कैरीचं पन्हं : पन्हं कधीही , म्हणजे अगदी उन्हाळ्यात सुध्दा उठसूठ प्यायचे नसते .
आता बाजारात बारा महीने कैर्या मिळतात म्हणून करण्याचा हा प्रकार नव्हे. आणि हा सिंथेटीक सरबतासारखा उठवळ आयटमही नव्हे. पण पन्ह्याची कृतीसुध्दा पाल्हाळीक नसावी. चला बनवू या उत्तम पन्हे.
पन्हं म्हणजे कच्च्या कैरीचे की कैर्या उकडून ? असा आगाऊ प्रश्न विचाराणार्या माणसाला पन्ह्याच्या कार्यक्रमातून आधीच कटाप करावे. पन्हे म्हणजे उकडलेल्या कैर्यांचेच !!
पन्ह्यासाठी आधी कैरीचे वय बघावे. अगदीच बालिकाबधू कैर्या टाळाव्यात. पोटात घट्ट कोय धरलेल्या साधारण पोक्त कैर्या निवडून घ्याव्यात. शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्या आधी टाळाव्यात.
आमच्याकडे /आम्ही हापूसची कैरी उकडूनच पन्हं बनवतो असे म्हणणार्या लोकांकडे पन्हं पिऊ नये. त्यांच्या पन्ह्याला एक बावळट वास येतो.
मुंबईतलं सर्वोत्तम पन्हं एकेकाळी फोर्टात खादी भांडारात मिळायचं. माडाचा गूळ वापरून केलेल्या पन्ह्याची चव पुन्हा कधीच चाखायला मिळाली नाही . पण सरकारी असल्याने हे पन्हं काही वर्षानी मिळेनासं झालं.
आता माड्गूळ फक्त मिळतो. कधीतरी उत्साहाच्या भरात माडगूळ घेऊ आणि तेव्हा घरी कैर्या असतील आणि गृहिणी नाक न मुरडता माडगूळ वापरेल हे जरा कठीणच आहे.
त्यातल्या त्यात बोरा बाजारात असलेल्या बेडेकरांच्या दुकानात हवं तसं पन्हं फक्त चैत्रातच प्यायला मिळतं. दुपारी दीडच्या दरम्यान हे पन्हं प्यायला जावं. उत्तम पन्ह्यासोबत ब्यांक , सरकारी हापीसातल्या पुरंध्र्यांची गर्दी हा एक बोनस आहे. बेडेकर त्याचे वेगळे पैसे घेत नाहीत.
याखेरीज मान्यताप्राप्त अॅडीशन म्हणजे वेलचीची पूड. वेलचीचा तोरा नाकापेक्षा मोती जड व्हावा इतकी वेलची वापरू नये. आणि अगदीच जास्त वेलची घातली तर ती शेवटीच्या पातेल्याच्या तलातल्या गाळातच जाते.
केशर वापरणे म्हणजे कैरीसमोर सुबत्तेचा ठुमका मारण्यासारखे आहे.
इतकी मार्गदर्शक तत्त्वं पाळली की पन्हं पन्हं असं लाडीक कण्हत रहावं. बायको मुकाट्याने बनवून देते.
प्रतिक्रिया
4 Apr 2017 - 5:41 pm | वरुण मोहिते
घाऊक जिलब्या आज ?? उद्या आणतो .
4 Apr 2017 - 6:55 pm | प्राची अश्विनी
आहाहा! पन्हं झालं आता वाटली डाळ पण येऊद्या.
पण कच्च्या कैरीबाबत असहमत. कच्च्या कैरीचं किसून ,न उकडवता केलेलं पन्हं अप्रतिम लागतं. आणि त्याचा रंग तर द्रुष्ट लागेल असा.
6 Apr 2017 - 7:54 pm | मोदक
झैरात...
केशर कैरी सरबत.
4 Apr 2017 - 6:56 pm | पुंबा
आहाहा.. मजा आली काका..
जबरदस्त..
4 Apr 2017 - 7:23 pm | मारवा
पण कडक उन्हाळा थंडगार बियर हे व्क्तीगत प्राधान्य आहे.
4 Apr 2017 - 7:28 pm | प्रसाद गोडबोले
ह्यावरुन एक अप्रतिम कल्पना सुचली ! मिपावर ऊन्हाळा स्पेशल कॉकटेल स्पर्धा ठेवुयात का ? पन्हाचं अन बीयरचे कॉकटेल भारी लागेल !!
4 Apr 2017 - 7:39 pm | वरुण मोहिते
वोडका लागते त्याला पन्ह खूप फ्रेश हवं त्यात वोडका पण अबसोल्यूट वोडका छान लागते . सेम अबाऊट कोकम सरबत थंडगार आणि वोडका मिक्स .
5 Apr 2017 - 1:33 pm | आदूबाळ
चालेल!
माझी एंट्री: पाणीपुरीचं पाणी आणि व्हाईट रम. शेकन, नॉट स्टर्ड.
5 Apr 2017 - 5:55 pm | mayu4u
आणि बर्फ़ाचा चुरा! ग्लासच्या कडेला लिंबू घासून!
5 Apr 2017 - 6:51 pm | आदूबाळ
अजून एकः
कोकम सरबत गोठवून केलेले बर्फखडे, टॉनिक वॉटर आणि बॉम्बे सफायर जिन.
6 Apr 2017 - 1:19 pm | रामदास
अबसोल्यूट वोडका + नीरा (पालक्कड मधून मागवलेली)
6 Apr 2017 - 9:55 am | कबीरा
थंडगार ताज्या उसाच्या रसाबरोबर स्कॉच....
4 Apr 2017 - 7:26 pm | पिलीयन रायडर
मी पण एक बावळट वासाची कैरी आणलीये. आता तुम्ही इतक्या आठवणी काढताय की पन्हं तरी करुन पाहुच..
4 Apr 2017 - 7:26 pm | प्रसाद गोडबोले
लहानपणी एकदाच शेपुच्या वासाचा आंबा खाल्ला होता , बेक्कार ! इतक्या वर्षांनी आठवुनही घाण वाटतय ....
व्व्व्व्वॉऑऑऑऑऑक्क्क्क्क्क्क थ्थूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ
4 Apr 2017 - 8:05 pm | कंजूस
झकास!!!
पन्ह पिण्यासाठी उन्हाळाही तसाच कडक असावा.
वाटेल त्या कैय्रांचं पन्ह होत नाही.
4 Apr 2017 - 8:18 pm | मारवा
म्हणुन सरुवात केली रेसेपी डीटेलात न जाता तुम्ही कुठे कसे मिळतत्ायात रमलात की
म्हणजे गुळाचे प्रमाण कीती कसे इ नाही दीलत
साखर वापरुन पन्ह करणारीला गुळाचा अंदाज येत नाही
सुगरणीवर खव्वया हावी झाल्यासारखा
खोबरट समजुन घेतलेली कैरी चक्क आंबट निघाली
आता हीची मारवाडी लुंजी घालू ? की गुजराती छुंदा बनाउ ?
की लोणचं च घालु सरळ सरळ ?
5 Apr 2017 - 12:22 pm | अत्रुप्त आत्मा
@पन्ह्यासाठी आधी कैरीचे वय बघावे. अगदीच बालिकाबधू कैर्या टाळाव्यात. पोटात घट्ट कोय धरलेल्या साधारण पोक्त कैर्या निवडून घ्याव्यात. शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्या आधी टाळाव्यात.››› काय ती निवड? ==)) ह्या ह्या ह्या!
5 Apr 2017 - 12:56 pm | नंदन
अलंकार आठवला :)
5 Apr 2017 - 1:31 pm | आदूबाळ
हां! भयानक लागतो हा प्रकार. पण मला वाटलं नव्हतं शेपूच्या वासाचे आंबे हा प्रकार इतका सार्वत्रिक असेल.
माडाचा गूळ म्हणजे काय? कुठे मिळतो हा प्रकार?
5 Apr 2017 - 1:45 pm | पुंबा
शेप्या आंबा म्हणतात त्याला बहुतेक. आकाराने मोठा, हिरवा रंग, आत गर खूप घट्ट आणि तो लिजंडरी वास तसेच चव... अतीप्रचंड घाणेरडा लागतो तो प्रकार.. :))
5 Apr 2017 - 1:53 pm | रामदास
माडा पासून बनवलेला गूळ बंगालची पेशालीटी आहे. नोलान गोर असं काही म्हणतात तिकडे .
पण फ़िल्मी सन्दर्भ पण आहेत. नूतन अमिताभ चा पिक्चर , लीना चंदावरकर पण होती.
सजना है मुझे सजना के असं गाणं पण होतं तो पिक्चर !
5 Apr 2017 - 8:56 pm | स्वाती दिनेश
हो तो सिनेमा..
चैत्र सुरू झाला आहे आणि तुम्ही पन्ह्याची आठवण काढलीत.. वावा..
स्वाती
5 Apr 2017 - 1:54 pm | रामदास
माडा पासून बनवलेला गूळ बंगालची पेशालीटी आहे. नोलान गोर असं काही म्हणतात तिकडे .
पण फ़िल्मी सन्दर्भ पण आहेत. नूतन अमिताभ चा पिक्चर , लीना चंदावरकर पण होती.
सजना है मुझे सजना के असं गाणं पण होतं तो पिक्चर !
5 Apr 2017 - 1:58 pm | नंदन
नोलेन गुर. नेहमीच्या शोंदेशापेक्षा नोलेन गुरेर शोंदेशाची चव भन्नाट लागते. अक्वायर्ड टेस्ट असावी बहुतेक ;)
(मुनिवर्यांसाठी 'आऊटसाईड द ऑफ-स्टंप' डिलिव्हरी :))
5 Apr 2017 - 2:09 pm | सूड
सौदागर बहुधा!!
5 Apr 2017 - 6:42 pm | चांदणे संदीप
पदमा खन्नाबै होत्या त्या काका! :)
Sandy
6 Apr 2017 - 12:39 pm | सिरुसेरि
छान माहिती . माहिती वाचुन जी . ए. कुलकर्णी यांची "चैत्र" हि कथा आठवली . याच कथेवर क्रांती कानडे यांनी केलेला चित्रपट आठवतो . त्याचवेळी "कैरी" हा चित्रपट विसरावासा वाटतो .
6 Apr 2017 - 6:12 pm | गामा पैलवान
रामदासकाका,
लेखातलं शेवटून दुसरं वाक्य म्हणजे कहर आहे. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा! ;-)
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2017 - 7:44 pm | सुबोध खरे
कोकणात पन्ह्याला चवीसाठी मिरची लावतात. आमच्या वडिलांनी खास पन्हे पिण्यासाठी क्रॉफर्ड मार्केट मधून हिरव्या कंच रंगाचे ग्लास आणले होते. त्यात गुळाचे, मिरची लावलेले फ्रिज मधल्या थंडगार पाण्याचे बर्फ टाकलेले पन्हे म्हणजे आ हा हा हा.
त्या ग्लासकडे पाहूनच गा~ ~ र वाटत असे.
22 Jan 2021 - 8:29 am | NAKSHATRA
उन्हाळ्यातील आठवणी जाग्या झाल्या