शरदातला स्वित्झर्लंड : ०५ : युंगफ्राउयोख

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
9 Jul 2015 - 1:32 am

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

हा सात किलोमीटर लांबीचा बोगदा १८९८ ते १९१२ या १४ वर्षांत बांधला गेला. यातून जाणार्‍या रेल्वेच्या मार्गाला २५% चढ / उतार आहे. इतक्या तीव्र उतारावरून ती घसरू नये यासाठी सर्वसाधारण रुळांबरोबरच तिला धरून ठेवण्यासाठी दातेदार चक्राच्या रुळांची (कॉगव्हिल) रचना उपयोगात आणली आहे.

युंगफ्राउयोखवरून आल्प्स पर्वतराजीमधील (२३ किमी लांब आणि १२० चौ किमी क्षेत्रफळाच्या) सर्वात मोठ्या अफाट आलेत्श हिमनदीचा उगम होतो. युंगफ्राउ-आलेत्श परिसराला २००१ पासून "जागतिक वारसा क्षेत्र (वर्ल्ड हेरिटेज साईट)" म्हणून ओळखले गेले आहे. या ठिकाणाला दर दिवशी ४००० ते ६००० पर्यटक भेट देतात. जॉन ख्रिस्तोफरच्या प्रसिद्ध ट्रायपॉड्स कादंबर्‍यांतील प्रसंग युंगफ्राउयोख संकुलात घडतात.

युंगफ्राउयोख एक स्थापत्यशात्रिय चमत्कार आहे असे त्याचे रेखाचित्र पाहून वाटले होतेच...


युंगफ्राउयोख ०१ : उभ्या छेदाची रेखाकृती

...पण हा प्रकार स्वतः पाहिल्या-अनुभवल्याशिवाय त्याची नीट कल्पना येणे शक्य नाही.

युंगफ्राउयोख संकुलाचे स्थूलपणे पाच विभाग करता येतील :

१. पहिला विभाग :

यात रेल्वे स्टेशन आणि त्याच्याशी संबंधीत सर्व यंत्रणा येते. स्टेशनवर रेल्वे पोहोचली. खाली उतरल्यावर लक्षात आले की आपण अजूनही पर्वताच्या पोटातल्या बोगद्यातच आहोत. फक्त बोगद्याची रुंदी आणि उंची वाढून तो एका भल्यामोठ्या लांबलचक पोकळीसारखा दिसत होता.

२. दुसरा विभाग :

हा मुख्यतः पर्यटनाशी संबंधीत आणि आकारमानाने सर्वात मोठा भाग आहे. रेल्वे स्टेशनवरून येथे जाण्यासाठी दोन बोगदे आहेत. या भागात घाटाच्या आणि म्योंख पर्वताच्या दक्षिण पृष्ठभागाच्या लगतच्या भागात कोरलेले बोगद्यांचे चार मजली जाळे आहे. मजल्यांत वरखाली करायला लिफ्ट्सही आहेत. यात पर्यटकांना आकर्षित करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या अश्या :

(अ) बोगद्यांच्या जाळ्यात असलेल्या आणि मोक्याच्या ठिकाणी पृष्ठभागाबाहेर डोकावणार्‍या इमारतींत एक हॉटेल आणि चार रेस्तराँ आणि एक कॅफेटेरिया आहेत. त्यातल्या एकाचे नाव चक्क "बॉलिवूड रेस्तराँ" आहे !


युंगफ्राउयोख ०२ : दूरावलोकन (जालावरून साभार)

वातानुकूलित रेस्तराँच्या खिडक्यांजवळ बसून मजेत खानपान करताना थोड्याश्याच खालच्या स्तरावरून सुरू होवून दूरवर पसरत जाणार्‍या आलेत्श (Aletsch) हिमनदीचा भव्य विस्तार पाहता येतो...


युंगफ्राउयोख ०३ : खिडकीजवळची जागा पकडून बसलेले अस्मादिक आणि सहलमित्र

.


युंगफ्राउयोख ०४ : रेस्तराँच्या खिडकीतून दिसणारे आलेत्श हिमनदीचे विस्तीर्ण पात्र

(आ) हिममहाल (Ice Palace) : कधीच न वितळणार्‍या (म्हणजे बहुतेक हजारो वर्षे वयाच्या) बर्फात असलेल्या या बोगद्यांच्या जाळ्यांत अनेक सुंदर हिमशिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन आहे.


युंगफ्राउयोख ०५ : हिममहाल ०१

.


युंगफ्राउयोख ०६ : हिममहाल ०२

एका बर्फाच्या खिडकीच्या मागे राहून युंगफ्राउयोखला आल्याचा पुरावा कॅमेर्‍यात बंदिस्त करता येतो...


युंगफ्राउयोख ०७ : हिममहाल ०३

(इ) एक छोटे सिनेमागृह : येथे युंगफ्राउयोखबद्दलचे, या पर्यटनच्या प्रकल्पबांधणीसंबंधीचे, तिथल्या पर्यटन व्यवस्थांबद्दलचे आणि इतर अनेक संबंधीत शास्त्रीय विषयांवरचे लघुपट दाखवले जातात. वेळेच्या अभावामुळे यातला एखादाच आपल्याला पाहता येतो. पण तिथल्याच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून गेलेल्या पर्यटकांना अनेक माहितीपूर्ण आणि मनोरंजक लघुपट बघता येतात.

(ई) स्किईंग करायला शिकविण्याची शाळा.

(उ) पोस्ट ऑफिस, जागोजागी असलेली माहिती केंद्रे, आठवणवस्तूंची आणि इतर दुकाने, ईमेल केंद्र,

... इ इ बरेच काही.

३. तिसरा विभाग :

दुसर्‍या विभागातून एक बोगदा पकडून किंवा स्टेशनवरून लिफ्टने आपल्याला उघड्यावरच्या बर्फाच्छादित पठारावर जाता येते. बराच वेळ बोगद्यातून फिरल्यावर मोकळ्या हवेत श्वास घेताना आपल्याला जरा बरे वाटते ! पण लगेचच चारी बाजूला दिसणारी अद्भुत दृश्ये वारंवार आपला श्वास रोखून धरतात... मग ते अगोदर खिडकीतून पाहिलेल्या पण आता पूर्णरूपात दर्शन देणार्‍या आलेत्श हिमनदीचे भव्य रूप असो;

किंवा कोंकोर्डियाप्लात्स (Konkordiaplatz) सारखा मानवी नजरेच्या आवाक्याला आव्हान देणारा हिमसागर असो;...


युंगफ्राउयोख ०८ : युंगफ्राउयोखवरून दिसणारा कोंकोर्डियाप्लात्सचा नजारा

किंवा धावत गेलो तर पाच-दहा मिनिटात हात लावता येतील असे डोळ्याना आभास करून देणारी बर्फाचा मुकुट डोक्यावर घेऊन दिमाखाने चमकणारी आणि दूरवरची अगदी उघडीबोडकी पर्वतशिखरे असोत...


युंगफ्राउयोख ०९ : युंगफ्राउयोखवरून दिसणारे दृश्य ०१

.


युंगफ्राउयोख १० : युंगफ्राउयोखवरून दिसणारे दृश्य ०२

.


युंगफ्राउयोख ११ : युंगफ्राउयोखवरून दिसणारे दृश्य ०३

निसर्गाचे हे अनवट रूप पाहताना आपला श्वास सतत जड होत आहे... पण तो उंचीवरच्या विरळ हवेच्या प्रभावाने नक्कीच नाही... हे जाणवत राहते.

या पठारावर एक स्विस ध्वज रोवलेला आहे. अर्थातच, तेथे फोटो काढण्याचा प्रघात मोडण्याचा गुन्हा कोणीच पर्यटक करू शकत नाही...


युंगफ्राउयोख १२ : स्विस ध्वज

एका बाजूला स्फिंक्स नावाचा एक सुळका त्याच्या डोक्यावर त्याच नावाची वेधशाळा मिरविताना दिसतो...


युंगफ्राउयोख १३ : स्फिंक्स सुळका व वेधशाळा

घाबरू नका, ते आकर्षण पहायला आपल्याला तो बर्फाच्छादित सुळका चढून जायची गरज नाही, हे माहितीपत्रकाने सांगितलेले असते. आपली पावले परत बोगद्यांकडे वळतात...

४. स्फिंक्स वेधशाळा (Sphinx Observatory) :

बोगद्यांच्या जाळ्याच्या विरुद्ध बाजूच्या टोकाला असलेली लिफ्ट आपल्याला जगातल्या सर्वात जास्त उंचीवर (३,५७२ मीटर) असलेल्या वेधशाळेत घेऊन जाते. हे Global Atmosphere Watch या संस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मुळातच स्विस हवा उच्च प्रतीने प्रदूषणमुक्त आहे. त्यात हे ठिकाण इतक्या उंचीवर असल्याने या वेधशाळेत घेतल्या जाणार्‍या निरीक्षणाचे आणि त्यावरून केल्या गेलेल्या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सौर्यवार्‍यांतून येणार्‍या उच्च उर्जाभारीत न्यूट्रॉन्सचे अस्तित्व या वेधशाळेत सर्वप्रथम सिद्ध केले गेले. अश्या प्रकारच्या संशोधनासाठी अनिवार्य असणारे शुद्ध वातावरण आणि त्याचबरोबर जमिनीखाली खोलवर निरीक्षणे घेण्याची क्षमता असलेली दुसरी वेधशाळा विरळा आहे.

सुळक्याच्या डोक्यावर बसल्यासारखी दिसणार्‍या या वेधशाळेच्या इमारतीला भेट देणे आणि तिच्या मनोर्‍याच्या सज्जावरून आजूबाजूच्या परिसराचे परत एकदा विहंगम दर्शन घेणे हा अविस्मरणीय अनुभव आहे...


युंगफ्राउयोख १४ : स्फिंक्स वेधशाळा (जालावरून साभार)

या जागेवर Jungfraujoch radio relay station आहे. मात्र ते पर्यटकांसाठी खुले नसते.

५. बर्फातील खेळांच्या रसिकांसाठी केलेल्या व्यवस्था :

वेधशाळेच्या लिफ्टमधून खाली आल्यावर जवळच असलेल्या एका निर्गमन व्दारातून बाहेर गेल्यास आपण बोगद्यांच्या जाळ्याच्या दुसर्‍या बाजूला उघड्या बर्फावर येतो. या विभागात बर्फांच्या खेळांशी संबंधीत सोयी आहेत. इथे जवळच नवख्या लोकांना स्नो डिस्क वापरून बर्फावर घसरण्यासारख्या सोप्या खेळांची मजा घेता येते. तर थोड्या दूरवर असलेल्या म्योंखयोखहुट् (म्योंख घाटावरची झोपडी) पर्यंत चालत जाऊन हायकिंग, स्किईंग, गिर्यारोहण, इत्यादी बर्फातले जास्त धाडसी खेळ खेळता येतात.

वेळेअभावी या विभागात मला जाता आले नाही. पण तेथे जाणारा रस्ता किती साहसपूर्ण असेल याची कल्पना देणारे हे जालावरून साभार घेतलेले चित्र देण्याचा मोह आवरला नाही...


युंगफ्राउयोख १५ : "म्योंखयोखहुट्" कडे जाणारा रस्ता (जालावरून साभार)

.

हे सर्व संकुल इतके विशाल आहे की, विशेषतः बोगद्यांत, हातात मार्गदर्शक पुस्तिका असूनही एखाद्या वेळी वाट चुकायला होते. जरा जास्त वेळ इथे व्यतीत करता आला असता तर बरे झाले असते असे सतत वाटत राहते. पण परतीच्या गाडीची वेळ होत आली आहे हे पाहून मोठ्या नाखुशीने परत रेल्वे स्टेशनवर परतावे लागते.

.

(क्रमश :)

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

9 Jul 2015 - 8:10 am | श्रीरंग_जोशी

ही संपूर्ण लेखमालिका म्हणजे एक पर्वणी आहे.

हा ही भाग एकदम माहितीपूर्ण व मुद्देसुदपणे लिहिला आहे. अनेक धन्यवाद.

कमालीच नेत्रसुखद आहे हे सर्व.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 12:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही जागा कमालीची नेत्रसुखद आहे याबाबत संशय नाही ! शिवाय नैसर्गिक सौंदर्याला अजिबात धक्का न लावता आपली सहल आणखीच रोचक, आरामदायक आणि परत परत यावे असे वाटण्याजोगी बनवणारे मानवी व्यवस्थापन, हे खास स्विस विशेष !

चौकटराजा's picture

9 Jul 2015 - 11:26 am | चौकटराजा

ही एकूणच मालिका छानच आहे. लॉटरब्रूनेन ( उच्चाराबद्द्ल माफी) च्या दरीच्या संदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. इतके की आता हा स्फिन्क्सच्या वाटेवर तळे कुठे दिसणार पठार कुठे दिसणार हे पाठ झाले आहे. हिमालय व आल्पस मधे माझ्या मते एक फरक असा असावा की हिरवळ आल्पस भागात जास्त आहे. युरोपिअन श्रीमंतीमुळे बांधीव व आकर्षक रस्ते ही अधिक. हिमाल्य भाग रौद्र आहे. एक प्रश्न असा की टिटलिस व युंगफ्राउ यातील एकच निवडायचे झाल्यास कोणते निवडावे ? आपण दिलेल्या या भागाच्या स्कींमॅटिक नकाशामुळे मला लहानपणी पाहिलेल्या एका फोटोची आठवण आली. फोटोच्या खाली कल्याण रे स्टे ( इंटरलाकेन) व वर हुच्च ठिकाणी हाजी मलंग बाबा ( युंगफ्राउ ). असा तो फोटो असायचा.

टिटलिसवर श्वासोच्छवासाला त्रास होत नाही आणि युंगफ्राऊबाबावर तो बर्‍याचजणांना होतो असं निरीक्षण नोंदवतो.

कोणाला नेमका त्रास होईल हे अनप्रेडिक्टेबल आहे. पण तिथे दहातल्या पाच जणांना अगदी स्पष्ट जाणवण्याइतका त्रास होत असल्याचं दिसलं. विशेषतः सिगरेट ओढणार्‍यांना किंवा अस्मादिकांसारख्या नॉन स्मोकर्सना हा त्रास "स्थूलमाना"ने होत असावा.

त्या बोगदाप्रदक्षिणेत अनेकजण धापा टाकत डोळे मिटून जागोजागी बसलेले किंवा कोणाकोणाच्या आधाराने कष्टाने मार्गक्रमणा करत असलेले दिसतात.

ठिकाण मात्र अप्रतिम सुंदर. जेवणाखाण्याची व्यवस्था ठीकठाक. "पिण्या"ची व्यवस्था वापरल्यास माउंटन सिकनेस आणखी वाढण्याची शक्यता. थंडीवर उतारा म्हणून "औषधाचे" घोट घेतल्यावर अधिक दमछाक झाली होती.(अधिक माहिती डॉक्टरसाहेब देऊ शकतील)

याच्या पायथ्याशी असलेल्या इंटरलाकेन शहरात (तुलनेत कमी आल्टिट्यूडला येताच) श्वासाचा त्रास पूर्ण थांबला आणि तिथे भरपूर पदभ्रमंती केली. या इंटरलाकेन शहरात बाकी सर्व सुंदरसुंदर पाहताना वाटेत एक मजेदार दुकान ऊर्फ "शरीरसंबंध उपकरण दुकान" दिसलं. त्याची दर्शनी पाटी रोचक होती. "द लास्ट XXX शॉप बिफोर युंगफ्राउ"

युंगफ्राउला लोक अनेकविध उद्देशांनी जात असावेत आणि अनेकांना तिथे निश्चित माउंटन सिकनेस होत नसावा अशी समजूत त्यावरुन करुन घेतली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

गवि, सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद !

टिटलिस (३२०० मीटर) आणि युंगफ्राउयोख (३४००) यांच्यात उंचीत खूप वाटला नाही तरी जसजसे वर जाऊ तसे प्राणवायुचे प्रमाण जास्त जास्त कमी होत जाते. धुम्रपानाचा प्रभाव असलेल्या माणसांत, फुफ्फुसांची राखीव शारिरीक क्षमता (बायॉलॉजिकल रिझर्व) कमी असल्याने, थोड्याश्या कमी झालेल्या प्राणवायुचाही प्रभाव सर्वसाधारण माणसांपेक्षा बराच जास्त असू शकतो.

तसेच, युंगफ्राउयोखमध्ये बरेच जास्त चालणे होते, त्यातही चार मजली बोगद्यांतून वरखाली करावे लागते. शिवाय, बराच वेळ बोगद्यांच्या जाळ्यात राहिल्यानंतर काही जणांना संवृतिभीतिच्या (क्लॉस्ट्रोफोबीयाच्या) प्रभावाने श्वास जड झाल्यासारखे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

युंगफ्राउयोख आणि टिटलिस एकमेकापासून खूप वेगळ्या कारणांसाठी अत्यंत रम्य ठिकाणे आहेत. तेव्हा, तुलना होऊ शकत नाही. पण, दोन्ही ठिकाणे न चुकता बघावी अशीच आहेत ! या सहलीत आपण टिटलिसलाही भेट देणार आहोतच !

स्विस आल्प्समध्ये मानवी हस्तक्षेप करताना नैसर्गिक सौदर्याला किंचितही धक्का लावला जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. मात्र त्या सोईंमुळे आपल्याला निसर्गसौंदर्याची मजा फारसे कष्ट न घेता सुखकारक रितीने घेता येते. अर्थातच, पर्यटक त्या सुंदर आठवणी बरोबर घेऊन जाताना, तेथे परत कसे येता येईल याचा विचार करत असला तर आश्चर्य ते काय ?

खर्चाचे पहायचे झाले तर, रस्ते व इतर मोठे प्रकल्प बनविणार्‍या तज्ञांच्या मते, आपल्याकडे तेवढ्याच प्रमाणात पैसे खर्च करून (पक्षी : खर्च केल्याचे दाखवून) सुंदर निसर्गाची माती केल्याची उदाहरणे पैश्याला पासरी आहेत ! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

लॉटरब्रूनेन ( उच्चाराबद्द्ल माफी) च्या दरीच्या संदर्भात...

Lauterbrunnen चा उच्चार लाउटेरब्रुनन असा होतो. जर्मन भाषा फोनेटिक आहे. त्यामुळे काही थोडे अपवाद वगळता प्रत्येक मुळाक्षराचा देवनागरीप्रमाणे एकच उच्चार केला जातो.

पुढच्या लेखात आपण मनमोहक दर्‍याखोर्‍याने भरलेल्या लाउटेरब्रुननच्या परिसरातल्या काही भागातून प्रवास करणार आहोत !

मधुरा देशपांडे's picture

9 Jul 2015 - 12:00 pm | मधुरा देशपांडे

आहाहा...माहितीपुर्ण लेख.
मागच्या वेळी जवळचा बराच परिसर पाहिला. आता पुढच्या वेळी युंगफ्राऊ नक्की.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी आणि मधुरा देशपांडे : अनेक धन्यवाद !

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2015 - 12:13 pm | स्वाती दिनेश

कितीही वेळा येथे गेलं तरी परत परत जावेसे वाटणारा परिसर!
येथे उंचीवर खूप जणांना विरळ हवेचा त्रास होतो, मागे एकदा आम्ही येथे गेलो असताना एक चिनी आपला ग्रुप चुकला. एकटा पडल्याने घाबरला आणि त्यात त्याला विरळ हवेमुळे त्रास व्हायला लागला. मग भरपूर साखर खायला दिली त्याला ..
आणि लिफ्टच्या बाहेर असलेली पत्रपेटी? पत्र पोस्ट केले का तेथून? तेथल्या सुविनिअर शॉप मधून पिक्चर पोस्टकार्ड घेऊन आपल्या सुह्रदांचा किवा आपलाच पत्ता लिहून पत्रपेटीत टाकायचे, १०-१५ दिवसांनी जेव्हा ते आपल्याला मिळते तेव्हा इतकी मजा वाटते..
स्वाती

हवा तर विरळ असतेच आणि त्यातून क्लॉस्ट्रोफोबीया असेल तर त्रास जास्त. कारण ट्रेन कशी जाणार याची तुम्ही माहिती घेता तेंव्हाच जाणवते कि आपण एक अतिविशाल पर्वताच्या आत आहोत. मग ती टिपिकल भावना जाणवायला लागते.

खूप खूप उत्सुकता आहे.
वरील बर्‍याच लोकांनी सांगितल्याप्रमाणे श्वास घ्यायला मात्र त्रास होऊ शकतो. ऑक्सिजन कमी पडल्यामुळे डोकं बधिर झल्यासारखं वाटणे, माळमळल्यासारखं वाटणे, वगैरे. सुरुवातीला तर काही वेळ असाही मोह होऊ शकतो की लगेचच परतिचि ट्रेन मिळतेय का ते बघावं की काय. नंतर हळूहळू त्या वातावरणाची सवय होते मग मात्र तेथून पाय निघत नाही.

झकासराव's picture

9 Jul 2015 - 3:15 pm | झकासराव

नितांतसुंदर आहे जागा. :)

तुमचे प्रवास वर्णन लेख भारीच असतत नेहमी.

नाव का बदलल हो?
मला आज कळाल तुमच खरं नाव.
आम्ही आपले एक्का काकाच मेन्दुत रजिस्टर केलेल. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 5:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपासभासद होताना माझं पहिलं नाव टाकून पाहिलं तर ते अगोदर गेलेलं होतं, मग गंमत म्ह्णून टोपणनाव घेतलं. आत्तापर्यंत मिपावरचे बरेच जण कट्टा अथवा फोटोवरून मला ओळखू लागले आहेत. तेव्हा माझ्या खर्‍या नावानेच मिपावर वावरायचे ठरवले. एक्का काका पण चालेल !

सानिकास्वप्निल's picture

9 Jul 2015 - 3:47 pm | सानिकास्वप्निल

माऊंट टिटलीस तर आवडतं ठिकाण आहेच पण युंगफ्राऊच्या आठवणी ही तितक्याच छान.
मस्तं लिहिले आहे, खूप सुंदर होत आहे ही सफर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 4:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वाती दिनेश, सुखी जीव, पद्मावति आणि सानिकास्वप्निल : सहलीतल्या सहभागासाठी धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jul 2015 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

मज्जा आली
बर्फ...बर्फ ... बर्फ!

द-बाहुबली's picture

9 Jul 2015 - 6:12 pm | द-बाहुबली

भन्नाट.

अजया's picture

9 Jul 2015 - 7:26 pm | अजया

जातेच आता!

अर्धवटराव's picture

10 Jul 2015 - 2:19 am | अर्धवटराव

बरं झालं आमची सौ. मिपावर येत नाहि... नाहितर एव्हाना आम्हाला स्विस फ्लाईट पकडावी लागली असती.
काय जबरा पर्यटन. वाह.

सुधीर कांदळकर's picture

10 Jul 2015 - 9:59 am | सुधीर कांदळकर

माहितीपूर्ण. चित्रे, तपशील, विचार, प्रतिसाद, सारेच सुरेख. मस्त सफरीत मी आहेच.
ध्न्यवाद.
चित्र पाहिल्यामुळे आपले खरे नाव कळले.

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2015 - 4:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्रुप्त, बॉमकेस बॅक्षी, अजया, अर्धवटराव आणि सुधीर कांदळकर : अनेक धन्यवाद !