवटी वाचकाची ओंजळ नेहमी भरून गेलेली असते.

धर्मराजमुटके's picture

11 Oct 2017 - 9:32 pm | धर्मराजमुटके

आवडले. जुना अने जाणिता लेखकुंची बात ही कुछ और है !

भ ट क्या खे ड वा ला's picture

13 Oct 2017 - 9:08 pm | भ ट क्या खे ड वा ला

उपमा आवडली .