सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना! :)
कधी येशील कोंदणी??... :X
तुझ्या नजरेचा मेघ, त्यात काजळाची रेघ
कसा सोसावा आवेग, पडे काळजाला भेग
धनुष्य का भिवईचे, ताणूनसे धरलेले
तीर नयनांचे असे, मजवरी रोखलेले
रंग त्यांचा निळा भुरा, अचपळ मेघ खरा
पापण्यांचा गं पिसारा, झुलवी का झराझरा
कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे
मन वार्याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे
नाजूकशी गं जीवणी, नको फ़ुलवूस राणी
कट्यारच जीवघेणी, काळजाचे पाणी पाणी
तुझे हासणे ते मंद, मन माझे होई धुंद
लाल पाकळ्यांत बंद, जशा शुभ्र कळ्या कुंद
तुझ्या प्रेमात नाहतो, तुला स्वप्नांत पाहतो
तुझ्या सयीत वाहतो, संगे तुझ्याच राहतो
श्वासाश्वासात गं राणी, बघ तुझ्या आठवणी
माझीच तू हिरकणी, कधी येशील कोंदणी?
- प्राजु
प्रतिक्रिया
11 Feb 2009 - 8:27 pm | मानस
फारच छान ....
श्वासाश्वासात गं राणी, बघ तुझ्या आठवणी
माझीच तू हिरकणी, कधी येशील कोंदणी?
या ओळी विशेष आवडल्या .... अजुन येऊदेत ..............
11 Feb 2009 - 9:26 pm | छोटा डॉन
आम्हालाही ह्याच ओळी विषेश भावल्या ...
अतिशय उत्तम कविता , इनफॅक्ट "नवे मराठी ग्रिटिंग" मिळाले म्हणा ना ..!
( कॉपीराईटचा काय झोल नाही ना ? ;) )
मस्त, मजा आली.
------
छोटा डॉन
12 Feb 2009 - 8:17 am | आनंदयात्री
असेच म्हणतो.
सुरेख कविता. आवडली.
11 Feb 2009 - 8:27 pm | शितल
प्राजु,
खास व्हॅलेंटाईन डे साठीची कविता आवडली. :)
सुंदर श्र्रुंगारिक काव्य रचना. :)
11 Feb 2009 - 8:28 pm | त्रास
धूंद करे ही काव्यवारुणी
कळलेच नाही पेला पुढे केला कोणी
वा वा क्या बात है....सुंदर
11 Feb 2009 - 8:29 pm | लिखाळ
वा ! कविता आवडली.. शेवट मस्तच..
लाल ओठांत शुभ्र कळ्या ही उपमा आवडली..
निळ्या डोळ्यांसाठी मेघ.. हे थोडेसे खटकले.. त्या ऐवजी मोरपिसातल्या डोळ्याची तुलना अधीक खुलली असती असे वाटले...
-- लिखाळ.
11 Feb 2009 - 8:42 pm | सखाराम_गटणे™
सुरेख
11 Feb 2009 - 9:09 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!!! कसलं वर्णन केलंय. प्राजुतै ऑलराउंडर एकदम.
बिपिन कार्यकर्ते
11 Feb 2009 - 9:10 pm | रेवती
क्या बात है!
झकास कविता!
नाजूकशी गं जीवणी, नको फ़ुलवूस राणी
कट्यारच जीवघेणी, काळजाचे पाणी पाणी
मस्तच!
रेवती
11 Feb 2009 - 9:10 pm | चतुरंग
एकदम वॅलेंटाईन डे स्पेश्शल म्हणायची! :)
चतुरंग
11 Feb 2009 - 9:13 pm | बिपिन कार्यकर्ते
रंगाशेठ, प्रतिसाद पण जोडीनेच आला. ;)
बिपिन कार्यकर्ते
11 Feb 2009 - 9:16 pm | चतुरंग
शाळेत असल्यापासून प्रश्नपत्रिकेतला 'जोड्या लावा' हा माझा हातखंडा प्रश्न होता!
आता शाळा नसली म्हणून काय झालं, जोड्या अजूनही मी बरोब्बर लावतो! ;)
चतुरंग
11 Feb 2009 - 9:16 pm | प्राजु
व्हॅलेंटाईन स्पेश्शल कविता म्हंटल्यावर.. ठरवून.. १, २, ३..... प्रतिसाद प्रकाशित करा वर क्लिक.... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Feb 2009 - 11:55 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त आयडिया.
बिपिन कार्यकर्ते
11 Feb 2009 - 9:18 pm | धनंजय
वा!
सर्वांना प्रेम-दिनासाठी शुभेच्छा!
11 Feb 2009 - 9:22 pm | जेन
खूपच छान....टू गुड...
11 Feb 2009 - 9:27 pm | मुक्ता
खुप आवडली
11 Feb 2009 - 9:43 pm | अवलिया
मस्त
--अवलिया
11 Feb 2009 - 10:45 pm | मीनल
'पूरुषाला एका स्त्रीच रूप कसं दिसेल' हे स्त्री असून वर्णन करणे कठिण काम आहे.ते तू केलंस.
ग्रेट!
मीनल.
11 Feb 2009 - 11:56 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर निरीक्षण...
बिपिन कार्यकर्ते
11 Feb 2009 - 10:53 pm | जयवी
क्या बात है प्राजु....... जोरदार दिसतोय तुमचा व्हॅलेंटाईन्स डे ;)
12 Feb 2009 - 12:20 pm | सर्किट (not verified)
क्या बात है प्राजु....... जोरदार दिसतोय तुमचा व्हॅलेंटाईन्स डे
हुश्श ! "आता यायलाच हवं तुमच्याकडे", असं लिहिलेलं नाही.
-- सर्किट
11 Feb 2009 - 10:55 pm | बेसनलाडू
ही कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू
11 Feb 2009 - 10:56 pm | शशिधर केळकर
प्रथम वाटले हे ही एक विडंबन असणार!
पण कविता जसजशी पुढे सरकत गेली, तसा तो विचार केव्हा मागे पडला कळलेच नाही.
<<पूरुषाला एका स्त्रीच रूप कसं दिसेल' हे स्त्री असून वर्णन करणे कठिण काम आहे.ते तू केलंस>>
सहमत!
11 Feb 2009 - 11:26 pm | संदीप चित्रे
>>कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे
मन वार्याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे
या ओळी विशेष आवडल्या.
12 Feb 2009 - 12:11 am | विसोबा खेचर
वा! फरच छान कविता..!
शीर्षक मात्र कैच्याबैच वाटले! :)
त्यापेक्षा,
'मन वार्याचेही खुळे...' हे शीर्षक कवितेबदल बरेच काही सांगून जाते!
असो, पुलेशु...
तात्या.
12 Feb 2009 - 12:15 am | प्राजु
'मन वार्याचेही खुळे...' ही शीर्षक कवितेबदल बरेच काही सांगून जाते!
काय काय सांगितलं तुम्हाला ते आम्हांलाही सांगा बरं का! :)
असो, पुलेशु...
धन्यवाद. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Feb 2009 - 4:45 am | घाटावरचे भट
छान!! कवितेला छान डौल आहे.
12 Feb 2009 - 12:50 am | रामची आई
खुप छान आहे कविता!!
12 Feb 2009 - 1:03 am | शाल्मली
क्या बात है !!
मस्तच..
प्रसंगाचं औचित्य साधून मस्त कविता टाकली आहेस.
--शाल्मली.
12 Feb 2009 - 1:52 am | अनामिक
खट्याळ कविता...!!
प्राजु तै ने यमकात बांधलेल्या ओळी वाचताना मस्तं ताल धरल्या जातो... कवितेतला शव्द न शब्द आवडून गेला! !
(आठवणीत रमलेला) अनामिक
12 Feb 2009 - 5:15 am | शाहरुख
उत्तम कविता...वाचुन कसंसच झालं :-)
12 Feb 2009 - 8:14 am | राघव
प्राजु तै, अतिशय सुंदर रचना!
सगळी कविताच आवडली. शेवटचे कडवे विशेष! :)
सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना!
तुला सुद्धा व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!
मुमुक्षु
12 Feb 2009 - 8:17 am | मदनबाण
धनुष्य का भिवईचे, ताणूनसे धरलेले
तीर नयनांचे असे, मजवरी रोखलेले
व्वा...झकास !!!
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
12 Feb 2009 - 8:29 am | वल्लरी
खुप छान कविता!!
---वल्लरी
12 Feb 2009 - 12:17 pm | मॅन्ड्रेक
अतिशय उत्तम कविता , इनफॅक्ट "नवे मराठी ग्रिटिंग" मिळाले म्हणा ना ..!
आजच हे काव्य तिला पाठ्वत आहे.
मॅन्ड्रेक.
at and post : janadu.
12 Feb 2009 - 8:03 pm | मराठी शब्द
मॅन्ड्रेक माझा लहानपणीचा आवडता हिरो. रागावू नका....janadu हे असे लिहितात...xanadu
12 Feb 2009 - 1:11 pm | नितिन थत्ते
लै भरी कविता
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
12 Feb 2009 - 1:57 pm | दत्ता काळे
कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे
मन वार्याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे
... हे तर फारच आवडंल.
12 Feb 2009 - 7:22 pm | प्राजु
कोंदण आवडलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Feb 2009 - 8:08 pm | मराठी शब्द
शिल्पकाराला विचारले तर तो म्हणतो, मी मुर्ती घडवतांना नको असलेला दगडाचा भाग काढून टाकतो. तुमची प्रतिभाही तशीच आहे. शब्दांच्या अजस्त्र भांडारातून नेमके तेच घेउन झिगझाग पझल पक्क सोडवल्यासारखे वाटतेय.
13 Feb 2009 - 4:38 pm | पुष्कराज
छान आहे तुमची कविता,
तुमच नाव पण छान आहे-प्राजु
13 Feb 2009 - 7:05 pm | शंकरराव
कविता आवडली,
मस्तच..
10 Mar 2009 - 5:39 pm | क्रान्ति
मस्त कविता आहे एकदम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
11 Mar 2009 - 12:28 am | चन्द्रशेखर गोखले
कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे
मन वार्याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे
या ओळी विशेष करून आवडल्या...सुंदर नाजुक साजुक कविता !!!