नवरात्र जल जागर : माळ सहावी

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 7:58 am

==================================================================

नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...

==================================================================

आजच्या माळेतील श्री डी. एस. चौधरी, कृषी सहायक, (वडूल मंडल कृषी विभाग. मो. 7588635781. यांच्याशी झालेला दूरध्वनी वार्तालापाचा गोषवारा:
डी एस चौधरी यांना अश्या सामाजिक कार्याची स्फूर्ती डॉ लक्ष्मण आसबे यांच्या कामधेनु परिवार यांच्या सेवाभावी कार्यातून मिळाली.डॉ लक्ष्मण आसबे निराधार विधवा,अनाथ मुले यांचे साठी शिक्षण व स्वयंरोजगारासाठी कामधेनु परिवार म्हणून संस्था सातारा जिल्ह्यात चालवितात. त्या माध्य्मातून विधवा निराधार स्त्रीयांना स्वयंपूर्ण बनविने आणि त्यांचे मुलांना मुख्य प्रवाहात आणून शिक्षण देणे याकरीता त्यांचे सहकारी काम करीत आहेत. अशाच एका कार्यक्रमात चौधरी यांना डॉ लक्ष्मण आसबे यांनी "तुझा जनसंपर्क दांडगा आहे,तू काही समाजोपयोगी काम का करीत नाहीस” असे विचारले आणि चौधरी यांना दिशा मिळाली
कामधेनु परिवार खटाव तालुका यांचे कामाने भारावून आपणही समाजाचे देणे लागतो तर आपल्या फिरतीच्या कामाचाच उपयोग करून चौधरी यांनी ते शासकीय कामाकरीता जेथे जेथे भेट देत तिथे शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून अनाथ मुलांची माहीती संकलन करून ग्राम सभेत देत असत. त्यांच्या पालन पोषणाचा खरच जर गावकरी काही अंशी उचलणार असतील तर त्यांची सोय कामधेनु परिवार खटाव येथे करण्याची तजवीज करीत आहेत.
त्यांच्या नेहमीच्या कामाचे रेट्याव्यतीरिक्त त्यांना अतिरिक्त पदभार दिलेल्या भागातही त्यांनी लक्षणीय कामगीरी केली आणि जिल्हाधिकार्यांकडून कौतुक मिळविले.

विशेष सांगण्याची बाब म्हणजे शासनाकडून शेतकर्याचा अपघात विमा उतरविला जातो (रू १ लक्ष रकमेचा) त्याचा हप्ता शासन भरते. अश्या दुर्दैवी घटनेतील कायदेशीर वारसदारास (विशेषतः विधवा निराधार स्त्रीस) कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करताना अक्षरशः मेटाकुटीस येते आणि तीचा दावा रेंगाळत राहतो.कुणाचे पाठबळ नाही,पुरेशी माहीती नाही या कारणास्तव ती न्याय्य हक्काच्या विमा रकमेपासून वंचीत राहते आणि तीची आर्थीक फरपट होते.नेमकी हीच अडचण ओळखून चौधरी त्या अभागी स्त्रीस त्यांचे तालुक्यातीस समविचारी मित्र मंडळी यांच्या सहय्याने सर्व कागदपत्रांची पूर्तात करून दावे लवकर निकाली निघावेत यासाठी प्रयत्न करतात. दावा दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष दावा रक्कम त्या वारसदारास मिळेपर्यंत पाठपुरावा करतात. वेळप्रसंगी पदरमोड करून संबंधीत अधिकार्यास भेटून अडचणी सोडविण्यास पुढाकार घेतात.त्याची परिणाम स्वरून लाभार्थी महिला आणि तीचा परिवार कामधेनु परिवार खटाव मधे जोडला जातो आणि संस्थेलाही एक सक्षम कार्यकर्ता(कामधेनु परिवार) मिळतो.

मिपा परिवारचे वतीने मी डी. एस. चौधरी, कृषी सहायक,साहेबांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेतच तुम्हीही द्या ही आग्रहाची विनंती. संपर्क क्रमांक ७५८८६३५७८१

रब्बीसह उन्हाळी पिकांच्या पाण्याचा सुटला प्रश्न
-ढोकीकर अनुभवताहेत जलसमृद्धी
शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे तहानलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी गावाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून विविध कामे केली. त्यातून पाण्याची साठवण क्षमता, परिसरातील विहिरी आणि बोअरच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. आता रब्बीसह उन्हाळ्यातही पिकांना पाण्याची उपलब्धता झाली आहे. खऱ्या अर्थाने जलसमृद्धीचा अनुभव ढोकीकर घेत आहेत.
सुदर्शन सुतार

बार्शी-लातूर महामार्गावरील ढोकी हे सुमारे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव. भौगोलिक क्षेत्र सुमारे 2442 हेक्‍टर आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना याच गावात आहे. या कारखान्यामुळे गावाची ओळख तशी सर्वदूर. तेरणा प्रकल्पाचे "बॅकवॉटर' लाभल्याने आणि गावातच कारखाना असल्याने पूर्वी गावात उसाची शेती सर्वाधिक होती. सुमारे 60 टक्के क्षेत्र बागायती होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कारखाना बंद पडला. त्यातच सलग तीन-चार वर्षांत सततच्या दुष्काळामुळे गावची आणि परिसरातील पाणीपातळी खोल गेली. ती अगदी गेल्या वर्षापर्यंत जवळपास 13 मीटरपर्यंत. याचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्यावर झाला.

"तेरणा'चे पाणीही बंद
पिण्याच्या पाण्यासाठी गावची ढोक ओढ्यात पाणीपुरवठा विहीर पाण्याअभावी बंद आहे. त्यानंतर नव्याने तेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून ढोकीसह चार गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आखली; पण तेरणा प्रकल्पातच जेमतेम पाणीसाठा असल्याने या प्रकल्पातूनही पाणी मिळणे बंद झाले आहे. आज गावात पाच-सहा चांगले बोअर आहेत. गावातील काही दानशूर, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे ते गावच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्याचा प्रयत्न करतात.

"एकात्मिक'चा लाभ
जलयुक्त शिवार अभियानासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील 300 गावांची निवड झाली; पण काही तांत्रिक अडचणींमुळे नेमकी ढोकीची निवड होऊ शकली नाही. मात्र, अतिशोषित पाणलोटातील गाव असल्यामुळे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात निवड झाली. या योजनेसाठी 2 कोटी 56 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला. पहिल्या वर्षी मिळणारा 10 लाख 28 हजार रुपये निधी ग्रामपंचायती रस्ते, दिवाबत्ती, वीज यांसारख्या कामांसाठी अपेक्षित होता. मात्र, पाण्याची समस्या लक्षात घेऊन ढोक ओढ्याच्या खोलीकरणासह परिसरातील कंपार्टमेंट बंडिगचे काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ग्रामस्थांना या कामांसाठी प्रवृत्त करणे हे जिकिरीचे काम होते. त्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नारायण समुद्रे, सरपंच सौ. सुनंदा माणिक आवटे, उपसरपंच अमर समुद्रे यांच्यासह एकात्मिक पाणलोट समितीचे सचिव दिनेश पांचाळ, सदस्य अखिल काझी, मंगेश तिवारी, निहाल काझी, गुणवंत सुतार, सतीश वाकुरे, माणिक आवटे, शोभा समुद्रे, चंद्रकला माळी, शकाफत पठाण, वैभव रोंदवे, प्रभाकर गाढवे, गफ्फार काझी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोट्टावर, तालुका कृषी अधिकारी डी. आर. जाधव, मंडल कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, पर्यवेक्षक एस. जी. सुरवसे, कृषी सहायक आर. आर. माकोडे आदींनी लोकांना कामाचे महत्त्व पटवून दिले.

खोलीकरणही झाले, रस्ताही मिळाला
गावच्या बाजूने ढोक ओढा वाहतो आहे. दरवर्षी त्यातून वरच्या बाजूने आलेले पाणी पुढच्या गावाला वाहून जायचे. मात्र, या वर्षी गावकऱ्यांच्या एकीमुळे ओढ्याच्या खोलीकरणाला, सरळीकरणाला सर्वानुमते मान्यता मिळाली. अवघ्या महिनाभरात एप्रिलमध्ये सुरू केलेले सुमारे 800 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि तीन मीटर खोलीचे काम पूर्ण झाले. त्यातून 22 टीसीएम पाणी क्षमता तयार झाली. गाळ आणि माती ओढ्याच्या एका बाजूला टाकण्यात आली. त्यातून पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तम रस्ताही तयार झाला. याच ओढ्यात 10 "रिचार्ज शाफ्ट' घेण्यात आले. त्यामुळे पाणी मुरण्याची क्रिया चांगली होते. यंदा सप्टेंबरमध्ये थोडा पाऊस झाला. मात्र, पाणी पूर्णतः मुरले. परिणामी परिसरातील विहीर आणि बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली.

746 टीसीएम साठवण क्षमता वाढली
याशिवाय गाव परिसरातील 1600 हेक्‍टर क्षेत्रावर हाती घेतलेली कंपार्टमेंट बंडिंगची कामे जवळपास संपली. पहिल्या टप्प्यात 833 हेक्‍टर म्हणजे 50 टक्के काम पूर्ण झाले. त्यात सुमारे 720 टीसीएम पाणी साठणार आहे. ओढ्याच्या खोलीकरणामुळे 22 टीसीएम पाणीसाठवण क्षमता वाढली. गावच्या परिसरातील दोन सिमेंट बंधाऱ्यातील 4 टीसीएम पद्धतीने 746 टीसीएम पाणीसाठवण क्षमता नव्याने तयार झाली आहे.

विहीर, बोअरच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ
ढोक ओढ्याच्या परिसरात 24 विहिरी आणि 33 बोअर आहेत. ापैकी 13 विहिरी आणि जवळपास 27 बोअरच्या पाण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विहिरींची पाणीपातळी 9 मीटरपर्यंत वर आली आहे. सलीम काझी यांच्या 50 फूट विहिरीतून सहज हाताने पाणी घेता येईल अशी स्थिती आहे. निहाल काझी यांच्या शेततळ्यात सात ते दहा फुटांपर्यंत पाणी साठले आहे. गोविंद तिवारी यांच्या विहिरीत 35 फूट आणि सत्यजित देशमुख यांच्या कोरड्या पडलेल्या विहिरीतही 20 फुटांपर्यंत पाणी आहे.

उन्हाळ्यासाठीही पाणी उपलब्ध
गेल्या दोन-तीन वर्षांपासून खरीप हाती लागत नाही. रब्बीही जेमतेमच मिळतो. यंदा रब्बीच्या पिकांनाही पाणी मिळाले आहे. बोनस म्हणून उन्हाळी हंगामात पाणी उपलब्ध होणार आहे.

लोकप्रतिनिधींची मदत
गावकऱ्यांचा उत्साह आणि कामाची धडपड पाहून उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही त्यांना प्रोत्साहन देत आमदार निधीतून अडीच लाख रुपयांचा निधी दिला. गाव परिसरातील शेतकऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने शक्‍य ती आर्थिक मदत दिली.

मान्यवरांनी दिली भेट
यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली होती. अशात एकात्मिक पाणलोट विकास योजनेतून कामे करून पाण्याविषयी आपली जागरूकता दाखवणाऱ्या ढोकीकरांच्या प्रयत्नाला दाद देण्यासाठी म्हणून गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भेट देऊन गावकऱ्यांचे कौतुक केले.

गावकऱ्यांच्या आणि कृषी विभागाच्या सहकार्यामुळेच आम्ही जिकिरीची कामे करू शकलो. यापुढेही पाण्याच्या वापराबाबत आणि बचतीबाबत काम हाती घेऊ.
सौ. सुनंद आवटे, सरपंच, ढोकी, ता. जि. उस्मानाबाद

कोणत्याही कामासाठी विरोध होत असतोच; पण ढोकीकरांनी सकारात्मक प्रयत्नाला समजून घेत सहकार्य केले.
-अमर समुद्रे, उपसरपंच, ढोकी

पाणीप्रश्‍नावर लोकांची सकारात्मकता वाढते आहे हे ढोकी गावात झालेल्या कामांनी दाखवून दिले आहे.
-शंकर तोट्टावर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद

विहीर घेतली, पण पाणी नव्हते. यंदा कंपार्टमेंटच्या कामामुळे पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. जवळपास 40 ते 45 फूट पाणी आहे. दरवर्षी सोयाबीन, उडीद अशी पिके घेत होतो. यंदा कांदा, ऊस यांसारखी पिके घेणार आहे.
सलीम काझी, ढोकी

संपर्क --
अमर समुद्रे, उपसरपंच- 9404676654
आर. आर. माकोडे, कृषी सहायक – 9422935141

साखळी सिमेंट बंधाऱ्यामुळे दुष्काळाचे सावट हटले

सातारा जिल्ह्यामधील म्हासुर्णे (ता. खटाव) या कायमस्वरूपी दुष्काळसदृश गावामध्ये कृषी विभागाने साखळी सिमेंट बंधारे उभारल्याने गाव तसेच परिसराला जणू जीवदान मिळाले आहे. बंधारे बारमाही जलमय राहण्याच्या इराद्याने गावकऱ्यांनी लोकसहभागातून गावाजवळून वाहणाऱ्या उरमोडी व टेंभू योजनेच्या कालव्यामधील पाणी बंधाऱ्यात घेतले. आजमितीला सर्व महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना या गावामधील 60 टक्के शेतीला पुरेसे पाणी मिळत आहे. यामुळे गावाचा दुष्काळ हटला. शेतीमध्ये हंगामी पिकांऐवजी जवळजवळ बारमाही पिके डोलू लागली आहेत.

वडूज (ता. खटाव) पासून दक्षिणेस 20 किलोमीटरवर मल्हारपेठ ते पंढरपूर मार्गावर म्हासुर्णे हे गाव आहे. माण व खटाव या दुष्काळी तालुक्‍यांतील गावांप्रमाणे याही गावामध्ये वर्षानुवर्षे दुष्काळ ठाण मांडून असायचा. गावाला टंचाईस्थितीच्या निकषाखाली टॅंकरने पाणीपुरवठा व्हायचा. जनावरांच्या छावण्याही असायच्या; परंतु 2013-14 नंतर कृषी विभागाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम झाल्यामुळे गावावरील दुष्काळाचे सावट दूर झाले आहे.

गावात 2 हजार 835 हेक्‍टर शेतीचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे 2 हजार 200 हेक्‍टर क्षेत्र वहितीखाली येते. लोकसंख्या सुमारे नऊ हजार. प्रत्येक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन हे शेती आहे. शेतीमध्ये ज्वारी, बाजरी व कडधान्ये ही पीक पद्धत. देशभरात पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर व जुन्नरचा परिसर तसेच म्हासुर्णे व याच तालुक्‍यातील पुसेगावचा परिसर खरिपामधील बटाटा पिकासाठी पोषक आहे, त्यामुळे बटाट्याचे उत्पन्न हे म्हासुर्णेच्या शेतीची जमेची बाजू; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे याही पिकाची खात्री देता येत नाही. परिणामी उदरनिर्वाह चालवण्यासाठी गावातील अनेकांनी कुणाच्या तरी आधाराने मुंबईसारख्या शहरात मिळेल ते उत्पन्नाचे साधन पकडले आहे. यामधील 20 टक्के लोक दुष्काळ व पाण्याच्या तीव्रतेमुळे आजही गावाकडे फिरकत नाहीत.

2013-14 नंतर तयार झालेले बंधारे मोठ्या ओढ्यावर असल्याने बारमाही जिवंत पाणीसाठे तयार झाले. सुरवातीला पहिला बंधारा उभारत असताना हे काम कोल्हापूर पद्धतीप्रमाणे असल्याचा गावातील लोकांचा समज झाला. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील लाकडी फळ्यांचे दरवाजे वर्षभरामध्ये कुजून जायचे तर लोखंडी दरवाजे असल्यास चोरी व्हायची, त्यामुळे हे बंधारे असून नसल्यासारखे होते. सुरवातीला साखळी सिमेंट बंधारा उभारत असताना गावकऱ्यांना एकत्रित बोलावून बदलत्या तंत्रज्ञानाबाबत जाणीवजागृती करण्यात आली. त्यातून शंभर टक्के लोकांचा सहभाग घेण्यात आला. 36 मीटर लांब व 3 मीटर पाणीसाठा उंचीचा पहिला बंधारा उभारण्यात यश आले.

बंधारा उभारण्यात गावकऱ्यांचे मोठे परिश्रम
पहिला बंधारा उभारत असताना कारगिरांच्या बरोबरीने गावातील वयोवृद्ध व महिलांनीही कष्ट घेतले. बांधकामापासून ते माल वाहतूक व पाणी मारण्याच्या कामातही गावकऱ्यांनी मोलाची मदत केली. सिकंदर नबीलाल मुल्ला, संजय सोपान माने व भरत परशुराम माने यांनी कोणताही पूर्वानुभव पाठीशी नसताना बंधाऱ्याचे बांधकाम केले. परिणामी आजमितीला ते तिघे जण आता बंधारे बांधकाम ठेकेदार बनले आहेत.

बंधारा उभारताच सुदैवाने टेंभू योजनेतील पाणी सायफन पद्धतीने घेऊन तो तुडुंब भरण्यात आला. याचा फायदा असा झाला, की सिमेंट बंधाऱ्याखालील क्षेत्रातील विहिरींची पाणीपातळी ऐन उन्हाळ्यात खूपच वाढलेली दिसली. याआधी कधीसुद्धा हे चित्र गावकऱ्यांना पाहता आले नाही. ते स्वप्न या कामाच्या माध्यमातून पूर्ण झाले. यानंतर गावातील प्रत्येकाने यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व कृषी विभागाची बंधारे उभारणीची मोहीम पूर्णत्वाकडे नेली.

गावची भौगोलिक रचना अशी आहे, की गावच्या दक्षिण व उत्तर बाजूस चढ आहे. शिवाय गावाच्या कडेने चंद्राकृती आकाराचे दोन मोठे ओढे आहेत आणि गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही त्याच ओढ्यांच्या आजूबाजूस आहेत. त्यामधील एका ओढ्याला पहिल्या चार बंधाऱ्यासाठी उरमोडी योजनेचे पाणी सायफन पद्धतीने व उरलेल्या 5 बंधाऱ्यांसाठी दोन्ही योजनांचे पाणी मिळू शकते. याच वर्षी लोकांनी लोकसहभागातून 1 लाख 60 हजार व 2 लाख 80 हजार रुपये रक्कम दोन टप्प्यांमध्ये अशी 4 लाख 40 हजार रुपये लोकवर्गणी जमा केली. जमा केलेल्या लोकवर्गणीतून पाण्याची दोन आवर्तने आतापर्यंत मिळाली आहेत. नऊ बंधाऱ्यांमध्ये 191.3 टीसीएस पाणीसाठा झाला आहे. सर्व महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असताना गावामधील 60 टक्के लोकांना पुरेसे पाणी मिळू लागले आहे. त्यातील कष्टाळू शेतकऱ्यांनी बंधाऱ्याजवळ विहिरी खोदून त्यामधील पाणी पाइपलाइन करून लांब अंतरावरील शेतीला पुरवले आहे. अजूनही भविष्यात दुष्काळ जाणवला तरी बऱ्याचअंशी पाण्याची खात्रीशीर सोय या गावामध्ये झाली आहे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटला आहे.

पीक पद्धतीत बदल झाला
गावामधील सिद्धनाथ, रेणुका तसेच भैरवनाथ शेतकरी बचत गटांनी एकत्रित येऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी ठिबकद्वारा वापर करण्याचा निश्‍चय केला आहे. पाण्याची सोय झाल्यामुळे ज्वारी व बाजरीबरोबर ऊस, भाजीपाला, आले, केळी पिकाकडे शेतकरी वळले आहेत, तर खरीप बटाट्याच्या लागवडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच कांद्याचे पूर्वी तुरळक क्षेत्र असायचे. ते आता सुमारे 30 हेक्‍टरपर्यंत वाढले आहे.

कृषी विभागाने उभारलेल्या बंधाऱ्यांच्या पश्‍चिम काठाला माझी शेती आहे. माझ्या ज्वारीचे पीक ऐन फुलोऱ्यात आल्यानंतर माझ्या विहिरीचे पाणी पूर्ण संपले होते. पीक हातातून जाण्याची भीती होती. मात्र टेंभू योजनेचा कालवा आमच्या गावाच्या दक्षिण हद्दीतून गेला आहे. या कालव्यामधून सायफन पद्धतीने पाइप टाकून माझ्या जमिनीलगतच्या ओढ्यातून पुढे सांगली जिल्ह्यातील येतगावला पूर्वीपासून पाणी नेले जायचे. आम्हाला मात्र त्या वाहून जाणाऱ्या पाण्याकडे बघत बसण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. या वर्षी मात्र या पाण्याला सिमेंट बंधाऱ्यामुळे अडवू शकलो. ज्वारी व उसाचे पीक सुरक्षितपणे हाती लागले. शिवारातील विहिरी ऐन उन्हाळ्यात भरपूर पाण्याने भरल्या. कृषी विभागाने पुरवलेल्या मका बियाण्यामुळे आम्ही ऐन उन्हाळ्यात हिरवा चारा उत्पादन करू शकलो, त्यामुळे गावात जनावरांच्या छावणीची गरज पडली नाही.
-राजाराम गोविंद माने, मो. 9890901580.

गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि बंधारे उभारण्याच्या कामी मदत केली. पाण्याची उपलब्धता झाल्यावर पीक पद्धतीत बदल केले. त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसत आहेत.
डी. एस. चौधरी, कृषी सहायक, वडूल मंडल कृषी विभाग. मो. 7588635781.

आमची पावणेदोन एकर शेती आहे. बंधारे उभारण्याआधी शेती पिकत नव्हती. पाण्याची उपलब्धी झाल्यानंतर आम्ही पिके घ्यायला सुरवात केली. आम्ही याआधी शेती पिकत नसल्याने बंधारे उभारणीच्या कामावर मजूर म्हणून काम करत होतो. पाण्यामुळे मोठा बदल झाला आहे. सध्या कांदा लागवडीची तयारी सुरू आहे.
- मालन शिवाजी मोरे

उरमोडी व टेंभू योजनेतील पाण्यातून उभारलेले सिमेंट बंधारे पूर्ण भरल्यामुळे गावच्या शिवारातील लोक या वर्षीचा दुष्काळ सहन करू शकले. त्याबद्दल कृषी विभागाचे आम्ही आभारी आहोत.
-भरत परशुराम माने, मो. 9763864456.

समाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

वाचला लेख. या कामात सातत्य राखणे मात्र अतिशय महत्त्वाचे आहे. केवळ आता बारमाही पाणी उपलब्ध आहे म्हणून ऊस वगैरे पाणीखाऊ व मातीचा कस संपविणारी पिके घेण्याच्या नादाला लागू नये.

पैसा's picture

20 Oct 2015 - 1:11 pm | पैसा

+१ नाहीतर बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू व्हायचा!

धन्यवाद नाखु, एवढी चांगली माहिती आणून आमच्यासमोर ठेवता आहात. यावर्षी जे लोक झोपेत राहिले त्यांची अवस्था काय असेल हे आताच कळते आहे. कोकणात, गोव्यात पाणीटंचाई कधी नसते असे वाटत होते, पण इथे बराच बर्‍यापैकी पाऊस झाला तरी गेले ८ दिवस नळाला पाणी कमी येत आहे कारण धरणात पुरेसे पाणी नाही म्हणे. रोज रात्री १२/१ वाजता उठून पाणी भरून ठेवावे लागते आहे.

अनुप ढेरे's picture

19 Oct 2015 - 10:05 am | अनुप ढेरे

टीसीएम या एककाचा फुल्फॉर्म काये?

टीएम्सी असे माहीतीय. थाऊजंड मिलियन क्युबिक फूट. हे एकक मोठ्या जलसाठ्यासाठी वापरले जाते. धरणाचा साठा, विसर्ग वगैरेसाठी हेच एकक शासकीय यंत्रणांकडून वर्तमानपत्रात वापरले जाते असे वाचनात आहे.

अनुप ढेरे's picture

20 Oct 2015 - 2:21 pm | अनुप ढेरे

मलाही तेच माहितिये.
वर

गावच्या परिसरातील दोन सिमेंट बंधाऱ्यातील 4 टीसीएम पद्धतीने 746 टीसीएम पाणीसाठवण क्षमता नव्याने तयार झाली आहे.

यातलं ७४६ हा आकडा टीएम्सी नसावा. खूप जास्तं होइल ते.

अभ्या..'s picture

20 Oct 2015 - 1:25 pm | अभ्या..

नाखुनकाका,
कामधेनु परिवाराची उस्मानाबादी शेळ्यापालनासंदर्भात एक फुल्ल पेज अ‍ॅड वाचनात आलेली होती. योजना कागदावर आकर्षक वाटत होती. पण शंकेची पाल अजून चुकचुकत आहेच. पर्ल्स अ‍ॅग्रो, एमू पालन, मश्रूम, अशामध्ये तर गणना नाही ना होणार. ५ वर्षाखाली महिला बचत गटाचे अन मायक्रो फायनान्स चे किस्से हजारोनी आहेत म्हणून विचारले.
राष्ट्रवादीने इलेक्षनमध्ये महिला बचत गटाचा प्रभावी वापर करुन घेतला ते आपणास माहीत असेलच.

नाखु's picture

20 Oct 2015 - 2:20 pm | नाखु

तो कामधेनु परिवार आणि मी उल्लेखलेला सातार्यामधील स्वयंसेवी संस्थेचा काहीही संबंध नाही . नाव सोडून. माझ्या लेखातील संस्था महिला सबलीकरण (सरकारी शब्द) आणि स्वयंरोजगार, अनाथ मुले स्त्रीया यांचे पुनर्वसन यावर काम करतो.

तरी संबंधीताला फोन करून खातर जमा करून घेतो.

खुलासे दार नाखु