एक डाव भुताचा

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
1 Dec 2015 - 3:41 pm

जनरली हॉरर कथेमधली पात्रं उशीर झाल्यावर जंगलाचा रस्ता पकडतात आणि अलगत भुताच्या जाळ्यात सापडतात, पण त्यादिवशी मी आणि संजयने पकडलेला रस्ता नेहमीचाच होता. मला आजही तो प्रसंग आठवला कि अंगावर काटा येतो.

डिसेंबरचे दिवस होते, हवेत बऱ्यापैकी गारवा होता. रात्री १० च्या नंतर धुकं आता नेहमीचंच झालं होत. आमच्या शाळेच्या मुख्य इमारतीच्या अगदी समोर आतल्याबाजूला मैदानाला लागूनच चाळ टाईप शाळेचीच इमारत होती. कोणते वर्ग भरायचे ते आता आठवत नाहीये पण संध्याकाळी ते रिकामे असायचे. मी, संजय, संजय-२ आणि निलेश त्यातल्या एखाद्या रूममधे एकत्र अभ्यास करायचो... बोबडीवळायच्या त्या रात्री संजय-२ आणि निलेश नेहमीप्रमाणे ९ वाजता गेले. मी आणि संजयने आपण शाळेच्या शिपायाने हकलत नाही तोपर्यंत थांबायचं असं ठरवून अभ्यास चालू ठेवला. फेऱ्या मारता मारता संजय टाइमपास म्हणून त्याच्या धुळ्याकडची एक "बावडीवरच्या जखिणीची" गोष्ट सांगत होता. गोष्ट रंगात आली असतांनाच दारावर जोर-जोरात थापा पडू लागल्या अनं काळजाचा एकच थरकाप उडाला.

पण तो शाळेचा शिपाई होता.. काय रे ये फुकणीच्यांनो!! किती वाजलेत माहितीये? हैशप्पथ!! विश्वास बसत नव्हता रात्रीचे बरोब्बर ११:३० झाले होते. थरथरतच पुस्तकं पिशवीत भरली आणि गेटच्या बाहेर पडलो. एव्हाना थंड पडलेला शाळेचा गेट उघडताना हाताला झिणझिण्या आल्या. आकाशात अमावस्येच लख्ख चांदण पडल होत. सगळीकडे निरव शांतता होती. वाटेवर एक कुत्रं देखील दिसत नव्हत. सोबतीला फक्त हवेची एखादी येणारी झुळूक आणि धुक्यामुळे दिसेनासा झालेला रस्ता, त्यात रातकिड्यांचा आवाज भितीमधे आणखीनच भर घालत होता. मी आणि संजय मेन गेटने बाहेर पडून उजव्या हाताला जनता मार्केटकडे जायला वळलो. बिल्डींग नंबर १३७ च्या रस्त्याला वळण्याआधी जो चार रस्ता येतो त्याच्या मधोमध एक चौकोनी टाकी होती. बऱ्यापैकी मोठी आणि खोल असलेली ती टाकी वरून आयताकृती सिमेंटच्या स्लॅबने कव्हर केलेली होती. मधल्या गॅप मधून आतमधे सहज बघता येत असे. त्यादिवशी इतक्या अंधारात देखील त्यातला एक स्लॅब मला जास्तच सरकलेला दिसला. टाकीवर नेहमीच दिसणारे ओवाळून टाकलेले लिंबू, मिरची, सुया टोचलेल्या काळ्या बाहुल्या, वाडी ठेवलेल पान ह्यांच्या जोडीला त्यादिवशी जे दिसलं ते पाहून आम्ही जागचेच थिजलो.

बरोब्बर बारा वाजले होते, टाकीच्या मधोमध एक बाई जोरजोरात रडत बसली होती. प्रथम आम्हाला वाटलं कोणत्या मजुराची बायको असेल आणि त्याच्याशी भांडून हि इथे रडत बसली असेल. त्या निरव शांततेत तिचं हमसुन हमसून रडणं काळजाचा थरकाप उडवत होत. संजय आणि मी हिम्मत करून तिला विचारले कि एव्हढ्या रात्री तू इथे काय करतेस? हे ऐकून ती काही उत्तर न देत अजून जोरात रडू लागली. तिचा तो रडण्याचा भयानक आवाज अक्षरशः घुमू लागला. तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला पण तिने तिचे तोंड साडीच्या पदराने झाकून ठेवले होते. तिच्याशी अजून बोलायचा प्रयत्न करत असतांनाच संजयच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. संजयने मागे वळून पाहिले आणि दुसऱ्या सेकंदाला त्याचं शरीर घामाने डबडबलं. तोंडून एकहि शब्द बाहेर पडत नव्हता त्याची जणू दातखिळीच बसली होती. पन्नाशीतील दोन पांढरे शुभ्र म्हातारे आमच्या बाजूला कधी येउन उभे राहिले कळलच नाही.

काय रे ये पोरांनो!! माहित नाय रात्री या टायमाला टाकीच्या आसपास फिरायचं नाय म्हणुन.. आवंढा गिळून कसबस बोल्लो आहो काका हि बाई का रडतेय म्हणुन विचारायला थांबलो होतो. कोणती बाई? हि? इतक्यात आमच्या डोळ्यांदेखत त्या बाईने टाकीत उडी मारली. पाण्याचा मोठ्ठा आवाज, बाईची आर्त किंचाळी आणि दुसऱ्या सेकंदाला एकदम शांतता. आमच्या समोर आता काय वाढून ठेवलंय असं वाटून संजय आणि माझे पाय लटपटायला लागले. काही कळायला मार्ग नव्हता. एकमेकांना सांभाळत काही बोलणार इतक्यात आमचा आवाज दाबत ते म्हातारे म्हणाले चला पोरांनो तुमीबी आता घरला जा, आमचाबी टाईम झालाय असं म्हणत त्या दोघांनी एकामागोमाग टाकीत उड्या मारल्या. उडी मारतांना त्यातल्या एकाचा धक्का लागून मी टाकीच्या कडेला धडपडून पडलो. डोळ्यासमोर अंधारी आली, पुढची बरीच मिनिटं शांततेत गेली, एक बाई आणि मुलगा आळी-पाळीने काहीतरी बोलत होते. त्यातला मुलगा सारखा ऊठ ऊठ करत होता पण मला शुद्ध येत नव्हती. इतक्यात तोंडावर कोणीतरी पाणी मारले आणि हसायला लागले, त्यांच्या हसण्याचा आवाज मात्र कीरररररर असा होता. मी खूप घाबरुन धड्पड केली आणि धापदीशी कॉटवरुन खाली पडलो. काही कळायच्या आत बाबांनी कानफटात वाजवली आणि खाडकन डोळे उघडले समोर संजय, आई आणि बाबा उभे होते...संजय मला शाळेत न्यायला आला होता. शाळेत जाता जाता त्याला किंद्र्या आवाजात टाकिवरच्या जखीणीचं स्वप्न सांगितलं...चालत चालत एव्हाना आम्ही टाकीपर्यंत पोहोचलो होतो...... ती तिकडेच होती आमची वाट पाहत... आणि स्लॅबहि तसाच होता जरा जास्तीचा सरकलेला.

https://lh3.googleusercontent.com/-2CLY-NQpuqw/Vl1xojtQKoI/AAAAAAAAAQQ/k...

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

1 Dec 2015 - 3:45 pm | एस

हेहेहे! मस्त!

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

1 Dec 2015 - 6:38 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

आकाशात अमावस्येच लख्ख चांदण पडल होत.

जव्हेरगंज's picture

1 Dec 2015 - 7:11 pm | जव्हेरगंज

यात खटकण्यासारखं काय आहे?
अमावस्येला लख्ख चांदण पडतच असत.

बाकी कथा भारी हो!!

ईथेच होती ती टाकी>>>> ही ही ही, मँप पण काढून दाखवलाय तुम्ही. डेंजरच की!!

अभ्या..'s picture

1 Dec 2015 - 9:18 pm | अभ्या..

हायला जव्हेरभाऊ. बघा जरा लेखकू किती पुढं गेलेत. म्याप, लिजेंन्ड्स वगैरे अगदी शिस्तीत. आपण लैच मागासलेले राव.
(शीतलीच्या घराचा काढा बरं जरा नकाशा)

चांदण = चंद्राचा प्रकाश

दत्ताभाऊ गोंदीकर's picture

1 Dec 2015 - 6:44 pm | दत्ताभाऊ गोंदीकर

लय जब्राट लिवलय

पैसा's picture

1 Dec 2015 - 7:08 pm | पैसा

बाकी ठीक आहे. अमावस्येच्या चांदण्याने घात केला.

विशाल कुलकर्णी's picture

1 Dec 2015 - 8:27 pm | विशाल कुलकर्णी

मस्तच कथा ! ताई, अमावस्येला चंद्र नसतो. पण तारे असू शकतात, असतात. ;)

पैसा's picture

1 Dec 2015 - 8:31 pm | पैसा

अमावस्येला तारे छानच दिसतात रे, पण त्यांचा उजेड "लख्ख चांदणं" म्हणावं एवढा नसतो. लेखकाने काळोख अधोरेखित करण्यासाठी लिहिले असले तर नकळे!

भीमराव's picture

2 Dec 2015 - 2:07 am | भीमराव

आवो काकु बरोबर है तेच, चांदणं आवसेलाच लखलखीत आसतय, पुनवला चांदुबामुळं ऊजेड लय आसतो पन तेजामुळं चांदण्याचा प्रकाश फिक्का पडतो, तेच्या उलट आवसला चंद्र नसतो म्हणुन मंग चांदण लखलखीत आसतय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Dec 2015 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त...लिहित राहा

गामा पैलवान's picture

1 Dec 2015 - 8:28 pm | गामा पैलवान

हाहाहा टाकीजवळच चौरस्तासुद्धा आहे : https://goo.gl/maps/3hDRmBXxZMs

-गा.पै.