शरदातला स्वित्झर्लंड : ०६ : इंटरलाकन आणि हार्डर कुल्म

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
13 Jul 2015 - 5:37 pm

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

हे सर्व संकुल इतके विशाल आहे की, विशेषतः बोगद्यांत, हातात मार्गदर्शक पुस्तिका असूनही एखाद्या वेळी वाट चुकायला होते. जरा जास्त वेळ इथे व्यतीत करता आला असता तर बरे झाले असते असे सतत वाटत राहते. पण परतीच्या गाडीची वेळ होत आली आहे हे पाहून मोठ्या नाखुशीने परत रेल्वे स्टेशनवर परतावे लागते.

.

परतीचा प्रवास आलो त्याच मार्गाने म्हणजे युंगफ्राउयोख-क्लायनं शायडिक्-लाउटेरब्रुनन-इंटरलाकन असा होता. मात्र आता सकाळच्या प्रवासात असणारे धुके पूर्णपणे विरून गेले होते आणि लखलखीत सूर्यप्रकाश पडला होता. दूरवरचा आसमंतही स्पष्टपणे दिसत असल्याने त्याच्या सौंदर्याला अजूनच झळाळी आली होती...


क्लायनं शायडिक् रेल्वे स्टेशन

येताना पहाटेच्या अंधुक प्रकाशात आणि धुक्यात शरदाचे रंगीबेरंगी रुपडे नीट दिसले नव्हते. आता मात्र लाउटेरब्रुनन स्टेशननंतर शरदाने त्याच्या उधळलेल्या रंगांच्या भांडाराची चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्या निसर्गसौंदर्यात नाहून निघत असतानाच तिथल्या इमारती आपणही काही कमी नाही हे त्यांच्या नीटनेटकेपणाने, झाडाफुलांनी सजवलेल्या आकर्षक खिडक्यांनी आणि कलात्मक आवारांनी दाखवून देत होत्या...


लाउटेरब्रुनन

.

रेल्वे प्रवासात एका स्विस सहप्रवाशाशी संभाषण करताना मी त्याच्या देशातल्या सौदर्यदृष्टी, नीटनेटकेपणा आणि स्वच्छतेची तारीफ केली. त्यावर त्याची प्रतिक्रिया विलक्षण होती. जरासा स्वतःवरच नकळत चीड आल्याच्या आविर्भावात तो म्हणाला, "आजकाल पूर्वीसारखी स्वच्छता राहिली नाही. पूर्वी पानगळीच्या मोसमातही रस्त्यांवर झाडांची पडलेली पाने दिसत नसत !"

मी, अर्थातच, निःशब्द !!!

.

इंटरलाकन

इंटरलाकन या शब्दाचा अर्थ "दोन तळ्यांमधील (जागा)" असा होतो. ब्रिएंझ आणि थुन या दोन सरोवरांमधल्या सपाट जागेचे ब्योडेली असे नाव आहे. ब्योडेलीमध्ये चार गावे वसली आहेत... इंटरलाकन (५,६०० लोकवस्ती), उंटरसेsन (५,६०० लोकवस्ती), माटन् (३,७०० लोकवस्ती) आणि ब्योनिगन (२,५०० लोकवस्ती). यातल्या इंटरलाकनला त्याच्या रस्त्यावरच्या मोक्याच्या जागेमुळे व रेल्वे स्टेशनमुळे जास्त महत्त्व आले आहे. सौंदर्याबाबत एकमेकाशी स्पर्धा करणारी इंटरलाकन, उंटरसेsन आणि माटन् ही शहरे वाढत वाढत आता एकमेकाला जोडली गेली आहेत. मात्र स्विस अभिमानाला जागून आजपर्यंत झालेल्या दोन जनमतकौलांत त्यांनी शासकीय एकत्रीकरणाला विरोध करून आपापल्या नगरपालिका स्वतंत्र राखल्या आहेत !


इंटरलाकन आणि परिसर (मूळ चित्र जालावरून साभार)

ब्योडेलीमधून वाहणारी आरं नावाची नदी जरा गमतीची आहे. ही नदी आल्पसमध्ये उगम पावून एका ठिकाणी इतकी रुंद आणि खोल होते की त्याला ब्रिएंझ सरोवर असे म्हणतात. त्या सरोवराच्या विरुद्ध टोकाला असलेल्या ब्योडेलीमध्ये तिचा प्रवाह चिंचोळा होतो. ब्योडेलीच्या दुसर्‍या टोकाला ती परत थुन सरोवराच्या रूपाने प्रसरण पावते. ब्रिएंझ सरोवराच्या पाण्याची उंची थुन सरोवराच्या पाण्यापेक्षा २ मीटरने वर आहे. थुन सरोवराच्या विरुद्ध टोकातून बाहेर पडून ती पुन्हा अजून काही ठिकाणी सरोवरे बनवत पुढे जाते. आपल्या सर्व प्रवासात अनेक उपनद्यांना सामावून घेत ती युरोपच्या दुसर्‍या क्रमांकाच्या र्‍हाईन नदीला मिळते. आरंचा (नदी, उपनद्या आणि सरोवरे मिळून बनलेला) पाणलोट जवळ जवळ निम्म्या स्वित्झर्लंडला सुजलाम् सफलाम् करतो.

इंटरलाकनला बाकी स्वित्झर्लंडशी जोडणार्‍या ब्योडेलीमधील रेल्वे मार्गाबद्दल एक गमतीदार सत्यकथा आहे. हा रेल्वेमार्ग मुख्यतः दोन सरोवरांतील जलप्रवासाला जोडण्याची मदत म्हणून बांधला गेला. मात्र रेल्वे कंपनीच्या मालकांनी मार्ग बांधताना तो दोनदा आरं नदी ओलांडेल हे जातीने पाहिले आणि तेथील नदीवरचे पूल इतक्या खालच्या स्तरांवर बांधले की त्यांच्या खालून स्टीमर कंपनीच्या बोटी जाणे शक्य होणार नाही. अश्या रितीने त्यांनी जलसेवा कायमची रेल्वेवर अवलंबून राहील अशी खबरदारी घेतली ! आता तर हा रेल्वेमार्ग ब्योडेलीच्या हद्दीबाहेर दूरवर जाऊन स्वित्झर्लंडच्या सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडतो. इंटरलाकन मध्यवर्ती ठिकाण बनविण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.

शहरात बघण्यासारखे फारसे काही नसूनही इंटरलाकन भारतीय पर्यटकांत प्रसिद्ध होण्यासाठी बॉलीवूडचा हातभार लागला आहे हे नि:संशय. इंटरलाकनकरही हे कौतूकाने मान्य करताना दिसले. हॉटेलमध्ये खोलीची चौकशी करताना स्वागतिकेने माझ्याकडे पाहून "भारतीय का?" असे विचारले आणि हो म्हटल्यावर "आमच्या इथे खूप हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होते. मी पण बघितले आहे." असे सांगितले. भारतीय चित्रपटांत नाचत नाचत गाणी म्हणतात याची तिला मजा वाटली होती. शेवटी हात जोडून "नामोश्कार" पण केला ! नंतर केव्हातरी मी स्वित्झर्लंडमध्ये चित्रित केल्या गेलेल्या हिंदी चित्रपटांची यादी जालावर शोधली आणि चकीत झालो. भारतीय पर्यटन "नीट" चालवले असते तर जितका पैसा पर्यटक म्हणून भारतीयांनी सर्व स्वित्झर्लंडमध्ये खर्च केला आहे त्याच्या अनेकानेक पटींनी जास्त नाव आणि पैसा भारतीयांनी एकट्या हिमालय पर्यटनातून कमावला असता. शिवाय त्यातून देशाच्या अभिमानात भर घालणारे काही केले हे समाधान मिळाले असते ते वेगळेच ! असो.

हॉटेलमध्ये सामान टाकून, शॉवर-कॉफी वगैरे सोपस्कार आटपून इंटरलाकनवर स्वारी करायला सज्ज झालो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे गनीमाची खात्रीची अंतर्गत खबरबात काढण्यासाठी स्वागतिकेला आपल्या गोटात सामील करणे जरूरीचे होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला म्हणालो, "उद्या सकाळी सकाळी मी इंटरलाकन सोडून जाणार. आता चार वाजलेत म्हणजे माझ्याकडे चार एक तास उरले आहेत. स्वित्झर्लंडमधले चकचकीत रस्ते आणि खरेदीत मला रस नाही. तुझ्या शहराचा कोणता विशेष मी बघावा असे तुला वाटते ?" ती जराशी गोंधळली आणि मला हॉटेलसमोरून जाणारा एक बस क्रमांक देऊन म्हणाली ही बस बहुतेक सर्व इंटरलाकनला फेरी मारून तुम्हाला परत इथे आणून सोडेल. त्या बसने तासाभरात इंटरलाकनच्या खूपश्या गल्लीबोळात फिरवून आणले, झाले संपले इंटरलाकनदर्शन ! कोणत्याही विकसित देशातले मुख्य रस्ते एकमेकापासून खूपसे वेगळे नसतात. त्यामुळे दोनचार देश पाहून झाल्यावर तेच ते रस्ते आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सेस पाहण्यात फारसा रस उरत नाही. मात्र, मुख्य रस्ते सोडून जरा एक दोन गल्ल्या आतवर गेलो की त्या देशाचे खरे बरेवाईट रूप समोर येते, देशाची खरी संस्कृती दिसायला लागते. हे बघायला, अनुभवायला मला खूप आवडते...


इंटरलाकनची एक गल्ली

इंटरलाकन कोणत्याही स्विस गावा-शहरासारखे नीटनेटके, स्वच्छ आणि टुमदार होते. याच एका गोष्टीमुळे त्या शहरात जास्त फेरफटका मारण्याचा मला कंटाळा आला. परत हॉटेलवर जाऊन स्वागतिकेला, "तुझ्या गावात काही वेगळे बघायला नाही काय ?" असे विचारून पिडले. जरासा विचार करून ती म्हणाली, "तुम्ही समोर दिसतो आहे त्या हार्डर कुल्मवर जा. वेळ कमी आहे पण तिथे जायला रेल्वे आहे आणि तुमचे तास दोन तास मजेत जातील. मात्र तिथले रेस्तराँ आता उघडे असेल की बंद हे मी सांगू शकत नाही. सुंदर देखावा मात्र जरूर दिसेल." चला, आता अंधार पडेपर्यंत तास दोन तास घालवायचेच आहेतच. बघूया काय देखावा दिसतो ते." असे म्हणत मी तिने बोटाने दाखवलेल्या पहाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो.

वाटेत एक आकर्षक इमारत दिसली. कोणती बरे म्हणून जवळ जाऊन बघितले तर ते "इंटरलाकन ईस्ट" निघाले ! मुंबईच्या धर्तीवर इंटरलाकनमध्ये इस्ट आणि वेस्ट अशी दोन रेल्वे स्थानके आहेत ! युंगफ्राउयोखवरून परतताना येथेच उतरलो होतो. पण, बाहेर पडल्यावर मागे वळून न पाहिल्याने ही सुंदर इमारत पाहिली नव्हती. जुन्या शैलीतली पण उत्तम अवस्थेतली लांबलचक दुमजली, नीटनेटकी इमारत, स्विस माणसाने स्वतःचे घर सजवावे तश्या खिडक्यांत ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या, प्रदर्शनी भागात एक प्रशस्त तलावासारखे त्याच्या कडांवरून झुळुझुळु पाणी वाहणारे (फवारे नाही) कारंजे... आणि या सगळ्याला शरदाने रंगविलेल्या वृक्षराजीची पार्श्वभूमी ! रेल्वे स्टेशनच्या इमारतीसारखी सरकारी वास्तूही किती आकर्षक बनवता येते याचे उत्तम उदाहरण म्हणून ही इमारत दाखवता येईल...


इंटरलाकन (पूर्व) रेल्वे स्थानक (स्थानकासमोर दिसणारी तपकिरी पट्टी कुंपण नसून कारंज्याच्या कठड्यावरून ओघळणार्‍या पाण्यामुळे निर्माण झालेला दृष्टीभ्रम आहे ! )

१९१२ मध्ये युंगफ्राउयोख स्टेशन बनल्यापासून तर इंटरलाकन अधिकच प्रसिद्ध झाले आहे. एकूण सहा वेगवेगळ्या स्विस रेल्वे कंपन्या इंटरलाकन रेल्वेस्थानकांचा उपयोग करून त्या शहराला इतर पर्यटक आकर्षणांना आणि एकंदरीत सर्व देशाला जोडतात. भोवतीच्या स्विस पर्वतराजीत आणि तळ्यांच्या आजूबाजूला अनेक डझनाने असलेली पर्यटक स्थळे हे इंटरलाकनचे महत्त्व वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. इंटरलाकनच्या आजूबाजूला ४५ पेक्षा जास्त पहाडी रेल्वेमार्ग; अनेक रज्जूमार्ग व खुर्चीमार्ग (chair lifts); एकूण २०० किमी पेक्षा जास्त लांब असलेल्या स्की ट्रॅक्सकडे नेणारे रज्जूमार्ग; असंख्य हायकिंग ट्रेकमार्ग आणि दोन्हीकडच्या सरोवरांच्या काठांवर डझनाने असलेली पर्यटक आकर्षणे आहेत. या सर्वांत॑ मध्यभागी वसलेल्या आणि जागतिक स्तराच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेल्या इंटरलाकन शहराचा त्याच्या आजूबाजूची पर्यटक आकर्षणे पाहण्यासाठी मध्यवर्ती तळ म्हणून उपयोग होतो. अर्थातच, असे ठिकाण जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षणांपैकी एक झाले नसते तरच आश्चर्य !

स्विस आवारांतील आणि खिडक्यांतील फुले आणि झाडे

ही खास वेगळी नमूद करावी अशी गोष्ट आहे. स्विस इमारतींच्या खिडक्यांच्या (मग त्या खाजगी घरांच्या असो वा सरकारी) कुंड्यातील आणि आवारातली फुले आणि झाडे इतकी निगा राखलेली आणि सुंदर असतात की एकही फूल कोमेजलेले दिसत नाही की झाडाचे पान सुकलेले अथवा अळीने कुरतडलेले दिसत नाही. सुरुवातीला ती सगळी शोभा नकली (प्लास्टीकची) असल्याचा संशय येऊन मी त्यांना अगदी जवळ जाऊन निरखत असे आणि (कोणी पहात नाही याची खात्री करून) हात लावून पहात असे ! अजूनही कधीमधी तसे करण्याचा मोह होतोच. माझा संशय खरा ठरवणारा पुरावा अजून तरी सापडलेला नाही !

हार्डर कुल्म

ही उंटरसेsन नगरपालिकेच्या हद्दीत असलेली एक टेकडी (कुल्म = टेकडी) आहे. तिच्या उताराचा एक भाग इंटरलाकनच्या हद्दीत येतो. या टेकडीवर असलेल्या मध्ययुगीन गढीसारख्या दिसणार्‍या इमारतीत पूर्वी तिचेच नाव दिलेले हॉटेल होते. काही काळापूर्वी त्यात लागलेल्या आगीच्या कारणाने तेथे आपत्तिक व्यवस्था पुरवणे किती अशक्य आहे हे घ्यानात आले आणि नगरपालिकेने ते हॉटेल बंद केले. आता दिवसा तेथे त्याच नावाचे रेस्तराँ चालू असते. पण, रात्री तेथे थांबायला कोणालाही परवानगी नाही...


हार्डर कुल्मचे विहंगम दृश्य (स्विस पर्यटनाच्या पत्रकावरून साभार)

१,३२२ मीटर उंचीवरच्या या रेस्तराँमध्ये जाण्यासाठी स्टीलच्या दोरखंडाने ओढून चालविली जाणारी (funicular) रेल्वे आहे. ही आठ मिनिटांत आपल्याला टेकडीच्या माथ्यावर पोचवते..


फ्युनिक्युलर रेल्वे स्थानक

.


फ्युनिक्युलर रेल्वे रूळ आणि दोरखंड

टेकडीवरच्या स्टेशनपासून पाच एक मिनिटे चालून आपण हार्डर कुल्म रेस्तराँच्या इमारतीच्या मागे पोहोचतो. हॉटेलला वळसा घालून त्याच्या समोरच्या कड्यावरच्या उघड्या प्रांगणात शिरताना डोळ्यासमोर आलेले पहिलेच दृश्य आपल्याला थक्क करून सोडते...


हार्डर कुल्म वरून दिसणारे पर्वतराजीचे विहंगम दृश्य : ०१

जसजसे आपण आवारच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाकडे जातो तसे ध्यानात येते की, "अरे, जवळच्या दोन डोंगरांच्या वरून आणि त्यांच्यामधल्या दरीतून डोकावणारी ही हिमशिखरे ओळखीची आहेत."... ज्यावर बर्फ साठू शकत नाही इतका खडा उत्तरकडा (उर्फ आयगरभिंत किंवा आयगरवांड) डावीकडच्या आयगरची ओळख पटवतो, मधला म्योंख, त्याच्या उजवीकडे युंगफ्राउयोखचा घाट आणि उजवीकडे सर्वात उंच युंगफ्राउ... सगळे दिमाखाने चमकत असतात !...


हार्डर कुल्म वरून दिसणारे पर्वतराजीचे विहंगम दृश्य : ०२

मोक्याची जागा पकडून या विशालकाय दादालोकांबरोबर फोटोऑप टाळणे कठीणच नाही का?...


हार्डर कुल्म वरून दिसणारे तीन दादालोक आणि अस्मादिक : ०३

जरा खाली नजर गेली की दोन्ही बाजूंची विस्तीर्ण सरोबरे, मधली ब्योडेलीची पाचूसारखी हिरवीगार सपाटी आणि तिच्यावर सुंदर नक्षी काढल्यासारखी दिसणारी चार टूमदार शहरे नजरेत भरतात... आणि या सगळ्यांत चित्राच्या चौकटीच्या तळाला लुडबुडणारी पण त्यांच्यावर शरदाने केलेल्या रंगवर्षावामुळे अडथळा न वाटणारी वृक्षवल्लरी. काय डोळ्यात साठवावं आणि काय कॅमेर्‍यात बंदिस्त करावं असा संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती ! तरीसुद्धा, मावळत्या दिनकराच्या उरलेल्या काही किरणांच्या कृपेने जे काही करता येईल ते सर्व करण्याची धडपड केली जातेच...


हार्डर कुल्म वरून दिसणारे ब्योडेलीचे विहंगम दृश्य : ०१

.


हार्डर कुल्म वरून दिसणारे ब्योडेलीचे विहंगम दृश्य : ०२

.

रेस्तराँ बंद होण्याच्या वेळेच्या अर्धा एक तास अगोदर स्वागतिकेने शेवटच्या मागणीची (लास्ट ऑर्डर) घोषणा केली आणि रेस्तराँच्या आत न जाता प्रांगणात टाकलेल्या टेबलाची निवड करून मागणी नोंदवली. खाली जाऊन इंटरलाकनमध्ये रेस्तराँ शोधून काढण्यापेक्षा इथेच भरपेट खाण्याची सोय झाल्यामुळे इथे अजून अर्धा-पाऊण तास घालवता येईल हा सुखद विचार यामागे होता !

काही नवीन : आताचा हाती आलेल्या माहितीप्रमाणे हार्डर कुल्म रेस्तराँ २०१५ च्या उन्हाळ्यापासून ६:०० च्या ऐवजी रात्री ९:३० पर्यंत उघडे राहणार आहे. वर जाणारी शेवटची गाडी ८:५५ व खाली येणारी शेवटची गाडी ९:४० ला सुटेल. याचा अर्थ असा की आता पर्यटकांना हार्डर कुल्मवरून ब्योडेलीतल्या आणि सरोवरांच्या सभोवतालच्या गावांच्या दिव्यांची रोषणाई पाहता येईल !

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिथे थांबलेल्या माझ्यासारख्या अनेक पर्यटकांना रेस्तराँच्या कर्मचार्‍यांनी अगदी हाताला धरून गाडीत बसवायचेच ते काय बाकी ठेवले होते !

हार्डर कुल्मच्या उतारावर फ्युनिक्युलरमधून काढलेली काही चित्रे...


हार्डर कुल्मच्या उतारावर ०१ : इंटरलाकन, आरं नदी आणि ब्रिएंझ सरोवर

.


हार्डर कुल्मच्या उतारावर ०२ : इंटरलाकन

.

हार्डर कुल्म रेस्तराँमध्ये मुंबईहून बिझनेस ट्रीपवर आलेल्या एका जोडप्याची ओळख झाली. उरलेल्या वेळात त्यांच्याबरोबर इंटरलाकनची रात्रीची पायी सफर केली. ते शहराबाहेर स्विस निसर्गात बुडालेल्या एका लॉगहाऊसमध्ये तीनचार दिवस राहिले होते. अशी अनेक लॉगहाउसेस आणि घरांमध्ये चालवलेली तीन-चार ते दहा-बारा पाहुण्यांची व्यवस्था असलेली पाहुणाघरे (गेस्टहाउसेस) सर्व स्वित्झर्लंडमध्ये जागोजागी विखुरलेली आहेत. अश्या जागा आकाराने लहान असल्या तरी तेथे पर्यटकांसाठी रहाण्या-खाण्याच्या उत्तम सुखसोई असतात. चारपाच दिवस स्विस ग्रामीण निसर्गात पायी फिरण्यात आणि राजेशाही आळसात घालवायचे असल्यास याच्याइतका उत्तम पर्याय नाही.

तासभर व्यापारी विभागात पायपीट केल्यावर निरोप घेऊन आम्ही आपापल्या हॉटेल्सकडे वळलो. आजचा दिवस तर अपेक्षेपेक्षा जास्त सुरेख गेला. उद्या माऊंट टिटलिस काय नजारे दाखवेल याचा विचार मनात चालू होताच. दिवसभराच्या दगदगीचा आतापर्यंत पत्ता लागला नव्हता, पण, बिछान्याला पाठ लावल्या लावल्या केव्हा डोळा लागला ते कळलेच नाही.

.

(क्रमशः :)

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

तुम्ही पृथ्वीवरच्या स्वर्गात फिरुन आलात! डोळ्याची पारणी फिटली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठैरो, ठैरो, ये तो ट्रेलर था । अजून खूप बाकी आहे ! :)

मधुरा देशपांडे's picture

13 Jul 2015 - 6:06 pm | मधुरा देशपांडे

वाहवाह. क्या बात है.
हार्डर कुल्म लिस्ट मध्ये अ‍ॅड केले आहे. इंटरलाकेनच्या गल्ल्या ओळखीच्या वाटल्या अगदी. आरं नदी पण छानच आहे.
स्विस आवारांतील आणि खिडक्यांतील फुले आणि झाडे याबद्दल ऐकलेली एक कथा अशी घराघरातील गृहिणीच्या गृहकृत्यदक्ष असण्याची ती ओळख आहे. खिडक्यांमधली फुलं जितकी जास्त आणि आकर्षक, तेवढी त्या घरातील गृहिणीचे कौतुक जास्त. :)
त्या बॉलीवुड फिल्म्सच्या लिस्ट साठी धन्यवाद. तिथे वाचुन लक्षात आले की मागच्याच वेळी ज्या गृयेरे चीज फॅक्टरी आणि कॅसलला भेट दिली, तिथेही दोन चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. आता यापुढे आधी गुगलुन बघायला हवे लेख लिहिताना, तेवढाच एक मुद्दा अ‍ॅडवता येईल. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

खिडक्यांमधल्या फुलांच्या कुंड्यावरून स्विस गृहिणींत चढाओढ असते आणि कधीकधी हेवेदावे सुद्धा होतात, इतके त्यांना त्याबद्दल प्रेम असते हे ऐकून आहे ! स्विस घरांना बाहेरून पाहूनसुद्धा यावर विश्वास बसतो.

भारतीय चित्रपट खरे काश्मीर आणि गरिबांचे काश्मीर (म्हणजे पनवेलशेजारचे आपटा) सोडून युरोपमध्ये चित्रीकरण करू लागले. याची परिणती भारतातील सधन पर्यटक मोठ्या संख्येने युरोपकडे आकर्षित होण्यात झाली. बॉलिवूडच्या भारतीय जनमानसावरच्या प्रभावाची खरी जाणीव युरोपियन (सरकारी व खाजगी) पर्यटन संस्थांना सिलसिलामधल्या क्युकेनहोफ मधल्या टुलीपच्या बागेतल्या गाण्याने झाली असे म्हणतात. त्या गाण्याने नेदरलँड हे पूर्वी भारतात फार प्रसिद्ध नसलेले गंतव्यस्थान एकदम प्रकाशात आले आणि त्याचा त्या देशाच्या पर्यटन उद्योगाच्या उत्पन्नावर लक्षणीय परिणाम झाला असे म्हणतात. १९९० पासून झालेल्या अर्थक्रांतीमुळे भारतात निर्माण झालेल्या नवश्रीमंतांच्या गटाला आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रथम नेदरलँड व स्वित्झर्लंड आणि नंतर न्युझीलंड व ऑस्ट्रेलियाने भारतीय चित्रपट व्यवसायाला सोईसवलती देऊन आपल्या देशात चित्रिकरण करण्यासाठी आकर्षित करायला सुरुवात केली. पर्यटन व्यवसायाच्या इतिहासात हा एक महत्वाचा अध्याय आहे. आजही प्रगत देशांतल्या पर्यटकांची संख्या स्थिर राहत असता अथवा कमी होत असताना (मुख्य म्हणजे त्यांचा पर्यटनासाठी केलेला दरवर्ष दरडोई खर्च कमी होत असताना) भारतीय पर्यटकांची संख्या (आणि दरवर्ष दरडोई खर्च) वाढत आहे. आतापर्यंत या सर्व देशांत भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही खास योजना करण्याची मानसिकता आली आहे. उत्तर अमेरिका व ब्रिटनमध्येच नव्हे तर खंडीय युरोपात आणि ऑस्ट्रेलिया-न्युझीलंडमध्ये खास भारतीय रेस्टॉरंट्स शोधायला फारसे श्रम पडत नाहीत हीसुद्धा आपोआप घडून आलेली गोष्ट नाही ! शेवटी पैशाची भाषा खणखणीत असते आणि ती सगळ्या व्यापार्‍यांना जन्मजात अवगत असते ! :)

चीनसुद्धा अश्याच कारणांनी जागतीक पर्यटन क्षेत्रात महत्वाचा देश झालेला आहे. मात्र यासाठी चीनच्या चित्रपटसृष्टीचे काही योगदान आहे की नाही याबाबत मला खात्रीपूर्ण माहिती नाही.

सानिकास्वप्निल's picture

13 Jul 2015 - 8:20 pm | सानिकास्वप्निल

सुंदर छायाचित्रे आणि उत्तम माहितीपूर्ण लेखन.
सफरीचा आनंद घेत आहे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सतिश गावडे's picture

13 Jul 2015 - 8:35 pm | सतिश गावडे

छान माहिती आणि प्रकाशचित्रे.
अशी स्वच्छ आणि टापटीप ठिकाणे पाहिली की तिथे राहणार्या लोकांचा हेवा वाटतो.

अशी स्वच्छ आणि टापटीप ठिकाणे पाहिली की तिथे राहणार्या लोकांचा हेवा वाटतो

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 11:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे आणि सूड : धन्यवाद !

अशी स्वच्छ आणि टापटीप ठिकाणे पाहिली की तिथे राहणार्‍या लोकांचा हेवा वाटतो, हे नि:संशय ! मात्र हे पण लक्षात घेतले पाहिजे की त्या स्वच्छतेच्या आणि टापटीपीच्या मागे तिथल्या नागरिकांची व शासनांची जबाबदारीची तीव्र जाणीव, आश्चर्यकारक अभिमान आणि अथक प्रयत्न आहेत.

रेल्वे प्रवासात एका स्विस सहप्रवाशाशी संभाषण करताना मी त्याच्या देशातल्या सौदर्यदृष्टी, नीटनेटकेपणा आणि स्वच्छतेची तारीफ केली. त्यावर त्याची प्रतिक्रिया विलक्षण होती. जरासा स्वतःवरच नकळत चिड आल्याच्या आविर्भावात तो म्हणाला, "आजकाल पूर्वीसारखी स्वच्छता राहिली नाही. पूर्वी पानगळीच्या मोसमातही रस्त्यांवर झाडांची पडलेली पाने दिसत नसत !"

मी, अर्थातच, निःशब्द !!!

फारच छान लिहिलय.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2015 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा

मस्त मज्जा यायली फोटू आणि म्हाइति वाचताना.

सुरेख फोटो.हा भागहि अप्रतिम.

प्रचेतस's picture

14 Jul 2015 - 4:44 pm | प्रचेतस

प्रचंड सुंदर आहे हा देश.
तुम्ही भटकत असताना वेळेचा सदुपयोगही फार कौशल्याने करुन घेता. एकही ठिकाण सोडत नाही. :)

पैसा's picture

14 Jul 2015 - 6:36 pm | पैसा

एकापेक्षा एक छान फोटो आहेत! खूप छान! असेच जगभर फिरत रहा!

चौकटराजा's picture

14 Jul 2015 - 7:35 pm | चौकटराजा

धागा वाचता वाचता एका फोटोपाशी आलो. " अरे हा फोटो पश्चिमेच्या बाजुने हार्डर क्लूम वरून किंवा त्याच बाजुने कुठून तरी " त्या" तिघांचा काढलेला दिसतोय असे मनात येते न येते तोच पुढे मजकूर वाचला .आपण अतिशय अभ्यासूपणे लिहिता आहात. लय भारी ! गावात भटकून येणे हा आपल्याप्रमाणे माझा ही आवडता प्रवास प्रकार आहे. स्थानिक लोक युरोपात किती रिलेट होतात या बद्द्ल काही कल्पना मलातरी नाही. पण मधुरा यांच्या एका धाग्यात त्या बद्द्ल सकारात्मक असा उल्लेख आलेला आहे. आपली ही ट्रीप ऑकोट्बर पंधरा ते २३० अशा काळातली ( शोल्डर सीझन) मधली होती की काय ? लाल पिवळा धम्मक ऑटम मस्त दिसतोय त्यात ! बाकी १९९० नंतरच्या नवश्रीमंतात मी मोडत नसल्याने अजून युरोपच्या " काळजी" तच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा स्वित्झर्लंडचा अभ्यास भारी आहे ! या सहलीच्या वेळेचा अंदाजही अचूक आहे... ऑक्टोबरचा दुसरा-तिसरा आठवडा !

स्वित्झर्लंडमध्ये शहरांमध्ये आणि पर्यटक ठिकाणांवर, दर माणशी ५०-७५ युरोमध्ये न्याहरी+राहण्यासाठी, जागा सहज मिळतील. स्वच्छता आणि सुरक्षेची काळजी करावी असे ठिकाण स्वित्झर्लंडमध्ये नाही, तेव्हा जागा ठरवताना ती चिंताच नाही. तेव्हा उचला लॅपटॉप आणि करा सुरुवात इथून.

ऑटम ऑस्सम वाटत असेल तर पुढचा भाग जरूर पहा.

मृत्युन्जय's picture

14 Jul 2015 - 7:41 pm | मृत्युन्जय

पुभाप्र .

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

पद्मावति, अत्रुप्त, इशा१२३, प्रचेतस, पैसा आणि मृत्युन्जय : अनेक धन्यवाद !

यशोधरा's picture

14 Jul 2015 - 9:08 pm | यशोधरा

मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2015 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2015 - 1:07 pm | स्वाती दिनेश

इंटरलाकेनच्या गल्ल्या ओळखीच्या वाटल्या अगदी. आरं नदी पण छानच आहे.
मधुराशी बाडिस,

एका स्विस सहप्रवाशाशी संभाषण करताना मी त्याच्या देशातल्या सौदर्यदृष्टी, नीटनेटकेपणा आणि स्वच्छतेची तारीफ केली. त्यावर त्याची प्रतिक्रिया विलक्षण होती. जरासा स्वतःवरच नकळत चिड आल्याच्या आविर्भावात तो म्हणाला, "आजकाल पूर्वीसारखी स्वच्छता राहिली नाही. पूर्वी पानगळीच्या मोसमातही रस्त्यांवर झाडांची पडलेली पाने दिसत नसत !
हेच अगदी आमची बायरिश त्सेंटा आजी, ड्रेस्डेनच्या काळेबाई (फ्राउ श्वार्झ्), माइन्सच्या मार्लिस काकू आणि स्वीस लाउझानचा रोमेन आणि वेवेचा जिऑफ्रीही म्हणतो.
एकंदरीत पूर्वीचं स्वीस्/जर्मनी आता राहिलं नाही असा आविर्भाव दिसतो.. :)
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2015 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

खरं आहे तुमचं. तिथली तरुणाई त्या देशांच्या पूर्वीपासून सिग्नेचर समजल्या जाण्यार्‍या गोष्टींबद्दल बरीच निष्काळजी होत आहे हे नि:संशय.

जुइ's picture

15 Jul 2015 - 11:04 pm | जुइ

इंटरलाकन विषयी नवीन माहिती या भागात समजली.

फारच उपयोगी माहीती. मी या सुट्टीत साधारण त्याच सुमारास जाण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2015 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

जुइ आणि अभय : धन्यवाद !

@ अभय : जरूर जा. सुट्ट्या असल्याने बहुतेक जण जरी उन्हाळ्यात (मे ते जुलै) स्विस सहल करत असले तरी पानगळीच्या मोसमा तली तिथली सफर सर्वात सुंदर असते असा माझा स्वानुभवावर आधारलेला दावा आहे.

तुमच्या स्विस सहलीसाठी शुभेच्छा !

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2015 - 1:58 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच नयनरम्य फोटोज अन वाचकांना भविष्यातील पर्यटनासाठी उपयुक्त ठरू शकेल अशा पद्धतीने लिहिलेली माहिती.

सुजल's picture

21 Sep 2015 - 3:18 am | सुजल

मस्त!