तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटलेला समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा. म्हणायचा- तरूणपणी माझा रूबाब तू बघायला हवा होतास. किंवा कदाचित माझे गोव्या- कोकणातले भाऊबंद तरी बघायला हवेस तू.
आणि असाच एक दिवस अचानकच कोकणात जाण्याचा योग आला. माझ्या आईच आजोळ वेंगूर्ल्याच, तिथेच जवळ उभ्यादांड्याला वडिलोपार्जीत घर. घर म्हणजे अगदी परीकथेच मॉडेल समोर ठेवूनच बांधलेल. समोरच सुंदर सुंदर झाड. आणि परसाच्या बाजूला समूद्र किनारा. कोणीस म्हणाल, " जा जरा जावून बघून तर ये किनारा." अगदी नाईलाजाने गेलो मी.
वाटच इतकी सुंदर होती. जशी कोणी मुद्दामच वाळू शिंपडलीये वाटेवर.कसली कसली झुडूप उगवलीयेत वाटेत. जशीगावातली छोटी मूलच. शहरी पाहुण्याला बघताहेत. आपापसात खाणाखूणा चालू आहेत. कोण बर हा? आधी कधी पाहीला नाही ह्याला. मग वाळूची एक उंचच उंच टेकडी. तिथेच एक छोटूकली होडी. कोणीतरी मुद्दाम चित्र काढायला आणून ठेवलेली कशी. खूप खूप खेळून आलीये ती लाटांबरोबर. रापलेला रंग आणि लाटांच्या फेसाळलेल्या खूणाच सांगताहेत की. जसजस पूढ जाव तस तस पायाखालची वाळू कशी मऊ मऊ होत जातेय आणि माझ मन पण मवाळतय त्या ओल्या-गार वाळूबरोबरच. वाळूत पसरलेले शिंपले किती सुंदर दिसताहेत. मी नसताना रात्री, आकाशातून कोणीतरी उतरून खेळून गेलय. त्याच्याच खूणा ह्या. छोटे छोटे धामण ( छोट्या कूर्ल्या) धावताहेत सैरावैरा. त्यान्च्या छोट्या घरात जावून लपून बसताहेत. अगदी घरी कोणी नवीन पाहूणा आल्यावर, छोटी मूल बूजून लपून बसतात अगदी तश्शेच. एका लयीत पडणारी ती छोटीशी पावल कीती सुन्दर दिसताहेत. त्यांना वाटतय, आपण कूठे लपलोय ते ह्याला कळणारच नाही. पण त्यांच्या छोट्याश्या पावलांच्या छोटुल्या रेषा सांगताहेत की त्यांच्या लपण्याची ठीकाण. का त्यांचा खेळाचा तास संपलाय म्हणून वर्गात जाऊन बसलीयेत गूपचूप.
त्यात वारा खूपच धीट म्हणायचा. अगदी मला स्पर्श करून बघतोय की- गालाला , केसांना. मी त्याला म्हटल " बराच धीट आहेस की रे?" तर मला म्हणतो कसा, " मी खूप खूप आनंदात आहे. माझ कीनै लग्न ठरलय ह्या चांदण्या रात्री." मी त्याला विचारल, " मी आल तर चालेल का रे लग्नाला?". तस म्हणाला , " ये की. खुशाल ये." मी त्याला विचारल , " अरे पण वधू कोण , कूठची ते तरी सांग." तसा लाजलाच आणि समुद्राकडे पळून गेला हळूच. पण लाटाही कसल्या खट. त्याही वार्याची मस्करी करताहेत. लाटा किती सुंदर दिसताहेत. निळा करडा रंग थोडा किनार्याजवळ आला की पांढूरका होवून मोती उधळून जातो. आणि येताना रिकाम्या हाताने येत नाहीत त्या. वाळूसाठी छान छान शिंपले घेवून येतात. वाळूही कशी हरखून जाते. तरी मी म्हटलच तीला , " मज्जा आहे बूवा एका मूलीची. सारख्या सारख्या भेटवस्तू मिळताहेत तिला" तशी लटक्या रागाने चापटच मारली तिने.
मी म्हटल वार्याला, " काय रे लाटांमागे जावून लपतोस? ये की जरा बाहेर." तसा आलाच तो गिरकी घेत. मला म्हणतो कसा " चल आपण लाटांबरोबर खेळू" आणि हात धरून ओढतच घेवून गेला मला. लाटाही कश्या पावलांवर मोती टाकून जाताहेत. हळूच पाय काय ओढताहेत. ढकलताहेत काय. मी त्यांना विचारल, " कूठूनशी आणता तूम्ही मोती आणि शिम्पले? जरा मला पण सांगा की?" तशी एकमेकांशी नजरानजर करत मला म्हणतात कश्या, " ते आमच गूपीतै. तूला नाहीच सांगणार आम्ही ते" मी म्हटल , " राहील. मी कीनै माझ्या मित्राला वार्याला विचारेन. तो नक्की सांगेल मला." तश्या गलबलाट करायला लागल्या.
परत जाताना मी हळूच मागे वळून बघीतल. तर सर्व जण कसे बघताहेत माझ्याकडे. परत कधी येणार विचारताहेत. मी म्हटल येणारै लवकरच.
परवा जूहूला गेलेलो सहज. मी काही म्हणायच्या आधीच समुद्र मला म्हणतो कसा, " काय, कसा काय वाटला आमचा भाऊ?. मी म्हटल " छानै रे. खरच खूप खूप छान." मग मी त्याला वेड्यासारख विचारल, " पण तूल कस रे कळल?" तसा म्हणतो कसा, " अरे वारा येऊन गेलेला आमंत्रणाला.आणि बघ तर तूला काय देऊन गेलाय?" अस म्हणून हळूच मला दोन छानशे शिंपले काढून दिले. अजूनही ते दोन शिंपले मी जपून ठेवलेत. अहो का म्हणून का विचारताय. माझ्या अश्याच एका सुंदर दिवसाच्या आठवणी आहेत ना त्यात.
***************************************************************
प्रतिक्रिया
6 Jan 2009 - 9:50 am | पर्नल नेने मराठे
सुन्दरच...........
चुचु
6 Jan 2009 - 12:56 pm | महेश हतोळकर
छान लिहिलय! पण हे तुम्हीच का?
6 Jan 2009 - 4:58 pm | अनिल हटेला
क्या बात है !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
7 Jan 2009 - 12:23 am | विसोबा खेचर
अरे वारा येऊन गेलेला आमंत्रणाला.आणि बघ तर तूला काय देऊन गेलाय?" अस म्हणून हळूच मला दोन छानशे शिंपले काढून दिले. अजूनही ते दोन शिंपले मी जपून ठेवलेत.
वा..!
7 Jan 2009 - 12:33 am | प्राजु
सुरेख वर्णन..
मला समुद्र नेहमीच वेड लावतो. कोकणात गुहागर, वेळणेश्वरचा समुद्र किती किती वेळा मी पाहिलाय. पण दरवेळी तो आपलं वेगळंच रूप दाखवतो..
कोकणात जायचं तर केवळ सागर किनार्यावर जायलाच हवं हा माझा नेमच आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Jan 2009 - 12:43 pm | अनंत छंदी
वा! फारच छान!
7 Jan 2009 - 4:44 pm | मूखदूर्बळ
धन्यवाद दोस्तहो :)