श्रीगणेश लेखमाला ९ : माझी चित्तरकथा

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
26 Sep 2015 - 12:03 am

..........................
वर्दळीच्या नव्या पेठेतली सकाळी ७.००ची वेळ. इंच इंच लढवणार्‍या दुकानदारांची स्टँडीज, मॅनिक्वीन बाहेर ठेवण्याची घाई. पाच मजली भव्य शोरूम. २० बाय ५ चा ग्लोसाईन. वजन अंदाजे ३५० किलो. त्यात ट्यूबलाईट्स. लहान जिन्यावरून तो नेता येत नाही, म्हणून बाहेरून चढवतोय. वरून सोडलेले दोर. पाळणा बांधून त्यावर उभे राहून ड्रिल करणारे कामगार. त्यांच्या कमरेला दोर बांधून धरलेला मी. दोर थोडा हलला की धस्स होतंय. बोर्ड हळूहळू जागेवर बसताना निम्म्याच्या वर मी कठड्यावरून बाहेर आहे.
..........................
पाच लाख पॅम्पलेट्सची ऑर्डर. एकाच वेळी सोलापूर अन कोल्हापुरात पेपरमध्ये पडले पाहिजेत. वेळ २ दिवस फक्त. प्रिंटिंग व्हायलाच २ दिवस जातात. सोलापुरात पडतील हो, कोल्हापूरचे कसे काय? रात्री १२ला पेपर विक्रेत्याला गाठून त्याचे गठ्ठे पॉईंटवर पोहोचवा. लगेच गाडी कोल्हापूरच्या दिशेने. बरोबर ५ वाजता कोल्हापूरचे पेपरवाले पॅम्पलेट्स टाकतात.
..........................
इलेक्शनचे काम. पैसे घ्यायला उमेदवाराने फार्म हाऊसवर बोलावलेले. गावाबाहेर ३० कि.मी.वर सुनसान एरियात. १०-१२ गनमन. तेवढीच दांडगी कुत्री. एखाद्याला टपकवून पुरला तरी खबर कळणार नाही. रोखीत पैसे घेऊन परत येईपर्यंत जिवाची शाश्वती नाही.
..........................
असलो तर राजा असतो. नसले तर चहा प्यायलाही पैसे नसतात..
..........................
काय गरज आहे असले धंदे करायची? ११ ते ५ जॉब नाही मिळणार मला? महिन्याचा पगार काय नको वाटतो? रात्रंदिवस फोन वाजत असतो. एकदा घरातून बाहेर पडलो की यायची वेळ कधीच फिक्स नाही. का करतो मग मी हे सगळं?
उत्तर एकच..
छंद.
व्यवसायाचा छंद. छंदाचा व्यवसाय.
..........................
मध्यमवर्गीयच मी. अगदी टिपिकल. वडील बँकेत, आई शाळेत. झालो असतो ना डॉक्टर इंजीनिअर, गेलाबाजार बँकेत तरी. पण नाही. नडली माझी चित्रकला. पूर्ण खानदानात चित्रकला मलाच कशी येते.... माहीत नाही. यात काही करीअर आहे... माहीत नव्हते.....
बारावीपर्यंत रितीरिवाजाप्रमाणे शिक्षण झाले. रितीरिवाज म्हणजेच गणिताशी दुश्मनी करून अन इतिहासाची पुस्तके चितारून. नाही म्हणायला प्रत्येक चित्रकला स्पर्धेत शाळेचे नाव गाजण्याएवढी कला माझ्या अंगात होती. दै. सकाळची स्पर्धा असो की कामगार कल्याण केंद्राची. मी राज्यस्तरीय पहिला नंबर कधी सोडला नाही. एवढ्या एका गोष्टीसाठी मला अभ्यासातून सूट मिळायची.
घरात कौतुक फक्त वडिलांना. चौथीत असताना मी आर्टिस्ट क्वालिटीचे पोस्टर कलर अन वॉटरप्रुफ इंक वापरलीय. आईच्या दृष्टीने माझा ऊपयोग फक्त दिवाळीत तुळशी वृंदावन रंगवायला किंवा रथसप्तमीला रथ काढून द्यायला. वडिलांच्या ओळखीच्या एकाने सांगितले की कमर्शिअल आर्ट कर. काय असते ते पण माहीत नव्हते. नेहमीच्या कॉलेजपेक्षा वेगळे कॉलेज असते अन तेथे फक्त चित्रेच काढायची असतात हा ईंटरेस्टिंग पार्ट होता. त्यावेळी दहावीनंतर फाऊंडेशनला अ‍ॅडमिशन मिळत असे.
मग काय...दहावीनंतर मी लगेच चित्रकला महाविद्यालयासाठी बाहेर जाण्याचे ठरवले. घरच्यांनी ते मात्र ऐकले नाही. "आधी बारावी कर. तब्येत चांगली कर अन मगच जा" असा सल्ला मिळाला. बारावी नापास झाला तरी चालेल, अशीही सूट मिळाली. मग काय, बास्केटबॉल अन टेक्निकल एवढेच दोन वर्षे केले. घरातील आर्थिक स्थिती चढउताराची व्हायला अन मला फाऊंडेशनच्या कोर्ससाठी बाहेर पडायला गाठ पडली. फाऊंडेशन एक वर्षाचे. अगदी ओढगस्तीत पार पडले. सुरुवातीला भीती वाटायची. च्यायला सगळीच आर्टिस्ट पोरं. आपला कुठे निभाव लागावा. एकेकाचे कलर सेट अन ब्रशेस पाहून छाती दडपायची. पण टिकलो. टिच्चून काम केले. मराठवाड्यात पहिला आलो. मग म्हटले, आपले कोल्हापूर गाठावे. उपयोजित कलेची पदविका (पदवी अन पदविका कालावधी सेमच - ४ वर्षे फाऊंडेशननंतर आहे. दोन्हीला जीडी आर्टस म्हणत.)
..........................
फाऊंडेशनचा स्वतंत्र कोर्स एक वर्षाचा असे. असाईनमेंटसही भर्पूर असत. ह्या मार्कावरच पुढची दिशा ठरे. सगळ्या शाळांतली चित्रकला चांगली असणारीच मुले वर्गात असल्याने कॉम्पीटिशन टफ वाटायची. ही भीती अगदी कमर्शिअल आर्टच्या प्रथम वर्षात कायम होती. कारण कोल्हापूरचा कलाप्रांतातला दबदबा. तिथला सगळ्या चित्रकला महाविद्यालयापेक्षा वेगळा अनुभव. पण सरावलो थोड्या दिवसात. वाटले होते त्यापेक्षा भरपूर विषय होते. अ‍ॅनॉटॉमी तर अगदी डॉक्टरांना शिकवत नसतील एवढी घटवून घेतली जाई. टायपोग्राफी, फॉन्टस अन स्केचेसच्या कागदांनी बॅगा भरायच्या. अ‍ॅडव्हर्टायझिंग आर्ट एन आयडीयाला ओएनएम चा ऑग्लिव्ही पुस्तकातून पिडायचा. जगातली सगळी गाजलेली न फसलेली कॅम्पेन्स, पिअर्स साबणाच्या गेल्या शतकातल्या अ‍ॅडपासून आजपर्यंतचा प्रवास एकताना भान हरपायचे. एकेक शब्दांचा काळजीपूर्वक केलेला उपयोग अन अभ्यास पाहून वाचनाची गोडी लागली. एखाद्या प्रॉडक्टचा यूएसपी (युनिक सेलींग पॉइन्ट) हेच सर्वस्व झाले. जगातील उत्तमोत्तम मॅगझीन्स, व्हिडिओज अन फोटोग्राफ यातून जाहिरातक्षेत्र म्हणजे ६५ वी कला का म्हणतात याचे भान आले. सेकंड इयरला असाईनमेंट्स शोकेसमध्ये लागू लागल्या. इतर मुलांकडून अन शिक्षकांकडून कौतुक चालू झाले. सेकंड इयरला परीक्षेला ऑप्शनल विषय निवडायचा असे. अ‍ॅडव्हरटाईझिंग, पब्लिक वेल्फेअर अन पब्लिकेशन. ऐन वेळी मी कुणी न निवडणारा पब्लिकेशन निवडला. टिच्चून काम केले. त्या वेळी डेडलाईन सांभाळून काम करायच्या माझ्या मर्यादांची मलाच जाणीव झाली. पहिल्यांदाच स्वतःच्या कलेविषयी आत्मविश्वास जाणवायला लागला.
इतरांना वाटायचे - ५ वर्षे काय शिकवतात चित्रे काढायला? पण खरे सांगतो, ती ५ वर्षे पुरेशी वाटायची नाहीत. कॅलिग्राफी, टायपोग्राफी, अ‍ॅनॉटॉमी हे करत तीन वर्षे पार पडली. खर्च अगदी मेडिकल-इंजीनिअरिंगवाल्यांप्रमाणे नसायचा, पण तोसुद्धा जड व्हायचा. शिक्षण शुल्क तर अगदी नाममात्र म्हटल्याप्रमाणे. मिरजला मावशीकडे राहून रोज रेल्वेने कोल्हापूरचा जाण्या-येण्याचा पास काढून कॉलेज पूर्ण केले. शेवटच्या वर्षाची परीक्षा मुंबईला जे.जे.मध्ये. तिथे रहेजा, सोफिया अन अमरावतीची मुले परीक्षेला यायची. बांद्र्याच्या कलानगर जे.जे. हॉस्टेलमध्ये राहून एकदाची परीक्षा पार पडली. लगेच नोकरी मिळवायला इतर सहाध्यायींची धडपड सुरू झाली. आपापले पोर्टफोलिओ घेऊन अ‍ॅड एजन्स्यांची अन अ‍ॅनिमेशन हाउसेसची दारे ठोठावू लागली. काय जाणे, पण मला त्यात इंटरेस्ट वाटेना. सरळ गावी निघून आलो.
..........................
गावी एक आठवडा तेवढा पिक्चर बघण्यात अन फिरण्यात घालवला. कॉलेजात असताना बाईक वगैरे वापरलेली, पण घरी बाईक देईनात. त्या काळात मला बाईक रेसिंगचा नाद लागलेला. गाड्या थोड्याशा मॉडीफाय करून द्यायची कामे करायचो. पैशाची गरज भासू लागली. शिकत असताना थोडी प्रिंटिंगची कामे केली होती, त्या अनुभवावर एक दिवस बाबांना म्हणालो, "मला ५० हजार हवेत."
"कशाला?"
"पीसी अन स्कॅनर, प्रिंटर घ्यायचाय. प्रिंटिंगची कामे चालू करतो."
"त्याशिवाय होणारच नाहीत का? सध्या तर मी देऊ शकत नाही."
"नाही होणार."
"मग एक काम देतो तुला, सध्या बाहेरून करून घे. जमेल का?"
एका बँकेच्या लोगोचे अन स्टेशनरीचे काम होते. काम भरपूर होते. बरीचशी आर्टवर्क हाताने केली. डीटीपीवाल्याकडे बसून उरलेली केली. जवळपास ३ महिने काम चालले. सगळे फिरणे बस आणि रिक्षाने, दरम्यान माझा जो होईल तो खर्च वडील देत. तीन महिन्यांनी बँकेचे बिल मिळाले. ७८ हजाराचे होते, डीटीपीवाल्याचे पैसे तेव्हाच दिले. उरलेली रक्कम देताना वडिलांनी तोपर्यंत मला खर्चाला जेवढे पैसे दिले, त्याचे व्हाऊचर बनवून ठेवले होते. ते वजा करून उरलेले १४ हजार माझ्या हातात आले.
"आता मला सांग, १४ हजार कमवायला काय करावे लागते? किती वेळ लागतो?"
उत्तर मला माहीत झाले होते.
"मग तुला एकरकमी ५० हजार कसे द्यायचे?"
आता तेही मला नको होते. वडिलांनी दिलेल्या धड्यापेक्षा मौल्यवान गोष्ट मला कळली होती.
मला स्वतःला पैसे कमवता येतात. निदान एका पद्धतीने तरी.
..........................
अचानक मला एका अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शन हाऊसची स्वप्नवत पगाराची ऑफर आली. इंटरव्ह्यू पार पाडून जॉइन झालो. घरच्यांना अगदी हायसे वाटले. पण माझे मन नोकरीत लागेना. प्रिंट मीडियाचे आकर्षण गप्प बसू देईना. एक दिवस नोकरी सोडून पुन्हा घरी आलो.
परत माझी प्रिंटिंगची कामे सुरू झाली. मित्रपरिवार होताच. लहानसहान कामे करत दिवस सरू लागले. तेव्हा पहिली सेकंडहँड बाईक घेतली. ग्राफिक्सच्या नॉलेजसाठी मल्टीमिडीयाचा डिप्लोमा केला, लागणार्‍या सॉफ्टवेअरचे सर्टिफिकेट कोर्स केले. या सार्‍यांना लागणारा पैसा म्हणजे सोबत कामे चालू असतच.
..........................
अचानक एका मित्राने म्हटले, ऑफिस टाकू या. माझ्याकडे जास्त भांडवल नव्हते. घरून मागायची सोय नव्हती. ही संधी भारी वाटली. लहान स्वरूपात ऑफिस सुरू झाले. जसजशी कामे येऊ लागली, तसे मला कळू लागले - धंदा एवढा सोपा नाही. लहान कोटेशन्सही चुकू लागली. थोड्याशा गफलतीमुळे पूर्ण असाईनमेंट रिजेक्ट व्हायचे प्रमाण वाढू लागले. रिकव्हरीचा प्रश्न होताच. मला एकट्याने ही कामे झेपेनात. पार्टनर वेगळ्या फील्डमधला. त्याला माझे प्रोब्लेम कळेनात. शेवटी ६ महिन्यात ऑफिसचा कारभार आटोपला. आटोपला असे वाटले, पण ओळखीच्या काही स्क्रीन प्रिंटर्सनी मला परत मदतीचा हात देऊ केला. त्यांना डिझाईनसाठी माझी गरज होती. त्यांनी ऑफिससाठी लागणारे पैसे दिले. परत जुनी कथा रिवाईंड. मला मॅनेजमेंट जमेना. प्रिंटिंगसाठी लागणारे पेपर, बाईंडिंग, प्लेटा याच्या हिशोबात वारंवार चुकू लागलो. डिझाईन्स सुंदर असायची, पण प्रिंटिंगला वाट लागायची. काय करावे समजेना. त्यात बँकांचा व्यवहार, चेक्स इ. गोष्टींचे गांभीर्य नव्हते. एका बँकेने सीसी दिली, पण तो पैसा कसा खर्चायचा याचे ताळतंत्र राहिले नाही. भरीस भर म्हणून स्क्रीन प्रिंटर्सनी गैरफायदा घ्यायला सुरुवात झाली. शेवटी डोक्यावर मोठ्ठा कर्जाचा भार घेऊन, मी मालक नसलेल्या या धंद्याचा अंत झाला. सुरुवातीला घरी काही बोललेलो नव्हतो. मध्यंतरात त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. शेवटी असा अपेक्षाभंग करून बसलो. कर्जाचा भार पूर्ण उचलायचे ठरवले. वडिलांनी मुदत मिळवून दिली. नेमके त्याच वेळी एका प्रॉडक्शन युनिटचे मालक मला नोकरीसाठी हुडकत आले. सर्व मानापमान बाजूला ठेवून नोकरी चालू केली. रोज ४-४ तास ओव्हरटाइम करून, बाहेरची कामे घेऊन अन चक्क एक वेळा जेवून कर्जाचा भार उतरला. याच काळात धंद्यातल्या सार्‍या खाचाखोचा खर्‍या अर्थाने कळू लागल्या. हे आधीच केले असते तर बरे, असे वाटायचे. प्रिंटिंगमधल्या लहानसहान गोष्टी आत्मसात झाल्या. फील्डमधल्या लोकांच्या ओळखी झाल्या. डिझाईनर म्हणून लोक मला ओळखू लागले. धंद्याची इच्छा मात्र अजून जिवंत होती. मात्र आयटीमधला पैसा खुणावू लागला. एक दिवस नोकरी सुटली अन सरळ एका कंपनीत व्हिज्युअलाईझर म्हणून जॉइन झालो. तिथे टीममध्ये अ‍ॅक्चुअल कामाचा अनुभव असणारा मी एकटाच होतो. गावातील पगारापेक्षा तिप्पट पगारात बरे चालले होते. वीकेंडला गावी आलो असता दोघातिघांनी पार्टनरशिपसाठी ऑफर दिली होती. ९ महिन्यात आयटीला रामराम ठोकला. घरच्यांच्या विरोधाला जुमानून एकट्याने फ्रीलान्स कामे सुरू केली.
..........................
अशातच एका अपघाताला तोंड द्यावे लागले. पुण्याहून येताना ट्रॅव्हल्सची वोल्व्हो सरळ पुलात कोसळली. मला बराच मार लागला. चेहरा पूर्ण फाटला, खालचा जबडा डिस्प्लेस झाला. डोक्यावर अन पाठीवर जखमा झाल्या. माझ्या शेजारचा जागीच मृत झाला. केवळ खेळाचे शरीर होते म्हणून लवकर रिकव्हर झालो. तरी या अपघाताने व्यवसायातून ६ महिन्यांसाठी बाहेर फेकला गेलो. हातातल्या मोठ्या असाईनमेंट्स गेल्या. हे प्रिंटिंगचे फील्ड धार्जिणे नाही, असे घरच्यांचे बोलणे रोज ऐकू लागलो. एक दिवस ठरवले. सरळ उठून नात्यातल्या एकाचा बार रेस्टॉरंट सांभाळायच्या कामाला मदत करायला सुरुवात केली.
प्रिंटिगची कामे ज्या तन्मयतेने करायचो, त्याच पद्धतीने हॉटेलमध्ये काम केले. स्टॉक, गोडाऊन, किचन, टेबल अन काऊंटर अशा सगळ्या ड्युट्या केल्या. रोज रात्री झोपायला ३ वाजायचे. मनुष्यस्वभावाचे हरेक नमुने तिथे पाहायला मिळाले. लवकरच एका नवीन बारची पार्टनरशिप अन चालवायसाठी ऑफर आली. जवळपास हे डिल फिक्स होतच होते. पण.....
नवीन हॉटेलचे बोर्ड अर्थातच मी डिझाईन अन प्रिंट केलेले होते. ते पाहून तिथेही माझ्या लाडक्या प्रिंटिंगने पाठ सोडली नाही. कस्टमर तिथे येत अन मी कामे करून देई. हळूहळू प्रिंटिंगच्या कामाचीच व्याप्ती वाढू लागली. एका जिवलगाने सल्ला दिला - "ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर." नुसता सल्ला देऊन न थांबता या जिवलगाने नवीन ऑफिसच्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केले. प्रसंगी तासनतास वाद घातला, पण अभ्याचे स्वतःचे ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात येईपर्यंत सर्व प्रकारची मदत केली.
पैसा, भावनिक पाठबळ, तांत्रिक मदत अगदी जे जे लागेल ते ते पुरवले. त्यावेळी ह्या जिवलगाची मदत नसती तर कदाचित मी एखाद्या बारच्या काऊंटरवर दिसलो असतो.
..........................
आता माझ्या या ऑफिसात सर्व प्रकारच्या अ‍ॅडव्हर्टाईझिंगची कामे केली जातात. मोठी कॅम्पेन्स अगदी प्रोफेशनली कम्प्लीट होतात. रेडिओसारख्या माध्यमाच्या अ‍ॅडस सदैव चालू असतात. त्यांचे स्क्रिप्ट्स अन क्रियेटिव्हज यामध्ये माझी मोनोपली तयार झाली आहे. न्यूजपेपर अ‍ॅडसाठी सर्व मोठ्या पेपर्सची एजन्सी आहे. सोशल मीडिया मार्केटिंग अन एसईओमध्ये बरीचशी कामे चालू असतात. फ्लेक्स अन प्रिंट हा तर माझा जुना व्यवसाय. ती कामे अगदी प्रॉपरली पूर्ण होतात.
आज जुन्या चुकांची शक्यतो पुनरावृत्ती टाळली जाते. हिशोबातला पै न पै टिपला जातो. आरोग्याकडे तर अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही. कस्टमर्सच्या कंपनीचे मोटो अन टॅगलाईन्स तयार करता करता स्वतः मात्र केवळ पुस्तकी वाक्ये न अवतरित करता काम करत राहिलो. मला जमतेय अन लोक देतायत तोपर्यंत कामे मिळत राहणारच. कामे होत राहतील, पण जोडलेली माणसे अन कमावलेला लौकिक हेच अ‍ॅसेट्स मानून सध्यातरी वाटचाल चालूय. लोक म्हणतात, बिझनेसमन म्हणजे फक्त पैसा पैसा अन पैसा करणारी जात. कमर्शिअल आर्ट म्हणजे तर शुद्ध उपयोजित कला. आर्ट फॉर पीपल. आमची प्रत्येक कलाकृती लोकांचा विचार करून साकारलेली असते. मिळणार्‍या पैशाला बांधील असते.
पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची....
त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही.
..........................

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Sep 2015 - 12:17 am | मुक्त विहारि

"ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर."

हे असे सांगणारे जिवलग मित्र जवळ असरील तर, तुम्ही सगळ्यात सुखी मनुष्य आहात.

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 12:55 am | अभ्या..

अगदी खरंय तुमचं मुवि.
सोपं असतंही अन सोपें नसतेही सुखी होणं.

खरी गोष्ट.

तसे एक संस्कृत सुभाषित पण आहे की, "अमित्रस्य कुतः सूखं."

अर्थात उत्तम मित्र लाभावे लागतात आणि बर्‍याच वेळा ते नशिबानेच मिळतात.

(मित्रांच्या बाबतीत नशिबवान) मुवि

सुबोध खरे's picture

26 Sep 2015 - 6:55 pm | सुबोध खरे

अभ्या शेट
आपले कष्ट पाहून आपल्याला साष्टांग नमस्कार. एक विनंती करू काय
आत्ता आपण जे करत आहात ते चालू ठेवून आपल्याला आवडते तशी चित्र काढणे चालू ठेवा. केंव्हा तरी आपल्या चित्रांना खरी किंमत देणार्या रसिकाची भेट होईल आणि आपण मोठे चित्रकार होऊ शकाल. अंजली इला मेनन या सुद्धा राजा मेनन या एक नौदल अधिकार्याच्या पत्नी होत्या परंतु केंव्हा तरी त्यांच्या संपर्कात महत्त्वाच्या व्यक्ती आल्या आणि त्या एकदम प्रकाश झोतात आल्या. आपली वाटचाल चालू ठेवा. परंतु हे काम मी पोटासाठीच करीत आहे असे मनातून काढून टाका कारण जसा जसा जास्त काळ जाईल त्यामुळे ते काम तुम्हाला जास्त बोजड आणि कंटाळवाणे वाटू लागेल.
शेवटी बैठकीची गायकी गाणारे मोठे मोठे गवय्ये सुद्धा( अगदी भारतरत्न भीमसेन जोशी सुद्धा) शेवटी भजन किंवा नाट्यसंगीताचा आधार घेतातच. कला हि जर रसिकापर्यंत पोहोचली नाही तर तिची इतिकर्तव्यता होत नाही असे म्हणतात.
बाकी काय लिहिणे. कधी मुंबईत येणे झाले तर कळवा. भेटायला येऊच .

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 12:23 am | प्रचेतस

एकच नंबर रे भावा.

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2015 - 12:25 am | श्रीरंग_जोशी

अभ्या तुझे प्रत्यक्षातले वय अजुन फारसे नसेल पण अनुभवाचे वय बरेच अधिक आहे हे नक्की. एक मनस्वी कलाकार म्हणून तुला ओळखत होतोच. पण धडपडत तयार होत गेलेला एक यशस्वी व्यावसायिक हे रुप नेमकेपणाने आज प्रथमच कळले.

या अनुभवकथनासाठी खूप धन्यवाद. हे वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल.

तुझ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी अन स्वतःच्या आनंदासाठी चित्रं काढायला संधी व निवांतपणा मिळावा यासाठी शुभेच्छा!!

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 1:01 am | अभ्या..

धन्यवाद मित्रा श्रीरंगा.
मिपाकरहो एक गोष्ट म्हणजे माझ्याबद्दल काहीही माहीती नसताना फक्त मिपाच्या ओळखीवर श्रीरंगाने माझ्याकडून त्याच्या घरातील उपनयनाची पत्रिका छापून घेतली होती. श्रीरंगा सर्वच बाबतीत (पत्रिकेतील मजकूर, डिझाईन अन इतर बाबी) कीती परफेक्षनिस्ट आहे ते तेव्हच कळले. पुण्यातील पत्रिकेत "अगत्याने यावे हि नम्र विनंती" या ओळीतील हि ची वेलांटी श्रीने शिकविली. पूण्यात पार्सल कुरीयर होण्याआधी मला अमेरिकेहून पैसे ट्रान्स्फर झाले होते. असा मित्र अन असे ग्राहकही विरळेच.
धन्यवाद श्रीरंगा.

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2015 - 1:19 am | श्रीरंग_जोशी

ती पत्रिका निमंत्रितांना खूप आवडली होती. नेहमीपेक्षा वेगळे, सुबक अन तरीही आकर्षक असे डिझाइन होते.
पत्रिकेच्या डिझाइनसाठी कौतुकाचे बोल जे अनेकांकडून ऐकायला मिळाले ते तुझ्यापर्यंत पोचवायचे राहून गेले.

ज्यांना ते डिझाइन बघायचे आहे त्यांच्यासाठी दुवा.

बादवे तो विनंतीअगोदरचा 'ही' दीर्घ होता.

बाबा योगिराज's picture

26 Sep 2015 - 8:06 am | बाबा योगिराज

मस्तच आहे. सुंदर आणि सुतसुटित.

मांत्रिक's picture

26 Sep 2015 - 8:27 am | मांत्रिक

सहमत!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे

डिझाईन अप्रतिम आहे ! गोडूल्या बटूचे बालपण त्याच्या विचलित नजरेतून वट्ट पकडलेय !

बादवे, 'ही' ऐवजी 'हि' का बरे ?

मांत्रिक's picture

26 Sep 2015 - 11:44 am | मांत्रिक

मला पण ही जास्त बरोबर वाटतं.

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2015 - 12:19 pm | प्रभाकर पेठकर

सगळी एक अक्षरं जसे, 'मी', 'ती', 'तू', 'की', ही दीर्घच असतात. त्यामुळे मलाही 'ही' जास्त बरोबर वाटतं.
सुधांशु नूलकरसाहेब प्रकाश पाडू शकतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्याकरणाच्या दृष्टीने 'ही' बरोबर आहे. म्हणूनच कुतुहलाने मी प्रश्न विचारला आहे.

मांत्रिक's picture

26 Sep 2015 - 12:24 pm | मांत्रिक

ही वाट दूर जाते..
हे गाणं मोठ्याने गुणगुणल्यास हीऽ असा दीर्घोच्चारच बरोबर वाटतो.

सुधांशुनूलकर's picture

27 Sep 2015 - 10:29 am | सुधांशुनूलकर

'मी', 'ती', 'तू', 'की', दीर्घच असतात. त्यामुळे मलाही 'ही' जास्त बरोबर वाटतं.

हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. (हे शब्द एकाक्षरी असल्यामुळे ते 'शेवटचं' अक्षर - म्हणजेच अन्त्याक्षर - असतं.) अपवाद : 'नि'.

मराठी साहित्य महामंडळाचा शुद्धलेखन नियम क्र. ५ : इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घ लिहावे. अपवाद : 'आणि', 'नि' (ही मराठीतली अव्ययं), तसंच 'परंतु', 'यथामति', 'तथापि', 'अद्यापि', 'यथाशक्ति', 'यथाविधि' (ही तत्सम - म्हणजे मूळ संस्कृत अव्ययं). 'अव्यय' असल्यामुळे या शब्दांमध्ये र्‍हस्व-दीर्घ बदल होत नाहीत.

तुम्ही व्यनिद्वारे माझ्या लक्षात आणून दिलंत, म्हणून आजच हा प्रतिसाद पाहिला, म्हणून उत्तर द्यायला उशीर झाला. क्षमस्व.

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2015 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

हे शब्द एकाक्षरी असल्यामुळे ते 'शेवटचं' अक्षर - म्हणजेच अन्त्याक्षर - असतं.

म्हणजेच, तुम्ही दिलेले अपवाद वगळता, सर्व अंत्याक्षरं ही दीर्घच असतात/असावित. बरोबर?

राही's picture

26 Sep 2015 - 12:08 pm | राही

सुंदरच आहे डिझाइन. आगळे वेगळे आणि आकर्षक.

शेखरमोघे's picture

26 Sep 2015 - 1:54 pm | शेखरमोघे

खरोखरच सगळेच आगळे वेगळे आणि सुन्दर ! "ही" बद्दल वाटलच की ही "ही" "हि" कशी?

बोका-ए-आझम's picture

26 Sep 2015 - 12:35 am | बोका-ए-आझम

खरंखुरं कलंदर आयुष्य आणि कुठलीही तडजोड न करता स्वतःला योग्य वाटेल तेच करण्याची जिद्द म्हणजे आमचा अभ्याभौ! जियो!

प्यारे१'s picture

26 Sep 2015 - 12:35 am | प्यारे१

___/\___

बाकी काही बोलायची गरज नाही आणि लायकी सुद्धा. भीड!

मधुरा देशपांडे's picture

26 Sep 2015 - 12:52 am | मधुरा देशपांडे

फार आवडला लेख. परत परत वाचला. खूप शुभेछा!!

उगा काहितरीच's picture

26 Sep 2015 - 12:57 am | उगा काहितरीच

च्यायला आम्हाला आमचाच स्ट्रगल लै वाटतो राव ! भाऊ खरंच प्रेरणा मिळते परत उठून शून्यातुन चालू करण्याची असं काही वाचलं की . मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी .

रामपुरी's picture

26 Sep 2015 - 1:23 am | रामपुरी

कलंदर आहात...

हा अभ्या साला छुपा रुस्तुम आहे एक नंबरचा. _/\_

अतिशय आवडला लेख! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

स्रुजा's picture

26 Sep 2015 - 1:34 am | स्रुजा

सुरेख !! हॅट्स ऑफ तुमच्या जिद्दीला..

दिवाकर कुलकर्णी's picture

26 Sep 2015 - 1:48 am | दिवाकर कुलकर्णी

तुमची चित्तर कथा अफलातूनअाहे,लेखन शैली पण आवडली कला निकेतन मध्ये शिकलात काय?
चित्तर कथा अजून फुलू दे हार्दिक शुभेच्छा

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 1:11 pm | अभ्या..

हो, कला निकेतन. कळंबा रोड. आयटीआयसमोर, कोल्हापूर. फाऊंडेशन नांदेडला. :)

हे सगळे वाचून 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे वाक्य आठवले.
तुझ्या अंगी कला आहेच. तिचे व्यवसायात रुपांतर करताना हा मधला शिक्षणाचा कालावधी किती खाचखळग्यांचा होता ते समजले. लेखन आवडले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Sep 2015 - 6:40 am | कैलासवासी सोन्याबापु

धडपड मनःपूर्वक जिथे केली जाते तिथे यश कल्ला करते! खुप खुप शुभेच्छा!

योगी९००'s picture

26 Sep 2015 - 6:46 am | योगी९००

आईशप्पथ...!! डोळ्यातून पाणी आले लेख वाचताना. तुमच्या पुढे मी खूपच फालतू आहे याची जाणीव ही झाली. पण ही जाणीव आणि तुमची धडपड एकदम प्रेरणादायी आहे. अजुनही आम्ही काही करू शकतो हेच वाटले.

या अनुभवकथनासाठी खूप धन्यवाद...!!

गेली पाच-सहा वर्षे मीपा वर आहेत त्याचा फायदा झाला असे वाटले. "श्रीगणेश लेखमाला" सारखे उत्तम अनुभव कोठेच वाचायला नाही मिळाले.

मांत्रिक's picture

26 Sep 2015 - 8:00 am | मांत्रिक

मस्तच रे अभ्या.. अगदी अवलिया दिसतोस. भयानक कष्टातून जावं लागलेलं दिसतंय तुला. सलाम तुझ्या मेहनतीला. असो. पुढील वाटचालीसाठी, प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
खूप खूप प्रगती कर, मोठा हो!!! मनापासून शुभेच्छा!!!

राही's picture

26 Sep 2015 - 8:01 am | राही

आयुष्यात शेवटी मागे वळून पाहाताना किती आणि काय काय केलं या आठवणींच्या आनंदापेक्षा किती काही करायचं राहून गेलं याच्या आठवणी अधिक त्रास देतात. तुम्हाला या आठवणी छळणार नाहीत हे नक्की. मनुष्य पैशाने श्रीमंत होतोच पण अनुभवाने श्रीमंत होणं अधिक आनंददायी असतं. तो आनंद तुम्हाला लहान वयातच पुरेपूर मिळाला आहे.
आणि धडपडीचं चीज हे पैशात नसतं तर ती करतानाच्या कैफात असतं असं म्हटलं जातं. जर्नी इज़ मोअर एन्जॉयेबल दॅन सक्सेस हेही तुम्ही अनुभवलं असणार. आयुष्य जगणं म्हणजे काय हे या लेखावरून समजतं.
धन्यवाद.

बाबा योगिराज's picture

26 Sep 2015 - 8:27 am | बाबा योगिराज

काय गरज आहे असले धंदे करायची? ११ ते ५ जॉब नाही मिळणार मला? महिन्याचा पगार काय नको वाटतो? रात्रंदिवस फोन वाजत असतो. एकदा घरातून बाहेर पडलो की यायची वेळ कधीच फिक्स नाही. का करतो मग मी हे सगळं?
उत्तर एकच..
छंद.
व्यवसायाचा छंद. छंदाचा व्यवसाय.
.
साला हे १००% खर आहे. हे अनुभवयला डोक्यात खुळच पायजे.
.
तुमचा प्रवास वाचून आनंद झाला. (आपल्या सारखे येडे अजुन बी हैत)
.
मागील काही वर्षात मी तर हेच अनुभवलय की,
मराठी माणूस धंद्यात का "पडतो"........कारन मराठी माणूस थोड्याश्या आपयशाने खचुन जाऊन प्रयत्नच करत नाही. तुम्ही तेव्हाच हारता जेव्हा तुम्ही प्रयत्न करण सोडून देता.
तुमचा प्रवास हेच संगतोय की, धंद्यामधे वर-खाली होतच राहणाऱ. तुम्ही फ़क्त स्वतःचे स्वप्न,स्वतःच्या कल्पना या वर विश्वास ठेऊन वाटचाल करा देव बाप्पा तुमच्या मागे उभा राहिलच.
अभ्या भौ सलाम तुमच्या जिद्दीला. शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
तुमच्या धंद्यातील अजुन ही अनुभव येऊ दया की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 8:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकदा भेटायचयं एवढचं बोलतो. भेटीमधे योग्य प्रतिक्रिया देईन म्हणतो.

मुक्त विहारि's picture

26 Sep 2015 - 9:32 am | मुक्त विहारि

मी पण येणार.

एक कट्टा लवकर ठरवा.

खटपट्या's picture

26 Sep 2015 - 1:09 pm | खटपट्या

मी पण !!

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2015 - 7:54 pm | चौथा कोनाडा

मी पण येणार !

मी पण अभ्या-भक्त झालोय ही पॉवरफुल स्टोरी वाचुन !
हा खडतर प्रवास खुपच सही उतरलाय !
अश्या अवलिया व्यक्तिमत्वाला सादर सलाम !

मी पण येणार अभ्याला भेटायला :)

खेडूत's picture

26 Sep 2015 - 8:47 am | खेडूत

अप्रतिम चित्तरकथा !
अशा कठीण काळात भल्याभल्यांचा विश्वास डळमळीत होतो. कष्टमय मार्गाने यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ! अजून अनुभव येउद्यात .
(शिवाय त्या निव्वळ आनंदासाठी काढलेल्या चित्रांचीही वाट पहातोय !)

श्रीगणेश लेखमाला आता आता वैविध्याने पूर्ण बहरली आहे !

सुधीर कांदळकर's picture

26 Sep 2015 - 9:03 am | सुधीर कांदळकर

चित्रे काढायला कोणी मनाई केली आहे काय? वेळ मिळत नसतो. अग्रक्रम देऊन काढावा लागतो. रोज किंवा आठवड्यातले काही दिवस ठराविक वेळ काढून छंद जरूर जोपासावेत. अगदी भरपूर खर्च करून. तो एक छान विरंगुळा असतो. पाहा पटतंय का.

सुधीरपंत मनाई कुणीच केली नाही. केली तर मी जुमानणारही नाही. रोज बँकेत अथवा हपिसात काम करुन घरी चित्रांचा छंद जोपासणे वेगळे अन दिवसभर डिझाइन्स अन चित्रेच काढून परत तो छंद म्हणून जोपासणे वेगळे. व्यवसायत चित्रे काढून मला आनंद मिळतोच. ह्यातला फक्त पैसा हा फॅक्टर बाजूला काढायचाय. होईल ते. जमेल एकनाएक दिवस. :)
कोणार्क का खजुराहोच्या कंदारीय महादेव मंदिराच्या शिल्पकाराची काहीतरी गोष्ट आहे हो. आपला वल्ल्या नाहीतर बॅट्याला माहीत असेल. दिवसभर मंदिरावर शिल्पकृती घडवून तो रात्री झोपडीत एक लहानशी मूर्ती घडवत बसायचा. राजाने ती मूर्ती मंदिरात बसवण्यासाठी मागितल्यावर कलश अर्धाच सोडून त्या मूर्तीसहित गायब झाला. अशी काहीतरी कथा आहे बघा.

नाखु's picture

26 Sep 2015 - 9:11 am | नाखु

अभ्या मस्त लेख

जरा विस्ताराने लिहायचे मनावर घे.

पैशाने मोठी पण मनाने छोटी धेंडे आणि

कला म्हणून मान देणारे मनस्वी व्यक्ती.

तुझ्या जिवलग मित्राला माझा सलाम.

आणि तुला खूप खूप शुभेच्छा . प्यारे भौंच्या "भीड" शब्दाला तीव्र सहम्ती+ लढ बाप्पू.

चाकरमानी नाखु

अभ्या,तुझे अनुभवाचे वय फार मोठे आहे माझ्यापेक्षा.म्हणून __/\__

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Sep 2015 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

"आता मला सांग, १४ हजार कमवायला काय करावे लागते? किती वेळ लागतो?"

खरं आहे वडिल हे आपले सर्वात मोठे हितचिंतक असतात ह्याची जेव्हा जाणीव होते तेव्हापासुन आपण खर्याअर्थाने मोठे झालो असे समजायला हरकत नाही.

"ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर. जसे जमेल तसे कर. अगदी परत शून्यातून सुरुवात कर, पण तेच कर."

असे मित्र मिळायला भाग्य लागते यार.

तुम्ही जसे चांगले चित्रकार आहात तेवढेच चांगले लिहिता सुध्दा. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जिवंत उभा केला आहे. तुमचे अनुभव वाचायला आवडले एक वेगळा दृष्टीकोन शिकवुन गेले

वेळ मिळेल तसे लिहित रहा.

पैजारबुवा,

पांडुरंग हरी.
माऊली माऊली.

सुबोध खरे's picture

26 Sep 2015 - 10:10 am | सुबोध खरे

ह्या जिवलगाची मदत नसती तर
असे मित्र मिळायला फार मोठे भाग्य लागते.
या श्री गणेश लेखमालेतील एक एक लेख वाचून आमच्या सारख्यांना स्वतःबद्दल शरम वाटायला लागली आहे.
बारावी नंतर एक स्पर्धा परीक्षा काय पास झालो डॉक्टरी केली. सुखात सरळ लष्करी अधिकार्याची नोकरी लागली. ती केली त्यानंतर त्याच बळावर बाहेर हि सहज नोकरी मिळाली ती सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. कुठेही कष्ट म्हणून घेतलेले नाहीत कि कधी पैशाची कमतरता भासली नाही. एक मात्र आहे कि डॉक्टरच व्हायचे आहे हे निश्चित होते. त्यामुळे आज ३३ वर्षानिसुद्धा डॉक्टर झाल्याबद्दल कधीही वाईट वाटलेले नाही. त्यामुळे तुम्हाला निवृत्त कधी व्हायचे आहे या प्रश्नाला "हातपाय चालतात तोवर नाही" हे वित्तीय सल्लागारांच्या पचनी पडणार नाही असे उत्तर माझ्या CNBC TV १८ वरील शो मध्ये दिले होते अशी परिस्थिती आहे. "ज्यात तुझे मन खर्‍या अर्थाने रमतेय, तेच कर" हे सांगणाऱ्या मित्राशी मी १०००% सहमत आहे.
आमचे आयुष्य कसे गुळगुळीत एक्स्प्रेस वे सारखे गेले. लोकांच्या कच्च्या रस्त्यावरील वाटचाल पाहून स्वतः बद्दल लाज वाटावी अशी परिस्थिती आहे.
अभ्या शेट तुम्हाला साष्टांग ---/\---. एकदा भेटणे आवश्यक झाले आहे.

एस's picture

26 Sep 2015 - 11:09 am | एस

फार छान!

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 11:25 am | चांदणे संदीप

अभ्यादादा सर्वप्रथम तुमचे अभिनंदन!! ब-याच गोष्टींसाठी आहे!
आपल्याला आवडत ते करायला मिळण किंवा जमण ही खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय प्रेरक लेख लिहिलाय तुम्ही! आपण अमुक हेच करायला इथे आहोत हेच तुमच्या लिखाणातून आणि अनुभवातून दिसतय!

आणखी एक गोष्ट उल्लेखनीय म्हणजे जिथे आजकालची तरूण पिढी दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगलुरू किंवा अगदीच भारत सोडून बाहेर अशा ठिकाणी अर्थार्जन करण्यासाठी स्थलांतरित होत आहेत (त्यात काही गैर आहे अस माझ म्हणण नाही) त्यात तुम्ही तुमच स्वत:च गाव/शहर निवडलात आणि स्थैर्य मिळवलंत! ही नक्कीच अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे! तुमच्यामुळे मला आज मी सोलापूर जिल्ह्यातला असल्याचा अभिमान वाटला!

पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची....

मुक्तपणे, कसलेही ओझे न बाळगता तुमच्याकडून चित्रे काढली जावीत व रसिकाच्या हृदयात त्यांना अढळस्थान मिळावे हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.

तुमच्या जिद्दीला, चिकाटीला मेहनतीला, कर्तृत्वाला सलाम!
अजून खूप काही लिहिण्यासारखे आहे या लेखाबद्दल, त्यातल्या तुमच्याबद्दल, पण थांबतो आणि एवढेच म्हणतो...

सपने उन्ही के पूरे होते है
जिनके सपनोमे जान होती है
पंखो से कुछ नही होता
हौसलोसे उडान होती है

आता इतक्या चांगल्या लेखाला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी असे उसने शब्द, चांगल नाही वाटत ना?

हे घ्या… खास तुमच्यासाठी माझ्या स्वत:च्या चार ओळी… गोड मानून घ्या!

ये ढलान की मस्ती बता रही है,
किस कदर चोटी, चढके है आये!

लुभाती वादियां मिली राहोमें
उनसेभी कर किनारा है आये!

जाना हमने ना रूकता कोई
हम भी कभी, ना थमके है आये!

- संदीप चांदणे

बाबा योगिराज's picture

26 Sep 2015 - 11:30 am | बाबा योगिराज

अरे वल्लाह..... क्या बात है संदीप भौ...

राही's picture

26 Sep 2015 - 12:06 pm | राही

फार सुंदर आहेत हो या ओळी.
किस कदर चोटी चढ के हैं आये ! .
उतारावरच कळतं किती आणि कसा चढ चढून आलोय ते.

राही's picture

26 Sep 2015 - 12:09 pm | राही

ढलान हवे वर.

संदीपभाऊ जिंकलेत राव तुम्ही.
जसे लेखन तशाच सच्च्या भावना. त्यात सोलापूरचे तुम्ही. अहाहा.

ये ढलान की मस्ती बता रही है,
किस कदर चोटी, चढके है आये!

लिख लिया दिलपे.

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 1:32 pm | चांदणे संदीप

____/\____

पिशी अबोली's picture

26 Sep 2015 - 11:37 am | पिशी अबोली

आहेच आमचा अभ्यादादा भारी!
अर्थात हा लेख वाचेपर्यंत किती भारी आहे याची कल्पनापण नव्हती.
__/\__ ही एवढीच प्रतिक्रिया देऊ शकते. स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी काय मेहनत, काय जिद्द आणि काय त्याग करावा लागतो याची कहाणीच वाचायला मिळाली. __/\__

मोहन's picture

26 Sep 2015 - 11:48 am | मोहन

मस्त चित्तरकथा !

तुमचे स्वप्न लवकरात लवकर पुर्ण होवो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2015 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. उत्तम कलाकार आहे हे त्याच्या मिपावरील कलाकारीने वारंवार सिद्ध झाले आहेच. पण जीवनातही त्याने इतकी "कलाकारी" दाखवून मुख्य म्हणजे "आपल्याला काय हवे हे त्याला समजले" आणि "ते समजल्यावर त्याने हातातल्या दुसर्‍या गोष्टी सोडून हवे त्याचा एककल्लीपणे पाठपुरावा केला." हे विशेष.

बर्‍याच जणांना पहिली गोष्टच माहीत होत नाही आणि ज्या थोड्यांना माहीत होते त्यापैकी फारच थोड्यांना दुसरी गोष्ट करायला जमते... कारण पहिल्या गोष्टीला बुद्धी पुरते, दुसरीसाठी डोक्यात विचित्र वेड असावं लागतं ! या दोन्ही गोष्टी जमल्या की मात्र बहुदा एक जगावेगळं अजब रसायन तयार होतं. त्यातच जर अभ्या.. ला सापडला तसा तंबूला वार्‍या-वादळात बल देणारा आणि त्याचबरोबर जमीनीला घट्ट धरून ठेवणारा आधार (गोड पाश ?!) सापडला तर सोन्याहून पिवळे ! अश्या तिहेरी संगमाने कर्तृत्वाला व्यावहारीक झळाळी दिली नाही तरच आश्चर्य ! या सर्व गोष्टी खूप खूप विरळा आणि जीवनभर जीवापाड जपून ठेवाव्या अश्याच असतात !

कला, व्यावसायिक आणि वैयक्तीक आयुष्यातल्या उत्तरोत्तर उत्कर्षासाठी अभ्या.. ला अनेकानेक शुभेच्छा !!!

आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची....
त्या दिवशी माझ्या अपेक्षा फार म्हणजे फार कमी असतील, यात शंका नाही.

हे ज्या दिवशी विचारपूर्वक आणि समाधानाने केले जाईल त्यावेळची चित्रे पहायची मजा काही और असेल... आठवण ठेवा ! ;) :)

3 वेळा प्रतिसाद अपडेट झाला का?

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 1:27 pm | अभ्या..

धन्यवाद डॉक्टरसाहेब.
तहेदिलसे (हा आम्च्या दुसर्‍या प्राडॉक्टरांचा आवडता शब्द बर्का) शुक्रीया.
आणि विसरत काहीच नाही मी. ;)

मित्रहो's picture

26 Sep 2015 - 12:10 pm | मित्रहो

__/\__
अजून काय बोलनार

वेल्लाभट's picture

26 Sep 2015 - 12:21 pm | वेल्लाभट

क्या बात है अभ्या भाऊ....
कडक्कच ! कडक्कच...
सलाम घ्या आमचा.....

जगप्रवासी's picture

26 Sep 2015 - 12:21 pm | जगप्रवासी

साष्टांग दंडवत स्वीकारा.

अनुप ढेरे's picture

26 Sep 2015 - 12:27 pm | अनुप ढेरे

अप्रतीम!

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2015 - 12:34 pm | प्रभाकर पेठकर

सुरक्षित हमरस्ता सोडून आपल्या आवडीची, काटाकुट्यांनी भरलेली, वेगळीच पायवाट चोखंदळायची आणि आत्मविश्वासाने आरामदायी महामार्गाला जाऊन मिळायचं, ह्यासाठी शरीराच्या हाडं आणि स्नायूंइतकेच मनाची हाडं आणि स्नायू दणकट असावे लागतात. कष्टसाध्य यशाचं कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे.

मनमौजी आणि मस्त कलंदर कल्पनांसाठी अगदी पोटभर शुभेच्छा.

सुधीर's picture

26 Sep 2015 - 12:56 pm | सुधीर

मिपाच्या सुंदर बॅनर्सच्या पाठचा माणूस एवढा कलंदर आहे हे आज कळले.
दंडवत!

कलाकार म्हटलं की ,त्याने ह्या मनावर कब्जा केलाच. हीच आमच्या कलानगरीची परंपरा आहे. कदाचित आपण या गोष्टीचा अनुभव ही घेतला असेल. चांगला लेख , जिद्दीला सलाम.

खटपट्या's picture

26 Sep 2015 - 1:15 pm | खटपट्या

क्या बात है. जबरदस्त वाटचाल.
कलाक्षेत्रात जायचेच हे ठरवून केवळ घरच्यांच्या धमकीमुळे कलाक्षेत्रात न गेलेला खटपट्या.

कधी कधी अभ्या दादासारखेच वाटते की जे पायजे ते करावे. पण तेवढा जीगर राहीला नाही आता. फुकटचे स्वतःला बांधून घेतले....जाउदे. आम्ही साले असेच मरणार..

नाही ओ खटपट्याराव. नावातच खटपट का काय फक्त?
असे नाही विचार करु.
आपले चिगो साहेब म्हैतेत का? त्यांची स्वाक्षरी लक्षात ठेवायची.
तबियतसे एक पथ्थर तो ऊछालो यारो.

मास्टरमाईन्ड's picture

26 Sep 2015 - 1:17 pm | मास्टरमाईन्ड

जबरदस्त आहे राव तुमची चित्तरकथा.
काही गोष्टी वाचून मात्र नॉस्टॅल्जिक झालो.

प्रथम तुमच्या जिद्दीला सलाम. प्रिंटींग व्यवसायात जम बसवणे खरच अवघड आहे. या व्यवसायात अलिकडच्या काही वर्षात किती स्पर्धा वाढली आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मीही घेतला आहे. गावगाडा आणि महानगराचा गाडा ही दोन साप्ताहिके चालवताना स्वतःची प्रिंटींग प्रेस होती. साप्ताहिकांचे काम दोनच दिवस चालत असल्याने बाहेरची प्रिंटींगची कामे घेणे सुरु केले. एक एक अनुभव येत गेले. शाई संपली त्यापासून पेपर खरेदी करण्यापर्यंत सर्वाचा हिशोब जुळवता जुळवता दमछाम व्हायची. त्यात मशिनवर काम करणारे कामगार त्यांच्या शिफ्ट आणि त्यांचे नखरे सांभाळताना अनेकदा आपणच आता हेही काम शिकून घ्यावे असे वाटायचे. पुढे पुढे तर कामगार आपल्या माघारी वैयक्तिकरित्या कामे आणून आपल्याच मशिनवर छापून देतात हे कळले तेव्हा नको हा व्यवसाय असे झाले. साप्ताहिके बंद केली त्यानंतर प्रिंटींग मशीनही विकून टाकली.
दरम्यान वृत्तपत्रात पत्रकारिता सुरु असल्याने पैश्याची अडचण नव्हती. तरिही तुमच्यासारखेच स्वतःचे काहीतरी सुरु करावे ही इच्छा अजून तग धरुन आहे. नुकतीच क्रिएटीव्ह मिडीया नावाची फर्म फक्त नोंदणी करुन ठेवली आहे. इमेजबिल्डींग पासून ते पब्लीसिटीपर्यंत बरीच कामे या क्रिएटीव्ह मिडीयाच्या माध्यमातून करण्याची आखणी केली असली तरी माझे स्वतःचे एक्सपोजर आधी व्हावे या दृष्टrने कुठे अनुभव मिळतो का याचा प्रयत्न सुरु आहे. आपण मला काही मदत करु शकाल का? आपल्या फर्म मध्ये येऊन आपण कसे काम करता हे जाणून घेण्याची इच्छा आहे. आपले सहकार्य मिळाल्यास खूप मदत होईल.

अवश्य. कधीही विचारा काय हवे ते. जरुर सांगेन. मिपावर एखादा धागा काढलात आपण तर मिपाकरांनाही माहीती मिळेल.

पद्मावति's picture

26 Sep 2015 - 1:24 pm | पद्मावति

अप्रतिम!
सुरेख लिहिलंय. तुमची जिद्द, चिकाटी आणि मेहेनत, जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.

शेखरमोघे's picture

26 Sep 2015 - 1:57 pm | शेखरमोघे

सुन्दर लेख, सगळेच - चान्गले तसेच वाईट - अनुभव टिपणारा! आवडला.

स्वप्निल रेडकर's picture

26 Sep 2015 - 1:59 pm | स्वप्निल रेडकर

अभ्या भाऊ ,आवडेश !!!मी सुद्धा comercial artist आहे.सध्या एका नियतकालिक प्रकाशनामध्ये काम कर्तोय illustrator म्हणून . खूपशा आठवणी ताज्या झाल्या.अर्थात एवढी मेहनत आणि चिकाटी नवती .थोडाफार धोपटमार्गी प्रवास :)
तुज्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम!

द-बाहुबली's picture

26 Sep 2015 - 1:59 pm | द-बाहुबली

वाह...! गणेशा लेखमालेनिमित्ताने मिपावर रोज असे काही वाचायला मिळत आहे की वाटते... मायला आपले अयुष्यच अजुन सुरु झालं नाहीये अनं लोक मेहनतिवर कुठच्या कुठं पोचले. और आनं दो.

दिवाकर कुलकर्णी's picture

26 Sep 2015 - 2:00 pm | दिवाकर कुलकर्णी

कांहिना लेख वाचून डोले ओले झाल्याची भावना झाली,मला
प्रतिक्रिया वाचूनहि तीच भावना झाली,सर्व
मिपाकर जरूर थट्टेखोर असतील,पण खरेतर पहिल्यांदा ते सर्हदयी
आहेत हे अधोरेखित झाले

चाणक्य's picture

26 Sep 2015 - 2:31 pm | चाणक्य

साॅलिड. तुमच्या वडिलांनी दिलेला धडा फारच भारी आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देणारा तुमचा जिवलगही भारी

विवेकपटाईत's picture

26 Sep 2015 - 2:45 pm | विवेकपटाईत

कथा आवडली पण मनात असल्याप्रमाणे जगू न शकण्याची रुखरुखहि जाणवली.

अद्द्या's picture

26 Sep 2015 - 2:58 pm | अद्द्या

"पैसा गरजेचा आहेच, पण न जाणो एक दिवस माझा कलंदर स्वभाव उफाळून येईल अन हे सारे झुगारून मी फक्त माझ्या आनंदासाठी चित्रे काढायला सुरू करेन. अगदी वाट पाहातोय त्या दिवसाची..."

^^^

अभ्या . . हे जेव्हा वाटेल न . तेव्हा फक्त बँक बेलेंस चेक कर . .
पुढील १५ -२० वर्षे तुझ्या नंतर बसून खातील एवढे पैसे असतील . तर बिनधास्त जा :)

(अशीच काही स्वप्ने डोक्यात ठेऊन घासत असलेला अद्द्या)

शिव कन्या's picture

26 Sep 2015 - 4:32 pm | शिव कन्या

तुमची कहाणी वाचून अशा माहितीतल्या दोनेक कलावंतांची सहज आठवण आली.
असा संघर्ष, आणि त्यावरची मात! एक दिवस तुम्ही केवळ स्वतः स्वतः साठी चित्र काढू लागाल, तो दिवस लवकर उगवो,...... शुभेच्छासह.

नि३सोलपुरकर's picture

26 Sep 2015 - 5:34 pm | नि३सोलपुरकर

जिंकलस मित्रा,
तुझ्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम.

मृत्युन्जय's picture

26 Sep 2015 - 7:30 pm | मृत्युन्जय

खतरा जमलाय लेख. अव्वल स्ट्रगल करुन यशस्वी झालास भावा. अभिनंदन

यशोधरा's picture

26 Sep 2015 - 7:45 pm | यशोधरा

अभ्या :)

जव्हेरगंज's picture

26 Sep 2015 - 8:03 pm | जव्हेरगंज

ही चित्तरकथा थेट पोहोचली!

पैसा's picture

26 Sep 2015 - 8:12 pm | पैसा

खूपच छान मनापासून लिहिलंस! लै भारी! मात्र हे सगळे वाचून लोकांनी तुला पुरता अभ्याशेट करू नये बस! या सगळ्यात एक लहान, त्याच्या वयाप्रमाणे वागणारा अभ्या आहे. कधी वाईट वाटलेलं सांगेल, तर कधी गप्पच होऊन जाईल, कधी लहान भावासारखा रुसेल, पण अगदी सच्चा, खराखुरा! कधीही हाक मारली की मदतीला हजर! खूप खूप मोठा हो अभ्या!! आत्ता कुठे सुरुवात झालीय.

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2015 - 8:34 pm | श्रीरंग_जोशी

बर्‍याच प्रतिक्रिया वाचून असं वाटलं की अभ्याकडे पाहण्याची लोकांचा दृष्टीकोन बदलतोय की काय? माझ्या नशिबाने मला काही मोठमोठ्या कलावंतांबरोबर निवांत वेळ घालवता आला आहे. ती बहुतेक मंडळी सामान्य माणसांप्रमाणे वागणूक मिळण्यासाठी तरसत असतात.

अभ्याला त्याच्या आनंदासाठी चित्रे काढायला निवांतपणा मिळत नाही याबाबत सहानुभूती व्यक्त केली जात आहे. बहुधा त्यालाही ते अपेक्षित नसावे. अशा अवलिया कलाकाराला अन कर्तॄत्ववान माणसाला त्याच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सदिच्छा जरुर व्यक्त करावी परंतु तिचे रुपांतर सहानुभूतीमध्ये झाल्यास त्यालाही ते त्रासदायकच असेल.

हे माझ स्वतःचं मत आहे इतरांना पटायलाच हवं असा आग्रह नाही.

खुप छान लेख.तुमच्या मेहनतीचे कौतुक.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2015 - 8:40 pm | चौथा कोनाडा

|| तेथे कर माझे जुळती ||

प्रवाहा विरुद्ध पोहत धडपडत खरचटत केलेल्या प्रवासाची कलात्मक सुंदर कहाणी !

स्पेसिफिक अन पॉवरफुल लेखन ! अभ्यादादा च्या लेखनास सलाम !

मस्त लिहिलेस अभ्या , खुप मोठा हो गूणी कलाकार आहेस:)