बौद्ध, जैन, हिन्दू लेणी व वस्ती स्थाने
अनेकदा विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना जाणवते की त्यातील काही भाग हिन्दू तर काही जैन, बौद्ध वा अन्य धर्मियाच्या भरभराटीच्या काळात बांधले गेले होते.
त्यामुळे त्यांच्या स्थापत्यकलेची छाप त्या त्या भागातील त्या वास्तूंवर जाणवते. वेरूळच्या कैलास लेण्यात असे प्रकर्षाने जाणवते.
लेणी किंवा असे स्थापत्य कलेचे काम सामान्यतः राजाश्रय किंवा धनिक लोकांच्या प्रेरणेतून होत असावे. असे वाटते की धर्मातील शिकवणी जनमानसावर खोलवर रुजवण्यास, बुद्ध, महावीर आदि तीर्थंकरांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा प्रसार व अंगिकार व्हावा आणि ज्यांनी हे स्वीकारले आहे त्यांच्या राहण्याची व पांतस्थांना विश्रामाची सोय आपसूक व्हावी अशा अपेक्षेने ह्या वास्तू निर्माण केल्या गेल्या असाव्यात. मोठ्या संख्येने अनुयायांना ध्यान-धारणा व अन्य धार्मिक अनुष्ठाने करायला सोय असावी या किंवा अशा विविध उद्देशांनी सराया, चैत्य, विहारांची रचना केली गेली असावी. सरपण, शिधा, पिण्याच्या व वापराच्या पाण्याची, भोजन बनवायची, प्रातर्विधीची व्यवस्था काय व कशी होती? दगडात कलाकृती करताना जखमी वा आजारी पडलेल्यांची कशी काय सोय केली जात असे?
भारतात बुद्धांचे विचारधन अनेक शतके मागे पडले इतके की त्या धर्माचे अनुयायी डॉ आंबेडकरांच्या ‘नव बौद्ध धम्म’ संकल्पनेशी जोवर जुळले गेले नाहीत तोवर हा धर्म श्री लंका ब्रह्मदेश, चीन, जपान, आणि अतिपूर्वेतील आशियायी देशातच विविध नावाने व काहीसा फेरफार करून फुलला बहरला. जैन पंथांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात समुद्रसीमा न ओलांडण्याच्या अटीमुळे कदाचित विदेशात गेले नाहीत. तरीही त्यांचे अनेक पंथ-उपपंथ पायी चालायच्या बंधनामुळे बस्त्या व मठ स्थापून राहाताना दिसतात.
कधी कधी प्रश्न पडतो की भारतात बुद्ध, जैन अनुयायांची चलती केंव्हा व कुठवर होती? नंतर असे काय झाले की त्या विचारांचे प्रभावलय कमी होत नष्टप्राय झाले...? हजारोंच्या संख्येने बुद्धांचे, महावीरांचे अनुयायी अशा गूहावजा जागेत राहत असत. अशांची निर्घृण कत्तल झाली असावी? इतके विहार-चैत्य, कोरीवलेणी ज्या काळात तयार झाली त्या काळात त्यावेळच्या राजघराण्यांनी बौद्ध वा जैन धर्म स्वीकारला होता काय? सम्राट अशोकाचे नाव इतिहासाच्या पानांमुळे लक्षात राहते. त्याने आपल्या राज्याचा तो राजधर्म मानला असे आपणास वाचायला मिळते. भारतातील अन्य विशेषतः महाराष्ट्रात अजंठा, वेरूळ घारापुरी आणि किती तरी ठिकाणी डोंगर-दगडात खोदून स्थापत्य केलेले आहे त्यांना राजाश्रय कोणाचा होता? त्या राजघराण्यांची, माहिती व इतिहास कळायला, वाचायला आवडेल.
ती परंपरा का व कशी खंडित झाली असावी? मुस्लिम राजसत्तांचे आघात असे एक कारण असले तरी अनेकदा आपापसातील वैर व वैचारिक कलह ही यात सहभागी असतील. या सर्वाचा आढावा इथल्या तज्ज्ञांनी घ्यावा व आमच्या ज्ञानात भर टाकावी ही विनंती.
प्रतिक्रिया
6 Jun 2015 - 4:30 pm | कंजूस
शशिकांतकाका प्रश्नांचा आवाका फारच मोठा आहे हो.शिवाय अडीच हजार वर्षांचा काळ लेण्यांसाठी पाहावा लागेल.जैन आणि हिंदु धर्माचा विचार साडेचार हजार वर्षांचा आहे.काही कालखंडाचा भाग थोडा संदिग्ध आहे तो सोडला तर इतिहासकारांनी बाकीच्या घटनांची सांगड घालण्यात यश मिळवले आहे. मराठीतल्या दोन विश्वकोशांत मिळणारी माहिती आपण पाहिलीत असेलच.इथे सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात संगतवार मिपाकर लिहितील तर एक कायमचा संदर्भलेख घडेल यात शंकाच नाही.
7 Jun 2015 - 6:57 am | योगविवेक
कदाचित वल्ली यांच्या समावेत या विषयावर चर्चा झाली तर बरेच काही समजू शकेल.
7 Jun 2015 - 9:11 am | कंजूस
नक्कीच !!
7 Jun 2015 - 11:44 pm | शशिकांत ओक
कट्ट्यात वल्लींंशी झाली...
शिवाय शरद हार्डीकर सरांशी ही या विषयावर बोलणे झाले त्यांनी वरील धाग्यातील काही भागावर लिहायला हवे म्हटले. वाट पाहू या ...
8 Jun 2015 - 7:52 am | कंजूस
मीही याबद्दल थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे काही याविषयी मूळ संशोधन नाही केवळ निरनिराळ्या ठिकाणाहून वाचलेली ,ऐकलेली माहिती मांडणार आहे.
8 Jun 2015 - 1:35 pm | माहितगार
गूहा आणि किल्ले हे प्रकार ज्ञात इतिहासापेक्षा प्राचीन काळापासून मानवी वापरात असावेत. (तौलनिक) सुरक्षीत रहवास हा गूहा आणि किल्ल्यांच्या वापरा मागचा हेतु असू शकतो. गूहा आणि किल्ल्यांचा वापर कोणत्याही विशीष्ट धर्म पंथापुरता मर्यादीत अथवा प्रचलीत असेल असे वाटत नाही. त्या त्या काळात ज्या ज्या धर्म पंथांचा प्रभाव असेल ते ते लोक त्या त्या काळातील गूहा आणि किल्ल्यात आढळावयास हवेत असे वाटते.
दुसरे असे की किल्ले आणि गूहांचा उद्देश्यच सुरक्षा आणि लपणे असा असावा. उंचावरून खालून येणारी श्वापदे असोत अथवा शत्रू असोत त्यांना परास्त करणे सोपे जात असावे. मध्ययूगातही सर्व सज्ज बादशहा आणि सम्राटांना किल्ले मिळवण्यासाठी महिनोंमहीन्यांचा तळ ठोकल्या शिवाय अथवा आतून फितूरी झाल्या शिवाय किल्ले घेणे शक्य होत नसावे. आख्ख्या भारतावर सत्ता गाजवणार्या मोगलांना दिल्लीहून जवळ असलेला उत्तरांचल प्रदेश घेता आला नाही कारण पहाडी लढाया त्या काळातही कठीण होत्या आजच्या काळातही कठीणच असतात. पर-प्रदेशातून येणार्यांना एकवेळ किल्ले सहज मिळू शकतात सर्व गूहा माहित होणे, धागा लेखक म्हणतो तसे हजारोंच्या संख्येने निघृण हत्या व्हाव्यात एवढे सहज शक्य नसावे. हजारोंच्या संख्येने हत्त्याकरणारे गूहातील पुरावे नष्ट करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत जर पुरावे नष्ट केले गेले नसतील तर जेवढे आर्कीऑलॉजीकल एव्हीडन्स प्राप्त व्हावयास हवेत तेवढे आर्कीऑलॉजीकल एव्हीडन्स पुढे येताना दिसत नाहीत.
मध्ययुगीन काळापर्यंत राजसत्ता कुणाचीही असो राजसत्तेस उत्पन्नाचे मुख्य स्रोत तीन असावेत १) लढायांमध्ये परप्रदेशात केलेल्या लूटी २) दुसर्या राजांकडून घेतलेल्या खंडण्या हि दोन उत्पन्ने केवळ युद्ध काळातच मिळत, शांतता काळात मिळणारे रेग्युलर उत्पन्न परकीय व्यापार्यांवर बसवलेले आयात कर २) नजराणे ३) शेतसारा. हे सांगण्याचे मुख्य कारण हे की शेतसारा हे एक मुख्य उत्पन्न होते ज्यासाठी शेती होणे गरजेचे होते शेती माणूसबळावर अवलंबून होती त्यामुळे सरसकट वांशिक हत्येने राजसत्तेचेच आर्थीक नुक्सान अधिक संभवत असावे. राजसत्तांकडून नियंत्रणासाठी जरब बसवण्यासाठी दहशत बसेल अशा शि़क्षा देणे हा मुख्य मार्ग होता, युद्धकाळात केवळ येणार्या बातम्यातूनच जरब बसावी म्हणून लूटींसोबत अधिक निघृणतेचे प्रदर्शन होत असावे नाही असे नाही. धर्माचा उपयोग सैनिकांच्या निष्ठा टिकवण्यासाठी काही प्रमाणात निश्चित होत असणार पण युद्धकालीन निघृणता राजसत्ताधिशाचा धर्म कोणताही असो ती युद्धकाळात सहसा होत असे अशी उदाहरणे बर्याच धर्मांच्या पार्श्वभूमी असलेल्या राज्यकर्त्यांबाबत मिळतात यात इतरवेळी शांतीप्रीय म्हणवल्या जाणार्या धर्मांच्या अनुयायी (पण प्रत्यक्षात हिंसक मार्गांचा स्विकार केलेल्या) राजांचा सुद्धा समावेश होतो अशी उदाहरणे इतिहासात दिसतात त्यामुळे जोतो काळ ज्या त्या परिपेक्षात बघणे अधिक रास्त ठरावे असे वाटते.
8 Jun 2015 - 5:44 pm | योगविवेक
लावून पाहून प्राचीन काळापासून किल्ले,गूहा,लेणी,सरायाा,नदीच्या काठावरील घाट,समुद्री तटबंद्या याकडे पाहून मोठी चूक तर होत नाही ना?
वैचारिक प्रगल्भता,वैश्विक सत्य शोधायला प्रेरित होऊन सामान्य जीवनाचा त्याग करून जाण्यासाठी लागणारा मनाचा निश्चय,त्यांच्यांकडून केल्या गेलेला अनुभूतीजन्य ज्ञानाला समजून घ्यायला व त्यांचे अनुकरण करायला परिस्थिती निर्माण व्हायला गूहा, लेणी,नद्यांचे घाट,सराया यातील शांत वातावरण आदि गोष्टी युद्धजन्य परिस्थिती पासून दूर राहून तात्कालिक लढाया,वैयक्तिक हेवेदावे या पासून दूर राहण्यासाठी कारणीभूत होत असाव्यात...
8 Jun 2015 - 5:46 pm | प्रचेतस
:)