काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत. परिणामी संस्थेतील पूर्वीचे उत्साही वातावरण संपुष्टात येऊन ते गढूळ झाले.
ती नोकरी सोडून दुसरा पर्याय बघणे बऱ्याच जणांना जमत नव्हते. त्यामुळे बरेच जण इथला कोंडमारा सहन करीत व धुसफफुसत काम करीत होते. फुरसतीच्या वेळांत जेव्हा आम्ही एकत्र जमत असू, तेव्हा संस्थाचालकांना दूषणे देत आमच्यातील असंतोष व्यक्त करीत असू. ही नोकरी सोडण्याचे धैर्य नाही आणि संघटित होऊन संस्थेशी टक्कर देण्याची हिम्मत नाही, अशा अवस्थेत आम्ही दिवस ढकलत होतो. या रोगट वातावरणाचा आमच्यावर परिणाम होऊन आम्ही वृत्तीने नकारात्मक झालो होतो. जेवण, चहापान इ. निमित्ताने आम्ही एकत्र जमलो की तेव्हाच्या गप्पांमध्ये संस्थेच्या नावाने बोटे मोडणे, हा आमचा एककलमी कार्यक्रम झाला होता.
हे सगळे बदलले पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटे. जर आपण अजून बराच काळ येथे राहणार असू आणि व्यवस्थापनाच्या वृत्तीत बदल होणार नसेल, तर मग आपणच आपल्याला सकारात्मक बनवले पाहिजे, हा विचार दृढ झाला. आपल्या सहकाऱ्यांमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले पाहिजे असे मनोमन वाटू लागले. त्यासाठी काय करता येईल याचा सतत विचार करू लागलो.
एका शनिवारी रात्री पलंगावर पडलेलो असताना अचानक एक कल्पना मनात चमकून गेली. ती म्हणजे आपल्या सहकाऱ्यांचा मिळून एक ‘कट्टा’ जमविणे. परंतु सर्वसाधारण ‘क्लब्ज’ पेक्षा हा कट्टा वेगळा हवा हे महत्वाचे. निव्वळ खाणेपिणे, फालतू गप्पा, कुजबुज व कुचाळ्या असे त्याचे स्वरूप नको. मग माझे विचारचक्र वेगाने फिरू लागले आणि त्यातूनच एका उपक्रमाचा जन्म झाला.
कट्ट्याचा मूळ हेतू असा होता. आम्ही सहकाऱ्यांनी मिळून नियमित स्वरूपात एकत्र जमावे. दर वेळेस आमच्यातील एकाने सुमारे वीस मिनिटे जगातील कोणत्याही विषयावर बोलावे. ते बोलणे माहितीपूर्ण व मनोरंजक असावे. त्यानंतर सुमारे चाळीस मिनिटे त्या विषयावर आमची चर्चा व्हावी. वक्त्याने बोलण्यासाठी त्याच्या पसंतीचा विषय निवडावा. पण, कट्ट्याच्या तासादरम्यान आपले रोजचे कामकाज व त्यातील कटकटी याबद्दल कोणीही एक चकार शब्द काढू नये.
असा कट्टा सुरू झाल्यास आम्ही त्या तासाभरात पूर्णपणे वेगळ्या विश्वात जाऊ, रोजच्या कटकटी विसरू आणि प्रफुल्लित होऊ असे मला वाटले. मी स्वतः या कल्पनेने आनंदून गेलो होतो. आपल्या सहकाऱ्यांना ही कल्पना आवडेल असे मनोमन वाटत होते. मग कट्ट्याच्या स्वरूपाविषयी अजून काही विचार मनात आले. एखाद्या विषयावर एखाद्याने फक्त ‘बोलणे’ एवढीच कट्याची मर्यादा नको. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार भाषण करणे, एखादी कला सादर करणे, वैयक्तिक कलासंग्रहाचे प्रदर्शन, स्लाईड-शो असे विविध पर्याय जरूर ठेवावेत.
हे सगळे विचारमंथन झाल्यावर मी अतिशय खूष झालो. मग काही केल्या झोप येईना. कधी एकदाचा सुटीचा रविवार संपतोय आणि सोमवारी ही कल्पना मित्रांसमोर मांडतोय यासाठी उतावीळ झालो. मग सोमवार उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही कार्यालयात आलो. मी तर जेवणाच्या सुटीची आतुरतेने वाट पाहत होतो. जमेल तेवढ्या सहकाऱ्यांना निरोप दिला आणि आजच्या सुटीत वेळ काढून यायला सांगितले. ठरलेली वेळ झाली आणि आम्ही सुमारे २५ जण एकत्र जमलो. मी सर्वांसमोर कट्ट्याची कल्पना मांडली. माझे बोलणे पूर्ण होते न होते तोच त्यांचे चेहरे उत्साही दिसू लागले. मग त्यांच्यातून उत्स्फूर्तपणे, ‘अत्यंत सुंदर कल्पना’, बहुत खूब’, ‘fantastic’ असे अनेक उद्गार निघाले. मंडळी या कल्पनेवर बेहद्द खूष होती.
मग अवघ्या पाच मिनिटात आमच्या कट्ट्याची ‘घटना’ तयार झाली. त्यात सादर करण्याचा विषय हा जगातला वाट्टेल तो असेल, फक्त दोन विषय सोडून – एक, आपले रोजचे कामकाज आणि दोन, व्यवस्थापनासंबंधीच्या तक्रारी ! थोडक्यात, आपल्या करीअर संबंधी काहीही न बोलता जाणीवपूर्वक वेगळा विषय निवडावा, असा त्याचा मथितार्थ होता.
काही जणांना हा कट्टा आठवड्यातून एकदा हवा होता तर काहींच्या मते तो महिन्यातून एकदा ठीक होता. मग पंधरवाड्यातून एकदा हा सुवर्णमध्य निघाला. कट्ट्याचा सूत्रसंचालक ही भूमिका माझ्यावर सोपविण्यात आली. माझे काम असे की वक्त्यांचे वेळापत्रक आखणे, त्यांना संबंधित दिवसाची आठवण करणे आणि प्रत्येक सादरीकरणाचा सारांश टिपून ठेवणे.
दरवेळेचा वक्ता हा १५ दिवस आधी ठरवला जाई. त्यामुळे त्याला विषय निवडणे आणि त्याची पुरेशी तयारी करणे शक्य होई. अशा तऱ्हेने या उपक्रमास सुरवात झाली आणि तो नियमित होऊ लागला. सादरीकरणासाठी आपला क्रमांक लवकर लागावा यासाठी अहमहमिका होती. एकूण आम्हा सर्वांच्यात उत्साह संचारला. लोकांनी निवडलेले विषय हे अफलातून होते. त्यातून प्रत्येकातील सुप्त गुण सर्वांसमोर येऊ लागले. सादर झालेल्या विषयावरील चर्चा तर थांबायलाच तयार नसे. सुरवातीच्या काही वक्त्यांना मी स्वतंत्रपणे गाठून त्यांची या उपक्रमाबद्दलची मते आजमावली. सर्वानी दिलखुलासपणे एक गोष्ट कबूल केली. ती म्हणजे, जेव्हा एखाद्याचा बोलण्याचा दिवस १५ दिवस आधी ठरे तेव्हापासून तो त्या विषयाने अक्षरशः झपाटला जाई. (इथे वाचकांनी हे लक्षात घ्यावे की या कट्ट्याचा काळ हा भारतात आंतरजाल सामान्यांच्या वापरात येण्यापूर्वीचा आहे. त्यामुळे एखाद्या विषयाची माहिती चुटकीसरशी मिळवणे तेव्हा सोपे नसे). तसेच आपले सादरीकरण जास्तीत जास्त चांगले व्हावे यासाठी तो प्रयत्नशील असे. त्यामुळे रोजच्या कामकाजातील त्रास, घरच्या अडचणी आणि जगण्यातील ताणतणाव या सगळ्यांपासून त्याला खरोखर सुटका झाल्यासारखे वाटे.
आता चहापानाच्या वेळेस जेव्हा आम्ही एकत्र जमत असू तेव्हा गप्पा मारण्यासाठी कट्ट्यातले नवे विषय मिळत. एकमेकांतील कलागुणांची सर्वांना माहिती होऊ लागली. परिणामी आमच्यातील जिव्हाळा खूप वाढला. ही सगळी कट्ट्याचीच किमया म्हणावी लागेल.
या कट्ट्यांमध्ये हाताळले गेलेले विषय जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे होते. नाटक-चित्रपट, सहित्य, क्रीडा, थरारक अनुभव, राजकीय-सामाजिक, खाद्यजीवन, अध्यात्म, पर्यटन आणि वैयक्तिक छंद अशा कित्येक क्षेत्रातील विषय सादर होत होते. बहुतांश लोकांनी एखाद्या विषयावर बोलणे एवढेच पसंत केले. पण मोजक्या लोकांनी प्रत्यक्ष कलेचे सादरीकरण, स्लाईड-शो आणि स्वतःच्या संग्रहाचे प्रदर्शन अशा प्रकारे कट्टा सदर केला. नमुन्यादाखल त्यातील काही विषयांचा उल्लेख करीत आहे.
एकजण सिक्कीमला पर्यटन करून आला होता. त्याने त्याच्या सहलीचा सारांश एका वाक्यात सांगितला. तो म्हणाला, “मला तिथे आवडलेल्या गोष्टी म्हणजे – मुले, फुले आणि बायका!” आणि याच क्रमाने तिन्ही गोष्टी आवडल्याचे त्याने नमूद केले. अन्य एकजण त्याकाळी झालेल्या मुंबई - बाँबस्फोटाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्या घटनेचा ‘आँखो देखा हाल’च त्याने आम्हाला सादर केला. त्याने, त्यावेळी वाटलेल्या प्रचंड भीतीमुळे त्याच्या नाडीचे ठोके तिप्पट झाल्याचे सांगितले. हा वृत्तांत ऐकत असताना आम्हा सर्वांच्या नाडीचे ठोकेही नक्कीच वाढले होते.
‘चारोळी’ हा प्रकार त्याकाळी नुकताच प्रकाशित होत होता. एकाने त्यावर त्याचा कट्टा सादर केला. त्यामध्ये चंद्रशेखर गोखल्यांची पुढील चारोळी प्रचंड दाद मिळवून गेली :
‘इथं वेडं असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत’
त्याने ही चारोळी म्हटल्यावर आम्ही बेहद्द खूष होऊन ती पुन्हा एकसुरात तीनदा म्हटली! त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात आपल्याला हा अनुभव पदोपदी येत असतो.
वैयक्तिक छंदांसंबंधीच्या विषयात एकाने ‘स्वतःची फोटोग्राफी’ हा विषय निवडला होता. बहुतेकांची अशी अपेक्षा होती, की हा गृहस्थ त्याने काढलेले उत्तम फोटो दाखवून त्यावर बोलेल. पण, प्रत्यक्षात त्याने जे सादर केले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेले. त्याने ‘माझ्या फोटोग्राफीतील चुका’ हा विषय ठरवून त्याने काढलेले दहा फोटो आम्हाला दाखवले. त्यातील प्रत्येकात काहीतरी चूक झाली होती आणि ती टाळण्याजोगी होती. आपल्यातले बरेचजण तसे हौशी फोटोग्राफर असतात. अशा सर्वांसाठीच हा विषय मार्गदर्शक व मनोरंजक ठरला. तसेच, आपण केलेल्या चुकांमधूनच आपण सतत शिकत असतो, हा मुद्दा अधोरेखित झाला.
एका क्रीडाप्रेमी सदस्याने ऑलिम्पिक्स आणि फुटबॉल-विश्वचषकांचा इतिहास यावर घेतलेले कट्टे जबरदस्त गाजले. आम्ही सगळे ते मंत्रमुग्ध होऊन ऐकताना वेळेचे भान कुणालाच राहिले नव्हते. सामाजिक कार्यात रस असलेल्या एकाने ‘भारतातील गरिबी व तिचे परिणाम’ हा विषय सादर करताना दारिद्र्यातून उत्पन्न होणारे कुपोषण, रोगराई, बालमृत्यू आणि आत्महत्या या मुद्द्यांचा आढावा घेतला. तो सर्वांनाच अंतर्मुख करून गेला. या विषयामुळे, आतापर्यंत साधारण करमणुकीच्या पातळीवर रेंगाळणाऱ्या आमच्या कट्ट्याला एक वेगळा पैलू पडला.
आमच्या कट्ट्यासारखे अन्य काही इतरत्रही चालू असतात. एकाने हाच धागा पकडून ‘जगामध्ये दीर्घकाळ चाललेले कट्टे’ हा विषय घेतला. परदेशातील एक-दोन कट्ट्यांचा दाखला देताना त्याने सांगितले की की ते सुमारे दीडशे वर्षे चालू असून त्यामध्ये नवीन सभासदाला प्रवेश मिळणे हे महाकठीण असते. त्या कट्ट्यातील कोणी सोडून गेल्यास अथवा निधन पावल्यासच नवीन व्यक्तीला घेतात आणि त्यापूर्वी तिला कठीण चाचणीस सामोरे जावे लागते! हे ऐकल्यावर आपला कट्टाही असा दीर्घकाळ चालो (पण इच्छुकांसाठी खुला राहो) अशी सुखद भावना आम्हाला स्पर्शून गेली.
कट्याच्या पहिल्या वर्षात सभासदांची उपस्थिती ९०% असायची. त्याची लोकप्रियता वाढत होती. बरेच सभासद नियमित येत तर थोडे अधूनमधून हजेरी लावणारे. दुसऱ्या वर्षात कट्टा जरा अनियमित होऊ लागला. पंधरवाड्याऐवजी महिन्याने. काहीना विषय निवडीचा पेच पडल्याने ते येईनासे झाले. तरीही जे हजर असत ते खूष व समाधानी होते. तिसऱ्या वर्षात मात्र कट्ट्याची उपस्थिती रोडावली. एखाद्याचा बोलण्याचा दिवस असताना खुद्द तोच त्यादिवशी दांडी मारे. नियमित मंडळींना याचे वाईट वाटे. ते अनुपस्थितांना भेटून नियमित येण्याचे आवाहन करीत. नंतर मात्र असे ठरले की अनुपस्थितांच्या फार मागे लागायचे नाही. जेवढे हजर राहतील तेवढ्यानी कट्टा नेटाने चालू ठेवायचा. खरं म्हणजे माझ्यासह काहीजणांनी हा कट्टा अखंड चालू राहण्याचे स्वप्न पाहिले होते. काही काळाने आमच्यातील काही जण जरी ही नोकरी सोडून अन्यत्र गेले, तरीसुद्धा सर्वांनी महिन्यातून एकदा तरी भेटून हे चालू ठेवावे अशी आमची खूप इच्छा होती. पण, प्रत्यक्षात ती शक्यता धूसर झाली.
अशा प्रकारे सभासदांच्या घटत्या उपस्थितीतही आम्ही काही मोजके जण कट्टा चालवत राहिलो. दरम्यान आमच्यातील काहींनी ती नोकरी सोडली. त्यामुळे कट्ट्याची उपस्थिती आणखीनच खालावली. तरीही काही काळ आम्ही पाच जण निरनिराळे मनोरंजक व उत्साहवर्धक विषय घेऊन कट्टे करीत राहिलो. शेवटी, एके दिवशी भरलेल्या कट्ट्यामध्ये माझ्यासह अवघे तीन जण हजर होते. आम्ही तिघांनी हा उपक्रम चालू राहिला पाहिजे अशी तीव्र इच्छा व्यक्त केली. हे बोलताना आम्ही खूप भावनिक झालो होतो. पण का कोण जाणे, त्यापुढील कट्ट्याची तारीख काही ठरवली गेली नाही. त्यानंतर कोणीच पुढाकार न घेतल्याने कट्टा संपुष्टात आला.
यथावकाश आम्ही तिघेही ती नोकरी सोडून अन्यत्र स्थिरावलो. त्यानंतर खूप वर्षांनी आम्ही तिघे काही काही कारणाने भेटलो. आम्ही एकमेकांना आलिंगन देत कट्ट्याच्या आठवणी काढल्या. खरे तर आम्ही त्या विषयाबाबत खूप भावनिक होतो. पण, कट्टा पुन्हा सुरू करण्याचा विचार कोणीच बोलून दाखवला नाही. जर आम्ही पुन्हा असा उपक्रम चालू केला असता आणि तो टिकवून ठेवण्यात आम्हाला पुन्हा अपयश आले असते, तर ते आता पचवणे जड गेले असते.
नंतर मी या कट्ट्याबाबत जरा विचारमंथन केले. एक गोष्ट लक्षात आली, की कुठल्याही उपक्रमाला एक ठराविक आयुष्य लाभते. त्याच्याशी संबंधित लोकांना सुरवातीस भन्नाट वाटलेली एखादी कल्पना कालांतराने मिळमिळीत वाटू शकते. त्यात उत्साह व सातत्य टिकविणे हे वाटते तितके सोपे नसते. विशेषतः बुद्धीजीवी उपक्रमांच्या बाबतीत हे अधिकच जाणवते. तेव्हा असा कट्टा दीर्घ काळ चालेल असे स्वप्नरंजन करण्यापेक्षा तो काही काळ का होईना चालला यातच समाधान मानलेले बरे.
तर, अशी ही जन्म-मृत्यू कथा – एका कट्ट्याची. या कट्ट्याने आम्हाला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन दिला तसेच आमचा मनोविकास घडविला. अधूनमधून मी जेव्हा गतायुष्याचे स्मरणरंजन करतो, तेव्हा त्या तीन वर्षांदरम्यान त्या उपक्रमाने जो अवर्णनीय आनंद दिला, त्या आठवणींनी आजही रोमांचित होतो.
******************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘पुरुष उवाच’, दिवाळी अंक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
प्रतिक्रिया
6 Sep 2017 - 2:11 pm | दुर्गविहारी
मला वाटल मि.पा. कट्ट्याचा वृतांत कि काय? पण फारच सुंदर लिहीले आहे तुम्ही. अर्थात अश्या प्रकारे चालु केलेल्या उपक्रमाचा शेवट बर्याचदा असा खेदजनक होतो. असो. पु,ले.शु.
6 Sep 2017 - 2:53 pm | मोदक
नंतर मी या कट्ट्याबाबत जरा विचारमंथन केले. एक गोष्ट लक्षात आली, की कुठल्याही उपक्रमाला एक ठराविक आयुष्य लाभते. त्याच्याशी संबंधित लोकांना सुरवातीस भन्नाट वाटलेली एखादी कल्पना कालांतराने मिळमिळीत वाटू शकते. त्यात उत्साह व सातत्य टिकविणे हे वाटते तितके सोपे नसते. विशेषतः बुद्धीजीवी उपक्रमांच्या बाबतीत हे अधिकच जाणवते. तेव्हा असा कट्टा दीर्घ काळ चालेल असे स्वप्नरंजन करण्यापेक्षा तो काही काळ का होईना चालला यातच समाधान मानलेले बरे.
सहमत.
आमचे मित्रमंडळींचे चर्चा / छंद असे कायप्पा ग्रुप हळूहळू लयाला जाण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे दोन वेगळ्या ग्रुपमधल्या ठरावीक लोकांना वेगळ्याच नांवाखाली एकत्र केले तर तिसरा नवीन ग्रुप (बहुदा नवीन असल्याने) अत्यंत जोमाने सुरू आहे आणि भरपूर चर्चा / माहितीची देवाणघेवाण होत आहे.
मनुष्यप्राण्याला सतत कांहीतरी नवीन हवे असते. :)
6 Sep 2017 - 7:15 pm | ज्योति अळवणी
मस्त लिहिलाय कट्टा
मनुष्यप्राण्याला सतत कांहीतरी नवीन हवे असते. :)
100% सहमत
6 Sep 2017 - 2:58 pm | कुमार१
मनुष्यप्राण्याला सतत कांहीतरी नवीन हवे असते. :). सहमत
6 Sep 2017 - 3:29 pm | कुमार१
दुर्गवि हारी, आभार आणि सहमती.
6 Sep 2017 - 4:18 pm | रेवती
लेखन आवडले.
6 Sep 2017 - 4:20 pm | कुमार१
रेवती, आभार !
6 Sep 2017 - 4:43 pm | सस्नेह
मनापासून लिहिलंय.
6 Sep 2017 - 5:16 pm | सिरुसेरि
प्रामाणिक लेखन .
6 Sep 2017 - 6:41 pm | माम्लेदारचा पन्खा
छान उपक्रम आहे . . . . .चालू राहिला असता तर बरं झालं असतं . . . .
6 Sep 2017 - 7:51 pm | कुमार१
सर्व नवीन प्रतिसाद कांचे आभार. तुम्हाला ही कल्पना आवडली याचे समाधान वाटते.
6 Sep 2017 - 9:54 pm | पैसा
खूप छान लिहिलंय. असं होतं. ते टाळण्यासाठी त्या उपक्रमात सूक्ष्म बदल करत राहिले पाहिजेत. सतत नव्या कल्पना, नवे लोक येत राहिले पाहिजेत. त्याबरोबरच कोणीतरी त्या कल्पनेने भारलेले आणि एखादे व्रत असल्यासारखे चालू ठेवणारेही लोक असले पाहिजेत. अन्यथा आरंभशूरांची किंवा वाचाळवीरांची कमतरता नाही.
6 Sep 2017 - 10:11 pm | दशानन
असाच एक कट्टा मी देखील कधी सुरू केला होता आणि सेम तुमच्या प्रकारे बंद नाही पडला फक्त नवे काही द्यावे या माझ्या अतिदोषामुळे ते प्रकरण बंद पडले पण त्याचे दुःख नाही , पण ते अजून सुरू राहिले असते असे कधी कधी वाटे अधून मधून..!
7 Sep 2017 - 7:45 am | कुमार१
पैसा व दशानन, आभार व सहमती !
7 Sep 2017 - 8:15 am | चौकटराजा
मी नव्या सोसायटीत रहायला आल्यावर "शनिवार संध्याकाळ कट्टा " अशी संकल्पना मनांत धरून होतो. पण परिचय होऊ लागला तसे सर्वांचे दोष, अहंकार समोर येउ लागले. तुमचा काही काळ यशस्वी कट्टा झाला या बद्द्ल मी जाम खुष झालो. मी भक्तीमार्गापेक्षा ज्ञानमार्ग चांगला हे मानत आलो आहे. आपल्या पध्दतीच्या कट्याने विकसित ह्वायला मदत होते . तरीही आपण जर निरखून पाहिले तर वाटसअॅप व फेसबुक यांची लोकप्रियता घसरत चालली आहे हे आपल्याला कळून येईल. इतकेच काय मिपावरही लोक कमी यायला लागलेत. जातस्य ही धृवो मृत्यू हे सगळ्याला लागू पडते. आजकाल एखादी गोष्ट बंद पडली तर दु:ख मानायचे नाही पुढे जायचे असे मी ठरवून चाललो आहे एके दिवशी आपणही संपणार आहोत याची जाणीव ठेवून.
7 Sep 2017 - 8:31 am | चांदणे संदीप
असा कुठलाही चांगला उपक्रम राबवताना त्याचा समारोपही योजला गेला पाहिजे. म्हणजे तो परत कधी सुरू करता येईल याबद्दल आयोजक आणि त्यातील कार्यकर्ते यांच्यात उत्साह नेहमीच टिकून राहील.
एक लहानसे उदाहरण: आमच्या सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सवाचे पहिलेच वर्ष होते. पुणे आणि पिंचिंमधले इतर गणपती सोसायटीमधील लोकांना पाहता यावे म्हणून सात दिवसाचा कार्यक्रम ठरवला गेला. तेव्हा सोसायटीमध्ये २००-२५० सदस्य होते. उत्सवाला व त्यात आयोजित सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी सोसायटीमध्ये ४००-४५० सदस्य आहेत म्हणून मग यावर्षीचा उत्सव १० दिवस करायचे ठरले. पण उपस्थिती मात्र गेल्यावर्षीपेक्षाही कमी होती. आयत्या वेळेत मनोरंजनाचे कार्यक्रम आखले तरीही माणसांपेक्षा खुर्च्यांची संख्या जास्त होती.
असो, लिहिलय मस्त... पुलेशु!
Sandy
7 Sep 2017 - 8:33 am | कुमार१
चौकट राजा, आभार
आजकाल एखादी गोष्ट बंद पडली तर दु:ख मानायचे नाही पुढे जायचे असे मी ठरवून चाललो आहे एके दिवशी आपणही संपणार आहोत याची जाणीव ठेवून. >>> + १
7 Sep 2017 - 10:46 am | कुमार१
चांदणे, आभार. तुमची सूचना चांगली आहे.
7 Sep 2017 - 12:53 pm | बाजीप्रभू
तुमच्या कट्ट्यातले चौफेर विषय वाचून एक मान्य करावं लागतं कि कट्ट्याचे स्टॅंडर्ड उच्च दर्जाचे होते. आम्ही देखील शाळेच्या ग्रुपचे कट्टे भरवायचो... दुर्दैवाने तो अल्पायुषी ठरला. पण एक निरीक्षण नोंदवलं कि... राजकारण, श्रद्धा-अंधश्रद्धा, आताची पिढी, मुलं, डॉक्टरी व्यवसायातील लबाडी, इंशुरन्स, बेजवाबदार मीडिया वैगरे विषय असल्यास लोकांना विशेष होमवर्क करावं लागत नाही आणि ते हिरहिरीने भाग घेतात... तोच जर विषय "आवडलेलं पुस्तक" असेल तीन टाळकीही जमत नाहीत.
असो तुमचं लेखन आवडलं.
7 Sep 2017 - 1:50 pm | कुमार१
बाजीप्रभू, आभार!
घेतात... तोच जर विषय "आवडलेलं पुस्तक" असेल तीन टाळकीही जमत नाहीत. >>>> मस्त! +100
8 Sep 2017 - 10:02 am | कुमार१
सर्वांचे आभार. समारोपाच्या निमित्ताने थोडे मनोगत.
हा लेख पूर्वी एका दिवाळी वार्षिकात प्र. झाला होता. तिथे त्यांनी लेखाखाली माझी संपर्क महिती छापली नव्हती. त्यामुळे वाचकांचे प्रतिसाद येण्यास मार्ग नव्हता. त्यातून तो अंक फक्त वार्षिकच अस्ल्याने वाचक काही कळवू शकत नाहीत.
जेव्हा एखदी कल्पना आपल्या डो क्यातून निघते तेव्हा आपल्याला त्याबद्दल ममत्व असते. पण, एकूण या उपक्रमाबाद्दल बाहेरच्या व्यक्तीचे तटस्थ मत घेणे गरजेचे असते. म्हणून हा लेख इथे लिहीला.
आधी वाटत होते की आपल्या एक खाजगी उपक्रमाबद्दल लेख लिहावा की नाही. तसेच, कट्ट्यातील चर्चिलेल्या विषयांबद्दल इतरांना वाचायची काय उत्सुकता ? पण धीर करून लिहीला.
आपणा सर्वांना तो आवडला याचे समाधान आहे.
धन्यवाद !
8 Sep 2017 - 11:19 am | मोदक
इथेच थांबू नका.. पुढे एखादा विशेष चर्चाविषय आणि त्याबद्दल सर्वांनी मांडलेली मते, विरोधी मत किंवा वेगळी भूमीका कोणी मांडली त्याचे कसे स्वागत झाले तेही सांगा.. वेगळा लेख लिहून असे सगळे आमच्यापर्यंत पोहोचवा.
बाकी मिपाकरं आगाऊ वाटली तरी कुठे आगाऊपणा करायचा ते बरोब्बर जाणून असतात. तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे त्यामुळे घाबरू नये. ;)
************************************************
माझा अनुभव सांगतो..
बेंगलोरची दोन मिपाकरं मैत्र आणि सागर आमच्या ग्रुपातली मंडळी. एक दिवस नेहमीचे यशस्वी विषय "गांधीजी, चले जाव" सुरू झाले.. दोघे एकदम तयारीने मुद्दे मांडत होते, बराच वेळ मतभेद सुरू होते.. आणि मी इतर ठिकाणच्या अनुभवावरून कोणी पातळी सोडेल काय अशा धास्तीने सगळे वाचत होतो. (या दोघांबद्दल खात्री होती मात्र चर्चा जाम आवेशाने सुरू होती)
..अशी कल्पना करा.. सचिन आणि लारा बॅटिंग करत आहेत.. मॅग्रा किंवा वॉल्श सारखा बॉलर आहे आणि आजुबाजूला गिलख्रिस्ट, जाँटी, गिब्ज, पाँटिंग अशी क्षेत्ररक्षणरत्ने विखुरली आहेत - अशा लेव्हलची चर्चा सुरू होती.
शेवटी आपले मतभेद आहेत असे मान्य करून दोघे थांबले. एकही क्षण असा नव्हता की दोघांनी पातळी सोडली होती किंवा दोषारोप केले नव्हते.
नंतर माझ्या एका बेंगलोर वारीत नेमके मैत्रला लंचला जमले नाही आणि सागरला डिनरला... दोघेही "आज ग्रुपसोबत त्याला भेटणे जमायला हवे होते राव.." असे मनापासून हळहळत होते. :)
************************************************
असे निवडक प्रसंग मिपावरही सापडतील... :)
तात्पर्य - लिहिते रहा..
8 Sep 2017 - 11:23 am | कुमार१
मोदक, आभार.
जरूर विचार करेन.