मी ज्या घरात सध्या असतो
त्या घरात आधी रहायचो
माहित होती मला भिंत न् भिंत
कोपरा अन् कोपरा त्या घराचा
आणि सहज जाऊ शकत होतो मी
एका खोलीतून दुस-या खोलीत
.
.
.
पण आजकाल,
कुठल्याही खोलीत गेलो तरी
हसते ती खोली माझ्याकडे बघून
अनोळखी माणसाकडे बघून आपण हसतो तसं
काही काही कोपरे तर
दिसतच नाहीत मला
भिंती दिसतात....पण त्यांना आता वेगळा रंग आहे
दारंही वाढलीयेत घरात
तशी दिसत नाहीत....पण आहेत...कळतं मला
कधी कधी तर वाटतं
बरीच घरं आहेत या एकाच घरात
मग मी ये जा करतो
या घरातून त्या घरात
अगदी बेमालूम पणे...कुणालाही कळू न देता
.
.
.
याच घरात मी आशिर्वादही घेतले
आणि शापही
ईथे कधी पालवी फुटलेला मी
अाताशा पाचोळा बनून उडत राहतो घरात
त्याच माझ्या जुन्या घरात
उडता उडता दिसत राहतं काहीबाही मला
जुनं काहीतरी....गोधडीसारखं जुनं
थोडा वेळ किंवा थोडे दिवस उडल्यावर
कुठल्यातरी खोलीत पडतो मग
आणि येतो उठून माझ्या माझ्या खोलीत
.
.
.
रोज सकाळी मी पडतो घराबाहेर
आणि येतो संध्याकाळी दारातून आत
घर शोधत...
कधी सापडलंच चुकून
तरी निसटतं हातातून
मुठीतल्या वाळूसारखं
मी आटापिटा करतो जीवाचा
घर धरून ठेवण्याचा
पण कदाचित घरालाच मान्य नाहीये
माझ्या हातात राहणं
.
.
.
मी ज्या घरात सध्या असतो
त्या घरात मी आधी रहायचो
प्रतिक्रिया
7 Jan 2017 - 1:18 am | रातराणी
सुरेख! कविता आवडली!
7 Jan 2017 - 1:40 am | संजय क्षीरसागर
.
7 Jan 2017 - 2:12 pm | नीलमोहर
आवडली कविता