शिला मला म्हणाली,
"मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण-शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा."
असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती.
मी म्हणालो,
"शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे."
शिला म्हणाली,
"चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवर्याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती.
"बाळं " म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो. तिला आता माजघर आणि स्वयंपाकघर कुठे आहे ते आठवत नव्हतं.सकाळी जेवली कि नाही, ते संध्याकाळी आठवत नव्हतं.घरातली कोण कोण वारले, माझे वडील धरून, तिला आठवत नव्हतं .
मी पण मनात घाबरायला लागले की कदाचीत एकदिवस माझ्या नवर्याला मी आठवूच शकणार नाही, अल्झायमरमुळे नव्हे तर माझी आठवण पुस्स्ट होईल म्हणून."
मी शिलाचं एव्हडं ऐकून तिला विचारलं,
"मग तू काय करायचं ठरवलंस?"
मला म्हणाली,
"शरदच्या त्या दिवसाच्या डायग्नोसीस नंतर एक वर्ष मी, तो गेल्यानंतर त्याची आठवण काढीत राहिले.त्याचं ते मिष्कील हंसणं,माझा हात हातात घेवून माझ्याशी मान खाली घालून बोलणं,त्याचं ते खाकरणं आणि त्याच्या इतर चांगल्या गुणांची, हळूवार बोलण्याची, गम्मती करण्याची मी माझ्या मनात उजळणी करायची.जमेल तेव्हडं मी त्याचा चेहरा जणू विषेश शक्ति आणून माझ्या मनात ठेवीत होते.आणि ते शेवटी तो सोडून जाई पर्यंत."
मी मग शिलाला विचारलं,
"ह्यात तू यशस्वी झालीस का?"
त्यावर ती म्हणाली,
"त्यावेळी मला वाटायचं की जबरदस्तीने,लक्षात ठेवण्याची,परत परत उजळणी करण्याची,माहितीत राहण्याची, जणू एक प्रोसेस आहे.जसं आपण पाढे म्हणा,गाणे म्हणा,चावी ठेवण्याची जागा म्हणा, लक्षात ठेवतो तसं.शरदला कॅन्सर पासून वाचवू
न शकल्याने, मनात घट्ट ठरवलं होतं की त्याच्या मरण्याच्या घटने पेक्षा त्याला विसरून न जाण्याची घटनाच वाचवून ठेवू पाहिन."
"हे तू कसं आचरणात आणू शकलीस?"
असं मी तिला विचारलं
त्यावर ती म्हणते कशी,
" अरे,नंतर माझ्या एक ध्यानात आलं,की आठवणीला सुद्धा एक प्रकारची स्वतःची ओढ असते.ती तू काबूत आणू शकत नाहीस.क्षणभर का होईना ती ओढ, गमवलेली प्रेमळ व्यक्ति मिळण्यासाठी एक प्रकारची उचल खाते. एकदा मी माजघरात देव्हार्या जवळ शांत बसली असताना,माझ्या जवळ शरद बसल्याचा मला भास झाला.
आम्ही दोघं नेहमी जवळ बसलेलो असताना माझं शरिर जे एक प्रकारे मऊ पडायचं अगदी तसं,वाटलं.मला त्याचा चेहरा आठवत नव्हता,त्याची चालण्याची ढब आठवत नव्हती,त्याच्या ज्या सर्व खाणाखूणा मी लक्षात ठेवल्या होत्या त्याचा त्या क्षणाशी काहीही काडीचा संबंध आला नाही.देवाजवळच्या आरशात ज्यावेळी माझं लक्ष गेलं, त्यावेळी माझ्या स्वतःच्या चेहर्यात माझ्या आईच्या चेहर्यातली नजर,मी तिला शेवटी हॉस्पीटलात पाहीली होती तशी दिसली.
मला आठवतं,मी तिला त्यावेळी माझ्या वडीलांविषयी प्रश्न केला होता,आणि तिची त्यांची आठवण पुस्सट झालेली दिसली होती,परंतु त्यावेळी सुद्धा ती मला तरतरीत आणि तेजी दिसली होती.तिचा मेंदू तिला सहाय्य करीत नव्हता , पण ते इतकं महत्वाचं नव्हतं,जितकं की मला त्यावेळी वाटलं होतं. माझे वडील अंधूक का होईना तिच्या मनात दिसले असतील. तो अल्झायमरचा मेंदू पण तिची आठवण पुस्स्ट करू शकला नव्हता."
मी म्हणालो,
"शिला,म्हणजे मेंदू आणि आठवण ह्यात नक्कीच फरक आहे असं तुला नाही का वाटत.?"
ती लगेचच म्हणाली,
"अगदी बरोबर, बाहेर जाण्यापुर्वी घरातले सर्व दिवे काढले की नाही हे लक्षात ठेवण मेदुचं काम,पण आठवण ही भावनेत डुंबलेली असावी.आणि खोल विहीरीतून कळशीने उचल घ्यावी तशी आठवण काळवेळाची पर्वा न करतां उचंबळून वर यावी.अशी माझी खात्री झाली आहे."
हे शिलाचं सर्व ऐकून मला वाटलं तिच्या म्हणण्यात कांही तरी अर्थ असावा.
मी तिला जवळ घेऊन म्हणालो " It makes some sense."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
17 Mar 2016 - 3:13 pm | शित्रेउमेश
It’s really makes some sense….!!!
17 Mar 2016 - 3:28 pm | DEADPOOL
यक नं
17 Mar 2016 - 5:51 pm | निशांत_खाडे
आवडेस. लिहित राहा..
18 Mar 2016 - 12:01 am | श्रीरंग_जोशी
आवडलं अन पटलं.
18 Mar 2016 - 3:00 am | अगम्य
छान लिहिता तुम्ही
18 Mar 2016 - 6:17 am | यशोधरा
उपमा आवडली!
18 Mar 2016 - 8:07 am | चांदणे संदीप
लेखन आवडले!!
Sandy