असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥
त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥
मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥
दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥
आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥
दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥
स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखविती त्रिपुरारी॥
विसरूनि सारी भवचिंता निश्चिंत बैसले सदाशिव। नर्मम ददाति तू नर्मदे सदासर्वदा सुखी भव॥
आशिर्वचन दिलेत देवा हसून बोले शर्वरी। नंदिकेश्वर म्हणे देवा चला आता कैलासपुरी॥
उष्णप्रदेशी जन्मलेली ही मम कन्या कैसी ते हिम सहन करी। कुणा हाती सोपवू मी कोमलांगी ही माझी कुमारी॥
मेकलराज उभा रहिला हात जोडोनी सामोरी। संधी द्यावी मला दयाळा मनिषा आपुली करीन पुरी॥
संतोषले परमेश्वर या आश्वासनांतरी। सोपवुनी आपुली कन्या मेकलराजाचे करी॥
निर्धास्त झाले शिवपार्वती निघाले माघारी। देवाधिदेव संतोषले उजळली कैलासपुरी॥
मेकलसुता आता जाहली शिवक्न्या सुंदरी। विंध्य सातपुडा दोन बंधू सुखावले बहु अंतरी॥
चुलबुली आणि अवखळ होती म्हणून रेवा म्हणती सारी। बाललिला पाहत तियेच्या आनंदीत सारी मेकल नगरी॥
दिवस चालले आनंदाने मोठी झाली स्वरुपसुंदरी। विवाह आता हिचा करावा मेकलराज मनी विचार करी॥
योग्य वराचा शोध घेतसे भारतवर्षा माझारी। राजबिंडा शोण नृप तो राज्य करीतसे शेजारी॥
सर्वार्थाने योग्य असे हा विचार आला नृपांतरी। प्रस्ताव पाठवी मेकलराज शोणनृपाच्या दरबारी॥
निर्मल सुंदर मम कन्येचा स्वीकार करावा राजेश्वरी। किर्ति ऐकूनि नर्मदेची शोण तिचा स्वीकार करी॥
कैसा असेल राजपुत्र कोण सांगेल कोण योग्य वर्णन करी। जुहिला प्रिय सखे पाहुन येई कैसा असे मम सख्या हरी॥
सजली धजली जुहिला नर्मदेसम पोषाख करी। पायीची नुपुरे झंकारीत ठुमकत जातसे बाहेरी॥
पुर्वदिशेला वसली होती निसर्गरम्य शोणपुरी। वर्तमान जाणून घेण्या शोणनृपाचे आली जुहिला सेवेकरी॥
नटली सजली जुहिला देखून स्तब्द जाहला शोणसखा। स्वर्गीची वाटे अप्सरा मोहितसे मम चित्ता॥
राजबिंड्या शोणास पाहुनि जुहिला मनी हरखली। मदनबाणे विद्ध होऊनि कर्तव्य आपुले विसरली॥
येई गे सुंदरी मम चित्तचकोरी शोणराजा हर्षला। मी नसे आपुली वधू असे न बोले ती जुहिला॥
गैरसमजुतिने पार पडला भव्य लग्न सोहळा। विसरुनि कर्तव्य आपुले रमली राणी ती जुहिला॥
बहुत दिन जाहले काहीच न कळे वार्ता। चिंतीत होऊनि स्वतः निघाली मग ती शिवसुता॥
दुरुनच दिसला दिपोत्सव आसमंत सजला धजला। स्वागतास आपुल्या नगरी सजली मनी हरखली शिवबाला॥
समीप जाता तिने देखिला दरबार तो भरलेला। सिंहासनी बैसले होते शोणनृप अन राणी जुहिला॥
ह्रुदयभेदक दृश्य पाहुनि क्रोधित झाली नर्मदा। नर्मम ददाति ब्रीद आपुले विसरुनि होई ती कृता॥
अगे पापिणी मम दासी तू काय म्हणू मी तुला। कृतघ्न कामिनी आज शापिते बघ मी तुला॥
जलरुप व्हा याच क्षणी दोघे लागा पतीत प्रवाहाला। थांब जुहिले!दुर्गंधीत होईल पाणी कुणी न स्पर्शी तव जला॥
मी ही होते जलरुप अन जाते स्वदेश काजा। संतापाने गर्कन फिरली रेवा निघाली अस्ताचला॥
सुन्न होऊनि दुःखीत मने शोणप्रवाह पडला । उंचावरुनि उडी घेऊनि पुर्वेकडे निघाला॥
जुहिलेचा प्रवाह राहिला त्याच ठिकाणी स्तब्दसा। मेकलतली आजही आहे वाहता तो कसानुस॥
नर्मदा मग जलरुप जाहली ज्या स्थला। माईकी बगिया म्हणती आज त्या वनस्थला॥
दुःखीत रेवा विव्हल होऊनि गुप्त होतसे भूमित। मेकलराजाही झाला किंकर्तव्यमूढ अन दुःखीत॥
भूमिगत राहुनि नर्मदा करीतसे तपस्या। दिन महिने साल बारा पुरी झाली तपस्या॥
प्रसन्न झाले महादेव सांग म्हणाले मनी आहे काय तुझ्या। आपुली मी तनया पण काय नशिबी हे माझ्या॥
जनहितार्थ जन्म तुझा सुरसे शीघ्रही कार्यारंभ करी। महानद असशी तू जल आता प्रवाहीत करी॥
आज्ञा प्रमाण पिताश्री धेय्य माझे मज कळले। कैक जन्मांचे पुण्य माझे या जन्मी फळले ॥
अमरकंटक राजधानी पर्वतमाथ्यावर वसली। रम्य वने-उपवने असे बहु ही सजली॥
मेकलराजा करी तयारी नर्मदावतरणाची। सुंदर कुण्ड बांधविले शोभा तिथे गोमुखाची॥
शिवस्मरण करुनि रेवा गोमुखाने कुण्डांतरी प्रवेशली। सुंदर स्वच्छ नीलजल रुपे प्रवाहीत ती झाली॥
निघाली ती सुरसरिता लोककाजा कारणे। खळ्खळ अवखळ नाचत निघाली पश्चिमेकडे॥
सुंदर घनदाट उपवनी बसले होते कपीलमुनि। तृषा त्यांची शांतविण्या वेगे तिने घेतली उडी॥
कपीलमुनि नम्रतेने करीते झाले अभिवादना। स्विकारुनि ते नम्रपणे पुढे निघाली पावना॥
घोर तपस्या त्या अरण्यी करीत होते दुर्वासमुनि। पुढे निघाली जलदुग्ध द्वारे क्षुधा त्यांची शांतवुनि॥
घोर काननी प्रवेशली मग आनंदे तमसा। लोकक्ल्याणास्तव प्रवास करीतसे विपाशा॥
मार्गी मग तिला मिळाल्या कपिला अन करगंगा। करंज वृक्षराजी मधूनि गळा पडतसे कोमल कण्वा॥
तुडारमैय्या सवे घेऊनि चालली अमलडेह मागे टाकुनी। रुषाही पडले मागे गोरखपुरास मिळे सिवनी॥
अगणित गांवे अगणित नगरे पर्वत अन घनदाट जंगले। फुलती उपवने फळती झाडे सुंदर पक्षीगण गात गान मंगले॥
सुभिक्षीत करत चालली आनंदीत ती धरणी।पतीतपावन जिची जलधरा तीच असे तीर्थजननी॥
मार्कंडेय भृगु वशिष्ठ कर्दम शौनकादि। नारद पिप्पलाद सनतकुमार नाचिकेत सनकादि॥
सर्वदेव मुनि मनुज वंद्या ही मानिनी। हर्म्यदा ही शर्मदा ही दिव्य वरदायिनी॥
जलचर नभचर अगणित ते सुंदर पक्षीगण। सुखे राहती मत्स्य कच्छ तसेच अगणित मीन॥
भारहारिणी सुखदायिनी माता तीर्थशिरोमणी। भववारिधी भयहारिणी माता पतीतपावनी॥
सत्य त्रेता द्वापार युगी होता मोठा सन्मान। नतद्रष्ट या कलियुगी मात्र सदा होतो अपमान॥
तरिही तुझे प्रेम माते लाभते सर्वा समान। नमस्ते नमस्ते मैय्या तव चरणी सदा प्रणाम॥
अमरकंटक नेमावर शूल्पाणि। बांदराभान गोराग्राम जमदग्नि॥
इंद्रवरण तपोवन अन बुधनी। भाखा कवांट तसेच कडीपाणी॥
असा चालला प्रवास शिवकन्येचा। पुर्वपश्चिम प्रवाहीत दक्षिणोत्तर तीरांचा॥
समय आला आता जीवन सांगतेचा। समोर होता रत्नसागर सुंदर तो साचा॥
दर्शनांतरी मैय्या स्तब्द झाली क्षणभरी। नतमस्तक होऊनि उभी राहिली विमलेश्वरी॥
विनम्र अभिवादन करुनि म्हणे पित्याला। सफल झाले मम जीवन आज्ञा द्यावी आता मला।\
नर्मदे तू महाभागा सर्वपापहरी भव। तव जलांतरीच्या शिला सर्व होतील शिव॥
वंदन करुन पित्याला रेवा पुढे सरकली। रत्नसागरामध्ये मग ती सामावली॥
नर्मदे हर!नर्मदे हर हर!! नर्मदे हर हर हर!!!
प्रतिक्रिया
14 Jun 2016 - 12:34 am | कवितानागेश
सुंदर लिहिलंय.
फार दिवसांनी दिसलात खुशीताई. :)
14 Jun 2016 - 12:45 pm | खुशि
नर्मदे हर!तिसरी पायी नर्मदा परिक्रमा मैय्या कृपेने पुर्ण झाली.त्यामुळे नव्हते इतके दिवस.
14 Jun 2016 - 2:13 am | अर्धवटराव
छान.
14 Jun 2016 - 12:46 pm | खुशि
धन्यवाद.
14 Jun 2016 - 8:42 am | कंजूस
नर्मदाप्रेमाचा परिपाक कविता रूपाने अवतरला.
मागचे ४५ भाग वाचले आहेत.सर्वच छान.
आतापर्यंत वाचलेल्या नर्मदापरिसर वर्णनांत उत्कृष्ट.
14 Jun 2016 - 12:47 pm | खुशि
धन्यवाद
14 Jun 2016 - 12:27 pm | सस्नेह
नर्मदाख्यान सुंदर !
हे आख्यान तुम्ही रचले आहे काय, खुशिताई ?
14 Jun 2016 - 12:50 pm | खुशि
नर्मदे हर!तिसरी परिक्रमा करताना चालत असताना सुचत गेले तसे लिहीत गेले.ही लोककथा आहे प्रचलीत मध्यप्रदेशात.
14 Jun 2016 - 12:32 pm | यशोधरा
सुरेख!
तुम्ही लिहिलेय हे खुशीताई? फार आवडले :)
14 Jun 2016 - 12:53 pm | खुशि
नर्मदे हर! हो मीच लिहिले आहे,तिसरी पायी परिक्रमा करत असताना सुचत गेले तसे लिहीत गेले.ही लोककथा प्रचलीत आहे मध्यप्रदेशात.
14 Jun 2016 - 6:19 pm | यशोधरा
नर्मदे हर, खुशीताई, खूप सुंदर लिहिलेत.
नर्मदामाईचा प्रसादच झाला की तुमच्यासाठी.
15 Jun 2016 - 12:07 pm | खुशि
नर्मदे हर यशोधरा,खरच प्रसाद मिळाला आहे मला.
14 Jun 2016 - 1:00 pm | पद्मावति
आहा!!!
खूप सुरेख. प्रसन्न वाटलं वाचून.
15 Jun 2016 - 12:09 pm | खुशि
नर्मदे हर पद्मावती,धन्यावाद.
14 Jun 2016 - 5:16 pm | बोका-ए-आझम
तुमच्या विनोबा एक्सप्रेस असं तुम्हीच नाव दिलेल्या पहिल्या परिक्रमेबद्दल इथे मिपावरच वाचलंय. त्यानंतर काही कामानिमित्त भरुचला नर्मदेच्या तीरावरच राहायचा योग आला आणि नर्मदेची ओढ जाणवली. आता आयुष्यात कधीतरी नर्मदा परिक्रमा करायचीच हे ठरवलेलं आहे. नर्मदे हर!
15 Jun 2016 - 12:04 pm | खुशि
नर्मदे हर. विचार केला आहेत परिक्रमा करण्याचा याचा अर्थ मैय्याने बोलावले आहे आपल्याला लवकरच योग येणार परिक्रमेसाठी प्रस्थान करण्याचा.
14 Jun 2016 - 6:01 pm | जेपी
पुर्वी तुमचे लेख वाचले होते..
आयुष्यात कधी जमले तर परिक्रमा करायचा मानस आहे..
लेख आवडला..
15 Jun 2016 - 11:59 am | खुशि
नर्मदे हर. धन्यवाद टोनी.मनात विचार आला परिक्रमा करण्याचा मग समजा आपल्याला बोलावले आहे मैय्याने.नक्की लवकरच योग येईल परिक्रमा करण्याचा.
15 Jun 2016 - 8:27 am | विवेकपटाईत
कथा ऐकली होती, काव्य रूपाने वाचताना अजूनही आवडली. वाचता वाचता दांडेकरांची नर्मदा परिक्रमा आठवली.
15 Jun 2016 - 11:56 am | खुशि
नर्मदे हर धन्यवाद विवेक.
15 Jun 2016 - 12:05 pm | परिंदा
खुशिताई, तुमच्या पहिल्या परिक्रमेवरचे लेख वाचले होते.
त्यावर तुम्ही दोन परिक्रमा केल्यात हे माहितीच नव्हते.
तुम्ही खरंच ग्रेट आहात!__/\__
तुमच्या तिन्ही परिक्रमातल्या खास अनुभवांविषयी पुन्हा एकदा लिहावेत, अशी विनंती करतो
16 Jun 2016 - 6:15 pm | खुशि
लिहायचा विचार करते आहे.काही लिहिले आहे पण ते हिंदीत आहे लिहू?
15 Jun 2016 - 12:24 pm | स्पा
तुम्ही परत एकदा लेखमाला लिहा कि
16 Jun 2016 - 6:16 pm | खुशि
हिंदीत लिहू?
16 Jun 2016 - 11:55 am | जव्हेरगंज
नर्मदे हर!
_/\_
16 Jun 2016 - 6:17 pm | खुशि
नर्मदे हर.
17 Jun 2016 - 5:08 pm | मूकवाचक
_/\_
17 Jun 2016 - 6:07 pm | पैसा
खूपच सुरेख! मनापासून लिहिलेले अगदी नर्मदेच्या प्रवाहासारखे ओघवते काव्य!
22 Jun 2016 - 3:35 pm | सविता००१
फार फार सुंदर लिहिलंय हो..
22 Jun 2016 - 3:46 pm | गणामास्तर
नर्मदे हर!
22 Jun 2016 - 4:59 pm | मितभाषी
!! नर्मदे हर !!
छानच. आवडले.
22 Jun 2016 - 8:29 pm | चंपाबाई
( शंका .. नर्मदेचे लग्न जर अखेर समुद्राबरोबर होणार होते , तर मैत्रिणीचे लग्न शोणाबरोबर झाल्यावर ती का चिडली ?)
1 Jul 2016 - 2:30 pm | खुशि
लग्न मोडले तेव्हा ती तशी लहान होती जग पाहिले नव्हते तिने.
1 Jul 2016 - 3:11 pm | चंपाबाई
स्वतःचा नव्रा पहायलाही मैत्रिणीला पाठवायचं ?
या अध्यात्मिकलोकांच्चं काय समजतच नाही. स्वतःही संसार करत नाहीत , इतरानाही करु देत नाहीत.
असो.