सारे मिळूनी खाऊ

Dinesh Satpute's picture
Dinesh Satpute in जनातलं, मनातलं
28 Feb 2016 - 8:32 am

बिल्डिंग च्या गेटमधून बाहेर पडताना आमच्या सोसायटीचा गार्ड तिवारीनं मला आवाज देत सलाम ठोकला. हाडकुळया तिवारीला पाहून याच्या कोणत्या गुणाकडे पाहून याला नोकरीस घेतला असेल हा प्रश्न मला नेहेमी पडतो. साहेब मी असं ऐकलं कि तुमच्या ड्रायबाल्कनी चा प्रोब्लेम अजून तसाच आहे,पुन्हा पाहू का प्रयत्न करून. मी म्हटलं, होतं कधी कधी चोक अप. ठीक आहे , कर पुन्हा एकदा प्रयत्न असं मी म्हणताच...साहेब ,चला तुम्ही पुढे , मी आलोच असं म्हणून तिवारीनं आपल्या सामानाची शोधा शोध सुरु केली. बायकोला तिवारी काय म्हणाला हे सांगताच. .पहा नाहीतर तुम्ही..गेल्या दोन महिन्यापासून सांगते आहे..पण तुम्ही मनावर घ्याल तेव्हा.

तेवढ्यात तिवारी दारात हजर. .साहेब तुम्ही निवांत बसा ..मी पाहतो म्हणून तिवारीनं अर्धा तास प्रयत्न करून एकदाचे चोक अप निघाले म्हणून घोषणा केली. एक बादली पाणि ओतून मी खात्री केली..नेहेमीप्रमाणे शंभर रुपयाची नोट खिशात टाकत तिवारी परत चोक अप झालं तर सांगा असं म्हणून निघून गेला. संध्याकाळ पर्यंत आमची बाल्कनी पुन्हा पाण्याने भरून गेली..तिवारीकडे जाऊन निरोप दिला. तिवारीनं त्याचा मित्र राजूचा नंबर दिला..साहेब आपल्या सोसायटी मध्ये सर्व कामे हाच करतो अस सांगून तो नक्की चोक अप काढेल असं सांगताच मी राजूला फोन केला.

मी राजूला तिवारीच नाव सांगताच पुढे काही बोलायच्या आत राजूनं सुरुवात केली...साहेब तुमच्या सोसायटीत खूप भुक्कड लोकं राहतात..पैसे देत नाहीत. फाल्तूची कटकट आपल्याला चालत नाही. त्याच बोलणं मधेच थांबवत मी म्हटलं बर मग ..राजूनं बोलणं सुरु ठेवलं ..साहेब मी सोसायटीत यायचे तीनशे रुपये घेतो..एकतासात तुमच काम झालं तर पाचशे रुपये घेईन आणि पुढच्या प्रत्येक तासाला दोनशे रुपये लागतील..हे ऐकून मी म्हटलं, राजू अरे एवढी फी माझे फ्यामिली डॉक्टर सुद्धा घेत नाही..माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत राजूनं मला सुनावलं...अस करा तुमच्या डॉक्टर लाच बोलवा अस म्हणून राजूनं फोन कट केला. तिवारीनं झाला प्रकार ओळखला..मला धीर देत. .साहेब मी करतो बरोबर म्हणून मला घरी जाण्यास सांगितलं.

दुस-यादिवशी सकाळी तिवारी राजूला आमच्या घरी घेउन आला..साहेब काम पूर्ण होईपर्यंत याला सोडू नका असं म्हणून निघून गेला..राजूनं सुरवात केली..साहेब एक जाड तार घ्या..कपडा द्या..पाण्याची बादली भरून आणा असे एकामागे एक आदेश देत राहिला. मी सुद्धा राजूची फी आकारण्याची पद्धत लक्षात असल्याने तोंडातून चकार शब्द न काढता राजूच्या हाताखाली काम करत होतो. त्यानंतर राजूनं सांगितलेल्या दुकानात जाऊन ड्रेनेज क्लिनर घेउन आलो..हे काय कमी झालं म्हणून राजूनं मला आता बिल्डींगच्या खाली जाऊन पाईप मधून पाणी येते काय हे पाहण्यास उभे केले . पुढचा एकतास दर पंधरा वीस मिनिटांनी राजू मला एकच प्रश्न विचारात होता..साहेब पाणि आलं का ? आणि मी एकच उत्तर देत होतो..नाही अजून..शेवटी कंटाळून मनांतल्या मनात राजूचा तासाप्रमाणे हिशोब करत हा प्रकार थांबवण्यासाठी परत निघालो..परत घरात आलो तर राजू बाल्कनीमध्ये डुलकी घेत होता ..मी जोरात आवाज देताच राजू खडबडून जागा होत काल रात्री उशिरापर्यंत काम केल्यामुळे डुलकी लागली असं सांगून आपलं सामान भरू लागला. राजूनं चोक अप बाल्कनीत नसून सोसायटीच्या पाईप मध्ये आहे असा निष्कर्ष काढत तासांच्या हिशोबा प्रमाणे सातशे रुपये घेतले आणि जाता जाता सोसायटीच्या प्लंबर ला बोलावून घ्या असा फुकटचा सल्ला दिला.

बायकोच्या सांगण्यानुसार हा विषय एकदाचा संपण्यासाठी पुन्हा एकदा तीवारीकडे जाऊन सोसायटीच्या प्लंबर पक्याला फोन करून बोलावून घेतलं .पक्यान बाहेर च्या पाईप मध्ये अडकलेला एक हातमोजा काढला आणि मला दाखवण्यासाठी घेउन आला . बाल्कनीतल पाणि मात्र खाली जाताना पाहून मी पक्याच्या हातावर दोनशे रुपये टेकवत माझ्यासाठी मागे ठेवलेली घाण साफ करू लागलो .
पाईप मध्ये अडकलेला मोजा किती रुपयांना पडला याचा हिशोब करत असतांनाच तिवारीनं दरवाज्यातुन आवाज दिला ..साहेब ,पक्या सांगत होता की मोजा निघाला पाईप मधे . माझा हातमोजा विसरला वाटत तुमच्याघरी ..देता का तेवढा ? माझ्या खूप दिवसांपासून पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं. तिवारीकडे धाडस होतं .कोपरापासून हात जोडून मी तिवारीला नमस्कार केला .

समाजअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

28 Feb 2016 - 8:42 am | जेपी

मी पयला..
आपण घाबरत नाही ब्बा पयला प्रतिसाद द्यायला.

---
बाकी हाऊसिंग केअर ची काम स्वत:च शिकुन घ्यावी.वेळ,पैसा आणी होणार मनस्ताप वाचतो.

मुक्त विहारि's picture

28 Feb 2016 - 8:50 am | मुक्त विहारि

छान लेख.

थर्माकोलला काळा रंग लावून, तो खडक आहे, असे दाखवून, पैसे कमवणारा माहीत आहे.

मनांत काही-बाही आणू नका, मी "काला पत्थर" ह्या सिनेमाविषयी बोलत आहे.

पण हातमोज्याचा उपयोग ह्या अशा कामासाठी पण करता येतो, हे नव्याने समजले.

एस's picture

28 Feb 2016 - 9:24 am | एस

भारीये!

रातराणी's picture

28 Feb 2016 - 11:09 am | रातराणी

:)