माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्या प्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो असे म्हणायला हरकत नाही. घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाक घराला घराच्या ऋदयच स्थान असत. ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्या पाण्याचा चैतन्याचा झरा. छोटे मोठे सगळेच ज्याची उघडझाप करतात अशी एक दार असलेली थंडगार तिजोरी म्हणजे फ्रीज सगळ्यांचाच लाडका असतो. पदार्थाला एकसंध धरून ठेवणारे वाटण म्हणा की एखादी चटपटीत चटणी करण्यासाठी लागणारा मिक्सर दिवसातून एकदा तरी भिरभिरतोच. काही किचन मध्ये ओव्हन नावाची छोटीशी गुहा असते ती घंटो का काम मिनटो मे करायला बरेचदा गृहिणीला फायदेशीर ठरते. सोबत भट्टीचेही काम होते. सुबकशा भिंतीवरील मांडणीवर किंवा आधुनीक ट्रॉलीमधे धान्य, कडधान्याच्या बरण्या बगीच्यातील एकाच आकारातल्या फुलझाडांप्रमाणे बहरलेल्या दिसतात. मांडणी किंवा ट्रॉलीतील नित्यनियमाने लागणारी भांडी शाळकरी मुलांप्रमाणे शिस्तीत बसलेली असतात आणि कधी कधी दंगेखोर मुलांप्रमाणे इकडून तिकडे दंगाही करत असतात. अजून एक गमतीशीर गोष्ट ह्या स्वयंपाकघरात असते तो म्हणजे खाऊचा डबा. ह्या डब्यामुळे घरातील बाळ-गोपाळ इथे नित्य वावरत असतात. बहुतांशी घरात डायनिंग टेबल हे स्वयंपाक घरातच असत. टेबल नसले तरी बरीचशी कुटुंबे ह्याच खोलीत जेवायसाठी पंगत घालून बसतात. अशा वेळी ह्या गृहलक्ष्मी प्रसन्न झालेली दिसते. कारण तिच स्वयंपाकघरातील मूळ उद्दिष्ट पार पाडलेलं असत.
काही स्वयंपाक घरात काही संस्कार, रुढी पाळल्या जातात. पटल्या न पटल्या तरी जेष्ठांच्या इच्छेसाठी मानल्यास त्यांना आनंद देऊन जातात. जसं की आमच्या घरात रोज दही घरात असावं लागत. ह्या निमित्ताने हवे तेव्हा दही माझ्या पाककृतीला कला द्यायला तयार मिळत. अशा परंपरा जो तो आपआपल्या सोयीनुसार पाळत असतो.
कलाकौशल्य जपण्याच स्वयंपाक घर हे स्त्रीच हक्काच स्थान. अगदी मग त्याच्या सजावटी पासून ते वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांच्या पाककृती बनवण्यासाठी, स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या टिप्सनेही स्त्री आपलं कौशल्य पणाला लावत असते. किचन मध्ये झुरळ, मुंग्या , पाली यांना अटकावा घालण्यासाठी स्वच्छते बरोबरच विविध उपाययोजना राबविल्या जातात. म्हणजे स्वयंपाकघराला लसीकरण केले जाते एक प्रकारे आणि ह्यांचा हल्ला झालाच तर किटकनाशकांचा मारा करून वेळीच शत्रूला गार करावे लागते.
लहान मुला पासून ते वृद्धा पर्यंत कोणाला काय आवडेल त्या पदार्थांची रेलचेल इथे चालू असते. रुचकर पदार्थांचे अनेक सुगंध ह्या खोलीत दरवळत असतात. गरम चपातीचा वास, आंबेमोहोर तांदळाच्या खिचडीचा घमघमाट, लोणी कढवून तुप काढल्याचा सुगंध, दणदणीत फोडणीचा दरवळ पसरला की घरातील माणसांना आपोआपच भूक चावळते. मांसाहाराचा दरवळ तर शेजारीपाजारीही पोहोचतो. इथे भांडीही एकमेकांशी गप्पा मारू लागतात. पातेलं-पळी, तवा-कालथा, कढई-झारा, वाटी-चमचा यांचे परस्परांशी संवाद चालू होतात. कुकराची शिट्टी जेवण तयार असल्याची सूचना देते.
दिवाळी, होळी सारखे सण आले की स्वयंपाकखोली कशी पदर खोचून सज्ज झालेली दिसते. रोजच्या सामाना बरोबर सणांच्या पदार्थांचे सामान विशेष पाहुणे म्हणून स्वयंपाकखोलीत विराजमान होते. ठेवणीतली भांडी बाहेर येऊन शायनिंग मारू लागतात. स्त्रियांसाठी आणि स्वयंपाकघरासाठी एक्ट्रा ड्यूटी चालू होते पण ती आनंदाने केली जाते कारण मिळणारा ओव्हरटाइम कौटुंबिक सुख, समाधान देणारा व चविष्ट असतो.
काही ठिकाणी ही भूमिका पुरूषही बजावत असतात कोणी कर्तव्य म्हणून तर कोणी आवड म्हणून. मास्टरशेफची मूळ शिकवण ह्याच विद्यालयातून प्रथम घेतलेली असते ना.
कधी कधी आपण कंटाळा आला म्हणून किंवा कुणाकडे काही कार्यक्रमानिमित्त जेवायला जातो तेव्हा हे स्वयंपाकघर एकटं पडत. थोडं हिरमुसल्यासारखं वाटत. पण थोडा आराम मिळाल्याने दुसर्यादिवशी स्वयंपाकघराची मालकीण आणि स्वयंपाक घर नवीन जोमाने आपल्या कामात दंग होतात. अन्नपूर्णादेवी प्रसन्नपणे दोघांवर मायेचा पाझर घालत असते.
( दिनांक ४ मार्च २०१७ च्या लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशीत)
प्रतिक्रिया
9 Mar 2017 - 5:41 pm | पूर्वाविवेक
सुंदर लेख जागु !
पण चुकीच्या वेळी आल्यामुळे दुर्लक्षित राहिलाय.
9 Mar 2017 - 9:59 pm | कौशी
लेख आवडला.