नवप्रवर्तनाचा सोहळा

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जनातलं, मनातलं
20 Mar 2017 - 1:27 pm

४ ते १० मार्च राष्ट्रपती भवनाच्या आवारात ’नवप्रवर्तन उत्सव’ साजरा झाला. २०१५पासून हा उपक्रम सुरू आहे आणि यंदाचे तिसरे वर्ष होते. मला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. मुघल गार्डन पहायला म्हणून गेलो आणि बाहेर पडताना हे दिसले तर आत घुसलो. सुखद धक्का बसला. सर्वसामान्य माणसांच्या कल्पकतेला व्यासपीठ दिले होते. एक वैद्यकीय इनोवेशन्सना दिलेला विभाग सोडला तर उर्वरित सगळे संशोधक तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य भारतीय होते. जवळपास सगळेच ग्रामीण भागातील रहिवासी. त्यांचे संशोधनसुद्धा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा स्वस्त उपकरणे, वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात यादृष्टीने केलेल्या संशोधनांनाच जागा मिळाली होती. यातल्या काही इनोवेशन्सची मला माहिती होती, पण बाकी सर्व नवे होते.

festival of innovation entrance

या सर्वसामान्य ग्रामीण भागातील संशोधकांना देशाच्या राजधानीत, राष्ट्रपती भवनात व्यासपीठ मिळणे, त्यांना ओळख, प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळणे हा या कार्यक्रमाचा हेतु अत्यंत स्त्युत्य वाटला. भारताला महागड्या, सोफ़िस्टेकेटेड संशोधनाखेरीज अशा साध्यासोप्या, काहीशा ’जुगाड’ पद्धतीत मोडणाऱ्या पण सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणाऱ्या संशोधनांचीसुद्धा गरज आहेच.

मी टिवी पाहत नाही, त्यामुळे एखाद्या न्यूज़ चॅनेलने या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली असेल तर याची कल्पना नाही, पण मला (मी वाचत असलेल्या) कुठल्याही वर्तमानपत्रात यासंदर्भात बातमी दिसली नाही. अशा उपक्रमांना प्रसिद्धी मिळायली हवी असे वाटते. सगळीकडे नकारात्त्मक बातम्यांच्या सुळसुळाट असताना सकारात्मक, जनोपयोगी काही घडत असेल तर ते जनतेपर्यंत पोचावे.

मोबाइल मरायला टेकल्याने जास्त फोटो घेता आले नसते. त्यामुळे मी माझ्या विशेष जिव्हाळ्याच्या क्षेत्रातले म्हणजे कृषी क्षेत्रातले काही फोटो घेऊ शकलो. केरळ, मणीपूर, हि.प्र., राजस्थान, मध्यप्रदेश,ओडिशा अशा भारताच्या निरनिराळ्या भागांतील शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळाले होते. त्यांच्या पत्त्यासह माहितीपत्रक लावलेले होते. सगळ्यांच्या वाणांचे सॅम्पल आणि बियाणेसुद्धा होती.(त्यांचे फोटो काढू शकलो नाही. मोबाइल मेला. ) काही शेतकरी स्वतः हजर होते.(शेवटचा दिवस असूनही.) या सुधारित वाण निर्मात्यांना मोन्सॅन्टोसारख्या अवाढव्य कंपन्यांप्रमाणे कोट्यावधी डॉलर्सचे पेटंट राइट्स कदाचित मिळणार नाहीत, पण पारंपरिक मास सिलेक्शन पद्धतीने विकसित केलेल्या आणि स्थानिक ऍग्रोक्लायमॅटकरिता अधिक उपयुक्त असलेल्या या वाणांचे महत्व त्याने कमी होत नाही.

निरंजन भटा. भटईचे(वांग्याचे) हे वाण. स्वतः हाताळून पाहिले होते, चांगलेच वजनी आहे.
निरंजन भटा

एरवी मणीपूरची सर्व प्रसिद्धी चुकीच्या कारणांसाठी होत असताना त्या पिटुकल्या राज्यातील दोन शेतकऱ्यांना इथे प्रतिनिधीत्व मिळाले होते.

धान

सदाबहार आंबा. आंबे आणि आंब्याची कलमे पण विक्रीला होती.

सदाबहार आंबा

उष्णकटिबंधीय क्षेत्रातही फळधारणा होऊ शकेल अशा सफरचंदाच्या वाणाची कलमे विक्रीला होती.

Tropical Apple

tropical apple saplings

मला अपघातानेच लागलेला हा 'शोध' मनस्वी आनंद देऊन गेला. पुढील वर्षी हा सोहळा चुकवणार नाही.

-स्वामी संकेतानंद

समाजबातमीमाहिती

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2017 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

महत्वाची माहिती. टीआरपीच्या मागे लागलेली माध्यमे अश्या सकारात्मक कामांकडे सर्रास दुर्लक्ष करतात !

स्वामी संकेतानंद, धन्यवाद, ही माहिती इथे दिल्याबद्दल.

या इन्नोव्हेशन प्रदर्शनात महाराष्ट्रातील एकही शेतकर्‍याचा सहभाग नव्हता का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2017 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

महत्वाची माहिती. टीआरपीच्या मागे लागलेली माध्यमे अश्या सकारात्मक कामांकडे सर्रास दुर्लक्ष करतात !

स्वामी संकेतानंद, धन्यवाद, ही माहिती इथे दिल्याबद्दल.

या इन्नोव्हेशन प्रदर्शनात महाराष्ट्रातील एकाही शेतकर्‍याचा सहभाग नव्हता का ?

स्वामी संकेतानंद's picture

20 Mar 2017 - 2:56 pm | स्वामी संकेतानंद

सहभाग होता. नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने फवारणी यंत्रात सुधारणा केली आहे, त्याचे ते यंत्र ठेवले होते.
आमच्या सीमेपलीकडेच मप्रच्या छिंदवाडा जिल्ह्यातील एका 'मराठी शेतकऱ्याचे' सोयाबीनचे सुधारित वाण पण होते. मोबाईल मेल्याने फोटो काढता आले नाहीत.

सुधांशुनूलकर's picture

20 Mar 2017 - 3:03 pm | सुधांशुनूलकर

मनस्वी आनंद देणार्‍या, अपघातानेच लागलेल्या या 'शोधा'बद्दल इथे लिहिलंत, आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2017 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

थँक्स फॉर शेअरींग.

दरवर्षी पुसा दिल्ली येथून नवीन शोध करणाय्रा शेतकय्रांना प्रमाणपत्रे,बक्षिसे देतात.
त्यांचं संशोधन पुढे शेतकरी (मोठे) वापरत नाहीत.

फ़ारच छान वाटलं बातमी वाचून.

प्रीत-मोहर's picture

21 Mar 2017 - 7:17 pm | प्रीत-मोहर

यंदा नाही पण २०१५ साली एक मित्र सहभागी झाला होता. त्याच्या स्टार्टप कपनीतुन :)

पैसा's picture

21 Mar 2017 - 7:30 pm | पैसा

असं चांगलं काहीतरी सतत वाचायला आवडेल