चाळीतील आठवणी------भाग ४

भिंगरी's picture
भिंगरी in जनातलं, मनातलं
15 Mar 2016 - 2:51 pm

चाळीतील आठवणी भाग १,,
पावसाळ्यात चाळीतल्या मुलींना घराबाहेर जास्त पडायला मिळायचे नाही.घराच्या छतावरून पडणार्‍या पाण्याच्या पागोळ्या पकडणे, अंगणातून वाहणार्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे,अर्थात तेही पायरीवर बसूनच,व्हरांड्यात चीपर्‍या खेळणे असे असे सगळे बंदिस्त खेळा खेळायचो. पाउस थांबला की मुलं ओल्या अंगणातच टोकदार दगडांनी छोटा खड्डा करत व त्या खड्यात टाचेने गोल फिरून गोट्या खेळायला गल तयार करायचे,लोखंडाची फुटभर सळी घेउन 'शीगरूपी' खेळायचे. त्यामुळे आम्हा मुलींना “why should boys have all the fun?” असे वाटायचे.
मात्र असा एक सण होता ज्याचा फक्त मुलीच आनंद घेउ शकत होत्या,तो म्हणजे हादगा (भोंडला) . पावसाळ्यात हादग्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो.
फेर धरून हादग्याची गाणी म्हणायला मजा यायची. परंतू डब्यातील खाउ ओळखणे हे हादग्याचे सर्वात मोठे आकर्षणं असायचे. मुलांना जरी या खेळात भाग घेत येत नव्हता तरी मी व माझी मैत्रीण आमच्या धाकट्या भावंडांना अप्रत्यक्ष सामील करून घ्यायचो. लपाछपीच्या नावाखाली ते चाळीतील प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून येणारा वास लक्षात ठेवून कोणत्या घरात कोणता पदार्थ शिजवला जात आहे ह्याची आम्हाला अचूक माहिती द्यायचे. डब्यांमध्ये शिरा, उप्पीट, खीर फारतर पुरणपोळी सारखे पदार्थ असायचे त्यामुळे ते ओळखायला सोपे जायचे. एकदा गंमत झाली, सगळ्यांचे डबे अचूक ओळखले ,परंतू पुजारीने आणलेला डबा कोणालाच ओळखता आला नाही,आमचे हेरखातेही गडबडले होते. शेवटी त्या मुलीने डबा उघडला ,त्यातील पदार्थ आम्ही प्रथमच बघत होतो, तो पदार्थ होता उत्तप्पा. आम्हाला हरवून उत्तप्याच्या चवीने आमची मने जिंकली होती.

आम्ही राहत असलेल्या कँपात सणांची मजा काही औरच होती. दिवाळी आणि होळीला तर अगदी धमाल यायची. प्रत्येकाच्या दारात मोठे अंगण असायचे.दिवाळीची तयारी अंगण तयार करण्यापासून होत असे. चाळीतील सगळेजण एकमेकांना मदत करायचे. चारेक घरांतच चोपण्या असायच्या,परंतू अंगण चोपायला सर्वाना आळेपाळीने मिळायच्या. अंगण शेणाने सारवून वाळले की रांगोळीसाठी गेरूने मोठे चौकोन सारवले जाई. अंगण मोठे असल्यामुले रांगोळ्याही मोठ्या असायच्या.
फटाके वाजवून झाले की चाळीतील रांगोळ्या बघायला निघायचो. अक्षरशा जत्रा भरत असे प्रत्येकाच्या दारात. थंडीचे दिवस असल्यामुळे पहाटे दव पडून रांगोळीचे रंग ओले व्हायचे , मेहनेतीने काढलेली रांगोळी खराब होऊ नये म्हणून ती पत्र्याने झाकावी लागायची किंवा कधीकधी विटांवर मोठ्या फळ्या ठेवून त्यावर रांगोळी काढून रंग भरावे लागत.म्हणजे रात्री ती फळी अलगद उचलून घरात नेऊन पुन्हा सकाळी बाहेर ठेवावी लागत असे. दुसर्या दिवशी नवी रांगोळी तिच्याच बाजूला काढली जायची. तिसर्या दिवशी पहिली रांगोळी साफ करण्याचाअ मान अर्थातच धाकट्या भावाला व त्याच्या मित्रमंडळींना असे. रांगोळीवर मनसोक्त कुदून पाच मिनिटात सगळी रांगोळी एका डब्यात गोळा करून द्यायचे.

आजच्यासारख्या तेव्हा फटाक्यांच्या मोठ्या माळा नसायच्या.आमच्या शेजारच्या चाळीत एक सोनार होते त्यांच्याकडे दर भाउबिजेला त्यांचा मुंबईहून आलेला मामा फ़टाक्यांचा 'कोट' लावायचा. लवंगी फटक्याच्या माळी एकाशेजारी एक ठेवून मोठी माळ तयार करायचा . पाचएक मिनिटभर ती माळ वाजायची,परंतु तासभर आधीच चाळीतील सर्व मुले तेथे ह्या सोहळ्याची गंमत पहायला जमायचे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मोठ्या जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी जलवाहिन्यांना समांतर ट्रॉली लाईन टाकल्या होत्या, ज्यावरून इंजिनावर चालणाऱ्या व हातांनी ढकलायच्या ट्रॉल्यांची वाहतूक होत असे. इंजिन ट्रॉली गॅरेजमध्ये तर पुश ट्रॉल्या आमच्या घरासमोरच लावल्या जायच्या. चाळीतील मुले ह्या लाइनवर लांबवर ठराविक अंतरावर वाजवायच्या टिकल्या ठेवायचे. ब्रेक सैल करून ही पुशट्रॉली जोरात ढकलायचे. ट्रॉलीच्या चाकाच्या दबावाने एकापाठोपाठ एक टिकल्या वाजायच्या व सलग वाजणाऱ्या टिकल्यांच्या आवाजामुळे मुलांना 'कोट' वाजवल्याचे समाधान मिळायचे.

होळी म्हटली म्हणजे चाळीतील मुलांचा उत्साह ऊतू जायचा. मुले जागरण करणार म्हणजे कोंबडी चोरणे व होळीत कशाची ना कशाची आहुती ठरलेली असायची.. ह्यात एखाद्याच्या दारातील सरपणापासून ते लाकडी कॉट पर्यंत काहीही चालाताचे. ह्यात भेदभाव केला जायचा नाही. एकदा आमच्या शेजारच्यांची कोंबडी चोरताना घरातल्यांना आवाज येउ नये म्हणून माझ्या मोठ्या भावाने घरातील मोरीचा नळ जोराने सोडून मित्राना मदत केली होती. भावाचे मित्र कोबडीबरोबर घराच्या मागील शेडमधील जुन्या पुस्तकाचा बॉक्सही घेऊन पळाले व भाऊ घराबाहेर जाईपर्यंत सगळी पुस्तके होळीत भस्म झाली होती. मॅट्रीक पास झाल्यावर दोन वर्षाने लहान असलेल्या आपल्या बहिणीकरता भावाने जपून ठेवलेली ती'मॅट्रीक मॅगझिन' होती.
रंगपंचमीला आम्हाला फारसे रंग विकत घ्यावे लागत नसे. स्टोअर कीपर पिवळ्या रंगाची पावडर आम्हाला द्यायचा. हाताला तेल लावून ही पावडर चोळली की पक्का रंग तयार व्हायचा जो एखाद्याच्या चेहर्याला अथवा कपड्याला लावला तर रॉकेल शिवाय साफ होता नव्हता. रंग खेळण्याकरता काहींना घरातून बाहेर काढावे लागायचे. दारं खिडक्या लावेल्यांना घराबाहेर काढण्यासाठी एखादा कर्मचारी DDT मारण्याच्या पंपात रंग टाकून त्याची नळी खिडकीच्या झरोक्यातून घरात टाकायचा,घरातील कपडे व इतर वस्तू खराब होतील ह्या धाकाने घराचा दरवाजा उघडला जायचा.

कँपात दरवर्षी एप्रिल महिन्यात सार्वजनिक सत्यानारायणाची पूजा असायची. पूजेपूर्वी आठवडाभर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी खेळाच्या स्पर्धा भरवल्या जायच्या. गोळाफेक, कुस्ती, उंच उडी ,लांब उडी, अशा खेळांचा समावेष असल्यामुळे आमच्याकरता ते छोटे ऑलिंम्पिकच होते. सांघिक खेळात जलविभाग विरुद्ध बांधकाम विभाग असे सामने व्हायचे. ज्यात हूतूतू पासून रस्सीखेच असे सामने असायचे. ह्यात दोन जरा अपारंपारिक खेळ होते. पहिला होता वेण्या घालण्याचा. केसांच्या नव्हे,तर दोरखंडाच्या. ३०- ४० फूट लांबीचे ६-७ दोरखंड उंच झाडाच्या आडव्या फांदीला बांधून तितक्याच लोकांनी कमीतकमी वेळात त्याची वेणी पूर्ण करायची असा हा खेळ होता. ह्यात एकमेकांना ओलांडण्याचा ठराविक नियम होता. दुसरा खेळा होता पुश ट्रॉलीचा. ह्यात दोन खेळाडूंनी एक रिकामी ट्रॉली ढकलत एक किलोमीटर अंतर कमीत कमी वेळात कापायचे. अंतिम रेषेजवळील पंचाच्या हातात स्टॉप वॉच असायचे, त्याकाळी आजच्यासारखे मॊबाइलसारखे साधन नसल्यामुळे वेगळीच युक्ती वापरली होती. शेजारील मोठ्या जलवाहिनेवर लोखंडी कांबेचा जोरात आघात केला असता पाण्यातून तो ध्वनी एक किलोमीटरवर असलेल्या पंचापर्यंत त्याच क्षणी पोहोचत असे व तो स्टोप वोच चालू करत असे. अशा अनेक गमती जमतीमुळे चाळीतल्या जीवनाच्या आठवणी अद्यापही जागृत आहेत.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

जरा उशिराने, पण फार छान लिहिलेय! नॉस्टॅल्जिक वाटलं अगदी!

मस्त लिहिले आहे. मागील भागाची लिंक, त्याच्या पुढील भागात दिली तर आधीच्या लिखाणाचा रेफरन्स मिळणे सोपे जाईल.

नाखु's picture

16 Mar 2016 - 12:01 pm | नाखु

राहिलेला माणुस चाळीला विसरू शकत नाही हे खरे !

का कुणास ठाऊक पण फ्लॅटच्या आठवणी इतक्या समरसेतेने/उत्कटतेने कुणाला सांगताना पाहिले नाही.

भिंगरी's picture

24 Mar 2016 - 9:48 pm | भिंगरी

अगदी अगदी.

जेपी's picture

16 Mar 2016 - 1:40 pm | जेपी

मस्त लेख..पुभाप्र..

मस्त लिहिते आहेस ताई.पुढचा भाग लवकर टाक.

राही's picture

16 Mar 2016 - 7:06 pm | राही

सगळे भाग आता एकदम वाचले. अतिशय आवडले.
त्यावेळचे नातेसंबंध, लग्ने, (झालीच तर्)प्रेमप्रकरणे, भाषा, खाणेपिणे याबद्दलही येऊ द्या.

इडली डोसा's picture

16 Mar 2016 - 7:24 pm | इडली डोसा

आता मागचे भाग पण वाचते.

माइंड रिफ्रेश हुआ, भाेत अच्छा लगा ठेंकु