===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
===================================================================
एका बाजूला हिमशिखरांनी भरलेल्या पर्वतराजी तर दुसऱ्या बाजूला काही बोडके तर काही हिरवाईने नटलेले डोंगर. हिरवाईतून मधूनच पांढऱ्या-तांबड्या ठिपक्यांसारख्या दिसणाऱ्या घरांची छोटी छोटी गावे. मधूनच एकांड्या शिलेदारासारखे भर जंगलात असलेले घर. असल्या अनवट ठिकाणी भान विसरून गेले नाही तरच नवल ! गाडीने शिट्टी वाजवली आणि नाईलाजाने सर्वजण पाय ओढत आपापल्या दब्यांमध्ये शिरले.
गाडीने क्लायनं शायडेक् स्टेशन सोडले. आयगरच्या शिखराचा तळ ऑक्टोबरमध्येही बर्फाच्छादित होता. माहितीपत्रकावरच्या नकाश्याप्रमाणे बोगद्यात गाडी शिरली की सर्व प्रवास आयगर आणि म्योंखच्या पोटातूनच करून एकदम म्योंख आणि युंगफ्राउ याच्यामधील युंगफ्राउयोखच्या पठारावरच जमिनीवर येईल असे दिसत होते...
इंटरलाकन ते युंगफ्राउयोख मार्ग (स्विस पर्यटनच्या माहितीपत्रकावरून साभार)
.
आजूबाजूच्या परिसराचे दर्शन थोड्याच वेळात संपेल या काळजीने जागा बदलत दोन्ही बाजूचा नजारा जास्तीत जास्त डोळ्यात साठवण्याकडे आणि काही जास्तच पसंत पडले की कॅमेरा सरसावणे सुरू झाले...
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०१
.
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०२
.
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०३
.
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०४ (जालावरून साभार)
.
गाडी बोगद्यात शिरली. थंडीमुळे बोगद्याच्या भिंतीवरही बर्फ साठलेले होते...
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०५ : बोगद्याच्या भिंतीवर बर्फ साठले होते (जालावरून साभार)
.
आता पाऊण एक तास... नाही नाही स्विस पद्धतीने ५२ मिनिटे म्हणायला पाहिजे... शांत बसून बोगद्यातून प्रवास करायचा आहे असे समजून सर्वजण आपापल्या मूळ खुर्च्या धरून बसले. काही जणांनी डोळे मिटायलाही सुरुवात केली. पण, एक आश्चर्य आमची वाट पाहत होते. या बोगद्यात... हो बोगद्यात... दोन रेल्वे स्टेशने आहेत ! रेल्वेचा बोगदा प्रथम आयगर पर्वताच्या उत्तर उताराच्या पृष्ठभागाच्या जवळून जातो आणि पर्वताच्या अर्ध्या उंचीवरच्या पहिल्या स्टेशनवर, आयगरवांड / आयगरवांट (आयगर भिंत) येथे, थांबते. तेथे ८ मीटर लांब आणि साधारण एक मीटर उंच काच लावलेली खिडकी आहे. हे छिद्र बोगदा बनवताना निघालेली दगडमाती बाहेर टाकायला बनवलेले होते. त्या काळी पर्यावरणाचे नुकसान वगैरे कल्पना अस्तित्वात नव्हत्या हे त्या काळाच्या स्विस स्थापत्यकारांचे नशीब ! नाहीतर त्यांच्या नावे किती गदारोळ झाला असता ! आयगरच्या उभ्या भिंतीच्या अर्ध्या उंचीवरून दिसणारे विलक्षण दृश्य लोकांना खिडकीतून बघता यावे म्हणून इथे गाडी पाच मिनिटे थांबते...
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०६ : आयगरवांड स्टेशनवरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य ०१
.
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०७ : आयगरवांड स्टेशनवरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य ०२
पर्यटनाव्यतिरिक्त या खिडकीचा उपयोग सद्या गिर्यारोहकांना मदत करण्यासाठी आणि बचाव मोहिमांसाठी केला जातो. या खिडकीचा उपयोग आयगर सँक्शन या चित्रपटातील शेवटच्या प्रसंगांत केला होता.
येथून बोगदा पश्चिमेकडे वळून युंगफ्राउ पर्वताकडे जाऊ लागतो. शेवटचा थांबा येण्याअगोदर अजून एक स्टेशन लागते...आईसमीअर (हिमसागर)... आणि तिथल्या खिडकीतून दिसणारे दृश्य ते नाव सार्थ करणारे असते...
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०८ : आईसमीअर स्टेशन (जालावरून साभार)
.
युंगफ्राउयोखच्या वाटेवर ०९ : आईसमीअर स्टेशनवरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य
अश्या बोगद्याच्या भिंतीला असलेल्या आणि पर्वताच्या पृष्ठभागाला जोडणार्या खिडक्या मी प्रथमच पाहत होतो. इतकेच नव्हे तर त्यांचा पर्यटनासाठी आणि गिर्यारोहणासाठी उपयोग करण्याच्या कल्पकतेचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. एकंदरीत, युंगफाउयोखला पोचण्याअगोदरच आपण बर्यापैकी प्रभावित झालेलो असतो. ज्या गंतव्याच्या आकर्षणाने हा प्रवास करत होतो, तो प्रवास इतक्या लवकर संपल्याचा विषाद प्रथमच वाटत होता !
.
बोगद्यातले युंगफ्राउयोख स्टेशन (जालावरून साभार)
.
हा सात किलोमीटर लांबीचा बोगदा १८९८ ते १९१२ या १४ वर्षांत बांधला गेला. यातून जाणार्या रेल्वेच्या मार्गाला २५% चढ / उतार आहे. इतक्या तीव्र उतारावरून ती घसरू नये यासाठी सर्वसाधारण रुळांबरोबरच तिला धरून ठेवण्यासाठी दातेदार चक्राच्या रुळांची (कॉगव्हिल) रचना उपयोगात आणली आहे.
.
(क्रमशः )
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
===================================================================
प्रतिक्रिया
7 Jul 2015 - 12:58 am | मेघनाद
नयनरम्य .....
7 Jul 2015 - 1:13 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
7 Jul 2015 - 1:03 am | विकास
मस्तच! बोगद्यात बर्फ पाहून आश्चर्य वाटले! बर्फाचे नाही तर गाडी चालू असल्याचे. आमच्याकडे असे झाले असते तर बंद केल्या असत्या - रुळावरील बर्फामुळे!
7 Jul 2015 - 1:22 am | डॉ सुहास म्हात्रे
हे असं काही झालं की मला नेहमी ते झ्युरिक HB मधल्या माहितीकेंद्रातल्या माणसाचे शब्द आठवतात, "धिस इस स्वित्झर्लंड, सर !"
माझ्या नॉर्वेच्या सफरीत, -२०/२५ डिग्री सेल्सिअस तापमानात धृविय प्रदेशातही नॉर्वेजियन विमाने बरोबर वेळापत्रकाप्रमाणे कशी काय उडतात, याचा अभ्यास करायला आलेला एक अमेरिकन तंत्रज्ञ अधिकारी भेटला होता !
7 Jul 2015 - 2:30 am | चित्रगुप्त
एकदम झकास.
यावरून मला अनेक वर्षांपूर्वी मी पाच दिवस विजयनगरच्या अवशेषाच्या मधोमध असलेल्या एका झोपडित (पुरातत्व खात्याच्या) राहून भटकंती केली होती, तेंव्हा भेटलेली एक अमेरिकन बाई आठवली. ज्यांना हिंदीत 'गडरिये' म्हणतात, त्या राजस्थानी मेंढपाळांच्या संपूर्ण जीवनशैलीचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी ती वर्षभर त्यांचेबरोबर राहून अगदी बारीक-सारीक गोष्टींचे रेकॉर्डिंग, टिपणे, फोटो वगैरे करत असल्याचे आठवले. गंमत म्हणजे त्या सर्व मेंढ्या जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवींच्या मालकीच्या होत्या, आणि त्या मेंढपाळांना दरडोई एक हजार रुपये महिना असा तनखा होता. मेंढ्या एका जागी दोन दिवसाहून जास्त राहिल्या, तर मरतात, म्हणून त्यांना सतत फिरत ठेवावे लागते, असे त्या मेंढपाळांनी मला सांगितले. या अमेरिकन बाईंना स्मिथसोनियन ची ग्रांट या कामासाठी मिळलेली होती. ऐकावे ते नवलच, असे त्यावेळी मला वाटले होते.
7 Jul 2015 - 2:49 am | डॉ सुहास म्हात्रे
मला गंमत या गोष्टीची वाटली होती की, आर्क्टीक हवामान असलेला अलास्का १८६७ पासून ज्याच्या ताब्यात आहे अश्या आणि तंत्रज्ञानातल्या जगातला सर्वात प्रगत समजल्या जाणार्या राष्ट्रातला तंत्रज्ञ अतीथंड हवेत विमानव्यवस्था कशी चालू ठेवावी हे समजून घ्यायला २०१३ मध्ये नॉर्वेत आला होता !
8 Jul 2015 - 5:13 pm | राजेंद्र मेहेंदळे
"-२०/२५ डिग्री सेल्सिअस तापमानात धृविय प्रदेशातही"
तापमानाचे आश्चर्य म्हणाल तर कॅनडामध्ये -४० डिग्री तपमानातही विमाने वेळेतच उडतात.
ध्रुविय प्रदेशाचे आश्चर्य असेल तर समजु शकतो. कारण तिकडे गुरुत्वाकर्षणाचे काही नियम वेगळे असतील /असु शकतील.
7 Jul 2015 - 1:31 am | मधुरा देशपांडे
हा भागही आवड्ला. पण थोडे मोठे भाग टाका ना प्लीज.
युंगफ्राऊच्या खालोखाल तिसर्या क्रमांकावर असलेले, आणि जर्मनीतील सर्वात उंच शिखर Zugspitze ला जाण्यासाठी सुद्धा याच पद्धतीची, बर्फातुन आणि पुढे साधारण ४.५ किमी लांब बोगद्यातुन जाणारी कॉगव्हिल ट्रेन आहे. अविस्मरणीय अनुभव असतो तो.
पुभाप्र.
8 Jul 2015 - 4:49 pm | यसवायजी
कॉगव्हिल ट्रेन- (अशीच माहिती म्हणून. विकीवरून साभार)
. 

-
अशा उंच ठिकाणी जायला रॅक & पिनियन टाईपच्या या रेल्वे आहेत. बर्फात सुद्धा चालतात म्हणजे भारीच. आपल्याकडे आहेत काय हिमालयात अशा? असल्या तर कुठे आहेत?
Zugspitze (जालावरुन)
8 Jul 2015 - 4:56 pm | यसवायजी
आणी हा मी काढलेला फोटो-

Zugspitze
7 Jul 2015 - 4:39 am | अरवीन्द नरहर जोशि.
फारच चांगले वर्णन आहे. फोटोही उत्तम आहेत . मराठी लिहिण्याची पद्धत बदलून फारच चांगले काम केले आहे .
7 Jul 2015 - 4:59 am | श्रीरंग_जोशी
स्विस रेल्वे अन पर्यटन विभागाच्या कल्पकतेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. वर्णन व फोटोज नेहमीप्रमाणेच उत्तम.
वरच्या प्रतिसादातील अभ्यासासाठी दुसर्या देशातले तंत्रज्ञ वाला किस्सा वाचून एक एकलेला किस्सा आठवला. काही वर्षांपूर्वी मुंबई लोकल रेल्वेसेवा अधिक क्षमतेने कशी वापरता येईल यासाठी जपानमधील रेल्वे तज्ञांना बोलावण्यात आले होते.
काही दिवस निरिक्षण व अभ्यास केल्यानंतर त्यांनीच हात जोडले. एवढ्या कमी वेळात अक्षरशः लक्षावधी माणसांना सहजपणे इकडून तिकडे करणार्या तुमच्या रेल्वेइतक्या क्षमतेने आमची रेल्वे व्यवस्था चालू शकेल याची कल्पना आम्ही स्वप्नातही करू शकत नाही, अशा शब्दांत कौतुक करून गेले.
8 Jul 2015 - 4:06 pm | मदनबाण
वाचतोय...
@श्रीरंग
काही वर्षांपूर्वी मुंबई लोकल रेल्वेसेवा अधिक क्षमतेने कशी वापरता येईल यासाठी जपानमधील रेल्वे तज्ञांना बोलावण्यात आले होते.
काही दिवस निरिक्षण व अभ्यास केल्यानंतर त्यांनीच हात जोडले. एवढ्या कमी वेळात अक्षरशः लक्षावधी माणसांना सहजपणे इकडून तिकडे करणार्या तुमच्या रेल्वेइतक्या क्षमतेने आमची रेल्वे व्यवस्था चालू शकेल याची कल्पना आम्ही स्वप्नातही करू शकत नाही, अशा शब्दांत कौतुक करून गेले.
बरोबर आहे, आपल्या रेल्वे वेळापत्रक पाळत नाहीत आणि जपानच्या रेल्वे अतिशय वक्तशीर असतात ! ;) त्यामुळेच त्यांनी नमस्कार केला असावा. ;) जगातले सगळ्यात बिझी रेल्वे स्टेशन असलेल्या टोकियोच्या Shinjuku रेल्वेची व्यवस्था आपण /आणि आपल्या रेल्वे अधिकार्यांनी नक्कीच पाहण्या सारखी आहे. { हल्लीच मी डिस्कव्हरी एचडी वर हा संपूर्ण भाग पाहिला, सध्या World's Busiest अशी काहीशी मालिका सुरु आहे }
Worlds Busiest Train Station: Shinjuku [full] by bwr_
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
8 Jul 2015 - 6:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ.
त्यातले जगातल्या सर्वात गर्दीच्या रेल्वे स्टेशनबाबतचे एक वाक्य जपान जपान का आहे हे सांगून जाते... "ट्रेनला ६० सेकंदाचा उशीर गुन्हा समजला जातो."
हा बुलेट ट्रेन सफाई, ज्याला "६ मिनीटाचे आश्चर्य (७ मिनीट मिरॅकल्)" म्हटले जाते बघण्यासारखा आहे...
...आणि आपल्या इथल्या कामगारसंघटनांच्या नेत्यांना कमीत कमी हजार वेळा बघण्याची सक्ती करण्यासारखा आहे.
23 Jul 2015 - 12:45 am | प्यारे१
हजार वेळा बघायची सकती केल्यास संप करतील!
बाकी एक्कामालकांची सहल यावेळी उशिरा जॉइन केली!
23 Jul 2015 - 1:04 am | डॉ सुहास म्हात्रे
"६ मिनीटाचे आश्चर्य (७ मिनीट मिरॅकल्)" ऐवजी "७ मिनीटाचे आश्चर्य (७ मिनीट मिरॅकल्)" असे वाचावे.
7 Jul 2015 - 11:34 am | अजया
स्वप्नवत प्रवास.वाचताना आम्हालाही संपु नयेसा वाटत होता!
7 Jul 2015 - 11:58 am | स्वाती दिनेश
वर्णन छानच.. युंग फ्राऊ आवडते डेस्टिनेशन आहे..
(खरं म्हणजे सगळे स्वीसच आवडते डेस्टिनेशन आहे, :) )
स्वाती
7 Jul 2015 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
मधुरा देशपांडे, अरवीन्द नरहर जोशि., श्रीरंग_जोशी, अजया आणि स्वाती दिनेश : सफरीतला सहभाग असाच चालू राहू द्या. अजून बर्याच अनवट गोष्टी पहायच्या आहेत !
7 Jul 2015 - 2:07 pm | पद्मावति
मस्तं चाललीय ही सफर. युन्ग्फ्राऊ ची ट्रेन म्हणजे खरोखर अनोखाच अनुभव असतो. निसर्गाचं हे बर्फाळ रूप असे अगदी हातभर अंतरावरून अनुभवण्याची गंमत वेगळीच वाटते.
8 Jul 2015 - 5:15 am | जुइ
सुरेख वर्णन आणि फोटोज. स्विस रेल्वे आणि पर्यटण विभागाचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे.
8 Jul 2015 - 9:31 am | पैसा
मस्तच! तुमच्यामुळे हे सगळे घरबसल्या बघतो आहोत!
8 Jul 2015 - 12:06 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
8 Jul 2015 - 1:32 pm | कपिलमुनी
घरबसल्या स्विस सहल
8 Jul 2015 - 3:00 pm | इशा१२३
अप्रतिम आहे स्विस.हा भागहि आवडला.
पुभाप्र.
8 Jul 2015 - 3:41 pm | मृत्युन्जय
अप्रतिम चालले आहे. हा भाग लवकर संपवल्याबद्दल निषेढ
8 Jul 2015 - 5:28 pm | मोनू
स्वप्न पाहातेय असेच वाटले वाचताना... फोटो अप्रतिम... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
10 Jul 2015 - 12:33 am | डॉ सुहास म्हात्रे
पद्मावति, जुइ, पैसा. प्रचेतस, कपिलमुनी, इशा१२३, मृत्युन्जय आणि मोनू : अनेक धन्यवाद !
22 Jul 2015 - 11:14 pm | राजकुमार१२३४५६
इंटरलाकेन ला आपण कोणत्या हॉटेल मध्ये राहिले होते ?
आणि रेल्वे ने गेल्या वर पायी प्रवास किती झाला. मधेच taxi किंवा कार करावी लागली का?
इंटरलाकेन ला स्टेशन पासून हॉटेल किती लांब होते?
या प्रश्नाची उत्तरे दिली तर अजून माहिती मिळेल.
23 Jul 2015 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे
लेखात लिहील्याप्रमाणे स्टेशनपासून पाचेक मिनिटांच्या अंतरावर राहिलो होतो. या सफरीत झ्युरीक सोडून इतर कोठेच हॉटेल अगोदर बुक केले नव्हते. दोनतीन हॉटेल्स पाहून स्टेशन्पासून जवळचे सोईचे ठिकाण आणि योग्य किंमत पाहून हॉटेल निवडले होते. कारण हॉटेलमध्ये फक्त झोपायचे होते. बहुतेक ठिकाणी पहाटे न्याहारी सुरू होण्या अगोदरच लवकर प्रवास सुरू केला.
हा पहिला स्विस अनुभव असल्याने झ्युरिक विमानतळ ते हॉटेल टॅक्सी केली होती, पण नंतर कळले की रेल्वेने तो प्रवास केला असता तर १/१० खर्चात आणि निम्म्या वेळेत पोचलो असतो ! बाकी सर्व प्रवास स्विस पास वापरून रेल्वे, ट्रॅम, बस असाच केला. स्विस पासमध्ये बर्याच पर्यटक आकर्षणांतील (डोंगरी रेल्वे, बोट इ) वाहनांच्या तिकीटात ५०% सवलत मिळते.
23 Jul 2015 - 12:39 am | डॉ सुहास म्हात्रे
त्यामुळे कोणत्याच हॉटेलचे नाव लक्षात राहिले नाही. मात्र कमी रेट असला तर खोल्या लहान असू शकतात पण सेवेचा दर कधीच कमी पाहिला नाही.
23 Jul 2015 - 8:51 am | राजकुमार१२३४५६
आपण हि अमुल्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !!
अजून एक विचारावेसे वाटते.
स्वित्झर्लंड मध्ये आपल्या सर्व भारतीय बँकाचे क्रेडीट किवा डेबिट कार्ड चालतात का?
का सर्व ठिकाणी कॅश बाळगावी लागते.
23 Jul 2015 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमचे क्रेडीट किवा डेबिट कार्ड आंतर्देशीय व्यवहार करण्यायोग्य असल्यास ते स्वित्झर्लंडमध्ये चालावे. पण भारतीय कार्ड परदेशात वापरल्यास खूप जास्त प्रमाणात विनिमय दर (एक्सचेंज रेट) पडतो असे ऐकले आहे, स्वतः तसे कधीच न केल्याने स्वतःचा अनुभव नाही. पण ट्रॅव्हलकार्ड हा उत्तम पर्याय आहे... यात प्रीपेमेंट केलेले असल्याने जास्त विनिमय दराचा धोका नाही. तसेच एकाच कार्डावर अनेक परकिय चलने ठेवता येतात. खर्च न झालेले चलन परत आल्यावर लगेच भारतीय रुपयांत बदलून मिळते. एक अतिरिक्त कार्ड मिळते, मूळ कार्ड हरवले तर ते डिसेबल करून नविन चालू करून घेता येते. तुमच्या बँकेत किंवा परकीय चलन एजंटकडून अधिक माहिती घ्या आणि मगच निर्णय करा. छोटेमोठे सर्व व्यवहार कार्डाने करता येतात. मात्र अडीअडचणीसाठी काही कॅश जरूर जवळ ठेवा.
23 Jul 2015 - 9:01 am | राजकुमार१२३४५६
युंगफ्राउयोख समजण्या साठी हा video पाहावा.
23 Jul 2015 - 1:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त व्हिडिओ आहे ! धन्यवाद !
23 Jul 2015 - 12:29 pm | खटपट्या
सर्वे चित्रे स्वप्नवत...
23 Jul 2015 - 10:47 pm | राजकुमार१२३४५६
ट्रॅव्हलकार्ड ची चवकशी केली असता समजले कि ते आपल्या बँकेत उपलब्ध आहे.
आणि कॅश airport वर बदलून (currency exchange) देतात का? का त्या देशयात गेल्यावर आपण बदलू शकतो?