शरदातला स्वित्झर्लंड : ०७ : नंदनवनातला प्रवास

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
16 Jul 2015 - 2:30 pm

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

तासभर व्यापारी विभागात पायपीट केल्यावर निरोप घेऊन आम्ही आपापल्या हॉटेल्सकडे वळलो. आजचा दिवस तर अपेक्षेपेक्षा जास्त सुरेख गेला. उद्या माऊंट टिटलिस काय नजारे दाखवेल याचा विचार मनात चालू होताच. दिवसभराच्या दगदगीचा आतापर्यंत पत्ता लागला नव्हता, पण, बिछान्याला पाठ लावल्या लावल्या केव्हा डोळा लागला ते कळलेच नाही.

दुसर्‍या दिवसाच्या सकाळी न्याहारी करून पावणेसात वाजता हॉटेलच्या बाहेर पडलो. इंटरलाकन इस्ट स्टेशन पायी चालत पाच मिनिटावर असल्याने वेळेच्या आधी पोचलो. गाडी सकाळी लवकराची असल्याने फारशी गर्दी नसेल हा अंदाज बरोबर निघाला आणि खिडकीशेजारची मोक्याची जागा पकडायला काही प्रयास पडले नाहीत. आजच्या गंतव्याच्या पहिल्या प्रवासाचा मार्ग इंटरलाकन-हेर्गिसविल-एन्गेलबर्ग असा होता. या अडीच तासाच्या रेल्वेप्रवासानंतर टिटलिसवर काय बघायला मिळेल याच विचारात असतानाच जो परिसर सुरू झाला त्यातल्या प्रवासाचा अनुभव माझ्या सर्वोत्तम अविस्मरणीय अनुभवांपैकी एक होता.

जसजसे ढगांचे आणि धुक्याचे आवरण कमी होऊ लागले आणि सूर्यप्रकाशात परिसर उजळू लागला तसतशी रेल्वेच्या सकाळच्या प्रवासात डोळ्यावर सहजपणे येणारी गुंगी खाडकन उतरली. आणि जसजसा सूर्य वर चढत गेला तसतशी त्या प्रवासाची रंगत वाढतच गेली.

सुरुवात उंच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्या खेड्याने झाली. डोंगराच्या उतारावर असलेल्या दाट झाडीला, ती बर्‍यापैकी धुक्यात गुरफटलेली असूनही, शरदाने बहाल केलेल्या नव्या रंगीबेरंगी वस्त्रांचा दिमाख दाखवायचा मोह आवरत नव्हता हे जाणवत होते. जरा जास्त प्रकाश असता तर काय बहारदार दृश्य दिसले असते असा विचार मनात येऊन मन थोडेसे खट्टू झालेच...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०१

जरा पुढे एक बर्‍यापैकी उच्चभ्रू वाटणारे गाव दिसले. अनेक दिमाखदार बहुमजली इमारती आणि त्यांची वृक्षवेलींनी सजलेली हिरवीगार आखीवरेखीव आवारे गावाच्या सधनतेची साक्ष देत होती. दूरवर दिसणारे भलेमोठे आणि उंच शिखराचे चर्च या साक्षीत भरच घालत होते. इथेही, दूरवर गावात असलेली आणि त्याच्या पलीकडच्या टेकडीवरच्या काही झाडांनी आपले जुने कपडे बदलून शरदाचा पेहराव घातला आहे असा दाट संशय येत होता. पण, धुक्याने आपला पडदा कायम ठेवून चिडविण्याचा हट्ट चालूच ठेवला होता...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०२

.

काही वेळाने गाडीचा मार्ग चिचोळ्या दरीमधून जाऊ लागला आणि आता जास्त जवळ असलेल्या विरुद्ध बाजूच्या पर्वतावर शरदाने केलेली जादू अधिकाधिक स्पष्ट दिसू लागली...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०३

.


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०४

.


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०५

.

इथल्या जंगलांत असलेल्या वृक्षवैविध्यामुळे इतर ठिकाणी सहसा दिसत नाहीत इतके रंग एकाच वेळेस नजरेच्या एकाच आवाक्यात येत होते. अजूनही पूर्णपणे न संपलेल्या हिरव्या रंगाच्या अनेक छटांबरोबरच पिवळ्या-नारिंगी-तपकिरी-किरमिजी-तांबड्या रंगांच्या अनंत छटांची जंगलांवर पखरण झालेली दिसत होती. त्यामुळे इतर बर्‍याच ठिकाणी पानगळीच्या मोसमात दिसणारा एकाद-दुसर्‍या रंगछटेचा तोचतोपणा इथे नव्हता किंवा भडक तांबड्या रंगाचा आग ओकणारा धक्कादायकपणाही नव्हता... होती ती केवळ एकातून दुसर्‍यात सहजपणे मिसळत जाणार्‍या असंख्य रंगछटांची डोळ्यांना आल्हाद देणारी नक्षी. "पुढच्या झाडीत कोणत्या रंगछटा दिसतील ?" हा प्रश्न सतत मनातली उत्सुकता वाढवीत राहिला... पुढची प्रत्येक झाडी रंगांच्या वेगळ्या छटा आणि रचना दाखवून रसिकांची निराशा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत राहिली !...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०६

जसजसा प्रवास पुढे पुढे जात होता तसतसे जंगल आणि वस्ती यांच्यातला दुरावा कमी होत गेला आणि जंगले गावांत शिरली होती की लोकांनी जंगलात गावे वसवली हे सांगणे कठीण होत गेले...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०७

.


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०८

.

मधूनच गाडी एखाद्या दरीतून एका बाजूच्या कड्यावरून जात असताना विरुद्ध दिशेच्या पर्वताचे रौर्द्र दर्शन होत होते. आता विरळ झालेल्या धुक्यातून समोरच्या पर्वतपायथ्यावर असलेल्या जंगलाचे मोहक रंग अंधुक का होईना पण दिसत होते. जर लखलखीत सूर्यप्रकाश असता तर काय मजा आली असती असे वारंवार वाटत होते...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ०९

.


एन्गेलबर्गच्या दिशेने : १०

.

सूर्यदेवाला आतापर्यंत आमची जराशी दया आली असावी. प्रवासाच्या शेवटच्या अर्ध्या तासात त्याने आपले मुखकमल ढगांच्या आडून बाहेर काढून डोळे किलकिले करून आमच्याकडे बघितले. त्याची तेवढीशी कृपादृष्टीही शरदाच्या खजिन्यातले अनेक नजराणे दाखवून गेली...


एन्गेलबर्गच्या दिशेने : ११

.


एन्गेलबर्गच्या दिशेने : १२

.


एन्गेलबर्गच्या दिशेने : १३

.

गाडी एन्गेलबर्गला पोहोचली आणि जो प्रवास केवळ एका जगप्रसिद्ध गंतव्याकडे जाण्यासाठी म्हणूनच केला होता तो इतक्या लवकर संपला याची खंत वाटली ! अनपेक्षितपणे आलेला हा अनुभव इतका सुंदर होता की... केवळ जिवंतपणी केलेली नंदनवनातली सहल ! टिटलिस पर्वतावर जाण्याचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी जवळच असलेल्या रज्जूरेल्वेमार्गाकडे (फ्युनिक्युलरकडे) जराश्या जड पावलांनीच निघालो.

इनमिन ४००० वस्तीचे एन्गेलबर्ग गाव किती आधुनिक आणि टापटिपीचे असावे याचा अगोदर अंदाज करणे कठीण होते. पण आता अश्या गोष्टी दिसल्या नसत्या तर मला एक स्विस नागरिक नसूनही चीड आली असती इतपत मनाची तयारी झालेली होती !

.

(क्रमशः :)

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2015 - 2:38 pm | स्वाती दिनेश

एंगेलबर्ग ही शब्दशः यक्षपुरी आहे.. आणि टिटलिस तिचा परमोच्च बिंदू.. कितीदा गेले असेन.. पण अजूनही मन भरलं असं वाटत नाही.. मे महिन्यात गेलं तर मात्र टूरिस्टांचा सुळसुळाट असतो.त्या पायथ्याशी.. गुरमेट इंडियाच्या गाडीवर मसाला टी, समोसा,वडापाव खाणारे होते का शरदातही? :)
ऑटममध्ये टिटलिसची शोभा काही औरच..
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2015 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

"एंगेलबर्ग"चा अर्थच देवदूतांचे गाव असा होतो ! त्याची जाहीरात "The place where angels come to play !" अशी केली जाते. हा सर्व परिसरच इतका सुंदर आहे की त्या जाहिरातीवर विश्वास बसावा !

वेळेच्या अभावामुळे एंगेलबर्गमध्ये रहावे अशी इच्छा असूनही जमले नाही, त्यामुळे समोसा-वडापाववाल्यांशी सामना झाला नाही. पण सहलीत १२-१५ जणांच्या गुजराती सहप्रवाश्यांच्या जथ्याशी ओळख झाली !

सानिकास्वप्निल's picture

18 Jul 2015 - 7:19 pm | सानिकास्वप्निल

१०० % सहमत.
टिटलिसला जाताना ऱोटेअरमधून दिसणारी Eugenisee नदी, नीळंशार पाणी, हिरवळ, टुमदार घरं, मोहक सौंदर्य.
गॉरमे इंडियाच्या गाडीवर मिळणारी पाव-भाजी, गाजर-हलवा, इडली-चटणी पण गं ;)

सानिकास्वप्निल's picture

18 Jul 2015 - 7:20 pm | सानिकास्वप्निल

सर्व फोटो सुंदर आहेत, मस्तं लिहिला हा ही भाग :)

पाटील हो's picture

16 Jul 2015 - 4:05 pm | पाटील हो

जाकास ....

खटपट्या's picture

16 Jul 2015 - 4:17 pm | खटपट्या

सर्व फोटो स्वप्नवत आहेत.
आता वाचतोय..

अजया's picture

16 Jul 2015 - 4:27 pm | अजया

अप्रतिम सुंदर नजारा!

प्रचेतस's picture

17 Jul 2015 - 9:22 am | प्रचेतस

खरोखरच नंदनवन.
फोटोंतील घरे अगदी जुनाट पद्धतीची आणि हिम-पावसापासून संरक्षण देण्याच्या पद्धतीने बांधल्यासारखी वाटतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2015 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याचश्या लहान गावांतली घरे आग्रहाने पारंपारीक पद्धतीची असतात. गावांतल्या बर्‍याचश्या नविन इमारतीही लाकडी असतात. फक्त मोठ्या गावातल्या आणि शहरांतल्या नविन इमारती सिमेटच्या असतात. आतमध्ये मात्र सर्व आधुनिक सुखसोयी असतात.

चौकटराजा's picture

17 Jul 2015 - 9:40 am | चौकटराजा

ऐसाच ऑटम आपुनकू देकनेका हय ! मतलब ऑक्टो १५ २०१६ हा म्हऊर्त लागणार का काय आम्हाला ! असो. खरोखरच
पेटलेल्या ( हा शब्द माझ्या आतेभावाचा युरोपच्या ऑटम बद्द्ललचा) युरोपचे फोटो मस्त आलेत. हिरवळीत काहीसा तपकिरीपणा आला आहे पण त्यामुळे हिरवाई जरा गोडच दिसतेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2015 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमको इस्से रंगीला ऑटम देखनेलो मिलेंगा ऐसाईच इच्चा करतई ।

एकदम ऐसाईच...


(जालावरून साभार)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2015 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा

सदर फ़ोटू चोरणेत येत हाये!

काय त्ये फ़ोटू !??? निस्त तरंगायलोय हवेत! इशेषत: थे दुसय्रा फोटूमुळे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2015 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

पर्वा इल्ले. ह्यो फोटू तर आमीबी नेटावर्नच घ्येत्ल्येला हाय !

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2015 - 11:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाटील हो, खटपट्या आणि अजया : अनेक धन्यवाद !

अविनाश पांढरकर's picture

17 Jul 2015 - 11:56 pm | अविनाश पांढरकर

वाचतो आहे.

पद्मावति's picture

18 Jul 2015 - 12:26 am | पद्मावति

योग्य नाव दिलेत. सुंदर...

इशा१२३'s picture

18 Jul 2015 - 8:24 am | इशा१२३

अगदी हेच मनात आले.नदनवनच.
आप्रतिम फोटो.

हिरवागार निसर्ग,शुभ्र बर्फाच्छदित पर्वत बघितलेत .आता शरदात जायला हवे.इतके छान लिहिले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2015 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

अविनाश पांढरकर, पद्मावति आणि इशा१२३ : अनेक धन्यवाद !

@ इशा१२३ : शरदमध्य अथवा मध्यानंतरच्या पहिला आठवडा गाठून जा. म्हणजे रंग पूर्ण बहराला आलेले असतील पण बहुसंख्य पाने झाडावरच असतील.

इशा१२३'s picture

20 Jul 2015 - 12:37 pm | इशा१२३

नक्किच!
या माहितिबद्दल धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jul 2015 - 4:24 am | श्रीरंग_जोशी

मी अमेरिकेत भरपूर फॉल कलर्स पाहिले असले तरी पर्वतराजीतले फॉल कलर्स अन तेही स्वीस आल्प्समध्ये म्हणजे माझ्यासाठी स्वर्गीय सौंदर्यच.

या लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2015 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॅनडात एक जागा आहे... आता नाव विसरलो... पण ते सगळे जंगल शरदात काही आठवडे सर्व जंगलाला आग लागलेली दिसण्याइतकी आश्चर्यकारक लालभडक होते.

पण अनेक रंगाच्या छाटांची नक्षी जंगलभर विखरून टाकणारा स्विस शरद नेत्रसुखद आणि जास्त मनोहर असतो !

जुइ's picture

20 Jul 2015 - 8:18 am | जुइ

फॉल कलर्सचे फोटो खूप सुंदर आले आहेत. स्विस आल्प्सचे फॉल कलर्सचे फोटो म्हणजे एक पर्वणीचं आहे!

वेल्लाभट's picture

20 Jul 2015 - 11:51 am | वेल्लाभट

ओह माय गुडनेस्स....
ओह माय गुडनेस्स

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2015 - 10:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी, जुइ आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद !