सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।
नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?
बघ तर तुला काय सांगतो हा आवाज?
ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.
पाहिले आये नाद बिंदू से
पीछे जमया पानी ।
सगळ्यां ढगांत पाणी पुरेपूर भरलेलं आहे. ही गोष्टही असंच सुचवते की आपल्या सर्वांच्या देहरूपी घटांत एकच परमेश्वर वास्तव्य करतो.
सब घट पूरण पूर रह्या है।
अलख पुरुष निर्बानी हो जी।
त्या पुरुषाला अलख पुरुष म्हटलंय. अलक्ष्य वरुन अलख हा शब्द आला आहे. अलक्ष्य म्हणजे न दिसणारा. सर्वामध्ये परमेश्वर कसा आहे? तर ढगांत असूनही पाणी दिसत नाही तसा!
सबंध काव्यात हेच पावसाचे, पाण्याचे, ढगांच्या आवाजाचे रूपक वापरून कबीर त्यातून साधनेच्या पायऱ्या दाखवून देतात.
आता ते पावसाच्या थेंबांशी जणू बोलतात की तू तिथून आलास, कुठे जायचं त्याचा पत्ता जणू लिहून घेऊन आलास.आणि तूच अनेकांची तहान भागवलीस.
वहां से आया पत्ता लिखाया ।
तृष्णा तोउने बुझायी ।।
पण मग तू नदीत राहणे सोडून खारट समुद्राकडे निघालास. म्हणजे एकाअर्थी स्वतःच उलट फसलास. यातलं रूपक ध्यानात घेण्यासारखं आहे. पाण्याचा थेंब म्हणजेच सर्व जीवांत असणारे आत्मतत्व असे आधीच्या कडव्यात आले आहेच. हा आत्मा कोणत्या रूपात जन्म घेणार हे सर्व आधीच ठरलेले असते. मनुष्य रूपात असताना, जेव्हा स्वतःचा उद्धार करून घेणे शक्य आहे तेव्हा मात्र तू विषयसुखात गुरफटलास आणि जन्ममृत्यूच्या फासात स्वतःला अडकवलेस.
अमृत छोडसो विषय को धावे ।
उलटी फाँस फसानी रे ।।
पुढच्या कडव्यात एक वेगळेच रूपक समोर येते.
कबीर म्हणतात, हा जो पाऊस पड़तोय तो म्हणजे जणू गगनमंडलात गाय दुहली जाते आहे. पावसाचे पाणी जणू तिचे दूध आहे. आणि जे संत आहेत त्यांनी त्या दुधाचे दही करुन ते घुसळले. आणि त्यातून येणारे लोणी खाल्ले. उरलेलं ताक सगळं जग वापरतंय.
गगन मंडलू में गो बियानी।
भोई पे दही जमाया।
माखण माखण संतो ने खाया ।
छाज जगत बापरानी हो जी ।।
दुधाचे दही होणे, त्याचे ताक होणे आणि अदृश्य असलेले लोणी वर येणे ही सामान्य प्रक्रिया आहे. पण एका अर्थी ही दुधाची उन्नती आहे. संतही या पावसाकडे फक्त पाणी या अर्थी न बघता त्यात दडलेला अर्थ जाणतात. पहिल्या कडव्यात आलेली उपमा (बिंदूच्या आधी नाद, इत्यादी साधनेतल्या पायऱ्या जाणून असतात) म्हणून जणू काही ते लोणी खातात आणि लोणी काढून टाकल्यावर उरणारे ताक इतर लोक वापरतात.
याचा थोड़ा वेगळा अर्थही निघू शकतो.
साधनामार्गात नाद, बिंदू, कला (सिद्धी) हे अनेक टप्पे असतात पण अंतिम टप्पा स्वतःला (किंवा परमतत्वाला) जाणून घेणे हाच. संतांना तो साधतो तर इतर लोक या आधीच्या टप्प्यांच्या अनुभवात अडकून पडतात.
एखाद्या काव्याचा अर्थ लावणे आणि आपण लावलेला अर्थच बरोबर असे म्हणणे दोन्ही अवघडच.
काव्य उतरत असताना कवीची भावावस्थाच अशी असते की कदाचित् कवीसुद्धा पूर्णपणे एखादी ओळ समजावून सांगू शकायचा नाही. असेच काहीसे पुढच्या कडव्याच्याबाबतीत माझे झाले आहे.कदाचित् कबीर खूप वेगळं काही सांगत असतील.
साकार-निराकार हा भेद समजणे अवघडच. पण सद्गुरु सगळं सोपं करतात. धरा नाहीच असे पाहिले तर केवळ एक गोलाकार मंडल दिसेल. सरोवराशिवाय, म्हणजे सरोवराच्या आकाराशिवायही पाणी हे पाणीच उरते. सरोवरामुळे त्याला आकार मिळतो. आणि ज्याला आपण सरोवर म्हणतो त्याला सरोवर म्हटले नाही तर ते नुसते पाणीच !
म्हणजे आपण निराकाराला नुसता आकार नाही तर नावही कल्पिले आहे. पण निराकार असे नामात किंवा आकारांत अडकणारे नाही असेच गुरु सांगतात आणि अज्ञानाचा अंध:कार दूर होऊन ज्ञानाचा उजेड होतो.
बिन धरती एक मंडल दीसे ।
बिन सरुवर ज्यू पानी रे ।
गगन मंडलु में हो उजियारा।
बोल गुरुमुख बानी रे ।।
हे एकदा झालं की सकल चराचरात साठलेलं चित्स्वरूप मीच आहे याचा साक्षात्कार होतो. सो$हं सो$हं असा जणू बाजा वाजू लागतो.
ओहं सो$हं बाजा बाजे,
त्रिपुटी धाम सुहानी रे।
इथे ओहं हे यमकात्मक वाटतं. किंवा फार तर त्याला 'ॐ' चा अपभ्रंश म्हणता येईल. अर्थाच्या दृष्टीने मात्र, 'सो$हमात्मा' 'मी आत्मा आहे', 'सकल जीवांच्या हृदयात 'मी' म्हणून जी स्फूर्ती होते, तोच मी आत्मा' अशी स्पष्ट, निःसंशय जाणीव होते. हे ज्ञान म्हणजे स्वतः सकलविश्वाशी एकरूप असल्याची जाणीव देणारे असल्याने त्यातून होणारा आनंद बाजा वाजावा तसा जणू व्यक्त होतो. साधक शांत होतो. भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र कार्यान्वित होते. नाक आणि दोन भुवया यांच्यामधला भाग म्हणून त्रिपुटी असे म्हटले आहे. सुहानी हे बहुतेक त्या बाजाच्या ध्वनीशी संलग्न असावं. त्या सो$हंरूपी बाजामुळे आज्ञाचक्र सुखावलं असा काहीसा अर्थ असावा.
इडा पिंगला सुखमन नारी ।
सुन्नध्वजा फहरानी रे ।
इडा-पिंगला नाड्या सम होऊन सुषुम्ना नाडी कार्यरत होते असे वर्णन आहे. सो$हं च्या साक्षात्काराचा हा परिणाम.
शून्यध्वजा ! किती विलक्षण शब्द आहे! निर्गुण जाणलं म्हणजे काय झालं? हे सांगणं अवघड आहे. शून्यध्वज फडकल्यासारखंच हे ! शब्दात बांधताच न येण्यासारखं.
कबीर म्हणतात माझ्या बंधूनो, ही जी आगमवाणी आहे ती ऐका! आगम म्हणजे योगमार्गाशी संबंधित शास्त्र-पुराणे इत्यादी. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे शास्त्र किंवा तंत्र. आगमात योगमार्ग, ध्यानाच्या पद्धती आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.
पाऊस पडणे, त्यापूर्वीचा ढगांचा आवाज या रूपकातून कबीर जे सांगतात ते म्हणजे ही आगमवाणीच !
कहे कबीरा सुनो भाई साधो
ज्या यी अगम की बानी रे ।
दिन भर रे जो नजर भर देखे ।
अजर अमर वो निशानी हो जी ।
जो कुणी याकडे लक्षपूर्वक बघेल त्याला एक अजरामर अनुभवच मिळेल.म्हणजेच साधकाने सातत्य, डोळसपणा सोडता कामा नये असेच कबीर सुचवत असावेत.
इतकं सगळं लिहूनही अपूर्णत्व आहेच.
हीच अनुभवापुढे लेखनाची मर्यादा !
-चैतन्य दीक्षित
प्रतिक्रिया
22 Apr 2016 - 8:50 pm | विजय पुरोहित
सुंदर रे मनमेघ भाऊ...
विवेचन अतिशय आवडले...
सोऽहम्
सोऽहम्
सोऽहम्
सोऽहम्
22 Apr 2016 - 8:54 pm | विजय पुरोहित
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी
याचा अर्थ गगन प्रदेश म्हणजे टाळूतील सहस्रारचक्रात निर्माण होणारा अनाहत ध्वनी तर नसेल?
त्याच्याविषयी संत जनाबाई म्हणतातः
चारी वाचा कुंठित झाली॥ सोऽहम् ज्योति उभारिली॥
अनुहत घंटा श्रवणी ऐकुनि ॥ विस्मित झाली जनी॥
22 Apr 2016 - 9:04 pm | विजय पुरोहित
इथे अजून एक भजन देण्याचा मोह आवरत नाहीः
सोऽहम् सोऽहम् जप करी मना...
सोऽहम् रूपे सांडिली बाह्यपूजा...
सोऽहम् रूपे जाणिले आत्मराजा...
सोऽहम् रूपे देखिले त्या सद्गुरूसी...
सोऽहम् तत्वे तारीतो जो दीनांसी...
श्री गजानन महाराज गुप्ते...
22 Apr 2016 - 9:56 pm | विजय पुरोहित
अवांतरः हे श्री गजानन महाराज गुप्ते हे नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी "बी" यांचे सख्खे बंधु होत. या कवी "बी" यांनीच "चाफा बोलेना चाफा चालेना" हे अप्रतिम काव्य लिहिले!!!
23 Apr 2016 - 7:10 am | मनमेघ
विजय भाऊ, धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल.
22 Apr 2016 - 9:40 pm | बोका-ए-आझम
कुमारजींचं कॅसेट आणि सीडीवर ऐकायला मिळालेलं आहे पण तारा मराठी नावाच्या एका चॅनेलसाठी कुमारजींच्या सुकन्या कलापिनी कोमकली यांनी हे भजन गायलं तेव्हा रेकॉर्डिंगला हजर राहण्याची सुसंधी मिळाली होती. त्याही फार सुंदर पेश करतात हे.
23 Apr 2016 - 7:12 am | मनमेघ
सुंदरच गातात. निर्गुणी भजने हा कुमारांनी दिलेला वारसा त्या उत्तम रीतीने पुढे नेत आहेत.
एक UGC कार्यक्रम लागायचा त्याच्या टायटलला उड़ जाएगा हंस अकेला दाखवायचे ते आठवलं तुमच्या प्रतिसादावरून.
धन्यवाद.
22 Apr 2016 - 10:03 pm | DEADPOOL
छान!!!
22 Apr 2016 - 10:40 pm | यशोधरा
सुर्रेख!
22 Apr 2016 - 10:48 pm | राघव
हेही चांगलंय.. पण काही ठिकाणी जरा वेगळं मत मांडायचा मोह होतोय..
अनाहत नादः माझ्या वाचनाप्रमाणे [अनुभवाप्रमाणे नाही! :-) ] हा नाद म्हणजे ॐकाराचे वर्णन आहे. त्यालाच संतांचं नाम म्हणतात. मंदिरातील घंटा ही या ॐकाराचंच व्यक्त स्वरूप होय. आणि हा भाग साधनेच्या सुरुवातीला नाही तर ज्या चार वाणी सांगीतल्या आहेत त्यातील शेवटच्या म्हणजे परावाणीत अनुभवाला येतो.
नाम हे अत्यंत उपाधीरहित सांगीतलेलं आहे. ॐकार हे नामच झालं. ॐकारानंच ब्रह्मतत्त्वाचं वर्णन केलेलं आहे.
म्हणून, निराकाराला नाव देणे आणि ते या नावात अडकणारे नसणे हा अर्थ जरा मला न समजणारा आहे. कदाचित तेवढं वाचन नाही अजून.
23 Apr 2016 - 7:09 am | मनमेघ
अनाहत नादाबद्दल तू म्हणतोस तसे चारही वाणींच्या नंतर अनुभवाला येणारी गोष्ट असे मीही ऐकले आहे.
परंतु साधनेत आवाज ऐकू येणे,रंग (बिंदू) दिसणे ही साधना योग्य मार्गावर असल्याची लक्षणे मानली जातात.
बाकी तू म्हणतोस तसे नाम हे उपाधिरहित आहेच आणि ॐकार हा अनाहत नादाचे व्यक्त रूप आहे हे अगदीच पटले.
~चैतन्य
23 Apr 2016 - 2:52 pm | सविता००१
अतिशय आवडलं आहे हे विवेचन.
ही भजनं तर आवडतातच. अशक्य सुंदर आहेत ती. पण त्यावर इतकं छान लिहिलेलं पहिल्यांदा वाचलं.
23 Apr 2016 - 2:53 pm | अभ्या..
अतिशय सुरेख चैतन्यराव.
आवडले.
23 Apr 2016 - 3:50 pm | राही
यावर काही लिहिण्यासारखे उरलेलेच नाहीय. आधीच हे भजन फार आवडते. कुमारांमुळे झीणी झीणी आवाज कित्येकदा कानात रुणझुणत असते. सुंदर लेख.
सोsहं कोsहम् किंवा हंसः सोsह्म् ही लय श्वासोच्छ्वासाशी जुळलेली.. श्वासावर लक्ष्य केंद्रित करताना ही लय अस्तित्वात भिनते. त्यात हृदयाचे ठोके - अन् आहत नाद. कशाचाही कशावरही आघात न होता निर्माण झालेला नाद. तो आदिनाद जणु आपल्या हृदयात सामावलेला. श्वासाचे आत येणे बाहेर जाणे.. बाजाच्या पेटीच्या भात्यासारखे. अखेरीस कोण मी? तोच मी, असे एकरूपत्व.
सुंदर.
23 Apr 2016 - 6:20 pm | मनमेघ
प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे.
कुमारांनी गायलेली भजने लहानपणी त्यातल्या वेगळ्या ठेक्यासाठी ऐकली पण शब्द कळायचे नाहीत. अर्थ कळणे अजून दूरची गोष्ट. हे लिखाणही अर्थ लावायचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
काही कमी-जास्त वाटत असेल तर अवश्य सांगा.
पुनश्च धन्यवाद _/\_
~चैतन्य दीक्षित
23 Apr 2016 - 6:52 pm | mugdhagode
.
23 Apr 2016 - 9:24 pm | तिमा
या आवडत्या भजनाचा अर्थ कोण सांगेल असा नेहमी प्रश्न पडे. आजचा दिवस सार्थकी लागला. धन्यवाद.
24 Apr 2016 - 9:35 am | वैभव जाधव
भजन खूप मार्गदर्शक आणि विवेचन देखील....
24 Apr 2016 - 4:40 pm | मूकवाचक
पुलेशु ...
25 Apr 2016 - 12:30 pm | पैसा
सुंदर लिहिलंय!
25 Apr 2016 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले
खुपच छान :)
25 Apr 2016 - 1:48 pm | चौकटराजा
संतामधे कबीर माझा लाडका आहे. त्यात कुमार गंधर्व हे लाडके गायक. व चैतन्य प्रभू मिपाकर यासारखा व्यासंगी निरूपणकार. मी अल्पमति असल्याने काही डोक्यावरून ही गेले. तरीही काही शिरले हे काय थोडे? असेच लिहित रहा.
25 Apr 2016 - 8:25 pm | मार्गी
अतिशय सुंदर!! धन्यवाद!
26 Apr 2016 - 8:13 am | मनमेघ
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो.
~चैतन्य दीक्षित.
26 Apr 2016 - 8:19 pm | सुमीत भातखंडे
उत्तम विवेचन.
कुमारजी तर आवडतातच....पण राहुल देशपांडे यांचं सादरीकरणही छान आहे
27 Apr 2016 - 12:26 am | Anand More
या भजनाच्या अर्थाबाबत किरकोळ मतभेद आहेत. पण तो माझ्या संदर्भांचा आणि आकलनाचा परिणाम असावा. माझे लेखन पूर्ण झाले की मांडतो.
28 Apr 2016 - 8:02 pm | मनमेघ
लिहा आनंदजी,
नक्की आवडेल वाचायला.