दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ वाचून खरंच आनंद वाटला. पैसविषयी आधी ऐकलं होतं, पुस्तक वाचताना लेखिकेने हे स्वान्तसुखायच लिहिले असावे असं वाटत राहते.
या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे.
पहिला ‘स्वच्छंद’ ज्यांत याच स्वान्तसुखाय लेखनाची, लेख लिहिण्याच्या ऊर्मीची आणि हे लेख लिहिण्याची सुरुवात कशी झाली हे दुर्गाबाई सांगतात. आत्मचरित्रपर लेख. साधा वाटतो पण लेखिकेच्या सहज सुलभ लेखन शैलीमुळे. छोटासा पण उत्तम आहे.
दुसरा लेख ‘पैसाचा खांब’ या लेखावरूनच पुस्तकाला पैस नाव दिले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या छोट्या खांबावरच्या पूर्ण अवकाशाला ज्ञानेश्वर पैस म्हणतात. ह्या पैस शब्दाला इतर संतांपेक्षा निराळेच परिमाण ज्ञानेश्वर देतात असे निरीक्षण दुर्गाबाई नोंदवितात. ह्याच लेखात ज्ञानेश्वरीत आलेले चार खास ज्ञानेश्वरांचे शब्द – महाशून्य, सहनसिद्धी, दु:ख-कालिंदी, ज्ञानमित्र याविषयी थोडक्यात पण अतिशय उत्तम विवेचन दुर्गाबाईंनी केले आहे. लेख मुळातूनच वाचनीय.
तिसऱ्या ‘पंढरीच्या विठोबा’ मध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अध्यात्माचा पूर्ण अभाव’ असल्याने दुर्गाबाई त्यांच्या मूळगावी म्हणजे पंढरपुरात त्यांचा जुना वाडा पहाण्याच्या निमित्ताने जातात. या लेखात लेखिका पदूबाईची वेगळीच लोककथा सांगतात, जी रा. चिं. ढेरे यांच्या विठ्ठल – एक महासमन्वयक या पुस्तकात वाचावयास मिळते (ढेरे दुर्गाबाईंना अत्यंत मानायचे असे वाचल्याचे आठवते). लेखाचा शेवट “पंढरीच्या विठोबाचे व माझे पिढ्यांचे आंतरिक नाते नव्याने उजळले” अशा वाक्याने होतो.
यापुढे ‘जोगवा’ म्हणून लेख येतो, हा ह्या पुस्तकातला सगळ्यात छोटा पण अर्थवाही लेख, दुर्गाबाईंच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावीशी वाटणारा लेख.
त्यानंतर येतो ‘द्वारकेचा राणा’, द्वारकेतले एकूण वातावरण आणि वाळूमय गोमती नदी बघून लेखिका भयचकित झाल्या आहेत, तेंव्हा त्यांना आठवणारी मीरा आणि त्यातून लिहिलेली “भगवान व भक्त यांच्यातील भानगड लांबूनच पाहण्यासारखी नि कोरड्या काव्यात वाचण्यासारखी” अशी वाक्य स्तिमित करतात. द्वारकेचा राणा आणि चिरंतन दु:ख याचे कारण नंतर दुर्गाबाईंना भागवतपुराणातील दशम स्कंधात सापडते. लेखाचा शेवट उत्तर पुराणातल्या गोष्टीने लेखिका करतात.
ज्ञानेश्वरांच्या दु:ख-कालिंदी यावरून पुढचा लेख ‘यमुना-कालिंदी’ प्रभावित असावा असे वाटते. स्वत: यमुनेच्या काठी राहिल्यावर आलेले अनुभव दुर्गाबाई सांगतात त्याचबरोबर यम आणि यमीची गोष्ट सांगून यमी म्हणजेच यमुना अशीही नोंद त्या करतात. कदंब वृक्षाचे आणि यमुनेचे नातेही त्या स्पष्ट करतात. कालिंदी, गोपी आणि वृंदावन यांची जिवंत अनुभव देणारा लेख.
यांनंतर ‘नैनीचा पूल’ म्हणून लेख येतो. इतर लेखांच्या तुलनेत हा लेख मला वैयक्तिक फारसा भावला नाही, ह्या लेखात दंग्याच्या वेळचे प्रवासवर्णन आहे.
यानंतर येणाऱ्या ‘महेश्वरची महाश्वेता’ या लेखात दुर्गाबाई अहिल्याबाई होळकरांची सुंदर ओळख करून देतात, विविध घटना सांगतात. लेख मुळात वाचनीय.
‘ख्रिस्त-संगत’ दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्वाची वेगळीच ओळख, संकरी हिंदू आणि त्यातून तयार होणाऱ्या श्रद्धेतून येणारे संस्कार आणि शाळेत असल्यापासून मनावर बिम्बवण्याचा प्रयत्न झालेले ख्रिश्चन संस्कार यातून झालेल्या मानसिक संघर्षातून निर्माण झालेला समन्वय अतिशय उत्तम शब्दांकित झाला आहे.
‘डोंगर माथ्यावर’, ‘आसन्नमरण काळी राणी’ आणि ‘बुद्ध-प्रलोभन’ या तीन लेखात दुर्गाबाई त्यांची मास्टरी असलेल्या बुद्ध, बौद्ध संप्रदाय आणि बौद्ध लेणी याविषयी मौलिक माहिती पुरवितात. कथा सांगतात, बुद्ध जीवनातले अनेक प्रसंग सांगतात, पूर्ण बुद्ध कथा सांगतात.
संग्रही ठेवावे असे पुस्तक असेच या पुस्तकाचे वर्णन करता येईल.
प्रतिक्रिया
8 Dec 2015 - 2:48 pm | मितान
उत्तम पुस्तकपरिचय ! पण अजून सविस्तर हवा होता.
पुस्तक संग्रही आहे. ऋतुचक्र ही असेच लाघवी लेखन असलेले अप्रतिम पुस्तक ! त्याबद्दलही वाचायला आवडेल.
8 Dec 2015 - 3:18 pm | यशोधरा
हो, पैस हे एक अतिशय सुरेखसे आणि अत्यंत वाचनीय असे पुस्तक आहे. कितीदा वाचले तरी कंटाळा येत नाही. पैस, भावमुद्रा, व्यासपर्व, दुपानी, अस्वल सारकी पुस्तके लिहिणार्या दुर्गाबाई आणि आठवले तसे लिहिणार्या दुर्गाबाई एकच होत्या, हे खरेच वाटत नाही कधी कधी..
8 Dec 2015 - 3:19 pm | यशोधरा
ऋतूचक्र हे अजून एक सुरेख पुस्तक.
8 Dec 2015 - 3:53 pm | प्रसाद प्रसाद
पैस, व्यासपर्व आणि आठवले तसे वाचलंय, संग्रही आहे. ऋतूचक्र विषयी खूप चांगल ऐकल आहे, वाचन यादीत आहे.
खूप विद्वान आणि विदुषी थोडेसे विक्षिप्त असतात असे दुर्गाबाईच स्वत: म्हणतात. आठवले तसे अशाच थोड्या विदुषी विक्षिप्तपणाचे उदाहरण वाटते.
8 Dec 2015 - 6:05 pm | प्रचेतस
बाईंनी संकलित केलेलं 'जातक कथा' संग्रह कधीपासून लिस्टात आहे. ह्याची तुलना केवळ बर्टनच्या अरेबियन नाइट्सशीच करता यावी.
8 Dec 2015 - 6:26 pm | यशोधरा
सातवा भाग बुकगंगावर आहे. मला हवी असलेली काही पुस्तकं औट ऑफ प्रिंटच दिसताहेत :(
8 Dec 2015 - 6:37 pm | प्रचेतस
'वरदा' कडे सर्व खंड उपलब्ध आहेत. पण किंमत बरीच जास्त आहे. जवळपास ५००० च्या आसपास. :(
8 Dec 2015 - 6:58 pm | यशोधरा
हायला! बाईंची बाकीची पुस्तकं पण आहेत का तिकडे? चला चला!
8 Dec 2015 - 6:37 pm | प्रचेतस
'वरदा' कडे सर्व खंड उपलब्ध आहेत. पण किंमत बरीच जास्त आहे. जवळपास ५००० च्या आसपास. :(
8 Dec 2015 - 10:01 pm | पैसा
लिखाण अजून विस्तृत हवे होते. ही सर्वच पुस्तके वाचलेली आहेत. सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण दुर्गाबाईंनी पाककृतींचेही पुस्तक लिहिले आहे. जुन्या मराठी पाककृतींचे दुर्गाबाईंनी लिहिलेले "खमंग" माझ्या संग्रही आहे!
9 Dec 2015 - 10:18 am | यशोधरा
माझ्याकडेपण आहे 'खमंग' :)
9 Dec 2015 - 12:30 pm | अजया
खमंग मिळतं अजून?
पैस ऋतूचक्र सर्वच आवडीची पुस्तकं. तुमच्यामुळे आठवण झाली.परत काढून वाचेन!
9 Dec 2015 - 1:11 pm | जागु
अरे वा मी ऋतुचक्र वाच्ल आहे. आत हे शोधते.