(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)
काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.
हाच प्रकार कुणीतरी करावा अशी माझी अपेक्षा नाही परंतु अश्याच प्रकारचा प्रयत्न एखाद्या व्यवस्थेला किंवा संस्थेला चित्रित करण्याचा व्हावा असे मला वाटायचे.
कोर्ट या चित्रपटाने न्यायालयात कामकाज कसे चालत असेल हे हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच चित्रपटातून जी न्यायालये समोर आली त्यामध्ये भाषणबाजी, वकिलांचे तारखा घेण्यासाठी आजारी पडणे वगैरे वगैरे पाहायला मिळाली. पण कोर्ट याबाबतीत वेगळा आहे. इथे एकतर सत्र न्यायालय आहे आणि मोठ्याच्या मोठ्या चेंबर मध्ये खूप लोक फक्त हीच केस ऐकायला बसले आहेत असे नाही. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अगदी जवळ जाणारं हे न्यायालय आहे.
चित्रपटाची कथा एक लोकशाहीर नारायण कांबळे यांच्या भोवती फिरते. त्यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे वासुदेव पवार यांनी आत्महत्या केली असा आरोप ठेवून पोलिस त्यांना अटक करतात. कोर्टात बऱ्याच तारखानंतर नारायण कांबळे यांना जामीन दिला जातो. नंतर त्यांना दुसऱ्याच कायद्याखाली परत अटक केली जाते आणि तो मुद्दा परत त्याच न्यायाधीशांसमोर येतो. पुढची तारीख देऊन कोर्टाला महिनाभराची सुट्टी पडते.एका अर्थाने इथेच चित्रपट संपतो (चित्रपट इथे संपवला असते तरी चालले असते, पण अजून काही सीन्स न्यायाधीशांच्या संदर्भात घडतात आणि मग चित्रपट संपतो.)
चित्रपट जसा जसा पुढे जातो तसे सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांचे वैयक्तिक आयुष्य दाखवले जाते. सरकारी वकील एका मध्यम वर्गीय घरातून आल्या आहेत तर बचाव पक्षाचे वकील एका श्रीमंत घरातून आले आहेत. त्यांच्या आवडीनिवडी यामध्येही खूप फरक आहे. सरकारी पक्षाचे वकील नाटक पाहायला जातात जे मराठी - अमराठी वादावरती आहे तर बचावपक्षाचे वकील एका बार मध्ये जाऊन परदेशी सहलींवर आपल्या मित्रांशी चर्चा करतात. तिथे बसून ते एक पोर्तुगीज गाणेही ऐकतात. दोघेजण आपापल्या घरच्यांसोबत जेवायला बाहेर कुठे कुठे जातात यावरही एक सीन आहे. एका बंदी आणलेल्या पुस्तकाच्या बाजूने बचावपक्षाचे वकील बोलतात तर दुसऱ्या दिवशी त्यांना लोकांच्या रागाला सामोरे जावे लागते. अश्या विविध गोष्टी दाखवत चित्रपट पुढे सरकतो. या गोष्टी objectively दाखवल्या गेल्या आहेत. त्यावरती कसलेही समालोचन चित्रपटात नाही. जो प्रेक्षक चित्रपट पाहतो आहे त्याने स्वतः त्याचा अर्थ लावणे अपेक्षित आहे.
चित्रपटातील पात्रांची निवड अतिशय उत्तम आहे आणि वास्तवाच्या जवळ जाणारी आहे. चित्रपटाचे छायाचित्रण उत्कृष्ट आहे विशेषतः रुंद आणि बर्याच वेळ चालणाऱ्या फ्रेम्स. पहिल्या काही सीन्स मध्ये एवढा वेळ चालणारी एकच फ्रेम पाहून वैताग येऊ शकतो पण पुढे पुढे त्याची सवय होते.
एकंदरीत एका कोर्ट केस च्या निमित्ताने समाज, न्यायव्यवस्था, सरकारी व्यवस्था यावरती भाष्य करण्याचे काम हा चित्रपट करतो.कुठल्या समीक्षकाने काय म्हटलंय किंवा आपले मित्र मैत्रिणी काय म्हणताहेत यावरती न जाता आपण स्वतः जाऊन एकदा अनुभव घ्यावा असा हा चित्रपट आहे!
ता.क.: काल मी हा चित्रपट कलकत्त्यात पाहिला. जेव्हा जायचे ठरवले तेव्हा वाटले कि पूर्ण थीएटर मध्ये आपण एकटेच असू आणि तसे असेल तर शो रद्द तर नाही होणार ना अशी शंका चाटून गेली. परंतु तसे काही झाले नाही. थीएटर छोटेच होते पण चित्रपट पाहायला साधारण ३० जण तरी हजर होते. हे चित्र पाहून खूप समाधान वाटले. चित्रपट संपला तेव्हा अगदी टाळ्याही पडल्या.
प्रतिक्रिया
19 Apr 2015 - 12:55 pm | माम्लेदारचा पन्खा
असंच चालू असतं कोर्टात.... चांगलं की वाईट ते नाही माहीत..ज्याचं त्यानं ठरवावं.. पण जे आहे हे असं आहे....!!
19 Apr 2015 - 2:03 pm | बॅटमॅन
सहीच ओ सव्यसाचीसाहेब! आवडलं. :)
19 Apr 2015 - 4:26 pm | सुहास झेले
अप्रतिम सिनेमा... दीर्घ फ्रेम्स वास्तविकता अधिकाधिक भेदक करत जाते. शेवटचा न्यायाधीशाचा प्रसंग तर निव्वळ अप्रतिम.
सिनेमा नक्की बघा :)
20 Apr 2015 - 11:57 am | माम्लेदारचा पन्खा
आता संग्रही ठेवण्याची इच्छा आहे.........
20 Apr 2015 - 1:57 pm | पिंपातला उंदीर
आचार्य अत्रे यांच्या 'श्यामची आई ' ला पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते . त्यानंतर मुंबईत शिवाजी पार्क वर आचार्य अत्रे यांचा जाहीर सत्कार झाला . त्यावेळी केलेल्या भाषणात अत्रे विषादाने म्हणाले ,"तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आलात . पण याच्या अर्धी गर्दी जरी तिकीट खिडकीवर आली असती तर आमच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा थोडा हलका झाला असता ."असे म्हण्याची पाळी चैतन्य ताम्हाणे आणि टीमवर येऊ नये यासाठी एक भाषिक समाज म्हणून आपण काय करणार आहोत हा कळीचा प्रश्न आहे .
23 Apr 2015 - 1:56 pm | चिगो
'मी मराठी' ह्या वृत्तपत्रातला उतारा का? त्या पुरवणीत वाचला होता, म्हणून म्हटले..
25 Apr 2015 - 2:50 pm | पिंपातला उंदीर
@चिगो साहेब , तो उतारा / लेख / समीक्षा मीच लिहिली होती . .
20 Apr 2015 - 2:49 pm | मराठी_माणूस
अतिशय वेगळा अनुभव. खर्या अर्थाने चाकोरी बाहेरचा चित्रपट.
हिंदी सिनेमाने कोर्टरूम ड्रामाच्या नावाखाली जे काही दाखवले जाते त्याला छेद देणारा.
कोणीही नामवंत कलाकार नसल्याने, त्यांच्या उपस्थीतिने प्रभावीत होण्याचा प्रकार झाला नाही.
प्रत्येकाचा अभिनय हा अतिशय सहज आणि सुंदर. इतके वास्तववादी चित्रण गेल्या कीत्येक वर्षात पाहीले नव्हते.
(आवांतरः पहिल्याच दिवशी पाहीला, तरीही अंदाजे ८०% थिएटर रीकामे होते)
20 Apr 2015 - 5:53 pm | अभिजित - १
ठाणे eternity मॉल ला शुक्रवारचा पहिला शो कॅन्सेल झाला हि बातमी पेपर मध्ये वाचली.
20 Apr 2015 - 6:09 pm | यशोधरा
मला पहायचा आहे .
20 Apr 2015 - 8:06 pm | पलाश
चित्रपट पहावेसे वाटत होतेच पण विषयाचा अंदाज येत नव्हता. चित्रपटसमीक्षण व प्रतिसाद आवडले. हे वाचल्यानंतर हा चित्रपट कसा व कुठल्या अपेक्षा ठेऊन पहावा ते नीट कळल्याने आता नक्की पाहीन.
21 Apr 2015 - 10:27 am | चौथा कोनाडा
छान परिक्षण लिहिलेय !
कालच कोर्ट पाहिला. आवडला की नाही नीट सांगता येणार नाही. खुपशी दृष्ये दाद देण्यासारखी आहेत. पात्र निवड अतिशय चपखल आहे. एक वेगळे काहीतरी पहात आहोत ही जाणाव छान आहे, पण थेटर मधुन बाहेर पडताना रितेरितेच वाटत होतं.
सिनेमाचा संथ समारोप अगदी ८० च्या दशकातील आर्ट्फ़िल्म छाप शेवटी सिनेमा आपल्याशी (पक्षी: माझ्याशी) नीट कनेक्ट होऊ शकला नाही / किंवा आपण कनेक्ट होऊ शकत नाही. आपल्या सारख्या बरया पैकी चोखन्दळ रसिकांना सुद्धा हा सिनेमा पसंत पडेल असे वाटत नाही. कविच्या सामाजिक अस्तिवाची धग जाणवली नाही / गुदमरून मृत झालेला कामगार, त्याचे कुटुंबिय समाजापासुन / वसाहतीअतल्या आजुबाजुच्या लोकांपासुन इतके तुटले असतील हे पटले नाही !
फॅण्ड्रीच्या वेळी बरोबर याच्या उलट अनुभव आला.
या संध्याकाळच्या साडेसातच्या प्राईम टाईम कोर्टात आम्ही फ़क्त वीस पंचवीस साक्षीदार होतो. बाहेर पडताना दुर्दैवाने बहुते्कांच्या मुद्रेवर माझ्यासारखेच प्रश्नचिन्ह होते.
22 Apr 2015 - 4:20 pm | बबन ताम्बे
घरी गेल्यावर प्राणायाम केला असतात तर बरे वाटले असते.
23 Apr 2015 - 12:09 pm | चौथा कोनाडा
ताम्बे साहेब कसले मनकवडे हो तुम्ही ! तुम्हाला हे प्राणायामचं कसं लक्षात आलं?
हा सिनेमा पाहताना मध्यंतरानंतर माझ्या पुढील रांगेतील दोघे जण प्राणायाम करताहेत हे मला जाणवले, पण सिनेमा संपल्यावर जाण्यासाठी उठलो तर ते ते दोघे चक्क निद्रासन करत आहेत ! डोअरकीपरच्या मदतीने मग त्यांना "भाना"सनात आणायला लागले.
बाय-द-वे सिनेमाचा शेवट समाज व न्यायसंस्था यांच्या निद्रीस्त पणा वरच आहे !
23 Apr 2015 - 12:39 pm | बबन ताम्बे
अशा वेळी नाकात दोरी घालायची. सटासट शिंका येऊन झोपी गेलेला झटक्यात जागा होतो.
पुढच्या वेळी थेटरमधे जाताना खिशात दोरी न्या. (अर्थात फक्त दुर्बोध सिनेमा पहायला जाल तेंव्हा.)
23 Apr 2015 - 4:12 pm | चौथा कोनाडा
म्हणे नाकात दोरी घालायची ! अन त्यानी "कोर्टात" खेचले म्हन्जे ? आयुष्यभरासाठी नाकी नऊ यायचे.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये हा धडा या सिनेमा पाहुन सुद्धा लक्षात आला नाही तर आवघड आसतय !
25 Apr 2015 - 3:26 pm | खटासि खट
आपल्या सारख्या बरया पैकी चोखन्दळ रसिकांना सुद्धा हा सिनेमा पसंत पडेल असे वाटत नाही. >>> चौथा कोनाडा हे नाव बदलून वर्तुळ ठेवा. बिझी रहाल.
26 Apr 2015 - 7:32 pm | चौथा कोनाडा
:-)))
22 Apr 2015 - 12:45 pm | संदीप डांगे
प्राईम टाईमला गर्दी नाही याबद्दल तक्रार करणार्यांना एक सांगावेसे वाटते. कुठलाही सिनेमा असो त्याला प्रचंड प्रसिद्धीची आवश्यकता आहे. फॅण्ड्रीच्या वेळेस झीने जबरदस्त प्रसिद्धी केली तशी कोर्टसाठी झाली नाही.
23 Apr 2015 - 1:22 am | चौथा कोनाडा
भरपुर प्रसिद्धी करून राजमान्यता (म्हंजे पारितोषिकेप्राप्त, समिक्षकानी वाखाणलेला, आंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये नावाजलेले) मिळवलेले चित्रपट लोकमान्य (सवंग लोकप्रियता नाही) ठरले नाहीत अशी बरीच उदाहरणे आहेत. ! फॅण्ड्री मध्ये तो एक्स फॅक्टर नसता तर तो ही लोकमान्यता पावला नसता. वळु व फॅण्ड्री मध्ये हा एक्स फॅक्टर असल्यामुळे हे सिनेमे चालले. मला आठवतेय वळुची प्रसिद्धी ही फॅण्ड्रीच्या मानाने कमीच होती तरीही तो लोकाना आवडला !
24 Apr 2015 - 11:32 pm | संदीप डांगे
प्रत्येक सिनेमाचं एक ऑडियंस असतं. सिनेमांमधे 'याच्यापेक्षा तो चांगला' हे व्यक्तिसापेक्ष आहे. फँड्री आणि कोर्ट यांचं ऑडियंस वेगळं तर वळू, दे धक्का, मी शिवाजी... यांचं वेगळं. आपआपल्या ऑडियंसपर्यंत पोचायला प्रसिद्धी लागतेच. फँड्रीची पहिल्याच आठवड्याची कमाई २.३५ करोड आहे तर वळूची चित्र-गृहात असेपर्यंतची संपूर्ण कमाई ३.५ आहे. पुर्वप्रसिद्धीचा हा फरक पडतो. 'आंतरराष्ट्रीय पुरस्कार, शासकिय पातळीवर कौतुक' म्हणजे प्रसिद्धी असे आपणास वाटत असेल. पण तसे नसते.
तो 'एक्स फॅक्टर' काय तो आम्हालाही कळू द्या. कारण सो कॉल्ड एक्स वाय झेड फॅक्टरवाले मोठे सिनेमेही दणदणीत आपटले आहेत. आणि कुठलाच फॅक्टर नसलेले तुफ्फान हौस्फुल्ल गेलेत.
26 Apr 2015 - 7:50 pm | चौथा कोनाडा
फँड्री हा कोर्टपेक्षा चांगला असं मी म्हटलेलं नाहीय !
मी फक्त सिनेमाच्या "शेवटाच्या परिणामकारकता" च्या उदाहरणादाखल त्याचा उल्लेख केला होता.
'एक्स फॅक्टर' म्हंजे नसुन जमुन आलेली पटकथेची अपिलिंग बांधणी, कथायोग्य वेग आणी अन परिणामकारक शेवट ही जमुन आलेली पाकक्रिया (भट्टी) ! या बाबतीत शेवटाला कोर्ट सैल पडत जातो. एक वेगळे काहीतरी पहात आहोत असे वाटत असते अन थेटर मधुन बाहेर पडताना रितेरितेच वाटत राहते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
सुधीर यांच्या प्रतिसादानुसार देखिल "चित्रपट एक कथेचा प्रवाह न राहता तुकड्या तुकड्यांचा कोलाज वाटत राहतो" याच्या शी सहमत
काही सिनेमे लोकांपर्यन्त उशीराने पोहोचतात. अन चांगले असले तर जरूर यशस्वी होतात. कोर्टाच्या बाबतीत असे झाले तर आनंदच आहे.
27 Apr 2015 - 2:44 pm | संदीप डांगे
तुमच्या प्रतिक्रियांवरून अंदाज बांधून पहिल्यांदाच एक गुस्ताखी करतोय.
एक मैत्रीचा सल्ला देतो. चित्रपट महोत्सवांमधे होईल तेवढे अधाशासारखे चित्रपट बघा. थोड्क्यात काय तर चित्रपटांबद्दलचा अभ्यास वाढवा. कोनाड्यात राहू नका.
दामिनी, मेरी जंग म्हणजेच चित्रपट नाही. एक रुका हुआ फैसला पण बघा. चित्रपटांचे जग फार विशाल आहे.
प्रत्येकाचा चॉईस वेगळा असला तरी चवीच्या बाहेरचे चित्रपटसुद्धा बघायला काय हरकत आहे?
27 Apr 2015 - 9:07 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद ! गुस्ताखी माफ !
आपल्या सुचवणीबद्दल आदरच आहे.
तुम्ही उल्लेखलेले "दामिनी, मेरी जंग" तर तद्दन कमर्शियल चित्रपट आहेत. (त्यातल्या त्यात दामिनी हा राजकुमार संतोषी सारख्या सामाजिक भान असलेल्या दिगदर्शकाचा होता) या विषयी न बोललेलेच बरे.
मी आवर्जुन कोर्ट बघायला गेलो होतो (ते ही चक्क एकटा) या वरुन तुम्हाला माझ्या चवीचा अंदाज यायला हरकत नाही.
कोर्टाच्या ज्या गोष्टी आवडल्या त्याला दाद दिलीच आहे.
मी माझ्या वरील प्रतिसादात उल्लेखली विधानांची परत एकदा नोंद घ्यावी या साठी खाली पुनरुल्लेख करत आहे:
"या बाबतीत शेवटाला कोर्ट सैल पडत जातो. एक वेगळे काहीतरी पहात आहोत असे वाटत असते अन थेटर मधुन बाहेर पडताना रितेरितेच वाटत राहते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे."
सुधीर यांच्या प्रतिसादानुसार देखिल "चित्रपट एक कथेचा प्रवाह न राहता तुकड्या तुकड्यांचा कोलाज वाटत राहतो" याच्या शी सहमत.
काही सिनेमे लोकांपर्यन्त उशीराने पोहोचतात. अन चांगले असले तर जरूर यशस्वी होतात. कोर्टाच्या बाबतीत असे झाले तर आनंदच आहे"
या उप्पर काय लिहु? कृपया गैरसमज नसावा.
27 Apr 2015 - 9:58 pm | संदीप डांगे
माफीबद्दल धन्यवाद! आणि तुमच्या वैयक्तिक मताबद्दल संपूर्ण आदर. तुमच्या चवीबद्दलही कुठली टिप्पणी नाही. ते जनरल स्टेट्मेंट होतं.
तरी तुमच्या अनुभवाबद्दल थोडे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. कोर्ट संपल्यावर जे रितेपण तुम्हाला वाटले खरे तर तेच चित्रपटाचे बलस्थान आहे. कुणाला अजून वेगळे काही वाटले असेल. एकच सिनेमा पाहून वेगवेगळ्या लोकांमधे वेगवेगळे भाव उमटण्याला चित्रभाषेत प्रचंड महत्त्व आहे. मी असे चित्रपट बरेच बघितलेत की ज्यात अर्थाचा काहिच ताळमेळ लागत नाही. पण ते एक अनुभव असतात. त्यात काही संदेश, धक्कादायक शेवट, नवरसांपैकी कुठलाही रस वैगेरे नसतो. उत्कंठा वाढवणारे क्षणही नसतात. एकदम फ्लॅट. तरीही तो अनुभव संपन्न करून जातो. अगदी हवे सारखे. काहीच पकडता येत नाही हातात. पण आपण तिच्यात असतो, ती आपल्यात असते. आणि तरीही एकटं एकटं वाटतं. असे चित्रपट बनवणे खरे उच्च कौशल्याचे द्योतक आहे. कथा सांगणे, दाखवणे, रंगवणे वेगळे आणि ती अनुभवणे वेगळे. तशा पातळीवर कोर्ट गेल्यानेच जागतिक पातळीवर त्याचे कौतुक झाले.
मेडीटेशनच्या भाषेत सांगायचे तर मन निर्विचार होतं तो अनुभव सर्वोच्च असतो, ती मनाची सर्वोच्च अवस्था असते. चित्रपट जर मेडिटेशनसारखे समजले तर कोर्ट सारखे चित्रपट हे या कलेतली सर्वोच्च अवस्था आहे. जिथे सर्व आहे पण काहीच निर्दिष्ट करता येत नाही. सगळं समजतं पण काहीच हाती लागत नाही.
एकाने कुठेतरी म्हटलंय जणू खर्या कोर्टात कॅमेरे लावून दिग्दर्शक निघून गेलाय.
दुसरं असं की बर्याच एकसारख्या अनुभवांनंतर एखाद्या अनुभवाची पुर्वतयारी होऊन जाते मनात. तसा अनुभव आला नाही तर चुकचुकल्यासारखे वाटते. कमर्शीयल असो वा आर्टफिल्म वा समांतर ह्यांचा एक निश्चित फॉर्मुला असल्याने एक पुर्वग्रह असतो. त्याच्याही बाहेरचं काही अनुभवलं की वेगळं वाटतं. (कोर्ट, फँड्री असे चित्रपट आहेत. ते मराठी आहेत म्हणून जास्तच अभिमान आहे.) "फॅण्ड्रीछाप शेवट टाईपकास्ट होइल असे वाटत नाही." हे तुमचं वाक्य त्याचंच द्योतक आहे. छाप आणि टाईपकास्टच्या बाहेर जाऊन चित्रपट बनतायत, ते कमर्शीयल यश धुंडाळायला थेटरात येतायत हेच आजच्या पिढीचं कर्तृत्व आहे असं वाटतं.
हे सगळं असंच झालं तुमच्यासोबत असं अजिबात म्हणत नाही. जस्ट बीइंग हायपोथिटीकल! :-)
1 May 2015 - 5:39 pm | चौथा कोनाडा
"ओपिनियन न्युट्रॅलीटी" केंद्रस्थानी ठेवुन रितेपण अन बलस्थान या विषयी केलेले रसग्रहण, विष्लेषण / विवेचन आवडलं.
धन्यवाद, संदीप डांगे !
25 Apr 2015 - 3:32 pm | खटासि खट
फॅण्ड्री मध्ये तो एक्स फॅक्टर नसता तर >>>> अय्योय्यो, ओ सलजी, मि शांगु का खलं खलं कि हितं कुनालाच तो येक्स का वायझेल फॅक्तल कलला नाहि, शगले अदानी लोक्स भरलेत. पन कलु नये म्हनुन होहो म्हनतात.
26 Apr 2015 - 8:01 pm | चौथा कोनाडा
अहो साहेबजी, शांगतो येक्स का वायझेल फॅक्तल, शांगतो. येक्स का वायझेल फॅक्तल म्हंजे दुसले तिसले काय न्हाय, लोकास्नी भावनाली "परिणामकारकता" हाय का नाय ? ज्यास्ती ह्येड्येक कलुन घ्यायच्या नाय डोक्याला. आवडलं तं व्ह्य म्हनायंचं नाय तं न्हाय ! हाय काय नाय काय !
आता कार्ट-२ बी येतोय. आजच तंबी दुराईंनी ल्हिलेला ट्रेलर वाचला.
कोर्ट-२
बगा, आवडतंय का?
27 Apr 2015 - 8:27 am | खटासि खट
तुमचा आयडी बदलण्याची नितांत गरज आहे वर्तुळदादा.
1 May 2015 - 5:53 pm | चौथा कोनाडा
बास्स का खटखटदादा ! येवडा तुम्हास्नी कोर्ट-२ चा ट्रेलर दिला होता, त्या बद्दल काय नाय लिहिलेत !
का मागं लागलायसा आमच्या, नांव बदला म्हून ? येवडा कोपर्यातला कोनाडा शोधला तो बी चौथा अन तुमी म्हंताय नांव बदला ! येनीवे, हट्ट आवडला तुमचा ! चौको खुश हुवा !
हे घ्या, झालो आम्ही वर्तुळ :
4 May 2015 - 11:03 am | खटासि खट
(वेलेच आहात_.
काय बी आवडतं तुमास्नि. काय तर म्हणं ट्रेलर ! आवं अजुन येक बी पार्ट बगितल्याला नाय. आता तुमच्या गोलगोल लिवन्याला डायरेक्ट हसल्यालं बी बरं दिसनार नाय म्हनुनशान तुम्हाला म्हनलं गोल व्हां म्हण्जी लै कोनाडं भेटत्याल. न्हाई कळला व्हय ?
6 May 2015 - 1:26 am | चौथा कोनाडा
येक पार्ट बी बगितला नाय ह्ये सांगितल ते बर केलेन !
आता आम्हास्नी काय करायच लै कोनाड भ्येटुन ( हा, आता कोनाडी भ्येटत असल तर बात येगळी) अन तुमच म्हनताल त
स्वत:च वर्तुळ वर्तुळ म्हुनश्यान फेर धरल्याव समदच गोलगोल दिसाय लागल अस त झाल नसाव !
30 Apr 2015 - 11:34 am | बबन ताम्बे
त्या पुणे ५२ मधे पण (ट्रिपल) एक्स फॅक्टर होता का हो चौ.को.साहेब? त्याचा शेवट पण काय कळला नाय !
1 May 2015 - 6:56 pm | चौथा कोनाडा
हो, होता ना ! पुणे ५२ मधे (तसला) एक्स फॅक्टर होता! कथेच्या ओघात कथा नायक अन त्याला त्याला गळाला लावणारी ग्लॅमरस स्त्री यांचा प्रचंड बोल्ड बेडसीन बघुन दचकायला झाले होते. असले दृष्य मी मराठी सिनेमात पहिल्यांदाच पाहिले. त्या अर्थाने पुणे ५२ मधे एक्स फॅक्टर होता !
सिनेमाचा शेवट कळण्यासारख्या कॅटॅगिरीतला नव्हता.
खालील धाग्यांवर पहा काही हाताला लागतेय का ते :
१) मिपा_पुणे-५२
२) माबो_पुणे-५२
३) ऐअ_पुणे-५२
४) लोस_पुणे-५२
५) मटा_पुणे-५२
22 Apr 2015 - 3:30 pm | सुधीर
चित्रपट पाहताना ८०-९० च्या दशकातल्या समांतर हिंदी चित्रपटांची आठवण आली. खास करून लहान असताना पाहिलेला "एक डॉक्टरकी मौत" आठवला. हाही चित्रपट संथ गतीने समाज व्यवस्थेचे आणि खास करून न्यायव्यवस्थेचे चित्रण करत पुढे जात रहातो. पण संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाने मूळ कथे बरोबर, बर्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न केल्यामुळे चित्रपट एक कथेचा प्रवाह न राहता तुकड्या तुकड्यांचा कोलाज वाटत राहतो. चित्रपट मला आवडला पण चित्रपटात करमणूक मूल्य अगदीच नगण्य असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकाला कितपत रुचेल अशी शंका वाटते.
चित्रपट बहुभाषिक आहे. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती संवाद बर्यापैकी आहेत. मुंबईतल्या लोकांना ते संवाद नक्कीच कळतील पण मराठी सबटायटल्स असायला हवे होते असे वाटते.
मराठी चित्रपटांना पारितोषकं मिळत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे पण पारितोषकांसाठीच्या चित्रपटाची लाट येऊ नये असेही वाटते. नाहीतर सामाजिक विषय, अतिशय वास्तवादी चित्रण, भूमिकेला अगदी अनुरुप वाटतील असे निवडून घेतलेले कलाकार (वा उत्तम अभिनय करवून घेतलेली पण कलाकार नसलेली माणसं), प्रत्येक फ्रेम/शॉट मधून बर्याच काही इतर गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न, अनपेक्षित पण "इंपॅक्ट" करणारा शेवट हा "फॅण्ड्री फॉर्म्युला" होऊ नये असे वाटते.
23 Apr 2015 - 1:28 am | चौथा कोनाडा
अगदी, अगदी ! पहिल्या दोन परिचछेदाशी १००%सहमत !
फॅण्ड्रीछाप शेवट टाईपकास्ट होइल असे वाटत नाही. प्रत्येक कथेच्या शेवटाची वेगळी गरज असेल. आता गेल्या वर्षभरात असा शेवट असलेला सिनेमा आलाय ?
23 Apr 2015 - 9:21 pm | सुधीर
नाही (कदाचित, मी मोजकेच चित्रपट पाहतो..) एवढेच म्हणायचे होते की, फॉर्म्युला होऊ नये...
25 Apr 2015 - 3:04 pm | अनुप ढेरे
मी गेल्या आठवड्यात पाहिला हा सिनेमा. भरलेलं होतं थिएटर.
26 Apr 2015 - 10:45 pm | सव्यसाची
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!
ज्यांना कोर्ट आवडला नाही किंवा आपण 'चित्रपट' पाहिला असे वाटले नाही त्या सर्वांना मी समजू शकतो. या चित्रपटात करमणूकमुल्य, जे एका सामान्य प्रेक्षकाला हवे असते, ते कमीच आहे. तरीही हा चित्रपट मला स्वतःला कोलाज वाटला नाही.
या चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांची मुलाखत पाहीली होती. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि नवीन कलाकारांना घेण्यामागे भावना हीच होती कि कॅमेरा पहिल्यांदाच फेस केल्यावर जे काही भाव असतील ते टिपायचे होते. परंतु या मधील सर्व कलाकारांची निवड मलातरी खूप आवडली.
हा फॉर्मुला वगैरे तयार होईल कि नाही माहिती नाही, परंतु वास्तववादी चित्रण असणारे चित्रपट येत राहावेत असे मला वाटते. मी स्वतः फँड्री पहिला नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही परंतु नवीन प्रयोग मराठी चित्रपटामध्ये व्हावेत अशी इच्छा मात्र जरूर आहे.
27 Apr 2015 - 11:23 pm | एस
उत्कृष्ठ लेख आणि तशीच चर्चा.
28 Apr 2015 - 12:11 pm | मदनबाण
चित्रपटाची ओळख आवडली... हल्लीच याचा प्रोमो पाहिला होता, ते इथे देतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt
1 May 2015 - 6:48 pm | पैसा
उत्तम लेख आणि चर्चा!
1 May 2015 - 9:53 pm | समीरसूर
लेख छान झाला आहे.
'कोर्ट' मला आवडला. एक एक प्रसंग छान विचारपूर्वक रचला आहे आणि तरीही चित्रपट कुठेच रटाळ वाटत नाही. कित्येक ठिकाणी विसंगतीतून विनोद निर्माण झाल्याने चित्रपटाचा बाज अगदीच कलात्मक चित्रपटांसारखा ठोकळेबाज वाटत नाही.
6 May 2015 - 11:29 am | कंजूस
कोर्ट विषयावर ७० साली हिन्दी "कानून" आला होता.शांतता कोर्ट चालू आहे हे मराठी। नाटक गाजले होते.३६५ दिवस-कल्पना: ह•मो•मराठे यांचे एक माणूस एक दिवस हे पुस्तक वाचनीय त्यात फिरोदिया यांच्या घरचा दिनक्रम मला आवडलेला.
24 Sep 2015 - 3:56 pm | चौथा कोनाडा
राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेता मराठी चित्रपट "कोर्ट " भारता तर्फे ऑस्करच्या स्पर्धेत दाखल होतोय ही मराठी मनाला सुखावणारी बातमी आहे !
कोर्टाने ऑस्करची पायरी चढलीय आता कळसही गाठावा या साठी हार्दिक शुभेचछा !