सध्या हाणामारी-राजकीय गदारोळाच्या वाहिन्या पाह्ण्यापेक्षा दूर्दर्शन सह्याद्रीच्या बातम्या पाहणे जास्त चांगले आणि हितावह वाटते. अगदी सरकारी वाहिनी असूनही पुरस्कृत केल्यासार्ख्या आक्रस्ताळी, व मिपा भाषा परीकोषानुसार पालीचा डायनासोर करीत नाहीत. मोजके आणि नेमके.
अशातच काल रात्री साडे नऊच्या बातम्यात एक सुखद आणि आश्चर्य्जनक बातमी पाहिली आणि अवाक झालो.(टीप ज्यांना अगोदरपासून माहीत असेल त्यांनी माफ करावे) कारण नुकतेच मिपावर मांझी चित्रपटाचे परीक्षण समीक्षण वाचले गेले. बराच उहापोह झाला.
पण आपल्या इथे महाराष्ट्रातही एक सरस मांझी आहे ह्याची कल्पना नसल्याने माझी मलाच शरम वाटली. आणि मी संपूर्ण बातमी तर पाहिलीच पण बातमी दरम्यान श्री राजारम भापकर उर्फ भापकर गुरुजी (गुंडेगाव जि अहमदनगर) यांची मुलाखतही पाहिली.(आयुष्यातील ५७ वर्षे रस्ता तयार करण्यात खर्ची केलेला तपस्वी)
त्या अनुषंगाने आज जालावर माहीती धुंडाळली.
मुळात ती मुलाखत्वजा मनोगत पाहणे जास्त परिणामकारक आणि कर्त्याच्या तोंडून कहाणी ऐकणेच जास्त रास्त होईल.
मुलाखती दरम्यान सांगीतलेल्या दोन घटना जास्त भावल्या.
भापकर गुरुजीं असल्याने त्यांनी रस्त्याच्या आराखड्यासाठी अभियंते बोलावले पण ते येईनात गावकरीही या रस्ता बनवायच्या कल्पनेला खुळचटपणा सम्जून "येडा मास्तर" असी संभावना करीत.शेवटी रस्ता कुठून कसा आणि सुरक्षीत कसा काढता येईल याचा विचार करताना.गुरुजींना एक कल्पना सुचली. रस्ता ज्या डोंगररांगाम्धून काढायचा होता त्याच्या एक डोंगरावर कसलेसे लहान देऊळ होते त्याच्या डागडुजीसाठी काही किरकोळ बांधकाम साहीत्य गाढवांवर लादून नेले जात होते. त्या गाढवाच्या मालकांना भापकर गुरुजी भेटले. माझं काही सामान त्या देवळापासून खाली आणायचे आणशील का? मालक (कैकाडी) राजी झाला आणि दर सांगीतला ५ रूपये ( सुमारे ५० वर्षांपूर्वी) भापकर गुरुजी त्याच्याबरोबर त्या देवळापाशी पोहोचले आणि गाढवावर गोण्या लादल्या फक्त मालकाला एकच अट सांगीतली गाढवे आपली आपणहून उतरू देत.त्यांना मारणे हाकलणे नको. गोण्यांना मुद्दाम खालून काही छिद्रे ठेवली आणि गोण्यांमध्ये चुन्याची फक्की होती.गाढवांनी सर्वात सुरक्षीत ठिकाणांहून डोंगर रांगा पार केल्या आणि रस्त्याच्या आराखडा भापकर गुरुजींनी मजूरांच्या सहाय्याने खुणांचे दगड (लगोरीसारखे एकावर एक रचून)पक्का केला.
त्याच मुलाखतीत त्यांनी खंडाळा घाटातील रेल्वेबाबतही किस्सा सांगीतला खंडाळा घाटातल्या रेल्वे ट्रॅकसाठी ब्रिटीश अधिकार्याने धनगराचाही सल्ला घेतला होता. मेंढ्या-बकर्या जथ्थ्याने जिथून ये जा करतात तो भाग जास्तीत जास्त सुरक्षीत असतो असा निर्वाळाही भापकर गुरुजी देतात.
जालावर त्यांचेबाब्त माहीती खालील लिंकवर आहे.
भापकर गूरुजी
साडेनऊच्या बातम्या
काहींना हे अगोदरच माहीत असल्यास त्यांनी मला माफ करणे.
आपलाच नाखु.
प्रतिक्रिया
5 Sep 2015 - 10:34 am | मांत्रिक
मस्तच माहिती दिलीत. गाढवांच्या ये जा करण्याचा मार्ग पायवाट म्हणून विकसित करण्याची कल्पना खरोखर मस्त!
5 Sep 2015 - 10:40 am | नाखु
पक्क्या रस्त्यात रूपांतर केले. दळणवळणाची प्रचंड गैरसोय होती म्हणून.
खुलासेदार नाखु
5 Sep 2015 - 10:42 am | मांत्रिक
पक्का रस्ता? सरकारी मदतीशिवाय? बाप रे!!!
5 Sep 2015 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु
महाराष्ट्रात असे खुप आहेत हीरे
आमटे कुटुंबियांसारखे काम करणारे एक डॉ.कोल्हे कुटुंब ह्यांच्याबद्दल कालच कळले, ते अकोला जिल्ह्यात काम करतात (अर्थात सद्धया प्रमाण लोकबिरादरी इतके मोठे नाही)
(अस्सल काच) बाप्या
5 Sep 2015 - 11:17 am | एस
डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे.
5 Sep 2015 - 10:44 pm | नाव आडनाव
डॉ.कोल्हेंची मुलाखत आयबीएन लोकमतच्या "ग्रेट भेट" मधे ऐकली होती. चांगल्या मुलाखती असायच्या - हिम्मतराव बाविस्कर, रघुनाथ माशेलकर पोपटराव पवार, तात्याराव लहाने, सुधा मूर्ती ...
अश्या लोकांच्या कामाकडे बघून सामान्य माणसाला प्रेरणा मिळते, पण प्रश्न पडतो की ह्या लोकांना इतक्या मोठ्या कामाची प्रेरणा कुठून मिळत असेल. जे ते करतात, तसं आधी अजिबातही नसतं. नगरमधे आजही बर्याच गावांत चांगला रस्ता नाही. जिथे आहे तिथे बर्याच ठिकाणी तुटका फुटका सिंगल रोड (सिंगल लेन सुद्धा नाही). ६०-७० वर्षां आधी जेंव्हा हीच परिस्थीती अजून बेकार असेल, तेंव्हा रोड स्वतःच्या पैश्यातून आणि मेहनतीने करण्याचं ठरवणं सुद्धा किती अवघड असलं असेल - आणि तेही सारं दुसर्यांसाठी. मी संत बघितले नाहीत, पण जेंव्हा कधी असतील ते नक्की असेच असणार.
5 Sep 2015 - 11:21 am | एस
भापकर गुरुजींवर मिपाकर आयुर्हित यांनी सर्वप्रथम लेख लिहिला होता. मांझी हा चित्रपट आल्यानंतर एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली होती.
भापकर गुरुजींनी केवळ ५७ किमीचे रस्ते स्वखर्चातून बनविले असे नाही तर जांभळासारख्या फळाच्या बियाही गोळा करून, विकत घेऊन जंगलही फुलवले आहे. फार प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व!
5 Sep 2015 - 6:38 pm | मित्रहो
छान माहीती दिली. मांझी चित्रपटामुळे आता अशा बऱ्याच लोकांच्या कार्याला प्रतिष्ठा मिळेल.
5 Sep 2015 - 7:23 pm | प्यारे१
रस्ते बनवणं ही सरकारची जबाबदारी आहे.
या लोकांच्या कामाचं कौतुक आहेच पण त्यांना आनंदानं हे काम करावं लागत आहे की अगतिकतेमधून?
भापकर गुरुजी अथवा मांझी हे ध्येयवेडे दुसर्या एखाद्या आणखी भव्य आणि जास्त उत्पादक कामांमध्ये आपली ऊर्जा वापरु शकले असते असं नाही वाटत?
माझ्या मते त्यांना अकारण खस्ता खाव्या लागल्यात. त्यांच्या कार्याची महती कमी होत नाही हे निश्चित.
एक ऐकीव माहिती:
सातारा जिल्ह्यातून जाणारा एक राज्य महामार्ग कागदोपत्री चार पदरी आहे. प्रत्यक्षात तो दोनच पदरी आहे.
रस्त्याचे दोन पदर नेमके कुठं गेले याचा याठिकाणी विचार करता 'राष्ट्रामध्ये वाद' निर्माण होण्यापूर्वी सरकार बदललं.
७ मीटर रुंदीचा एक किलोमीटर रस्ता बनवायला साधारण १ कोटी तरी पकडले तरी जिल्ह्यातला ६०-७० किमीचा रस्ता म्हणजे किती होतात याचा विचार करावा लागतो. दुपदरी रस्ता म्हणजे याच्या दुप्पट.
घोटाळ्यांचं रुपडं आपल्याला बर्याचदा समजतच नाही ही वस्तुस्थिती आहे.
भापकर गुरुजींना आयुष्य वेचावं लागलं यासाठी खरंतर वाईट वाटायला हवंय.
5 Sep 2015 - 7:39 pm | अभ्या..
सगळेच्या सगळे दोन पदर राष्ट्रात वाद करणार्यांकडे जात नसतात. त्यातला खडी पुरवणारा आपला शेजारी निघतो, अर्थमुव्हिंगला जेसीबी पुरवायचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या एखाद्या सोयर्याने घेतेलेले असते. त्याच्या फार्म हाऊसचा डिझाईन प्लान आपल्या ऑफिसमधून गेलेला असतो. एखाद्या मित्राने त्या रस्त्याचे रेडियम बोर्ड बसवायचे काम घेतलेले आसते. त्याची पार्टी आपण झोडलेली असते. कसा झिरपत जातो हा गैरव्यवहार कुणास ठाऊक. उगी एकाला कुणाला सूळी चढवण्यात अर्थ नाही. गरज लागेल तसे लोक मार्ग काढतात हिच वस्तुस्थिती. दुसर्यांच्या गरजेसाठी काढणारे असे मांझी विरळे. म्हणून त्यांचे कौतुक आहेच.
5 Sep 2015 - 7:46 pm | मांत्रिक
मार्मिक रे अभ्या... अगदी मुद्द्यावर बोट ठेवलंस! संपूर्ण बाजू लक्षात घेतली जात नै! असो!
5 Sep 2015 - 7:55 pm | प्यारे१
मान्य आहे रे भावा पण नदीवरचा पूल नि रस्ता आक्खाच्या अक्खा गायब होणं याबाबत काय म्हणशील? आणि यात कुठला एक बोट ठेवण्यासारखा नाही. हे साटंलोटं असतंय. बाकी आमच्या एवढ्या थोरामोठ्यांशी ओळखी नसल्यानं आम्हाला विशेष माहिती नाही.
आणि वरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणं या ध्येयवेड्या लोकांच्या कामाचं मोल मोठं आहेच.
5 Sep 2015 - 9:56 pm | काळा पहाड
त्या जनतेचा "जाणता" नेता शर्द्या सध्या रोज उपदेश द्यायला लागलाय. "पाणी जपून वापरा", म्हणजे उसवाल्यांना याला पाणी देता येईल. "दुष्काळात चारा छावण्या उघडा", म्हणजे तिथे टँकर पोचवून हा रग्गड पैसे कमावेल. दु:ख याचं नाही की हा बोलतो, दु:ख याचं की जनता याला आणि याच्या चमच्यांना मतं देते. तीच जनता सध्या मराठवाड्यामधून पावूस नाही आणि जमिनीतलं सगळं पाणी बोअर लावून उपसून संपवल्यावर आता स्थलांतर करते आहे.
5 Sep 2015 - 7:43 pm | पद्मावति
एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची छान ओळख करून दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
5 Sep 2015 - 8:12 pm | पैसा
छान ओळख!
5 Sep 2015 - 8:46 pm | अत्रुप्त आत्मा
उत्तम माहिती. धन्यवाद.
5 Sep 2015 - 9:58 pm | खेडूत
इथे त्यांच्याविषयी अजून सविस्तर पहायला मिळेल .
आजच एबीपी वर त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा कार्यक्रम पुन्हा दाखवला (३०:०० मि.) .
8 Sep 2015 - 7:09 pm | gogglya
बाकी प्राण्यांच्या नैसर्गिक प्रेरणेचा असा वापर करण्याची युक्ती अफलातून आहे.
9 Sep 2015 - 12:21 pm | सस्नेह
अफलातून आयडीया.
शेअर केल्याबद्दल नाखुकाकांना धन्यवाद !
8 Sep 2015 - 7:22 pm | सूड
वायफळ लेखांच्या मांदियाळीत हा माहितीपूर्ण धागा बघून बरं वाटलं.
8 Sep 2015 - 8:01 pm | कंजूस
सह्याद्रीच्या पाऊलखुणा कार्यक्रमही चांगला असतो,परंतू कोणती चित्रफीत दाखवायची याची सुचना दिल्लीवरून वरळीला पाच दहा मिनिटे अगोदर येते त्यामुळे कार्यक्रम कोणता हे कळत नाही.
ट
दूरदर्शन : पाहिचं तर पहा { नाहीतर फुटा },
एमटीडीसी : राहिचं तर रहा { नाहीतर फुटा }
8 Sep 2015 - 8:12 pm | धर्मराजमुटके
'मांझी' चित्रपट रिलीज झाल्यावर बर्याच वृत्तपत्रांत भापकर गुरुजींविषयी लेख लिहून आले होते. नक्की संदर्भ आठवत नाहीत.
टीप : मिपावर 'तेथे माझे कर जुळती' किंवा अशाच एखाद्या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील / भारतातील अशा प्रकारच्या हटके कामे करणार्यांबद्दल परिचयात्मक लेखन केले जाऊ शकते काय ? मात्र त्या व्यक्ती तुलनेने अप्रसिद्ध किंवा कमी प्रसिद्द असाव्यात. (प्रसिद्ध व्यक्तींबद्दल लिखाण असूच नये असे नाही पण बरेचदा प्रसिद्ध व्यक्तींबद्दलची माहिती इतर ठिकाणी ही सहज उपलब्ध असते म्हणून.)
9 Sep 2015 - 12:26 am | एस
मिपाला एक संस्थळ म्हणून काही मर्यादा आहेत. पण शेवटी ते इथे लिहिणार्यांच्या प्रतिभेवर आणि इच्छेवरही अवलंबून आहे. उदा. अशा स्वरूपाचा एखादा धागा तुम्ही काढू शकता व वेळोवेळी त्यात तुम्ही,तसेच इतर लेखक/प्रतिसादकर्ते भर घालू शकतील.
9 Sep 2015 - 11:10 am | टीपीके
+१००००००००
9 Sep 2015 - 12:19 pm | विशाल कुलकर्णी
मस्त माहिती..
पाहतो दोन्ही दुवे. धन्यवाद देवा !
9 Sep 2015 - 1:55 pm | बॅटमॅन
मस्त माहिति नाखुकाका!!!!
9 Sep 2015 - 2:04 pm | नाखु
साडेनऊच्या बातम्या
सा सं ना विनंती जमल्यास वरतीच आणि दृष्यस्वरूपात चिटकवणे.
10 Sep 2015 - 9:22 am | अभिजीत अवलिया
भापकर गुरुजीन्बद्दल वाचले होते. त्यानी आपले संपूर्ण आयुष्य असे दुर्गम भागात रस्ते बनवण्यासाठी वेचले. पण त्यांचे अजून एक स्वप्न आहे ते म्हणजे ह्या रस्त्यावरून एस.टी वाहतुक सुरु करने. हे रस्ते त्यानी स्व खर्चातून बनवलेत, ते सरकारी नाहीत. त्यामुळे ह्या रस्त्यावरून एस.टी. महामंडळ गाड्या सोडत नाही. कारण कोणत्याही रस्त्यावरून एस.टी. सोडायची असेल तर तो रस्ता वाहतुकीला योग्य आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र लागते. आणी हे रस्ते सरकारी नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग असे पत्र देईना.
10 Sep 2015 - 10:01 am | प्रभाकर पेठकर
प्रेरणादायी व्यक्तीमत्व आणि त्यांचे कार्य.
प्राण्यांतर्फे सुरक्षित मार्ग शोधणे अप्रतिम.
10 Sep 2015 - 10:16 am | चैतन्यमय
माहीती आवडली नादखुळाजी.