एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054
एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086
----------------------------
"चहा…
"……. "
"ओ साहेब…"
"………"
"साहेब चहाSSSS…" जोरात चहाचा कप वाजवत कांबळे थोडेस्से ओरडलेच.
"हंह…. हं……." पाटलांनी दचकुन वर पाहिले. तर कांबळे चहा घेऊन उभे.
"अहो काय साहेब… कित्ती वेळ?? पिंट्या येउन कधीचा गेला… चहाचं पार गोमुत्र झालंय बगा… कसल्या तंद्रीत होता?"
"अरे हां रे… ते हे…. हेच वाचत होतो… जरा…." पाटील त्या फाईल कडे बघत म्हणाले.
"काही धागादोरा सापडतोय??"
"अजून तरी काही नक्की नाहीये कळत…"
"बंर बंर…. साहेब निघू का? आज जरा घरी कामे… निघू?"
"अरे इतक्या लवकर?" असं म्हणत पाटलांनी घड्याळ बघितलं…
"अरे… खूप वेळ झाला रे…"
"होय ना साहेब… तुम्ही आपलं वाचण्यात गुंग होतात म्हणून काही बोललो नाही… पण घरून फोन येऊ लागले जरा … तेंव्हा" कांबळेंचं नुकतंच लग्न झालं होतं… त्यामुळे ओढ जरा जास्त होती.
"अहो काय कांबळे… जायचं ना… कशाची परवानगी विचारताय? आधीच पोलीसलोक कधी घरी वेळेवर जातात का? जावा… करा ऐश…" डोळे मिचकावत पाटील म्हणाले.
"काय राव.. म्हणजे तुम्ही तर ना पार… " जात जात ओशाळत कांबळे म्हणाले.
चला… निदान आज तरी घरी लवकर जाता येईल आता पुढचं घरीच वाचू.. असा विचार करत असतानाच फोन खणखणला…
"साहेब लवकर कसब्यात पोहोचा… एक अपघात झालाय… खूप गर्दी जमलीय… लवकर या" फोन ठेवला गेला.
च्यायला… आज पण झोपेची XXXXX… अशी सणसणीत शिवी हासडून पाटलांनी त्यांची हॅट उचलली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ : त्याचे घर
वातावरण सुतकीच… जराशी घरात गर्दी आहे. आतल्या खोलीत पीआय पाटील आणि त्याचे बाबा.
"काही गेलंय का घरातलं??" पाटील
"नाही ओ… काहीच नाही… सगळी सारवासारव झाल्यावर बघितलं ओ…. सगळी कपाटं झाली, पिशव्या झाल्या, सगळे कप्पे झाले बघून… एकही रुपया नाही गेलाय चोरीला"
"…. …"
"काही कळत नाहीये का मारलं…. आमच्या पोराला…" गदगदून त्याचे बाबा म्हणाले.
"त्याचं… कोणाशी…. भांडण…. व गै रे???"
"नाही ओ… कधीच नाही…. अगदी शांत आहे…. होता तो… " थोडं चुकचुकून त्याचे बाबा म्हणाले. त्याचं जाणं त्यांच्या अजून पचनी पडत नव्हतं.
"कोणाशीच नाही?"
"अहो कॉलेजातल्या पोरात जरा तश्या कुरबुरी चालतातच कि… "
"म्हणजे त्याचं भांडण झालं होतं… "
"किरकोळ झालं होतं तसं… "
"कधी?"
"बहुतेक पहिल्या वर्षी…. किरकोळच बाब होती… पण त्याने त्याच्या चुलत भावाला सोबत घेऊन ते प्रकरण मिटवलं होतं… "
"बंर… "
"तेव्हढंच …. बाकी अजिबात कोणाच्या ना अध्यात ना मध्यात असायचा तो… "
"नंतर काहीच त्रास नाही झाला त्याला?"
"नाही ओ… जर झाला असता तर कळालं असतं कि आम्हाला… "
"तो बोलायचा तुमच्याशी?"
"फारसं नाही… पण बोलायचा कधी कधी"
"काही…. अफ़ेअर…. वगैरे?"
"नाही ओ काही कल्पना नाही …. नसेलच बहुधा… त्याच्या मित्रांना विचारा… त्यांना माहिती असेल बहुतेक… "
"बर… "
"इन्स्पेक्टर साहेब…. पण इतक्या विचित्र पद्धतीने कोणी मारले असेल ओ …… माझ्या मुलाला… " अत्यंत जड आवाजात बाबा म्हणाले.
"मलाही तोच प्रश्न पडलाय… बघू…. तपासात काहीतरी निष्पन्न होईलच लवकर.… मी निघतो…" निघायच्या तयारीत पाटील म्हणाले.
"काही कळालं तर कळवा आम्हाला"
"अवश्य.."
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
"किती वर्षं झाले तुम्ही ओळखताय त्याला?" पोलिस स्टेशन मध्ये त्याच्या काही मित्रांना बोलावलं होतं. त्यापैकी एकाला पाटलांनी विचारले.
"झाले साहेब दहा अकरा वर्षं?"
"मग चांगलंच ओळखत असाल त्याला?"
"होय साहेब… अगदी सज्जन होता तो. कोणाशीच भांडण नव्हतं त्याचं…गावात जोपर्यंत होता तोपर्यंत त्याला फारसे मित्र नव्हते. आम्हीच चार पाच जण होतो. आमच्यात पण फारसा मिसळायचा नाही… पण पुण्यात पुढे शिकायला गेला आणि जरा फरक पडला बघा …. होय"
"कोणाशी भांडण ?"
"भां ड ण…. असं …. तसं … एकदा……. नाही…. काही नाही … भांडण बिन्ड्न नाही ओ" जरा चाचरतच त्याचा दुसरा मित्र बोलला…
"मग घाबरत का बोलतोयेस?"
"ना ही…"
"उगा काही लपवायच्या गोष्टी करू नका…. तुमच्याच अंगावर येतील" जरा आवाज वाढवत पाटील म्हणाले
"तसं … एकदा किरकोळ झालं होतं… "
"कसलं?"
"पेपर दाखवण्यावरून…"
"कधी?"
"काय वर्ष लक्षात नाही बघा… पण एकदा त्याच्या मागे बसणार्याला त्याने काही दाखवलं नाही म्हणून एकदा त्याने मार खालला होता…पण त्याने ते सेटल केलं होतं नंतर… "
"नंतर?"
"नंतर?"
"नंतर काही झालं का त्याचं?"
"काही कल्पना नाही बुवा… बहुतेक नसंल झालं"
"बंर…"
"साहेब त्याचा काही संबंध नसेल ओ… खूप जुनं प्रकरण होतं ते… आणि छोटं होतं…"
"बघतो मी ते… तुम्ही निघा आता… परत गरज पडली तर बोलवेन… या मग"
"साहेब एक विनंती होती…"
"काय?
"आमचं नाव कोणाला नका सांगू…. ती पोरं जरां डेंजरसेत… उगा… आमचा ताप वाढायचा… "
"त्याची काळजी नका करू… "
"निघतो… " असं म्हणून ते सगळे उठले… अबे काय गरज होती थोबाड उचकटायची, तरी बरं अजून काही पचकला नाही.. नसती डोक्याला किरकिर, असं काही तरी पुटपुटत ते निघाले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
"ऐकायला किंवा वाचायला विचित्र वाटतंय नै…"
त्याचे मित्र गेल्यावर लगेच पाटलांनी ती फाईल उघडली…
"एका बुटाचा काय संबंध नी लगेच आत्महत्येचा विचार? स्वाभाविक वाटत नसेलंच… पण कसंय आधीच न्युनगंडाने पोखरलेल्याला साधा धक्का पोहोचला तरी कोसळायला वेळ नाही लागत. आधी आम्ही तोळामासा प्रकृतीचे, त्यात ओपन… आणि मुळात मलापण हे पचले नव्हते कि एव्हढं साधं कारण आणि लगेच आत्महत्या? हाSSSSSड… असा विचार केला आणि आत्महत्येचा विचार डिलीट केला… पण त्या एका घटनेनं माझ्या मनावर एव्हढा परिणाम केला कि रस्त्याने जाताना चुकून जरी तो "सोन्या" किंवा त्याचे मित्र दिसले कि पाय लटलट कापायचे आणि एक तर मी मार्ग बदलायचो किंवा मागे फिरायचो… पण कधी कधी आमची नजरानजर व्हायचीच तेंव्हा माझी फाटल्यासारखी गत व्हायची… आणि अगदी चुकून जर ते किंवा तो माझ्याकडे बघून निर्मळ हसले तर माझा दिवस खूप चांगला जायचा. खूप हलकं वाटायचं.
अश्यात अकरावी झाली… ऐंशी का ब्याऐंशी मार्क पडले (तसे पडतातच सगळ्यांना). तसं अकरावीतच फिक्स झालं होतं कि आपण इंजिनीअर होणार… ए ग्रूप घेतला होता. बारावीत गेलो. अर्थात एनसीसी जॉईन केली नाहीच. पहिल्या वर्षाचं एनसीसीचं प्रमाणपत्रं पण नाही घेतलं… एव्हढी त्या बूट प्रकरणाने माझी मारली होती (का मी मारून घेतली होती देव जाणे). बारावी पास झालो. सत्त्याहत्तर टक्के पडले. बहुतेक आमच्याच बॅच पासून फ्री सीट वालं प्रकरण बंद झालं होतं. एव्हढ्या कमी मार्कांना सरकारी कॉलेज मिळणं शक्य नव्हतं. आणि खाजगी कॉलेजची फी परवडणारी नव्हती… जरा तणावाचे वातावरण होते.
एके दिवशी माझा अगदी जवळचा मित्र पेढे घेऊन आमच्या घरी आला… सांगलीच्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला होता, ज्याला माझ्यापेक्षा पंधरा टक्के कमी होते. तो कॅटेगरीतला होता. आम्ही सगळ्यांनी अगदी हसतमुखाने त्याचे कौतुक केले. तुझ्या प्रयत्नांचं चीज झालं वगैरे म्हणालो. त्याला शुभेच्छा दिल्या. तो गेला. त्याला त्याच्या जातीच्या हक्काची स्कॉलरशिप मिळणारंच होती. त्याच स्कॉलरशिपच्या बळावर नंतर त्याने गाडी पण घेतली म्हणे. खरे खोटे देव जाणे. दुसर्या दिवशी अजून एका मित्राबद्दल कळालं तो धनाढ्य अल्पसंख्यांक समाजाचा होता… त्याला सोलापूरच्या त्यांच्या समाजाच्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. अशा चोहीबाजुने बातम्या येत होत्या… आणि आमचं टेम्परेचर वाढत होतं…
ते दिवस माझ्या दृष्टीने खूप अस्वस्थतेचे होते. मला काही खूप मार्क वगैरे नव्हते पण माझ्यापेक्षाही कमी असलेल्यांना चांगल्या जागा मिळत होत्या. एकीकडून "साल्या…. अजून अभ्यास करायला काय झालं होतं" असं म्हणून मी मला खूप कोसत होतो आणि दुसरीकडून व्यावहारिक जगात जातीमुळे, फक्त जातीमुळे होणारी कुचंबणा टोचत होती. माझे अगदी जवळचे मित्र जेंव्हा त्यांच्या जातीचा फायदा (कि गैरफायदा?) घेत होते. आणि मनापासून मी त्यांच्यापासून, माझी इच्छा नसताना लांब जात होतो… त्यापैकी जवळपास बरेचजण आज खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत. पण नंतर आमचा संबंध जवळपास संपल्यातच जमा झाला. 'ह्या जगात एकंच गोष्ट चिरंतन आहे ती म्हणजे जात' ह्या समीकरणाशी माझी जरा तोंड ओळख होत होती. माझे चांगले मित्र ह्या जातीमुळे माझ्यापासून दुरावत होते.
.
.
मी अजून कुठेच प्रवेश घेतला नव्हता. घरात निवांत बसून होतो. पैसे भरून कुठल्यातरी इंजिनिअरींगच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाही असता, कर्ज काढून. पण त्याचवेळेस एकीकडून घराची साधारण परिस्थिती दिसत होती. आई-बाबांची अस्वस्थता दिसत होती. माझ्या नाजूक प्रकृती आणि प्रवृत्तीबद्दल आईची काळजी दिसत होती.….
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि ह्या सर्वांवर थयाथया नाचणारी माझी जात दिसत पण होती आणि डसत पण होती…!!!
क्रमशः
प्रतिक्रिया
24 May 2016 - 6:03 pm | संजय पाटिल
ओपन व्यथा!!
आत्ता शिर्षकाचा अर्थ कळला..
25 May 2016 - 4:01 pm | मराठी कथालेखक
+१
24 May 2016 - 6:15 pm | एस
ओक्के.
24 May 2016 - 6:32 pm | अभ्या..
चैला मला पहिल्या भागापासूनच वाटत होते. टक्का कसा आला नाही.
आता आला. ओके.
24 May 2016 - 7:28 pm | सूड
ओके आता लिंक लागतेय. वाचतोय.
25 May 2016 - 9:49 am | वटवट
सर्वान्चा आभारी आहे...
7 Jun 2016 - 4:22 pm | मराठी कथालेखक
पुढिल भाग कधी टाकताय ?
9 Jun 2016 - 10:24 am | राजाभाउ
ओके. आत्ता कळाले. वाचतोय. पु.भा.प्र.
9 Jun 2016 - 12:19 pm | मराठी कथालेखक
व्यथेची कथा पुर्ण करा हो :)
9 Jun 2016 - 12:34 pm | वटवट
होत असलेल्या दिरंगाईची मनापासून माफी मागतो. तिसरा भाग टाकल्यावर लगेच माझी परीक्षा सुरु झाली. सध्या गावाकडे आलो आहे. इंटरनेट एव्हढे चांगले नाही म्हणून वेळ लागत आहे.मोबाइलवरून टाईप होण्यात खूप अडचणी आहेत.तरी लवकरंच टाकतो…