आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज भोसले ह्यांची तारखेनुसार जयंती.
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी ||
शिवरायांसी आठवावें | जीवित तृणवत मानावेँ |
इहलोकी परलोकी उरावे | कीर्तीरूपें ||
आपल्या दैवताला शतशः वंदन करुन गेल्या वर्षी मला आलेला एक अनुभव आपणासोबत सांगु इच्छितो.
२०१५ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्नसमारंभ, देवदर्शन आटोपुन शनिवारी(२६डिसें.)जुन्या नाशकात(नाशिकला) माझा मुक्काम होता. संध्याकाळी फेरफटका म्हणुन मावसभावासोबत दुचाकीवर बाहेर पडलो. बर्याच वर्षांनंतर नाशिकची बोचरी; पण मस्त थंडी अनुभवली(५°से). सवयीप्रमाणे बाहेर खवय्येगिरी केली. नंतर गाडी गंगेच्या घाटावर वळवली. गाडीवर असल्याने स्वेटर घालुनसुध्दा ती थंडी अंगाचेहर्याला चांगलीच झोंबत होती. सहन होत नसल्याने १० मिनिटात तिथुन निघुन भद्रकालीला(जुन्याच नाशकात) आलो. रात्री ८:४५ वाजले होते. तेथील श्रीमंत साक्षी गणेश मंदिरापुढे एक मंच उभारला होता. साधारण २००-२२५ च्या आसपास लोक मंचापुढे खुर्च्यांवर बसली होती. पोलिस बंदोबस्त होता. ४-५ वयस्कर माणसे मंचावर बसली होती. त्यांच्यामधोमध थोडा पुढे साध्या फायबरच्या खुर्चीवर एक म्हातारा माणुस;डोक्यावर गांधी टोपी,अंगावर मळकट पांढरा झब्बा-पायजमा; बडबडत होता.(माझे त्यावेळचे मत). माझी नजर मंचाकडे होती. भावाने घरी जायचं का असं मला विचारलं. मी त्याला काही म्हणणार एवढ्यात त्या वृध्दाचे 'शहाजीराजे शिवाजीला म्हणाले' हे तीन शब्द कानावर पडले. आपसुकच मला राहवले गेले नाही. मी भावाला म्हणालो की चल जाऊन बघु काय आहे ते..
बाजुने उभ्या असलेल्या घोळक्यातुन रस्ता काढत आम्ही मंचापासुन २०-२५ फुटांवर जाऊन उभे राहिलो. मंचावर शिवाजी महाराजांची मुर्ती होती व भगवा ध्वज उभारला होता. कार्यक्रमाचा फलक तिथे लावला होता..
~~~~~~ शिवसुर्यजाळ ~~~~~~
(सुरुवातीस नाव अनाकलीय वाटले)
आणि 'ते वयोवृध्द' होते
शिवभक्त श्री.संभाजी भिडे गुरुजी
वय ८२/८३च्या पुढेच. खणखणीत आवाज. काटक पण चपळ शरीर. उंचीने लहान. झुपकेदार पांढऱ्या मिशा. दिसायला जरी साधे असले तरी यादवकालीन,शिवकालीन इतिहासाचा सखोल अभ्यास. म्हणतात ना 'साधी राहणी, उच्च विचारसरणी'. काही वर्ष संघाचे प्रचारक. तस ते त्यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट जाणवत होतं. महाराष्ट्रभुषण मा. बाबासाहेब पुरंदरे, मुख्यमंत्री देवेंद्र फ.,अन्य इतिहासकार ह्यांच्याशी त्यांचे जवळकीचे संबंध. न थकता न अडखळता निर्जळी ते बोलत होते. हे एक विशेष. कार्यक्रम ६ वाजता सुरु होणार होता पण तो ७:१५ ला भिडे गुरुजींच्या भाषणापासुन सुरु झाल्याचे तिथल्या एका श्रोत्याने सांगितले. सुरुवातीचे भाषण ऐकायला मिळाले नाही पण; जेव्हा ऐकायला लागलो तेव्हा ते आताच्या हिंदु समाजावर बोलत होते. तसा प्रत्येक ठिकाणी ते छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांचा उत्तमरीत्या संदर्भ देत होते आणि ते पटतही होतं. ह्या दोन्ही पिता-पुत्रांच्या कार्यकालातील काही मोजक्याच महत्वाच्या घटना ते सांगत होते. एका क्षणापुरतं मला शिवशाहीर बाबासाहेबच आठवले. पण पुढच्याच क्षणी माझी ती समज फोल ठरली.
आता तुम्ही म्हणाल ह्यात काय विशेष❓
हे तर बाबासाहेबही सांगतातच त्यांच्या शांत,मृदु पध्दतीने.
पण ह्या भिडे गुरुजींची पध्दत बाबासाहेबांच्या उलटच.(तुलनेचा मुद्दाम हेतू नाही). शत्रूला उल्लेखताना तिखट शब्दातील दाहकता, अफजलखान,औरंगजेब,दलेरखान ह्यांना भडवा, मुघलांना मुसल्डे म्हणणारे, शिवचरित्र-भगवदगीतेतील संस्कृत श्लोक तोंडपाठ, हिंदु जनजागृती करणारे तसेच महाराजांचे संपुर्ण हिंदुस्थानाचे स्वप्न, धर्मभाव, त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा लोकांना पटवून देणाऱ्या बेधडक गुरुजींचा आवाजच तिथल्या भागात घुमत होता. अधुनमधुन ते महाभारताचाही संदर्भ सहजपणे समजावत होते.
२०१३ च्या रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आणि माणगड ते रायगड ह्या दुर्गमोहीमेचे आमंत्रण ते स्वतः तुळजाभवानीचा प्रसाद घेऊन भारताचे विद्यमान प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. यथोचित आदरतिथ्यानंतर अवघा अर्धा तास भिडे गुरुजींनी श्री मोदीजीना सोहळा कशासाठी करतो हे सांगितले. मोदींनी सोहळ्याला येण्याचे गुरुजींसमोरच नक्की केले. ठरलेल्या दिवशी मोदीजी रायगडावर आले. राजदरबारातील त्यांची भेट गुरुजींनी मुद्दाम टाळली. उगाच लोकांसमोर मोठाईकी नको म्हणून. पण त्यांनी मोदीजीना गडावर असतानाच एक पत्र पाठवलं. पत्रात लिहील्यानुसार मोदीनी महाराजांच्या समाधीस प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला. त्यामागील गुरुजींचा उद्देश एवढाच की रायगडावर येऊन एक हिंदू म्हणुन तुमच येणं सार्थकी लागो व महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या कार्यात नुसतेच यशस्वी नाही तर १००% यशस्वी होवो. टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वतः मोदींनीही 'मी गुरुजींच्या आमंत्रणावरुन नाही तर आदेशानुसार रायगडावर आलेलो आहे.' असे विधान सामाजिक प्रसारमाध्यमांत केले.
एकुणच ते महाराजांच्या आचार विचारापासुन आजची आपली तरुण पिढी व हिंदू समाज किती आणि का लुप्त आहे हे सांगत होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मग त्यांनी कार्यक्रमाच्या मुळ उद्देशाला हात लावला म्हणजे ज्यासाठी कार्यक्रम आयोजित केला गेला होता. सुरुवात त्यांनी 'जर गड-दुर्ग नसते तर..' 'जर गड-दुर्ग नसते तर महाराज मातीत मिळाले असते..' ह्या विधानाने केली. रायगडावर १६८०मध्ये म्हणजे महाराजांच्या मृत्युच्या काही दिवस अगोदर महाराजांनी स्वतः मत प्रकट केलेले..'जर गड-दुर्ग नसते तर माझे व माझ्या मावळ्यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुर्ण झालेच नसते..आऊसाहेबांनी(जिजाऊंनी) आम्हाला जन्म दिला तर वेळोवेळी आम्हांस मृत्युपासुन दूर लोटले,वाचवले ते ह्या स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गड-दुर्गांनीच ..!!'
गड-दुर्गांबाबत सांगताना गुरुजींनी महाराजांच्या कार्यकालातील पुरंदरचा वेढा, प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान भेट व वध आणि घोड(पावन)खिंडीतील धारातीर्थ बाजीप्रभू देशपांडे, अलाउद्दीन खलजीचा अजिंक्य देवगिरीस वेढा ह्या घटनांचे संदर्भ सांगितलेत. तिन्ही घटनांचे संदर्भ त्यांनी त्यांच्या तडफदार शैलीत ज्या पध्दतीने सांगितले त्याने तर श्रोतेमंडळी चांगलेच भाषणात गुंगले होते. विशेषतः अफजलखान वधातील एकमेकांचे दोनअर्थी संवाद. कहो तो माहोल जम गया था और उसमे इतिहास की मेहफिल रंग सजा रही थी. मुळात इतिहास हा विषयच समजुन घेण्याचा आहे. आवड असेल तर तो अजुन रंजक वाटतो आणि तोही शिवकालीन असेल तर आपल्यासारख्यांच्या ज्ञानात अजुन भरच. इतर श्रोत्यांना मी सुध्दा अपवाद नव्हतो. वातावरण शिवगाथामय झालेले. अधुनमधुन 'जय भवानी जय शिवाजी' म्हणणार्यांना त्यांनी फटकारले.."टाळ्या,घोषणा हा बालिशपणा बंद करा. ह्यासाठी मी इथे आलेलो नाही. माझा विषय समझुन घ्या." ह्याआधी त्या घटना मी पुस्तकातुन वाचल्या होत्या पण; तरीही मी त्या घटना गुरुजींच्या शैलीमुळे नव्याने ऐकत आहे असेच भासले. त्यांना ज्ञात असलेल्या बारीकसारीक गोष्टी ते कथन करीत होते. गुरुजींमार्फत मला ज्ञात झालेल्या काही मोजक्या गोष्टींची हि नोंद ----
~ शिवरायांची वयाच्या १४व्या वर्षी हिंदवी स्वराज्यस्थापनेची शपथ तर १७व्या वर्षी राजगड,तोरणा,सिंहगड,पुरंदर हे किल्ले आदिलशाहीकडून जिंकून स्वताब्यात.
~ वय वर्ष १४ ते ५० ह्या ३६वर्षांच्या काळात महाराज २८९ लढाया लढले. त्यातील ७ लढतीत पराभव.
~ मे१६८० ते १६८९ कालावधीत छत्रपती संभाजी १५६ लढाया लढले. सर्व लढाया अपराजित.
~ छ. संभाजींच्या मृत्यूनंतर पेशवा- मराठ्यांचे ४७ वर्ष संपुर्ण हिंदुस्थानासाठी शर्थीचे प्रयत्न.
~ दोन्ही पितापुत्रांची 'प्रत्योत्पन्नमति'. म्हणजेच युध्दात,राजकारणात कठीण प्रसंगी नीतीशास्त्राचा योग्य वापर करुन संकटावर मात करणे.
~ भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांनी इ.स.१६५९ ते १६६७ दरम्यान पोर्तुगीजांच्या मदतीने लहानमोठी ४०० जहाजे बनविली. त्यासाठी कल्याण-भिवंडी-ठाणे-पनवेल ह्या प्रदेशांची निवड केली गेली.
~ धारातीर्थ. धारा म्हणजे तलवार. तीर्थ म्हणजे तलवारीवर सांडलेले रक्त.
~ शिवपुत्र संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत 'बुधभूषणम' हा ग्रंथ लिहीला.
त्यानंतरही ३ ग्रंथाचे लिखाण.
~ बर्याच लढाईत महाराजांच्या शेकडो सैन्याकडून कैक हजारो मुघलांचा पराभव. मोठ्यातल्या मोठ्या फौजेचा कमीतकमी ताकदीनिशी निभाव लावणे. शहाजीराजांनी सांगितलेले हेच ते 'ब्रम्हास्त्र'.
~ पुरंदरच्या तहात गमावलेले सगळे २३किल्ले महाराजांनी फक्त पाच वर्षात मुघलांकडून जिंकून स्वराज्यविस्ताराचे कार्य चालु ठेवले.
~ घोडखिंडीत सिद्दी जोहरच्या हजारो सैन्याशी बाजीप्रभू देशपांडेसह महाराजांच्या फक्त ४५० मावळ्यांचे सकाळी ८ ते सायं.५ वाजेपर्यंत घनघोर युध्द.
~ महाराष्ट्रतल्या ३७८ गड/किल्ल्यांपैकी(गिरी/स्थल/जल) २९७हुन अधिक किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले.
छत्रपती शिवाजी आणि रौद्रशंभू संभाजी महाराजांसारखे थोरपुरुष आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपल्या प्रत्येकाचे सदभाग्यच. गड-किल्ल्यांचा विषय आता त्यांनी चांगला उचलला होता. महाराष्ट्रातले गड-दुर्ग हा इतिहासाचा;नव्हे ह्या केसरीपुरुषांच्या अतुलनीय पराक्रमाचा आपल्यास लाभलेला ठेवा आहे. त्या महापुरुषांचे वारसच. ह्याची जाण एक हिंदु म्हणून आपणास मरेपर्यंत असावीच.आज काही छोट्या मोठ्या संस्था दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहेत. गडस्वच्छता मोहिमा राबवीत आहेत. तेही एक शिवकार्यच. प्रत्येक गिर्यारोहक हा शिवभक्त असतोच असे नाही. पण प्रत्येक शिवभक्त हा दुर्गप्रेमी असतोच. गिर्यारोहकांबद्दल त्यांचे मत काहीसे चांगले नाही. कारण काही बेअक्कल गिर्यारोहक दारुच्या बाटल्या,प्लँस्टिक,कचरा करुन, गुहा-लेण्यांमध्ये नावे लिहुन त्यांच्या बिनडोकपणाचे दर्शन तर करतातच पण गडाचेही पावित्र्य घालवतात. असे प्रकार सुज्ञ गिर्यारोहकानी(जमत असेल तर) बंद केले पाहिजेत. तुमच्या गिर्यारोहणातून कोणतेतरी सकारात्मक कार्य होऊ देत. सर्व दुर्गप्रेमी/गिर्यारोहकांनी मिळून जरी हे कार्य चालु ठेवले तर येणाऱ्या पुढील पिढीवर 'शिवकालीन इतिहास काय होता!' हे समजुन घेण्याचे 'संस्कार' तरी होतील.
कार्यक्रम अंतिम टप्प्यात होता. खरेतर गुरुजी आले होते ते हिंदु तरुणांना 'धारातीर्थयात्रा' मोहिमेसाठी उद्युक्त करण्यासाठी. इंटरनेटवरुन कळाले कि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे निर्माते, मूळचे सातारकर असलेले गुरुजी गेली ३० वर्षे शिवप्रबोधनाचे समाजकार्य करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली १५-१६ धारातीर्थ मोहिमा यशस्वी झाल्यात. ह्या मोहिमेतुन त्यांना 'शिवाजी-संभाजी' नावाचे रक्तगट असलेले तरूण निर्माण करायचे आहेत. ज्यांची आज एक "प्रगत राष्ट्रा"साठी गरज आहे(आणि आहेच). त्यांनी सुरु केलेल्या ह्या धारातीर्थ मोहिमेचा मुळ उद्देश असा की -
"हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी ६९ वर्ष उलटून गेलीत.
तरी पण हिंदुसमाज मनाने पुर्णतः परतंत्रच आहे. कर्तुत्ववान, शीलवान, धैर्यवान, साहसी, त्यागी, संयमी, स्वदेशाभिमानी व स्वधर्माभिमानी तरुणांची उगवती पिढी ही राष्ट्राची खरी मूलभूत संपत्ती आहे. सध्याच्या अधःपतित अवस्थेतुन उगवत्या तरुण पिढीला ध्येयवादी बनविण्यासाठी 'पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवप्रभूंच्या अत्यंत स्फुर्तीप्रेरणादायक जीवनाचा न पुसला जाणारा खोल ठसा त्यांच्या मनात उतरविणे अत्यावश्यक आहे.'
श्रीछत्रपतींच्या वृत्तीची अवघी तरुण पिढी ही राष्ट्राची निकड आहे.
यासाठी स्मरण म्हणुन श्रीछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या
व अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने धारातीर्थ बनलेल्या
गडकोटांच्या मोहिमा दरवर्षी आयोजित केल्या जातात.
मृतवत अंतःकरणाची हिंदुसमाजातील तरुण पिढी
ध्येयवादी बनवण्याचा ही मोहीम एक प्रभावी मार्ग आहे.
ह्यातुन अस्ताव्यस्त झालेल्या हिंदुसमाजाचा संसार सुरळीत चालवणारे, अदम्य इच्छाशक्तीचे व उत्तुंग महत्त्वाकांक्षाचे, प्रखर देशभक्त व धर्मभक्त ध्येयवादी तरुण घडावा हे ह्या मोहीमेचे एकमेव लक्ष्य आहे."
सुरुवातीस मला अनाकलीय असलेले कार्यक्रमाचे नाव आता काहीसे आकलनीय झाले होते. माझ्या बौध्दिक कुवतीनुसार मला कळलेले - ही धारातीर्थ गडकोट मोहीम म्हणजेच 'शिवसुर्य' आणि वर नमूद केलेला मोहीमेचा हिंदुसमाजापरीचा उद्देश म्हणजेच 'शिवसुर्यजाळ'.
(असे म्हणावयास हरकत नाही)
रात्रीचे ११ वाजले होते तरी गुरुजींच बोलणं काही संपत नव्हतं. सायं.७:१५ पासुन भाषणास सुरुवात केलेल्या गुरुजींना पोलीस अधिकार्यांनी कार्यक्रम संपवण्याचा आग्रह केला. गुरुजींनीही त्यांना मान देऊन कार्यक्रम १५ मिनीटांत संपवतो अशी कबुली दिली. तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती करुन तुम्ही तुमचे कार्य नैतिकतेने करा. मुख्यमंत्रांना मी तुमची स्वतःहुन ओळख करुन देऊन तुमची बढतीसाठी शिफारस करेन असा गमतीदार शेराही लगावला.
शेवटच्या १५ मिनीटात त्यांनी भाषणाला एक अखेरचा झंकार म्हणून महाभारतातील कौरव-पांडवांच्या युध्दातील एक प्रसंग थोडक्यात सांगितला. श्रीमदभगवदगीतेतील अध्यायानुसार कुरुक्षेत्रावर युध्द सुरु व्हायला अवघे काही क्षण बाकी होते. श्रीकृष्णानं शंख फुंकुन युध्दाच्या प्रारंभाचे संकेत दिले. पण रथामध्ये श्रीकृष्णाच्यामागे बसलेल्या अर्जुनाचे अवसान मात्र गळाले होते. हातातील शस्त्र त्याने जमिनीवर ठेवून खिन्न मनाने तो बसला होता. ते पाहुन श्रीकृष्णाने अर्जुनास काय झाले हे विचारले असता त्याने धर्मासाठी मी माझ्या स्वकीयांशी, आप्तेष्ठांशी, गुरुजनांशी लढू शकत नाही. माझ्यात तेवढी ताकद नाही. ह्यांना मारुन मी साम्राज्य मिळवायचे. असे नको व्हायला.(गीतेतील दोघांचे संभाषण गुरुजी संस्कृत श्लोकांसहित मराठीत सांगत होते)
अर्जुनाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाने त्याला खडे बोल सुनावले.
(१८ वा अध्याय)
"अर्जुना, असा षंढासारखा काय बोलतोस. तुझ्यासारख्या योध्द्याला असे बोलणे शोभत नाही.
सत्य आणि न्यायाच्या बाजुने लढणे हे तुझे कर्तव्य. ते तुझ्या रक्तात आहे.
नेहमी चांगल्याचा गौरव होतो. पुरुषाने कर्तव्याच्या आड मैत्री-नाते हे येऊ न द्यावे.(थोडक्यात गीतासार असा की) पुरुषाने त्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे करावे. फळाची अपेक्षा ठेऊ नये.लालची होऊ नये.
राग व लोभ हे तुमच्या बुद्धीमत्तेला दुबळे करतात. ज्याप्रमाणे आनंद उपभोगता त्याचप्रमाणे दुःख पचवण्याची क्षमता असावी.
योग्य काय,अयोग्य काय हे समजुन पुरुषाने कार्य करावे.
अर्जुना, तुझ्या मनाची हि शिथिलता सोड. उठ. उभा रहा आणि युध्दास सज्ज हो. मानवतेपेक्षा न्याय श्रेष्ठ."
वरील प्रसंगाचा तंतोतंत उदाहरण देऊन गुरुजींनी तिथे उपस्थित असलेल्या तरुणांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी चांगलेच उद्युक्त केले होते.
तुमच्यातील षंढाला समूळ नाकारुन पुरुषार्थाला ओळखा. दोन्ही पिता-पुत्रांचे जय-पराजय,राष्ट्रकार्य,समाजकार्य,धर्मकार्य कदापि न विसरणारे. ते लक्षात ठेवूनच स्व-कर्तव्यास जागा.
खरेतर आजची परिस्थिती बघितली तर आपला हिंदु समाज निःपक्षपणे एकत्र येण्यासाठी देखील अशाच काही मार्गदर्शकांची गरज आहे. तरुणांवर जातीवादाचा प्रभाव असण्यापेक्षा आपल्या धर्माची जाणीव त्यांना असणे हे महत्वाचं.
त्यांनी दिलेले उदाहरण शब्दात मांडायला जमलं नाही पण एक मोडका-तोडका प्रयत्न केलाय.
नुसतं कथा कथन करण तसं सोप असत पण त्यातील योग्य मतितार्थ ओळखुन तो समोरच्याला जसाच्या तसा पटवुन देऊन(वा मनावर बिंबवुन) त्याला एखाद्या उद्दिष्टपुर्तीसाठी प्रवृत्त करणे हे जिकरीचे कौशल्य. तेच गुरुजींनी केले आणि आजवरही करत आहेत.
संत तुकारामांचे अभंग, रामदास स्वामींचा दासबोध, श्रीकृष्णाची भगवदगीता, बाबासाहेबांचे शिवचरित्र ह्यातील काही मोजक्या संस्कृत श्लोकांचा अर्थासहित संदर्भ ते देत होते.
आणि...शेवटी त्यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांकडून गुरूजींनी एक प्रतिज्ञा वदवून घेतली. त्या प्रतिज्ञेचे शब्द मला पूर्ण आता आठवत नाहीत. त्यासाठी क्षमस्व. पण शेवटचे वाक्य आठवते ते..'मी माझ्या कार्यास प्रामाणिकपणे सदैव तत्पर राहीन..!' प्रेरित सर्व तरूणांना धारातीर्थ मोहीमेत सहभागी होण्याचे आमंत्रण देऊन त्या 'शिवभक्ता'ने ११:२०ला 'निर्जळी' आपल्या भाषणास तूर्तास पुर्णविराम दिला.
कार्यक्रम संपला होता. गुरुजी मंचावरुन खाली उतरले तोच त्यांच्याभोवती तरुणांचा घोळका जमला. काहींचे शंका निरसन होत होते तर कोणाच्या प्रश्नांची उत्तर मिळत होती. दुसरीकडे आयोजक मोहीमेची पत्रक वाटत होते. त्यांच्याभोवतीची गर्दी थोडी कमी झाली आणि मी गुरुजींना भेटायला गेलो. त्यावेळेस काय बोलावे काही सुचत नव्हतं. गुरुजींना मी वाकून नमस्कार केला. माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून ते म्हणाले.."पोरा, चांगल्या घरचा दिसतोस. चांगला शिकलेला दिसतोस. शिक्षणाचा सदुपयोग कर. शिवकार्यात-राष्ट्रकार्यात मनापासून सहभागी हो." मी हो म्हणालो. गुरुजी- "राहायला कुठे?" मी म्हणालो कल्याण. "त्या ऐतिहासिक नगरीत बोलव की आम्हाला पण." इति गुरुजी. मी "नक्की यावे गुरुजी.तुमचं स्वागतचं आहे." एवढं बोलून त्या खर्या शिवभक्ताचा निरोप घेतला.
महाराष्ट्र भुषण शिवशाहीर श्री.बाबासाहेब पुरंदरे ह्यांना भेटायची माझी मनापासून खुप इच्छा आहे. तो क्षण कधी येईल माहीत नाही पण शिवभक्त श्री.संभाजी भिडे गुरुजींना भेटून त्या इच्छेला थोडीफार किनार मिळाल्याचा आनंद आणि समाधान आजपर्यंत आहे. बाबासाहेबांच्या एका ओळीची मला इथे आठवण होते. ती म्हणजे इतिहासाचा 'अभ्यास' जितका महत्वाचा, तितकाच त्याचा 'उपयोग'ही महत्वाचा. रशिया,चीन,अमेरिका,इंग्लंड यासारखी एकूण एक राष्ट्र त्यांचा इतिहास जपतात. त्याचा अभ्यास करतात. त्याचा उपयोग करतात आणि त्यातूनच नवा इतिहास घडवतात. ही ओळ माझ्यामते भिडे गुरुजींना लागू होते आणि हा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवून, धारातीर्थयात्रासारख्या मोहीमा राबवून ते इतिहासाचा राष्ट्राच्या उद्धारासाठी सर्वपणाने उपयोग करीत आहेत.
आणि महत्वाचे म्हणजे ह्या वयात सुध्दा हा शिवभक्त शरीराची, जीवाची तमा न बाळगता प्रत्येक मोहिमेत नव्या उत्साहाने सामील होत आहे.
खरंच धन्य जाहलो त्या मावळ्यास ऐकूनी-भेटूनी-बघूनी..!!!
बाकी त्यांबद्दल बहुत काय लिहीणे..._/\_
****मोहीमेबद्दल थोडेसे****
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी दुर्गामाता दौड, शिवचरित्र पारायण, धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास,शिवराज्याभिषेक सोहळा असे कार्यक्रम/सोहळे आयोजित केले जातात. त्यातलीच एक ही धारातीर्थ मोहिम.
महाराष्ट्राचे दैवत शिवछत्रपती, धर्मवीर संभाजी राजे व अनेक नरवीरांचे जीवन आपल्याला वाचून, ऐकून वा माहितीपट बघून कळतील पण ते जाणून-समजून-उमजून घ्यायचे असतील तर शिवछत्रपती आणि त्यांचे असंख्य मावळे जसे जगले तसा प्रयत्न केला पाहिजे. मोहिम हा नरवीरांसारखा जगण्याचा-राहण्याचा केलेला अल्पसा प्रयत्न. हे सर्व नरवीर काळाच्या ओघात निघून गेले. पण आजही ते कोणत्या रुपात अस्तित्वात असतील तर हे महाराष्ट्राचे गड-दुर्ग. आपल्या धर्म शास्त्रानुसार कोणताही देह हा नाशवंत आहे पण त्यातील आत्मा हा अमर आहे. शिवछत्रपती व त्यांचे मावळे हे सुध्दा अपवाद नाहीत. त्यांचा जगण्याचा, जीवनाचा आत्मा म्हणजेच सह्याद्री-गडकोट जे आजही अस्तित्वात आहेत.
जसं प्रभु श्रीराम म्हंटल की धनुष्यबाण, पवनसुत हनुमान म्हंटल की गदा, श्रीकृष्ण म्हंटल की सुदर्शन चक्र, शंकर म्हंटल की त्रिशुल तसच शिवराय म्हंटल की गड-दुर्गच डोळ्यांसमोर येतात. या दुर्गरुपी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्यासारखेच कणखर व प्रखर आयुष्य जगणे शिकण्यासाठीच या मोहिमा सह्याद्रीच्या रांगांमधून गडागडांवर केल्या जातात ते तरुणांनी सहभागी होण्यासाठीच.
स्वतः शिवछत्रपती म्हणजेच एक उत्तुंग, उदंड आणि अजिंक्य दुर्गच. प्रत्येक गड प्रत्येक किल्ला हा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची रुपं आहेत. प्रतापगड म्हणजे त्यांच्या पराक्रमाचं रुप, पुरंदरगड म्हणजे धर्माच रुप, सज्जनगड म्हणजे श्रद्धेच,भक्तीच रुप, सिंहगड हे त्यांच्या मायेच रुप, सिंधुदुर्ग-विजयदुर्ग हे त्यांच्या कल्पकतेच रुप, राजगड हे वैभवतेच रुप तर रायगड म्हणजेच त्यांच्या अजिंक्याचं रुप. महाराजांचे चरणस्पर्श झालेल्या व इतर दुर्गांवर जाऊन त्यांच्या जीवनाची विविधता जाणून घेणे हा सुध्दा ह्या मोहीमेचा एक उद्देशच.
२०१६ ह्यावर्षीही दिनांक २३ ते २७ जानेवारी कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणागड ते भूधरगड अशी धारातीर्थयात्रा श्री तुळजामातेच्या आरतीने शुभारंभ होऊन यशस्वीपणे पार पडली. खरेतर ही मोहिम तरुणांसाठी एक शारीरिक, मानसिक सत्वपरीक्षाच असतेच. कारण मोहिमेचे नियमच शिस्तीचे ते असे की...
- मोहिमेचे शुल्क फक्त रुपये ४०.
- प्रत्येक धारकर्याने भारतीय वेश परिधान करावा आणि डोक्यावर पांढरी टोपी असावी.सोबत कानाच्या उंचीपर्यंतची काठी आणावी.
- समारोपाच्या दिवशी प्रत्येकाने भगवा फेटा बांधलाच पाहिजे.
- स्वतःला पुरेल एवढी शिदोरी व एक तांब्या पुरेल एवढा जलकुंभ स्वतःने सोबत आणावा.
- एक पातळ लहानशी सतरंजी व चादर.
- करमणूकीची साधनं पूर्णतः निषिद्ध. आणल्यास जप्त करुन शिक्षा केली जाईल.
- इतर कोणत्याही प्रकारचा,विदेशी,रंगीबेरंगी वेश चालणार नाही.
- स्वयंस्फुर्त तरुणांनीच सहभागी व्हावे. चंगीभंगी वृत्तीच्या तरुणांनी नाही.
- डोंगरातून चालावयाचे असल्याने कमीतकमी सामान पाठीवर असावे.
- **सगळ्यात महत्त्वाचे :
मोहिमेची तयारी म्हणून प्रत्येक धारकर्याने नित्य पळणे, जोर- बैठका मारणे, मंत्रासह सूर्यनमस्कार घालणे असा शारिरीक व्यायाम सुरु करावा. तसेच 'राजा शिवछत्रपती'चे नियमित वाचन सुरु करावे.
शिवरायांची आरती,ध्येय व प्रेरणा मंत्राचे पठण केलेले असावे.
मोहिमेत हात न उचलता २०० किंवा त्याहून अधिक जोर मारणार्या प्रत्येक धारकर्याला 'श्रीशिवछत्रपतीमुद्रा' असलेले गौरवपत्र देण्यात येईल.
आणि या मोहिमेचे ब्रीदवाक्य..
|| राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ||
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
प्रतिक्रिया
19 Feb 2017 - 8:36 am | उगा काहितरीच
___/\___
19 Feb 2017 - 10:03 am | प्रचेतस
छान
19 Feb 2017 - 8:28 pm | Nitin Palkar
मनःपूर्वक धन्यवाद!
अतिशय सुंदर लेख लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!
19 Feb 2017 - 11:03 pm | भटक्या चिनु
मनापासून आभार नितीनजी..
19 Feb 2017 - 9:36 pm | खेडूत
छान माहिती. गडकिल्ले पायी फिरण्याची मोहीम १९८५ च्या सुमारास सुरू झाली ती अद्याप सुरू आहे. एकदा तरी अनुभवावा असा एक उत्क्रुष्ठ उपक्रम आहे.
त्यांचं कार्यक्षेत्र आमच्या जिल्ह्यात असल्यामुळे बरेच बालपण संभाजीरावांच्या छायेत गेले- त्यांचा जवळून परिचय झाला. अशी निरपेक्ष माणसे यापुढे पहायला मिळणार नाहीत असे वाटते.
मिपावर त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे लेख आधीही आले आहेत.
१. भारत म्हणजे काय?
२. भटकंती यांचा लेख
22 Feb 2017 - 12:37 pm | भटक्या चिनु
दोन्ही लेख जबरीच....धन्यवाद.
22 Feb 2017 - 11:36 pm | भटक्या चिनु
दोन्ही लेख जबरीच....धन्यवाद.
20 Feb 2017 - 12:35 pm | शेवटचा डाव
ज्या नावाने या महाराष्ट्राला एक करन्याची ताकत आहे ते नाव म्हणजे छत्रपती, ,,,,,