डोरियन ग्रे
"बिग बॉस मधून एकाचे पलायन"
कॅमेराच्या झगझगाटात
प्रश्नांची सरबत्त्ती..
सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत
तिथेच
आशाळभूतपणे उभी असणारी
झिपर्या केसाची,
पोट खपाटीला गेलेली मुले ..
कुणालाच दिसली नाहीत?
नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा
आणि बघण्याचा हट्ट
वाढतोच आहे...
एक कॅमेराचा झोत गेला की
मागे उरलेल्या अंधारात
अनेक जण सामावतात....
अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात
निवडक काहींना कधी कळणार?
कधी कळणार आम्हालाही?
की .. प्रकाशझोतातल्या प्रत्येक 'डोरियन ग्रे' मागच्या
अंधारात...
कुढत, सडत असतात असंख्य निष्पाप
जणु त्याच्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त घेत असल्यागत!
अगदी जन्मभर...
- सोनाली जोशी
(शेवटच्या काही ओळीतील बदलांकरता विसुनानांचे आभार.)
प्रतिक्रिया
21 Nov 2008 - 6:07 pm | विसुनाना
कविता आवडली.
मुख्यतः कवितेतला संदेश .
वेगळ्या (पक्षी नव्या / सामान्यजनांना फारशा माहित नसलेल्या) प्रतिकाचा वापर केलेला आहे.
अशी प्रतिके नव्या कवितेत यायला हवीत.
आणि
हे नेमके पोचले.
म्हणून आवडली.
पण डोरियन ग्रेचे प्रतिक तितके चपखलपणे वापरले गेले आहे असे वाटले नाही.
स्पष्ट करतो :
'डोरियन ग्रे' स्वतःला चिरतारुण्य प्राप्त व्हावे अशी अपेक्षा करतो. ('ययाति -पुरु')
ती पूर्ण होते. पण त्याच्या कृष्णकृत्यांची छाया मात्र त्याच्या पोर्ट्रेटवर पडत राहाते.
तो तरुण राहतो आणि पोर्ट्रेट मात्र वेडेविद्रे होत जाते. या अर्थाने 'डोरियन ग्रे' खल (अँटागोनिस्ट) आहे. त्याची प्रतिमा नव्हे.
जसा ययाति खल वाटतो. पुरु नव्हे.
या कवितेत -
'डोरियन ग्रे'च चाचपडतात असे म्हटल्यावर खल कोण? असा प्रश्न पडतो. प्रतिमाच अंधारात चाचपडत राहायला हव्यात. प्रतिमाच - पण चित्रातल्या नव्हेत, कालपटलावर जिवंत, तीनमितीय आणि हाडामांसाच्या.
कदाचित ययाति हे प्रतिकही वापरता आले असते आणि ते आपल्या लोकांना जास्त चटकन समजले असते. 'डोरियन ग्रे ' ही कविता इंग्रजीत जरूर अनुवादित करावी.
21 Nov 2008 - 6:13 pm | नंदन
कविता आवडली.
एक कॅमेराचा झोत गेला की
मागे उरलेल्या अंधारात
अनेक जण सामावतात....
अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात
- उत्तम. फक्त डोरियन ग्रेचे रूपक त्या अंधारातील मुलापेक्षा स्वतःच्या प्रेमात बुडालेल्या सेलेब्रिटीला अधिक समर्पक वाटले असते.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Nov 2008 - 5:33 pm | मनिष
कविता आवडली सोनाली!
21 Nov 2008 - 6:17 pm | सुवर्णमयी
डोरियन ग्रे वापरतांना माझ्या मनात अधिक चपखल काही मिळेल का याचा विचार सुरू होता. ययाति चा विचार डोक्यात आला नाही आणि आता विचार करूनही ययति आणि पुरू इथे वापरता येतील असे मला वाटत नाहीये.
पण त्याच्या कृष्णकृत्यांची छाया मात्र त्याच्या पोर्ट्रेटवर पडत राहाते- तशाप्रकारे काही निवडक माणसांच्या वाईट कामांचे पडसाद अशा हजारो - निष्पाप माणसांच्या यातनामधून उठत आहेत. हे मला सूचवायचे आहे. म्हणून प्रतिमा नाही तर - इतर माणसे असा उल्लेख केला आहे. पण त्यामुळे जर तिच निष्पाप माणसे दुष्ट आहेत असा अर्थ निघत असेल तर प्रोब्लेम आहे:) कवितेवर आणखी काम करून मला कविता सोपी आणि मुद्देसूद करता येईल.
21 Nov 2008 - 6:31 pm | लिखाळ
की वलयामागे
अंधारात
असंख्य 'डोरियन ग्रे' चाचपडत राहतात..
चालतेबोलते- हाडामासाचे .. प्रतिमेतले नाही!
कुणाच्यातरी पापाच परिमार्जन
करत
जन्मभर....
मला डोरियन ग्रे हे रूपक माहित नसल्याने तुम्हाला जे म्हणायचे तसेच कविता वाचताना मला समजले. काही निवडकांनी केलेल्या पापाची फळे भल्तेच कुणी भोगत असतात आणि ते निवडक जेवढे पुष्ट होतील तितके ते हडामासाचे लोक अशक्त... असे काही. हे वाचून मला असे वाटले की डोरियन ग्रे हा कुणी कुपोषित वगैरे मनुष्य असावा आणि विषमतेचा बळी या अर्थाने लोक त्याचा उल्लेख करित असावेत. पण प्रतिसाद वाचून आणि ऑस्कर वाईल्डच्या डोरियन ग्रे या कादंबरीचे वर्णन वाचून माझा समज वेगळा झाला होता ते समजले.
अवांतर : एकिकडे डोंगर असला की दुसरीकडे खड्डा असतोच असे नेहमी म्हटले जाते. पण खड्डा होण्याचा दोष डोगराच्या माथी जातो का? समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेमध्ये हे म्हणणे खरे ठरते का?
कविता चांगली आहे.
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 6:41 pm | सुवर्णमयी
एकिकडे डोंगर असला की दुसरीकडे खड्डा असतोच असे नेहमी म्हटले जाते. पण खड्डा होण्याचा दोष डोगराच्या माथी जातो का? समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेमध्ये हे म्हणणे खरे ठरते का?
>> नाही खड्डा असणे हा डोंगराचा दोष नाही! पण डोंगर कदाचित तो खड्डा दूर करण्यास मदत करु शकतो, निदान डोंगराचे कौतुक करतांना खड्ड्याकडे दूर्लक्ष इतरांनीही करू नये! हा या कवितेमागचा उद्देश आहे, रूपक चुकले असेल, पण त्या रूपकाशिवायही मी या विषयावर लिहायला हवे असे मनात कधीचे होते..
सर्वांच्या परखड आणि प्रामाणिक प्रतिसादासाठी आभार.
सोनाली
21 Nov 2008 - 7:12 pm | लिखाळ
>>निदान डोंगराचे कौतुक करतांना खड्ड्याकडे दूर्लक्ष इतरांनीही करू नये! <<
छान.. बरोबर आहे...
उत्तरासाठी आभार..
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या चार ओळी त्यानंतरच्या चार ओळी आवडल्या.
एकीकडे असे तर दुसरीकडे काही तरी तसे, असा एक स्तरातला फरक मग तो सामाजिक असू दे की कोणताही तो कवयत्रिने शब्दबद्ध केला ते आवडले, बाकी प्रतिसादात डोरीयन ग्रे बद्दल आपण लिहिले म्हणून ते कळले, नसता बाकीचे संदर्भ जरा डोक्यावरुनच गेले असते.
-दिलीप बिरुटे
21 Nov 2008 - 7:17 pm | ऋषिकेश
डोरीयन ग्रे कविता आवडली.. :)
- ऋषिकेश
21 Nov 2008 - 7:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इतर प्रतिसादकर्ते आणि कवयित्री यांच्या प्रतिसादांमुळे समजण्यास मदत झाली.
21 Nov 2008 - 8:24 pm | मुक्तसुनीत
कविता आवडली. वाईल्डच्या "पिक्चर ऑफ डोरियन ग्रे"चे रूपक चांगल्या रीतीने वापरले आहे असे वाटले.
या ( आणि कवयत्रीच्या या मागच्या "पाण्यावरच्या" ) कवितेमधून आर्थिक दरी , असमतोल, अंधारात चाचपडणार्या कोट्यावधींच्या पार्श्वभूमीवर मूठभर लोकांचे इन्टरेस्ट्स जपणे , समाजातल्या "आहे रे" वर्गाचे "नाही रे " वर्गाकडे केले गेलेले संपूर्ण दुर्लक्ष या सार्या बद्द्ल कवीयत्रीच्या मनात पडलेले प्रतिबिंब दिसते.
बाकी "सेलेब्रिटीज्"च्या मानसिकतेबद्दल वाईल्डच "डोरियन ग्रे" मध्ये बोलतो : " . . . there is only one thing in the world worse than being talked about, and that is not being talked about."
"घटं भिद्यात् , पटं छिद्यात् " काहीही झाले तरी "प्रसिद्धी : पुरुषो" मिळवण्याचा आजचा जमाना !
21 Nov 2008 - 11:05 pm | धनंजय
पण डोरियन ग्रेची उपमा थोडक्यात हुकली असे वाटते. पण असे ठामपणे सांगणेही मला कठिण जाते आहे. सुवर्णमयीच जाणतात :
त्यामुळे त्या जो काय बदल करतील तो समर्पक असेल अशी मला खात्री आहे.
माझ्या मते उपमा अशी असू शकते :
प्रकार एक : डोरियन ग्रे = समाज; त्याची दृश्य प्रतिमा = झगमगाटातले प्रसिद्ध लोक; लपवलेली प्रतिमा = कंगाल दुष्काळ
प्रकार दोन : डोरियन ग्रे = प्रसिद्ध लोक; त्याची दृश्य प्रतिमा = झगमगाटातली प्रतिमा; लपवलेली प्रतिमा = त्यांचे कुरूप अंतःकरण
...
21 Nov 2008 - 11:58 pm | सुवर्णमयी
मी पहिल्या पर्यायाची निवड करेन.
सर्वांच्या प्रतिसादाकरता मनापासून आभारी आहे.
(काय चुकत आहे कळतय, पण कस बरोबर करायच ते पण करता येऊ दे-लवकर)
22 Nov 2008 - 12:04 am | मीनल
आधी बंपर गेली.
पुन्हा पुन्हा वाचल्यावर शिवाय प्रतिक्रियांमुळे समजली.
प्रतिकात्मक असल्यामुळे समजावून घ्यावी लागली.सहज सोपी अशी नाही.
पण मेसेज उत्तम दिला आहे.
मीनल.
22 Nov 2008 - 12:52 am | प्राजु
कवितेतला विषय समजण्यासाठी डेरियन ग्रे अगदी चपखल बसले आहे रूपक.
धनंजय यांनी तर आणखी सोपी करून सांगितली आहे. कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Nov 2008 - 10:26 am | विसोबा खेचर
सह्ही कविता..!
22 Nov 2008 - 2:47 pm | जयवी
सोनली.... कविता खूप आवडली.
डोरियन ग्रे बददल मात्र माहित नव्हतं. विसुनाना....धन्यवाद :)
22 Nov 2008 - 5:08 pm | दत्ता काळे
कविता आवडली