==================================================================
नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...
==================================================================
आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद:
ही लेखमाला लिहिताना यशस्वी लाभार्थी आणि संबधीत अधिकारी याच्याशी व्यक्तीशः संपर्क केला त्याचे अनुभव आणि झालेला संवाद+माहीती त्या त्या धाग्यावर देणार आहेच.
झालेल्या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे :
- शहरी नोकरदार माणसांबद्दल सरसकट अढी नाही. ( तथाकथीत स्वयंभू नेत्यांनी संघटनांनी गैरसमज पसरविण्याचे काम गेली २ दशके इमाने इतबारे केले आहे असे असूनही हे विशेष)
- त्यांच्याशी बोलताना,आप्ल्या कामाची दखल शहरातही घेतली जाते याचा निर्भेळ आनंद जाणवला.
आजच्या माळेतील श्री नवनाथ पाठक उपसरपंच (घाट शिरस) यांच्याशी झालेला दूरध्वनी वार्तालापाचा गोषवारा:
नवनाथ अतिशय प्रतीकूल परिस्थीतीतून वर आलेले आहेत. स्वतःची फक्त २ एकर जमीन तीही कोरडवाहू.पण मित्रांच्या मदतीने आणि सहकार्याने सामुहीक शेती (१० वर्षांपूर्वी असा धाडसी प्रयोग) केली.तालुक्यात ठिबक सिंचनाचा प्रसार आणि वापर व्हावा म्हणून स्वतःपासून सुरुवात केली. योग्य नियोजन आणि पारंपारीक पीक पद्धतीला फाटा देऊन डाळींब फळबाग फुलवली. वैयक्तीक सहभाग आणि काळजीपूर्वक देखभाल यामुळे डाळींबाचे विक्रमी उत्पादन काढले. त्याचा प्रिणाम म्हणून गावातील इतर शेतकरीही पारंपारीक पीक पद्धतीत (जी काही ठिकाणी तोट्यात होती) बदल करण्यास उस्फुर्तपणे पुढे आले.
नवनाथ आणि त्यांच्या मित्रपरिवारने अश्या प्रगतीशील शेतकर्यांना सहाय्य व मार्गदर्शन केले.ठिबक सिंचनचा अनुभव असल्याने अश्या शेतकर्याना नवीन ठिबक जोडणी (फक्त मजूरी काम) मोफत करून दिले.(दर एकरी किमान रू १५०० ते २००० मजूरी घेतली जाते) शहरी माणसांना ही रक्कम किरकोळ वाटेल पण लाभार्थी शेतकर्यांच्या दृष्टीने ही मोठी रक्कम आहे.
मित्रमंडळीच्या सहभागातून स्थापन झालेल्या सहकारी संस्थेने २१ गुठे जागेवर नेट शेड (पॉली हाउस) बांधले त्यात सिमला मिर्ची यासम नगदी उत्पादन देणारी भाजीपाला उत्पादने घेतली.आपले काम पारदर्शक आणि निरपेक्ष असेल तरच लोकांचा विश्वास बसतो हेही त्यांनी आवर्जून सांगीतले.
जलयुक शिवार कामे करताना सरकारी कामे बरेचदा अर्धवट अवस्थेत सोडली जातात आणि निव्वळ शेवट्च्या १० रुपयांचे काम न झाल्याने (आधी त्या प्रक्ल्पावर्/कामावर खर्च केलेले ) ९० रुपये अक्षरशः पाण्यातच काय पाण्याबरोबर वाहून जातात हे कटु असले तरी सत्य आहे. सरकारी तिजोरीतील पैशाची अशीही उधळपट्टी चालू असते. हे शहरी माणसांच्या फारसे निदर्शनास येत नाही (कदाचित यात बातमी मूल्य नसेल म्हणबंधार्य्बंधार्यामधील गाळ वाळू-दगडमिश्रीत असल्याने शेतात वापरता आला नाही परंतु तो नाला-बंडीग्,बांध बंदीस्तीसाठी वापरला.(तेव्ह्ढीच वाहतूक खर्चात बचत). शहरात लोकांचा कचरा गावाबाहेर नेऊन टाकण्याचा खर्च समजला तरी मिपाकरांचे डोळे दिपतील.
सध्या नवनाथ आणि त्यांचे सहकारी यांनी घाट्शिरस येथील एम आय तलाव शुद्धीकरणाचा प्रस्ताव शसकीय पातळीवर पाठविला आहे.अंदाजपत्रक अदमासे १ कोटीचे वर आहे.यामध्ये गाळ काढणे , निर्जीव जल्स्तोत्रांचे पुनरूज्जीवन्,पाणी गळती रोखणे, वनराई बंधारे इत्यादी कामे समाविष्ट आहेत.
मिपा परिवारचे वतीने मी नवनाथ यांना अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेतच तुम्हीही द्या ही आग्रहाची विनंती.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. साहजिकच पिकांची विविधता जपण्यास मर्यादा येतात. दरवर्षी अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तालुक्यातील घाटशिरस हे संपूर्णतः पावसावर अवलंबून असणारे गाव आहे. गावात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता असावी यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे झाली. वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होण्यास त्यामुळे मदत झाली आहे.
संदीप नवले
नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यापासून सुमारे दहा-पंधरा किलोमीटरवर डोंगररांगांच्या कुशीत घाटशिरस गाव आहे. वृद्धेश्वराचे देवस्थान असल्याने डोंगरातील गाव म्हणून ते ओळखले जाते. पाण्याचा कुठलाही स्रोत नसल्याने पूर्णपणे ते पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाळ्यातच पिके घेतात. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून कमी होत चाललेल्या पावसामुळे गावात बेरोजगारांच्या संख्येत वाढू लागली आहे.
गावाची पार्श्वभूमी
गावाचे भौगोलिक क्षेत्र 1, 303 हेक्टर असून, लोकसंख्या सुमारे तीन हजार एवढी आहे. गावाचे सरासरी पर्जन्यमान 350 मिमी असले तरी प्रत्यक्षात त्याहून अल्प पाऊस होतो. गेल्या वर्षी गावात सरासरी 150-175 मिमी, तर यंदा फक्त 359 मिमी. पाऊस झाला. मूग, उडीद, सोयाबीन, मका, तूर, चारा पीके घेतली जातात. रब्बीत गहू, हरभरा, ज्वारी, गळीतधान्य अशी पिके असतात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून कमी होत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीसाठी जाण्याची वेळ येत होती.
ही परिस्थिती बदलायची तर एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली होती. त्या दृष्टीने चालू वर्षी गावातील शेतकरी आणि कृषी विभागाने एकत्र येण्याचे ठरवले.
टॅंकरमुक्तीच्या दिशेने
घाटशिरस गावाच्या तिन्ही बाजूंनी डोंगर असल्याने दरवर्षी अत्यंत कमी पाऊस पडायचा. परंतु जो काही पडायचा त्याचे पाणी अडविण्याची सोय नसल्याने सर्व पाणी वाहून जायचे. गेल्या वर्षापासून कृषी विभागाच्या माध्यमातून आगामी काळातील नियोजन म्हणून पाणलोटाची कामे हाती घेण्यात आली.
लोकसहभागातून गाळ काढण्याला परवानगी
गावाच्या हद्दीत 1972 च्या दुष्काळात बांधण्यात आलेला पाझर तलाव आहे. दोन वर्षांपूर्वी तो कोरडा पडला होता. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत होती. गावाजवळील तलावातील गाळउपसण्याला परवानगी नसल्याने ते काम तसेच पडून होते. परंतु सिंमेट बंधारे, नालाबंडिंग आदींच्या कामांमुळे पाणीपातळीवर झालेला फायदा लक्षात घेतल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नुकतीच गाळ उपसण्यासाठी परवानगी दिली आहे. लवकरच हे काम हाती घेणार असल्याचे उपसरपंच नवनाथ पाठक यांनी सांगितले.
शासकीय माध्यमातून झालेली कामे
घाटशिरस गावात गेल्या दोन-तीन वर्षांत कृषी, वन, महसूल अशा विविध विभागांतर्गत विविध कामे झाली. यात कंपार्टमेन्ट बंडिग 442, माती नालांबाध 2 (गाळ काढणे व दुरुस्ती), सिमेंट नालाबांध 9, खोल सलग समतल चर 25 हेक्टर, शेततळी, पाझर तलाव आदी कामांचा समावेश आहे. त्यामुळे चालू वर्षी पहिल्याच पावसानंतर गावात पाणीपातळीच्या माध्यमातून सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. या सर्व कामांवर आत्तापर्यंत सुमारे 50 लाखांहून अधिक खर्च झाला आहे. त्यामुळे गावात एकप्रकारे जलसमृद्धी येऊ लागली आहे.
पाणीसाठ्यात झाली वाढ
गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतल्यामुळे सुमारे 250 ते 300 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा अंदाज आहे. तसेच 300 ते 400 विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यात मदत झाली आहे. यंदा 80 ते 90 मिलिमीटर पाऊस झाला असून शेततळे, पाझर तलाव, सिमेट बंधारे अशा विविध कामांमुळे सध्या सुमारे 500 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गावाला किमान वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गावात दरवर्षी पाऊस कमी होत चालला होता. त्यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून नालाबांधांची दुरुस्ती, कंपार्टमेट बंडिंग अशी विविध कामे झाली. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन रब्बीची पिके आता घेता येणार आहेत.
नवनाथ पाठक- 9822935884
उपसरपंच
बंधाऱ्यांमुळे परिसरातील सुमारे 300 ते 400 विहिरींना फायदा झाला आहे. त्यामुळे सुमारे एक हजार हेक्टरवर रब्बी हंगामात पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
पंढरीनाथ पडवळे-9823123584
घाटशिरस
गावात कृषी विभागाच्या माध्यमातून विविध कामे हाती घेतल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतीचे मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही काही प्रमाणात प्रश्न मिटला आहे. आगामी काळात अशीच कामे लोकसहभागातून हाती घेण्यात येणार असून, पावसाचा प्रत्येक थेंब जिरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पाडुरंग पाठक, शेतकरी
तालुक्यात दरवर्षी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाही अनेक गावात टॅंकरद्वारे पाणी दिले जात होते. त्यामुळे कृषी विभागाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्या माध्यमातून अनेक गावांत कामे झाली. तुलनेने घाटशिरसमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारांतर्गत जलसंधारणाचे विविध उपाय केले गेले. यंदा पहिल्याच पावसात हे सर्व बंधारे भरून वाहू लागले. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. आता शेतकऱ्यांना पिकांमध्ये विविधता ठेवणे शक्य होणार आहे.
किरण मोरे-9404978058
तालुका कृषी अधिकारी, पाथर्डी
<पीक पद्धतीत बदल अन् शंभर टक्के "ठिबक'ला प्राधान्य
- - सकाळ वृत्तसेवा
सोलापूर - जलयुक्त शिवार अभियानातून हाती घेतलेल्या कामांमध्ये आता पावसाचे पाणी साठू लागले आहे. साठलेल्या पाण्याचा योग्य वापर, पीक पद्धतीत बदल आणि शंभर टक्के ठिबक सिंचनाचा वापर या उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानातील कंपार्टमेंट बंडिंग, सलग समपातळी चर, विहीर पुनर्भरण, खोल सलग सम पातळी चर यांसारख्या छोट्या-छोट्या कामांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. दरवर्षी पावसाचे वाहून जाणारे पाणी आता शिवारातच थांबल्याने दुष्काळात आशेचा किरण निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अद्यापही सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झाला असला तरीही पडलेल्या पावसाचे पाणी शिवारातच थांबल्याने विहीर व बोअरची भूजल पातळी वाढण्यास या अभियानातील कामांचा मोठा फायदा होताना दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार 609 विहिरींचे पुनर्भरण हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत 14 हजार विहिरींचे पुनर्भरण पूर्ण झाले आहे. कंपार्टमेंट बंडिंगची एक लाख हेक्टर क्षेत्रावरील एक हजार 990 कामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी 80 हजार हेक्टरवरील एक हजार 651 कामे पूर्ण झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद माळशिरस तालुक्यात झाली आहे. माळशिरस तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून राबविण्यात आलेल्या कामांमुळे माळरानावर पाणी साठलेले दिसत आहे.
करमाळ्यातही दिसू लागले सकारात्मक परिणाम
करमाळा तालुक्यातील मांगी, नेरले, विहाळ, श्रीदेवीचा माळ या गावांसह जलयुक्त शिवार अभियानातून कामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये पाणी पातळी वाढल्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. विहीर पुनर्भरणापूर्वी तीन ते पाच फूटदरम्यान असलेली पाणीपातळी आता आठ फुटांपर्यंत गेली आहे. अर्धा ते एक तास चालणारी पाण्याची मोटार आता पूर्ण दिवसभर चालत आहे.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 10:12 am | जेपी
वाचतोय.
16 Oct 2015 - 10:41 am | एस
वा!
फारच सकारात्मक. जलयुक्त शिवार योजना लोकांना जोपर्यंत आपली वाटत नाही, तोपर्यंत हीही योजना केवळ कागदोपत्री राहण्याची भीती वाटत होती. पण या लेखमालेमुळे ही शंका दूर झाली. आपण आवर्जून संबंधितांशी संपर्क साधत आहात त्यामुळे ही माहिती 'फर्स्टहॅण्ड' व उपयुक्त झाली आहे. तुम्हांला मन:पूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद...
17 Oct 2015 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे
फारच सुंदर लेखमाला.
या अगोदर शेतकर्यांबद्दल आलेल्या लेखांत फक्त कर्जमाफी, सरकारने द्यायचे शेतमालाचे भाव आणि पॅकेज सोडून इतर काहीही मुद्दे शेतीत नाही असाच सूर लावलेला होता. काही शेतकर्यांनी ते रडगाणे सोडून शेती फायदेशीर बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत हे निश्चितच आशादायक आहे !
20 Oct 2015 - 3:38 pm | गुलाम
५०० टीसीएम काही वेगळे युनीट आहे का? ५०० टीएमसी असणे तर शक्य वाटत नाही.
(लेखमाला उत्तम चालु आहे त्यामुळे ती शक्य तेवढी निर्दोष असावी असे वाटते म्हणून विचारतोय. गैरसमज नसावा.)
23 Oct 2015 - 12:47 pm | नाखु
नाही गैरसमज नाही ही लेखमाला ही संकलन स्वरूपात असल्याने या संकल्पनांशी मी ही अपरिचित आणि अनभिज्ञ आहे. तुमच्या मुळे किमान संपर्क करून माहीती घेऊ शकलो हे ही झाले.
धन्यवाद.