अहल्येची रामायणातील दुसरी कथा

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
8 Apr 2015 - 8:23 am

श्री. विवेक पटाईत यांचा अहल्येवरचा लेख वाचावयाला सुरवात केल्यावर सुखावलो होतो. श्री. विवेक मूळ रामायणावरून, तेथील संदर्भ देऊन, लिहत असल्याने "कादंबरीती"ल व्यक्तीचित्रे वाचतांना खटकणारे वाचावे लागणार नाही असे वाटत होते. पण पुढे पुढे गेलो तसे जाणवले की "अरे, हे तर आपण वाचलेल्या "रामायणा"तील नाही." आता रामायण व महाभारत यांचे खंड हाताशीच असतात. बालकांड, सर्ग ४८-४९ वाचावयास सुरवात केली आणि काहीच जुळेना. वैतागलोच. मिपा बंद असल्याने त्यांचा लेख समोर ठेवून तपासणेही शक्य नव्हते. पण शेवटी त्यांनीच आमच्या बंद कुलुपाची चावी दिली. "हरि अनंत, हरिकथा अनंता" त्यांचे "वाल्मीकि रामायण" निराळे व माझ्याकडील " वाल्मीकि रामायण " वेगळे. माझ्याकडे पं. सातवळेकर यांनी संपादित केलेले स्वाध्याय मंडळ, पारडी यांनी छापलेले रामाय़ण (संस्कृत व मराठी भाषांतर) प्रथम प्रकाशन १९५८ ९ खंड ही पुस्तके आहेत. वरदा प्रकाशन यांनी हेच भाषांतर प्रसिद्ध केले आहे. श्री विवेक त्यांच्याकडील रामायणाची माहिती देतीलच. आता तुम्ही म्हणाल " तुमच्याकडील पुस्तकांचे कळले हो, इथे त्याचा काय संबंध ? पुस्तकांची जाहिरात करावयाची ही जागा नाही." मान्य. संबंध असा की श्री. प्रसाद प्रसाद लिहतात त्याप्रमाणे श्री. पटाईत यांची गोष्ट, आपणास माहीत असते त्या मराठी गोष्टीपेक्षा, निराळी आहे व मी जी गोष्ट सांगणार आहे ती आणखीनच निराळी आहे. मी संस्कृत श्लॊक देत नाही, त्याची गरज दिसत नाही. भाषांतर विश्वसनीय आहे, विश्वास ठेवा.(सदाशिव पेठेतील संशयखोरांनी घरी येऊन पुस्तक बघावे !)
(विश्वामित्र रामाला आश्रमाची माहिती देत आहेत )
हा आश्रम महात्मा गौतम ऋषींचा होता. पूर्वी त्या गौतममुनींनी अहल्येसहवर्तमान अनेक संवत्सरसमुहपर्यंत तपश्चर्या केली. एकदा गौतममुनि आश्रमांत नाहीत, अशी संधी साधून सहस्रनयन इंद्र गौतममुनींचा वेष घेऊन आश्रमात आला आणि अहल्येला म्हणाला, "हे सुंदरि, तुझ्याशी समागम करावा अशी माझी इच्छा आहे " हे रामा, हा गौतमाचा वेष धारण करून आलेला इंद्र आहे, हे जाणूनही, प्रत्यक्ष देवराज इंद्रही आपल्या सौंदर्यावर लुब्ध होऊन आला आहे याचे कौतुक वाटून व देवांच्या समागमाचे सुख कसें असतें, हें पहावे , म्हणून त्या दुर्मति स्त्रीने त्याच्याशी रममाण होण्याचे मनांत आणिले. (समागम झाल्यावर) प्रसन्न मनाने ती त्या इंद्राला म्हणाली, "हे सुरश्रेष्ठा, मी कृतकत्य झालें, आता आपण येथून त्वरित जा आणि गौतममुनीपासून आपण स्वत:चे व माझे सर्वप्रकारे रक्षण करा." इंद्र पर्णकुटिकेतून गौतमाची मनांत भीति बाळगून लगबगीने बाहेर पडत आहे तो महामुनी गौतम आश्रमांत प्रविष्ट होतांना त्याच्या दृष्टीस पडले. आपला वेष धारण करणार्‍या दुराचारी इंद्राला पाहून गौतममुनि क्रोधाने त्याला म्हणाले, "हे दुर्बुद्धे, माझा वेष धारण करून ज्याअर्थी तूं हें निंद्य कृत्य केले आहेस त्या अर्थी वृषणरहित होशील." इंद्राचे वृषण तत्क्षणी भूमीवर गळून पडले. याप्रमाणे इंद्राला शाप दिल्यावर गौतममुनींनी आपल्या भार्येलाही शाप दिला कीं, "इतर कसल्याही प्रकारचा आहार न करतां केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप करीत तूं हजारो वर्षे या ठिकाणीच वास्तव्य कर, व कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता (कोणासही तोंड न दाखवता) तू येथेच आश्रमामध्ये पडून रहा. राम जेव्हा या वनांमध्ये येईल, तेव्हाच हे दुराचारिणी लोभमोहरहित बनलेली अशी तूं त्याच्या आदरतिथ्याने शुद्ध होऊन आनंदाने माझ्या समीप प्राप्त झाली असतां पूर्ववत सर्वांच्या दृष्टीस पडण्यायोग्य होशील",
आता दोन गोष्टींमधील महत्वाचे फरक बघा.
(१) इंद्र गौतमांना घाबरत होता. गौतम नाहीत तेव्हाच तो वेष पालटून येतो इद्राला शासन करण्याइतके तपोबल गौतमाकडे होते.
(२) इंद्राला अहल्येने ओळखले होते. तिचे कृत्य जाणीवपूर्वक होते. ती "कृतकृत्य" झाल्याचे स्वत: म्हणते व इंद्राने स्वत:ला व तिलाही गौतमाचे क्रोधापासून वाचवावे असे म्हणते.
(३) अहल्येने स्वत: पश्चात्ताप करत, कोणालाही तोंड न दाखवता एकांतवासाची शिक्षा भोगावयाची आहे. इथे लोकापवादाशी संबंध नाही.
(४) शाप वृषण गळून पडण्याचा आहे. सहस्रभगाचा नाही. अहल्या प्रथम ही त्याला सहस्रनयन म्हणत आहे.
(५) अहल्येने रामाचे आदरतिथ्य करून शुद्ध व्हावयाचे आहे. मिठी मारणे केवळ अप्रस्तुतच नव्हे तर अनाचरणीय आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर पं. सातवळेकर यांनी दिलेली गोष्टच जास्त सुसंगत, पटणारी वाटते.
आणखी एक गंमत. रामायणाच्या उत्तरकांडात अहल्येची गोष्ट परत येते.तेथे इंद्र अहल्येवर बलात्कार करतो व त्याला त्याचे फळ भोगावे लागते असे म्हटले आहे. पण ही उघड उघड प्रक्षिप्त कथा आहे.
अहल्येची कथा थोड्याफार फरकांनी लिंगपुराण, गणेशपुराण, ब्रह्मपुराण, पद्मपुराण स्कंदपुराण, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, यां ठिकाणी आहे. पण शरदबुवांचा वेळ संपला आहे.
शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Apr 2015 - 9:11 am | प्रचेतस

सहमत आहे.
मजकडे डॉ. प्र. न. जोशी यांनी संपादित केलेली वि. म. बु. कं. ची संस्कृत व मराठी अशी द्विभाषांकित प्रत आहे. शरदकाकांच्या उपरोक्त लेखातील संदर्भ ह्या प्रतीतही अगदी तसेच आहेत.

विवेकपटाईत's picture

3 Jun 2015 - 11:59 am | विवेकपटाईत

प्रिय शरदराव,
अहल्या उद्धाराची कथा बालकांडच्या ४८ आणि ४९ या दोन सर्गात आहे. (३३ + २२=५५ श्लोकांमध्ये आहे) आपण ही कथा संपूर्णपणे वाचली नाही आहे. ४९ सर्गातील १३-२२ श्लोक वेगळीच कथा सांगतात. (पुन्हा एकदा वाचा)
आपल्याला माहितच आहे आपले ग्रंथ श्रुती आणि स्मृतीवर आधारित होते. काळानुसार त्यात बदल होत गेले. अश्यावेळी रामायण रचण्याचा वाल्मिकींचा मूळ हेतू -अन्याय करणार्यांना दंड हा मिळालाच पाहिजे मग तो दशरथ असो व रावण २. सबका साथ, सबका विकास- मग जनाजातीय असो, शिकलेले बुद्धिमान .पण शस्त्रधारी ब्राह्मण (राक्षस) मानव इत्यादी - लक्षात घेऊन मी ४९ सर्गाच्या १३-२२ श्लोकांच्या आधारावर कथा रचली आहे. याच सर्गातल्या १७ आणि १८ श्लोकात राम आणि लक्ष्मणाने अहल्येचे चरण स्पर्श केले आहे. (सर्व प्रकाशित वाल्मिकी रामायणांत हेच सापडेल- पुन्हा एकदा वाचा). नंतर शास्त्रीय रीतीने अहल्येने राम आणि लक्ष्मण यांचे पाद्य, अर्घ्य अर्पित करून त्यांचे स्वागत केले. देवतागण प्रसन्न झाले (१९) का? कारण स्वर्गीय देवता एका निर्दोष स्त्रीवर लागणारा कलंक धुऊ शकत नव्हते. त्या साठी पृथ्वीवर राज्य करणारा राजाच लागतो. गौतमच्या अधीन राहणारी अहल्या तपाच्या शक्तीने विशुद्ध स्वरूपाला प्राप्त झाली. (२०) अर्थात गौतमाने अहल्येचा त्याग केला नव्हता. ते तिथेच त्या आश्रमात होते. तिचे निर्दोषत्व समाजाने स्वीकार केल्यावर गौतमाने आनंदाने तिचा स्वीकार केला. महातेजस्वी महातपस्वी गौतम अहल्या पुन:प्राप्त करून सुखी झाले (२१) आणि पत्नीसह तपस्येला सुरुवात केली.
माझा प्रयत्न मूळ कथा शोधण्याचा होता. ४८ आणि ४९ सर्गातील आधीचे श्लोक बहुधा नंतरच्या काळात जोडले गेले असतील. बहुधा स्त्रीच दोषी आहे, पुरुष नाही (निर्भया कांडच्या अपराध्यांचे ही हेच म्हणणे आहे) हे सिद्ध करण्यासाठी.
रामाने राक्षसी ब्राह्मणी सत्ते विरुद्ध समाजाच्या दलित आणि शोसित वर्गाला एकत्र केले होते. आपण विचार करा शबरीचे उष्टे बोर खाणारा राम 'शंबूक वध' करू शकत होता का?

प्रचेतस's picture

3 Jun 2015 - 12:04 pm | प्रचेतस

शबरीची कथा रामायणातील एका सर्गात असूनही त्यात बोरांचा कसलाच उल्लेख नाही शिव्य शबरीला तपस्विनी मानले गेले आहे.
शंबूकाचा उल्लेख येथे गैरवाजवी ठरावा कारण संपूर्ण उत्तरकाण्डच प्रक्षिप्त आहे.

पैसा's picture

3 Jun 2015 - 1:28 pm | पैसा

रामाने राक्षसी ब्राह्मणी सत्ते विरुद्ध समाजाच्या दलित आणि शोसित वर्गाला एकत्र केले होते.

साहेब, तुम्ही काही हजार वर्षांपूर्वीच्या काळाला आजच्या चष्म्यातून बघता आहात. त्या काळची जातिव्यवस्था जन्मावर आधारित नव्हती तर कर्मावर आधारित होती आणि यजन, अध्ययन-अध्यापन करणारे बहुसंख्य सामान्य ब्राह्मण हे अत्यंत दरिद्री असावेत असे वाटते. उदा. द्रोण-अश्वत्थाम्याची कथा. रामायणातील शंबूक वध वगैरे सगळेच भाग प्रक्षिप्त वाटतात. त्याबद्दल विचार करायचेही कारण नाही.

अर्धवटराव's picture

3 Jun 2015 - 9:45 pm | अर्धवटराव

रामाने राक्षसी ब्राह्मणी सत्ते विरुद्ध समाजाच्या दलित आणि शोसित वर्गाला एकत्र केले होते. आपण विचार करा शबरीचे उष्टे बोर खाणारा राम 'शंबूक वध' करू शकत होता का?

=)) =))
बरेच दिवसांनी ज्येनुइन कॉमेडी वाचायला मिळाली :)

प्यारे१'s picture

3 Jun 2015 - 11:00 pm | प्यारे१

रामाने......
कुठल्या वृत्त वाहिनीवर ही बातमी आली होती?
की स्टिंग ऑपरेशन केलं गेलं?

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 9:34 am | मदनबाण

हीच कथा ठावूक होती...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

प्रसाद प्रसाद's picture

8 Apr 2015 - 11:14 am | प्रसाद प्रसाद

शंका निरसन केल्याबद्दल आभारी आहे.

चुकलामाकला's picture

8 Apr 2015 - 11:35 am | चुकलामाकला

जसे महाभारतासाठी भान्डारकर इन्स्टीट्युट प्रमाण मानली जाते तसे कुठचे रामायण प्रमाण समजतात?

रमेश आठवले's picture

13 Apr 2015 - 11:54 pm | रमेश आठवले

कॅलिफोर्निया विद्यापीठातील इंडोलोजी व संस्कृत चे प्राध्यापक आर .पि. गोल्ड्मान यांनी रामायणाचे इंग्लिश मध्ये भाषांतर केले आहे. त्यासाठी त्यांनी बडोदा येथील Oriental Institute ने प्रसिद्ध केलेल्या रामायणाला प्रमाण मानले आहे. या बडोदा रामायण आवृत्ति विषयी खालील माहिती जालावर मिळते .
During 1951 to 1975, a Critical Edition of the great epic-Valmiki- Ramayana was prepared and published by the Oriental Institute in seven voluminous books, incorporating seven Kandas namely: Bala, Ayodhya, Aranya, Kishkindha, Sundara, Yuddha and Uttara,with the help of more than 25 assistants, working for 25 years, and with the financial assistance from U.G.C. The Bare Text containing only the constituted text of the Valmiki-Ramayana is also separately published in one book. The Pada-Index of the Valmiki-Ramayana is published in three different volumes.

चुकलामाकला's picture

18 Apr 2015 - 9:19 am | चुकलामाकला

माहितीबद्दल धन्यवाद!

पैसा's picture

12 Apr 2015 - 11:00 pm | पैसा

हीच कथा माहित आहे.

स्पंदना's picture

13 Apr 2015 - 6:54 am | स्पंदना

इंद्राने बलात्कार केला ही माहिती होती, मग कालांतराने त्यात अहिल्येच्या सहभागाची (म्हणजे तीला वाटलेल्या आकर्षणाची) कथा वाचली गेली.
तेंव्हाही अन आताही पडलेला एकच प्रश्न; जर एखादा योगी, मुनी, देव, राक्षस, राजा, योद्धा एखाद्या स्त्रीवर आसक्त झाला आणी त्याने त्या स्त्री ला मागणी घातली, वा तो कसला विवाह? गुपचुप करायचा? तसला विवाह केला, वा तसेच तिच्याबरोबर संबंध ठेवले तर त्याबद्द्ल इतका उहापोह उठत नाही. उलट स्वसामर्थ्याने वा स्वतःची पर्सनॅलीटी वापरुन वा मस्त्यगंधे सारखं तेथे धुक बिक निर्माण करुन, वा कुंती सारख वराबिराच्या नावाखाली त्या स्त्रीचा भोग घेतला याची वाहवा होत असे आणि आहे. पण अहिल्येने मात्र अश्या एखाद्या सुंदर दैदिप्यमान पुरुषाचा शरीरसुखासाठी विचार केला याची मात्र तिच्या बिभस्तनेत, परिनीती व्हावी? स्त्रीला कामसुखासाठी दुसर्‍या कोणाचाही विचार करण्याची मुभा नसावी?

अहल्येने आपले स्वातंत्र्य जपताना गौतमांचा विश्वासघात केला. जिथे मामला दोघांतच असेल तिथे असले काही प्रश्न येत नाहीत. पण आपल्या पत्नीने इंद्र आपल्याहून सुंदर आहे म्हणून आपल्याशी प्रतारणा केली हे गौतमाला अतिशय दु:खकारक वाटले असणार. शिवाय कथेनुसार अहल्येला गौतमाच्या रागाची भीती वाटली, त्याला दुखवल्याबद्दल तिला खेद वाटल्याचे कुठे दिसत नाही. हा स्वार्थीपणा झाला. अशी फसवणूक करण्यापेक्षा अहल्या सरळ गौतमाला सांगून त्याला सोडून गेली असती तर ते बरे झाले असते. पण तिला एकीकडे इंद्र हवा वाटला तर दुसरीकडे गौतमाची पत्नी म्हणूनही मोठेपणा हवा वाटला. जेव्हा तिसर्‍या माणसाला विनाकारण दुखवण्याचा प्रसंग येईल तेव्हा स्वतःचे निवड स्वातंत्र्य जरा मुरड घालून बाजूला ठेवणे श्रेयस्कर असे मला वाटते. अर्थात इतर कोणाचे वेगळे मत असू शकतेच.

स्पंदना's picture

13 Apr 2015 - 1:33 pm | स्पंदना

तस म्हंटल तर, मग या बाकिच्या राजा, मुनीवरांच्या पहिल्या स्त्रीया नव्हत्या का? होत्या! त्यांच्या विश्वास्घाताची का बरे चर्चा नाही?
हं आता अहिल्येने "माय चॉइस" म्हंटल अस म्हणुन तिच्यावर राग शाप आणी एकटेपणाची शिक्षा!! पण मग अशीच शिक्षा कोणत्याही पुरुषाला झालेली दिसत नाही.

अवतार's picture

13 Apr 2015 - 9:30 pm | अवतार

हे वास्तवावर आधारित कथानक वाटत नाही. त्यातील बहुतांश सर्वच व्यक्तिरेखा ह्या समाजाला नैतिक(?) वळण लावण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण केल्या गेल्या आहेत. रामायणात तत्कालीन समाजात (आणि आजही) प्रचलित असलेल्या पुरुषी वर्चस्वाची झाक स्पष्ट दिसून येते.
रामाने जर युद्धानंतर सीतेला कोणतेही आढेवेढे न घेता स्वीकारले असते तर रामाला खरोखरच महानायकाचा किंवा ईश्वरी पुरुषाचा दर्जा प्राप्त झाला असता काय?
शूर्पणखा राक्षसकन्या नसून जर अप्सरा असती तर लक्ष्मणाला तिचे नाक कापता आले असते काय?
अहिल्येला रामाचा पदस्पर्श नाकारण्याचे स्वातंत्र्य होते काय?
कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, कोण नीतिमान आणि कोण अनैतिक, कोण जगण्यायोग्य आणि कोण मारण्यायोग्य ह्याची अचूक मांडणी करण्यासाठी रामायणातील पात्रे सरळ काळ्या-पांढऱ्या रंगांमध्ये रंगवली आहेत. त्यांना वास्तवातील राखाडी छटेचा स्पर्श देखील नाही. तत्कालीन सामाजिक विचारधारांचे प्रतिबिंब म्हणूनच रामायणाकडे पाहता येईल.

प्रचेतस's picture

13 Apr 2015 - 9:37 pm | प्रचेतस

पूर्णपणे सहमत.

विवेकपटाईत's picture

3 Jun 2015 - 8:14 pm | विवेकपटाईत

श्री राम मर्यादापुरषोत्तम होते. माता समान ऋषीपत्नीला चरण स्पर्श करणे मर्यादाच विरुद्ध आहे. वाल्मिकी रामायणात रामाने अहल्येचा चरण स्पर्श केला आहे.

राघवौ तु तदा तस्याः पादौ जगृहतुर्मुदा ।
स्मरन्ती गौतमवचः प्रतिजग्राह सा हि तौ
(बालकांड ४९/१५)
श्री राम आणि लक्ष्मण यांनी अहल्येचा चरणांना स्पर्श केला. (श्री तुलसीदासाच्या रामायणाचा प्रभावामुळे व दूरदर्शन वर पाहिलेल्या मालिकांमुळे रामायण न वाचल्यामुळे हा भ्रम निर्माण झाला आहे).

या कथेत रुपकार्थ का बरे घेतला जात नाही?

तो काळ आर्य-अनार्य संघर्ष व संक्रमण काल समजल्यास व त्यात व्यक्ति विशिष्ठ नावे न घेता मूळ वैदिकांना अभिप्रेत रुपके जुळवुन बघा ना...

राम हा एक न्यायप्रिय शूर राजा होता. ('देव' नव्हे, तर त'माणूस') आर्य-अनार्य संकरा दरम्यानचा हा काळ समजुया. (बघा हं, वेदोक्त देव वा जागतिक स्तरावर आर्य रंगाने गोरे होते तर राम 'श्यामल' आहे)
या उत्तर भारतीय आर्य-अनार्य संयुक्त वंशाच्या (आणि जेताच नाव मिरवत असल्यामुळेच आर्य नामाभिधानित) राजाचा दक्षिणेकडचा प्रवास , उत्तर-दक्षिण संस्क्रुति मिलनाचे विवरण म्हणजे रामायण होय.

त्याच्या खूप पूर्वीची मध्य भारतातील क्रुषी संस्क्रुति काही काळ लोप पावलेला, कमी लोकसंख्येचा, भकास व ओसाड वा खडकाळ प्रांत, तेथिल जमिन म्हणजे 'अहल्या' नव्हे काय? (हल म्हणजे नांगर) यामागे इंद्राचे भोगकर्म वा बलात्कार म्हणजे खुप पुर्वीचे आर्यांचे आक्रमण व तदद्देशियांचा निर्वंश कारण असावे. (बघा हं, वेदांत इंद्र हे आर्य समूहनायकाचे पद आहे, अनार्यांची नगरे-पुर नष्ट करतो म्हणुन 'पुरंदर' म्हटले आहे...)

तसेच, इंद्र हा पर्जन्याचा नियंत्रक देवता हा उत्तर वैदिक विचार मानल्यास कदाचित अतिव्रुष्टी वा जलप्रलय व नंतर सरस्वती नदी आटल्याप्रमाणे अफाट दुष्काळ ही एक नैसर्गिक दीर्घापत्तिही त्या प्रदेशाला 'अहल्या' अर्थात क्रुषीसाठी अयोग्य करु शकते.

येथे रामाचा पदस्पर्श म्हणजे उपरोक्त अधिक बुद्धिमान नागर लोकांचा प्रवेश व त्यांनी सहयोगाने केलेला त्या प्रांताचा विकास नव्हे का? कदाचित रामाच्या याच सहकारी व्रुत्तीमुळे तेथिल व इतरकडील मध्य व दक्षिण भारतीय जनता त्याला सामील झाली... (त्यांना वानर हे ज्ञातिनाम समजावे)

अहल्येची कथा ही रुपकार्थ समजा, राम नावाच्या चांगल्या राजाने केलेला संस्क्रुति मिलाप लक्षात येईल.

प्रतिसाद अपेक्षित .....!

प्रचेतस's picture

3 Jun 2015 - 9:41 am | प्रचेतस

रामाकडून अहल्योद्धार हा दक्षिणेकडे येताना झाला नसून तो उत्तरेकडे मिथिलानगरीच्या दिशेने झाला आहे त्यामुळे उत्तरेचे आर्य आणि दक्षिणेचे अनार्य हे गृहितक येथे कोसळून पड़ते आहे.

ब्याट्या तुझ्याकडला श्लोक टाक रे इथे!! ;)