शरदातला स्वित्झर्लंड : ०८ : टिटलिस-एन्गेलबर्ग, देवदूतांचे क्रिडांगण

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
19 Jul 2015 - 10:47 pm

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

इनमिन ४००० वस्तीचे एन्गेलबर्ग गाव किती आधुनिक आणि टापटिपीचे असावे याचा अगोदर अंदाज करणे कठीण होते. पण आता अश्या गोष्टी दिसल्या नसत्या तर मला एक स्विस नागरिक नसूनही चीड आली असती इतपत मनाची तयारी झालेली होती !

.

आल्प्स पर्वतराजीतील टिटलिस हे शिखर आणि त्याचा परिसर एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थल आहे. ३,२३८ मीटर उंचीच्या या शिखराच्या परिसरात अनेक जागतिक स्तरांच्या पर्यटनसेवा असलेली आकर्षणे निर्माण केली गेली आहेत. हे ठिकाण १९०३-०४ च्या हिवाळ्यात पर्यटकांसाठी खुले झाले.

येथे सर्वसाधारण स्की खेळाडूंसाठीही व्यवस्था आहेत. पण, इथले स्की उतार खूप तीव्र असल्याने ते कुशल स्कीपटूंमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. इथल्या अनेक कठीण हिमवाटा धाडसी हायकर्सच्या खास आवडीच्या आहेत.

टिटलिसचे रौर्द्र आणि आश्चर्यकारक सौंदर्य मुख्यतः डोळ्याने आणि कॅमेऱ्याने टिपण्यात खूश होणाऱ्या आपल्यासारख्या बाकी पर्यटकांना तो आनंद उबदार वातावरणात आरामशीरपणे घेता यावा यासाठीही सज्जड व्यवस्था आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षभर तेथे जगभरच्या पर्यटकांची रहदारी चालू असते.

एक हजार मीटरपेक्षा किंचित जास्त उंचीवरचे हे एन्गेलबर्ग जेमतेम ४,००० लोकवस्तीचे गाव टिटलिसच्या सर्व परिसरातल्या आकर्षणांचे केंद्रबिंदू आहे. १९६७ मध्ये लुत्सर्न या मोठ्या स्विस शहराला रुंद रस्त्याने आणि रेल्वेने जोडले गेल्यावर तेथे जाणे येणे सुलभ झाल्यामुळे ते गाव आणि तेथील पर्यटनव्यवसाय दिवसेंदिवस बहरला आहे. जागतिक स्तराच्या सोयीसवलती असल्यामुळे पर्यटनाइतकेच ते व्यावसायिक सभासंमेलनांचे (प्रोफेशनल कॉन्फ़रन्सेसचे) केंद्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे. अप्रतिम सौंदर्यामुळे या जागेची जाहिरात "टिटलिस-एन्गेलबर्ग, देवदूतांचे क्रीडांगण" (MOUNT TITLIS, ENGELBERG, where Angels come to play) अशी केली जाते ! विशेषतः हिवाळ्यात सुंदर रंगीबेरंगी शैलीदार स्की परिधानाने* पेहरलेले स्त्रीपुरुष जेव्हा टिटलिसच्या तीव्र उतारावरून लांबच लांब स्की जंप्स मारत जवळ जवळ उडत जाताना बघताना ते वाक्य मनोमन पटून जाते !...

 ......
एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०१ व ०२

.


एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०३

.


एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०४

.


एन्गेलबर्ग-टिटलिस : देवदूतांचे क्रीडांगण ०५

(वरील पाच चित्रे जालावरून साभार)
(* : Helmets, Boots, Jackets, Pants, Goggles, Hats, Gloves, and of course Hi-tech skies... आणि या सगळ्या गोष्टी भडक पण एकमेकाला पूरक आणि आकर्षक रंगाच्या असतात हे सांगायला नकोच !)

या ठिकाणी असलेल्या पर्यटन आकर्षणांची यादी विश्वास बसायला कठीण जाईल इतकी मोठी आहे. पण तेथे जाताना इच्छुकांना वेळेचे नियोजन करायला सोपे जावे म्हणून ती खाली देत आहे (एन्गेलबर्गच्या अधिकृत संस्थळावरून साभार) :

१. वर्षभर उपलब्ध असणारी आकर्षणे :
Indoor and outdoor pool
Ice Sports
Horse-drawn carriage rides
High rope park
Climbing wall
Paragliding
TITLIS Cliff Walk
TITLIS Ice Flyer
TITLIS Glacier Cave
TITLIS Glacier Park
TITLIS Chocolate Shop
Nordic Walking Trails

२. मुख्यतः उन्हाळ्यात उपलब्ध असणारी आकर्षणे :
Hiking
Bike & E-Bike/Hikes
Climbing
Via Ferrata
Picnic areas
Kayaking & Rowing
Fishing
Toboggan run
Golf
Whey Bath
Vitap Parcours
Wildlife watching

३. मुख्यतः हिवाळ्यात उपलब्ध असणारी आकर्षणे :
Ski & Snowboard
Winterhiking
Snowshoeing
Ski tours
Cross Country Skiing
Sledding
Airboarding
Igloo Village
snowXpark
Rope Park
Ski & Snowboardschool

थोडक्यात, एन्गेलबर्ग-टिटलिस हा परिसर सर्व वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले एक मोठे खेळांचे मैदान आहे !

.

एन्गेलबर्ग (देवदूतांचे गाव) ते क्लाईन टिटलिस (छोटा टिटलिस) प्रवास

टिटलिसच्या मुख्य शिखरावर (३,२३८ मीटर) फक्त धाडसी गिर्यारोहकांनाच चढाई करता येते. मात्र त्यापेक्षा जरा खालच्या स्तरावर (३,०२८ मीटर) असलेल्या छोटा टिटलिस या शिखरापर्यंत अगदी शारीरिक समस्या असलेले लोकही जाऊ शकतील अशी वाहतूक व्यवस्था आहे. एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस हा तीन टप्प्यांत केला जाणारा प्रवास एक अनपेक्षित आणि संस्मरणीय पर्यटक आकर्षण आहे !

पहिला टप्प्यात फ्युनिक्युलर किंवा रज्जूमार्ग आपल्याला १,२६२ मीटर उंचीवरील गेर्शनीआल्प येथे घेऊन जाते.

प्रवास सुरू झाला की सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेते ते टूमदार एन्गेल्बर्गचे मनोहारी विहंगम दर्शन...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०१ : एन्गेलबर्गचे विहंगम दृश्य

थोड्याच वेळात रज्जूमार्ग उंचच उंच सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात शिरतो. हे वृक्ष आपले हिरवेपण जपून असले तरी त्यांच्यात मध्ये मध्ये असलेल्या अनेक लहानमोठ्या वृक्षांवर शरदाने उधळलेल्या रंगाची उधळण आपल्याला दिसत राहते. मुख्य म्हणजे आता आपण ते रंग दूरवरून अथवा जमिनीवरून न बघता त्या झाडांच्या उंचीवरून अथवा त्यांच्यापेक्षा जात उंचीवरून आणि अगदी काही हाताच्या अंतरावरून बघत असतो...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०२ : मनोहारी जंगलातून वाटचाल

गेर्शनीआल्प येथे पहिला थांबा घेऊन आपण वाहन बदलून रज्जूमार्गानेच पुढचे मार्गक्रमण सुरू करतो. आता इतर रंग नाहीसे होऊन आजूबाजूला फक्त हिरवे सूचिपर्ण वृक्ष आणि नजरेच्या टप्पा पोचेपर्यंत दिसणारी हिरवळ दिसू लागते. त्यांच्या पार्श्वभूमीवर शरदात बर्फ नसल्याने उघडेबोडके झालेले पर्वत दिसू लागतात. या सर्वांच्यामध्ये तरंगत असलेले धुके त्या निसर्गचित्राची गूढगंभिरता अजूनच वाढवत असते...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०३

जसजशी उंची वाढू लागते तसे धुक्याचे प्रमाण वाढू लागते. मध्येच रज्जूमार्ग खाली उतरत काही काळ हिरव्यागार गवताळ पठारावरून जातो आणि परत दुसरा चढ चढू लागतो...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०४

धुक्यातून काही काळ वर वर गेल्यावर एकाएकी आपल्या ध्यानात येते की ज्याला आपण घुके म्हणत होतो ते आप्ल्सच्या शिखरांना वेढणारे ढग होते आणि आता आपण ढगांच्या वरच्या स्तरावर पोहोचलो आहोत. ढग नसल्याने आता आजूबाजूला लखलखीत सूर्यप्रकाश आहे...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०५

ढगांच्या वरून विमानातून अनेकदा प्रवास केला असला तरी ढगांच्या वरून आणि उघड्याबोडक्या पर्वतशिखरांमधून छोट्याश्या वाहनात बसून तरंगत जातानाची मजा काही और असते...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०६

थोड्या वेळाने ट्र्युबसे (१,७९६ मीटर) येथील थांबा येतो. येथून वर जाताना एका बाजूला ट्र्युबसे सरोवराचे मनोहर दर्शन होते. या सरोवराच्या नावावरूनच या जागेचे नाव पडले आहे...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०७ : ट्र्युबसे सरोवर

रज्जूमार्गाचा पुढचा थांबा स्टान्ड (२,४२८ मीटर) येथे आहे. इथे पोचेपर्यंतची आपली सफर अगोदर माहीत झालेल्या वाहनांनी होत असल्याने आणि आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्य पाहण्यात गुंतलेले असल्याने, त्या वाहनांचे आपल्याला फारसे कौतुक वाटलेले नसते. मात्र, स्टान्ड ते क्लाईन टिटलिस या प्रवासात आपण ज्या वाहनात बसतो ते आपल्याला एक आश्चर्याचा धक्का देऊन जातेच. या वाहनाचे नाव आहे, रोटएअर (Rotair). हे एक उडत्या तबकडीसारखे गोलाकार आकाराचे पण रज्जूमार्गावरून जाणारे वाहन (गोंडोला) आहे. याचा विशेष हा की ते सर्व प्रवासभर वर वर जात असतानाच स्वतःभोवती ३६० अंशात फिरत असते. त्यामुळे त्याच्या काचेच्या भिंतीजवळची जागा पकडून उभे राहिले तर क्लाईन टिटलिसला पोहोचेपर्यंत आजूबाजूचा ३६० अंशातला सर्व रमणीय परिसर आपल्याला एकाच जागेवर उभे राहून तीन-चार वेळा बघता येतो... यामुळे, इतर वाहनांप्रमाणे "दुसर्‍या बाजूला कोणते सुंदर दृश्य दिसत असेल बरे ?" असा विचार करत ते पाहण्यासाठी मान वाक-वाकवून निष्फळ प्रयत्न करत निराश व्हावे लागत नाही ! ही जगातील पहिली रोटएअर प्रणाली आहे. नंतर अर्थातच इतर काही ठिकाणी ती वापरली गेली आहे...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०८ : रोटएअर (जालावरून साभार)

स्वतःभोवती फिरणारे रेस्तराँ अनुभवले होते पण अडीच ते तीन हजार मीटर उंचीच्या प्रवासातला हा "उभे राहून घेतलेला फिरता अनुभव" एक वेगळाच आनंद देऊन गेला... तो जेवढा टिटलिस परिसराचा सर्व नजारा बघता आला यामुळे होता तेवढाच त्या "फिरत्या तबकडी"त बसल्यामुळे होता !

हा प्रवास करताना कधी क्लाईन टिटलिसवरून खाली येणारी टिटलिस हिमनदी दिसते...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ०९ : रोटएअर मधून दिसणारी टिटलिस हिमनदी

तर कधी उताराच्या खालच्या बाजूला असलेल्या पांढर्‍याशुभ्र ढगांच्या दुग्धसागरात मधून मधून डोके वर काढणारी पर्वतशिखरे आणि एका खड्या कड्याच्या टोकावर असलेले नितळ निळ्या पाण्याचे ट्र्युबसे सरोवर दिसते...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : १० : रोटएअर मधून दिसणारे ट्र्युबसे सरोवर

तर कधी आपल्या इतकीच किंवा किंचित जास्त उंची असलेली हिमशिखरे सूर्यप्रकाशात चमकत आपले स्वागत करत असतात...


एन्गेलबर्ग ते क्लाईन टिटलिस : ११

.

देवदूतांच्या क्रीडांगणाचे आणि त्यातल्या प्रवासामार्गांचे रेखाचित्र ...


देवदूतांचे क्रीडांगणाचे आणि त्यातल्या प्रवासामार्गांचे रेखाचित्र (जालावरून साभार)

हे चित्र मोठ्या आकारात पाहायचे असल्यास खालील दुव्यावर टिचकी मारा...

http://www.pistenplan.info/images/engelberg-titlis-pistenplan.jpg

.

क्लाईन टिटलिस

रोटएअरमधून आपण नाईलाजानेच उतरतो. या प्रवासाच्या अनोख्या अनुभवानंतर आपण जरासे हवेत तरंगतच असतो ! रेस्तराँ, आठवणवस्तूंची दुकाने आणि पर्यटकांसाठीच्या इतर सुविधा असलेली इमारत क्लाईन टिटलिसला आपले स्वागत करते. थोडासा दम घेत, कॉफी आणि काही खाद्यपदार्थ यांची रसद पोटात जमा करून, आपण टिटलिसवर स्वारी करायला ताजेतवाने होतो.

इमारतीच्या बाहेर पाय टाकल्या टाकल्या आपण टिटलिस हिमनदी नावाच्या हिमसागरावर अवतरतो. आपल्यासारखे नवशे (स्विस पर्यटन ज्याला पांढरे सोने म्हणते त्या) चारी बाजूला पसरलेल्या भुसभुशीत पांढर्‍याशुभ्र नवलाईवर बराच वेळ फुदकत बसतात...


क्लाईन टिटलिस : ०१ :

सोबतीला दूरवरून सूर्यकिरणांत पांढरे शुभ्र दात चमकावत आपल्या आनंदात सामील होणारी व तो अधिकच वाढवणारी हिमशिखरे आणि खोल दर्‍या असतातच...


क्लाईन टिटलिस : ०२ :

.


क्लाईन टिटलिस : ०३ :

.


क्लाईन टिटलिस : ०४ :
.

बराच वेळ बर्फात उड्या मारून, भटकत, आसमंत न्याहाळून झाला तरी मन भरत नाही. पण इथे आपण रहायला आलेलो नाही आणि अजून काही आकर्षणे पाहायची बाकी आहेत ही जाणीव होऊन आपण आपल्या आवडीच्या पुढच्या आकर्षणाची निवड करू लागतो. आपल्या बरोबर रोटएअरमधून आलेले बर्फातले पट्टीचे खेळाडू आणि इथे नेहमीच येणारे पर्यटक आईसफ्लायर पकडून त्यांच्या आवडीच्या बर्फावरच्या खेळांसाठी (स्किइंग, स्केटिंग, आईस बोर्डिंग, हायकिंग, ग्लेशियर पार्क, इ) केव्हाच पुढे गेलेले असतात. आपणही त्या खेळांसाठी नाही तर केवळ खोल दर्‍यांवरून व हिमनद्यांवरून भरारी घेण्याच्या अनवट अनुभवासाठी उघड्या आईसफ्लायर मधून फेरी मारू शकतो...


क्लाईन टिटलिस : ०५ : आईसफ्लायर (जालावरून साभार)

किंवा हिमझोपडीत थांबून हिमक्रिडा करा न करा मस्त गरम कॉफी (किंवा चिल्ड बियर) चा आस्वाद घेत एखाद्या खास स्विस पदार्थाची चव घेत इतरांना बर्फावर बागडताना पाहू शकतो...


क्लाईन टिटलिस : ०६ : हिमझोपडी (जालावरून साभार)

किंवा आधुनिक इग्लूला भेट देऊ शकतो...


क्लाईन टिटलिस : ०७ : इग्लू (जालावरून साभार)

२०१२ मध्ये इथे एक TITLIS Cliff Walk नावाचा दोन उपशिखरांना जोडणारा १०० मीटर लांब आणि एक मीटर रुंद तरंगता पूल बांधला आहे. हा युरोपमधला सर्वात जास्त उंची असलेला तरंगता पूल आहे. खालच्या दरीतल्या हिमनदीच्या ५०० मीटर वरून या अरुंद पुलावरून चालणे नक्कीच चित्त्ताकर्षक असणार. माझी फेरी त्याअगोदर झाल्याने मला हा आनंद अनुभवता आला नाही. पण, वाचकांच्या माहितीसाठी त्याचा उल्लेख केला आहे...


क्लाईन टिटलिस : ०७ : टिटलिस क्लिफ् वॉक (जालावरून साभार)

इथला वेळ कसा भर्रकन् उडून गेला हे कळतच नाही. इथे परत यायला मिळाले तर येथे दोनतीन दिवस तरी रहायचे असे आपण मनोमन ठरवतो आणि रोटएअरच्या थांब्याकडे जड पावलांनी परतू लागतो.

एन्गेलबर्गच्या दिशेने परतीचा प्रवास त्याच मार्गाने होत असला तरी आता बर्‍याच वर आलेल्या सूर्यमहाराजांनी आपले डोळे वटारल्यामुळे बरेचसे धुके पळून गेलेले होते आणि शुभ्र सोन्याच्या सागराचा बराच मोठा परिसर दृष्टीच्या आवाक्यात येत होता. थोड्या वेळातच शुभ्रसागराची जागा हरितसागराने घेतली...


क्लाईन टिटलिसहून परतताना : ०१ : हरितसागर

जसजसे एन्गेलबर्ग जवळ येऊ लागते तसे सकाळच्या धुक्यात नीट न दिसलेले शरदाचे रंगकाम अधिकाधिक स्पष्टपणे दिसायला सुरुवात झाली...


क्लाईन टिटलिसहून परतताना : ०२ : एन्गेलबर्ग

.

टिटलिसवर ठरल्यापेक्षा जास्त वेळ रमल्यामुळे एन्गेलबर्गहून लुत्सर्नला जाणारी गाडी निघून गेली होती. मात्र पुढच्या दोन गाड्यांचे वेळापत्रक आणि स्विसपास खिशात असल्याने स्टेशनच्या दिशेने जाताना चिंतेने आतापर्यंतच्या मजेला अजिबात धक्का लावला नव्हता ! जय स्विस पर्यटन !!

कधी डोंगदर्‍यांतल्या जंगलांतून तर कधी सरोवराच्या काठावरून रम्य परिसरातून आमची गाडी लुत्सर्नच्या दिशेने निघाली...


एन्गेलबर्ग ते लुत्सर्न : ०१

.


एन्गेलबर्ग ते लुत्सर्न : ०२

मध्येच एका हिरवळीवर आरामात चरणारे हे स्विस मानबिंदू दिसले...


एन्गेलबर्ग ते लुत्सर्न : ०३

.

गाडीने वेग पकडला आणि आठव्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक मोठे स्विस शहर, लुत्सर्न, कसे असेल असा विचार सुरू झाला होता.

.

(क्रमशः :)

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2015 - 5:28 am | श्रीरंग_जोशी

काय ते ठिकाण, काय ते फोटोज, काय ते वर्णन.

केवळ अप्रतिम.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2015 - 10:36 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू रंगाण्णा!

माहितिनी धागा सजे सारखा,फ़ोटोतुन प्रतिबिंब पडे
फ़ोटुच फोटू चहुकडे नी मी म्हैती वाचु कुणीकडे

वेल्लाभट's picture

20 Jul 2015 - 11:22 am | वेल्लाभट

वा वा काय जमलंय ! सहीच

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2015 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी, अत्रुप्त आणि वेल्लाभट : धन्यवाद !

@ अत्रुप्त : कविता लै झ्याक !

चौकटराजा's picture

20 Jul 2015 - 8:21 am | चौकटराजा

स्वर्ग इथे आहे इथे आहे इथे आहे !' असे वर्णन करावे असा हा भाग आहे. मस्त !

प्रचेतस's picture

20 Jul 2015 - 9:19 am | प्रचेतस

अफाट सुंदर आहे.
अक्षरशः स्वर्गच.

खेडूत's picture

20 Jul 2015 - 9:59 am | खेडूत

अफाट सृष्टीसौंदर्य !

तीन वर्षापूर्वी ही सहल केली होती त्या आठवणी जाग्या झाल्या !

आजवर पाहिलेले सर्वोत्तम ठिकाण म्हणून मनात नोंदवले गेले आहे .

उदय के'सागर's picture

21 Jul 2015 - 10:07 am | उदय के'सागर

+१
"अफाट सृष्टीसौंदर्य"

वेल्लाभट's picture

20 Jul 2015 - 11:23 am | वेल्लाभट

पुनर्प्रचीती ! स्वित्झर्लँड हा स्वर्गतुल्य आणि प्रेमात पाडणारा देश आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2015 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा, प्रचेतस, खेडूत आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद !

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2015 - 11:22 pm | स्वाती दिनेश

तो झुलता पूल आणि ओपन आइसफ्लायर अतिशय आवडता..
लेख आणि फोटो छानच!
स्वाती

आल्प्स ची शीखरं, ढगांचा कापुस , बर्फाचा मुकुट आणि ते निळेशार सरोवर.....तुम्ही दिलेलं नाव सार्थ करतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2015 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

देवदूतांचे क्रिडांगण हे मी दिलेले नाव नाही. "MOUNT TITLIS, ENGELBERG, where Angels come to play" हे त्या भागाचे ब्रिद्वाक्य आहे !

आत्ता लक्षात आले. धन्यवाद.

Mrunalini's picture

21 Jul 2015 - 2:50 pm | Mrunalini

वाव... अप्रतिम फोटो. लेखही छान .

इशा१२३'s picture

21 Jul 2015 - 2:59 pm | इशा१२३

निव्वळ अप्रतिम.सुंदर फोटो.
आठवणी जाग्या झाल्या.फार आवडलेले ठिकाण आहे हे.स्वर्गीय वातावरण होते तिथे.
परत जावेच लागेल.

झकास वर्णन आणि माहिती.. टिटलिस म्हणून वर्णन करण्यात आलेली जागा म्हणजे प्रत्यक्षात "छोटा टिटलिस" आहे हे नव्याने कळलं.

एखाद्या ठिकाणी अक्षरशः मन मागे सोडून येणं आणि फक्त देहाने पुन्हा परत येणं याचं उदाहरण असलेल्या ठिकाणांपैकी एन्गेलबर्ग / एन्जेलबर्ग आहे. स्वित्झर्लंड / ऑस्ट्रिया / जर्मनी या पट्ट्यातली लहान गावं एकाहून एक सुंदर आहेत.

सर्वकाही इतकं उत्कृष्ट स्वच्छ इ इ कसं आणि आपल्याकडे असं पर्यटनपूरक काही का केलं जात नाही असं वाटून खिन्न होईहोईतो टिटलिसवरच्या त्या टुरिस्ट कॉम्प्लेक्सच्या भिंती अन छताच्या लाकडी फळ्यांवर प्रेमिक जोड्यांनी वासू-सपना फॅशनमधे आपापली नावं बदामबाणादि चिन्हांसहित रेखाटलेली पाहून शांत वाटलं.. ;)

त्याचप्रमाणे तिथे बर्फात मेलेले डास सापडले तेव्हा "छ्या, इथेही डास असतातच" असं स्वतःला समजावलं. छिद्रान्वेषीपणामुळे अशा ठिकाणाहून बाहेर पडणं सोपं जाईल असं वाटलं होतं..

एन्गेलबर्गला नेमकं बर्फाळ वादळही झालेलं पाहिलं. एका रात्रीत घरांच्या बाल्कन्या, कार्स, रेल्वेमार्ग वगैरे सर्व उंच बर्फाच्या थरात गाडलं गेलेलं पाहिलं. अशावेळी ट्रेन कशी चालवत असतील कोण जाणे. शिवाय कार्सवर आणि घरातून बाहेर पडण्याच्या रस्त्यांवर इतका जड बर्फाचा थर होता की कोणाला नेमकं कारने बाहेर जायचं असेल तर पीडाच होत असणार.

भारतात असली पीडा नाही. वा....!!! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2015 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला डास !!!??? आश्चर्य आहे !

छताच्या लाकडी फळ्यांवर प्रेमिक जोड्यांनी वासू-सपना फॅशनमधे आपापली नावं बदामबाणादि चिन्हांसहित रेखाटलेली पाहून शांत वाटलं.छताच्या लाकडी फळ्यांवर प्रेमिक जोड्यांनी वासू-सपना फॅशनमधे आपापली नावं बदामबाणादि चिन्हांसहित रेखाटलेली पाहून शांत वाटलं. हे मात्र पिलाटस कुल्मला बधितलं आहे :)

स्विस बर्फाचे व्यवस्थापन उच्च प्रतिचे आहे. हिवाळ्यातला स्वित्सर्लंड चाळलात तर अनेक वर्षातल्या मोठ्या बर्फाच्या वादळातही सेंट मॉरिट्झ सारख्या हिवाळी पर्यटन स्थानावरचे रस्ते सकाळी सहाला उत्तम अवस्थेत केलेले होते आणि आमची ग्लेशियर एक्सप्रेस एक मिनीट इकडे-तिकडे न होता सगळे आठ तासांचे अंतर मजेत कापत गेली !

नॉर्वेनेही असेच चकीत केले होते. भर हिवाळ्यात जमिनीवर मीटर-दोन मीटर बर्फ साठलेले असताना रस्ते आणि विमानतळ जणू आदर्श हवामान असल्यासारखे चालू होते !

सानिकास्वप्निल's picture

21 Jul 2015 - 4:09 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम!! टिटलिस सर्वात आवडते ठिकाण. आत्तापर्यंत ३-४ वेळा टिटलिसवारी झालीये आणि दरवेळेस नव्याने प्रेमात पडायला होतं. रोटएअर, आईसफ्लायर, बर्फातले खेळ सगळी मजा अनुभवताना मस्तं मस्तं वाटतं.

तुम्ही खूप छान वर्णन केले आहे, हा भाग विशेष आवडला, फोटो क्लासचं :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2015 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वाती दिनेश, पद्मावति, Mrunalini, इशा१२३, गवि आणि सानिकास्वप्निल : अनेक धन्यवाद !

पुण्याचे वटवाघूळ's picture

22 Jul 2015 - 4:00 pm | पुण्याचे वटवाघूळ

मस्त.

टिटलीस आणि पिलॅटस ही दोन ठिकाणे कधीतरी नक्कीच बघायची आहेत. आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2015 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

नक्की पहा ! दोन्हीही ठिकाणे अप्रतिम आहेत. या सहलीतही आपण लवकरच 'पिलाटस कुल्म'लाही भेट देणार आहोत :)

जुइ's picture

22 Jul 2015 - 7:16 pm | जुइ

अगदी घरबसल्या टिटलीसची सफर करून आणलीत. फोटो आणि माहिती दोन्ही आवडले.

द-बाहुबली's picture

22 Jul 2015 - 7:29 pm | द-बाहुबली

कितीतरी फोटो बघताना मनात फक्त यशराज गाणी रेंगाळु लागतात...

कट्टापा's picture

3 Jan 2016 - 3:36 pm | कट्टापा

अप्रतिम फोटो आणी वर्णन !