श्रीमन्महाभारत - उपसंहार
प्रत्येक गोष्टीला लोकप्रिय होण्यास तिचा काळ यावा लागतो. उदा. मुंबईतला लालबागचा राजा, सिद्धीविनायक, पुण्यातील दगडुशेट गणपती वा शिर्डीचे साईबाबांचे मंदीर. आजकाल मिपावर चलती आहे "महाभारता"ची चांगली गोष्ट. चार लोक महाभारत वाचणार असतील, त्यातही संपूर्ण (अर्थात मराठी भाषांतर) तर सोन्याला सुगंधच. शिवाय भागवत-कर्वे-कुरुंदकर सोबतीला असतील तर वा-ह-वा ! आज मी यांच्या जोडीला आणखी एका विद्वानाच्या पुस्तकाची भर घालू इच्छितो. भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या "श्रीमन्महाभारत-उपसंहार" या अमूल्य खंडाची.
चिपळुणकर आणि मंडळी यांनी संपूर्ण महाभारताचे भाषांतर १९०४ ते १९१८ या कालांत पुरे केले. त्याचा उपोद्घात ह,ना.आपटे यांनी लिहला व उपसंहार चिं.वि.वैद्य यांनी. उपसंहार आहे ५८० पानांचा, हो, ५८० पानांचा." काय आहे ?" या खंडात ? खरा प्रश्न" काय नाही ?" असा पाहिजे. आज याची ओळख करून देतांना थोडी निराळी पद्धत वापरणार आहे. मी फक्त वैद्यांनी केलेल्या १८ प्रकरणांची अनुक्रमणिका देणार आहे. त्यांनी प्रत्येक प्रकरणात निरनिराळे विषय घेतले व त्या विषयावर संपूर्ण महाभारतात काय आले आहे ते दिले आहे. लक्षात घ्या, एक लाख श्लोकात दिलेली एका विषयाची माहिती एकत्र करावयाची.....आणि असे विविध विषय. छाती दडपूनच जाते.
प्रस्ताव पृ.१-४.
प्र. १ महाभारताचे कर्ते--पृ.५-३८
प्र. २ महाभाअताचा काल -- ३९-७२
प्र. ३ भारतीय युद्ध काल्पनिक आहे काय ? -- पृ. ७३-७९
प्र. ४ भारती युद्धाचा काळ --पृ.८०-१२८
प्र. ५ इतिहास कोणत्या लोकांचा --पृ.१३०-१५७
प्र. ६ वर्णव्यवस्था,आश्रमव्यवस्था आणि शिक्षणपद्धति -- पृ.१५८-१८६; १८७-१९३; १९४-२०६
प्र. ७ विवाहसंस्था -- पृ. २०४-२३१
प्र. ८ सामाजिक परिस्थिति --पृ.२३२-२७८
अन्न --२३२-२४७
वस्त्रभूषणे --२३८-२६२
रीतिभाती --२६३-२७८
प्र. ९ राहकीय परिस्थिति --पृ. २७९-३२६
प्र.१० सैन्य व युद्ध -- पृ.३२७-३४७
प्र.११ व्यवहार व उद्योगधंदे --पृ. ३४८-३६१
प्र.१२ भूगोलिक माहिती -- पृ.३६२-३९२
प्र.१३ ज्योतिर्विषयक ज्ञान --पृ. ३९३-४१०
प्र.१४ वाङ्मय व शास्त्रे -- पृ. ४११-४२४
प्र.१५ धर्म --पृ.४२५-४५९
प्र.१६ तत्वज्ञान --पृ.४५३-४९४
प्र.१७ भिन्न मतांचा इतिहास -- ४९४-५३५
प्र.१८ भगवद्गीता विचार --पृ. ५३६५७६
परिषिष्ट --पृ.५७७-५८०
मासल्यादाखल "धर्म" या प्रकरणात काय काय आहे ? वैदिक धर्म, वैदिकान्हिक, संध्या होम, मूर्तिपूजा, तेहदीस देवता, शिव व विष्णु, शिवविष्णु-भक्तिविरोधपरिहार, स्कंद, दुर्गा, श्राद्ध, आलोकदान व बलिदान, दानें, उपवास, तिथि, जप, अहिंसा, आश्रमधर्म, अतिथिपूजन, साधारण धर्म, आचार, स्वर्गनरककल्पना, इतर लोक, स्वर्गाचे गुणदोष, प्रायश्चित्त, प्रायश्चित्ताचे प्रकार, पापांचे अपवाद, संस्कार, आशौच असो.
भागवत-कर्वे व वैद्य यांच्यात फरक काय ? पहिल्या प्रथम "कवियत्री" आहेत. त्यांना काय "भावले" ते त्यांच्या लिखाणाचा गाभा आहे. भावना प्रथम. व्यासांना न लिहिता काय सांगावयाचे आहे याचा मागोवा घेणे यांत त्यांना रस. वैद्य प्रथमपासून शेवटपर्यंत वैज्ञानिक."हे असे आहे" असे म्हणतांना त्यांच्याकडे पुराव्यांचा पाया असतो. इरावतीबाईंशी पंगा घेणे तसे सोपे."मला आवडले /पटले नाही" म्हटले, संपले. वैद्यांशी बोलतांना आपल्याला माहीत असते कीं आपला "तेवढा" अभ्यास नाही. द्या सोडून.
एक शतकापूर्वीचे पुस्तक. त्या तोलामोलाच्या विद्वानांनी नवीन काही लिहिले असेलही . पण ते तुकड्यातुकड्यात असणार व आपल्यासारख्या छोट्या माणसांपर्यंत ते एकत्रपणे पोचणे जरा अवघडच. तेव्हा आतातरी तुम्हाला महाभारताचा अभ्यास करावयाचा असेल तर अशी पुस्तके वाचनात पाहिजेत.
शरद
. .
प्रतिक्रिया
29 Aug 2015 - 3:01 pm | प्रचेतस
हे पुस्तक उपलब्ध आहे काय?
असल्यास कुठे मिळेल?
29 Aug 2015 - 3:04 pm | पैसा
अतिशय उत्तम ओळख करून दिलीत. शक्य असेल तर या पुस्तकावर अजून काही लेख लिहा ही विनंती!
29 Aug 2015 - 3:21 pm | मांत्रिक
सहमत. सर्वांनाच पुस्तक वाचायला जमेल असे नाही. पण तुम्ही जर थोडक्यात एकेक प्रकरणनिहाय गोषवारा लिहिलात तर फार उत्तम. एक वाच्यमेजवानीच असेल ती सर्वांना.
29 Aug 2015 - 3:34 pm | प्यारे१
+१
असेच म्हणतो.
30 Aug 2015 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१११
29 Aug 2015 - 3:12 pm | जेपी
ओळख आवडली.
पुस्तक कोठे मिळेल ?
29 Aug 2015 - 4:25 pm | शरद
चिपळुणकर आणि मंडळाची पुस्तके वरदा प्रकाशन, विदर्भ मराठवाडा इ. प्रकाशकांनी प्र्काशित केली आहेत.त्यातला आठवा खंड म्हणजे उपसंहार. हा खंड स्वतंत्र मिळतो की नाही हे माहीत नाही. चौकशी करावी लागेल. पुण्यातील मित्रांनी माझ्याकडून वाचावयास नेण्यास हरकत नाही. काही प्रकरणांवर लिहावयास आवडेल पण माझा आळशी स्वभाव ही मोठी अडचण आहे. जर कोणी उत्साही स्वत: तयार असेल तर त्यानेही पुस्तक नेऊन प्रयत्न करावा. माझ्या शुबेच्छा !
शरद
29 Aug 2015 - 11:04 pm | माहितगार
अर्काइव्हजवर आहे, वाचलयं मी ते. युनिकोडीकरण करण्यासाठी वर्थ आहे. युनिकोडीकरणासाथी कुणी व्हॉल्युंटीअर करत असेल तर मराठी विकिस्रोत प्रकल्पात आयात करता येईल.
29 Aug 2015 - 11:35 pm | प्रचेतस
लिंक मिळेल काय?
30 Aug 2015 - 12:32 am | पैसा
डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया वर आहे. बारकोड 5010010090845
30 Aug 2015 - 12:40 am | प्रचेतस
धन्स.
आता उतरवून घेईन.
30 Aug 2015 - 12:14 am | चित्रगुप्त
हा ग्रंथ (अगदी जीर्णशीर्ण अवस्थेत) माझेकडे आहे. परंतु त्याच्या या अवस्थेमुळे त्याचे स्कॅनिंग करणेही दुरापास्त आहे.
यापूर्वी यापूर्वी एका लेखातील प्रतिसादांमधे या ग्रंथात मांडलेल्या महाभारताच्या कालनिर्णयाविषयी बरीच चर्चा झालेली आहे:
http://misalpav.com/comment/543277#comment-543277
30 Aug 2015 - 4:01 pm | माहितगार
अर्काईव्ह डॉट ऑर्गवरील दुव्यांचा दुवा. उपसंहाराचा प्रथथम भागाचा दुवा निळ्या रंगात दिसतो आहे.