गोजल

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
22 Feb 2016 - 10:22 pm

ज्या कोणा राक्षसाने "अलार्म" हा प्रकार तयार केला न. देव करो आणि दर १५ मिनिटाने अलार्म वाजात राहो त्याच्या कानात. आणि सुट्टीच्या दिवशी कशाला वाजतो हा मूर्खपणा. रविवारचा दिवस आणि ६ वाजता उठणे म्हणजे पाप आहे पाप. पण नाही, हा वाजलाच . म्हणजे मला काही फरक पडत नाही , मला ऐकूही येत नाही. माझ्या खोलीत (माझ्या उश्याशी म्हणू )वाजत असलेला अलार्म ऐकून वरच्या खोलीतून आई / बाबा / बहिण कोणी तरी येउन ते बंद करतं आणि मला उठवतं. पण चूक त्यांची नाही . अलार्म वाजलाच नाही तर ते येणारच नाही माझी झोपमोड करायला. आता तुम्ही म्हणाल कि "अरे मुर्ख माणसा , लावतोच कशाला अलार्म ? " लोकहो, तोच तर प्रोब्लेम अहे. हा प्रकार आई चालू करून जाते रोज. आणि धमकी हि आहे कि जर मी माझी अक्कल पाजळली कोणे एके दिवशी आणि अलार्म नाहीच सेट केला . तर रोज ४. उठवलं जाइल. रविवारी सुद्धा. जगात कोणाशीही वाद घालू शकतो आपण, कोणालाही शब्दात गुंडाळणे म्हणजे हाताचा मळ आहे . आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देऊन प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं करायला लावणं हा छंद आहे म्हणू . पण ते सगळं घराबहेर. बाहेर असाल तुम्ही मोठे manager. पण घरी साधा अलार्म बदलायची हिम्मत नहिए.

असो, चहाचा मग घेऊन कट्ट्यावर बसलो होतो घरासमोर , अर्धी गल्ली जवळपास शेतकरी लोकच आहेत . आणि उरलेली अर्धी स्वतः जमीन कसून घेतात दुसऱ्याकडून. त्यामुळे या सगळ्यांची सकाळ रोजच लवकर होते. कोणी बैल जोडी बाहेर काढत होतं, कोणी कोयत्याला धार लावत तीन घरं सोडून बिडी फुंकत बसलेल्या दुसऱ्याशी मोठ्ठ्या आवाजात बोलत होतं. या लोकांच एक बरं असतं . "आपलं घर , आपली चौकट" हे असले दळभद्री ४ भिंतीतले हिशोब कधीच नसतात. जसं भांडण अर्ध्या गावाला ऐकू जातं. तसं नवीन बैल घेतल्याचा हिशोब हि सगळ्यांसमोर बिनधास्त केला जातो.

मला बाहेर थांबलेलं बघून पम्या हातातला तांब्या नाचवत आला. आणि कट्ट्यावर बसता बसता म्हणाला , " आदित आज एवढ्या पाटेचं उठल्यास ते .बरा हैस नवं ? "

मी " तुझी टीचर झोपू दिली तर झोपणार न. आणि तू कुठे गेला होतास सकाळचं ?"

हातातला तांब्या दाखवत तो हसत म्हणाला " इरुगतीस गेल्लो "

मी " साल्या भूकांड्या , घरात बांधलाय नवे ? आणि तळ्यावर कशाला? "

तो " होन्नाय गा ते ५ बाय ५ च्या डब्यात . तळ्यावरच काय ते उघडा संसार बघ आमचा. खरं मुंग्या चावोल्यात तिकडी बी , च्यायला त्या मोदिनी सोच्च भारत मुंग्यास्नी बी शिकवल्यान कि काय्की "

या वाक्यावर दोघेही पोट दुखेपर्यंत हसत होतो .

पम्या " असोग्यास जौलाव अतं . मोठ्या गोजली हिताय तिथे , येणार? "

तसंही घरी बसून करण्यासारखं काही नवतं. "येतो , अर्ध्या तासात ये परत. पण ते पकडून करणार काय? माझ्या घरी तर नाही करू देणार . "

पम्या " येताना पिरवाडीस जौवा , आत्या असतीया तिकडी. फोन करून सांगतु मी भावास"

"ठीक आहे ये, माझीच गाडी काढतो. तुझी गाडी चालू व्हायलाच तासभर लागेल "

अर्ध्या तासात आवरा आवर करून निघालो . त्याच्याकडे ज्यादाचा काटा होताच. जाताना एका शेताकडेला पाऊण एक तास खोदाखोदी करून पिशवी भरून गांडूळ आणि अळ्या जमवल्या. आणि आमची स्वारी निघाली असोग्याला . इथून २० किमी वर असोगा गाव आहे , छोटी नदी आहे तिथे . बरेच दिवसांनी मासे पकडायला गेल्यामुळे काटा आत फेकण्यापेक्षा तो फेकताना शर्ट मध्ये अडकलेला काढण्यातच जास्त वेळ गेला . आणि वर खेकड्यांनीहि ३-४ वेळा धागा कापून फजिती केली ती वेगळी. गांडूळ /अळी काढण्याच्या नादात नांगिनी धागे तोडतात साले. आणि असतात हि छोटे छोटे , त्यांना पकडून त्यातून खाण्यालायक काही मिळणार तर नाहीच. डोक्याला ताप नुसता.

चार साडे चार पर्यंत ७-८ मासे मिळाले होते, तेवढ्याने पम्या मी आणि त्याच्या भावाचं पोट तुडुंब भरलं असतं . हा सगळा खजाना पिशवीत भरून त्याच्या आत्याच्या घरी पोचे पर्यंत पिशवीला मेलेल्या माश्यांचा वास सुटला होताच . त्याने पिशवी आत जाऊन दिली आणि आम्ही गप्पा मारत बसलो बाहेरच. गरमीचे दिवस असल्याने , शर्ट काढून संध्याकाळच्या थंड वाऱ्यात बसायला मस्त वाटत होतं

तासभराने आत्या बाहेर आली . साधारण सत्तरीची बाई असेल, एक एक ताट आणून देत होत्या, प्रत्येक ताटात ढीग भर भात, तळलेला मासा आणि आमटी. असा सुंदर सा मेनू. मोठे मोठे हॉटेल वाले झक मारतील अशी चव होती त्यांच्या हाताला. वाढता वाढता कोण कुठला काय ओळखी काढणे सुरु झालं . मी माझं नाव आणि कुठे राहतो हे सांगताच आत्या एकदम थबकल्या .

आणि जवळपास ओरडल्याच "बामनाचा पोर तू? "

यात काही वेगळं वाटलं नहि. सहज चेष्टेत म्हणालो . "हो . का हो? बामणाला घरात घेत नाही का तुम्ही ?"

बाई एकदम उसळलीच, आतून कुठून तरी पाट आणून ठेवला, पाटा समोर रांगोळीच्या रेघा ओढल्या, माझ्या समोरचं ताट ठेवलं तिथे उचलून , आणि म्हणे "पाटावर बसा, आदी सांगतलं व्हत्त बामन हैस ते , ह्यो बी बैलागत बसलाय तसाच. आणि मासे खातोस होय रे. घरी माहितीये का? वाढलेलं ताट काढूचं न्हाय म्हणून ठेव्लाव "

"अहो आत्या , कसला बामन आणि कसला काय . जुन्या गोष्टी त्या, सोडा ते सगळं . "

"सोडा कसं , तुमी वेदं शिकता , म्हणून आमास्नी देव समजताय. आमच्या बा ला गावातल्या बामनानीच सांगितलं , पोरीला शिकव. म्हणून मिया शिक्लु, देवा जवळची माणसं असतात तुमचे लोक "

"असं काही नसतं होत. या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या . सोडा ते विचार , . " मी परत परत हेच सांगत होतो . मी ऐकत नाही तसं आत्या बोलायचीच बंद झाली . शक्य तेवढ्या लवकर निघालो तिथून . पम्या राहणार होता त्या रात्री तिथे , पण माझा चेहरा बघून सोबत येतो म्हणाला . अर्ध्या वाटेत आलो होतो तसा एकदम बोलला .

" या गोष्टी जुन्या हैताय हे तुमी बुकं बघून सांगता द्येवा, पण खेड्यातल्या लोकांना नाही फरक पडत त्यांनी, ३०-४० घराची गावं हाईत आत आत अजून . मधली ३-४ घरं बामनाची, आणि बाकी सगळी शेतकरी कुंभार चांभार न्हायतर वडराची. तेनंस्नी हे तुमच जुने विचार नवीन विचार फरक समजत नाय , आरक्षण आणि बाकी गोष्टी तर दूरच . गावात कोणी शिकलेला गुर्जी असेल, गावातला बामन चांगला असेल तर सगळं गावात काय बी तरास नसतो बग. नाय तर मग कुठे हात लागला कोणाचा कि गोमुत्र शिंपडून घेणारी लोकं आज बी हैत. गांधी गेला नेहरू गेला आणि बी कोणी गेला . आता ह्यो मोदी. . या लोकांना वाटतं पैसे वाटले कि सगळं नीट राहतं . शाळेत शिकण्यासाठी जेवण्याच आमिष दाखव्त्यात, तरीबी पोरं येन्नात. जर खरच कोणाला काही चांगलं करायचं असेल न . तर ह्या असल्या गावात जाऊन यायला पैजेल. हि माजी आत्या, अजून बी बामन म्हनलं कि जपून रहाती. जाऊंदे. तिया नको तरास करून घेऊ. हे असले विचार हि माणसं मेल्यावरच संपत्याल. आपन नंतरच्या पिढीला चांगल्या गोष्टी शिकवतलं बेस. जुन्या पिढीला शिकवून काही उपेग नाही"

समाजअनुभव

प्रतिक्रिया

मस्त रे आद्या, पैले वाटलं ते भाषादिनाच काय लिहिलंयस काय. भारी जमलाय वर्णन. गेल्या येळसारखा हिसका बसला नाय पण हे जमलंय. थोडं जातपात टाळता आली तर बरे. असे मला वाटते बरका.

अद्द्या's picture

23 Feb 2016 - 10:42 am | अद्द्या

धन्यवाद .. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन :)

नाखु's picture

23 Feb 2016 - 2:23 pm | नाखु

पण अभ्या सांगतो तिकडं बी ध्यान दे जरा !!!

(नाहीतर हिथं धुणी दुवायला कापडं काढून बसल्याली हैतच बादली भरभरून)

धोबीघाटापासून त्रिकाळ दूर नाखुस

अद्द्या's picture

23 Feb 2016 - 2:39 pm | अद्द्या

ते असतातच काका.

जी घटना जशी घडली , जशी "मला" वाटली तशी ती सांगणे ऐकवणे हे जास्ती महत्वाचे नाही का !!

तरीही, जे अभ्या ला म्हणालो तेच. पुढच्या वेळेस योग्य ते बदल करेन

सतिश गावडे's picture

22 Feb 2016 - 10:55 pm | सतिश गावडे

भारीच लिहिलं आहेस.

अगदी मागे मी तुला शिवाजीनगरला बाईकवर सोडले होते तेव्हा तू जसा गप्पांच्या ओघात काही बाही सांगत होतास तसं ओघवतं झालं आहे.

अद्द्या's picture

23 Feb 2016 - 10:42 am | अद्द्या

:)

एस's picture

22 Feb 2016 - 11:00 pm | एस

लिखाण आवडलं!

अद्द्यागारु, बेळगांवी येनो?

बोका-ए-आझम's picture

23 Feb 2016 - 7:51 am | बोका-ए-आझम

अद्द्याभौ!

चांगलं लिहिलंय पण शेवट अर्धवट वाटला. पुढे अजून काही लिहायचं आहे का?

अद्द्या's picture

23 Feb 2016 - 10:41 am | अद्द्या

नाही. पुढे नाहीये काही

चेक आणि मेट's picture

23 Feb 2016 - 7:59 am | चेक आणि मेट

तळ्यावरच काय ते उघडा संसार बघ आमचा. खरं मुंग्या चावोल्यात तिकडी बी च्यायला त्या मोदिनी सोच्च भारत मुंग्यास्नी बी शिकवल्यान कि काय्की "

खाॅ खाॅ खाॅ.......

पैसा's picture

23 Feb 2016 - 10:53 am | पैसा

छान लिहिलंय

सस्नेह's picture

23 Feb 2016 - 12:46 pm | सस्नेह

गप्पात गुंगवणारी गोष्ट !

रातराणी's picture

23 Feb 2016 - 12:54 pm | रातराणी

छान लिहिलंय!

जगप्रवासी's picture

23 Feb 2016 - 1:14 pm | जगप्रवासी

भाषा खूप मस्त

संजय पाटिल's picture

23 Feb 2016 - 1:18 pm | संजय पाटिल

मस्त गोष्ट.. कट्ट्यावर बसून सांगीतल्यागत वाटली.

उगा काहितरीच's picture

23 Feb 2016 - 1:45 pm | उगा काहितरीच

छान !

नीलमोहर's picture

23 Feb 2016 - 3:21 pm | नीलमोहर

'नंतरच्या पिढीला चांगल्या गोष्टी शिकवतलं बेस. जुन्या पिढीला शिकवून काही उपेग नाही'
-अगदी.
जुन्या पिढीच्या काही लोकांच्या मनात फार पक्के बसलेले असतात असे विचार.

बॅटमॅन's picture

23 Feb 2016 - 3:31 pm | बॅटमॅन

एक नंबर!!!!

सुधांशुनूलकर's picture

23 Feb 2016 - 4:35 pm | सुधांशुनूलकर

छान लिहिलंय

राजाभाउ's picture

23 Feb 2016 - 4:38 pm | राजाभाउ

मस्त लिहलयस !!!

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2016 - 5:43 pm | टवाळ कार्टा

भारी...कट्ट्याला ये की चायला