उड़ जाएगा हंस अकेला।
जग दर्शन का मेला ।। धृ ।।
जैसे पात गिरे तरुवर के ।
मिलना बहुत दुहेला ।
ना जानू किधर गिरेगा ।
लग्या पवन का रेला ।। 1 ।।
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
जम के दूत बड़े मजबूत ।
जम से पड़ा झमेला ।।2 ।।
दास कबीर हर के गुण गावे ।
वा हर को पार न पावे ।
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।। 3 ।।
- तसं समजायला सोपं असं हे निर्गुणी भजन.
आत्म्याला पक्ष्याची आणि देहाला पिंजऱ्याची उपमा अनेक काव्यातून दिसते. कबीरांनीही पक्ष्याची उपमा दिली आहे. मग ते हंसच का म्हणाले असावेत? हंसचं उलट केलं की सहं (अपभ्रंशाने सो$हं) होतं. आपल्या श्वासांतूनही हां सो$हं नाद अखंड चालू असतो (ध्यान देऊन ऐकावा लागतो मात्र). श्वास चालू असणं म्हणजेच पक्षी अजून पिंजऱ्यात असणं. श्वास थांबले म्हणजेच हंस उडून गेला.
जगात शाश्वत अशी एकच गोष्ट, मृत्यू !
अनेक संतांनी या मृत्यूचे स्मरण ठेवीत सत्कर्म करण्यासाठी सामान्य लोकांना उद्युक्त केलं.
'मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीसि सादर व्हावे ।'
कबीरही हंसाच्या उपमेतून हेच सांगतात.
जग दर्शन का मेला - हे जग एखाद्या मेळ्यासारखं आहे. मेळ्यात आपण गेलो म्हणजे घरी परत जायचं आहे ही गोष्ट आपल्या मनात पक्की असते. मेळ्यातच आपण राहणार नाही आहोत याची खात्रीच असते.
आत्मारूपी हंसाचेही तसेच!
मृत्यू कसा अटळ आहे? तर झाडाची पाने एकदा का पडून गेली की ती पुन्हा झाडाला लागणे अशक्य! तसाच मृत्यू अटळ आहे.
यातला दुसरा अर्थ जो मला जाणवला तो असा की
समजा एका झाडावरची दोन पाने आहेत, त्यातले एक जरी पडून गेले तरी त्या दोन पानांची पुन्हा भेट होणे अशक्य! कारण सोसाट्याचा वारा वाहतोय. झाडापासून तुटलेले पान उडून जाणार.
आपल्याला मृत्यू कधीही येऊ शकतो आणि आला की पुन्हा कुणालाच भेटणे शक्य नाही. त्यामुळे अकारण कुणाचा द्वेष न करता आनंदात राहावे असेही कदाचित कबीरांना सुचवायचे असेल.
वेळ आली की कुणीच इथे थांबू शकत नाही. सगळ्यांना जावंच लागणार. जेवढं आयुष्य खात्यावर जमा आहे तेवढं भोगलं की 'आलं बोलावणं'. यमाचे दूत आलेच न्यायला. ते फार मजबूत आहेत, त्यांच्या हातून सुटका नाही, कुणाचीही नाही.
सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ॥
अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें । (म्हणियारे- दूत)
नेऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥
किंवा-
मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥
- दासबोध.
मृत्यू कधी येणार ह्याची कल्पना नसल्याने ईश्वरचिंतनात काळ व्यतीत करणे उत्तम हे सांगताना कबीर म्हणतात की, "हा दास शिवाचे गुण गातो. परंतु शिवाचं माहात्म्य समजणे त्याला शक्य नाही".
यातून अजून एक छुपा संदेश कबीर देतात असे मला वाटते. आपल्याजवळ जे आहे त्याचा गर्व नसावा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे नको. सर्वसत्ताधीश ईश्वर आहे हे जाणून असावे.
हे सांगून पुढे "यथेच्छसि तथा कुरु" असेच जणू ते म्हणतात.
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला ।।
कर्माची गती गुरूलाही चुकणार नाही आणि शिष्यालाही नाही! करम की गति न्यारी !!
विचार करु तितकं अजून आत घुसत जाणारं हे भजन ! कुमारांनी ते गायलंय ही असं की शब्द(त्याचे अर्थ), सूर (त्यांचं व्याकरण) यांच्याही पलीकडे मन पोहोचतं...त्या क्षणापुरते का होई ना पण सगळ्या हेव्यादाव्यांतून, अकारण क्रोधातून, चिंतेतून आपण मोकळे होतो.
-चैतन्य
प्रतिक्रिया
26 Apr 2016 - 4:32 pm | विजय पुरोहित
अतिशय मधुर चाल असलेलं हे भजन आहे तितकंच अर्थपूर्ण!
यातील:
जब होवे उमर पूरी ।
जब छूटेगा हुकुम हुजूरी ।
हे तर अतिशय क्लासच!!!
हे जग एखाद्या मेळ्यासारखं आहे. मेळ्यात आपण गेलो म्हणजे घरी परत जायचं आहे ही गोष्ट आपल्या मनात पक्की असते. हे वाक्य विशेष आवडले.
सुंदर विवेचन!!!
26 Apr 2016 - 4:35 pm | विजय पुरोहित
आत्म्याला पक्ष्याची आणि देहाला पिंजऱ्याची उपमा अनेक काव्यातून दिसते. कबीरांनीही पक्ष्याची उपमा दिली आहे. मग ते हंसच का म्हणाले असावेत? हंसचं उलट केलं की सहं (अपभ्रंशाने सो$हं) होतं.
हे पण स्पष्टीकरण अतिशय भावले. वर नमूद करायला विसरलो होतो.
26 Apr 2016 - 4:36 pm | पैसा
सुंदर लिहिलंय
26 Apr 2016 - 4:47 pm | पेशवा भट
आवडलं.
26 Apr 2016 - 4:50 pm | mugdhagode
छान
26 Apr 2016 - 4:54 pm | नीलमोहर
'हंसचं उलट केलं की सहं (अपभ्रंशाने सो$हं) होतं. आपल्या श्वासांतूनही हां सो$हं नाद अखंड चालू असतो (ध्यान देऊन ऐकावा लागतो मात्र). श्वास चालू असणं म्हणजेच पक्षी अजून पिंजऱ्यात असणं. श्वास थांबले म्हणजेच हंस उडून गेला.'
- हे फारच आवडलं.
27 Apr 2016 - 12:52 am | बोका-ए-आझम
मला वाटतं हंस हा अत्यंत विवेकी पक्षी समजला जातो. त्याला नीरक्षीरविवेक असतो असं म्हणतात. तसंच आपण असावं असंही कबीरजींना म्हणायचं असेल कदाचित.
26 Apr 2016 - 4:56 pm | सप्तरंगी
जेंव्हा जेंव्हा हंस अकेला ऐकलं, तेंव्हा मीही विचार केला. हंसच का चिमणी कावळा इतर पक्षी का नाही तर हंस पांढराशुभ्र (त्या काळच्या दृशीने पांढरा म्हणजे +ve च ) रुबाबदार, राजबिंडा असतो. आणि बहुतांशी मादी आणि पिल्लांबरोबर विहार करतो (माणसासारखाच) पण तो कितीही रुबाबदार असला तरी हे त्याचे हे असणे हे नश्वर आहे, संपणारे आहे आणि असा हा राजबिंडा पक्षी शेवटी एकटाच असणार आहे. तसेच स्वताला हुशार, विद्यमान समजत असणारा, समाजप्रिय माणुसही एक न एक दिवस होत्याचा न-व्हता होणारच आणि बाकी पुढील सर्व जसे तुम्ही लिहिले आहे त्या धर्तीवरच बर्यापैकी विचार केलेला.
गुरु की करनी गुरु जाएगा ।
चेले की करनी चेला
या ठिकाणी वाटले : इथे खरे तर गुरु-चेला याचे शब्दश: अर्थ व्यर्थ वाटले. गुरु= चांगले कर्म आणि चेला= अगदी वाईट किंवा कु-कर्म असेच नाही पण कमी quality चे कर्म या अर्थाने मी ते घेतले . जैसी करनी वैसी भरनी सारखे जे जसे कराल तसेच त्याचे फळ मिळेल, चांगल्या कामाचे फळ नक्कीच चांगले, असे सुचवायचे असेल असे वाटले. आणि आपले भोग आपल्यालाच भोगायचे असतात, असेही वाटले.
** मी माझ्या बुद्धीनुसार विचार केला, बरोबरच आहे असा माझा मुळीच दावा नाही, उलट लोक कसा विचार करतात हे ऐकायला आवडेल.
सुंदर विवेचन. आज तुमचे सो$हं वाले भाग अजून वेगळा विचार देवून गेला. मस्तच ! अजून विवेचन वाचायला आवडेल.
26 Apr 2016 - 6:18 pm | प्रसाद गोडबोले
फारच सुंदर :)
26 Apr 2016 - 6:45 pm | वैभव जाधव
___/\___
26 Apr 2016 - 6:49 pm | मितान
अप्रतिम !!
26 Apr 2016 - 7:12 pm | सुबोध खरे
सुंदर लिहिलंय
कुमार गंधर्वांचा आवाजही तितकाच सुंदर आहे.
27 Apr 2016 - 12:23 am | Anand More
बहुतेक सर्वांची निर्गुणी भजनांची सुरवात यापासूनच होते … हंस आणि सोहं ची कल्पना आवडली. तुम्ही खूप छान लिहिलंय
27 Apr 2016 - 2:17 pm | मूकवाचक
___/\___
27 Apr 2016 - 8:34 pm | भाग्यश्री कुलकर्णी
माझे आवडते गाणे आहे हे पंडित कुमार गंधर्व आणी राहुल देशपांडे नी गायलेल.सुंदर विवेचन.आवडले.
28 Apr 2016 - 1:03 am | आनन्दा
हे जन पळभर म्हणतील हाय हाय, किंवा यावज्जीवो तिष्ठति देहे कुशलं तावत पृच्छति गेहे, गतवपि वायौ देहापाये भार्या बिभ्रति तस्मिन काये. यासारखे आहे.
हंस हे बर्याच ठिकाणी आत्म्याचे रूपक मानले आहे. आत्मारूपी हंस एकदा उडाला की उरलेले शरीर म्हणजे केवळ (अंत्य) दर्शनाची जत्राच आहे.
बाकी सोहं आणि हंस: हे त्या आत्मारूपी हंसाचे दोन पंख मानले जातात. श्वास घेताना सोहं, आणि सोडताना हंस:, हंसः हे खरेतर "अहं सः" असे आहे. पण त्याचा अपभ्रंश हंसः असा झाला. हेतू हा की श्वास घेताना म्हणायचे "तो मी आहे" आणि सोडताना म्हणायचे "मी तो आहे", म्हणजे कायम अनुसंधान राहील.
हे मला देखील असेच वाटते.
पण केवळ गुरू शिष्य नाही, इथे कदाचित ते शिष्यांना किंवा लोकांना सांगत आहेत म्हणून, पण नाहीतर त्यातला साधा अर्थ तू तुझ्या कर्माने जाणार आणि मी माझ्या एव्हढा सरळ वाटतो.
फक्त हे वाक्य पटले नाही
पहिली तीन कडवी प्रस्तावना आहे, तर शेवटचे कडवे उपदेश. अर्थात
असा अर्थ मी यातून घेतला.
28 Apr 2016 - 8:56 am | मनमेघ
आपल्या मौलिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपण लावलेला अर्थही योग्यच आहे.
मी केवळ प्रयत्न करतोय त्यामुळे काही चुकले/ न पटले तर असेच नक्की सांगा.
28 Apr 2016 - 10:35 am | आनन्दा
धन्यवाद. आम्ही पण तुमच्यासारखेच, किंबहुना जास्त चुकणारे.
आता "आव कलंदर केशवा" येऊ द्या.
28 Apr 2016 - 8:57 am | मनमेघ
आपल्या मौलिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपण लावलेला अर्थही योग्यच आहे.
मी केवळ प्रयत्न करतोय त्यामुळे काही चुकले/ न पटले तर असेच नक्की सांगा.
28 Apr 2016 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवड्लं. पण भितीही वाटली. सालं सर्व सोडून जावं लागेल या कल्पनेने.
-दिलीप बिरुटे