सांधीकोपरं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
14 Apr 2016 - 11:47 pm

बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं.

सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी.

उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली. तिचं पार्थिव शरीर जाळ्यात कधीकधी थरथरतं. एके दिवशी तेही नाहिसं झालं.

म्हातारीला उठवणी यायचं. घरात येऊन मग ती कपभर चहा करुन प्यायची. खरकटी भांडी खंगाळताना मग एकटीच हातवारे करून बोलत बसायची. देवपूजा तिच्याच्यानं होत नव्हती. पण जपमाळ ओढत उन्हात जाऊन बसायची.

भुंगा रोजच यायचा. लाकूड भरडून आतला भुसा बाहेर टाकायचा. त्याचा किरकीट आवाज रात्री बेरात्री ऐकू यायचा. कुणी एक सुतारपक्षी दुपारचं गोठ्यातल्या बांबूवर आपली चोच अशीच आपटायचा.

म्हातारीला आताशा जास्त करणं होत नाही. कसलसं निदान झालं अन एके दिवशी तीही मरुन गेली.

घरामागच्या झेंडूच्या फुलांनीही माना टाकल्या. गोठ्यावर शेकारलेलं पाचूट उडून गेलं. लिंबूनीचं एक रोप लावलेलं ते कधी उगवलंच नाही. घरामागची बाभळ मात्र ताडमाड उभी होती.

परवा वादळी वाऱ्यात ते घर म्हणे पडून गेलं. अन बाईची एकमेव अस्तित्वखूण पुसून गेली.

जीवनमानप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

15 Apr 2016 - 12:16 am | उगा काहितरीच

जबरदस्त ताकदीचे लिखाण ...

रातराणी's picture

15 Apr 2016 - 1:06 am | रातराणी

_/\_
नाव का असे दिले आहे पण? अर्थ नाही कळला...

आता फक्त भुंग्याचा रव ऐकू येतोय.

नाखु's picture

15 Apr 2016 - 8:29 am | नाखु

आणी जव्हेरगंज शैली म्हणतात ती हीच.

तुषार काळभोर's picture

15 Apr 2016 - 10:49 am | तुषार काळभोर

+१

नीलमोहर's picture

15 Apr 2016 - 5:33 pm | नीलमोहर

+१

साहेब..'s picture

15 Apr 2016 - 8:43 am | साहेब..

जबरदस्त

विजय पुरोहित's picture

15 Apr 2016 - 10:51 am | विजय पुरोहित

अप्रतिम...
जबरदस्त...

IT hamal's picture

15 Apr 2016 - 10:55 am | IT hamal

नाव व लेखनाचा अमूर्त सम्बन्ध आम्हा पामरान्ना समजून सान्गावा....ही नम्र विनन्ति

DEADPOOL's picture

15 Apr 2016 - 12:43 pm | DEADPOOL

_/\_

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2016 - 12:47 pm | मराठी कथालेखक

बाई आणि म्हतारी हे दोन पात्र आहेत की एकच ?
बाकी भकास आणि एकाकी आयुष्य दिवस छान रेखाटला आहे.

जव्हेरगंज's picture

15 Apr 2016 - 6:12 pm | जव्हेरगंज

बाई आणि म्हतारी ही दोन वेगवेगळी पात्रं आहेत.

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2016 - 6:34 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
त्या दोघींचं एकमेकांशी काय नातं होतं ?

चैतू's picture

15 Apr 2016 - 2:23 pm | चैतू

मस्त लिखाण.

पैसा's picture

15 Apr 2016 - 4:10 pm | पैसा

कथा आवडली. पण कथांची शीर्षके चमकदार करायच्या नादात तुम्ही कधी कधी जास्तच चमकदार करता!

जव्हेरगंज's picture

15 Apr 2016 - 6:10 pm | जव्हेरगंज

सहमत आहे. यावेळी जरा हुकलच.
बदलण्याची विनंती केली आहे.

सर्वांचा आभारी आहे!

आनंद कांबीकर's picture

15 Apr 2016 - 11:50 pm | आनंद कांबीकर

एकदम जव्हेरछाप
आवडली

कविता१९७८'s picture

17 Apr 2016 - 8:32 am | कविता१९७८

वाह, छानच

शैलेन्द्र's picture

19 Apr 2016 - 11:08 am | शैलेन्द्र

भन्नाट कथा