प्रथम वंदून श्री सद्गुरु चरण आणी नमून सरस्वती गजानन करितो प्रारंभ सांगावया श्री सद्गुरु कथन.
सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ह्या सुंदर अभंगाने करावीशी वाटते
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मोगरा फुलला, मोगरा फुलला
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
संत श्रेष्ट ज्ञानेशवरांच्या ह्या सुंदर अभंगाचा नीट अर्थ उमजणे अत्यंत अवघड आहे . तो अर्थ लावून दुसऱ्यांना समजावणे तर त्याहूनही कठीण .प्रत्येकाने आपापल्या भावानुसार त्याचे अर्थ लावले आहेत आणी त्या त्या वेळेला त्या भावनेनुसार तो अर्थ बरोबर आणी पूरक आहे असे मला वाटते .हीच तर संत श्रेष्ट ज्ञानेश्वरांची किमया आहे .त्यांच्या भक्ती आणी ज्ञान रसांनी नटलेले अभंग प्रत्येकाला त्याच्या घेण्याच्या कुवती नुसार काही न काही देवूनच जातात . कोणिही रिता परतत नाही .मी ही माझ्या भावनेनुसार मला भावलेला अर्थ इथे प्रगट करत आहे.
संत श्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंची महती (निवृत्ती नाथ महाराजांची) ह्या अभंगाच्या निमित्याने अगदी थोडक्या शब्दांत मांडत आहेत .
ज्ञानेश्वर महाराजांना गहिवरून आले आहे आणी ते सद्गुरुचरणी अत्यंत लीन होऊन म्हणताहेत की ,तुम्ही माझ्यात लावलेल्या ह्या ज्ञानाच्या (मोगऱ्याच्या) रोपट्याला आता फुलें आली आहेत .हि ज्ञानरूपी मोगऱ्याची फुलें मी जेव्हढी म्हणून वेचीत आहे तेव्हढा त्या वेलीला आणखी बहर येत आहे आणी माझे ज्ञान वाढतच आहे . नित्य नवीन कळ्या येतच आहेत आणी मोगऱ्याची फुलें फुलतच आहेत . त्यांना अंतच नाही . त्या ज्ञानरूपी मोगऱ्याच्या सुगंधाने माझे चित्त मोहरून टाकले आहे .तुम्ही माझ्या द्वारी लावलेली हि ज्ञानरूपी इवलीशी मोगऱ्याची वेल आता गगनाचा ठाव घेवू लागली आहे .त्या वेलीला आता आकाश ही ठेंगणे होवू लागले आहे .त्या ज्ञानाचा परिमल इतरत्रही पसरुलागाला आहे.आपल्या मनाच्या गुंतीने ,बुद्धीच्या दोऱ्याने ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ज्ञान फुलांचा एक सुंदर भक्तिरूपी भरजरी शेला विणून तो त्या निर्गुण निराकार परब्रम्ह: विठ्ठलाला अत्यंत भक्ती भावाने अर्पण केला आहे.तो पर ब्रम्ह: म्हणजेच महाराजांचे सद्गुरु श्री निवृत्ती नाथ महाराज होत, कारण त्या विठ्ठला मध्ये आणी त्या सद्गुरून मध्ये वेगळे असे काय आहे? त्याच बरोबर असे ही म्हणता येईल कि महाराजांनी हा शेला अर्पून आपल्या आई वडिलांची (विठलपंत आणीरखुमाबाई ) कृतज्ञता व्यक्त केली आहे .त्यांच्या पोटी मनुष्य देहाने जन्म घेऊन ते धन्य झाले . त्यामुळेच त्यांना निवृत्ती नाथांसारखे सद्गुरु प्राप्त झाले. स्वत: मागे राहून , कोणताही मोठेपणा व उपाधी न घेता त्यांनी ज्ञानेश्वर माउलींना पुढे करून लोकहिताचे कार्य त्यांच्या कडून साधून घेतले.
सद्गुरू हे असेच असतात .सद्गुरूंनी एकदा का “माझा” म्हंटले कि ते आपल्या शिष्याला कधीही अंतर देत नाहित.जन्म जन्मांतरी ते त्याची साथ सोडत नाहित . त्याची सर्व काळजी सद्गुरु वाहतात .जो पर्यंत शिष्य पूर्ण ज्ञानी होऊन ते त्याला वसागरातून पार लावत नाहित तो पर्यंत सद्गुरु त्याच्या साठी पुन्ह: पुन्ह: जन्म घेत राहतात .सद्गुरु म्हणजे साक्षात पर ब्रम्ह:, त्यांनी आपल्या शिष्याच्या अंतरी लावलेली ज्ञानाची वेल ते कधीच सुकू देत नाहित. जन्मोजन्मी ते त्या वेलीची निगाह राखतात .तिला भक्तिच्या व सत्संगाच्या खतपाण्याने वाढिस आणतात . ही ज्ञानाची वेल रुजली की मग त्याला ज्ञान मोगऱ्याची फुलें येतात आणी त्याचा परिमल सर्वत्र पसरतो व दुसऱ्यांनाही अविट आनंद देवून जातो.
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 5:55 pm | स्पा
साक्षात निर्गुण रूप दिसले
धन्यवाद
27 Nov 2015 - 6:01 pm | खेडूत
__/\__
27 Nov 2015 - 6:08 pm | pacificready
सुंदर लिहिलंय ___/\___
27 Nov 2015 - 6:27 pm | विश्वव्यापी
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
27 Nov 2015 - 6:53 pm | मूकवाचक
__/\__
27 Nov 2015 - 10:24 pm | विशाल कुलकर्णी
वाह, सुंदर !
27 Nov 2015 - 10:29 pm | पद्मावति
अतिशय सुंदर!
27 Nov 2015 - 10:32 pm | DEADPOOL
सुंदर!
28 Nov 2015 - 10:18 am | विश्वव्यापी
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे.
28 Nov 2015 - 6:59 pm | आनन्दा
सोबत तुनळीची लिंक पण द्या.. म्हणजे ऐकता पण येईल.. बाकी लेख मस्त.
28 Nov 2015 - 9:55 pm | गामा पैलवान
विश्वव्यापी,
अप्रतिम रचना आहे. त्यावर तुमचं विवेचन म्हणजे दुधात साखर. फक्त ते गगनावरी नसून गगनावेरी आहे. वेलू आभाळाच्या वर गेला नसून आभाळापर्यंत पोहोचलाय. :-)
बाकी, ज्याला त्याला भावेल तशा पद्धतीने रचनेतून अर्थ व्यक्त होतो. माऊलींची प्रतिभा अनुपमेय आहे! मला हे गाणं यौगिक रहस्याचं वर्णन वाटतं.
१.
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला : फूल म्हणजे सुमन = सु + मन. तर सुमने वेचीत असतांना कळ्या बहरल्या यातून मन अनंतप्रसव आहे असं सूचित होतं. असं असलं तरीही मन सु म्हणजे आत्मानुगामी (= आत्म्याच्या मागोमाग जाणारे) आहे. थोडक्यात कुंडलिनी जागृत झाल्याचं हे लक्षण आहे. ही फुले म्हणजे सुवासना आहेत. अशा योग्याचा जगाशी संबंध आला तरीही त्यातून बद्धवासना ऐवजी आत्मप्रत्यय आणून देणाऱ्या सुवासनाच उत्पन्न होताहेत. आत्मवस्तूमध्ये जगद्वस्तूचा लय होत आहे.
२.
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी :
हे रोप म्हणजे सुप्त कुंडलिनी आणि द्वार म्हणजे मूलाधार चक्र. ती जागृत होऊन तिचा वेलू गगनापर्यंत पोहोचला. गगन म्हणजे जिथे गं गं असा ध्वनी संतत चालू असतो ते ठिकाण. आपल्या मस्तकाच्या आत जिभेच्या टाळूच्या थोडं वर कमलगर्भाच्या आकाराचं आकाश असतं. यांत कुंडलिनी पोहोचली की भ्रामरी ऐकू येऊ लागते. हेच ते गगन.
३.
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला :
मनाचेच धागे गुंफून वस्त्र विणले आणि विठ्ठलरखुमाईस अर्पण केले. वस्त्र उभ्याआडव्या धाग्यांचे बनलेले असते. म्हणून ते जगद्रूपी द्वंद्वाचे प्रतीक आहे. हे द्वंद्व विठ्ठल + रखुमाई यांना एकत्रितपणे अर्पण केले. इथे द्वंद्वाचा मीलनात उपशम होतो आहे.
४.
मोगरा फुलला, मोगरा फुलला :
मो ज्याचा गर आहे तो मोगरा.
आता, मो = म् + ओ
म्हणून मो हे ओम् चे विपरीत प्रतीक आहे. जर ओम् हे ब्रह्मबीज धरले तर मो हे जगद्बीज धरायला हरकत नाही. म्हणून मोगरा हे जगाचे प्रतीक झाले.
असो.
जसा मनाला भावेल तसा अर्थ लावला आहे. गोड मानून घेणे. :-)
आ.न.,
-गा.पै.
28 Nov 2015 - 10:00 pm | मांत्रिक
दंडवत घ्या भौ!!! ऊठसूठ हिंदु धर्म परंपरा, साधुसंत यांचेविषयी फालतू टुकार शेरेबाजी करणारांस चांगली सुनावलीत!!!
28 Nov 2015 - 11:45 pm | विश्वव्यापी
क्या बात पैलवान साहेब,
हे गाणे म्हणजे एक अमुल्य योगिक हिराच आहे.
आपण दिलेला अर्थ हा अधभूत व पर्याप्त च आहे.
ह्या हिर्याचा आणखी एक पहलू तुम्ही आज समोर आणल्या बद्दल तुमचे खुप आभार. तुम्हाला माझा सलाम.
29 Nov 2015 - 11:55 am | आदूबाळ
बाबौ! म्हणजे नक्की काय आहे?
29 Nov 2015 - 11:55 am | आदूबाळ
बाबौ! म्हणजे नक्की काय आहे?
28 Nov 2015 - 10:03 pm | मांत्रिक
बाकी वारीयाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चालेचा खरा आध्यात्मिक अर्थ कुणी सांगेल का? मला एका सत्पुरुषाने सांगितलेला होता. पण आता विसरलोय. थोडंच लक्षात राहिलंय.
28 Nov 2015 - 11:39 pm | विवेक ठाकूर
बराच स्टडी दिसतोयं तुमचा, छान लिहीलंय! मूळ पोस्टपेक्षाही तुमचा प्रतिसाद सरस आहे.
28 Nov 2015 - 11:55 pm | संदीप डांगे
सुंदर, अतिसुंदर.
29 Nov 2015 - 12:02 am | प्रसाद गोडबोले
अप्रतिम !
यनावाला सरांची राहुन राहुन आठवण झाली :)
29 Nov 2015 - 12:18 am | अद्द्या
चांगलं लिहिता
बाकी ते "परत परत जन्म घेतात " इत्यादी चान चान ..
29 Nov 2015 - 12:40 am | संदीप डांगे
हा धागा आणि प्रतिसाद वाचता वाचता सहज भाव गुणगुणले, ते मग रेकॉर्ड केले मोबल्यावर. अतिशय सुंदर अमूर्त भावनेत पोचवणार्या लेख आणि प्रतिसादाला माझ्यातर्फे वेगळ्याप्रकारे दाद... गोड मानून घ्या. (लतादीदींशी तुलना करू नका. :-) )