एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054
एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086
एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148
एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475
एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610
एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node/36653
एक ओपन व्यथा ७ - http://www.misalpav.com/node/36736
....................................
"हे असलं नाव?..... अज्ञात आडनावे?"
क्लार्कनं कपाळावरच्या आठयांचं आधीच असणारं जाळं अजून जास्त गडद करून मला विचारलं.
खरं तर अत्यंत उद्विग्न मनःस्थितीत मी पुणे विद्यापीठातून बाहेर पडलो होतो. एलएलएमची दारं बंदच दिसत होती. तसाच बसस्टॅन्ड वर आलो असताना मला माझ्या एका मित्राचा फोन आला. आणि त्यांनं अगदी अनपेक्षित अशी बातमी दिली कि पुणे विद्यापीठाने त्याच वर्षापासून दुसर्या कॉलेजेसना एलएलएम कोर्स घ्यायची परवानगी दिलीआहे आणि अमुक अमुक कॉलेज मध्ये शकतो... मी लगेच त्या कॉलेज मध्ये पळत पळत गेलो आणि लगेच प्रोव्हिजनल एडमिशन घेऊन टाकली. ते नाव बदलायचं तर तसं मी मनावर घेतलंच होतं. घरी गेल्यावर आधी माहिती काढली. लगेच अर्ज केला. त्याच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या. मग ते एफेडेव्हिट सादर करणे, स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देणे, मग सेक्रेटरिएट ला विनंती करणे, त्यांचा प्रतिसाद, ते नाव बदलाचे डीड.... ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. ते जाहिरातीचं जरा अवघड होतं. घरी कळण्याचा संभव होता. मला ते कळू द्यायचं नव्हतं. पण अगदी स्थानिकेस्ट पेपरमध्ये जाहिरात दिली कि फारसं कोणी वाचणार नाही. सुदैवाने ह्याची वाच्यता झाली नाही.. मी वाचलो..... जेंव्हा गॅझेटमध्ये माझं बदललेलं नाव बघितलं तेंव्हा मी सुटकेचा निःश्वास टाकला होता. खूप मोकळं वाटू लागलं होतं. (सोबतच्या एका फोल्डरमध्ये सर्व कागदपत्रे सापडतील) आणि ती सर्व कागदपत्रे घेऊन मी कॉलेजच्या क्लार्क समोर उभा होतो.
"हे असलं नाव?..... अज्ञात आडनावे?"
"हो..."
"अरे पण... हे असलं नाव कधी असतं?"
"नसतं.... माहितीये मला"
"मग??"
"हे घ्या..." मी सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती त्यांना दिल्या.
"अरे.... हे काय?" सर्व कागदपत्रांची पडताळणी करून क्लार्क म्हणाले.
"गरजेची कागदपत्रे.."
"ते कळतंय सगळं... तशी सगळी पूर्तता केली आहेस. तुझं नाव हे असलं ठेवायला माझी काहीच हरकत नाही. पण...."
"जाऊ द्या ना सर...." त्यांचं वाक्य तोडत आणि मुळ कागदपत्रं घेत मी म्हणालो.
काय येडं पोरगंय हे, ह्या अश्या नजरेनं क्लार्क माझ्याकडे बघत असताना मी ऑफिसच्या बाहेर पडलो.
काहीपण म्हणा,जेव्हापासून मी माझं नाव बदललं तेंव्हापासून माझ्या वर्गात मी एका उत्सुकतेचा विषय झालो. हे असलं नाव? कोणाचं असतं? अज्ञात आडनावे? च्यायला जात कळतंच नाही राव. मला आडून आडून प्रश्न येऊ लागले माझ्या जातीच्या संदर्भात. मी अंदाज येताच सांगायचो कि, "मी ओपनचा". भारी वाटायचं जेंव्हा विचारणारा अजून बुचकळ्यात पडायचा. मी तिथून अजिबात सटकायचो नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघत बसायचो. त्यांची अस्वस्थता मला खूप समाधान मिळवून द्यायची. हे नाव बदलण्याची भानगड घरी कळणं तसं शक्य नव्हतं कारण एका वयानंतर मुलाची मार्कशीट आई बाबा नाहीत बघत आणि माझ्या गावाचं कोणीच नव्हतं, सुदैवानं, तिथं.
नाव आणि आडनाव बदलल्याने मला सुरुवातीला खूप फायदा झाला. सोबत एक पांढरी फाईल आहे. त्यात काही सर्टिफिकेट्स आहेत. त्या सगळ्यांच्या मागे काही कवितांची टायटल्स आहेत ती सर्व आधी सांगितलेल्या काळ्या फाईलसोबत कम्पेअर करा... बघा नाव बदलण्याचा फायदा...
----------------------
पाटलांनी दोन्ही फाईल्स पडताळून पाहिल्या. कविता त्याच होत्या. पण नाव बदलायच्या आधीची प्रमाणपत्रं हे मुख्यत्वे उत्तेजनार्थ किंवा फक्त सहभागाची होती. नाव बदलल्यावर त्याच सर्व कवितांना जास्त करून पहिलंच बक्षीस मिळालं होतं... अपवादात दुसरं.
भुवई उंच करून पाटील पुन्हा वाचू लागले.
---------------------
ज्या गोष्टीसाठी मी खूप आसुसलो होतो. ती मला मिळत होती.... परीक्षकमान्यता..... सध्याचा जमाना फक्त लोकमान्यतेचा नाही. नुसत्या टाळ्यांनी पोट भरत नाही. जिथे जाईन तिथे माझं नाव ऐकून लोकांच्या कपाळावर प्रश्नचिन्हे जमा होताना माझं मन अतीव समाधानाने भरून जात असे. जिथे गोवर्या वाचल्या तिथे फुले वेचतांनाचं काय समाधान असतं ते शब्दात नाही सांगता येत... मित्र मला "अड्या" म्हणून हाक मारायचे. कधी कधी..... नाही..... बहुतेक वेळा ते "वेड्या"च व्हायचं. पण मला ते चालायचं. मेलेली कोंबडी जाळाला थोडीच घाबरते. आणि हे असले टॉन्ट्स तर जाळाच्या झळा पण नव्हते, माझ्यासाठी....
एलएलएम करताना थोडाफार भविष्याबाबत विचार सुरु झाला. मला माझे पूर्णपणे आकलन झाले होते. डन... ठरवले कि आपण प्राध्यापक व्हायचे. एक पोकळी निर्माण झाली होती आयुष्यामध्ये. एखादा चांगला प्राध्यापक लाभला असता तर काही गोष्टी व्यवस्थित मार्गी लागल्या असत्या कदाचित. ती पोकळी भरून निघाली असती. पण दुर्दैवाने अशी एकही व्यक्ती सर म्हणून आयुष्यात आली नव्हती कि जिथे मला आशेचा किरण दिसला असता. म्हणून ठरवलं... आपणच ती जागा व्हायचं... आपण आपल्या विद्यार्थ्यांची मोकळी जागा भरून काढायची.... ज्या गोष्टीसाठी मी त्रस्त होतो, ज्या गोष्टींसाठी मी तरसत होतो त्या गोष्टींसाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना तरसु देणार नव्हतो...
ठरवलं...
बास्स... एकदा का नोकरी लागली की लाईफ सेटल... पण प्राध्यापक व्हायचं झालं तर नेट-सेट पास होणं आलं. तर दुसर्या वर्षांपासूनच तयारी सुरु केली.
माझं गाव सोडल्यापासून मी पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत होतो. कोणाची भीती नव्हती. कसलाच गंड नव्हता. उलट माझ्यात असणाऱ्या गुणांना "अज्ञात आडनावे" मुळे एक मान्यता मिळत होती. आयुष्य नं जळता जगता येऊ शकतं ही आयुष्याची वास्तविकता अनुभवत होतो. आनंद घेत होतो. फावल्या वेळात पुण्यात होणारी वेगवेगळी व्याख्यानं, संमेलनं वगैरे वगैरेंना जात होतो. एक वैचारिक अधिष्ठान लाभतंय असं वाटत होतं.... काही काळ..... काही काळंच...
नेटची तारीख घोषित झाली. मी नोटिफिकेशन वाचलं. आणि इतके दिवस ज्यावर पडदा पडल्यासारखं वाटत होतं ते जरा बाहेर पडू लागलं. ओपन ला फी ६००, ओबीसीला ३०० आणि एससी/एसटी ला फक्त १५०?? सगळे ओपन श्रीमंत असतात? आणि सगळे कॅटेगरीवाले गरीब असतात? माझ्या तोंडून आपसूक निघून गेलं. मला हे नवीनच होतं. पहिल्यान्दाच स्पर्धा परीक्षा अनुभवत होतो. माझ्या शेजारचा एक जण माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता. मी आपलं मुकाट चलन डाऊनलोड केलं. आणि बॅंकेत पैसे जमा केले.
नेटला तीन पेपर असतात. पहिला जनरल ५० मार्कांचा, दुसरा संबंधित विषयाचा ५० मार्कांचा, पहिला आणि दुसरा पेपर ऑब्जेक्टिव्ह असतो. ते पास झाल्यावरच तिसरा पेपर तपासला जातो जो डिस्क्रिप्टिव्ह असतो. आणि त्यावरच नेटचे भवितव्य अवलंबून असते (म्हणजे असायचे ... नंतर ह्या पॅटर्नमध्ये बदल झाला आणि तिसरा पेपर पण ऑब्जेक्टिव्ह झाला) माझा पहिलाच प्रयत्न होता. तरी पहिले दोन निघाले. तिसर्यात फेल झालो. तसं तेच मला अभिप्रेत होतं. कारण तिसरा पेपर पूर्ण सोडवलाच नव्हता. अर्धाच सोडवला होता. पेपर अर्धा लिहून कोणी पास होऊ शकतं? शक्य आहे? कसं होऊ शकेल ना?
होय...
हे अशक्य नाही....
पेपर अर्धा लिहूनही तुम्ही पास होऊ शकता....
फक्त.... अर्धा..
माझ्या पहिल्याच प्रयत्नात जिथे मी मला समजावत होतो कि नाही रे.. अर्धा पेपर लिहून कोणी नसतं पास होत, तिथे.. माझ्या सोबतचा तसाच पास झाला कि जो माझ्याच हॉल मध्ये होता आणि माझ्या आधी उठून गेला होता.
मी आम्हा दोघांचे मार्क्स बघितले. त्याला तिसर्या पेपरला माझ्यापेक्षाही कमी मार्क्स होते. असं कसं शक्यय? असं मी विचारताच तो हसत हसत म्हणाला.... "भाऊ... तू कितीजरी नाव बदललंस ना तरी जात नाही बदलू शकत.... मी ओपन नाही... आम्ही जास्त प्रोटेक्टेड" असं म्हणून गाडीची चावी फिरवत तो निघून गेला.
ओपनच्या आणि कॅटेगरीच्या मार्कांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांचा फरक असतो. नेहमीच.... त्याच फायद्यात तो पास झाला होता... वाटलं त्याच्या जातीला नशिबाची जोड मिळाली असेल. असो.... मी जास्त विचार नाही केला.
नाव बदलल्यावर खूप चांगले अनुभव आले होते. आणि अजून तरी व्यावहारिक जगाचा तसा संपर्क नव्हता आलेला. जग वाटतं तेव्हढं वाईट नाही, अशी धारणा होऊ लागली होती. मिळणाऱ्या बक्षिसांनी जरा मलमपट्टी पण होत होती.
बघता बघता एलएलएमचं दुसरं वर्ष पण संपलं. तोपर्यंत दोनवेळा नेट दिली होती. पहिला आणि दुसरा पेपर निघायचा पण तिसर्यात घोडं अडत होतं. सोबतचे जे कोणी कॅटेगरीत होते ते सर्व नेट निघाले. आम्ही ओपन वाले अजून आषाढी कार्तिकीच करत होतो... पण विठ्ठल काही प्रसन्न व्हायचं नाव घेत नव्हता. उंबरठ्यापर्यंत पोहोचत होतो मी पण आत काही प्रवेश मिळत नव्हता. तिसर्या पेपर पर्यंत पोहोचत होतो. पण तिसरा काही पार होत नव्हता. मला कळत नव्हतं पहिले दोन पेपर लगेच आणि दरवेळेस निघत होते पण तिसरा पूर्ण लिहून सुद्धा निघत नव्हता? आणि त्याचवेळेस काहीजण पूर्ण पेपर न लिहिता सुद्धा पास होत होते. 'बहुदा पेपर चेक करणाऱ्यांची लॉबीच असते', असाही विचार यायचा बर्याचदा.. काय घोळ होता देव जाणे पण घोळ होता खरं...
अंदाज आला कि हे नेट प्रकरण जरा अवघड आहे आपल्याला... मग इकडे तिकडे नोकर्या हुडकणं चालू झालं. कोर्टाचे दरवाजे तर मी माझ्यासाठी केंव्हाच बंद केले होते, स्वतःहून. बरेच दरवाजे ठोठावून झाले. पण रेफरन्स आडवा येत होता. आपल्याला कोण ओळखत होतं? घंटा... घरून पैसे येत होते. बारावी झाल्यावर सात वर्षांनंतर सुद्धा जर घरचे किरकिर नं करता पैसे पाठवत असतील तर जिवाला किती लाज वाटत असेल? तशी आणि तितकीच लाज मला वाटत होती. सोबतचे मित्र छान कमवत होते. काही जणांच्या लग्नाचंही होऊ घालत होतं. आम्ही नोकरी शोधत हिंडत होतो. सकाळ उजाडायची आणि मी आवरून बाहेर पडायचो. रोज निदान पाच ते सहा ठिकाणची दारे ठोठवायचो. आणि रात्री तोंड पाडून परत यायचो. सहा सात महिने शोधात गेले. मग त्या मध्ये डेटा ऑपरेटरची, मार्केटिंगचीपण कामे केली... पण काही पटत नव्हतं... सोबत नेट-सेट नेटानं देत होतो. मी आता अगदी खात्रीपूर्वक सांगतो, कि माझ्या सर्व मित्रांपैकी वा ओळखीपैकी एकही जण नेट किंवा सेट पास झाला नाही कि जो ओपन मध्ये होता. आणि त्याच बरोबर एकही जण असा नव्हता जो कॅटेगरी मध्ये असून पास झाला नव्हता. पुन्हा अस्वस्थता डोकं वर काढू लागली होती. आई म्हणायची अधूनमधून होशील पास... मी बरं म्हणायचो. आई पुन्हा म्हणायची, एकदा कि नेट-सेट पास झालास कि सगळ्या अडचणी सुटतील. मी पुन्हा बरं म्हणायचो. तिला कुठे काय परिस्थितीची कल्पना होती?.... पण मी तिला काहीच म्हणायचो नाही फक्त बरं म्हणायचो.
वस्तुस्थितीची अपरिहार्यता म्हणून मग मी बीपीओची नोकरी करायचं ठरवलं, नाईट शिफ्ट. मुद्दाम. कारण दिवस मिळायचा हातात. रात्री सहा ते सकाळी साडे चार शिफ्ट असायची. दुपारी अभ्यास करायचा. आणि परत संध्याकाळी ड्युटीवर.. असं रुटीन चालू होतं. बॅकऑफिसचं काम होतं. एलएलएम झालेला मी बीपीओ मध्ये काम करत होतो. मुळात मीच कधी कोणाला काही सांगत नव्हतो कि काय करत आहे म्हणून. पण अश्या गोष्टी कितीकाळ लपवून ठेवणार? कळायचंच कोणालातरी. मग फोन यायचा. प्रश्नांची सरबत्ती व्हायची. मी छानपैकी ऐकून घ्यायचो. बीपीओ मध्येच जर काम करायचं होतं तर एलएलएम केलंस कशाला? असंही कोणी म्हणायचं. मी हसायचो आणि 'ग्रास इज ऑल्वेज ग्रीन फ्रॉम दि अदर साईड' असं इंग्लिश मधून एक वाक्य मारायचो... छानपैकी.. स्टाईल मध्ये.... आणि फोन ठेवायचो.
आयुष्याची अपरिहार्यता म्हणून मी जरी बीपीओ जॉईन केलं असलं तरी काम अगदी मनापासून करायचो. मुळात मला आवडायचं ते कल्चर. पॉश पॉश. सुंदर सुंदर मुली. वा वा च वाटायचं. मग त्या पार्ट्या, प्रोजेक्ट्स, डेडलाईन, रोजचं टार्गेट वगैरे वगैरे... छान वाटायचं. दिवसभर एका विशिष्ट माझ्या अश्या टारगेटच्या मागे धावत होतो आणि संध्याकाळी माझ्या मॅनेजरच्या. वार्या चालूच होत्या. बीपीओ सोडून लगेच एलपीओ जॉईन केलं. पगारामध्ये जरा वाढ झाली. पण साधारण काम तसंच... फक्त आता दिवसाचं ऑफिस होतं. रात्रीचं नाही. म्हणून अभ्यासाला वेळ फारसा मिळत नव्हता. मग सुट्टीला किंवा वेळात वेळ काढून करायचो अधूनमधून.
मागच्या पानावरुन पुढचं पान... पहिला दुसरा पेपर निघत होता... तिसरा पेपर माती खात होता. आता तर माझी धारणा अजून पक्की होती कि च्यायला पेपर तपासणारी लॉबीच असणारे, मुद्दाम ओपनवाल्यांना पास होऊ देत नव्हते, बहुतेक. कारण पहिला आणि दुसरा पेपर हा कॉम्प्युटरवर चेक होत होता ओएमआर शीटमुळे. त्यात मी पास होत होतो. एकदाही फेल नाही झालो आणि मार्क्स पण चांगले मिळत होते. तिथे कोणीच हस्तक्षेप करू शकत नव्हतं. पण तिसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असल्या कारणाने कोणीतरी माणूसच तपासत असणार ना. साला तो कॅटेगरीचाच असणार.
साधारण २०१२ मध्ये तिसरा पेपर सुद्धा जेंव्हा ऑब्जेक्टिव्ह झाला आणि मी त्याच वर्षी जेंव्हा पास झालो.. तिसरा पेपर.. तेही चांगल्या मार्काने तेंव्हा माझी तर धारणा पक्कीच झाली कि हे जे काही ओपन च्या कँडिडेट्स बाबत होत होतं ते खरंच होतं. भाकड कथा नव्हती. कारण जोपर्यंत कोणतातरी ह्युमन एलिमेंट इन्व्हॉल्व होता तोपर्यंत मी (नुसताच मी नाही माझ्यासारखे कितीतरी हीच तक्रार करत होते) कधीच पास नाही झालो पण जेंव्हा तिसरा पेपर ओएमआरवर आला कि लगेच मी पास झालो. हा शुद्ध योगायोग मानायचा होता मी? कदाचित दुसरा कोणी मानू शकेल पण मी कधीच मानू शकणार नाही.
आता खरी लढाई सुरु झाली. पाणी खूप गरम आहे हे वाचून त्याची कल्पना करणे आणि उकळत्या पाण्यात हात घालून त्याची खातरजमा करून घेणे ह्यात किती अंतर आहे? हे `अनुभवल्याशिवाय कळत नाही. नोकरी करत नेट पास झाला म्हणून कौतुक करणारे करत होते आणि मी अर्ज तयार करत होतो. कॉलेजेस ना देण्यासाठी....
अगदी अधाशासारखा मी जाहिरातींची वाट बघत असे. आणि जाहिरात आली कि लगेच तिथे अर्ज पाठवत असे. खोटं वाटेल... पण जम्मू काश्मीर पासून तामिळनाडूपर्यंत मी अर्ज केले होते. सोबतच्या फाईलमध्ये त्याचे पर्टिक्युलर्स सापडतील. अपॉइंटमेंट सोडा साधं कॉल लेटर पण आलं नाही. पुण्यात असलेले सर्व कॉलेजेस पालथे करून झाले. अर्ज दाखल करून घेतले जायचे आणि हसतमुखाने मला सांगितलं जायचं, 'कळवतो'... मी वाट पाहात बसायचो. कॉल यायचा नाहीच.
कधी पेपर मध्ये जाहिरात यायची अमुक तमुक कॉलेज मध्ये जागा खाली आहे म्हणून. आम्ही अगदी आवरून वगैरे जायचो. तिथे गेल्यावर कळायचं कि एक तर जागा फक्त कॅटेगरीची भरणे आहे, ओपनची ऍड अशीच दिली, कायदा आहे म्हणून. कधी कधी आधीच ठरलेलं असायचं कोणाला निवडायचंय. कधी शुद्ध सौदा झालेला असायचा. कितीतरी लाख द्या आणि सीट बुक करा. आणि वशिला तर ठरलेलाच असतो. बर्याचदा नुसता पैसा असून चालत नाही तर त्यासोबत वशिलापण लागतोच लागतो.
रेफरन्स.... वशिला...
प्रत्येक बाबतीत रेफरन्स? चांगली आरोग्यसेवा मिळवायची असेल तर घरात डॉक्टर हवा... चांगला न्याय हवा असेल तर वकील हवा... प्लम्बरचे अव्वाच्या सव्वा भाव बघितले की घरात पण कोणीतरी प्लम्बर हवा असं वाटतं.. महागणारी घरं बघितली की वाटते की घरातली सांपत्तिक स्थिती उत्तम हवी. गॅरेजवाल्यांची मनमानी लूट बघितली की वाटतं कि घरात गॅरेजवाला हवा. वशिल्याच्या मुद्दा निघाला की वाटतं की घरात एकतरी नेता हवा. पोलीस स्टेशन मध्ये सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक बघितली की वाटतं, पोलिसांमध्ये आपलं कोणीतरी असायला हवं... आणि ह्या पैकी काहीच नसलं तर ह्या सगळ्यांना पुरून उरणारी जात तर हवीच हवी.... आणि ती जात पण कॅटेगरीतलीच हवी. ओपन नको...
माझ्याकडे काय होतं? फक्त डिग्र्यान्ची भेंडोळी आणि त्यासोबत ह्या डिग्र्यांची भेंडोळी जाळून एक वेळचा चहाही नं मिळण्याची हमी, जी माझ्या आयुष्यावरच्या माझ्या दाव्याची पोकळता आणि व्यर्थता मला क्षणोक्षणी दर्शवत होती....
वाटलं होतं निदान नेट/सेट पास झाल्यावर प्रश्न मार्गी लागतील. पण च्यायला तिथेही अडवणूक. मला काही कळत नाही की सरकारच्या डोक्यात कुठल्या जातीचे कांदे बटाटे भरलेत..... खरंच कळत नाही. कॅटेगरीच्या पोस्टवर ओपनचा कँडिडेट नाही भरता येत... ओ के... मग कॅटेगरीचा कँडिडेट ओपनच्या जागी कसा भरला जातो?? का भरली जातो ? कोण त्याला परवानगी देतं? म्हणजे आयुष्यभर कॅटेगरीचे फायदे लाटायचे आणि आता नाही बाबा केटॅगरीची पोस्ट हाती लागत असं दिसलं की ओपनमधून फॉर्म भरायचा... ओपनच्या वाट्याची नोकरी लाटायची. कशी मंजुरी दिली जाते देव जाणे.. स्पर्धापरीक्षेंमध्येही हाच नियम?? आधीच एकूण जागा ११ त्यात ओपनच्या वाट्याला ३ - ४.... त्यात ही मारून ठेवलेली मेख... हा न्याय आहे??
तुम्ही एखादं ध्येय निश्चित करावं. त्यासाठीचा मार्ग निश्चित करावा. तुम्ही त्या मार्गावर चालायला सुरु करावं आणि दरवेळेस तुमची जात आडवी यावी आणि तुम्हाला काहीच नं करता यावं... ह्यासारखी दुसरी हतबलता नाही...
साला..... त्यांना सगळीकडे आरक्षण हवंय.... सगळीकडे.... शिक्षणामध्ये, न्यायालयामध्ये, संसदेमध्ये, नोकऱ्यांमध्ये.... उद्या डिफेन्समध्ये पण मागतील.... सगळीकडे आरक्षण हवंय... मग रस्त्यात का नको... तिथेपण ठेवा ना... तुमच्या आज्या-पणज्यांचे रस्ते अडवले होते ना?? मग अडवा की सगळे रस्ते... डावीकडून फक्त एस सी चालतील, नंतर एस टी नंतर व्हीजेएनटी नंतर ओ बी सी... आणि ओपन वाल्यांसाठी ठेवा एक दोरी... लोम्बकळण्यासाठी... ठेवाच तिच्या आयला... नंतर लग्नात पण ठेवा आरक्षण. ओपनच्या जेव्हढ्या मुली असतील त्यामध्ये पण ठेवा ५०% त्यांच्यासाठी. त्यांच्या आज्या-पणज्यांचा पाण्याचा हक्क हिरावून घेतला होता ना मग एक ठराव पास करा म्हणावं... आणि हेतुपुरस्सर ओपनवाल्यांच्या नळातून दूषितच पाणीपुरवठा चालू करा... कराच असा ठराव. मारून टाका सर्वांना... मारून टाका... म्हणे समानता प्रस्थापित करायचीय. घंट्याची समानता... आरक्षणाने केंव्हाच ५०% टक्क्यांची मर्यादा पार केलीये. ६१ % टक्क्यांच्याही पुढे गेलंय ते आता. ओपनवर अतिक्रमण करून समानता प्रस्थापित करायचीय म्हणे... चार वर्ष नेट/सेट ची तयार करून घासून पेपर देत होतो तरीपण पास व्हायची बोंब होत होती, त्याचवेळेस चक्क अर्धा अर्धा पेपर लिहून माझे एस सी एस टी ओ बी सी चे मित्र धडाधड पास होत होते. ते मला वाकुल्या दाखवत आहे अशी स्वप्न पडायची मला दिवसाढवळ्या... १५-२० टक्क्यांचा फरक?? तोही असले पेपर लिहून. हा फरक थोडा असतो? जात इतकी महत्वाची असते? मग त्यातल्या गुणात्मकतेचं काय? की त्याच्या वाटेला वाटाण्याच्या अक्षताच?
ह्या विचारात माझ्या कित्येक रात्री जळत होत्या..... आतापर्यन्तच्या आयुष्याचं अवलोकन होत होतं... त्याच्याच पायावर माझ्या डोळ्यासमोर माझ्या भविष्याचं चित्र रेखाटलं जात होतं... खूप भयानक होतं ते... दरदरून घाम फुटायचा मला... इतरांच्या दृष्टीनं ह्या गोष्टी साधारण असतील... माझ्यासाठी नव्हत्या...
संताप संताप व्हायचा माझा.... साला जन्म घ्यायचा एकट्याने.... मरायचं एकट्याने.... आणि जगण्यामरण्यातला हा विचित्र, जीवघेणा आणि दुर्दैवी प्रवासही एकट्याने करायचा... आणि हातात?? काहीच नाही.... असले वांझ प्रयत्न, हा असला वांझ प्रवास कि ज्यातून मला काहीच मिळणार नव्हतं किंवा मिळवायचं होतं त्याची किंमत मला परवडणारी नव्हती. खूप जिवावर आलं होतं माझ्या हे असलं जगणं जगणं..
वपु म्हणतात एक तर तुमच्यात दुसऱ्यावर जबरदस्त उपकार करण्याची क्षमता हवी अथवा जबरदस्त अपकार करायची क्षमता हवी. आणि तुमच्यात ही ताकत जेव्हढी आणि ज्या प्रमाणात असेल तेव्हढ्याच आणि तशाच प्रमाणात आयुष्य सुंदर होतं.... माझ्याकडे कोणती क्षमता होती व्यावहारिक दृष्ट्या?? ना उपकारापुरती ना अपकारापुरती....
निराशा... हतबलता... अस्वस्थता.... ह्या कधीकधी दलदलीसारख्या असतात... जेव्हढे जास्त प्रयत्न कराल, तिथून बाहेर पडायचा... तेव्हढं जास्त रुतत जातो आपण त्यात.... मी अधिकच त्यात रुतत जात होतो.... दिवसेंदिवस....
म्हणून, एके दिवशी, मी माझ्यापुढे दोनच पर्याय ठेवले. एकतर मारत सुटावं किंवा मरावं... मारावं म्हटलं तर प्रश्न पडला, कोणाकोणाला मारायचं, शक्य होतं ते मला? गांडीत दम होता माझ्या? कोणी जरा दरडावलं की माझी फाटायची... मी मारू शकणार होतो? मी दुसरा पर्याय निवडला, जो तुलनेने सोपा आणि प्रभावी होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे १००% समाधानाची हमी देणारा होता. आणि त्याचबरोबर निदान माझ्यापुरतेतरी सारे म्हणजे सारेच प्रश्न सोडवणारा होता.
डोंबिवली फास्ट मधल्या माधव शास्त्रीसारखं मोठ्या आवाजात ओरडून डिक्लरेशन द्यावं वाटत होतं सारखं सारखं भर चौकात उभं राहून...
"ड्यू टू माय ओन फिलॉसॉफी आय ऍम नॉट एलिजिबल टू लिव्ह ऑन धिस प्लॅनेट....सो प्लीज टेक अवे माय सर्व्हिसेस... " वगैरे वगैरे....
पण माझ्याकडे, त्याने मला मरण देण्यापर्यंत वाट बघण्याइतका, संयमही नव्हता. ... कसा संयम बाळगणार होतो मी. वास्तवाचे चटके सोसत सोसत मन हे धगधगणारा विस्तव होऊन बसलं होतं. माझं अख्खं आयुष्य करपत होतं... माझ्याच डोळ्यासमोर... जे हवं होतं, ते फारसं मिळत नव्हतं, आणि जे काही मिळत नव्हतं त्याचा सोस सुटत नव्हता...
...काय करू शकणार होतो मी माझ्या आयुष्यात?आई म्हणायची माझी खूप कुशाग्र बुद्धिमत्ता आहे म्हणून, जिचा प्रत्यय मला काहीच आणि कधीच आला नाही. कुठल्या प्रकारचा नवरा आणि कुठल्या प्रकारचा बाप मी माझ्या बायकोसमोर आणि मुलांसमोर उभा करणार होतो? कुठल्या प्रकारचा प्राध्यापक मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर उभा करणार होतो?
........पिचलेला?
........खचलेला?
........थकलेला?
........मेलेला?
........रोज रोज मरू पाहणारा?
........कणा नसलेला? ........
........शेपूट घालू?
........कधीही मान वर नं करणारा?
........त्यांची ती नजर मी झेलू शकलो असतो?
........ते मला मानू शकले असते?
........मीच माझ्याच नजरेत कोणी नव्हतो, तर त्यांच्या नजरेत कोण असू शकलो असतो?
........ह्या असल्या अर्थशून्य, दळभद्री आणि निराशेने ओतप्रोत भरलेल्या जगण्यात काही अर्थ होता?
मला अतिसामान्य आयुष्य जगायचं नव्हतं. आणि असामान्य आयुष्य जगायची माझी कुवत नव्हती. मी मान्य करतो.... अगदी मनापासून मान्य करतो..... की....
मी ..... असामान्य ..... आयुष्य..... जगायला..... पूर्णपणे...... नालायक..... होतो.....
असामान्य ते अतिसामान्य मधला जो "ति" आहे ना? जो तिढा आहे नां? तो सोडवायला मी असमर्थ होतो. म्हणून मी ठरवलं की ह्या असमर्थतेची शक्यताच संपवायची.
.
.
.
.
.
.
.
.
आपण आत्महत्या करायची.... आणि तीही त्याच दिवशी जेंव्हा मी ह्या जगात आलो....
(शेवटचा क्रमशः)
प्रतिक्रिया
6 Aug 2016 - 2:21 pm | सामान्य वाचक
येव्हडीच पोच
बाकी निशब्द
8 Aug 2016 - 7:33 am | नावातकायआहे
+१
6 Aug 2016 - 3:03 pm | जावई
.
6 Aug 2016 - 3:13 pm | अभ्या..
च्यायला, काहीतरी जहरी आहे.
इतकं डीप पेनेट्रेशन?
लिहा, सगळं लिहा, वाचू मग बोलू
7 Aug 2016 - 6:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
असंच म्हणतो!
6 Aug 2016 - 3:34 pm | नीलमोहर
ही व्यथा पेपरमध्ये, पुस्तकांत, इतरत्र, जिथे शक्य तिथे छापून यायला हवीय,
जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवीय, पोहोचायला हवीय एवढंच..
6 Aug 2016 - 3:41 pm | संजय पाटिल
वाचतोय...
6 Aug 2016 - 3:59 pm | लालगरूड
:-(
6 Aug 2016 - 4:05 pm | कपिलमुनी
व्यथेसाठी सहवेदना
6 Aug 2016 - 4:18 pm | नाखु
अनुभवावीन ऐसे लिखाण होणे नाही....
आतमधून आलेले.वरील एका प्रतिसादातील विचारांशी सहम्त्,लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
ता.क. खफवर (जाती विषयक)विखारी पो(ष्ट) टाकणार्या लोकांना हा धागा वाचावसा वाटला नाही (आणी अर्थात पोच द्यावी वाटली नाही) यात कुणालाच वावगे वाटणार नाही हे माहित आहे.
उघड्या आभाळाखालचा नाखु
8 Aug 2016 - 11:42 am | नाखु
शिक्का मोर्तब झाले.
ता.क. अभ्या सल्लागार झाल्याचे माहीत नव्हते.
8 Aug 2016 - 12:36 pm | अभ्या..
लोकं ऐकले तर सल्लागार, नायतर फुकट फौजदार.
6 Aug 2016 - 6:11 pm | चंपाबाई
१०००० वर्षात १०० % आरक्षण भोगणारे लोक इतराना ५० वर्ष मिळालेले ५० % आरक्षण सहन करु शकत नाहीत, हे पाहून हसू आले.
7 Aug 2016 - 10:19 am | विवेकपटाईत
पहिले हि आरक्षण होतेच. तेंव्हाही ब्राम्हण आणि क्षत्रिय यांना सुखाची झोप नव्हती. ब्राम्हणाला नौकरी मिळू शकत नव्हती. गुरुकुलात मुफ्त मध्ये शिक्षा प्रदान करावी लागायची. दिली ती दक्षिणा स्वीकारणे त्याचे भाग्य. नेहमीच तो दरिद्री राहत होता. क्षत्रियाला फक्त मारण्याची/मरण्याची नौकरी मिळायची.
7 Aug 2016 - 10:35 am | चंपाबाई
ब्राह्मणाला क्षत्रिय्की व वैश्यकी अलाउड होती.
क्षत्रियाला वैश्यकी अलाउड होती.
पण वैश्याला फक्त वैश्यकी ( किंवा शूद्रत्व) व शूद्राला शूद्रत्वच .
वरच्या वर्णाला खालचे वर्ण अलाउड होते.
7 Aug 2016 - 10:42 am | चंपाबाई
ब्राह्मणाला क्षत्रिय्की व वैश्यकी अलाउड होती.
क्षत्रियाला वैश्यकी अलाउड होती.
पण वैश्याला फक्त वैश्यकी ( किंवा शूद्रत्व) व शूद्राला शूद्रत्वच .
वरच्या वर्णाला खालचे वर्ण अलाउड होते.
7 Aug 2016 - 4:37 pm | मितभाषी
पोटातल्या पोटात जुलाब होणारा खुळखुळा.
6 Aug 2016 - 6:13 pm | चंपाबाई
जातीय आरक्षणाच्या क्वालिटीच्या नावाने कोकलणारे लोक श्रीमंतांच्या पेमेंट आरक्षणाबद्दल व त्या टक्क्यांबद्दल बोलत नाहीत, हे आणखी एक आस्चर्य !
6 Aug 2016 - 6:28 pm | चंपाबाई
उद्या डिफेन्समध्ये पण मागतील....
डिफेन्समध्ये ते स्वतः होउनच आहेत हो... महार रेजिमेंट नाव ऐकलय का ? ' तुमची ' आहे का काही रेजिमेंट वगैरे ?
6 Aug 2016 - 10:19 pm | वटवट
बहुदा मला जे म्हणायचे आहे ते तुमच्या पर्यंत पोहोचलेलं नाहीयॆ... लिखाण अजून सुधारायला हवं माझं...
6 Aug 2016 - 10:39 pm | चंपाबाई
तुम्ही आणि तुमचे जातभाई सैन्यात पोहोचा व देशसेवा करा.
तुमचे भाषण पोहोचण्यापेक्षा ते जास्त लाभदायक ठरेल नै का?
जरा अभ्यास , व्यासंग वाढवून मग लिहावं
6 Aug 2016 - 11:22 pm | वटवट
चंपाबाई.... तुमचे काही ईश्यू असतील तर लिहा की... आम्ही त्याचेपण स्वागत करूच की... कशाला रडताय? ऑं...
(ऊगाच गोष्टी ताणायच्या असतील तर बिनधास्त बसा ताणत .... मी ईथे थांबतो)
7 Aug 2016 - 5:41 pm | मितभाषी
वटवट मला तर तुम्ही ओढुन ताणून लिहिले आहे असे वाटते. मी लिहू का नको असा विचार करतोय.
7 Aug 2016 - 7:04 pm | अभ्या..
मितभाषीअण्णा, सध्या तर लेखकाची गोष्ट चालूय. जे काही लिहिलं जातय ते लेखकाचे मनोगत असे नाहीये (असे वाटतेय).
अजुनही ह्याचा शेवट किंवा ज्याला आपण निष्कर्ष म्हणू शकतो असे काही नाहीये. बघुयात. मलाही बर्याच गोष्टी पटत नाहीयेत पण मत प्रदर्शन अथवा चर्चा होण्यापूर्वी कथामाला पूर्ण होऊ द्यावी असे माझे मत.
बाकी सरजी अपनी मर्जी के मालिक तो आपही है.
7 Aug 2016 - 7:12 pm | मितभाषी
ओके. अभ्याशेठ.
7 Aug 2016 - 7:14 pm | अभ्या..
थ्यान्क्स बॉस
9 Aug 2016 - 9:08 pm | क्षमस्व
जाऊ द्या हो
काशाला बाईमाणसाच्या नादी लागतायेत!
6 Aug 2016 - 10:59 pm | कपिलमुनी
प्रयत्नसुद्धा करु नका.
चांगला लिहीत आहात
7 Aug 2016 - 12:24 am | विप्लव
मराठा रेजिमेंट बद्दल माहित असते तर असा बावळट प्रश्न विचारला नसतास. स्वताच knowledge पडताळून पहा मगच फुकट सल्ले द्या
6 Aug 2016 - 9:12 pm | चिवचिवाट
The Maratha Light Infantry (MLI; also the Ganpats) is a regiment of the Indian Army. It was formed as the 103rd Mahrattas in 1768, making it the most senior light infantry regiment of the Army.
7 Aug 2016 - 5:16 pm | नगरीनिरंजन
अरेरे! वाईट वाटलं वाचून. मुळात गरिबी असेल तर प्रगती करणे अवघड आहे हे सर्वमान्य तत्त्व आहे आपल्या देशात. म्हणून कोणतेही काम करायची तयारी हवी ओपनवाले असलो तरी. त्यात लोकसंख्येमुळे वाढती स्पर्धा. प्राध्यापकच व्हायचे असा हट्ट करुन कसे चालेल? त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे मेलेली ढोरं ओढायच्या कामातलं १००% आरक्षण उठायची चिन्हे आहेत. तिथे कार्यक्षमता सिद्ध करायला खूप वाव आहे. आरक्षणातून आलेल्यांना दाखवून देण्याची सुवर्णसंधी आहे की आरक्षण न घेणारे किती सुपिरियर काम करु शकतात त्यांच्यापेक्षा.
7 Aug 2016 - 6:27 pm | चंपाबाई
एल एल बी व एल एल एम दोन डिग्र्या ( ग्रॅजुएट व पीजी ) मिळुनही जगता आले नाही, कारण काय म्हणे ? तर अजुन एका अमक्या परिक्षेत रिजर्वेशनमुळे म्हणे याना यश मिळाले नाही! हायला, लोकं नुस्त्या दहावी बारावीवर काही ना काही करुन धडपड करुन दाखवतात.
कॅटेगरीच्या पोस्टवर ओपनचा कँडिडेट नाही भरता येत... ओ के... मग कॅटेगरीचा कँडिडेट ओपनच्या जागी कसा भरला जातो?? का भरली जातो ? कोण त्याला परवानगी देतं? म्हणजे आयुष्यभर कॅटेगरीचे फायदे लाटायचे आणि आता नाही बाबा केटॅगरीची पोस्ट हाती लागत असं दिसलं की ओपनमधून फॉर्म भरायचा... ओपनच्या वाट्याची नोकरी लाटायची. कशी मंजुरी दिली जाते देव जाणे.
जरा अभ्यास करुन लिहायचं राव ! बसमध्ये बायकाना चार बाक राखीव असतात . पण स्त्रीला त्या किंवा इतर कुठल्याही जागेवर अवेलेबिलिटी असेल तर बसता येते.. का तुमच्या म्हणण्यानुसार , बायकांना चार बाक राखीव याचा अर्थ फक्त तिथे बायकाच बसतील व उरलेल्या सगळ्या जागांवर फक्त पुरुषच बसतील?
अरारारा ! एल एल एम असून कायद्याचं बेसिक ज्ञान नाही. नेट का फेल होत होतास समजले का?
7 Aug 2016 - 6:29 pm | चंपाबाई
( वरच्या प्रतिसादातील खालचा अर्धा भाग धाग्याच्या लेखक महोदयाना उद्देशून आहे.)
8 Aug 2016 - 12:47 am | योगेश कोकरे
काही गोष्ती खटकलेत. कथेच्या शेवटी सविस्तर प्रतिक्रिया देऊ.
9 Aug 2016 - 6:55 am | रातराणी
हम्म. अस्वस्थ करणारा आहे हा भाग. पुभाप्र.
9 Aug 2016 - 7:45 am | अरुण मनोहर
लेखमाला अजून पूर्ण झाली नाही. शेवटच्या भागात काहीतरी उलटे वळण लागून संताप आणि अगतिकतेचा अतिरेक सकारात्मक दिशेला जाईल अशी अशा करतो.
आरक्षण वाईट की चांगले ह्यावर कितीही वाद घातले, तरी देखील आरक्षण पुढची हजार वर्षे तरी राहाणार आहे ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती बदलण्यासाठी सकारात्मक कार्य अशक्य असेल, निदान गप्प बसून आपलाच नाश बघावा. नाहीतर डार्विनच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून स्वतः:ची क्षमता सिद्ध करावी. रडत बसले किंवा रागाने जगावर ओरडले तर तुमचेच हसे होईल. ह्यातला जो पर्याय तुम्हाला जमेल तो निवडावा.
आरक्षण ऑर नो आरक्षण, जो सक्षम नाही, तो आज ना उद्या रसातळाला जाणारच.
- ओपनवाला.
9 Aug 2016 - 8:52 am | मराठमोळा
लिखाणशैली आणे कथा दोन्ही अप्रतिम. सगळे भाग एका बैठकीत वाचून काढले. खिळवून ठेवणारे लिखाण. एखादा अप्रतिम सिनेमा होऊ शकेल अशी कथा आणी व्हावा अशी ईच्छा. जियो. लै भारी.
सिस्टीममधे नाहक बळी जातात हे विदारक सत्य आहे आणी अशा प्रकारची victimisation कथा कोणत्याही जातीच्या किंवा जात विसरली तरी ईतर प्रकारे कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकते हेही तितकेच खरे. लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद, राष्ट्रभेद, भाषाभेद हे सगळे त्यातलेच प्रकार ईतकेच काय तर एकाच घरात्ल्या भावंडांमधे discrimination ची भावना असल्याचे पाहिले आहे. हा कदाचित मानवी स्वभाव असावा.
कधी कधी असं वाटतं की या गोष्टींविरुद्ध लढण्याऐवजी त्या सत्य आणी निरंतर आहे म्हणून खुल्या मनाने स्विकार करावा. कदाचित मग त्या अनुषंगाने घडणार्या गोष्टी सुसह्य होतील आणी ठोस मार्ग शोधता येतील.
9 Aug 2016 - 12:49 pm | मराठी कथालेखक
लेखन उत्तम आहेच त्याबद्दल वाद नाही.
आरक्षणाचं समर्थन मी करीत नाहीच (दलितांना आरक्षणाऐवजी कायद्याने नीट संरक्षण हे अधिक महत्वाचे आहे). पण तरी ओपनवाल्यांची स्थिती अगदीच वाईट आहे काही संधीच उरल्या नाहित हे मात्र अमान्य.
LL.M झालेल्या व्यक्तीस अनेक संधी असू शकतात (एलपीओ तर तुम्हीच लिहिलित) ,कोर्ट प्रॅक्टिस , खासगी कंपनीत वकील होणे , JMFC, बँकेत specialist officer ई. (मी स्वतः या क्षेत्रात नसल्याने जास्त लिहित नाही. पण आजुबाजूला अनेक ओपन कॅटेगिरीतले ,कमावते वकील पाहिले आहेत).
9 Aug 2016 - 9:21 pm | संदीप डांगे
लिखाण चांगले चाललंय..
पूर्ण करा, वेगळ्या धाग्यावर चर्चा करता येईल...
9 Aug 2016 - 11:36 pm | प्रतापराव
कसल्या भेंडीगत बुळबुळीत व्यथा सांगताय. कॉलेजातला मित्र डोक्यावर मैला वहायचा वर्गात सगळे त्याला टाळायचे मात्र तो सदा हसमुख. खाजगी कंपनित मोठ्या हुद्दयावर गेलाय.कसल openनि मागास रडत बसलात.
10 Aug 2016 - 1:59 am | ट्रेड मार्क
लिहिण्याची शैली पण इतकी छान आहे की इथल्या बऱ्याच लोकांना तुम्ही सत्यकथा लिहिताय असं वाटतंय बहुतेक.
कथा म्हणून तर छान आहेच पण सत्यकथा जरी असली तरी हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक माणूस वेगळा, त्याची वैचारिक बैठक, मानसिक शक्ती, अडचणींना सामोरं जायची ताकद वेगळी. त्यामुळे दोन वेगवेगळी माणसे एखाद्या प्रसंगात सारखीच वागतील अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. एवढंच काय तर एक माणूस एकसारख्या दोन प्रसंगात सुद्धा वेगवेगळी प्रतिक्रिया देतो.
कथेतील नायक एकतर तब्येतीने तोळामासा त्यात लहानपणापासून जर बाकीची पोरं दडपून ठेवत असतील तर त्याची आत्महत्येची कृती जरी चुकीची असली तरी... एकूण कथानायकाच्या व्यक्तिरेखेचा आणि घटनाक्रमाचा विचार करता तो आत्महत्या करू शकतो.