सद्भावना - हराभरा भारत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
20 Jun 2016 - 11:14 am

लोकसत्तामधे प्रकाशित झालेला माझा एक लेख
इंग्रजीतही या व्यक्तीबद्दल लिहिलं आणि नुकतंच ते द बेटर इंडिया नावाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालं

वृक्षसंवर्धनाचं कार्य करणार्‍या एका संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. तसं व्यापांमुळे फार योगदान देता येत नाही पण जी खरोखर मनोभावे हे काम करतायत, ज्यांनी हा वसा खर्‍या अर्थाने घेतलाय त्यांचा परिचय मात्र होतो. अशाच एका व्यक्तीबद्दल कळल्यावर त्याच्याशी फोनवरून संवाद साधला, आणि त्याची माहिती अनेकांसमोर आणण्याचा प्रांजळ प्रयत्न केला.

एक सामान्य माणूस, एक साधा पण अतिशय महत्त्वाचा विचार आपले ध्येय बनवून यथाशक्ती प्रयत्नांना सुरुवात करतो आणि मागे हटायचे नाही हा निर्धार करून वाटचाल करू लागतो. वागळे इस्टेट येथे राहणारे पुरुषोत्तमदास गुप्ता त्यापैकी एक. चरितार्थासाठी ते रिक्षा चालवितात. मात्र त्या जोडीनेच परिसरातील वृक्षसंपदा वाचविण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. ‘सद्भावना- हराभरा भारत’ असे त्यांच्या या उपक्रमाचे नाव आहे..

जानेवारी महिन्यात रस्ता रुंदीकरणावेळी झाडे तोडल्यावर आणि महापालिकेचे झाडांच्या पुनर्वसनाबद्दलचे धोरण असमाधानकारक वाटल्यावर गुप्तांनी परिस्थिती बदलण्याचे आव्हान स्वीकारले. दररोज रिक्षातून १५ लिटर पाणी घेऊन ते घराबाहेर पडू लागले व रस्त्याकाठच्या झाडांना पाणी घालायचे काम करू लागले. ‘ये पेड जो हमें छांव देते है इनको हमें बचाना चाहिये, और हमारे गली मोहल्ले देश को हराभरा रखना चाहिये,’ असे म्हणणाऱ्या पुरुषोत्तमदास गुप्तांना यासाठी त्यांच्या एकटय़ाचे प्रयत्न अर्थातच थिटे वाटू लागले.

त्यांनी इतर रिक्षाचालकांना या मोहिमेविषयी सांगितले. त्यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी ते प्रयत्न करू लागले. लोकांना एकत्र आणायचं असेल तर फक्त बोलाचालीने काही होत नाही, हे समजून त्यांनी त्यांच्या या उपक्रमाला ‘सद्भावना- हराभरा भारत’ असे नाव दिले. अभियानाचे हे शीर्षक असलेलं एक रजिस्टर त्यांच्या रिक्षातून त्यांच्याबरोबर जाऊ लागलं. हळूहळू नावांची यादी वाढू लागली. काही रिक्षाचालकांनी त्यांचे अनुकरण केले. इतर नागरिकांनीही त्यांना साथ दिली. रजिस्ट्ररमध्ये त्यांच्या नावांची नोंदणी होऊ लागली.

अनेकदा त्यांचा हिरमोड, अपेक्षाभंग झाला. मात्र ते निराश झाले नाहीत. सध्या त्यांच्या रजिस्टरमध्ये पन्नासहून अधिक नावे आहेत. त्यांनी एक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपही तयार केलेला आहे. त्यावर ते वृक्षारोपणाच्या योजना मांडतात. परंतु अशाच योजना जेव्हा त्यांनी केल्या तेव्हा प्रत्यक्ष रोप लागवडीच्या वेळी एक-दोनच माणसे होती. तरीही हार न मानता त्यांची ही हरित चळवळ सुरूच आहे आणि राहील असे ते म्हणतात.

a

त्यांची पत्नी, मुले या सगळ्यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. मार्च महिन्यात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांनी परिवारासहित उपवन तलावाच्या परिसरात दोन झाडं लावून साजरा केला. ‘सद्भावना- हराभरा भारत’च्या सदस्यांनाही ते हे आवाहन करतात की, आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस झाडं लावून साजरे करा.

नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त ५ ते ११ जूनदरम्यान त्यांनी रस्त्याच्या कडेला ५० झाडे लावली. महापालिकेकडून त्यांनी ती रोपे आणली. नीट खड्डे खणून रोपे लावली. त्यांची नीट वाढ व्हावी म्हणून माती आणि खत टाकले.

‘पेड लगाना ये आधा काम हुआ. उनको पानी मिलना बहुत जरुरी है. मैं रोज १५ लिटर पानी पेडोंको देता हूं. पर ये करनेवाले ज्यादा से ज्यादा लोग अगर मिले तो शहर जल्दी और बेहतर हराभरा हो सकता है. मैंने लोगों में ये सोच जगानेकी कोशिश की, के यदि आप मॉर्निग वॉक के समय अपने साथ अपनी सुविधानुसार पानी ला कर नियमित रूप से कुछ पौधोंको देकर उनका जीवन बचाए, तो अपना और अपने बच्चोंका भविष्य उज्ज्वल बना सकते है,’ असे ते म्हणतात.

aa

पुरुषोत्तमदास गुप्ता हे कुणी पोटापाण्याची भ्रांत सुटलेले पेन्शनर नाहीत. कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांना दररोज रिक्षा चालवावी लागते. ‘सद्भावना- हराभरा भारत’ हीसुद्धा कुठलीही एनजीओ नाही की ज्यात बक्कळ पैसेवाले लोक गाडय़ा-घोडय़ातून, भरजरी कपडे घालून ‘चॅरिटी’ करायला येतात. मात्र पुरुषोत्तमदास गुप्ता आणि त्यांचा विचार हा एखाद्या छोटय़ाशा रोपटय़ाप्रमाणे निर्मळ आहे. त्याचा वृक्ष व्हावा ही त्यांची इच्छा आहे. त्यांची रिक्षा त्यांच्या ध्येयाच्या दिशेने सुटलेली आहे.

समाजजीवनमानसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनलेख

प्रतिक्रिया

गंम्बा's picture

20 Jun 2016 - 11:58 am | गंम्बा

मस्त वाटले वाचुन

मंजूताई's picture

20 Jun 2016 - 12:19 pm | मंजूताई

ओळख आवडली! शुभेच्छा!

पद्मावति's picture

20 Jun 2016 - 1:30 pm | पद्मावति

खूप छान.

अभिजीत अवलिया's picture

21 Jun 2016 - 10:21 am | अभिजीत अवलिया

छान ...

वेल्लाभट's picture

21 Jun 2016 - 10:32 am | वेल्लाभट

सर्वांचे आभार :)

अद्द्या's picture

21 Jun 2016 - 10:34 am | अद्द्या

छान उपक्रम :)

नाखु's picture

21 Jun 2016 - 11:05 am | नाखु

उद्याच्या सावली साठी आज उन्हात निसर्ग जाग्वणारा माणुस.

वेल्ला ड्न खुप शुभेच्छा

प्रीत-मोहर's picture

21 Jun 2016 - 11:06 am | प्रीत-मोहर

मस्त उपक्रम आहे. लाज वाटते अस काही करता येणं शक्य असुनही न करत अस्ल्याचा. पण सध्या तरी आम्ही घरात कसलाही कर्यक्रम झाल्यास रिटर्न गिफ्ट म्हणुन झाडे देणे हे सुरु केलेय. दरवर्षी घरी झाडे लावुन ती जगविण्याचा प्रयत्न सुरु आहे. ( गोव्यात असुनही आमच्या भागात उन्हाळ्यात पाण्याचा फार त्रास होतो. इतर लोक्स आमच्या घरुन पाणी नेतात वगैरे. त्यामुळे..)

शान्तिप्रिय's picture

21 Jun 2016 - 12:27 pm | शान्तिप्रिय

वेल्लाभट जी, एक सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
एन जी ओ वाले लोक सुद्धा माणसेच असतात. काहि एन जी ओ वाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असतील पण त्यामुळे तसा सरसकट शिक्का सर्व सेवाभावी संस्थांना लावणे उचित नव्हे!

वेल्लाभट's picture

21 Jun 2016 - 3:40 pm | वेल्लाभट

बाय अँड लार्ज असंच दिसतं पण. माणूस वाईट आहे. माझा एक जुना सहकर्मचारी जो आता अतिशय उच्च पदावर कामाला आहे तो मला काही दिवसांपूर्वी विचारता झाला की ट्रस्ट फॉर्मेशन ची प्रक्रिया काय असते, किंवा काय काय लागतं इत्यादी. सविस्तर बोललो तेंव्हा त्याच्या तोंडून हे वाक्य आलं, की 'रिटायरमेंटके बादका प्लॅनिंग करना चाहिये ना! हा हा हा' आणि तोवर त्याने सांगितलेलं आम्ही यांव करू आम्ही त्यांव करू हे सगळं मातीमोल झालं.

त्यामुळे वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींवरून केलेलं ते विधान आहे.

अभ्या..'s picture

21 Jun 2016 - 2:54 pm | अभ्या..

उपक्रम चांगलाय. हेतूही चांगलाय.

फक्त गुप्तासाहेब मुंबईत रिक्षा चालवतेत तेंव्हा मराठी मस्ट ना?

वेल्लाभट's picture

21 Jun 2016 - 3:36 pm | वेल्लाभट

बोलतात थोडं थोडं, शिकायचा प्रयत्न चालू आहे म्हणतात.
त्याबद्दल सुचवलेलं आहे त्यांना.

अभिरुप's picture

21 Jun 2016 - 5:48 pm | अभिरुप

सलाम आपल्या कार्यास

विवेकपटाईत's picture

21 Jun 2016 - 7:17 pm | विवेकपटाईत

आवडले.

प्रमोद देर्देकर's picture

22 Jun 2016 - 1:36 pm | प्रमोद देर्देकर

वॉव अजुन एक मस्त लेख.