मी आणि भाई नेरूरकर एकाच गावातले.एकाच शाळेत शिकत होतो.भाईचे वडील डॉक्टर होते.निरनीराळ्या खेड्यात जाऊन ते आजार्याना भेटून उपचार करून येत असत.पण नंतर नंतर त्याना त्यांच्या मोटरबाईक वरून प्रवास जमे ना.
तोपर्यंत भाई ग्रॅन्डमेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पुरं करून एम. डी. झाल्यावर वडीलांच्याच दवाखान्यात प्रॅक्टीस करू लागला.
दुरदैवाने भाईला वयाच्या एकेचाळीशीवर कसला तरी स्नायुचा आजार झाला.
हे मला पण माहित नव्हतं.बर्याच वर्षानी मी गावाला गेलो असताना त्याला व्हिलचेअरवर बसून रोग्यांवर उपचार करताना पाहून मी अचंबीत झालो.
एकदिवस वेळ काढून मी त्याच्याकडे गेलो होतो.तो रविवारचा दिवस होता.त्याच्याही दवाखान्याला सुट्टी होती.
गप्पा करताना भाई सांगू लागला,
" आमच्या डॉक्टरी पेशाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास आजारी काय सांगतोय ते ऐकायला लागणारी किंमत, ही त्या आजार्याच्या रोगाचं निदान करण्यासाठी लागणार्या माहागड्या किंमतीपेक्षा नक्कीच कमी असते.परंतु, ते ऐकणं हे रोगाच्या निदानासाठी आणि तो रोग बरा होण्यासाठी एक चांगलाच उपाय होऊ शकतो.
म्हणून मला वाटतं ऐकणं हा उपायावरचा प्रभावी उपचार आहे. "
अभ्यासू लोक सांगतात की,आजारी बोलू लागल्यावर त्याला मधेच बोलण्यापासून रोखायला फक्त अठरा सेकंद लागतात.
तुला एक गंमतीची गोष्ट सांगतो.ही मी आजारी पडण्यापूर्वीची गोष्ट आहे.
तो रविवार होता.मी शेवटचा आजारी तपासत होतो.मी तिच्या खोलीत घाईत गेलो आणि दरवाज्याजवळ उभा राहिलो.ती एक वयस्कर बाई होती.तिच्या बिछान्यावर एका कडेवर बसून ती सुजलेल्या पायावर मोजे चढवत होती.मी उंबरठा ओलांडून नर्सबरोबर पटकन बोलून घेतलं,तिच्या चार्ट मधून नजर टाकली.तिची प्रकृती स्थिर आहे हे पाहिलं.सर्व काही ठीक होतं.
मी तिच्या बिछानाच्या कडेवर जरा वाकून तिच्याजवळ बघत राहिलो.ते मोजे तिच्या पायावर चढवायला ती मला मदत करायला सांगत होती.ते करीत असताना मी स्वगत बोलू लागलो ते असं होतं,
" तुम्हाला आता कसं वाटतं?.तुमची रक्तातली साखर आणि ब्लडप्रेशर उंचावलं होतं पण आज ते ठीक आहे.नर्स सांगत होती की तुम्हाला तुमच्या मुलाला भेटण्याची उत्सुक्ता वाढली आहे.आज तो तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणे.कुणी तरी नात्यातला भेटायला आल्यावर नक्कीच बरं वाटतं.मला नक्कीच खात्री आहे त्याची तुम्ही वाट पहात असाल."
मधेच ती अधिकारपूर्ण आवाज काढून मला थांबवीत म्हणाली,
"बसा डॉक्टर,ही माझी बाब आहे, तुमची नाही."
मला जरा आश्चर्यच वाटलं आणि तिने मला अडचणीत टाकलं.मी खाली बसून तिला मोजे चढवले.ती मला सांगायला लागली,की तिचा एकूलता एक मुलगा जवळच राहतो.पण तिने त्याला गेली पाच वर्ष पाहिलं पण नाही.तिच्या प्रकृती अस्वास्थाच्या अनेक कारणात तणाव आणण्यात हे पण एक कारण आहे.तिचं सर्व ऐकून आणि तिच्या पायावर मोजे चढवून झाल्यावर मी आणखी काही तिच्यासाठी करू शकतो कां? म्हणून विचारलं.तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं आणि माझ्याशी स्मित केलं.मी तिचं ऐकावं हेच तिला हवं होतं.
प्रत्येक कहाणी निराळी असते.काही पूर्ण स्पष्ट असतात तर काही अस्पष्ट असतात.काही कहाण्याना सुरवात,मध्य आणि अंत असतो.काही कहाण्या एकडे तिकडे भटकत निष्कर्षाशिवाय राहातात. काही खर्या असतात,काही नसतात.पण हे सर्व काही फरक पाडत नाही.मात्र सांगणार्याला फरक पाडत असेल तर त्याची कहाणी रुकावट न आणता,तसंच कोणतंच अनुमान न काढता,आणि निर्णय न घेता ऐकली जावी एव्हडंच.
त्यानंतर ती बाई मला काय शिकवून गेली ह्याचा मी नेहमीच विचार करायचो.आणि माझ्या मलाच मी ते माझं थांबून,तिच्या जवळ बसून खरोखरीने ऐकलं ह्याच महत्व समजावून सांगायचो.
आणि त्यानंतर बराच काळ काही गेला नाही.जीवनात आलेल्या एका अनपेक्षीत वळणाने मी स्वतः आजारी झालो.माझ्या एकेचाळीस वर्षी मला स्नायुंचा रोग झाला.आता दहा वर्षानंतर मी कायमचा बसून असतो एका व्हिलचेअरवर.
जेव्हडं मला जमतं तेव्हडं मी ह्या खूर्चीवर बसून आजार्याना तपासत असायचो.पण जेव्हा माझ्या हातानाही ह्या रोगाकडून जखडलं गेलं तेव्हा हे तपासणं सोडून द्दावं लागलं.अजून मी मेडिकल स्टूडंटना आणि इतर सुशृषा करणार्या व्यवसायी लोकाना शिकवीत असतो.पण हे सर्व चिकित्सक आणि आजारी अशा दृष्टीकोनातून असतं.
मी त्याना सांगतो की मला वाटतं आजार्याचं ऐकणं हा उपायावरचा प्रभावी उपचार आहे.मी त्याना सांगतो की मला प्रत्यक्ष माहित झालंय की माझ्यावरच जे मी सांगतो ते इतराकडून ऐकून घेण्याच्या प्रक्रियेने अपरिमित उपचार होत राहिलाय, मात्र जेव्हा कुणी थांबून,माझ्या जवळ बसून मी काय सांगतो ते माझं शांतपणे ऐकलं जातं तेव्हा.
जसा तू आता माझ्या जवळ बसून ऐकत आहेस तसा."
भाई नेरूरकरने त्या व्हिलचेअरवर बसून मला हे त्याच्या मनातलं चिंतन सांगितलं ते मी कधीच विसरणार नाही.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 10:53 am | सर्किट (not verified)
सामंतकाका,
उत्तम लेख.
पण एक विचार आला, की भाई नेरुरकर समजा व्हीलचेअर मध्ये नसते, तर त्यांना "ऐकून घेणे" जमले असते का ?
-- सर्किट
5 Feb 2009 - 12:16 pm | श्रीकृष्ण सामंत
भाईला आजारी पडण्यापूर्वीच त्या बाईचा ऐकून घेण्याविषयीचा उपचाराचा अनुभव आला होता.
म्हणूनच भाई म्हणतो,
त्यानंतर ती बाई मला काय शिकवून गेली ह्याचा मी नेहमीच विचार करायचो.आणि माझ्या मलाच मी ते माझं थांबून,तिच्या जवळ बसून खरोखरीने ऐकलं ह्याच महत्व समजावून सांगायचो."
हे ऐकून घेण्याचं महत्व भाईला व्हिलचेअरवर बसण्यापूर्वीच माहित झालं होतं.आणि म्हणून भाईला "ऐकून घेणं " व्हिलचेअरवर बसण्यापूर्वीच जमत होतं हे उघडच आहे.
त्यानंतर काही काळ गेल्यावर भाई आजारी झाला.
व्हिलचेअरवर आजारी म्हणून बसावं लागल्यावर लोकं आपलं ऐकून घेतात हा त्याच्या आजारावर उपचार होत आहे हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे असं भाई म्हणतो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
5 Feb 2009 - 11:02 am | सुनील
आजार्याकडून डॉक्टरने ऐकणे हा उपचाराचा भाग आहे की निदान करण्याची पूर्वअट (प्रीरीक्वीझीट) आहे?
रोगी काय म्हणतोय ते जर डॉ़क्टरने धड ऐकलेच नाही, तर तो उपचार सोडाच, निदान तरी काय बोडख्याचे करणार?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Feb 2009 - 11:05 am | आचरट कार्टा
राजापुरात आमचे फॅमिली डॉक्टर पाध्ये आहेत, त्यांची आठवण झाली. त्यांच्याकडे जवळपासच्या खेड्यापाड्यांतून खूप पेशंट्स येतात. छोटासा दवाखाना. समोर टेबलापलीकडे डॉक्टर, अलीकडे वेटिंग साठी खुर्च्या आणि बाकं. कुणी नवीन माणूस आत आलं, की डॉक्टरांच्या पुढ्यातच येतं. आणि प्रिस्क्रिप्शन्स लिहिता लिहिता डॉक्टर वेटिंगरूम मधल्या प्रत्येकाची चौकशी करत असतात!
"गो आज्ये... आता काय झालं? परवा तर बाजाराला आली होतीस!"
"मामी, नात कशी आहे? तिचा बाबा घेऊन आला होता परवा. बिस्किटं फरसाण असलं खायला देऊ नका तिला..."
वगैरे...
त्यांचा हातगूण चांगला आहे, असं सगळे म्हणतात. त्यामागे हे ही एक कारण आहे. :)
आणि एक गोष्ट आठवली हे वाचून. प्लासिबो हा प्रकार पण भारी आहे. खोट्या गोळ्या. त्यात ड्रग केमिकल अजिबात नसतं. फक्त ही गोष्ट ती गोळी घेणार्याला माहिती नसते. त्या गोळ्या घेणारे बरेही होतात. आपण औषध घेतलंय या समाधानावर!
श्रीवर्धन-दिवेआगर किंवा पेण-रायगड परिसरात राहणार्या आदिवासी/वनवासींना तर इंजेक्शन दिलं नाही तर डॉक्टर गाढव असं वाटतं. अश्या वेळी डॉक्टर्स अनेकदा डिस्टिल्ड पाण्याचं इंजेक्शन देतात. त्या समाधानावर हे पेशंट्स बरे होतात!
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !