पुलंनी इतकं चपखल चितळे मास्तरांचं शब्दचित्र रंगवलय की त्यापुढे इतर कुणी लिहायचं म्हणजे…. पण पराडकर सर हे त्यापुढच्या काळातले. म्हणजे मास्तरांनंतरच्या सरांच्या पिढीतले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा गावात दोन शाळा होत्या. एक पांढरपेशा, मुलांच्या भवितव्याबद्दल जागरूक पालकांच्या पाल्यांची, तर दुसरी साध्यासुध्या कष्टकरी समाजातील, प्रगती पुस्तकावर अंगठा उमटवणाऱ्या आईबापांच्या पोरांची. सर या दुसऱ्या शाळेत शिकवत. शिवाय क्लासदेखील घेत. सरांच्या क्लासला ही गर्दी असे, पण निम्म्याहून अधिक मुलं फुकट शिकणारी असत.
तसा मी पहिल्या तीन नंबरात येणारा. पण सातवीत डोक्याला शिंगं फुटली आणि परिक्षेत त्याचा प्रत्यय आला. म्हणून माझी रवानगी सरांकडे झाली. माझा व्हॉलीबोल बंद करून क्लासला पाठवल्यामुळे मी जर घुश्श्यातच होतो. पहिल्या दिवशी तर मुद्दामहून उशिरा क्लासला पोचलो. सर रागावतील याची खात्री होती. खरंतर तीच इच्छा होती. पण सरांनी "ये ये" म्हणत अगदी निर्मळपणं स्वागत केलं. मी क्लासवरून नजर फ़िरवली. अगदी शेवटी, कोपऱ्यात नाखऱ्या दिसला. त्याच्या बाजूला जाऊन बसलो. सरांनी फळ्यावर अपूर्णांकाचं गणित मांडलं होतं आणि इकडे नाखऱ्या वहीतल्या माधुरीला मिशा काढण्यात दंग होता. अगदी योग्य जागी बसल्याचा मला आनंद झाला. इतक्यात सरांनी नाखऱ्याची वही मागितली. मान खाली घालून नाखऱ्यानं ती दिली. आता कमीत कमी दहा मिनिटं तरी टाईमपास होणार म्हणून मी खुश झालो. सरांनी वही बघितली आणि म्हणाले, "मेल्या, उद्या माधुरीने तुका तिच्या इस्टेटीचो दोन तृतीयांश भाग दिलो तर? तुका मोजूक येउक व्हया ना ? नायतर ती म्हनतली काय, पराडकर सरांनी काय शिकवूक नाय." सगळा क्लास हसू लागला. नाखऱ्यानं गुपचूप गणित सोडवायला घेतलं. आणि हा क्लास आपल्याला आवडणार याची मला आत कुठेतरी जाणीव झाली.
एक दिवस सरांच्या क्लासला, गावातल्या भाजी विकणार्याचा मुलगा आला. आईनं मारून मुटकून क्लासला पाठवलं होतं. पोराला इंजिनिअर करायची तिची इच्छा. पण त्याचं शिक्षणात बिलकुल लक्ष नव्हतं. त्याची बॅच सक्काळी सहाची होती. पहिल्याच दिवशी क्लासला न जाता तो अर्ध्यावरून घरी परत गेला. आईला म्हणाला, "माका चिंचेभितूर पांढऱ्या पातळातली बाई दिसली. सुटे केस होते नी उलटी चला होती." सरांच्या घराजवळ एक मोठ्ठ चिंचेचं झाड होतं खरं. पण त्याची आई हुशार. आपल्या मुलाला चांगलच ओळखत होती. तसाच त्याला ओढत आणि बडवत क्लासमध्ये घेऊन आली. "खय आसा ती बाई आधी माका दाखव. नायतर तुका उलटो टांगतलय." सरांनी पहिली तिची समजूत घालून घरी पाठवलं. आणि त्याला म्हणाले, "मार खायची हौस आहे का? नाही न? मग उद्यापासून इथे ये आणि शांतपणे कोपऱ्यात झोपून जा. म्हणजे तुझा मार वाचला आणि माझा वेळ वाचला." पोरगा खुश. पण सरांच्या क्लासमध्ये सतत काही न काही जोक्स घडत. त्यामुळे त्याचं झोपेवर मन लागेना. हळूहळू तो क्लासमध्ये लक्ष देऊ लागला. आणि पुढे गणितात बऱ्यापैकी गुण मिळवून पास झाला. सरांच्या हसत खेळत गणित शिकवण्यामुळं सगळ्यांनाच क्लास आवडत असे. नंतर कळत नकळत गणित आवडू लागे. सरांकडे आलेला विद्यार्थी कधी गणितात नापास होत नसे.
पण सगळ्यांनाच शाळा, अभ्यास आवडणार नाही हे सत्य सरांना उमजलं होतं. एकदा शाळेचे मुख्याध्यापक, सरांकडं एका विद्यार्थ्याविषयी तक्रार करू लागले, "याला परवा पेपरमध्ये कॉपी करताना पकडलं, कसं होणार या मुलाचं?" सर शांतपणे म्हणाले, "अहो तो उद्या नगराध्यक्ष होणार बघा." गंमत म्हणजे खरोखरच तो आज गावाचा नगराध्यक्ष आहे.
सरांना तीन मुलं. मुलगी लग्न करून जवळच्या एका गावात दिली होती. दोन्ही मुलगे अभ्यासात हुशार होते. मोठा इंजिनिअर होऊन चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. लग्न वगैरे होऊन मार्गी लागला. पण धाकट्याला मात्र स्किझोफ्रेनिया सारखा काहीतरी मानसिक आजार होता. त्यामुळे मधूनच कधीतरी त्याचं बिनसायचं. आणि तो मोठमोठ्यानं ओरडू लागायचा. त्यला सतत औषधं चालू असत. जेव्हा व्यवस्थित असे तेव्हा तोही गणिताचे क्लास घेत असे. पण त्याच्या आजारपणामुळे त्याचे क्लास बंद पडले. तो पंचविशीचा झाल्यावर, माझं लग्न करून द्या म्हणून आई वडिलांच्या मागे लागला. पण या मुलाचं लग्न कसं करणार? त्याला सरांनी, त्यांच्या बायकोनं सर्व प्रकारे समजावलं. पण त्याला काही पटलं नाही. रागारागानं तो घर सोडून निघून गेला. बराच शोध केल्यावर दोन तीन महिन्यानंतर नरसोबाच्या वाडीला सापडला. पुढं हे नेहमीचं झालं. बऱ्याच वर्षांनंतर कुणीतरी त्याच्यासाठी एक स्थळ आणलं. गरीब घरातील मुलगी होती. सर-बाईंनी त्या मुलीला सर्व परिस्थिती सांगितली व लग्नाला नकार दिला. पण मुलगी लग्न करायचंच म्हणून अडून बसली. तिला आईवडील नव्हते. कुणा दूरच्या नातेवाईकाच्या घरी ती अक्षरश: गुरासारखी फुकट राबत होती. घरातल्या आजारी वृद्ध माणसांचं सर्व करणं, शेतावर कामं करणं शिवाय घराची कामे यात ती बिचारी गंजून गेली होती. "नाहीतरी मी इथे फुकट मरतेय, निदान हक्काच्या घरात जाईन. पण मानाने जगेन." असे म्हणून ती या सत्त्वपरिक्षेस तयार झाली. साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नानंतर त्या मुलाच्या फिट्स जवळ जवळ बंद झाल्या. पण तो घरी बसून असे. कधी काही काम करताना कुणाला दिसत नसे.
मी गावाला गेलो की सरांना भेटून येत असे. यावेळी सरांनी अत्यंत कौतुकाने आपल्या सुनेची ओळख करून दिली. तिला सातवा महिना चालू होता. सासू सासर्यांच्या रुपात तिला आई बाप भेटले होते. सुनेच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूप बरं वाटलं. सरांनी नेहमीप्रमाणे माझी, इतर मित्रांची चौकशी केली. बाईनी चहा आणि लाडू वगैरे दिले. हे दर वेळचं होतं. कितीही नको म्हटले तरी सर बाई ऐकत नसत. आल्याआल्या चहा शेव, जाताना आंबे, पिठी हातात देत. "अरे आपल्या घरचं आहे, म्हणून देतो" असं आपुलकीनं सांगत. यावेळी फळ्यावर गणितं दिसत नव्हती. "सर क्लास काय म्हणतोय?" मी चौकशी केली. "नाय रे. आजकाल मुलांना शिकायची आवड आणि गरज दोन्ही नाय उरलं. नववीपर्यंत सरकार पास करते. आणि दहावी बारावीला कॉपी करून पास होतात. इथल्या प्रत्येक शाळेला, कोलेजला १०० टक्के निकाल दाखवायचा असतो, त्यामुळे सामुहिक कॉपी होते. तुम्ही भाग्यवान, योग्य वेळी शिकून गेलात" सर शांतपणे सांगत होते. निव्वळ पेन्शनवर सरांचं आणि घराचं भागात असेल का ? हा विचार मला अस्वस्थ करून गेला. अचानक सर खूप थकलेले वाटले.
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Oct 2015 - 8:22 pm | आदूबाळ
छान लिहिलंय. आवडलं.
8 Oct 2015 - 8:29 pm | एस
छान रंगवलंय शब्दचित्र. पुभाप्र.
8 Oct 2015 - 8:31 pm | रातराणी
आवडलं. पुभाप्र.
8 Oct 2015 - 10:12 pm | खेडूत
नेहेमीप्रमाणेच छान उतरलंय..
पुभाप्र.
8 Oct 2015 - 11:06 pm | भिंगरी
+++१११
8 Oct 2015 - 11:42 pm | बाबा योगिराज
आवड्यास.
9 Oct 2015 - 2:52 am | संदिप एस
काश... वो मुझे मिलते या मै उनको.. आज अफसाना कुछ और होता!!
खरच खूप आवडले सर!!
9 Oct 2015 - 6:59 am | दमामि
मला वाटलं श्रावण सर चे विडंबन आहे की काय
9 Oct 2015 - 7:09 am | अजया
आवडलं.पुभाप्र.
9 Oct 2015 - 7:30 am | प्रीत-मोहर
खूपच आवडले पराडकर सर.
पु.भा.प्र.
9 Oct 2015 - 7:52 am | अभय म्हात्रे
खूपच आवडले पराडकर सर आणि तुमचे लिखाण पण मन भुतकाळात गेले.
9 Oct 2015 - 8:18 am | इडली डोसा
शिक्षकांच्या शिकवण्यावरच त्या त्या विषयाची गोडी लागणे अवलंबुन असते.
9 Oct 2015 - 9:56 am | चुकलामाकला
धन्यवाद! खरेय, शिक्षकांच्या शिकवण्यावरच त्या त्या विषयाची गोडी लागणे अवलंबुन असते.
9 Oct 2015 - 10:30 am | नन्दादीप
मालवनचे काय वो तुमी????
9 Oct 2015 - 10:37 am | नाखु
छान उतरवलेत..
पोतडीतून अजून येऊद्या ! "धुराळी कुस्ती" धाग्यांनी वात आणलाय त्यात ही सुखद झुळुक.
नेमस्त नाखु
जिलहा परीषद शाळा विद्यार्थी
9 Oct 2015 - 10:40 am | मित्रहो
आवडले
9 Oct 2015 - 10:58 am | पद्मावति
खूप छान लिहिलंय. सुंदर व्यक्तिचित्र. खरोखर उत्तम शिक्षक मिळायला उत्तम नशीब लागतं.
पुढील भागाची वाट बघतेय.
9 Oct 2015 - 11:55 am | नि३सोलपुरकर
काश... वो मुझे मिलते या मै उनको.. आज अफसाना कुछ और होता!! आणी शिक्षकांच्या शिकवण्यावरच त्या त्या विषयाची गोडी लागणे अवलंबुन असते. ....१०००% सहमत .
नाहीतर आमचे गणिताचे सर ,...जाने भी दो यारो .
9 Oct 2015 - 12:09 pm | उगा काहितरीच
आवडला लेख ! आमचे गणिताचे शिंदे सर आठवले.
-नॉस्ट्याल्जीक !
9 Oct 2015 - 12:29 pm | बॅटमॅन
प्रचंड नॉस्टॅल्जिक. कितीही क्लिशे झालेलं वाक्य असलं तरी असे शिक्षक आता राहिलेले नाहीत हेच खरे.
9 Oct 2015 - 1:02 pm | द-बाहुबली
आपल्या भावनांची कदर आहे... पण लेख वाचुन कंटाळलो.
9 Oct 2015 - 1:21 pm | जगप्रवासी
आमच्या शिरोडकर शाळेतले सर आठवले. त्यांची गणित शिकवण्याची पद्धत इतकी छान होती की गणित मला आवडू लागल आणि आता आमच्या घराजवळील कुठल्या ही इयत्तेतली मुल माझ्याकडे गणित शिकायला येतात, इतक गणित डोक्यात पक्क बसलं आहे.
9 Oct 2015 - 1:24 pm | बिपिन कार्यकर्ते
छान.
मिपाचे जुने दिवस आठवले.
9 Oct 2015 - 9:53 pm | सानिकास्वप्निल
लेख आवडला.
वाचतेय...पुभाप्र.
9 Oct 2015 - 10:06 pm | नाव आडनाव
मस्त लिहिलंय. केमिस्ट्रिचे सर आठवले. असंच जीव तोडून शिकवायचे. म्हणायचे माझ्या नोटस चा अभ्यास करा आणि १०० पैकी एक मार्क जर कमी पडला तर जवाबदारी माझी :)
9 Oct 2015 - 10:13 pm | चतुरंग
आमचे कारभारी गोपाळे सर आठवले! :)
9 Oct 2015 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते
खरंच रे!
10 Oct 2015 - 6:49 am | चाणक्य
मस्तच. आवडले तुमचे पराडकर सर. पुभाप्र.
10 Oct 2015 - 7:27 am | अभिजीत अवलिया
मस्त. आवडले ....
10 Oct 2015 - 12:13 pm | हेमंत लाटकर
पराडकर सरांसारखे सर जर आजच्या मुलांना लाभले तर हुशार मुलांसारखे बाकीच्या मुलांना सुद्धा शिक्षणाची गोडी लागेल.
15 Mar 2017 - 9:52 pm | पिलीयन रायडर
हा ही लेख आवडला. पण ह्याचा पुढचा भाग लिहीणार आहात का? असाल तर नक्की लिहा. काही तरी गोष्ट अजुन शिल्लक असेल सांगायची..