दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती 'कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.' आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो. धन्यान तर परेसान करुन सोडल होत, घंटाघंट्याले इचारे 'फोन आला का, फोन आल का'. साडभावान टिकिट काढल्याचा फोन केला आन म्या आन धन्या शिद्दे नागपुरात पिक्चर पाहाले पोहचलो. तुम्हाले सांगतो राजेहो येक रुपयाचा पछतावा नाही झाला, का पिक्चर हाय पूरा पैसा वसूल. असा पिक्चर आजवरी बनला नाही. मजा आली.
पिक्चरमंधी जे बी हाय ते पहील्या बाहुबलीवाणीच लय मोठ, कोठ बी लहाणसहाण काम नाही. कंजूशीचा कारभारच नाही. येथ बैल मोकाट नाही सुटत हत्ती मोकाट सुटतो, तो बाहुबली खासर घेउन नाही निंगत तर रथ घेउन निंगतो. येकटा माणूस हत्तीले आटोक्यात आणतो, मंग बाहुबली हाय तो. त्या बाहुबलीले पाहून आमचा धन्या तर नुसता लवत होता. तिकड तो बाहुबली कुदला का इकड आमचा धन्या लवे. म्या त्याले म्हटल 'आबे धन्या कायले लवते बे येवढा, चांगल नाही दिसत'. तो काही आयकत नव्हता म्हणून मंग म्याच त्याले धरुन ठेवला. तिकड तो बाहुबली हत्तीच्या सोंडेवरुन हत्तीवर यंगला, हत्तीच्या सोंडेत त्यान बाणाची दोरी देली. आता तो बाण मारनार तसा म्या धन्याले सोडला म्हटल 'लव लेका तुले जेवढ लवाच तेवढ लव.' खर सांगू मले बी लवाव अस वाटत होत पण … जाउ द्या.
या पिक्चरमंधी का नाही ते सांगा लवस्टोरी हाय, मायलेकाच प्रेम हाय, येकापेक्षा येक फायटा हाय, गाणे हाय, कॉमेडी हाय, मोठाले महाल हाय, शिनसिनेरी हाय, भावाभावातला झगडा हाय. प्रेम, वचन, धरम साऱ्या गोष्टीचा झोलझाल हाय. कणच्या बी चांगल्या पिक्चरमंधी जे पायजेन ते बंद येकाच पिक्चरमंधी हाय. आपल्या बाहुबलीची लवस्टोरी अशी जोरदार हाय का नुसत्या लवस्टोरीचाच पिक्चर बनला असता. बाहुबलीच्या हिरोइनचे नुसते डोळेच दिसले आन तिच्या डोळ्यान बाहूबलीच का म्या बी घायाल झालो. फॅन झालो. नुसती तिलेच पाहत राहाव वाटे जी. पहील्या पार्टातली खप्पड म्हातारी तिच्या जवानीत अशी गोड पोरगी असन अस वाटलच नाही जी. ज्यान कोण त्या गोड पोरीची खप्पड, खंगलेली म्हातारी करुन टाकली त्याले जगाचा काही अधिकार नाही. अशा भल्लाने मारलाच पायजे. आता ते बाहुबलीची हिरोइन तवा ते बी त्याच्यावाणीच पायजेन का नाही. तेबी अशी तलवार चालवते, बाण तर असा मारते य़ेका झटक्यात तीन तीर समोरचा खल्लास. डेरींग बी केवढ पोरीत, ते महाराणीच्या राजदरबारात जाउन त्या महाराणीलेच खरीखोटी सुनवुन आली. डेरींग लागते ना भाउ, मजाकची गोष्ट हाय का. बाहुबलीले हिरोइन पायजे होती तर अशीच, ते काही महालात बसून इकडून आले ना तिकडून गेले अशी बोंबलत नाही बसत. महालावर हमला झाला तर तेबी हातात बाण घेउन धावते. का सिन हाय जी तो, दिलखूष. अशी हिरोइन जवा प्रेम करते ते मनापासून करते. येकदा प्रेम केल ना का मंग त्याच्या संग कोठबी जाले तयार होते. लयच आवडली आपल्याले हिरोइन, म्या त्या हिरोइनच नाव टिपून ठेवल आता फुड तिचा कणचाबी पिक्चर आला तरी आपण पायनार, भाषा समजो अगर ना समजो.
बाहुबलीची हिरोइन अशी जबरदस्त तर त्याची माय का कमी होती का. ते तर महाराणीच व्हय. हे वटारडोळी, कवाबी पाहाव तिचे डोळे तसेच मोठाले. तिच्या नुसत्या डोळ्याले पाहूनच कोणाले बी भ्याव वाटन मंग तो बाहुबली का असेना. का तो तिचा महाल, का तिचा राजदरबार, का तिच सिंहासन, साली नजर खालपासून वर पर्यंत पोहचालेच केवढा टाइम लागत होता. अशा महालाची, राज्याची राणी मोठाले डोळेवाली शिवगामी. नुसती नजर फिरवली का बंदे चूप. तिची चाल बी तशीच. महाराणी पायजेन तर अशी, तिले पहीली चिंता आपल्या प्रजेची. लोकासाठी ते काहीबी करु शकत व्हती. मंग मागपुढ पाहात नव्हती येच्यात आपला जीव जाउ शकते, पोरायचा जीव जाउ शकते. अंहं पयल काम लोकायले वाचवाच, त्यायच रक्षण कराच. महाराणी म्हणून ते अशी येकदम कडक तर माय म्हणून लय जीव लावनारी. आपल्या पुतण्याले पोटच्या पोरावाणी सांभाळल तिन. म्या तुम्हाले सांगतो बाहुबली नशीबवान होता त्याले देवसेना सारखी बायको आन शिवगामी सारखी माय भेटली. हे जर त्याले भेटले नसते तर तो आखाड्यात कुस्त्या खेळनार पहेलवाण बनला असता, बाहुबली बनला नसता. बाहुबलीले बाहुबली बनवल ते त्याच्या मायन आन बायकोन. साऱ्यायलेच अशी बायको आन अशी माय भेटली तर बंदेच बाहुबली बनते पाय.
बाहुबली असा तगडा तर त्याच्यासंग फाइट करनारा विलन बी तसाच तगडा पायजेन जी. तो जर लुचुपुचा असता तर कस जमन जी. बाहुबलीन येवढी ताकत का हत्ती आन घोडेच अडवाले वापराची का विलन नुसता ताकतवाला पहेलवाणच होता आस नाही तर लय डोकेबाज होता. त्याचा दिमाग कांपुटरपेक्षाही तेज चालत होता. कोणच्या टायमाले कोण का बोलल पायजे त्याले बराबर समजे. त्याचा बाप येडा होता, त्या कटप्पान त्याले सांगतल व्हत तू मंदबुद्धी हाय म्हणून. फालतूची बडबड करनारा पण तो भल्ला त्याले बराबर चूप करे आन त्याले तवाच बोलू दे जवा जरुरत राय. आखरीच्या फायटमंधी विलन का दिसला जी साल कणच्या हिरोले खाली पाहाले लावन. केसाची गाठ पाडून शर्ट फाडून का फाइट खेळतो जी. मोक्यांबो मेल्यापासून असा विलन पायलाच नव्हता. त्याचे दंड व्हय का व्हय. त्यान आखरीच्या फायटमंधी बाहुबलीले म्हणजे पहील्या बाहुबलीच्या पोराले माराले का का नाही वापरल जी. लोखंडाचा गोळा माराच तर तो केवढा मोठा शंभरक किलोचा असन, तो उचलाले बी ताकत लागते न जी अस चिरकूट लकडी पहेलवाणाचा काम हाय का ते. त्यायच्या आखऱीच्या फायटीमंधी का नाही तुटत सांगा. भल्लाचा रथ तुटते, भल्लाचा पुतळा खाली पडते, भितीच्या भिती तुटते, झाडच्या झाड मोडून निघते. येक गोष्ट सुटत नाही, येवढा खर्च करुन जे जे काही मोठ बनवल ते बंद तोडून टाकल. जे हातात लागन त्यान फाइट खेळले. याले म्हणते दुष्मनी याले म्हणते फाइट. का हो भाउ बराबर हाय का नाही. अशी फाइट म्या याच्या आधी पायली नवती. तिकड त्यायची फाइट चालली होती इकड आमचा धन्या फायटा मारत होता. जोरजोरात वरडत होता मार. मार.
कॉमेडी कराले आपला कटप्पा हाय न जी, बाहुबलीचा मामा. लय हासवल बा त्यान. पहील्या पार्टात त्याले पायल तवा वाटलच नाही हा बुढा कॉमेडीबी करत असन म्हणून. पण काहीही म्हणा खरा कटप्पा हातात तलवार घेउन लढाइच्या मैदानावरचाच. त्यान शेवटी बाहुबलीले मारलाच नाहीतर बाहुबली काही असा मरत नव्हता. मले वाटते त्याले बाहुबलीले माराची गरज नव्हती त्यान बाहुबलीले नुसत सांगतल जरी असत तर बाहुबलीन सोताच सोताले मारुन घेतल असत. त्याचा लय जीव होता कटप्पावर आन कटप्पाचा बाहुबलीवर. या कटप्पानच मायी लय मोठी परेशानी दूर केली त्यानच शेवटी उत्तर देल का
'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?'
लिहनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा.
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
प्रतिक्रिया
10 May 2017 - 8:23 am | सचिन काळे
वऱ्हाडी ठेचा!! झणझणीत लिहिलंय!!
10 May 2017 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा
प्लस वण.
मजा आली.
10 May 2017 - 8:52 am | सतिश गावडे
बम मजा आली बे...
10 May 2017 - 8:55 am | रुपी
भारीच..
10 May 2017 - 9:03 am | चांदणे संदीप
झ्याक लिवलंय जानराव... आशेच पिक्चर बगत ऱ्हावा आन आमाले श्टोऱ्या सांगीत जावा!
Sandy
10 May 2017 - 9:12 am | पैसा
मस्त!
10 May 2017 - 10:01 am | नि३सोलपुरकर
जानराव ..जानराव ,दिलखूष लिहून राहिले ना भो .
10 May 2017 - 10:32 am | चिनार
एक नंबर लिहिता ना जानराव तुम्ही...
बाकी तूरगीर इकली गेली असंन अन टैम असंन तर रोज लिहाच मनावर घ्या...
10 May 2017 - 12:43 pm | मितान
फारच भारी लिहीलं जानराव :))
10 May 2017 - 12:53 pm | विनिता००२
10 May 2017 - 1:02 pm | चिनार
हा डायलॉग आपल्याला लयच पटला बा जानराव...एक गब्बर अन दुसरा मोक्यांबो..हे दोनच खरे व्हिलन होते...
हे मोगॅम्बो !!!
आजकाल ते प्रकाशराज सारखे कॉमेडी करणारे व्हिलन र्हायतेत
10 May 2017 - 1:08 pm | चांदणे संदीप
हेल मोगॅम्बो आसतंय वो ते दादा.
आ. न.
Sandy
10 May 2017 - 1:33 pm | विनिता००२
ज्यान कोण त्या गोड पोरीची खप्पड, खंगलेली म्हातारी करुन टाकली त्याले जगाचा काही अधिकार नाही.>>> भले शाब्बास :हाहा:
हे वटारडोळी :खोखो:
10 May 2017 - 1:41 pm | पद्मावति
मस्तच!
=))
10 May 2017 - 1:55 pm | कपिलमुनी
10 May 2017 - 2:37 pm | मंजूताई
लिवले भाऊ!
10 May 2017 - 7:09 pm | मित्रहो
एक छोटासा प्रयत्न गोड मानून त्याला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
संदीपभाउ
याच पिक्चरचे टिकिट मिळायला येवढा त्रास झाला आता परत कोण पिक्चर बघनार. हैद्राबादमधे तेलगु भरपूर ठिकाणी होता पण हिंदी तुलनेत कमी.
चिनारभौ
रोज रोज लिहाले रोज रोज सुचल तर पायजे न.
11 May 2017 - 10:34 am | विनिता००२
ऑनलाईन बुकिंग मिळतेय ना
10 May 2017 - 7:20 pm | उगा काहितरीच
एक नंबर ... !
11 May 2017 - 12:06 am | डॉ सुहास म्हात्रे
=))
11 May 2017 - 1:47 am | रामपुरी
त्याचा दिमाग कांपुटरपेक्षाही तेज चालत होता.
चाचा चौधरी
11 May 2017 - 2:07 am | रेवती
छान लिहिलय.
11 May 2017 - 7:34 am | आगाऊ म्हादया......
आवड्या
11 May 2017 - 10:37 am | विशुमित
दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल.
आता तो बाण मारनार तसा म्या धन्याले सोडला म्हटल 'लव लेका तुले जेवढ लवाच तेवढ लव.' खर सांगू मले बी लवाव अस वाटत होत पण … जाउ द्या.
हे वटारडोळी
मोक्यांबो मेल्यापासून असा विलन पायलाच नव्हता.
जे हातात लागन त्यान फाइट खेळले. याले म्हणते दुष्मनी याले म्हणते फाइट.
लाजवाब..!!
11 May 2017 - 11:44 am | सस्नेह
काय ष्टोरी लिवलीय ! बाहुबली खुष हुआ !
वटारडोळी =))
11 May 2017 - 12:58 pm | सचिन काळे
वटारडोळी!!!
*lol*
11 May 2017 - 2:28 pm | अभ्या..
अगागागागागागागागा,
जानरावभो जगदाडे मालक, तुमी राव आमच्याच डावातले हैत. लिव्हा जमके.
11 May 2017 - 7:35 pm | मित्रहो
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
विनिता ताइ
अजूनपर्यंत तरी जानराव ऑनलाइनची लाइनीत गेला नाही. काही हरकत नाही जानराव हेही शिकून घेइल.
12 May 2017 - 2:43 pm | विनिता००२
जमान्यासंगे चालावे लागते बप्पा!!
आमी बी आता आताच तिकडं जाऊन र्हायलोय.
11 May 2017 - 7:43 pm | नाखु
12 May 2017 - 7:43 pm | सिरुसेरि
मस्त .. भैताडच लिउन रायलया
13 May 2017 - 1:04 pm | संजय क्षीरसागर
एकदम दिलखुष !
13 May 2017 - 3:37 pm | चित्रगुप्त
वा जी वा. बढिया लिवले .
पिच्चर बेकार असता तरी अनुष्कासाठी बघितला असताच. आता जातोच येकदोन दिवसात बघाले.
14 May 2017 - 7:21 am | एमी
=)) लय भारी!
27 Jun 2017 - 4:24 pm | धर्मराजमुटके
लै भारी ! काय लिवलयं !