'डायरी ऑफ अॅना फ्रँक 'ची पारायणं केल्यापासून म्हणजे शालेय वयापासूनच तिच्याविषयी एक सुप्त उत्सुकता होती.त्यामुळे अॅमस्टरडॅमला गेलं की 'अॅना फ्रँक हाऊस'ला भेट द्यायची हे मी युरोपमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हाच ठरवून टाकलं होतं. माझ्या अनेक सोनेरी स्वप्नात तेव्हा अजून एक भर पडली होती.पुढे अनेक वर्षांनी जर्मनीला आल्यावर अॅना फ्रँकची डायरी परत खुणावायला लागली. जेव्हा आम्ही अॅमस्टरडॅमला जायचा बेत आखला तेव्हा गुप्ता, शर्मा, वर्मा, चावला आदी मित्रमंडळीनी "अभी उधर जाके क्या है देखनेको?हम ट्यूलिप्स के सिजनमे जाएंगे.." असा फतवा काढला. "अॅना फ्रँक? ये कौन है?" असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही त्यांच्याशिवायच जाण्याचा सूज्ञ निर्णय घेतला.
(अॅना फ्रँक चे घर पाहण्यासाठी आलेल्यांची रांग)
अॅमस्टरडॅमच्या अगदी मध्यवर्ती भागात वेस्टरकेर्कच्या जवळ गेलं की अॅना चा पुतळा दिसतो आणि दिसते ते अॅनाचे लाडके चेस्टनटचे झाड! (सन २०१० मध्ये वादळी वार्याने ते १७० वर्षांहूनही पुरातन झाड पडले.) प्रिन्झनग्राक्ट येथे 'ते' तिमजली घर आहे. हे घर म्हणजे फ्रँक कुटुंबाचा कठिण काळातला आसरा होता.
१९४५ च्या एप्रिल महिन्यात छ्ळछावणीत अडकवून ठेवलेल्यांची सुटका झाली त्याच्या काहीच आठवडे आधी अॅना आणि मार्गोटचा काळाने घास घेतला तर त्यांची आई एडिथ जानेवारीतच उपासमारीने छळछावणीत मरण पावली. सगळ्या कुटुंबाची वाताहात झाली. ह्या युध्दात वाचला तो फक्त ऑटो फ्रँक, ह्या दोन गोंडस मुलींचा कमनशिबी बाप! त्याची सहकारी मिप गिसं हिने अॅनाच्या डायरीचा हा जीवापाड जपलेला ठेवा त्याच्या सुपूर्त केला आणि ऑटो ती डायरी वाचताना स्तिमित झाला. आपलीच चिमुरडी त्याला त्या डायरीतून उलगडत, भेटत गेली. मग त्याने १९४७ मध्ये तिची ही 'किटी' पुस्तकरुपाने जगासमोर आणली.
'त्या' घराजवळ अॅनाच्या पुतळ्यापाशी पोहोचता पोहोचता 'डायरी' आठवायला लागतेच. तळमजल्यावरील हॉलमध्ये मूळ घर आणि फ्रँक कुटुंब तेथे आसऱ्यासाठी आल्यावर केलेले बदल अशी दोन्ही मॉडेल्स ठेवली आहेत. जसजसे आपण घर पाहत जातो, तसतसे संदर्भ लागत जातात, तिथल्या भिंतींवर, जिन्यामधील जागेत अॅनाच्या डायरीतली वाक्ये उद्धृत करून ठेवली आहेत. त्याचाही परिणाम मनावर आपोआप होत राहतो. 'बुकरॅक'चे दार उघडून आत शिरलो की आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच पोहोचतो. अॅना आणि मार्गोटने (तिची बहिण) पोस्टर्स आणि फोटो लावून सजवलेल्या भिंती, त्यांच्या उंचीच्या पेन्सिलीने केलेल्या खूणा, त्यांचे खेळ, त्यांच्या अभ्यासाच्या वह्या सगळे जसेच्या तसे जपून ठेवले आहे. त्यांच्या खोल्यांना लावलेला टॅनकलरचा वॉलपेपर आणि पलंगावर बसल्यावर भिंतीला टेकल्यावर पडलेले डोक्याच्या तेलाचे डागही तसेच आहेत. बुकरॅक उघडल्यावर सगळ्यात प्रकर्षाने जाणवतात ते अरुंद आणि स्टिप जिने. ज्या जिन्यातून चढता उतरताना फार जपून जावे लागते अशा ह्या जिन्यातून सामान कसं आणलं असेल? ते ही लपत छपत.. हा प्रश्न डोक्यात घेऊनच आपण पुढच्या दालनात जातो.
मसाल्याच्या कारखान्याच्या मागे लपण्यासाठी केलेला हा आसरा, तिथल्या बंद खिडक्याआड दडलेली वेदना डायरीच्या रुपाने जगासमोर आली. ही काही फक्त फ्रँक कुटुंबाची वेदना राहत नाही, तर त्या काळात असले दुःख भोगावे लागलेल्या साऱ्यासाऱ्यांची ती वेदना होते. तिथल्या पडद्यावर दाखवण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या चित्रफितीतून तो काळच समोर उभा राहतो आणि सुन्न व्हायला होतं. तिची डायरी तिच्या बाबांना कशी मिळाली, त्यातून त्यांना आपलीच मुलगी कशी समजत गेली, याची ह्रद्य मुलाखत आहे. या कुटुंबाला मदत करणाऱ्या सुह्रदांच्या मुलाखती आहेत, अॅना छळछावणीत गेल्यावर आपला जीव धोक्यात घालून तिला बाहेरुन मदत करणाऱ्या मैत्रिणीची मुलाखत आहे.
एका भव्य दालनामध्ये अॅनाच्या या डायरीच्या जगभरातील भाषांमध्ये भाषांतरीत झालेल्या पुस्तकांच्या प्रती मोठ्या कलापूर्ण रीतीने मांडल्या आहेत.भारतीय भाषांमध्ये मंगला निगुडकरांची मराठी डायरी आणि एक बंगाली डायरी आहे. छोट्या,छोट्या नावही न ऐकलेल्या देशांच्या भाषांमध्ये अॅनाची डायरी आहे आणि एवढ्या मोठ्या खंडःप्राय देशातल्या फक्त दोनच भाषांमध्ये तिचे भाषांतर? असा एक विचार आला क्षणभर मनात आणि मी पुढच्या दालनात गेले. एक अतिशय अरुंद आणि स्टिप जिन्याने वर चढून गेलं की बंद काचेमध्ये 'ती' दिसते, किटी! ज्या डायरीची आपण पारायणं केली ती अशी मूळ स्वरुपात जेव्हा भेटते तेव्हा तिला बघण्या भेटण्याच्या ओढीने तिथे आलेले सगळेच भावूक होतात. खुद्द अॅनाच्या अक्षरातली ती 'किटी' पाहताना मग मनातले भावनांचे कल्लोळ डोळ्यातल्या पाण्यातून वाहू लागतात.
अॅमस्टरडॅमला किटीला, अॅना च्या डायरीला भेटून आले पण ती फ्रांकफुर्ट मध्ये जन्मली आणि ती दोन वर्षांची असताना नाझींच्या भीतीने फ्रँक कुटुंब फ्रांकफुर्ट सोडून आधी आखन आणि मग अॅमस्टरडॅम मध्ये गेले हे काही डोक्यातून जात नव्हते. फ्रांकफुर्ट मधलं तिचं जन्मस्थान ते घर, तो परिसर आता कसा असेल? हे पाहण्याची ओढ होती. मग जालावर शोध घेतला तेव्हा समजले डॉर्नबुश ह्या उपनगराजवळ तिचं घर आहे. ट्रामने गेलं असता Fritz-Tarnow-Straße ह्या स्टॉपच्या रस्त्यावर अॅना फ्रँक हाउस असं एका फलकावर लिहून एक बाण काढलेला दिसला. तेथे उतरून मग त्या बाणाच्या दिशेने गेले. Jugendbegegnungsstätte Anne Frank e.V. असं लिहिलेल्या एका सरकारी दिसणार्या आधुनिक इमारतीपाशी आले. तिथे विचारच करत होते की आत कसं जाऊ? कुणाला विचारू? अशा विचारात असतानाच एक ताई त्याच इमारतीत आत शिरत होत्या. त्यांनाच हटकलं असता, या ना आत, इथेच मिळेल तुम्हाला माहिती असं म्हणून त्यांनी आतच बोलावलं तर तिथे कचेरीच असलेली दिसली. तिच्या घराचं हे आधुनिक रूप, त्यातही तिच्या, फ्रँक कुटुंबाच्या अशा कोणत्याच खुणा दिसेनात. निराश मनानेच त्या ताईंना विचारलं इथेच होतं का तिचं घर? तर हसून त्या म्हणाल्या नाही, नाही.. हे अॅनाफ्रँक युथमिटिंगप्लेस आहे.
तिचं घर इथून जवळ आहे पण सांगायला जरा अवघड आहे. ती विचारात पडली कसं सांगावं? मग तिने चक्क एक नकाशा आणून दिला,कसं जायचं ते समजावून सांगितले आणि मी तिथून निघाले. रस्ता ओलांडून पलिकडे जायचं आणि डावीकडे सरळ चालत रहायचं. तिच्या सूचना आठवत नकाशात पाहत चालायला सुरूवात केली, मारबाखवेग नावाचा रस्ता लागला की उजवीकडे वळायचं हे डोक्यात ठेवून.. मारबाखवेग आला तशी उजवीकडे वळले. आता ह्याच रस्त्यावर तीन गल्ल्या सोडल्या की नंतरच्या कोपर्यावर तिचं घर आहे. पावलं भरभर उचलू लागली, गल्ल्या मागे पडू लागल्या आणि एका कोपर्यावरच्या घराबाहेर मोठा फलक, त्यावर लहानग्या अॅना, मार्गोटचा फोटो पाहून एकदम थबकायला झालं. हेच तिचं घर! न राहवून मी फाटकाकडे वळले तर तिथे दुसर्याचं कोणाची तरी नांवं.. आता त्या घरात ३-४ बिर्हाडे राहतात आणि 'त्या' काळच्या कोणत्याच खुणा तेथे दिसत नाहीत. इथून गाशा गुंडाळताना तिथल्या सगळ्या खुणा पुसून गेल्यात जणू!
(अॅनाचे फ्रांकफुर्टमधील घर- पूर्वी आणि आता)
तो फलकावरचा फोटो ही एकमात्र खूण त्या घराशी नाते सांगत असते. बाहेरूनच ते घर पाहिले. त्या घराभोवती चक्कर मारली. तिथे असलेल्या झाडांच्या सावलीत कधीच्या काळी इवली अॅना आणि मार्गोट खेळत असतील असं मनानेच पाहिलं, त्यांचा तिथला वावर मनानेच जाणवून घेतला आणि जड पावलांनी परत ट्रामकडे वळले.
(काही प्र. चित्रे आं जा वरून साभार)
प्रतिक्रिया
23 Feb 2016 - 5:37 pm | गॅरी ट्रुमन
मस्त. फोटो आवडले.
23 Feb 2016 - 5:56 pm | चांदणे संदीप
पुन्हा एकदा अॅना डोळ्यासमोर आली अन....
.
23 Feb 2016 - 6:03 pm | राही
तुमच्याबरोबर आम्हीही फिरून आलो त्या घरात.
23 Feb 2016 - 6:18 pm | जव्हेरगंज
आणखी थोडं पाहिजे होतं असं वाटलं !
पण जे आहे ते ही मस्त!!
23 Feb 2016 - 6:36 pm | उगा काहितरीच
छान लेख. वाचलंय याचं मराठीतील भाषांतर , अगदी एका बैठकीत वाचायला हवं अशा काही पुस्तकांपैकी एक. नशीबवान आहात आपण तिथे प्रत्यक्ष जायला मिळालं !
23 Feb 2016 - 6:41 pm | बहुगुणी
प्रत्यक्ष जाणं जमेल तेंव्हा जमेल, पण खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या आणि आता केवळ अंधुकच आठवत असलेल्या पुस्तकाची तुम्ही पुनर्भेट घडवून आणलीत, धन्यवाद!
हा लेख अॅनच्या जवळपास पुण्यतिथीलाच लिहिला जावा हेही उल्लेखनीय. (अॅन बहुतेक २२ फेब्रुवारीला टायफस च्या दुखण्याने मृत्यूमुखी पडली असावी.)
23 Feb 2016 - 7:00 pm | विजुभाऊ
या डायरीवर आधारीत एक नाटक गुजरातीमधे आहे. ( लेखीका- रंभाबेन जोशी)
अॅन फ्रँकची डायरी या नावाने मी देखील एक मराठी नाटक लिहीले आणि केले आहे.
23 Feb 2016 - 7:02 pm | आदूबाळ
छान लेख. आणखी तपशिलात हवा होता.
23 Feb 2016 - 7:13 pm | भंकस बाबा
उत्तम
23 Feb 2016 - 7:38 pm | खेडूत
अॅन फ्रँकची डायरी वाचलं होतं. तेंव्हा मन विषण्ण झाले होते. (तेंव्हा नुकतीच डखाऊला भेट दिल्याने असेल.)
लेख आवडला. किंचित पुस्तक परिचय दिला असतात तर न वाचलेल्यांना 'कोण ही?' असा प्रश्न पडणार नाही.
23 Feb 2016 - 7:44 pm | यशोधरा
अॅन फ्रँकची डायरी वाचलं होतं. तेंव्हा मन विषण्ण झाले होते. >> खरे आहे. एकदा वाचले, पुन्हा आजतागायत वाचायला हातात घेऊ शकले नाही.
23 Feb 2016 - 7:45 pm | यशोधरा
चांगलं लिहिलं आहेस स्वातीताई.
23 Feb 2016 - 7:53 pm | मुक्त विहारि
अॅमस्टरडॅम मधील हिरे कदाचित घेवू शकणार नाही पण हा हिरा, (अॅन फ्रँकचे घर), मात्र नक्कीच बघीन.
23 Feb 2016 - 8:01 pm | स्वच्छंदी_मनोज
खुप छान लेखन स्वाती ताई.
माझ्या मागच्या जर्मनवारी मध्ये मी एक विकेंड ऍमस्टरडॅम साठी ठेवला होता. शनीवारी सकाळी पोचल्या नंतर प्रथम तिथेच गेलो. विकेंड असल्याने भरपूर गर्दी होती. लाईनीमधून आत शिरायला चक्क १.३० गेला (लाईनमधे उभे असलेल्यांचे आजूबाजूचे गाणे बजावणारे चांगलेच मनोरंजन करतात आणी 'अॅना फ्रँक हाऊस म्युझीअम' तर्फे फ्री वाय-फाय दिले जाते त्यामुळे वेटींग पिरीयड चटकन निघून गेला).
आत शिरल्या नंतर दिलेल्या मॅप मधून बघत बघत फिरताना एका वेगळ्याच विश्वात फिरत असल्याची जाणव होत होती आणी सतत चालणार्या डच आणी इंग्रजी ऑडीओ मुळे अगदी दुसर्या महायुद्धाची आठवण आणी अॅना आणी त्यांच्या कुटुंबानी काढलेले लपून दिवस, त्यांच्या फॅक्टरीतल्या कर्मचार्यांनी त्याना केलेली मदत, तिथेच कोवळ्या वयातल्या अॅना आणी मित्रामध्ये फुलणारा प्रेमांकुर सर्व अगदी जबरदस्त उभे केले आहे. टूर संपल्या नंतरच्या दालनात एक लगेच तिच्या डायरीची पण खरेदी केली
ह्या भेटीचा परीणाम असा झाला की त्या नंतर रिकम्युझीअम आणी व्हॅन गॉग म्युझीअम बघताना पण तो इफेक्ट डोक्यातून जात नव्हता.
लेख लिहील्याबद्दल धन्यवाद.
23 Feb 2016 - 8:16 pm | सुमीत भातखंडे
जायचय मलापण. लवकरच प्लॅनींग करायला हवं.
धन्यवाद ह्या लेखाबद्दल.
23 Feb 2016 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
तेथे फिरताना विषण्ण करणारा इतिहास काय मनोवस्था बनवत असेल असा विचार मनात आला. :(
23 Feb 2016 - 8:54 pm | विजय पुरोहित
डोळे भरून आले अश्रूंनी...
माणूसच माणसाचा कसा काळ होऊ शकतो हे दिसते या कथेतून...
धिक्कार असो या नीच छळवादी माणसांचा...
ईश्वर त्यांना कधीही शांतता न मिळू देवो....
नरकात सडो साले हरामखोर...
Tottally Inhuman....
May God curse those people...
23 Feb 2016 - 11:25 pm | मितभाषी
हे बाकी अति होतय.
29 Feb 2016 - 2:12 am | किचेन
नाहि,अति नाही होतय।.उलट कमी पडतय .
1 Mar 2016 - 10:43 pm | मितभाषी
मग चालू द्या.
23 Feb 2016 - 9:15 pm | एस
डायरी ऑफ अॅन फ्रँक वाचल्यावर फारच उदासवाणे वाटले होते.
23 Feb 2016 - 9:20 pm | अजया
सुरेख लेख.अॅमस्टरडॅमला जेव्हा जाईन नक्की बघून येईन अॅन फ्रँकचं घर.
23 Feb 2016 - 9:52 pm | सतिश गावडे
लेख आवडला.
ही डायरी वाचली तेव्हा खुप तुटल्यासारखे वाटले होते. श्रेष्ठत्वाच्या कसल्यातरी भ्रामक कल्पनांनी माणूस कसा निर्दयी होऊन निष्पापांचा बळी घेतो हे वाचून मन सुन्न झाले होते.
23 Feb 2016 - 11:04 pm | इशा१२३
लेख आवडला.
शाळेत असतानाच कधीतरी वाचण्यात आलेली डायरी.मन सुन्न होत त्यातिल वर्णन वाचुन.
फोटोंसाठी धन्यवाद !!
23 Feb 2016 - 11:26 pm | मितभाषी
हेच बोलतो.
24 Feb 2016 - 12:12 am | रेवती
लेखन आवडले. त्या काळाची कल्पना करणे त्रासदायक आहे.
24 Feb 2016 - 5:28 pm | नाखु
वाचली नाही, परंतु मराठी भाषांतर आहे काय? असल्यास वाचेन (आम्च इंग्रजी इतरांना आणि ईग्लीश साहीत्य आम्हाला अजिबात कळत नाही म्हणून हा वळसा घालावा लागतो)
नाखु
24 Feb 2016 - 5:30 pm | सुमीत भातखंडे
भाषांतर आहे. ई-बुक स्वरूपात बुकगंगा आणि न्युज हंट वर उपलब्ध आहे.
1 Mar 2016 - 8:14 pm | एक एकटा एकटाच
धन्यवाद
मराठी अनुवादीत लिंक सांगितल्याबद्दल
24 Feb 2016 - 12:31 am | रातराणी
सुरेख लेख!
24 Feb 2016 - 5:34 pm | पैसा
अॅन फ्रँकबद्दल काय बोलावं? :(
24 Feb 2016 - 6:10 pm | मीनादि
धन्यवाद यासाठी
29 Feb 2016 - 3:11 pm | पद्मावति
सुंदर लेख.
29 Feb 2016 - 5:07 pm | प्रमोद देर्देकर
मी हे पुस्तक एका बैठकीतच वाचुन काढले होते. खरोखर एका माणसाच्या हट्टापाई जगाला काय काय भोगावं लागलंय.
अजुन अशा किती तरी अॅना किंवा व्यक्ती असु शकतील ज्या जगासमोर आल्याच नाहीत.
खरी तर ही आणि इतर काही पुस्तके आहेत की जी वाचायला लागल्यावर खाली ठेवताच येत नाही.
१) मला निसट्ले पाहिजे.
२) डेझर्टर
३) सैबेरियातुन पलायन
मनातुन खुप इच्छा आहे की त्या छळछावण्या, आणि तुम्ही सांगितलेलं अॅनाचे घर पहायला एकदा तरी जर्मनीला जायला मिळावे.
1 Mar 2016 - 6:58 pm | स्वाती दिनेश
पाहिल्या आहेत, खूप त्रास होतो ते पाहताना.. परत आठवून तर अजूनच त्रास होतो. छळछावणीचा लेख लिहायला घेतला आहे पण पूर्ण करताना फार त्रास होतो आहे त्यामुळे अर्धवटच पडला आहे.
स्वाती
29 Feb 2016 - 5:29 pm | सस्नेह
अॅना फ्रँकची डायरी वाचली होती ते सगळे दृश्य स्वरुपात समोर आले, फोटो पाहून ! :(
1 Mar 2016 - 8:02 am | मनीषा
डायरी ऑफ अॅन फ्रॅन्क वाचले आहे .. परत वाचीन आता .
लेख आणि फोटो उत्तम
1 Mar 2016 - 8:15 pm | एक एकटा एकटाच
लेख आवडला
1 Mar 2016 - 8:22 pm | मी-सौरभ
वाचनखुण साठवली आहे.
1 Mar 2016 - 11:03 pm | श्रीरंग_जोशी
आम्हाला १२वीच्या इंग्रजीच्या युवकभारती या पुस्तकात Diary of Anne Frank हा पाठ होता. तो माझ्या आवडत्या शिक्षकांकडून शिकायला मिळाल्यामुळे आजही स्पष्टपणे आठवतो.
तुमचा हा लेख वाचून The Diary of a Young Girl वाचण्याची इच्छा होत आहे.
या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
1 Mar 2016 - 11:11 pm | सूड
वाचली होती डायरी. बाकी ठिकाणं जपून ठेवावी तर ही अशी, नायतर आपल्याकडे गधेगाळीचा दगड दिसला तरी त्याला हारतुरे घालून पूजा सुरु होते.
1 Mar 2016 - 11:17 pm | विशाखा पाटील
लेखन आवडलं.
2 Mar 2016 - 1:49 pm | स्रुजा
:(
डायरी वाचली आहे, पुन्हा वाचण्याची हिंमत नाही. वर दिलेल्या दुव्यावरुन तिच्या शेवटच्या दिवसांबद्दल वाचलं. विषण्ण होतं मन !
तुझा लेख अर्थात च आवडला आणि फोटोज बद्दल खास आभार.
21 Mar 2016 - 5:14 pm | स्वाती दिनेश
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद,
स्वाती