परदेशी स्थायिक झाल्यानंतर गावाकडच्या फेऱ्या तशा कमी झाल्या. मग ऑर्कुटवर सरांच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनला. त्यावर एका मित्राचा मेसेज आला की सरांना प्रोस्टेट कँन्सर डिटेक्ट झालाय म्हणून. सरांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात पसरले होते. भराभरा सुत्रं हलली. मुंबईला टाटामध्ये ट्रीटमेंट झाली. सर तीन चार महिन्यानंतर गावी परतले. आठवड्यातून दोनदा जवळच्या मोठ्या शहरात जाऊन इंजेक्शन घेऊ यावे लागे. शिवाय वॉकरही संगतीला घ्यावा लागे. सर कसलीही तक्रार न करता हसतमुखानं सगळं सहन करत होते. कुणी विचारलं तर म्हणंत , "अरे अंथरुणावर पडण्यापेक्षा बरेच की हे."
त्यानंतर गावी गेलो तेव्हा एक वाईट बातमी कळली. सरांचा मुंबईत असलेला कर्तासवरता मुलगा अचानक कँन्सरने गेला. ऐकल्यावर मी सुन्न झालो. मला काही सरांकडे जाववेना. काय बोलणार होतो मी? पहिल्यांदाच गावी जाउनही सरांना न भेटताच मी परत आलो. नंतर एकदा बाबा फोन वर म्हणाले, "आज सर भेटले होते. तुझी चौकशी करत होते . यावेळी तू येउन गेलास पण भेटायला का आला नाहीस ,असं विचारत होते." मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. पुढच्यावेळी नक्के जाईन म्हणून मी फोन ठेवला.
दोन वर्षांनंतर गेल्या महिन्यात घरी गेलो. तेव्हा अजून एक भयंकर बातमी वाट बघत होती. सरांचा धाकटा मुलगा पूर्वीसारखाच घरातून निघून गेला. खूप शोधलं पण सापडला नाही. एक दिवस जवळच्या एका नदीमध्ये त्याचं प्रेत सापडलं. खिशात सापडलेल्या पाकिटावरून ओळख पटली. खात्री करायला पोलिसांनी त्याच्या बायकोला बोलावलं. पण तिनं चक्क ओळख नाकारली. गावात काही दिवस उलटसुलट चर्चेला विषय मिळाला. सरांना सगळं कळलं होतंच.
धीर एकवटून मी सरांकडे गेलो. फाटकाबाहेर त्यांची सून भेटली. ती सायकलवरून बाजारात चालली होती . नातू बाहेर खेळत होता. सर माजघरात पूजा करत होते. मला बघून सरांनी आपल्या बायकोला हाक मारली, " गो, बघ कोण इलो. वाईच चा ठेव गो. "मला काय बोलावं ते सुचेना. "चहा नको, सर. सोडलाय मी अलीकडे." मी खोटंच बोललो.भिंतीवर मोठ्या मुलाचा फोटो लावला होता. बाई आत खाटेवर पडल्या होत्या. त्या उठून हळूहळू बाहेर आल्या. "बस हा" म्हणत आत जाऊन लिंबू सरबत घेऊन आल्या. तोवर सरांची पूजा आटपली. वॉकर घेऊन तेही बाहेर पडवीत येउन बसले. मी अवघडून बसलो होतो.
"मग काय नवीन?आता कुठचे देश फिरून आलास? देश फिरण्यात तुझी मोदींशी कॉम्पिटिशन दिसता." सरांनी नेहमीप्रमाणं माझी चौकशी केली. पण आज माझ मन त्यात लागत नव्हतं सरांच्या ते लक्षात आलं असावं. ते माझीच समजूत घातल्याप्रमाणं म्हणाले, "काय आहे, जे नशिबात लिहिलंय ते होणारच. त्यावर फार विचार करू नये. वाईट वाटून घेऊ नये. आपण आपला मार्ग चालत राहावा. आणि हे मीच नाही तुझे आजोबा सांगायचे. आज मी जो काही आहे तो तुझ्या आजोबांमुळे." (माझे आजोबा गावातील एक नावाजलेले वकिल होते.)
सर प्रथमच स्वत:बद्दल बोलत होते. सरांची परिस्थिती गरीब. वडील लहानपणीच वारले. "आई आणि मी झोपडीत राहायचो. काकांच्या घरी आई काम करायची आणि मी त्यांची नारळाची बाग शिंपायचो. त्या बदल्यात सकाळी वाडगाभर पेज आणि संध्याकाळी एक कप चहा मिळायचा. इथे राहिलो असतो तर पाणक्या बनलो असतो. म्हणून मॅट्रिकसाठी आईनं बेळगावला नातेवाईकाकडं ठेवलं. नातेवाईक म्हणजे सख्खी बहिण रे! लग्नानंतर एकदाही माहेरी आली नव्हती.तिला कोण आणि कसं आणणार? तिचीही परिस्थिती कठीणच. त्यात दुसरेपणाला दिलेली. त्यामुळे मी बेळगावला गेलो तरी मला तिथंही कष्ट होतेच. पण बहिण असल्याने दोन वेळेला पोट्भर जेवायला मिळायचं. सुदैवानं मित्र चांगला मिळाला होता. तो रात्री झोपण्याआधी त्याची अभ्यासाची पुस्तकं मला द्यायचा. ती रात्री वाचून मी सकाळी परत करायचो. परिक्षा उत्तम मार्कांनी पास झालो. आणि कुणीतरी मुंबईला एअर इंडियात पायलट ट्रेनिंगसाठी परीक्षा द्यायचा सल्ला दिला. पहिल्यांदाच एकटा मुंबईला आलो. पहिले काही दिवस फार हाल काढले. परिक्षा द्यायला गेलो तर इतर मुलं छान सुटाबुटात फाडफाड इंग्रजी बोलणारी, आणि मी सदरा आणि लेंगा घातलेला, अनवाणी. वाटलं इथं काही आपला निभाव लागणार नाही, पळून जावं. पण हिमतीनं लेखी परिक्षा दिली आणि चक्क पहिला आलो. मग मात्र आत्मविश्वास आला. पुढल्या परिक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो . शिष्यवृत्तीवर ट्रेनिंग सुरु झालं. मी, रिसबूड आणि शानबाग असे आम्ही तीन मित्र कायम एकत्र असू. आम्हाला सगळे थ्री मस्कीटर्स म्हणायचे. खूप छान दिवस होते ते. वर्षं सरली. कोर्स संपला. आता पायलट म्हणून नियुक्ती होणार. कष्टाचे दिवस संपणार या आनंदात होतो.
पण मोठ्ठा घोळ झाला. आमचे काका थोडे विघ्नसंतोषी. त्यांनी आईला सांगितलं की गेल्या चार वर्षात मुलाला बघितलं नाहीस. आता नोकरी लागल्यावर अजून चार वर्षं तो भेटणार नाही तर काही दिवसासाठी घरी बोलावून घे. आई अडाणी. ती तयार झाली. काकांनीच पत्र लिहिलं आणि तिनं अंगठा लावला. पत्र होतं एअर इंडिया प्रमुखांच्या नावे. "आमचा मुलगा काही वर्षांपूर्वी घरी न कळवता , घरातले पैसे, दागिने घेऊन पळून गेला होता. तो तुमच्या इथे प्रशिक्षण घेत आहे असे कळले. तरी त्याला ताबडतोब घरी पाठवून द्यावे." नोकरीसाठी मुलाखतीची वेळ दिली होती. मी आत गेलो तर मुलाखत घेणाऱ्यांच्या हाती हे पत्र होतं. त्यावर आईचा अंगठा. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. बोऱ्या बिस्तर घेऊन गावाला परत आलो. आईला दोष देण्यात काही अर्थच नव्हता. तिची बिचारीची काय चूक? नशीब माझं "
मी थक्क होऊन ऐकत होतो, कुठं उत्तुंग आकाश आणि कुठं ही शाळेतली नोकरी? केवढी फसवणूक? हे सांगत असताना सरांच्या आवाजात ना दु:ख होतं ना नाराजी. काकांबद्दल द्वेष, राग नावालाही नव्हता. हे आहे हेच नशिबात होतं आणि हे शांतपणं स्विकारायचं या समजुतदारपणामुळे सरांच्या चेहऱ्यावर शांत भाव होते.
"पुढं शाळेत नोकरी लागली. लग्नही झालं. काका मला जमिनीतला, घरातला हिस्सा द्यायला तयार नव्हते. तुझ्या आजोबांनी मदत केली आणि ही जागा मिळवून दिली. इथं आलो तर सगळीकडं रान माजलं होतं, दिवसा जनावरे फिरत असत.( नागाला जनावर म्हणण्याची कोकणात पद्धत आहे.) मी नोकरीस जात असे, आणि ही एकटीनं येउन हे सर्व साफ करत असे. हिनं कलमं लावली, नारळ लावले .डुरक्यातून शेंदून शिंपलं. रक्ताच पाणी केल म्हणून हे घर वगैरे उभं राहिलं. माझी गृहलक्ष्मी आहे ही." सर अगदी कृतज्ञतेनं, मायेनं बाईंकडं पहात होते.
आणि नवऱ्यानं मनापासून केलेल्या कौतुकानं त्या माउलीच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. एक साधसुधं जोडपं. आयुष्यानं किती म्हणून परिक्षा घ्यावी? डोळ्यासमोर दोन मुलं जाणं याहून दु:खकारक काय असेल? पण दोघं एकमेकांच्या आधारानं उभे होते. ते दृश्य मनात भरून घेऊन मी निघालो.
दुसऱ्या दिवशी पोहे आणि पिठी घेऊन त्यांची सून आली. " काल द्यायचा रवला , घरचा आसा ना म्हणून पाठवल्यांनी." आईनं तिला चहा दिला. नवर्याचा विषय निघाला तेव्हा म्हणाली, "हे परत येणार नाहीत मला माहितेय. पण कुंकू अजून पुसलं नाही. नाहीतरी नवऱ्याचा आधार होताच कुठं? पण कुंकवाचा होता. ते मी तसंच ठेवणार. आम्ही तिघं एकमेकांना धरून राहू. माझं सगळं लक्ष आता या मुलाकडे आहे." सरांचा नातू आठ वर्षाचा आहे उशिरा बोलायला चालायला लागला, एका डोळ्यानं त्याला दिसत नाही. पण न डगमगता त्याच्या उपचाराबद्दल ती चौकशी करत होती. सरांची सून खंबीर होती. मनोमन मी तिला नमस्कार केला. आणि डॉक्टर मित्रांचे नंबर फिरवू लागलो.
कुठंतरी वाचलेलं, वापरून वापरून कदाचित गुळगुळीत झालेलं वाक्य आठवत होतं, "सरांनी इतक्या मुलांना गणित शिकवलं पण आयुष्याचं गणित काही त्यांना सोडवता आलं नाही हेच खरं."
प्रतिक्रिया
10 Oct 2015 - 1:31 pm | रातराणी
:( कठीण परीक्षा.
10 Oct 2015 - 2:22 pm | नाव आडनाव
.
10 Oct 2015 - 2:54 pm | संदिप एस
मला प्रचंड काँप्लेक्स होता (अजूनही गेला नाहीये पूर्णपणे)गणिताची लिटरली भिती बसली होती.
ईश्वरी कॄपेने म्हणा किंवा योग्य वेळी आय.टीत आल्यामुळे असेल पण प्रचंड मेहनत आणी राईट अॅटीट्युड मुळे खूप फायदा झाला.. असो, प्रतिक्रीया अस्थानी वाट्ल्यास ऊडवली तरी चालेल. क्षमस्व.
10 Oct 2015 - 2:57 pm | संदिप एस
सांगायचा उद्देश..खूप वाईट वाट्ल हा भाग वाचून.. ज्यांनी ईतरांचे आयुष्य घडवले त्यांच्यासोबत असे का व्हावे?
शेवटी, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे म्हणायचे?
10 Oct 2015 - 3:01 pm | मित्रहो
कधी नियती काही लोकांची परीक्षा त्यांना नापास करायलाच घेते.
10 Oct 2015 - 3:03 pm | नाखु
सत्यकथा असेल तर पराडकर सरांना धैर्य मिळो आणि नातू चांगला शिकून आई-आजी-आजोबांचा ठीक संभाळ करो हीच सदीच्छा !!!
10 Oct 2015 - 3:22 pm | बॅटमॅन
.........
काय बोलू....
10 Oct 2015 - 3:51 pm | द-बाहुबली
आयुष्य बदलावं लागतं...! हेच खरं.
अवांतरः- बाकी असं काही वाचलं की खरचं वाटतं आपण कमालीचे सुखाने जगत आहोत. आणि त्यासाठी त्या अनामीक शक्तीचे आणि या समाजाचे आपण फार मोठं देणं लागतो.
10 Oct 2015 - 3:54 pm | मांत्रिक
सही बोललात!
लेख वाचला, पण काय प्रतिसाद द्यावा तेच कळत नव्हतं.
नियतीनं दुःखाचा पेलाच भरुन ठेवलेला समोर! काय बोलणार तरी?
10 Oct 2015 - 4:27 pm | ब़जरबट्टू
.. लेख छान तरी कसा म्हणावा...
10 Oct 2015 - 4:47 pm | एस
फारच अवघड गणित घातलंन तुम्ही इथं. काय प्रतिसाद द्यावा हे सुचत नाहीये. श्री. पराडकर सरांसाठी मनःपूर्वक सदिच्छा!
10 Oct 2015 - 7:00 pm | चाणक्य
.
10 Oct 2015 - 7:09 pm | अभ्या..
काय काय सोसतात माणसं.
अवघड आहे खरच. :(
10 Oct 2015 - 8:24 pm | शित्रेउमेश
लेख वाचला... आणखी काहीच लिहवत नाही....
वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य..... कधी कधी किती चटका लावून जातं ना??
10 Oct 2015 - 8:35 pm | चतुरंग
फारच सोसावं लागतं काही माणसांना. पराडकर सरांबद्दल वाईट वाटलं. आपण त्या परिस्थितीला काही फार करु शकत नाही ह्याची जाणीव जास्त असहाय्य करुन टाकते :(
20 Apr 2017 - 7:33 pm | ट्रेड मार्क
+१
11 Oct 2015 - 12:54 am | उगा काहितरीच
काय बोलणार ?
11 Oct 2015 - 2:14 am | इडली डोसा
सरांबद्दल वाचुन वाईट वाटलं. त्यांची स्वतःची मुलं आज नसली तरी तुमच्या सारखे त्यांचे विद्दार्थी मायेनं त्यांची विचारपुस करत रहातील आणि वेळ प्रसंगी सरांना मदत करतील असा विश्वास वाटतो.
11 Oct 2015 - 7:31 am | कविता१९७८
बापरे, वाचुन खुप वाईट वाटले. काहीजणानि शेवटपर्यन्त दु:खच सोसावे लागते.
11 Oct 2015 - 7:59 am | अजया
किती मुलांना शिकवुन शहाणं केलं असेल सरांनी.त्यांचा प्याला मात्र दुःखाचा:(
11 Oct 2015 - 12:10 pm | पद्मावति
अत्यंत भावस्पर्शी!
अतिशय सुंदर शब्दचित्र.
11 Oct 2015 - 5:17 pm | चुकलामाकला
वाचल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
11 Oct 2015 - 5:38 pm | अन्या दातार
काळजाला चटका लावणारी कथा.
12 Oct 2015 - 9:32 pm | सानिकास्वप्निल
वाचून मन भरुन आलं :(
13 Oct 2015 - 7:20 pm | नि३सोलपुरकर
...........
सरांना ___/\___.
13 Oct 2015 - 10:27 pm | कानडाऊ योगेशु
सरांच्या स्थितप्रज्ञतेला दंडवत.
अशी गुण असलेली पिढी आता लोप पावली आहे.
15 Mar 2017 - 9:56 pm | पिलीयन रायडर
हा भाग नजरेतुन निसटला... सापडला म्हणुन आनंदाने उघडला.. पण वाचुन फार वाईट वाटलं. उगाच वाचला असं झालं... :(
16 Mar 2017 - 12:02 pm | मराठी कथालेखक
छान लिहिलंय..
14 Apr 2017 - 11:08 pm | विचित्रा
कारण कमीत कमी तीन पिढ्यांना गणित शिकवणारे, समुद्राकाठच्या गावचे ते शिक्षक परिचीत आहेतच, त्यांना शब्दरुपात साकारण्यासाठी आभार.
17 Apr 2017 - 5:56 pm | अप्पा जोगळेकर
.